साहित्यः
लांब आकाराची वांगी :१/२ किलो.
वनस्पती तुप : अर्धा ते पाऊण कप
कांदा : १ मध्यम
तिखट : १ लहान चमचा (टि स्पून)
आलं : १ इंच
लवंग : ४ नग
दालचिनी : ४ इंच
काळी वेलची : १ नग
काळी मिरी : ३० नग
मीठ : चवीनुसार
साखर : ४-५ मोठे चमचे (टेबल स्पून)
लिंबू रस : २ ते ३ मोठे चमचे.
कोथिंबीर : सजावटीसाठी
तयारी:
देठासहित वांग्यांना, देठापर्यंत, उभी चीर देऊन वाग्यांना आतून मीठ चोळून ठेवा.
कांदा लांब कापून घ्या.
आलं एकदम बारीक चिरुन घ्या.
तिखट्+लवंग्+दालचिनी+काळी वेलची+काळी मिरी एकत्र वाटून वस्त्रगाळ पुड करून घ्या.
कोथिंबीर बारीक चिरुन घ्या.
कृती:
तुप तापवून कांदा सोनेरी रंगावर तळून घ्या. तळलेला कांदा थंड झाला की अगदी बारीक चिरून घ्या (चॉप करा).
तळलेला कांदा, मसाल्याची वस्त्रगाळ पुड, मीठ एकत्र मिसळून वांग्यांमध्ये भरा.
खोलगट फ्रायपॅन मध्ये, कांदे तळून उरलेले, तुप तापवा आणि त्यांत वांगी परतण्यासाठी ठेवा.
अर्धी वाटी पाणी घालून, झाकण ठेवुन, मंद आंचेवर वांगी शिजवा. ह्या प्रक्रिये दरम्यान १-२ वेळा वांग्याची बाजू उलटवून सर्व बाजूंनी शिजवा.
लिंबू रस, साखर आणि थोडे पाणी (अगदी २ चमचे) एकत्र करून ठेवा.
वांगी पूर्ण शिजली की लिंबू-साखर-पाणी हे मिश्रण घालून मिसळा. साखर विरघळली, रस साधारण दाट झाला की उतरवा.
एखाद्या छानशा बाऊलमध्ये किंवा खोलगट बशीत काढून कोथिंबीरीने मस्त सजवा.
गरमगरम भाताबरोबर आनंद लुटा.
शुभेच्छा...!
प्रतिक्रिया
22 May 2013 - 2:14 am | रेवती
वेगळी भन्नाट पाकृ. भाताबरोबर छान लागत असणार यात शंका नाही.
22 May 2013 - 2:18 am | मोदक
अत्याचार हाये राव या वेळी अशा पाककृती बघणे म्हणजे...
नेहमीप्रमाणे आकर्षक सादरीकरण!!
22 May 2013 - 2:34 am | प्यारे१
सुंदर पाकृ.
'पाऊण कप वनस्पती तूप' वाचून जरा 'कट-कट' वाटलं.
(तवंगाला कट म्हणतात आमच्याकडं)
बाकी काल स्नेहातैच्या धाग्यावर वांगं इकडे पण वांगं? सध्या 'वांगमयीन जीवन' का? ;)
22 May 2013 - 2:50 am | रेवती
त्या तवंगालाच रोगन म्हणतात ना! पूर्वी एखाद्या मुलीनं/बाईनं चेहर्यावर मेकअप चढवला की "काय रोगण लावलय!" असं म्हणायचे तसा अर्थ निघतोय.
तुम्हाला तुपाचे प्रमाण जास्त वाटत असेल तर कमी घाला.
22 May 2013 - 2:56 am | प्यारे१
बरोबर आहे.
(प्लीज माझी दोन्ही वाक्ये- वनस्पती तूप नि कट- उडवता का? सुंदर पा कृ वर अकारण टीका नको.)
22 May 2013 - 3:00 am | रेवती
नाही हो. ते तुम्हाला नाही लिहिले. काही वाक्ये काढायला सांगू नका. इथं माझा कलफलक गंडलाय. मी मझा प्रतिसाद लिहायला चुकले आहे.
