गेले ते दिन गेले...!!

स्पंदना's picture
स्पंदना in विशेष
17 Sep 2013 - 6:06 am
श्रीगणेश लेखमाला २०१३

काय सांगु मंडळी! काय दिवस होते!! अर्थात आमच्या लहाणपणीचे. लहाणपणीची गोष्ट्च निराळी. सारेच अनुभव नवे! सारं विश्वच नवलाईने भरलेले. सुदैवाने माझा जन्म नव्या टेक्नॉलॉजीला फास्ट ट्रॅक लाभायच्या आधीचा. साधासा रेडीओ बरंचस मनोरंजन अन खुप सारी माहीती घेउन यायचा. बुधवारचं, अन शनिवारच पण बहुतेक, रेडीओवरच नाटक ऐकायला मंडळी आतुर असायची. घरातल्यांच्या शांत वातावरणात कोपर्‍यात कुठेतरी रेडीओची हळुवार गाणी लागायची, अथवा बातम्या सुरु असायच्या. असा ढणाणा आवाज करत फारच थोड्यावेळा रेडीओ लावला जायचा. वाद्यांचा अथवा आवाजाचा गलबला हा फक्त भटजी बुवांनी " वाजंत्री बहु गलबला न करणे....." या ओळीचा निषेध म्हणुन एकदम ढणा ढणा वाजवणे या वेळीच दिसुन यायचा.
अश्या वैभवी शांत जीवनात उत्सव म्हणजे खरोखर उत्सवी रुप धारण करुन यायचे. अन असाच उत्सवी असायचा गणपती!
या उत्सवाची सामाजिक कार्य म्हणुन सुरवात जरी लोकमान्य टिळकांनी केली असली; तरी ती सामाजिक भावना गल्लोगल्ली पसरली, ती आमच्याच लहाणपणी! कोल्हापुरात कुठे लक्ष्मीपुरीत व्यापार्‍यांचा, अन मग प्रत्येक पेठेतल्या तालमीचा गणपती बसायचा. शिवाजी पुतळ्याचा कायम एकवीस फुटी गणपती ही सुरवातसुद्धा आमच्याच लहाणपणीची. हा गणपती, गणपती विसर्जनापर्यंत तयार करणे, एव्हढी एकच शर्त असावी त्या मंडळाची. आम्ही एकदा रात्री गणपती पहात फिरत असताना हा गणपती बर्नर लावुन वाळवायच काम सुरु असलेले याची देही याची डोळा पहाणे झाले आहे.
गणेश चतुर्थीची सुरवात ही सकाळी सकाळी "गणराऽऽज रंऽगी नाऽचऽतोऽऽ" न व्हायची. प्रत्येक गल्लीत, प्रत्येक रेडीओवर आपल हेच. मग ती गणपतीची आरती, ती रोज सकाळी अन संध्याकाळी रेडीओवर लागलीच पाहिजे. पुढे दोन चार वर्षांनी "अशी चिक मोत्याची माळ.." या गाण्यानंतर कोळी गीतांचा जमाना सुरु झाला. तोवरही ठिकच म्हणायच. घरात गणपती आणायची गडबड सुरु असायची. स्वयपाक घरात मोदक अन अख्ख्या सडलेल्या गव्हाची खीर हे पक्वान्न असायच. अजुनही पेढे, निदान गणपतीच्या प्रसादात तरी नव्हते. प्रसादात असायचे ताज्या फोडलेल्या नारळाचे काप, साखरेत घोळवुन, पंचामृत अन मोदक. तेंव्हा या मोदकांची अन त्या खीरीची एव्ह्ढी लज्जत नव्हती जी आज जाणवते. प्रत्येक घरात आरतीच निमंत्रण असायच. निमंत्रण म्हणजे आरतीची तयारी ज्या घरात पहिला होइल तो दारात येउन ओरडायचा," ओ बाईच्या आई, माईऽऽ मुलांनो चला आरतीला!" की सगळे धावत त्या घरात शिरत, मग त्यांची झाली की बाजुची, पलीकडची अशी करत करत ही सगळी मंडळी आमच्याही घरात शिरत. एकुण दहा दिवसात स़काळ संध्याकाळ "जय देव जयदेव.." अस निदान पाचसहा वेळा तरी घडायचच. त्यातल्या त्यात आठवतात ते भोगुलकर आप्पा! त्यांच अगदी लंबोदराशी स्पर्धा करणारे दोंद होतं. अन ते आरतीच ताट कायमच त्या भल्यामोठ्या पोटावर धरुन एका हाताने नुसते सपोर्ट करायचे, सगळ्या लोकांचा सूर कुठेही असुदे, यांचा आपला धीर गंभीर ओढुन लावलेला,"जय मंगलमुर्ती.." कायमच सगळ्यांच्या शेवटी ऐकु यायचा. त्यात आणि भर म्हणुन त्यांची लाडकी मनी "डायना" कायम त्यांच्या टाचेला कडाडुन चावत असायची. त्यामुळे एका पायाने तिला बाजुला ढकलत, आप्पांची आरती सुरु असायची. मग अश्याच एखाद्या संध्याकाळच्या आरतीत गणपती बघायला जायचा घाट घातला जायचा.
रात्री आठ किंवा नऊच्या सुमारास गणपती बघायला सारे शेजारी पाजारी मिळुन आम्ही निघत असू. रस्त्यावर दहा-पंधरा जणांचे असे घोळके बिनधास्त फिरत असायचे. कुठे टोळ्या बनवुन धारमाड करणारे ते दिवस नव्हते. साधे कपडे घालुन त्यावर शाली अथवा स्वेटर्स घातलेल्या बहुतेक सगळ्या उत्साही स्त्रीया अन त्यांची १०-१२ वयोगटातली मुले अशी, अन एखाद दुसरा पुरुष म्हणता येइल असा मोठा माणुस असा एकुण थाट असायचा. पुढचा गणपती "इथेच" असल्याने रिक्षा अथवा कोणतेही वाहन बिनकामाचे ठरत असे. मग आपली ११ नंबरची गाडी दामटवत सगळेजण गणपतीच्या मांडवांना भेटी देत रात्री १२-१ पर्यंत फिरत असत. बहुतेक मंडळे लाईव्ह सिन्स "जीवंत देखावे" ठेवत असत. म्हणजे मंडळातली हौशी मंडळी काहीतरी वेषभुषा करुन तासन तास उभी असायची. काहीजण स्टेजच्या खाली बसुन दोर्‍या ओढुन ओढुन काही गाड्या, काही भावल्या हलवण्याचा प्रयत्न करायचे. एकदोनदा त्या गाड्या अडकुन बसल्याने जोरात ओढल्यावर हिसका बसुन प्रेक्षकात येउन पडल्याचेही आठवते आहे. काहीजण सुरेख आरास करायचे. एका मांडवात भक्त प्रल्हादाचा सीन लावला होता. त्यात हिरण्यकशपू प्रल्हादाला उकळत्या तेलात फेकतो अन प्रल्हादाला हातात घेउन विष्णु अवतरतो असा काहीसा यांत्रीक सीन होता. नेमके आम्ही पोहोचलो तेंव्हा काहीतरी बिघडल होतं. मंडळाचा कार्यकर्ता दुसर्‍याला सांगत होता, "आयला काय झालयां कुणास ठाउक, त्यो प्रल्हाद शिजला आंसल आत!"
मग सुरु झाले गणपतीच्या मुर्तीचे वेगवेगळाले अवतार. शिव मुद्रेतला गणपती, विष्णु अवतारातला गणपती, अन चक्क कपिलदेवच्या अवतारातला गणपती (विश्वचषक!)!!
