ऐका गणेशदेवा तुमची कहाणी

पैसा's picture
पैसा in विशेष
18 Sep 2013 - 7:33 am
श्रीगणेश लेखमाला २०१३

ऐका गणेशदेवा तुमची कहाणी.
निर्मळ मळे, उदकाचे तळे, बेलाचा वृक्ष, सुवर्णाची कमळे.
विनायकाची देवळे, रावळे.
मनचा गणेश मनी वसावा.
हा वसा कधी घ्यावा?
श्रावण्या चौथी घ्यावा, माही चौथी संपूर्ण करावा.
संपूर्णाला काय करावे?
पशा पायलीचे पीठ कांडावे. अठरा लाडू करावेत.
सहा देवाला, सहा ब्राम्हणाला, सहाचं सहकुटूंब भोजन करावे.
अल्प दान, महा पुण्य
असा गणराज मनी ध्याइजे, मनी पाविजे, चिंतीले लाभिजे.
ही पांचा उत्तरांची कहाणी पांचा उत्तरी सुफळ संपूर्ण.

**********

श्रावणात प्रत्येक वारी त्या त्या वाराची कहाणी आजी वाचायची. त्या कहाणीच्या आधी ही गणेशाची कहाणी नेहमी वाचायची. आजीला तर ही कहाणी पाठच होती. कोणत्याही कामाची सुरुवात म्हणजे श्रीगणेशा करायचा तर गणपतीचे नाव घेणे परंपरेत आवश्यक समजले जाते ना, म्हणूनच ही लहानशी गणेशाची कहाणी. अगदी साधी सोपी. मोजक्या शब्दात गणपतीच्या राऊळाचे वर्णन आहे. निर्मळ मळे उदकाचे तळे. बेलाचा वृक्ष आहे. म्हणजे शिवाचे देऊळ कुठेतरी जवळपास असणार. तळ्यात सुवर्णकमळे आहेत. आणि तळ्याशेजारी विनायकाचे देऊळ आहे. गणपतीचे विनायक हे नाव पुराणांमधे आणि बौद्ध तंत्रात वापरले गेले आहे.

कहाणी सांगते की "मनचा गणेश मनी वसावा." त्या विनायकाला मनात वसवा. त्यासाठी एक व्रत सांगितले आहे. सहा महिन्यातल्या एकूण ७ चतुर्थ्यांना विनायकाचे पूजन करावे आणि व्रत पूर्ण करताना लाडूंचा प्रसाद करावा. मग ते लाडू देवा-ब्राह्मणाला देऊन बाकीचे आपण खावेत. हे बरं आहे. म्हणजे ब्राह्मणांची मस्त सोय आहे! "मनी ध्याइजे, मनी पाविजे, चिंतिले लाभिजे" ही भाषा पाहिली तर रामदासांची किंवा जरा आधीची अशी वाटते.

बाकी कहाण्या "साठां उत्तरांची कहाणी पांचा उत्तरी सुफळ संप्रूण" असतात. पण ही कहाणी मात्र "पांचा उत्तरांची कहाणी पांचा उत्तरी सुफळ संपूर्ण" असं सांगितलं आहे. कारण बाकी कहाण्या मुळात मोठ्या असून संक्षिप्त केल्या आहेत. पण गणेशदेवाची कहाणी मात्र मुळातच संक्षिप्त आहे हे त्याचं कारण!

**********

कहाणीसारखा दुसरा लोकप्रिय प्रकार म्हणजे आरत्या. पैकी "सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची" बद्दल आपण प्यारे१ ने विस्ताराने लिहिलेलं वाचलं. परंपरेनुसार ती आरती संत रामदासांनी रचलेली. रामदासांच्या नावावर मारूतीची आणि इतर काही आरत्या आहेत. या आरत्यांबरोबर माझ्या आजीची आवडती आणखी एक आरती होती. विशेष म्हणजे ती हिंदीत आहे. माझ्या आजीला हिंदी येत नव्हतं पण ही आरती तिला पाठ होती. तिचे ऐकून आम्ही पण म्हणायला लागलो.

