"इलो रे,इलो! कोकणातला पाऊस.

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
30 Jun 2008 - 10:58 pm

"शीरा मारां!ही काय पडण्याची रीत झाली?"
कोकणातला पाऊस अनुभवल्या शिवाय कसा असतो तो कळणं कठीण.
"नेमिची येई मग पावसाळा"
हे कुणीतरी कोकणातल्या पावसालाच उद्देशून म्हटलं असणार.

मृग नक्षत्र ७ जूनला लागत.शेतकऱ्या पासून लहान मुला पर्यंत एप्रिल,मेचा उन्हाळा सहन करून झाल्यावर केव्हा एकदा पाऊस येईल असं होतं.मला आठवतं त्यानुसार, मृग नक्षत्र आलं की अगदी नियमीत त्या दिवसात पाऊस यायचाच.
"घडाम,घुडूम आकाशात व्हायचं.कडाड,कुडुम" होवून लाखो दिवे पेटवावेत तसं आकाशात क्षणभर सगळं उजाळून जायचं.
"इलो रे! इलो"
हे दोन शब्द ज्याच्या त्याच्या तोंडातून बोलले जायचे.ऐकून बरं वाटायचं.
कुणीतरी एखाद्दया व्यक्तिला संभोधून बोलावं तसं पावसाला बोलायचे.त्याच्या विषयी अनुद्नार काढण्यापासून ते त्याचं स्वागताचं संभाषण करण्यापर्यंत सर्वांची मजल जायची.तो पाऊस बिचारा सर्व ऐकून घ्यायचा.मालवणीत एक म्हण आहे,
"पावसान झोडल्यान आणि नवऱ्यान मारल्यान तर कोणाकडे जावून सांगतलय?"
आणि तसंच पावसाच्या बाबतीत व्हायचं.तो त्याला हवं तेच करायचा.
कोकणातले लाल मातीचे रस्ते,एप्रिल,मे मधे वाऱ्याच्या वावटळी येवून जी काय रस्त्यावरून धूळ उडून जायची ती जायची.पण उरलेली धूळ काय कमी असायची. एकदा का पावसाच्या सरी वर सरी यायला लागल्या की पावसाने लाल रस्ते धुवून निघायचे आणि रस्त्याच्या बाजूच्या गटारातून लाल पाणी धो,धो वहात कुठे जायचं कुणास ठावूक.पण मुंबईतल्या इराण्याने "पाणीकम चहाचे" भरून भरून लाखो कप जणू गटारात ओतून टाकल्या सारखं वाटायचं.
आम्ही लहान असताना त्यावेळी आमच्या घराच्या पडवीत बसून रस्त्यावरून जाणायेणाऱ्या लोकांचे स्वगत किंवा बरोबरच्याशी होणारे संवाद ऐकण्यात मजा लूटायचो.
"इलो रे,इलो!
हो आता पिच्छो पाडल्या शिवाय रव्हचो नाय!
आता धुम्शाण खूप झालां बाबा!
वषाड पडो! नुकसान केल्या शिवाय हो आता सोडूचो नाय!
केंव्हा एकदा त्वांड घेवोन जाय्त असां झालां!
असोच मधून मधून उघाडी ठेवून रव्ह.ह्या वेळेक तरी आमच्यावर उपकार कर!
शीरा मारां!ही काय पडण्याची रीत झाली?
गेले आठ दिवस जांवचां, नांव म्हणून काढणां नांय!
गेले आठ दिवस नुसतां झोडपून काढल्यान!
येतानां गर्जून येतां,आणि जातानां पण गर्जून जातां!"

हे पावसाळ्याच्या दिवसात निरनिराळ्या दिवशी आणि दिवसाच्या निरनिराळ्या वेळचे उद्गार ऐकायला यायचे. डोक्यावर ताज्या भाजीचं ओझं किंवा विकून झाल्यावर रिकाम्या झालेल्या टोपल्या घेवून परत जाताना विक्रेकर बायका आणि पुरूष त्यांच्या मनात आलेला सर्व शीण त्या बिचाऱ्या पावसावर असले शेरे देवून कमी करून घ्यायचे.
कुणी तरी म्हटलंय ना,
"माळावर बोंब मारायला पाटलाची परमीशन कशाला?"
तसंच,
"पावसावर टीका करायला कोणाची कोण परवानगी घेत नसतो.?
पाऊस येण्यापुर्वी एक दोन महिने अगोदर,लोकं आपआपली घरं शाखारून घ्यायची.मंगळौरी घरांची कौलं असलेले घरमालक कामगाराना घरावर चढवून कचरा साफ करून घ्यायचे. पावसाचं कौलावरून येणारं पाणी पन्हळातून खाली जमिनीवर आणल्या जाणाऱ्या ह्या पन्हळांना पण साफ करून घ्यावं लागायचं. पण दुसऱ्या प्रकारच्या कौलाना मात्र संपुर्ण काढून साफ करून मग नीट ओळीत लावावं लागायचं.त्याला घर शाखारून घेणं म्हणायचे.
त्याशिवाय झोपडी वजा घरं असायची त्यांच्या वर माडाच्या झाडांच्या पानाच्या-झावळ्यांच्या-विणून केलेल्या झापांना शाखारून घ्यावं लागायचं.ह्या दिवसात हे काम करणाऱ्या कामगाराना पोटा पुरता मोबद्ला मिळून पोट भरायाचा मार्ग मोकळा व्हायचा.तो कामगार पावसाचे अन्य तर्हेने आभार मानायचा.