मग आला डिस्कोचा जमाना. ढिंच्याक ढिंच्याक म्युझिकवर मिथुन, जितेंद्र कमल हसन थिरकु लागले. आत्ता पर्यंत ऐकत असलेल्या गाण्यात नव्हती अशी झींग या गाण्यांनी आम्हाला आणली. अन मग राजारामपुरी दुसर्‍या गल्लीत पहिल्यांदा गणपती बसवुन, म्युझीकल लायटींगची आरास केली गेली. घरातुन अगदी पळत पळत जाउन अगदी एकट्याने मी ती रिदम अन झगमगाटाची झिंग अनुभवली आहे. अनेकदा. कोणत गाण बर?...साऽऽरा जमानाऽऽऽ हसिनो़ंका दिवानाऽऽ. मग बरीच पण सगळी अशी ड्र्मबिट असलेली गाणी अन त्याबरहुकुम तालात नाचणारे लाखो लाईटस! त्या बांबुच्या कठड्यांमध्ये भान हरपून उभी असलेली मी. पण तरीही गणपतीत "नाचणे" हा प्रकार नव्हता आला. जास्तीत जास्त लेझीम पथक अथवा झांज पथ़क! दोन्ही हात वर करुन शरीराला जमेल त्या तालात नाचायचा धिटपणा अजुनही अस्तीत्वात नव्हता.(या हात वर करुन नाचण्याचा सगळ्यात वाईट झटका आमच्या गावाला बसला. पाऊस संपला की हलगीच्या तालावर रोज संध्याकाळी घुमणारं लेझीम जाउन, वर्गणी काढुन टेपरेकॉर्डर आणला गेला. आता त्याच्यावर कॅसेटा टाकुन नुसते हात वर करायचे! झालं!)
हे ही दिवस सरले. रस्त्याने चालताना रस्त्यावर बिछावलेल्या नजरेवरुन चालण्याचे अल्लड दिवस आले. तोवर दुसरी गल्ली सहाव्वी गल्ली अन तेराव्या गल्लीचा गणपती ही रित मोडुन प्रत्येक गल्लीचा गणपती झाला होता. गणपतीची म्हणुन कौतुकाने वर्गणी देउन सामाजिक उत्सवाला हातभार लावायचे दिवस सरुन वर्गणीच्या दिवसात दार बंद करुन बसण्याचे दिवस सुरु झाले. एक दोन ठिकाणी तालमिच्या पैलवानांनी स्वतःची पैलवानकी दुसर्‍या तालमिच्या पैलवानांना रस्त्यावर दाखवायला सुरवात झाली. पोरीबाळी घेउन गणपती बघायला जाव की नको असा काहीसा विचार माणसांना पडू लागला. घराघरातुन टी.व्ही अवतरुन बरेच दिवस झाले होते. तरी अजुनही श्रीदेवीचे हावभाव बघुन जनता शरमत होती. चेकाळ अजुन दूर होता. अश्याच दिवसात आम्हा बहिणींना स्कुटरवर बसवुन...चवळीच्या शेंगा होतो आम्ही त्यामुळे तिबल चौबल सिट चालुन जायची...एकदा आमचे मोठे बंधुराज आम्हाला गणपती दाखवायला घेउन निघाले. ( आता ते एकदम असे एव्हढे प्रसन्न कसे काय झाले आमच्यावर? हा एक अजुनही पडलेला प्रश्नच आहे.) सगळ्या घरात मी तशी "दिवटी"! तर पहिले दहा बारा गणपती बघुन आम्ही पोहोचलो शाहुपुरीतल्या कोठल्यातरी गणपतीच्या मांडवात! सिन होता अधांतरी बुवा! मंडळातल एक गोरंगोमटं पोरगं पकडुन त्याला पायघोळ कफनी घालुन एक दंड हातात देउन त्याला अधांतरी बसवल होतं. आता बाकी सारे हा चमत्कार निवांत पहात होते. पण गप्प बसले तर ती मी कसली? मी अगदी पुढे उभी होते. वाकले खाली...अर्थात पहायचे होते ते त्यांनी काय इकडम केलीय ते...पण झाल काय..अशी तरणी पोरगी आपल्याकडे नाही त्या अ‍ॅगलने पहातेय म्हंटल्यावर ते अधांतरी बाबा खुदुखुदु हसु लागले...ते हसु लागले तशी त्यांचे अधांतरी दिव्य आसनही गुदुगुदु लागले. मला तर हसायला निमित्त्यच लागायच. खेळ खल्लास! मंडळातली बाकिची तरुण मंडळी येउन त्या बुवावर खेकसु लागली अन त्यांनी मला तेथुन काढता पाय घ्यायला भाग पाडले. बुवाबाजीचा पर्दाफाश करण्याची माझी ती पहिली वेळ!
परत काही गणपती पाह्यले. तोवर मला दम देउन," गप गणपती बघायचे नाहीतर घरी सोडुन येइन" अस बजावल गेलं होतं. मी ही शहाण्यासारखी मान हलवली होती. मग बाकी सारे गणपती मुकाट पाह्यले. एव्हढ्या गर्दीत अजुनही आठवतय दोन चार धक्के बसले असतील. अजुनही "काय जनावर आहेत!" असे उद्गार बाहेर पडत नव्हते. तर शेवटी पोहोचलो गंगावेश तालमीचा गणपती पहायला. जीवंत देखावा! शिशुपाल वध! दोनचार लोक देखावा पहात होते. आम्हीही पोहोचलो! बाजुला कृष्ण हातात फिरत सुदर्शन चक्र घेउन उभा. (ते इलेक्ट्रीक होते) शिशुपालाचे धड मुंडक्याला लालभडक रक्त घेउन उभे. अन जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात शिशुपालाचे शिर! जीभ बाहेर काढुन! त्याचे डोळे अजुन जीवंत! पण झाल काय? त्या जीवंत डोळ्यांना दिसल्या दोन तरुण मुली. अन त्यात ही त्यातली एकजण ते लकाकलेले डोळे पाहुन भुवया उंचावतेय! आता मरणप्राय वेदना होताना कुणी मुली पाहील का? हे मुंडक पहात होत. मी नजरेला नजर मिळवली अन त्या मुंडक्याला हसु फुटल. आता मुंडक हसतय म्हंटल्यावर मला पा. पा. नि. म्हणतात ना? तस काहीसं. एकुण सिनचा पार बट्ट्याबोळ झाला राव! अगदी मुंडक नसलेल्या धडाला सुद्धा वाकुन हसु फुटल, अन किस्नातराव सुदर्शनचक्रासह परागंदा झाले. ज्येष्ठ भ्राता हसत अन रागवत अश्या दोन्ही टोकाच्या भुमिका बजावत होते. तेंव्हा गणपती पहायला मिळाले ते शेवटचे !
आजही आठ्वल तरी जाणवत ते; आमच्याच सारखे निरागस असणारे तरुण! लाजरे! भावनावश होणारे! तारुण्याच्या ओढीला आदराचा लगाम घालणारे तरुण! सुंदर दिसणार्‍या मुलीला चोरुन पहाणारे तरुण! गल्लोगल्लीच्या तालमित संध्याकाळी जोर बैठका घालायची खुमखुमी असणारे, कॉलेज करुन लवकरात लवकर चार पैसे कमवावे अशी धारणा असणारे, त्या जाणीवेखाली चिरडुन निघणारे तरुण! चुकुन कुठे घरातल्या व्यक्तींबरोबर दिसल की खुदकन हसणारे...त्यावेळी अगदी वेगळ्या ग्रहावरचे पण आज मनापासुन उमजणारे तरुण! काय चुकलं? कुठे चुकलं? देव जाणे! पण सगळ चुकायला सुरवात झाली ती ही आमच्याच काळात!