*******

शेंदूर लाल चढायो अच्छा गजमुखको । दोंदिल लाल बिराजे सुत गौरीहरको ।।
हात लिये गुडलड्डू सांई सुरवरको । महिमा कहे न जाय लागत हूं पदको ।।१।।
जय जय जी गणराज विद्यासुखदाता । धन्य तुम्हारा दर्शन मेरा मन रमता ।।ध्रु०।।

अष्टौ सिद्धी दासी संकटको बैरी । विघ्नविनाशक मंगल मूरत अधिकारी ।।
कोटीसूरजप्रकाश ऐसी छबि तेरी । गंडस्थलमदमस्तक झूले शशिबहारी ।।जय०।।२।।

भावभगतिसे कोई शरणागत आवे । संतत संपत सबही भरपूर पावे ।।
ऐसे तुम महाराज मोको अति भावे । गोसावीनंदन निशिदिन गुण गावे ।।जय०।।३।।

*******

आता शोध सुरू झाला हे गोसावीनंदन कोण? शोधताना डॉ. केतकरांच्या ज्ञानकोषात त्रोटकशी माहिती मिळाली. ती पुढीलप्रमाणे.

गोसावीनंदन.- याचें नांव वासुदेव असून बापाचें नांव गोस्वामी (गोसावी) होतें. हा तंजावरकडील राहणारा असून याचे गुरु गोपाळश्रमगजानन नांवाचे होते. अर्वाचीनकोशकार याच्या गुरूंचें नांव निरंजनस्वामी असें देतात. याचा काल इ. स. १६५०-१७०० चा होय. याचा मुख्य ग्रंथ ज्ञानमोदक नावाचा असून शिवाय सीतास्वयंवर व अभंग, पदें वगैरे स्फुटकाव्य बरेंच आहे. यांचीं स्तोत्रें व अष्टकें लहान मुलांनां शिकतां येतील अशीं सोपीं व साधीं आहेत; हा गाणपत्य होता. [महाराष्ट्रसारस्वत].

********

म्हणजे ही आरतीसुद्धा शिवाजीमहाराजांइतकी जुनी निघाली! मग पार्थिव गणेशाची पूजा किती जुन्या काळापासून सुरू असावी? सुरुवात कधी झाली नक्की ते सांगता येणार नाही. घाटावर ही प्रथा पेशव्यांच्या काळापासून सुरू झाली असे म्हणतात. पण कोकणांत तर फार पूर्वीपासून पार्थिव गणेशाची पूजा सुरू होतीच. पेशव्यांच्या आधीपासून हे नक्कीच. याला एक अप्रत्यक्ष पुरावा आहे.

गोव्यात पोर्तुगीजांच्या छळाला भिऊन पणजीतले कामत, हेदे आणि इतर काही घराण्यांत पार्थिव गणपतीऐवजी कागदाच्या गणपतीची पूजा सुरू झाली. त्यांच्या दप्तरांमधे, कुलवृत्तांतामधे याबद्दल लिहून ठेवलेले आहे. हा काळ १५६० ते १६०० हा असावा. कारण १५६० मधे गोवा इन्क्विझिशनची सुरुवात झाली. त्या काळात पोर्तुगीजांना प्रत्यक्ष विरोध न करता काही हिंदू लोक तगून राहिले. त्यांच्या घरातून मुख्यतः 'कागदाचा गणपती' पहायला मिळतो.

याला दुजोरा देणारी हकीकत माझ्या सासर्‍यांकडून ऐकली आहे. ते गोव्यातले कामत. पोर्तुगीजांच्या छळाला कंटाळून आणि कुलदैवताचा नाश झाल्यानंतर गोव्यातले घर, गाव सोडून पळाले ते थेट रत्नागिरी जिल्ह्यात येऊन पोचले. त्याच काळात काही घराणी कर्नाटकात मंगलोरकडे स्थलांतर करून गेली. तर काही रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर आणि आसपासच्या प्रदेशात येऊन पोचली.

तर हे कामत घराण्यातले काहीजण पोटाच्या पाठीमागे भटकत देवधे गावात येऊन पोचले. तिथल्या कुणा गद्रे नावाच्या माणसाला तो गाव सोडून जायचे होते. त्याने आपले राहते घर या कामतांच्या पूर्वजाना दिले, ते त्यांच्याकडून एक वचन घेऊन. की आपल्या घरात दिवाबत्ती झाली पाहिजे आणि गणपती आणला गेला पाहिजे. ती प्रथा अजूनपर्यंत टिकून आहे. याचाच अर्थ हा, की पोर्तुगीज येण्यापूर्वी कोकणात सर्वत्र पार्थिव गणपतीची पूजा सुरू होती.