कोकणात पावसाच्या दिवसात सर्व आसमंत गार गार होवून जायचं.कावळे,चिमण्या,कबूतरं वगैरे पक्षी बिचारे झाडांच्या फांद्दयांचा आडोसा घेवून निमुट दिवस काढायचे.जरा उघाडी मिळाली की कावळे कुणी उष्ट्या हाताने काही अन्न बाहेर फेकलं असल्यास तेव्हडंच गीळून दिवस काढायचे.कावळ्या कडून एक शिकण्या सारखं आहे की उष्टं अन्न खाताना आपल्या भाईबंधाना कांव कांव करून बोलावून घेवून ते अन्न सर्व मिळून खायचे.हे माणसाने आप्पलपोटेपणा कसा नसावा हे शिकण्यासारखं आहे.
कोकणातल्या शहरातून जरा खेड्यांत गेल्यास पावसाळ्यात येणाऱ्या मजेची नुसती आठवण मन बेचैन करून टाकतं.शेतकरी भर पावसात डोक्यावर इरली घेवून शेतात काम करायचे.ही इरली पण बांबुच्या पट्ट्याची बनवतात. मुस्लीम बायका चेहरा उघडा ठेवून बुरखा कसा घेतात तसाच बांबुच्या पट्ट्यांचा बनवलेला हा बुरखा पुढून उघडा असतो आणि डोक्यावरून ते पाठीवर खालपर्यंत जाईल असा अर्थात हा बुरख्या पेक्षा जाड असूनही पावसात काम करताना भिजून न जाण्यासाठी अंगावर घेवून शेतकरी शेतात काम करीत असतात.
ह्या इरल्यामुळे दोन हात मोकळे राहिल्याने वाकून जमिनीवर काम करतां येतं.भात लावणीच्या दिवसात प्रत्येक कुणग्यात-चौकोनी आकाराच्या पट्ट्यात- एका टोका पासून दुसऱ्या टोकापर्यंत एका ओळीत बसून, रोपं पेरत-trans plant- करत,कामाचा शीण कमी होण्यासाठी मिळून गाणं गात, इंच इंच पुढे सरकतानाचं दृष्य पाहून शेतकरी घेत असलेली मेहनत पाहून ह्यावेळी असं मनात यतं ते गाणं,
"आम्ही दैवाचे दैवाचे शेतकरी रे
करू काम स्मरू नाम
मुखी राम हरी रे"
मुंबईहून कॉलेजच्या सुट्टीत कोकणात घरी आल्यावर मावशीच्या खेड्यात जावून तिच्या झोपडीवजा घराच्या वरच्या माडीवर जावून अशा पावसाच्या
दिवसात खिडकीत बसून बाहेर दिसणारी हिरवी गार शेतं बघून मन प्रसन्न व्हायचं.
अशावेळी न सांगता मावशी भरपूर साखर घातलेला कप भरून चहा आणि थाळी भरून खमंग कांद्दयाची भजी घेवून यायची.अशा पावसातच हे कॉम्बीनेशन एनजॉय करता यायचं. एकदा असाच सुट्टीत आलो असताना मला आठवतं मी बसलो होतो. पुढल्या खिडकीत बसून श्रीहरी असंच बाहेरचं पावसाळी वातारण पाहून मुरलीवर, मंगेश पाडगांवकरांचं,

"लाजून हासणे अन हासून ते पहाणे
मी ओळखून आहे, सारे तुझे बहाणे"