__/\__
अपर्णा

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Sep 2013 - 6:57 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सेम टू सेम आमच्याकडेही थोड्याफार फरकाने असेच अनुभव होते. आमच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडळात आम्हीही असे शीन करायचो जाम मजा यायची. आम्ही एकदा डायनासॉर केला होता कामट्या आणि पोत्याला काळ रंग देऊन डोळ्याला लाल लाईट लावले असा आमचा शीन फेमस झाला होता. त्याच वर्षी समुद्रात शिंपले उघडते आणि बाप्पाचे दर्शन होते अशा टाईपचा तो शीन होता. मंडपाच्या वरच्या बाजूला एक दोर टाकून पडद्यामागे बसलेला दोर ओढायचा की शिंपले उघड्ले जायचे. पावसाचे दिवस होते. शीनाचा कार्यक्रम आवरला आणि रात्री पावसामुळे ज्या बल्ली (खांबावर) वर लोड होता ती बल्ली तुटली. आणि वरच्या पत्र्यासहीत आमचं मंडळ आडवं झाला. आमच्या सार्वजनिक मंडळाचा बाप्पा जागेवर आडवा झाला. बाप्पावर ओझं पडून बाप्पाचा एक हात बाजूला. दुस-या दिवशी समोरच्या बाजूने पडदा टाकून बाप्पा दर्शन बंद केले. दुसरा दिवस बाप्पाला उभं करण्यात आणि हात जोडण्यात गेला.. जसं काहीच घडलं नाही इतक्या संयमाने. सायंकाळपर्यंत बाप्पा व्यवस्थित बसले. आणि आम्ही पुन्हा नव्या जोमाने.... सायंकाळी शिंपले उघड-झापचा शीन नव्या उत्साहाने सुरु केला. 'गेले ते दिन गेले'

-दिलीप बिरुटे

पैसा's picture

17 Sep 2013 - 8:40 am | पैसा

मस्त लिहिलं आहेस! एकेक अपघात वाचून हसून लोळतेय! लै भारी!! त्याच बरोबर शेवटच्या वाक्यांनी चटकाही लावला. सगळंच चुकत गेलंय. आणि सुधारणं हाताबाहेर आहे हेही उमजतंय.

पण सगळ चुकायला सुरवात झाली ती ही आमच्याच काळात!

अजया's picture

17 Sep 2013 - 8:58 am | अजया

मस्तच किस्से गं एकेक! लहानपणचे दिवस अगदी नजरेसमोर उभे केलेस.

प्रचेतस's picture

17 Sep 2013 - 9:15 am | प्रचेतस

झकास लेख आणि आठवणी.