*************

गणपती ही मूळ अनार्यांची देवता. साधारण चौथ्या पाचव्या शतकात म्हणजे गुप्तकाळात त्याला वैदिक धर्मात स्वीकारायची प्रक्रिया सुरू झाली आणि चालुक्य, शिलाहार, यादव यांच्या काळात, म्हणजे साधारण ९ व्या शतकापासून हळूहळू त्याला प्रमुख दैवतांत स्थान मिळत गेले असे समजले जाते. याच सुमारास गाणपत्य हा एक पंथ तयार झाला. नंतर ११ व्या १२ व्या शतकांत बांधलेली गणपतीची देवळे आढळून येतात. तोपर्यंत बहुधा गणपती दरवाज्याच्या पट्टीवरच अथवा सप्तमातृकांसह दिसून यायचा! या दरम्यान किंवा जरा नंतर पार्थिव गणेशाची पूजा करायची पद्धत सुरू झाली असावी.

*********

गणपतीला सर्व विद्या आणि कलांचा अधिपती मानल्यामुळे सगळ्या लोकसाहित्यात गणपतीच्या प्रार्थना सापडतात. मग ते तमाशातले गण गौळण असो की त्याहीपूर्वीच्या दशावतारी खेळ्यातले सुरुवातीलाच येणारे गणपती चे सोंग असो. संत-तंत-पंत सगळ्या कविश्रेष्ठांना गणपतीचे रूप भावले. आणि त्यांनी आप आपल्या साहित्यात त्याला स्थान दिले.

खेळ्यातला गणपती येतो तो "पहिले नमन, देवा करीतो वंदन" च्या तालावर नाचत, आणि तमाशातला गण येतो तो "आधी गणाला रणी आणिला नाहीतर रंग पुन्हा सुना सुना" म्हणत. ओव्या, भूपाळ्या, भारूड, अशा सगळ्या प्रकारच्या लोकसाहित्यात गणपतीचे स्तवन हा आवडता प्रकार दिसून येतो.

तसाच अनेक संतांच्या अभंगांमधे गणपतीचा उल्लेख येतो. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांच्या शब्दात पाहिले तर

ओम नमोजी आद्या, वेद प्रतिपाद्या|
जय जय स्वसंवेद्या, आत्मरूपा|
देवा तूचि गणेशु, सकलमतिप्रकाशु|
म्हणे निवृत्तीदासू, अवधारीजो जी||

तर पंत कवींच्या रचनांपैकी

नेत्री दोन हिरे, प्रकाश पसरे, अत्यंत ते साजिरे|
माथा शेंदुर पाझरे वरी बरे, दुर्वांकुरांचे तुरे|
माझे चित्त विरे, मनोरथ पुरे, देखोनि चिंता हरे|
गोसावीसुत वासुदेव कवि रे, त्या मोरयाला स्मरे||

ही रचना अत्यंत प्रसिद्ध आहे.

**********

अशी अनेक उदाहरणे शोधू जाता सापडतील. गणपतीची पूजा, त्यात घुसलेली कर्मकांडं ते सगळं समजा आवडत नसेल तरी गणपतीच्या निमित्ताने सगळे नातेवाईक गावच्या घरी एकत्र भेटतात. त्या निमित्ताने घर साफ होतं. गप्पाटप्पा होतात. शेजारी भेटतात. पोरंबाळ जोरजोराने आरत्या म्हणतात, फटाके बिटाके लावून मजा करतात, हे काय थोडं झालं! इतर धर्मियांच्या ईद, थँक्स गिव्हिंग असल्या सणांची सुद्धा आपल्याला मजा वाटते, तर गणपतीच्या निमित्ताने आपली पोरं मजा करतात तर करू द्या की थोडी!