22 May 2013 - 9:50 am | प्रभाकर पेठकर
प्यारे१,
तुप, आपल्या मराठी पाककृतींच्या प्रमाणात, जास्तच आहे. पण काश्मिरात हे जास्त नाही. तसेही, ह्या पाककृती आपल्या रोजच्या आहाराचा भाग नाही बनू शकत. ह्या कधी काळी तेल-तुपाचा विचार न करता फक्त 'चवी'साठी बनवायच्या अन खायच्या.
मुळ पाककृतीनुसार मी तुप वापरले आहे. अर्थात, कोणाला कमी वापरायचे असेल तर काहीच हरकत नाही.
22 May 2013 - 11:41 am | सस्नेह
'रोगन' या उर्दू शब्दाचा अर्थ 'तेल' असा आहे. जसे बादाम रोगन म्हणजे बदाम तेल. तर्रीवाल्या पदार्थांना हे विशेषण वापरत असावेत.
22 May 2013 - 2:44 am | जुइ
वेगळी पाकृ आहे. करुन बघेन
22 May 2013 - 2:56 am | अजो
मस्त पाककृती..
22 May 2013 - 9:39 am | कोमल
छानच पाकृ..
करून पाहाणारच
22 May 2013 - 9:51 am | उदय के'सागर
वांगी आवडत नाही... पण ही 'डीश' अश्शीच्या अशी समोर असती ना तर खरं सांगतो सगळं फस्त केलं असतं :) फोटो जबरा आणि कातिल सादरीकरण !!!!! घरच्यांसाठी नक्कीच करून पाहिली जाईल ...
22 May 2013 - 10:31 am | ऋषिकेश
वा.. तव्याबरोबरच ही रेसिपी कन्वेक्शन मोड वर सुद्धा करून बघेन (पाच-सात मिनिटांनी सगळी एकदा वांगी फिरवावी लागतील बहुदा)
22 May 2013 - 10:42 am | पैसा
भरल्या वांग्यांचा काश्मिरी अवतार आवडला!
22 May 2013 - 11:20 am | सुहास झेले
भन्नाट.... कसली सही दिसतायत वांगी :) :)
22 May 2013 - 11:31 am | दिपक.कुवेत
फोटो पाहुनच जीव गेला. वांग्यांभोवती तुपाचं/तेलाच रींगण काय भारी आलेय!
अवांतरः माझ्या मते साखर कॅरमलाईज्ड होउन ग्रेव्हि/वांगी काळि झाल्येत का?
22 May 2013 - 5:08 pm | प्रभाकर पेठकर
नाही. वांग्यांचा रंग नैसर्गिक गडद जांभळा आहे. तेल आणि साखरेने त्याला विशेष चमक आली आहे.
साखर कॅरमलाईझ्ड होईपर्यंत शिजवायची नाही. साधारण घट्टपणा (पाक स्वरूप) येई पर्यंत शिजवायची.
22 May 2013 - 11:41 am | nishant
वांग आवडत नाही..तरिहि या फोटोने भुक चाळ्वली..भाताबरोबर नक्किच छान लागेल.
22 May 2013 - 11:50 am | सानिकास्वप्निल
हाये!!! दिल वांगी वांगी हो गया .....
निव्वळ अप्रतिम :)
22 May 2013 - 4:23 pm | सस्नेह
काश्मिरी वांगी मिरचीसारखी लांब लांब असतात काय ?
22 May 2013 - 5:14 pm | प्रभाकर पेठकर
वांग्यांमध्ये विविध रंग आणि आकार पाहायला मिळतात.
लहान गोल, लहान अंडाकृती, मध्यम आकाराची, मोठी भरताची, लांबट आकाराची वांगी तसेच,गडद जांभळी, पांढरी, किरमिजी, किरमिजी पांढरे पट्टे असलेली, हिरवी अनेक प्रकार आहेत.
ही लांबट, गडद जांभळी वांगी सर्वत्र मिळतात. खास काश्मिरची अशी नाहीत. पण पाककृती, पद्धत काश्मिरी आहे.