विटेकर's picture

17 Sep 2013 - 9:34 am | विटेकर

छान झालाय लेख ! पूर्वीच्या गणेशॉत्सवाची लज्जत आता राहीली नाही ! अश्याच एका गणेशोत्सवात नारायण पेठेत लक्ष्मी हॉल (?) मध्ये ऐकलेली यशवंत देवांची मैफल ( शब्द प्रधान गायकी ) अजून कानातून जात नाही ( साल बहुधा १९८६ असावे ) त्यादिवशी त्यानी केळीचे सुकले बाग असं काही म्ह्ट्ल की यंव रे यंव !तस पुन्हा जन्मात ऐकायला मिळालं नाही . आजही मैफिली होत असतीलच पण ती मजा नाही !

आजही आठ्वल तरी जाणवत ते; आमच्याच सारखे निरागस असणारे तरुण! लाजरे! भावनावश होणारे! तारुण्याच्या ओढीला आदराचा लगाम घालणारे तरुण! सुंदर दिसणार्‍या मुलीला चोरुन पहाणारे तरुण! गल्लोगल्लीच्या तालमित संध्याकाळी जोर बैठका घालायची खुमखुमी असणारे, कॉलेज करुन लवकरात लवकर चार पैसे कमवावे अशी धारणा असणारे, त्या जाणीवेखाली चिरडुन निघणारे तरुण! चुकुन कुठे घरातल्या व्यक्तींबरोबर दिसल की खुदकन हसणारे...त्यावेळी अगदी वेगळ्या ग्रहावरचे पण आज मनापासुन उमजणारे तरुण! काय चुकलं? कुठे चुकलं? देव जाणे! पण सगळ चुकायला सुरवात झाली ती ही आमच्याच काळात!

मस्त शेवट.

लॉरी टांगटूंगकर's picture

17 Sep 2013 - 10:12 am | लॉरी टांगटूंगकर

लेख अगडबंब आवल्डा!!!
इथे प्रतिसादात अजून काहीतरी लिहावं म्हणून गेले पंधरा मिनीट तसाच बसलोय, पण काहीच सुचत नाहीये :(

(कधीकाळी)
न्यु कॉलेज, शिवाजी पेठ
मन्द्या

मस्तच लेख! "चेकाळ" हा शब्दपण अगदीच आवडला :)

भावना कल्लोळ's picture

17 Sep 2013 - 11:35 am | भावना कल्लोळ

खरेच, मला माझ्या जोगेश्वरी मधल्या चाळीतले दिवस आठवले, ती मज्जा आता खरच नाही, तल्लीन होऊन केलेली आरती नाही, घोळक्याने जमुन गणपती पाहणे नाही……खरेच गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी.

भावना कल्लोळ's picture

17 Sep 2013 - 11:38 am | भावना कल्लोळ

खरेच, मला माझ्या जोगेश्वरी मधल्या चाळीतले दिवस आठवले, ती मज्जा आता खरच नाही, तल्लीन होऊन केलेली आरती नाही, घोळक्याने जमुन गणपती पाहणे नाही……खरेच गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी.

सस्नेह's picture

17 Sep 2013 - 9:23 pm | सस्नेह

अगदी सगळं चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं.
आणि ती वणकुद्र्यांच्या माडीवरून रात्रभर जागून पाहिलेली महाद्वारची विसर्जन मिरवणूक आठवली बघ अपर्णा.
असली मिरवणूक अख्ख्या भारतात नसेल कुठे. मग, लायटिंगसहित अन देखाव्यांसहित विसर्जन .मिरवणूक पाहिलीय का कुणी ?
बाकी गणपती बघता बघता लायनी लावून लायनी मारणारे लोक्स एकदम सह्ही हं !

स्पंदना's picture

18 Sep 2013 - 6:08 am | स्पंदना

अरे! आम्ही स्टुडीओत असायचो. बटाटेवडे खात. अजुन आहे बघ महाद्वारला. नावच आठवत नाही आहे ग! पण आमच्या नातेवाईकांचा आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Sep 2013 - 9:49 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर लेख !

दशानन's picture

17 Sep 2013 - 9:56 pm | दशानन

जब्बरा!!!
आपण कोल्हापुरी लोक ग्रेटच ;)

लेख बरंच मागे घेऊन गेला वाचता वाचता. आमच्याकडे गणपतीचे वेध लागत ते आमच्या आईची मोदकासाठीच्या पीठीची लगबग सुरु झाली की!! म्हणजे बाजारातून नीट शोधून तांदूळ आणून, ते धुवून वाळवेपर्यंत अगदी सगळे सोपस्कार चालायचे. त्यात आईची सुगरण म्हणून ख्याती चाळीतल्या महिला वर्तुळात, त्यामुळे त्यातली एखादी तरी 'वैनी, जरा ते उकडीचं परत एकदा सांगता काय?' असं विचारायला यायची. चतुर्थीचा दिवस उजाडला की वडील आंघोळ वैगरे आटपून नारळ खवायला बसत आणि आई तिची कामं उरकून आधी उकड आणि मग सारण. सुरुवातीला आमची बरीच लुडबूड चालत असे. त्या लुडबूडीतूनच हळूहळू थोडंफार जमू लागलं. त्यात आमच्या घरी विटाळ पाळला जाई. गणपतीच्या दिवसात असं काही झालं की स्वयंपाक वडलांच्या ताब्यात, नेहमी स्वयंपाक करणारी आई तीन्-चार दिवस काही काम न करता फक्त सूचना द्यायची तेव्हा गंमत वाटत असे. हळूहळू आम्हाला जसं थोडंफार स्वयंपाकाचं जमतंय असं वाटलं तसं असं काही झालं की आई लांब उभी राहून सूचना करायची आणि आम्ही तसंतसं करत जायचं.