सार्वजनिक गणपती लो. टिळकांनी ज्या उद्देशाने सुरू केले तो उद्देश कधीच साध्य झाला. पण नंतर बदलत्या रूपात सार्वजनिक गणपती सुरूच राहिले. त्यातलं बरंवाईट अनेक जागी चर्चिलं गेलं आहे. पुनरुक्ती करत नाही. आजच्या बदलत्या काळात गणपती आणायचा का, कसा, किती दिवस, निसर्गाला कमीत कमी त्रास देऊन परंपरा जपणं कसं साध्य करता येईल यावर प्रत्येकाने आप आपला विचार करावा. गणेशाच्या आद्य कहाणीत म्हटल्याप्रमाणे "मनचा गणेश मनी वसावा" हेही बरोबर.

आज अनंतचतुर्दशी. पार्थिव गणेशाला निरोप द्यायची वेळ आहे. त्याबरोबर या वर्षीच्या श्रीगणेश लेखमालेचा समारोप करायची वेळ आली आहे. श्री गणेशाचं पुढच्या वर्षी आगमन होईल तेव्हा परत भेटूच! तोपर्यंत आमच्या कोकणातल्या पद्धतीप्रमाणे गार्‍हाणं घालते.

जय देवा गणपती गजानना,

सालाबादप्रमाणे,

मिसळपाव संस्थळाच्या घरात,

लेकीसुना-मुलाबाळांसह

नारळ आणि मोदक अर्पून

भक्तीभावाने तुझी सेवा केली आहे.

ती गोड मानून घे

चुकलं माकलं पदरात घे

आणि

या वर्षापासून पुढच्या वर्षापर्यंत

राखणदार हो!

******

होय देवा म्हाराजा!!

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

18 Sep 2013 - 7:35 am | मुक्त विहारि

ओळख...

स्पंदना's picture

18 Sep 2013 - 7:49 am | स्पंदना

होय देवा महाराजा!

नऊ मोत्यांचे माळ गुंफलीस बघ पैसाताई. एक एक विचार अगदी मौलीक!

या वर्षीच्या गणेश लेखमालेचा सगळा भार पैसाताईने अगदी समर्थपणे उचलल्याबद्दल पैसाताईचे आभार अन अभिनंदन!

पैसा's picture

18 Sep 2013 - 8:34 am | पैसा

कौतुक केल्याबद्दल धन्यवाद अपर्णा! कोणी तरी उभं राहिलंच असतं. मिपा परत परत बंद पडत असल्याने यावर्षी पूर्वतयारीला फारसा वेळ मिळाला नाही. एवढ्या थोड्या वेळात आधी फार पूर्वसूचना न देता इतके सगळे लेख १० दिवस सातत्याने देणार्‍या तुम्हा लेखकांचे आणि ते वाचून त्यावर उत्तमोत्तम प्रतिसाद देणार्‍या वाचक प्रतिसादकांचे या निमित्ताने इथेच आभार मानते!

दुसर्‍या घरच्या गणेशमूर्तींच्या स्पर्धेलाही उदंड प्रतिसाद लाभत आहे. हा तर रथ जगन्नाथाचा. शेकडों हजारों हात लागतात आणि रथ आपोआप चालत रहातो! पुन्हा एकदा सर्वांचेच धन्यवाद!

निवेदिता-ताई's picture

18 Sep 2013 - 8:10 am | निवेदिता-ताई

सुंदर

अजया's picture

18 Sep 2013 - 8:39 am | अजया

पैसाताई, मिपाचा गणेशोत्सव साजरा झाला लेखमालेमुळे.तुम्हा सर्व लेखक आणि संपादक मंडळींचे आभार आणि अभिनंदन.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Sep 2013 - 9:15 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेख आवडला. मराठी आरत्यात हे ''शेंदूर लाल चढायो अच्छा गजमुखको'' कुठुन आलं असा प्रश्न पडायचा त्याचं उत्तर मिळालं. आभार.

पह्यलं नमन करितो वंदन...हे तुनळीवर खूपच आधुनिक तालासुरात ऐकायला मिळालं. (माझ्या तर अंगात येऊन घुमायला लागावं असा मुझीक वाटलं.) :)

आमच्या औरंगाबादला दिलीप खंडेराय आणि त्यांच्या गृपने यावर उत्तम नृत्य बसवलंय अनेक वर्षापासून ते उत्तम कार्यक्रम सादर करतात त्याची आठवण पह्यलं नमनानं झाली.