हे गाणं सुंदर सुरात वाजवत होता.आणि खाली वाकून वाकून पहात होता.मी सहज वाकून खाली पाहिल्यावर साधना, एरव्ही मुंबईत कॉलेजात स्लीव्हलेस टॉप आणि खाली जीन अशा ड्रेस मधे वावरणारी,आज आजीचं नऊवारी पातळ आणि लांब बाह्यांचा ब्लाऊझ घालून हातात दोन घागरी घेवून विहीरीवर पाणी आणायला जात असलेली दिसली.साधना श्रीधरची शेजारीण.ती पण अशीच कॉलेजच्या सुट्टीत आजीकडे थोडे दिवस राहायला आली होती.तिला उद्देशूनच ते गाणं होतं हे समजायला मला वेळ लागला नाही.माझ्याकडे पाठकरून श्रीहरी बसल्याने त्याला मी पण खाली पहात होतो ते दिसत नव्हतं. विहीरीतून दोन घागरी पाणी भरून, डोक्यावर चूंबळ ठेवून त्यावर एक घागर, आणि दुसरी घागर कंबरेवर घेवून लचकत मुरडत येताना पाहून श्रीधरने आपलं गाणं बदलं होतं.

"पाण्या निघाली सुंदरी
मन ठेविले दो घागरी
चाले मोकळ्या पदरी
परी लक्ष तेथे "
ह्या गाण्याचे सूर आतां मुरलीवर वाजवायला लागला.
माझ्याच वयाचा माझा मावस भाऊ-श्रीहरी- तो पण कॉलेजच्या सुट्टीत आपल्या आईला भेटायला नेहमी सारखा आला होता.ह्या वेळी त्याची प्रेयसी-गर्ल फ्रेन्ड- साधना पण तिच्या आजीकडे सुट्टीत कोकणच्या पावसाची मजा एन्जॉय करायला आली होती.जुलै महिन्यात कोकणातल्या पावसाला कहर यायचा.वर्षातून बाकीचे दिवस कोरड्या रहाणाऱ्या नद्या ह्या दिवसात तुडूंब भरून वहायच्या.विहीरी पण एरव्ही पाणी अगदी तळाला गेलेल्या, जुलै महिन्यात काठोकाठ भरायच्या.
मी हा त्यांचा रोमान्स पाहून एन्जॉय करीत होतो.
का कुणास ठाऊक त्याचं माझ्याकडे लक्ष का गेलं ते.तो जरासा लाजला.ते पाहून मी पण एक जुनं गाणं आठवून गुणगुणलो

" नको वाजवूं श्रीहरी मुरली रे
तुझ्या मुरलीने भूक तहान हरली
नको वाजवूं, नको वाजवूं
श्रीहरी मुरली"
हे ऐकून,माझ्या जवळ येवून म्हणाला,
"वा! सर्व भजी आणि चहा फस्त केलास आणि
म्हणतोस भूक तहान हरली"
आणि नंतर आम्ही दोघे खूप जोरा जोरात हंसलो.
काही वर्षानी श्रीहरी आणि साधनाचं लग्नं पण झालं आणि आता त्याना शाळेत जाणारी दोन मुलं पण आहेत.
जुलैभर कहर करून झाल्यावर ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला हा पाऊस जरा उघडीप घेतो.कदाचीत ती निसर्गाचीच जरूरी असावी.भातशेती पण एव्हांतोपरी अंग धरते.आणि मधूनच उघडीप मिळून उन मिळाल्याने कोवळे दुधाळ भाताचे दाणे पोसले जातात.

भर पावसात मात्र सुकी मासळीच खावी लागते.सुकी कोलंबी-सुंगटं- सुके बांगडे पाऊस येण्यापुर्वी साठवण करून ठेवलेले असतात त्याचा वापर होतो.शिवाय भर उन्हात एप्रील मे मधे सांडगे,पापड,कुरडुया उन्हात वाळवून तयार केलेला साठा अशावेळी उपयोगी येतो.तसेच वाळवून ठेवलेल्या फणसपोळया आणि आंब्याची साठं उपयोगी पडतात.

नद्यांचे पूर जरा कमी झाल्याने जाळी टाकून मासे मिळण्याची वेळ येते.पावसात सुळे,गुंजूले.शेतकं,काळूंद्री नावाचे मध्यम आकाराचे मासे मुबलक मिळतात.मग घरोघरी सुळ्याची खोबऱ्याच्या रसातली आमटी,आणि गुंजुल्याचं जागच्याजागी-घट्ट-तिरफळं घालून केलेलं तिखलं,लालबुंद कोकमाचं सार-सोलकडी- आणि साप्पाटून भात मिळाल्यावर काय विचारतां?
कोकणातला पावसाळा ह्या सर्व कारणाने चांगलाच लक्षात राहतो.
" नेमिची येई मग पावसाळा"
हे कुणीतरी कोकणातल्या पावसालाच उद्देशून म्हटलं असणार.