चाळीत गणपती एकच, मुंब्र्यांच्या घरी!! त्यांच्याकडे गणपती यायच्या दिवशी छान नाजूक पावलं दारापासून ते गणपतीच्या मखरापर्यंत चुन्याने रेखत. मला नेहमी प्रश्न पडत असे ह्यांच्या घरात कोणी लहान बाळ नाही, मग ही लहान पावलं उमटवतात तरी कशी?? जात्याच चौकस, त्यामुळे एकदा त्या आजींना विचारलं की हे कसं करता. त्यांनी अगदी कौतुकानं सगळं सांगितलं. आणखी एक मजा म्हणजे त्यांच्याकडे एक घुंगराची काठी होती, ती फक्त आणि फक्त गणपतीच्या दिवसातच बाहेर दिसे. आरतीला गेलं की ती काठी पटकवण्यासाठी चढाओढ लागे. मग अगदी तासभर आरती.

हळूहळू कॉलेजात वैगरे गर्क झालो, मुंब्रे आज्जींच्या घरी गणपतीत नेहमी आरतीला जायचो ते दोनदा, एकदा आणि हळूहळू बंद झालो. बदलापूरात आलो तसा सगळाच संपर्क तुटला. इथे मात्र नव्या मित्रमंडळीत जुनीच मजा नव्याने सुरु झाली.

तेच मोदक, सारणासाठी नारळ खवायला अजूनही वडलांचून अडतं,उकडीला मात्र भाऊ किंवा मी असतो. लांबून सूचना देणारी आई जरा जास्तच लांब गेलीये. आता गणपतीचे निदान पहिले तीन दिवस तरी याच्या त्याच्याकडे जाण्यासाठी राखून ठेवलेले असतात. वर्षभर नाही भेटलो तरी या दिवसांत भेट होते.

थोडक्यात काय तर माणसं बदलली तरी गणपतीच्या दिवसातली मजा तीच असते !! :)

स्पंदना's picture

18 Sep 2013 - 6:10 am | स्पंदना

तुम्हाला उकड जमते? :)
अन किती साध्या सरळ शब्दात घरच चित्र उभं केलत सुड! मस्त!
जरा थांबा त्या बॅट्याला त्यान काय गमावलय ते सांगुन येते.

स्वाती दिनेश's picture

17 Sep 2013 - 10:10 pm | स्वाती दिनेश

खरंच ग, गेले ते दिन गेले..
तुझ्या लेखाने सगळ्या आठवणी ताज्या झाल्या.
स्वाती

बॅटमॅन's picture

17 Sep 2013 - 10:19 pm | बॅटमॅन

लेख मस्त नॉस्टॅल्जिक. पण

काय चुकलं? कुठे चुकलं? देव जाणे! पण सगळ चुकायला सुरवात झाली ती ही आमच्याच काळात!

हे आपलं काय? बळंच? नक्की कशाला उद्देशून आहे हे समजलं तर बरं होईल नैतर व्हेग सरसकट आक्षेप आहे असे वाटेल. धागाकर्त्रीला तसे म्हणायचे नसावे अशी अपेक्षा.

मोदक's picture

17 Sep 2013 - 10:54 pm | मोदक

सोड ना ब्याट्या..

आपल्या मागच्या पिढीने* सुसाट वेगाने जग बदलताना पाहिले आहे. त्यामुळे त्यांची जडणघडण झालेला काळ आणि आत्ताचा काळ यात भरपूर फरक पडला आहे - हे तुलाही अमान्य नसेल!

तस्मात्.. भावनाओंको समझो. :-)

*एक पिढी = २५ वर्षे असा हिशेब मला ठावूक आहे. येथे २५ च्च वर्षांनी फूटपट्टी न लावता २० वर्षांचा हिशेब लावला तरी फारसा फरक पडणार नाही.

बॅटमॅन's picture

17 Sep 2013 - 11:09 pm | बॅटमॅन

आपल्या मागच्या पिढीने* सुसाट वेगाने जग बदलताना पाहिले आहे. त्यामुळे त्यांची जडणघडण झालेला काळ आणि आत्ताचा काळ यात भरपूर फरक पडला आहे - हे तुलाही अमान्य नसेल!

इथे थोडासा असहमत. आपल्या पिढीइतके झपाट्याने जग बदलताना अजून कुणीच पाहिले नाही. आणि महत्त्वाचे म्हंजे हे सगळे ड्रास्टिक बदल आपल्याला कळणे सुरू होण्याच्या आसपासचे आहेत. तूच पहा, साधारण इ.स. १९८० नंतर जन्मलेल्या पिढीचे आयुष्य २००० सालापर्यंत फार कै बदलले नव्हते. अगदी मी म्हणेन २००४-५ पर्यंत नव्हते. नंतर किती अन कसे बदल झाले ते सर्वांनाच माहिते. मागच्या पिढीसाठी हे बदल बर्‍याच नंतरच्या वयात झालेत. बदलाचा "ग्रेडिअंट" उलट आपल्यासाठी जास्त स्टीप आहे.

मोदक's picture

18 Sep 2013 - 12:20 am | मोदक

हेच बोल्तोय...

आपल्याला बदलांची सवय आहे, किंबहुना बदल नसेल तर आपल्याला चुकल्याचुकल्यासारखे होईल.

साधारण इ.स. १९८० नंतर जन्मलेल्या पिढीचे आयुष्य २००० सालापर्यंत फार कै बदलले नव्हते. अगदी मी म्हणेन २००४-५ पर्यंत नव्हते.

म्हणूनच.

असो..