अपर्णासारखंच म्हणतो... ''या वर्षीच्या गणेश लेखमालेचा सगळा भार पैसाताईने अगदी समर्थपणे उचलल्याबद्दल पैसाताईचे आभार अन अभिनंदन '' *good*

-दिलीप बिरुटे

वेल्लाभट's picture

18 Sep 2013 - 9:22 am | वेल्लाभट

केवळ सुरेख!

छान लिहिलंय! वाचूनच 'गणेशमय' वाटलं.

सुधीर's picture

18 Sep 2013 - 9:31 am | सुधीर

सुंदर! लेख आवडला.

कोमल's picture

18 Sep 2013 - 10:39 am | कोमल

मस्त..

छान ओळख.. :)

चित्रगुप्त's picture

18 Sep 2013 - 12:00 pm | चित्रगुप्त

अतिशय सुंदर लेख.
"गोसावीसुत वासुदेव कवि रे"... आणि "गोसावीनंदन निशिदिन गुण गावे" यातील 'वासुदेव' एकच ना?
आणखी कोणत्या पंतकवींने गणेशावर रचना केल्या आहेत?

अतिशय छान समारोप पैसाताई.
श्री बिरुटे सरांनी म्हणल्याप्रमाणे तुम्ही समर्थपणे ही लेखमाला यशस्वी केलीत त्याबद्दल अभिनंदन.
(माझ्यासारख्या लिहिता न येणार्‍याकडून सुध्दा तुम्ही या लेखमालेत लिहवून घेतले त्याबद्दल इथेच आभार मानतो :) )

प्यारे१'s picture

18 Sep 2013 - 2:22 pm | प्यारे१

मी पण असेच म्हणतो.

बॅटमॅन's picture

18 Sep 2013 - 2:44 pm | बॅटमॅन

लेख मस्त आवडला. संक्षिप्त आढावा मस्त घेतला आहे. कागदाच्या गणपतीबद्दल नव्यानेच माहिती कळाली. "सिंदूर लाल चढायो" चा लेखक गोसावीनंदन पाहताच महाराष्ट्र सारस्वताचा रेफरन्स देण्यासाठी हात शिवशिवत होते पण ते काम लेखातच पुढे झाल्याने त्याची गरज उरली नाही. :) एनीवेज़ सारस्वतामधील संबंधित भागाची लिंक इथे डकवत आहे. पान क्र. ५३० व ५३१ मध्ये त्रोटक माहिती आहे.

पान क्र. ५३१ वरच्या तळटीपेत पाहिले असता दिसेल, की "नेत्री दोन हिरे" या श्लोकातला "गोसावीसुत वासुदेव कवि रे" म्हंजे गोसावीनंदन नव्हे, तर पेण येथील एका हरिदासाचा पूर्वज आहे.

अवांतर: "गणानां त्वां गणपतिं हवामहे कविं कवीनाम्" हे ऋग्वेदातले सूक्त शङ्करपार्वतीसुत गजमुखाचे नव्हे.

अवांतर: "गणानां त्वां गणपतिं हवामहे कविं कवीनाम्" हे ऋग्वेदातले सूक्त शङ्करपार्वतीसुत गजमुखाचे नव्हे

ते ब्रह्मणस्पतीला उद्देशून आहे.

बाकी लेख अतिशय उत्तम.
श्री गणेश लेखमालेचा सुयोग्य समारोप.

बॅटमॅन's picture

18 Sep 2013 - 4:31 pm | बॅटमॅन

रैट्ट सार!

प्रसाद गोडबोले's picture

20 Sep 2013 - 3:05 am | प्रसाद गोडबोले

अवांतर: "गणानां त्वां गणपतिं हवामहे कविं कवीनाम्" हे ऋग्वेदातले सूक्त शङ्करपार्वतीसुत गजमुखाचे नव्हे.

ब्र्ह्मणस्पति म्हणजे आपला गजमुख गणपति नव्हेच असा काही ठाम पुरावा आहे का ?

प्रचेतस's picture

20 Sep 2013 - 9:11 am | प्रचेतस

ब्र्ह्मणस्पति म्हणजे आपला गजमुख गणपति नव्हेच असा काही ठाम पुरावा आहे का ?

आहेत की.

पुरावे त्याच सूक्तात पुढे आहेतच. बृहस्पतीला उद्देशून हे सूक्त आहे.

