अति सर्वत्र वर्ज्ययेत....

Pearl's picture
Pearl in जनातलं, मनातलं
4 Sep 2012 - 9:02 pm

( अति सर्वत्र वर्ज्ययेत....
याबद्दल जे काही विस्कळीत विचार मनात आले. ते मांडण्याचा प्रयत्न केला आहे. चू.भू. द्या. घ्या.)

आपल्या संस्कृत भाषेत फार छान छान कोट्स आणि सुंदर अर्थपूर्ण अशी सुभाषिते आहेत. त्यातलं 'अति सर्वत्र वर्ज्ययेत' हे वाक्य पण फार छान आहे. म्हणजे कोणतीही गोष्ट अति करू नये.
अति राग, अति लोभ, अति काटकसर, अति द्वेष, अति चिंता ..... अशी कोणतीच गोष्ट अति करू नये. एवढचं काय तर अति प्रेम(आंधळं प्रेम), अति काळजीही करू नये.

अति चिंता:
चिंतेबद्दल तर काय सांगावं. असं म्हणतातच ना की चिता मनुष्याला मेल्यानंतर जाळते, तर चिंता जिवंतपणी जाळते. मनुष्य प्राणी सतात कशाना कशाची चिंता करत रहातो. शिक्षण झालं की नोकरी मिळेल का. नोकरी मिळाली की गाडी घ्यायला जमेल का. गाडी घेतली की घर घ्यायचे जमेल का. & सो ऑन....
भविष्याची चिंता करता करता वर्तमान हातून निघून जात असते. आणि कशाचीही चिंता करून समस्या/प्रॉब्लेम तर सूटणार नसतो. याचा अर्थ काहीच करू नये. स्वस्थं बसावं असं मुळीच नाही. तर आपल्या हातात जे जे करणं शक्य आहे ते ते करावं समस्या सोडवण्यासाठी. पण नंतर ईश्वरावर काळजी सोडून द्यावी. (ज्यांचा ईश्वरावर विश्वास नाही त्यांनी नुसतीच काळजी सोडून द्यावी ;-)) ज्या गोष्टींवर आपला कंट्रोल नाही त्याची चिंता करू नये. पण त्याला सामोरे जायची तयारी ठेवावी.
माझी एक मावशी नेहमी म्हणते, कोणताही प्रॉब्लेम आला की त्यातून जास्तीत जास्त (वाईट) काय होईल याचा विचार करावा. कोणी फाशी तर देणार नाही ना, जीव तर जाणार नाही ना. मग झालं तर. मग टेन्शन कशाला घ्यायचे. मला तिचा हा फंडा खूप आवडतो. त्यात काही खूप अवघड, समजायला बोजड असं तत्त्वज्ञान नाही. पण एक दिलासा नक्की आहे. पेपरमध्ये छोट्या छोट्या कारणावरून आत्महत्त्या करणारे लोक पाहिले की अगदी हेच वाटतं की बाबानो आपला जीव सगळ्यात महत्त्वाचा/मोलाचा. त्याउपर काही नाही. त्याहून महत्त्वाचं काही नाही.

अति रागः
राग हा तर सगळ्यात वाईट. रागाच्या भरात केलेलं कोणतही कृत्य अतिशय चुकीचं होतं असत, त्यानं असं कृत्य करणार्‍याचचं अतोनात नुकसान होतं असतं आणि नंतर पश्चात्ताप होऊन काही उपयोग नसतो, झालेलं नुकसान/हानी बरेच वेळा भरून येणारी नसते. टोकाचा राग आला की पहिली गोष्ट काय होत असेल तर आपली सारासार विचार करण्याची शक्ती संपते. आणि आपण रागाला कंट्रोल करण्याऐवजी तोच आपल्यावर स्वार होतो. आणि मग आपण विचार न करता वागतो आणि स्वतःच स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेतो. नंतर आपल्याला वाटतं रहाते, रूखरूख लागून राहाते की आपणं असं का बरं वागलो.
एखाद्या गोष्टीचा प्रचंड राग आला असता पहिलं काय करावं तर शक्य असेल तर त्वरित त्या वातावरणापासून दूर जावं. दुसरं म्हणजे कोणतेही टोकाचे विचार मनात आणू नयेत किंवा आलेच तरी त्या विचारांची निदान अंमलबजावणी करू नये. हे बोलायला खूप सोपं आहे आणि करायला तितकचं जास्त अवघडं आहे. खूप अवघडं आहे. राग जाण्यासाठी काही वेळ जाऊ देणं आवश्यक आहे. 'काळ' हा खरचं बर्‍याच समस्यांवर इलाज आहे. मन थोडं शांत झालं की ज्यामुळे आपल्याला इतका राग आला त्या परिस्थितीचा शांतपणे विचार करावा. आणि नीट विचार करून ठरवावं की ही परिस्थिती कशी हँडल करावी. शांत झाल्यावर आपल्याला नीट सुचतं की काय करावं आणि मग आपण ती परिस्थिती जास्त चांगल्या प्रकारे हाताळू शकतो.