स्पंदना's picture

18 Sep 2013 - 6:35 am | स्पंदना

हेच तर बॅटमॅन, हेच तर कळणार नाही तुम्हाला. रस्त्यावर चुकुन एखाद दुसरी गाडी बघणारे आम्ही. गर्दी तर नसायचीच. तेच आम्ही गर्दी होउन तरुण झालो. चातुर्मासाच पंचगंगा स्नान करुन दिवस उगवायला परतणार्‍या स्त्रीया पाहणार्‍या आम्ही, श्रीदेवी, जयाप्रदा, मिनाक्षी सारख दिसायचा प्रय्त्न करायला लागलो. ओव्या म्हणायला संकोच वाटु लागला. धोतर,टोपीची टर उडु लागली ती आमच्याच पिढीत. आमच्यापर्यंत साधेपणा, सुसंस्कृत अशी स ची बाराखडी आली होती, तिला बिभस्त करण्यात आम्हीच पुढाकार घेतला. माझ्या लग्नानंतर बरेचजण विचारायचे, नवरा कंप्युटरमध्ये आहे म्हणजे काय? तोवर सगळ समोर घडायचं. तुला वाटत असेल की सगळ्यात जास्त बदल तुमच्या पिढीने पाहिले. पण तुमच्यावेळी टेक्नॉलॉजी फास्टट्रॅकवर ऑलरेडी आहे, होती. आम्ही रेडीओ ऐकत दहा वर्षाचे झालो. केबल यायला वयाची १७-१८ वर्ष उलटावी लागली. माझ्या वडीलांची पिढी तर हे सगळे बदल भांबावुन पहात होती, अ‍ॅडजस्ट करायचा प्रयत्न करत होती, पण या बदलांना बकाल स्वरुप दिलं ते आमच्या पिढीने. आम्ही लागलो लेझीम विसरुन हातवर करुन नाचायला. अब्बा, बिटल्सची धुंदी आम्हाला चढली! मी वर लिहीलं आहे. टिळकांनी १८९४ साली समाजप्रबोधनासाठी सुरु केलेला उस्तव समाज बिघडवण्यासाठी सुरु झाला तो आमच्याच काळात. मी वर लिहीलेलं थोड मन लावुन वाचशील तर कळेल तुला...आख्ख्या राजारामपुरीत दोन गणपती होते, त्या आधीतर फक्त तालमिचा गणपती असायचा. आमच्या आधी ते दोन होते, अन माझ्या ८व्या वर्षापासून १८व्या वर्षापर्यंत दहावर्षात १३ गल्लीत १३ मंडळे झाली. अक्षरश: एका गल्लीत मधला मेन रोड पकडुन दोन दोन मंडळ झाली. अन मग त्या मंडळाच्या वर्गण्या भरताना दम भरु लागला. हा सगळा अतिपणा आला तो आमच्या पासुनच. माझ्या म्हणण्याला पैसाताई, अतिवास सहमत होतात कारण तेंव्हा सुरु झालेली झिंग आज आपल्याला अस्ताव्यस्त समाज देउन गेली आहे. आता हे सावरायच कस हा प्रश्न आज अ‍ॅज अ‍ॅन अ‍ॅडल्ट आम्हाला पडला आहे. देश सोडला म्हणजे माती सुटत नाही रे. जीव तुटतो इतक्या पराकोटीच्या वाईट बातम्या पाहुन. माझी मुलं सुरक्षीत असतील, पण माझी भाचर नाहीत याची बोच जाणवते.
अस वाटत फिराव माघारी अन सुरु करावी ती लेझीम, दांडपट्ट्याची करमणुक, उगा गरबा म्हणुन नाचण्याऐवजी, खेळाव्यात गौरी पुरुषांच्या नजरेआड. अन राखावी आपल्या मातीची बुज. गौरी सोडुन तुफान गरबा खेळणारेही आम्हीच हो!

मालोजीराव's picture

18 Sep 2013 - 1:29 pm | मालोजीराव

तुमच्या काळातले बदल शार्प कॉर्नर सारखे होते तर आमच्या वेळचे बदल हे स्मूद कर्व्ह सारखे आहेत.

बॅटमॅन's picture

18 Sep 2013 - 2:23 pm | बॅटमॅन

वेस्टर्नायझेशन आणि साधेपणाकडून भपक्याकडे जाणे यांची सांगड घातल्यासारखी वाटतेय. तसे अभिप्रेत असेल तर असहमत. बाकी मग भपक्याच्या सुरुवातीबद्दल सहमत.

दादा कोंडके's picture

18 Sep 2013 - 12:02 pm | दादा कोंडके

जुन्या आठवणीचा लेख आवडला.
धागाकर्ती भारताबाहेर रहात असेल तर इतरांपेक्षा अंमळ जास्तच नॉस्टेल्जिक होण्याची परवानगी आहे. तसं नसेल तर ब्याट्म्यान म्हणतो तसा फाउल झालाय. :)

बॅटमॅन अन तुम्हाला मिळुन एकच प्रतिसाद.
वेस्टर्नायझेशन बद्दल बोलायला मी स्वतःच वेस्टर्न स्टायल मध्ये रहातेय. म्हणजे मी भारतात रहात नाही. अगदी सिंगापुरपर्यंत तुम्हाला तुम्ही काय गमावले आहे त्याचा अंदाज येत नाही. नुसता झगमगाट हवा वाटतो, भुरळ घालतो. पण मलेशियात जाउन बघा. अजुन खेडी अन त्यांची संस्कृती तशीच आहे.
मी मेलबर्नला आले अन मला माझं ३० वर्षापुर्वीचे कोल्हापूर परत मिळाले. अन मला जाणवलं, प्रगतीतर यांचीही झालीय, मग त्यांनी मूळ गाभा का नाही गमावला? आपण का गमावला? कारण आपण हुरळुन गेलो. झगमगाटाने. भरीतभर त्यांच्या सिनेइंडस्ट्रीने आपल्या इतका ताळ नाही सोडला. वाईट पहाणारी वागणारी माणसे आहेत नाही असे नाही, पण ते वाईट फक्त वाईट म्हणुन पहातात आपल्याला ते रोजच्या जेवणासारखे भरवले जातेय. लागतात नाचायला. तो बंटी न बबली आला तेंव्हा आई म्हणाल्या, हल्ली टीव्हीवर सगळ्या पोरी नुसत्या चड्डीतच नाचत असतात. कपडे कोणी घालतच नाही. कालचाच चर्चेचा विषय, टीव्हीवर कार्टुन्स मध्ये फार हिंसा होतेय का? अम्न मग त्यावर उपाय, तसे बदल. आहे आप्ल्याकडे अस?
अगदी साध उदाहरण देते, प्लास्टिकच्या पिशव्या. माझ्या सासुबाई एकदा मला वैतागुन म्हणाल्या आता बघावे तो दुकानदार छापलेल्या सुंदर प्लास्टिकच्या पिशव्या देतो. आम्ही एखादीच मिळाली तर जपून ठेवायचो. आता सगळच भरपूर झालय. आम्ही अश्या वापरल्या, अश्या वापरल्या प्लास्टिकच्या पिशव्या की एक दिवस किंग टाईडसने मुंबईत पाणी भरल तर ते ड्रेन व्हायला अडथळा आला या प्लास्टिकन. येथे जपुन प्लास्टिक वापरल जात , ते डिस्पोज करायची व्यवस्था आहे. हे सगळ मात्र केल ते आमच्या बिनडोक पिढीने. अन आता आम्ही अपेक्षा करतोय की या वेळच्या पिढीने ते निस्तराव.