गणानां तवा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमम |
जयेष्ठराजं बरह्मणां बरह्मणस पत आ नः षर्ण्वन्नूतिभिः सीद सादनम ||
देवाश्चित ते असुर्य परचेतसो बर्हस्पते यज्ञियं भागमानशुः |
उस्रा इव सूर्यो जयोतिषा महो विश्वेषामिज्जनिता बरह्मणामसि ||
आ विबाध्या परिरापस्तमांसि च जयोतिष्मन्तं रथं रतस्य तिष्ठसि |
बर्हस्पते भीमममित्रदम्भनं रक्षोहणंगोत्रभिदं सवर्विदम ||
सुनीतिभिर्नयसि तरायसे जनं यस्तुभ्यं दाशान न तमंहो अश्नवत |
बरह्मद्विषस्तपनो मन्युमीरसि बर्हस्पते महि तत ते महित्वनम ||
न तमंहो न दुरितं कुतश्चन नारातयस्तितिरुर्न दवयाविनः |
विश्वा इदस्माद धवरसो वि बाधसे यं सुगोपा रक्षसि बरह्मणस पते ||
तवं नो गोपाः पथिक्र्द विचक्षणस्तव वरताय मतिभिर्जरामहे |
बर्हस्पते यो नो अभि हवरो दधे सवा तं मर्मर्तु दुछुना हरस्वती ||
उत वा यो नो मर्चयादनागसो.अरातीवा मर्तः सानुको वर्कः |
बर्हस्पते अप तं वर्तया पथः सुगं नो अस्यै देववीतये कर्धि ||

समुदायांचा प्रभु म्हणून तूं गणपति, तूं ज्ञानीजनांत अत्यंत ज्ञानी; ज्यांची कीर्ति अतिशय उत्कृष्ट त्यांच्यामध्येंही तूं श्रेष्ठ. तूं राजाधिराज, तुला आम्ही आदरानें बोलावतो. हे स्तुतींच्या प्रभो ब्रह्मणस्पते, आमची हांक ऐकून आपल्या सर्व शक्तीसह त्वरेनें ये आणि ह्या आसनावर विराजमान हो.

हे बृहस्पते, हे परमात्मन्, देवांनाही तुझ्या ज्ञानशालित्वामुळेंच यज्ञामध्यें हविर्भाग प्राप्त आहे. आणि देदीप्यमान सूर्य जसा आपल्या तेजानें उषेची प्रभा उत्पन्न करतो, तसा तूंच एक आमच्या सर्व प्रार्थनास्तोत्रांचा उत्पन्न कर्ता आणि पिता आहेस.

निंदक आणि अंधकार ह्या दोहोंनाही आपल्या तेजानें नाहींसे करून टाकून, सत्यधर्माचा जो तेजोमय रथ त्याच्याचमध्यें बसून तूं जात असतोस. हे बृहस्पते, तो सत्याचा रथ उग्र असून दुष्टांचा नाश करणारा, राक्षसांचा उच्छेद करणारा, ज्ञानरूप धेनूंना कोंडून धरणार्‍या दुर्गांचा विध्वंस करणारा आणि स्वर्ग मिळवून देणारा असा आहे.

तूं लोकांना सदाचरणाच्याच मार्गांनी नेऊन त्यांचे रक्षण करतोस. जो तुझी अनन्य भावानें भक्ति करतो त्याला पातक किंवा क्लेश हे स्पर्शही करूं शकत नाहींत. तूं ब्रह्मद्वेष्ट्याला त्राहि त्राहि करून सोडून, त्याचा क्रोध निरर्थक करतोस. तेव्हां हे बृहस्पते, हा तुझा मोठाच महिमा होय.

हे ब्रह्मणस्पते, भक्तरक्षणाविषयीं अत्यंत तत्पर असा तूं ज्या भक्ताचें संरक्षण करतोस त्याला पातकाची बाधा होत नाही, त्याच्यावर कोठून कसलेंही संकट येत नाहीं, आणि दुष्ट शत्रु काय किंवा कपटी नीच काय, कोणीही त्याच्यावर आपला पगडा बसविला असें कधींही होत नाही. कारण सन्मार्गापासून भ्रष्ट करणार्‍या सर्वच दुरात्म्यांना तूं आपल्या भक्तांपासून दूर हांकून लावतोस.