अति लोभ/हावः
माणसाच्या जीवनात गोल्स नक्कीच महत्त्वाचे आहेत. पण त्याबरोबरच समाधानही तितकेच महत्त्वाचं आहे. या दोहोंचा नीट ताळेबंद ठेवता आला पाहिजे. म्हणजे महत्त्वाकांक्षा असणं चांगलं पण अति महत्त्वाकांक्षा नको. म्हणजे अभिमान आणि गर्व यातला जो सूक्ष्म फरक आहे तोच फरक या दोहोंत आहे. जीवनात गोल्स/एम्स असावेत आणि त्यासाठी भरपूर प्रयत्न, कष्ट करत राहिले पाहिजेच. पण जे आतापर्यंत मिळालं आहे त्याचीही किंमत असली पाहिजे आणि त्याबद्दल समाधानही वाटले पाहिजे. ज्या गोष्टी आपल्याला मिळाल्या आहेत, त्या गृहित धरता कामा नये. त्याची कदर असली पाहिजे. म्हणजे अर्धा भरलेला ग्लासही पाहिला पाहिजे. थोडक्यात सकारात्मक दृष्टीकोन (पॉसिटीव्ह अ‍ॅटिट्यूड) पाहिजे. मधे एक खूप छान कोट वाचनात आली. Being happy does not mean you have it all... It means being thankful to the lord for all you have
आणि जीवनात जे मिळवायच आहे ते स्वत:च्या बळावर मिळवावं. त्यासाठी कष्टाला, प्रयत्नांना पर्याय नाही. आणि असं स्वकष्टार्जित काही जेव्हा मिळतं, आपल्या कष्टाचं फळ मिळत, त्याची गोडी काही औरच असते.

(जर हे लिहिलेलं आवडण्यात आलं तर टी.बी.सी. ;-))

जीवनमानप्रकटनविचारविरंगुळा

प्रतिक्रिया

रेवती's picture

4 Sep 2012 - 9:05 pm | रेवती

आवडण्यात आलं.

मन१'s picture

4 Sep 2012 - 9:12 pm | मन१

बर्‍याच मुद्द्यांवर असहमती दर्शवत आहे.
सध्या इतकेच.

अमित's picture

4 Sep 2012 - 9:29 pm | अमित

आणि बरचसं पटलं देखील

टी.बी.सी. म्हणजे काय ?
रागावर एक अक्सीर इलाज . राग आल्यावर सर्व डायलॉग लो टोनमध्ये व लाडीकपणे बोला.
उदा. 'घाल माझ्या डोंबल्यावर..!' हे असे म्हणावे
'अय्या, घाल ना गं माझ्या डोंबल्यावर..!

मोदक's picture

4 Sep 2012 - 9:52 pm | मोदक

To Be Continued...

लिखाण आवडलं. पुभाप्र...

(स्नेहांकिता - पुभाप्र म्हणजे पुढील भागाच्या प्रतिक्षेत.)

कौशी's picture

4 Sep 2012 - 10:04 pm | कौशी

जे काही लिहीले ते खरेच ...

किसन शिंदे's picture

4 Sep 2012 - 10:59 pm | किसन शिंदे

छानच लिहलंय. याच्यापुढचंही नक्की लिहा, वाचायला आवडेल.

(अति सभ्यपणा केल्यास काय होईल हे जाणून घेण्यास उत्सूक असलेला;)) किसन.