श्रीकृष्ण सामंत

मौजमजालेख

प्रतिक्रिया

अरुण मनोहर's picture

1 Jul 2008 - 3:49 am | अरुण मनोहर

वाचता वाचता पावसात हरवून गेलो. उत्तम!

श्रीकृष्ण सामंत's picture

1 Jul 2008 - 3:55 am | श्रीकृष्ण सामंत

आभार मनोहर्जी
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

पिवळा डांबिस's picture

1 Jul 2008 - 4:37 am | पिवळा डांबिस

वा सामंतांनु! येकदम झक्कास हो!!
येकदम गावाकडेच नेऊन सोडल्यांत!!

पाऊस येण्यापुर्वी एक दोन महिने अगोदर,लोकं आपआपली घरं शाखारून घ्यायची.मंगळौरी घरांची कौलं असलेले घरमालक कामगाराना घरावर चढवून कचरा साफ करून घ्यायचे. पावसाचं कौलावरून येणारं पाणी पन्हळातून खाली जमिनीवर आणल्या जाणाऱ्या ह्या पन्हळांना पण साफ करून घ्यावं लागायचं. पण दुसऱ्या प्रकारच्या कौलाना मात्र संपुर्ण काढून साफ करून मग नीट ओळीत लावावं लागायचं.त्याला घर शाखारून घेणं म्हणायचे.
अगदी खरां हां!! आमच्या घराची शाकारणी करूक गावडे येयत. त्येंच्यासाठी दुपारच्याक आमची आजी फणसाची भाजी आणि उकड्या तांदळाची चवदार पेज करी. आम्ही भावंडा त्या पेजेवर नजर ठेऊन आसू. कधी आपल्याक थोडी ती मिळतां तेची वाट बघत!! आजी करवादां,"मेल्यांची भिकार लक्षणा बघा!! चांगलो बारक्या तांदळाचो भात खावचो सोडून मेल्यांका उकड्या तांदळाची पेज पिऊचे डोहाळे लागलेसत!!!":)

हो आता पिच्छो पाडल्या शिवाय रव्हचो नाय!
आता धुम्शाण खूप झालां बाबा!
वषाड पडो! नुकसान केल्या शिवाय हो आता सोडूचो नाय!
केंव्हा एकदा त्वांड घेवोन जाय्त असां झालां!
असोच मधून मधून उघाडी ठेवून रव्ह.ह्या वेळेक तरी आमच्यावर उपकार कर!
शीरा मारां!ही काय पडण्याची रीत झाली?
गेले आठ दिवस जांवचां, नांव म्हणून काढणां नांय!
गेले आठ दिवस नुसतां झोडपून काढल्यान!
येतानां गर्जून येतां,आणि जातानां पण गर्जून जातां!"
जुस्त हो, एकदम जुस्त!!
आमचे वाडियेच्या लोकांच्या तोंडी नेहमी ह्याच!! आणखी येक,
"आवशीक खावंक! या पावसान तर अगदी कहर केल्यान!! आंगावर शेवाळा उगवला!! मेल्या, आतातरी थांब!!":)

पावसात सुळे,गुंजूले.शेतकं,काळूंद्री नावाचे मध्यम आकाराचे मासे मुबलक मिळतात.मग घरोघरी सुळ्याची खोबऱ्याच्या रसातली आमटी,आणि गुंजुल्याचं जागच्याजागी-घट्ट-तिरफळं घालून केलेलं तिखलं,लालबुंद कोकमाचं सार-सोलकडी- आणि साप्पाटून भात मिळाल्यावर काय विचारतां?
आणि कुरल्यांचा सुक्या? तां विसरलांत काय सामंतानु?
:)
असो. गेले ते दिवस!! आता बसलोसोंव हंयसर साल्मन आणि कॅटफिश खात!
शिरां पडो त्यांच्यार!!!

आपलो (गुंजल्यांच्या तिखल्याच्या आठवणीन विद्ध!),
पिवळो डांबिस

श्रीकृष्ण सामंत's picture

7 Jul 2008 - 10:48 pm | श्रीकृष्ण सामंत

पिवळो डांबिस
ह्या नांव मालवणी माणसाकच शोभताला.
मधून मधून असाच एखादां मालवणीत स्फूट बीट लिवल्यात तर मराठी आईक मालवणी मावशेची याद केल्याचा बघून नक्कीच आनंद होतोलो.तुमका नाय वाटणा?
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

प्रमोद देव's picture

7 Jul 2008 - 10:54 pm | प्रमोद देव

सामंतानु तुमी लिवाच! माका काय तुमची मालवणी नीट येऊची नाय . पण वाचाक आणि ऐकाक आवडता.
तुमी एकेक गजाली लिवा बगु.