सर्वद्रष्टा असा तूं आमचा त्राता आणि सन्मार्गदर्शक आहेस. तुझ्या आज्ञेवरूनच आम्ही माननीय अशा स्तोत्रांनी भजन करीत असतों, म्हणून हे बृहस्पते, आमचा घात करण्याकरितां जो कोणी आमच्याशी कौटिल्य लढवील, त्याची ती दुष्ट क्रिया खाडकन् त्याचाच नाश करो.

अथवा आमच्याशी वैर धरणारा व गर्वानें ताठून जाऊन परवित्ताचा अपहार करणारा जो जो मनुष्य आम्हांला, तुझ्या निरपराधी भक्तांना पेंचात आणूं पाहील त्याला, हे बृहस्पती, तूं आमच्या वाटेंतून कायमचा काढून टाक आणि देवसेवा आमच्या हातून व्हावी म्हणून आमचा मार्ग सुगम कर.

प्रसाद गोडबोले's picture

20 Sep 2013 - 11:00 am | प्रसाद गोडबोले

पण ह्यात तो गजमुख नव्हता असे कुठे म्हणले आहे ?

( मी केवळ क्युरीयॉसिटी म्हणुन विचारतोय , बाकी वैदिक काळातले लोक खुपच प्रॅक्टीकल असल्याने ब्रह्मणस्पती हा अग्नि इंद्र वरुण ह्यांसारखा कॉमन मॅन असणार असे मलाही वाटते )

गजमुख आहे/नाही असा संदर्भ कै मिळाला नै. पण वेदांमध्ये अधिक शोधता शोधता बृहस्पतीला ७ मुखे आहेत असा काहीसा एक श्लोक मात्र मिळाला.

बर्हस्पतिः परथमं जायमानो महो जयोतिषः परमे वयोमन |
सप्तास्यस तुविजातो रवेण वि सप्तरश्मिर अधमत तमांसि ||

बृहस्पति प्रथम आविर्भूत झाला तो आकाशस्थ महत् तेजाच्या वर जो अत्युच्च प्रदेश आहे तेथे प्रकट झाला. सप्त वृत्तें हीच त्याची सात मुखें असून तो जातीचाच बलाढ्य आणि सात प्रकारच्या किरणांनी मंडित आहे. त्याने आपल्या नुसत्या फुंकारासरशींच काळोखाचा विध्वंस करून टाकला.

हा अजून एक श्लोक

तं शग्मासो अरुषासो अश्वा बर्हस्पतिं सहवाहो वहन्ति |
सहश चिद यस्य नीलवत सधस्थं नभो न रूपम अरुषं वसानाः ||

कल्याणप्रद, आरक्तवर्ण, असे अश्व जोडी जोडीनेंच बृहस्पतीला इकडे घेऊन येतात. त्या अश्वांचे ठिकाण कोणते म्हणाल तर शत्रुदमन सामर्थ्य जेथें प्रकट होते तो लोक. जणों काय पक्षांचे निवासस्थानच; असे ते अश्व, आकाश जसें निरनिराळे वर्ण धारण करते, त्याप्रमाणें आरक्त वर्णाचे तेज धारण करतात.

कुठे अश्व, कुठे मूषक नै का?

बाकी ही बृहस्पतीची मूर्ती येथे पहा.

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Sep 2013 - 12:19 pm | डॉ सुहास म्हात्रे

बृहस्पति प्रथम आविर्भूत झाला तो आकाशस्थ महत् तेजाच्या वर जो अत्युच्च प्रदेश आहे तेथे प्रकट झाला. सप्त वृत्तें हीच त्याची सात मुखें असून तो जातीचाच बलाढ्य आणि सात प्रकारच्या किरणांनी मंडित आहे. त्याने आपल्या नुसत्या फुंकारासरशींच काळोखाचा विध्वंस करून टाकला. हे तर सात रंगांच्या लहरींनी तयार होणार्‍या प्रकाशाच्या पहिल्या किरणाचे वर्णन आहे. हे बिग बँगचे वर्णन तर नाही ना? ;)

प्रचेतस's picture

20 Sep 2013 - 12:25 pm | प्रचेतस

हा हा हा. =))

अगदी अगदी.

सूड's picture

20 Sep 2013 - 2:20 pm | सूड

ब्रम्हणस्पति आणि बृहस्पति एकच काय??