हा प्रतिसाद बराच ब्यालन्स्ड वाटला आधीच्या तुलनेत. सहमत आहे.

बॅटमॅन's picture

18 Sep 2013 - 4:40 pm | बॅटमॅन

फक्त एक पुरवणी जोडेन की तुमच्या किंवा कुठल्याही पिढीला घाऊकपणे आरोपीच्या कठड्यात उभे करणे चुकीचे आहे. आधीच्या पिढीची जीवनमूल्ये ही "व्हर्च्यू ऑफ नेसेसिटी" तून आलेली होती. आपल्या पिढीची सांपत्तिक स्थिती त्यांच्यापेक्षा ऑन अ‍ॅन अ‍ॅवरेज बरीच चांगली असल्याने आपली मूल्ये बदलली इतकेच. जुन्या पिढीतले लोकही आपल्यासारखे हुरळले नसते असे आजिबात सांगता येत नाही. आपला वखवखलेपणा हा सार्वकालिक आहे. त्यामागे बरीच कारणे आहेत. फक्त तूर्तास सांगायचा मुद्दा इतकाच की "आधी आलबेल-आत्ता गंडले-गंडायला आमच्या काळात सुरुवात झाली" हे चित्र फसवे आहे. जुन्या काळातले उत्तम आणि आत्ताच्या काळातले गंडके यांचीच तुलना केली तर हाताला दुसरे काय लागणार म्हणा. असो.

सूड's picture

18 Sep 2013 - 6:35 pm | सूड

त्या आधीचं चांगलं आणि आत्ताचं वाईट म्हणतायेत असं मला नाही वाटत. मुद्दा हा आहे की उदाहरण म्हणून वापरलेल्या देशातल्या लोकांनी त्यांची संस्कृती कायम ठेवत प्रगती करुन घेतली. आपल्याकडे बर्‍याचशा प्रमाणात सगळं बासनात गुंडाळून झगमगाटाला प्राधान्य दिलं गेलं. फार लांब कशाला आजच्या विसर्जन मिरवणूका पाह्यल्या तरी या लेखात काय म्हणायचंय ते समजू शकतं, आताचा सार्वजनिक गणेशोत्सव आणि ज्या कारणासाठी तो सुरु केला गेला होता यात जमिन अस्मानाचा फरक आहे. या लेखात तेच म्हणायचंय असं मला वाटतं. आपल्या सोयीचे मुद्दे उचलून काथ्याकूट करायचाच असेल तर शुभेच्छा !! इति अलम् ॥ :D

अन्य देशांची भारताशी केलेली तुलना योग्यच आहे. त्याबद्दल काही म्हणणे नाही. गणेश मिरवणुकांबद्दलही सहमत. पण एक सरसकट सूर दिसल्यासारखा वाटला म्हणून म्हणालो. यात सोय अन गैरसोय कुठे आली?

यसवायजी's picture

17 Sep 2013 - 11:46 pm | यसवायजी

मस्त.. आवडलं.

शिवाजी चौकातला २५ फुटी गणपती म्हणजे माझ्यासाठी 'शहरातलं आकर्षण' होतं.
उत्सवात शिवाजी पेठेतल्या नंग्या तलवारी पण पाहील्यात.. ;)
अन महाद्वार रोडला गणपती पहायला लै मज्ज्जा यायची.

स्पंदना's picture

18 Sep 2013 - 6:38 am | स्पंदना

२५ फुटी?
२१ फुटीचा आता २५ फुटी झाला?

यसवायजी's picture

18 Sep 2013 - 9:38 am | यसवायजी

एदीत ओप्सन द्या की राव कुणीतरी.. :(

रेवती's picture

18 Sep 2013 - 12:01 am | रेवती

मस्त लिहिलय अपर्णा! सगळं आठवलं. मी शाळेत असताना पुण्यात गणपती पहायला येण्याचं बरंच आकर्षण लोकांना असावं. दरवर्षी कोणी ना कोणी लाम्बचे पाहुणे असायचे. आपापल्या घरचे ५ दिवसांचे गणपती आणि गौरी आटोपून पुण्यात यायला जमायचं बरेच जणांना. तेंव्हाचे देखावे वगैरे आठवले.

स्पंदना's picture

18 Sep 2013 - 6:39 am | स्पंदना

हो ग! कोल्हापुरात बरेचजण गणपती पहायला पुण्या-मुंबईला जायचे.

कवितानागेश's picture

18 Sep 2013 - 12:20 am | कवितानागेश

आमच्या लहानपणी गणेशोत्सवाचे स्वरुप बरे होते, मिरवणूका मात्र असह्य झाल्या होत्या.
पण गणेशोत्सवातल्या स्पर्धा आणि त्यात मिळणार्‍या बक्षिसांची आठवण झाली.
कॉलेज संपल्यानन्तर कुठे बक्षीस वगरै मिळालंच नाहिये! :(

नॉस्टॅल्जिक, बरंचसं पटणारं, थोडंसं न पटणारं अ‍ॅज युज्वल आपातै स्पेशल चटकदार लेखन....!