टवाळ कार्टा's picture

5 Sep 2012 - 5:02 pm | टवाळ कार्टा

मग राखी मिळते ;)
(आता बांधायची की सावंतांची ते विचारु नको )

मनीषा's picture

4 Sep 2012 - 11:38 pm | मनीषा


अति सर्वत्र वर्ज्ययेत....

अगदी १००% सहमत .
कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच. प्रत्येक गोष्टीला मर्यादा ही हवीच.
आणि ही मर्यादा ओळखता येणे, म्हणजेच शहाणपण.

म्हणूनच आपल्या माय मराठी मधे काही छान छान म्हणी आहेत ना ..

१) अति तेथे माती
२) अति घाई संकटात जाई
३) अति शहाणा त्याचा बैल रिकामा
४) अति झाले आणि हसू आले
.
.
.

पुण्याचे वटवाघूळ's picture

5 Sep 2012 - 5:06 pm | पुण्याचे वटवाघूळ

अति शहाणा त्याचा बैल रिकामा ही म्हण शहाणपणाशी संबंधित आहे की "अतीपणाशी"?


अति शहाणा त्याचा बैल रिकामा ही म्हण शहाणपणाशी संबंधित आहे की "अतीपणाशी"?

ही म्हण अतिशहाणपणाशी संबंधित आहे.

विकास's picture

5 Sep 2012 - 12:05 am | विकास

यावरून गीतेतला श्लोक आठवला

न योग फार खाऊनि किंवा खाणे चि सोडुनी । न फार झोप घेऊनि किंवा जागत बैसुनी ॥ ६-१६ ॥
निजणे जागणे खाणे फिरणे आणि कार्य हि । मोजूनि करितो त्यास योग हा दुःख-नाशन ॥ ६ -१७ ॥

विटेकर's picture

5 Sep 2012 - 3:48 pm | विटेकर

गीताई मधला श्लोक आवडला...

अत्रुप्त आत्मा's picture

5 Sep 2012 - 12:20 am | अत्रुप्त आत्मा

:)

जमेल तितका अतिरेक करावा. फायद्यात पडतो.
अति दानात् बलिर्बद्धो अति लोभात हि सुयोधनः |
विनष्टो रावणो लौल्यात्(अति) सर्वत्र वर्जयेत् ||
.
अति केल्याशिवाय कशात यशच नाही बघा. बह्गतसिंग, चाणक्य ह्यांनी काय आपल्या देशावर मोजून माप्पूओन प्रेम केलं का? नाही, त्यांनी कशाचीही फिकिर केली नाही, शांत डोक्याने स्वतःला ठीक वाटेल ते केलं. अगदि वाटेल ती किंमत मोजून. एकानं प्रानाची किंमत मोजली. दुसर्‍अयनी लोक काय म्हणतील ह्याची पर्वा केली नाही. एक मजबूत एकसंध राज्य उभं करायला वाटेल ते केले, दगाफटका, धोकेबाजी, सुनियोजित हत्या,इतरांचा वापर; काय वाट्टेल ते केले.
अति अति निष्ठा होती ह्यांची आपल्या तत्वांवर. त्यासाठी काय वाटेल ते झाले तरी चालेल.
.
अति रागानं काही होत नाही कसं म्हणता? सतराव्या शतकात परकीय आक्रमंकांच्या अराजकतेला वैतागून गाऐरव्यवस्थेबद्दलच्या आत्यंतिक रागातूनच एका सुसंघटित राज्याची स्थापना एका पोरानं शून्यातून केली की.
.
एडिसन का ग्रॅहम बेल कोण तो जगातील सर्वात पेटंटे घेणारा(श्भरच्या वर, अगदि लाइअट च्या बल्ब पासून ते टेलिफोन पर्यंत बरच काही) हा अत्यंत धूर्त होताच. आत्यंतिक लोभीही होताच. त्यातूनच त्यानं अधिकाधिक पेटंटे मिळवायला हे एवढे सगळे शोध लावायचा ध्यास घेत्ला. एवढ्या सगळ्यांना एकत्र करुन भगीरथ कार्य तडिस नेलं.
अति राग, अति लोभ, अति काटकसर, अति द्वेष, अति चिंता ..... अशी कोणतीच गोष्ट अति करू नये. एवढचं काय तर अति प्रेम(आंधळं प्रेम), अति काळजीही करू नये.
.
एक माणूस फारच चिंतित असे. विमानातून जायचं त्याला कधीही काम पडलं की तो टाळत असे. फोबियाच होता म्हणा ना त्याला. बिचारा सदैव चिंतित असे.विमानाला घाबरायचा. पण तांत्रिक बुद्धी त्याची बरी होती. एकदा नाइअलाज म्हणून विमानने जावे लागेल असे त्याच्या लक्षात आले. त्याने शेवटी मग भीतीवर/चिंतेवर उपाय म्हणून काय केले?
हवेत अल्गद खाली यायच्या तंत्राचा अभ्यास करुन, बर्याच सुधारणा केल्या आणि आज आपल्याला दिसते त्या आधुनिक पॅराशुटचा जन्म झाला. "विमानातून पडलो तर काय करायचे" ह्या आत्यंतिक चिंतेतून!!
अतिचिंतितता अशी innovation आणि नाविन्यास जन्म देते.
.
*वाद म्हणून वाद इतक्याच साठी वात्रटपणा करतोय. क्षमस्व. *