प्रचेतस's picture

20 Sep 2013 - 2:23 pm | प्रचेतस

हो.

सस्नेह's picture

18 Sep 2013 - 4:06 pm | सस्नेह

समारोपाची कहाणी शंभर उत्तरी सुफळ संपूर्ण.

अत्रुप्त आत्मा's picture

18 Sep 2013 - 4:47 pm | अत्रुप्त आत्मा

+१ :)

शेंदूर लाल चढायो..सारखिच अजुन १ आरती आंम्ही म्हणतो..

नाना परिमळ दूर्वा शेंदुर शमिपत्रे,लाडू मोदक अन्ने परिपूरित पात्रे।
ऐसे पूजन केल्या बीजाक्षर मंत्रे,अष्टही सिद्धि नवनिधि देसी क्षणमात्रे॥

अनन्न्या's picture

18 Sep 2013 - 4:37 pm | अनन्न्या

श्री गणेश लेखमालेतील सारेच लेख माहितीपूर्ण!

स्मिता.'s picture

18 Sep 2013 - 5:29 pm | स्मिता.

खूप छान आणि माहितीपूर्ण लेख आहे पैसाताई!
दरम्यानच्या काळात कार्यबाहुल्यामुळे या लेखमालेतील इतर लेख अजून वाचले नाहीत. समारोपाच्याच लेखाने सुरुवात झाली पण ती सुरुवातच इतकी सुरेख आहे की आताच इतरही लेख वाचून काढते.

वा! भरपूर माहिती समजली. हा लेख आणि सगळी लेखमाला आवडली. धन्यवाद.

सुबोध खरे's picture

18 Sep 2013 - 6:30 pm | सुबोध खरे

गणपतीच्या निमित्ताने सगळे नातेवाईक गावच्या घरी एकत्र भेटतात. त्या निमित्ताने घर साफ होतं. गप्पाटप्पा होतात. शेजारी भेटतात. पोरंबाळ जोरजोराने आरत्या म्हणतात, फटाके बिटाके लावून मजा करतात, हे काय थोडं झालं! इतर धर्मियांच्या ईद, थँक्स गिव्हिंग असल्या सणांची सुद्धा आपल्याला मजा वाटते, तर गणपतीच्या निमित्ताने आपली पोरं मजा करतात तर करू द्या की थोडी!
अगदी योग्य. लेखातील माहिती छान आहे. बाकी या आरत्या वर्षानुवर्षे म्हणत आलो पण त्याची पार्श्वभूमी आज समजली.

राघवेंद्र's picture

18 Sep 2013 - 7:29 pm | राघवेंद्र

पैसाताई, सुंदर माहितीबद्दल आभार.
श्री गणेश लेखमालेबद्दल संपुर्ण संपादक मंडळीचे आभार !!!
राघवेंद्र

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Sep 2013 - 9:26 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर सांगता. बरीच माहिती मिळाली... बर्‍याचदा हे माहिती नाही हेही माहिती नसते !

चैतन्यकुलकर्णी's picture

19 Sep 2013 - 11:44 pm | चैतन्यकुलकर्णी
नाखु's picture

20 Sep 2013 - 8:38 am | नाखु

लेख आणि लेखाचा समारोप एकदम "कडक" अभिनंदन एका "स्तुत्य" लेखमालेबद्दल

रुमानी's picture

20 Sep 2013 - 10:01 am | रुमानी

लहानपणापसुन हे सर्व अतिशय भक्ति-भावाने करत आलो पण आज ते आपल्यामुळे उत्तम रित्या समजले.

माहितिपुर्ण लेखासाथि आभार .......! :)

बॅटमॅन's picture

20 Sep 2013 - 2:33 pm | बॅटमॅन

वल्लीचे प्रतिसाद आवडले.

अनिरुद्ध प's picture

20 Sep 2013 - 5:41 pm | अनिरुद्ध प

सहमत

कवितानागेश's picture

21 Sep 2013 - 12:38 am | कवितानागेश

होय देवा म्हाराजा!! :)

पाषाणभेद's picture

22 Sep 2013 - 9:33 pm | पाषाणभेद

khupach navin maahiti milali. Vaali na aadhic pranam kela hota aataahi karato.

(This reply is also act as a sample to tell editors that I can't able to type in Marathi Font.)