९० च्या आगंमागं शहरात नि ९१-९२ नंतर गावांमध्ये आलेलं 'केबल'च्या छत्र्यांचं खेळणं भारतीय मनाला विलक्षण आकर्षित करुन गेलं. केबल मुळं नवनवीन उपग्रह वाहिन्या आल्या नि नंतर बेवॉच, बोल्ड ब्युटीफुल सारख्या मालिका सुरु झाल्या. घराघरात मालिका त्याही वेगवेगळ्या.
अजून आठवतं सोमवारी सकाळी शाळेत रविवारी संध्याकाळी दूरदर्शनवर बघितला मराठी सिनेमा हा चर्चेचा विषय होता. त्यात एकसंधपणा होता कारण प्रत्येकाकडं एकच चॅनल नि एकच चित्रपट. त्यात निरागसपणा शिल्लक होता.
नंतर हळूहळू आलेलं मोबाईलचं पेव नि मग सहजसाध्य इंटरनेट. खरंच बदलाचा वेग प्रचंड आहेच.
मात्र....
अपर्णा मागच्या पिढीत जायला लागलीये हे देखील तितकंच खरंय. ;)
आम्ही आहोतच मागून. होय पुढं :)

नॉस्टॅल्जिक, बरंचसं पटणारं, थोडंसं न पटणारं अ‍ॅज युज्वल आपातै स्पेशल चटकदार लेखन....!

९० च्या आगंमागं शहरात नि ९१-९२ नंतर गावांमध्ये आलेलं 'केबल'च्या छत्र्यांचं खेळणं भारतीय मनाला विलक्षण आकर्षित करुन गेलं. केबल मुळं नवनवीन उपग्रह वाहिन्या आल्या नि नंतर बेवॉच, बोल्ड ब्युटीफुल सारख्या मालिका सुरु झाल्या. घराघरात मालिका त्याही वेगवेगळ्या.
अजून आठवतं सोमवारी सकाळी शाळेत रविवारी संध्याकाळी दूरदर्शनवर बघितला मराठी सिनेमा हा चर्चेचा विषय होता. त्यात एकसंधपणा होता कारण प्रत्येकाकडं एकच चॅनल नि एकच चित्रपट. त्यात निरागसपणा शिल्लक होता.
नंतर हळूहळू आलेलं मोबाईलचं पेव नि मग सहजसाध्य इंटरनेट. खरंच बदलाचा वेग प्रचंड आहेच.
मात्र....
अपर्णा मागच्या पिढीत जायला लागलीये हे देखील तितकंच खरंय. ;)
आम्ही आहोतच मागून. होय पुढं :)

वेल्लाभट's picture

18 Sep 2013 - 9:36 am | वेल्लाभट

होतच आलंय हे; होतच राहणार...
गेले ते दिवस. हेच खरं.

मस्त... कोल्हापूरात आम्ही सुध्दा १ ~ २ वाजेपर्यंत देखावे पाहात फिरायचो.
राजारामपुरी १३ व्या गल्ली पासून सुरवात करून व्हिनस कॉरनर, शाहुपुरी, बिंदू चौकातून शेवटी २१ फूटी..

भारत २००८ साली श्रिलंका दौर्‍यावर असतांनाची एक मॅर, राजारामपूरीत तास भर उभे राहून पाहिलेली अन मॅच जिंकल्यानंतर प्रचंड धुमाकूळ घातलेला..

सगळ्या आठवणी ताज्या केल्या अपर्णा तै.. :)

अत्रुप्त आत्मा's picture

18 Sep 2013 - 1:05 pm | अत्रुप्त आत्मा

@शिशुपालाचे धड मुंडक्याला लालभडक रक्त घेउन उभे. अन जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात शिशुपालाचे शिर! जीभ बाहेर काढुन! त्याचे डोळे अजुन जीवंत! पण झाल काय? त्या जीवंत डोळ्यांना दिसल्या दोन तरुण मुली. अन त्यात ही त्यातली एकजण ते लकाकलेले डोळे पाहुन भुवया उंचावतेय! आता मरणप्राय वेदना होताना कुणी मुली पाहील का? हे मुंडक पहात होत. मी नजरेला नजर मिळवली अन त्या मुंडक्याला हसु फुटल. आता मुंडक हसतय म्हंटल्यावर मला पा. पा. नि. म्हणतात ना? तस काहीसं. एकुण सिनचा पार बट्ट्याबोळ झाला राव! >>> http://www.pic4ever.com/images/25r30wi.gif

मृत्युन्जय's picture

18 Sep 2013 - 1:27 pm | मृत्युन्जय

अतिशय उत्तम लेख. आणि शेवट लेखाला एक वेगळेच वळण लाउन गेला. ही चुकण्याची सुरुवात आमच्याच काळात झाली हे पटतय एकदम. एकदाच फक्त मैत्रिणींबरोबर गणपतीच्या मिरवणुकीला गेलो होतो. त्यानंतर कानाला खडा. जायचे तर मित्रांबरोबर नाहितर केबलवर मिरवणुक बघायची. महिलावर्गाबरोबर जाउन नसती रिस्क आणि रिस्पोन्सिबिलिटी नकोच.

अनन्न्या's picture

18 Sep 2013 - 5:01 pm | अनन्न्या

अजूनही आठवतात ते कोकणात येणारे चाकरमानी, चकचकीत चपला, चकचकीत ड्रेस घालून मिरवणारे...मुंबईहून येताना प्रसादाला वेगवेगळे प्रकार आणणारे.. हेवा वाटायचा! तिथे ते काय काम करत असतील, कशा परिस्थितीत राहात असतील तरी इकडे मात्र मुंबैवाले भाव खाऊन जायचे!

मदनबाण's picture

30 Sep 2013 - 3:19 pm | मदनबाण

सुंदर लेखन... भावनांशी पूर्णपणे सहमत.
मला अजुन आठवतय... महाभारत या मालिकेच्या पहिल्या भागच्या दिवशी {2 October 1988} आमच्या घरी कलर टिव्ही आणला होता,चाळीतली आजुबाजुच्या घरातली सगळी लोक आमच्या घरात जमा झाली होती. :)छतावरचा टिव्हीचा अँटेना नीट करणे आणि त्याचा नीट सिग्नल पकडण फार मोठ्ठ काम असे.