विटेकर's picture

5 Sep 2012 - 4:08 pm | विटेकर

अति रागानं काही होत नाही कसं म्हणता? सतराव्या शतकात परकीय आक्रमंकांच्या अराजकतेला वैतागून गाऐरव्यवस्थेबद्दलच्या आत्यंतिक रागातूनच एका सुसंघटित राज्याची स्थापना एका पोरानं शून्यातून केली की.

हा संदर्भ जर हिंदवी स्वराज्यासाठीचा असेल तर .. वादासाठी वाद म्हणून देखील ही गोष्ट मान्य करता येणार नाही.
हिंदवी स्वराज्य ही " प्रतिक्रिया" नव्हती , ते एक अवतार कार्य होते , पूर्णपणे सुनियोजितपणाने घडवून आणलेले महान कार्य होते . रागाच्या भरात केलेले क्रुत्य नव्हते .. तसे असते तर जावळीतच सगळे संपले असते ..

फड नासोंचि नेदावा| पडिला प्रसंग सांवरावा |
अतिवाद न करावा| कोणीयेकासी ||१२||

असे छ्त्रपती रागावून काही करतील असे वाटत नाही ..
काही बाबतीत वाद करता येत नाही .. like sacred cow !

बाकी चालू द्या .. विडंबन उत्तम आहे .

अन्या दातार's picture

5 Sep 2012 - 6:52 pm | अन्या दातार

विडंबन उत्तम आहे .

हे विडंबन आहे? नवीनच कळतंय. बाकी चालू द्यात

अमोल केळकर's picture

5 Sep 2012 - 11:05 am | अमोल केळकर

चांगले विचार :)

अमोल केळकर

जाई.'s picture

5 Sep 2012 - 11:11 am | जाई.

विचार आवडले

बिपिन कार्यकर्ते's picture

5 Sep 2012 - 5:30 pm | बिपिन कार्यकर्ते

अति छान! :)

रमताराम's picture

5 Sep 2012 - 5:57 pm | रमताराम

अति सर्वत्र वर्ज्ययेत्... एकदम मान्य, पण पुणे आणि चितळेंवरील टीका वगळून इतर बाबतीत.

पैसा's picture

5 Sep 2012 - 6:18 pm | पैसा

आणखी लिहा!

धन्यवाद.
प्रतिक्रियांबद्दल सर्वांचे खूप खूप आभार.

रणजित चितळे's picture

6 Sep 2012 - 10:17 am | रणजित चितळे

अति झाले हे सापेक्ष आहे

एकाचे अति दुस-याचे कमी असू शकते.
तेव्हा हे कोण ठरवणार?

बरे जो अति मुळे उपभोगतो (किंवा भोगतो) त्याला जेव्हा ते कळते तेव्हा फार उशिर झालेला असतो.

<<अति झाले हे सापेक्ष आहे<<
बरोबर आहे.

तरी पण याबद्दल मला असं वाटतं की
एखाद्या गोष्टीचे दुष्परिणाम दिसायला लागले/जाणवायला लागले की समजावं की (ती गोष्ट) अति झालं आहे.
(ती गोष्ट) कमी करायला हवी.

रजनीश म्हणतात्.
एखादी गोष्ट त्यागायची असेल तर ती अती करा...आपोआपच मन त्या गोष्टीचा विचार टाळायला लागेल