22 May 2013 - 4:35 pm | सूड
वनस्पती तूपाऐवजी साजूक तूप वापरलं तर?? चव दुणावेल की उणावेल?
22 May 2013 - 5:15 pm | प्रभाकर पेठकर
करून पाहा आणि तुमचे अनुभव सांगा.
22 May 2013 - 5:40 pm | Mrunalini
वा.. काय मस्त पाकॄ आहे... एकदा करुन बघितली पाहिज, पण त्याला तशी बारीक आणि लांब वांगी लागतील ती इथे कुठुन मिळणार.
22 May 2013 - 5:53 pm | प्रभाकर पेठकर
वांगी लांबच असली पाहिजेत असे नाही. छोटी (भरली वांगीवाली) वांगीही चालावित. मोठी वांगी नकोत कारण वांग्यांच्या फोडी करायच्या नाहीएत.
22 May 2013 - 5:44 pm | मदनबाण
देठा सकट असलेली वांग्यांची पाकॄ पहिल्यांदाच पाहिली...
काकाश्रींच्या हातचे हादडायला कधी तरी संधी मिळालीच पाहिजे असे आत्ता वाटु लागले आहे. :)
22 May 2013 - 6:14 pm | bharti chandanshive१
वेगळी पाकृ आहे
22 May 2013 - 6:26 pm | अत्रुप्त आत्मा
फोटू बघुन जबरी भूक खवळली आहे...आंम्ही ही पा.कृ.करणं...सोडा.
गेला बाजार...आज कात्रज पलिकडे वनपत्रे बंधुंच्या हाटिलाला आज भेट द्यावी लागणार. वांग...वांग म्हणजे १ नंबर मिळतं तिथे :)
22 May 2013 - 7:23 pm | पिंगू
वांगी जबरीच लागतील. फक्त ते वनस्पती तूप जरा जास्तच वाटते. कारण इतके तूप वांग्याच्या भाजीत बघायची सवय नाही.
22 May 2013 - 7:40 pm | कच्ची कैरी
वेगळी आणि छान पाककृती :)
23 May 2013 - 1:06 am | पिवळा डांबिस
फोटो छान आहे. पण वांग्यासाठी इतकं तूप खायची मनाची तयारी होत नाही हो!!! :)
सोडा.
नाय म्हणजे वांगी म्हंटली की सोडा आठवतं.
सोडे घातलेली वांगी!! अहाहा!!!!
बायकू (किंवा शेजारीणही चालेल!!)सीकेपी असेल तर प्रश्नच मिटला!!!
:)
23 May 2013 - 3:27 am | प्रभाकर पेठकर
वांगी-सोडे करून खाऊ घालण्यासाठी असावे, असे गृहीत धरतो.
23 May 2013 - 10:53 pm | पिवळा डांबिस
धरा, तसं गृहीत धरा!!!! :)
जरा अवांतरः तुम्ही मस्कतात, आमी लालालॅन्डमधे! तेंव्हा गृहीतकांत थोडोसो फरक असतलोच नाय!!!!
:)
24 May 2013 - 2:11 am | नंदन
वान्गीदाखल? ;)
24 May 2013 - 9:03 am | पैसा
पुरणातली वांगी पुरणात!
26 May 2013 - 10:19 pm | पिवळा डांबिस
ईऽऽऽऽ!!!! तुमच्याकडे पुरणात वांगी घालतात?
रेसेपी द्या नं गडे!!
पेठकरकाकांना देखील माहिती नसेल ती रेसेपी!!!!
:)
27 May 2013 - 12:30 am | अत्रुप्त आत्मा
@वान्गीदाखल? >>> =)) हां..........!!! अशी दखल घेतली पाहिजे. =))
30 May 2013 - 6:45 am | दीपा माने
एक आगळीच पाकृ दिलीत. भाताबरोबर तर खुपच चविष्ट लागेल यात शंकाच नाही.
15 Jun 2013 - 12:32 pm | विसोबा खेचर
व्वा..!