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

पिवळा डांबिस's picture

8 Jul 2008 - 8:50 am | पिवळा डांबिस

सामंतांनु, तुम्ही सुरू करा, आमी पाठीशी असौंवच!!
:)

श्रीकृष्ण सामंत's picture

8 Jul 2008 - 9:26 am | श्रीकृष्ण सामंत

मिपावर प्रमोद देव आणि पिवळो डांबीस सारखे मालवणीतले दिग्गज आसत मग माका लिहूक नक्कीच बरां वाटताला
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

यशोधरा's picture

1 Jul 2008 - 5:34 am | यशोधरा

पिडांकाका, अगदी खरा बोलल्यात!! :)

नंदन's picture

1 Jul 2008 - 12:47 pm | नंदन

मी पण ह्याच म्हणतंय :)

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

श्रीकृष्ण सामंत's picture

7 Jul 2008 - 10:52 pm | श्रीकृष्ण सामंत

यशोधरा,आणि नंदन,
एव्हडे सगळे मालवणी बघून आयच्यान बरां वाटतां.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

विसोबा खेचर's picture

1 Jul 2008 - 10:48 am | विसोबा खेचर

सामंतसाहेबांचा लेख आणि डांबिसरावाचा प्रतिसाद, दोन्ही आवडले. एकदम देवगडात नेऊन सोडले..! :)

आपला,
तात्या देवगडकर.

श्रीकृष्ण सामंत's picture

7 Jul 2008 - 10:55 pm | श्रीकृष्ण सामंत

तात्यानुं,
तुमका आवडलां तेतुरंच सगळा भरून निघाला.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

चित्रा's picture

1 Jul 2008 - 11:56 pm | चित्रा

पावसाचे वर्णन छान उतरले आहे, आवडले.

श्रीकृष्ण सामंत's picture

7 Jul 2008 - 10:56 pm | श्रीकृष्ण सामंत

चित्रा ,

आपल्याला आवडलं हे वाचून बरं वाटलं
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

दिनेश५७'s picture

10 Jul 2008 - 4:35 pm | दिनेश५७

सामंत भाऊ, आमास्नी तुमचा ता मालवणी काय जमत न्हाई, पन, येक सांगतू बगा.
येकदम अस्सल माल. मागं कोकनात कणकवलीच्या मठाजवळच्या येका खानावळीत मटनाचा रस्सा भुरकला व्हता... आगदी, प्वोटाला तडस लागंस्तोवर हानला... ईक्ती वर्सं झाली, पन आजून ती चव त्वोंडात हाये. ह्ये वाचताना, पुन्ना त्योच खमंगपना आटवला...
गजाली आजून येऊंद्यात म्हंतो मी.

श्रीकृष्ण सामंत's picture

10 Jul 2008 - 7:05 pm | श्रीकृष्ण सामंत

दिनेश५७जी,
आभार,मालवणी हळू हळू जमेल.मी आपली घाटावरची भाषा अगदी प्रेम करून शिकत असतो.आता आता मला बरीच कळाया लागली आहे.आपल्याला मटनाचा रस्सा आवडला हे वाचून बरं वाटलं.मी सुद्धा तुम्हाला सांगतो कधी पुण्याला आलो की "बोकडाचे ताजे मटण" मुद्दाम चव लावून खातो.आणि इतराना त्याची शिफारस सांगतो.
गजाली करून मी नक्कीच तुम्हाला आनंद देण्याचा प्रयत्न करीन
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

मेघवेडा's picture

9 Feb 2011 - 8:05 pm | मेघवेडा

व्वा! सामंतकाका, 'नुस्ते' खादाडीच्या नि पावसाच्या आठवणींनी भिजवल्यांत सगळ्यांका !!

आठवणींचो म्हापूर इलोहा हयसर!

काकानुं. परत येवा!

असुर's picture

9 Feb 2011 - 8:52 pm | असुर

च्यायला, ह्या कोकणातल्या पावसाने अगदी पिच्छा पुरवलाय! परवाच त्या 'गंध' मधला पाऊस पाहून वेड लागायला झालं होतं, आज हा सामंतकाकांचो लेख वाचून जीव गेलाच की अगदी!
एकदाच अनुभवलेल्या कोकणातल्या पावसाच्या आठवणींमध्ये गुंतून पडायला होतंय!! उपाय आहे का काही यातून सुटण्याचा?? हा पाऊस पार म्हणजे जीवाला पीसे लावतोय!!!

--असुर