"संत वॅलेंटाईन, काय माणूस होता सांगू ! एकदम झक्कास. प्रेमास अमर करून गेला बेटा! त्याची समाधी कुठे आहे सांगाल का? ऑर्किडची फुलं सजवायची होती त्यावर मला.", आता हे मी लिहित नाहीये किंवा लिहितच असेन तर माझं मानसिक स्वास्थ्य बिघडलं असेल हे सुज्ञास सांगणे नलगे.
"वॅलेंटाईनविषयी लिही ना", असं विनंतीवज फर्मान माझ्या गुलबक्षीने (गर्लफ्रेण्ड हो!) गेल्या आठवड्यात काढल्यावर मी माझं मराठी टायपिंगचं सॉफ्टवेयर कॉम्प्युटरमधून काढून टाकलं होतं. स्वीटीच्या मागल्या बर्थ डे च्या दिवशी तिल्या दिलेल्या ग्रीटींग कार्डावर तिला मराठीत शुभेच्छा लिहिताना अक्षरांच्या स्वरूपात कोंबड्यांच्या पायाला शाई लाऊन त्या अक्षरशः कागदावर नाचवल्या होत्या. गर्ल ने अगम्य लिपी वाचून अन त्यावर कानापर्यंत खोटं हासून मला "आय लव यु" म्हणत कडकडून मिठी मारलेली मला लख्ख आठवतेय (हे सांगताना माझ्या सावळ्या गालावर लाली चढलीय. ती दिसत नसेल तर तो तुमचा प्रश्न आहे). त्यामुळे ती मला पुन्हा माझ्या स्वाक्षरीत कागदावर लिहायला लावील ह्याची शक्यता अक्षय खन्नाच्या टकल्यावर केस उगतील इतकी कमी होती. त्यामुळे मराठी सॉफ्टवेयर अनईन्स्टॉल केल्यावर वॅलेंटाईनच्या कचाट्यातून मी तसा सुटलो होतो.
पण दुसऱ्या दिवशी कॅडबरीला हे कळल्यावर ती मला हटाने म्हणाली, "हे काय रे विनू. कर ना पुन्हा इन्स्टॉल!". त्यासाठी तिने मला गालावर दोन मुकेही दिले होते. (लाजून पाणी झालोय). त्या दोन पाप्यांच्या बदल्यात मी पुरता फसलो होतो. आज लाडू लवकर घरी येणार होती. तोवर मल लेख संपवायचा होता. पण पुढच्या तीन ओळी सोडून टेपा मारता येत नाहीत. आठवून आठवून बेजार झालोय. त्यातूनच उत्पन्न होणारे हे पर्सनल विचार. भावनांचा उद्वेग म्हणणे अधिक संयुक्तिक होईल.
हे बघा प्रेमाचा एक कॅलेण्डर दिवस आहे. १४ फेब्रुवारी. त्याला म्हणतात वॅलेण्टाईन डे. इ.स. २००० साली जेव्हा गणू आजोबांना मी वॅलेंटाईनची व्याख्या सांगितली तेव्हा ते वॅलेंटाईन ऎवजी टर्पेंटाईन दिवस समजून कवळीवजा हसले होते. मी ही त्या पी.जे वर हसलो. कारण गणू आजोबांची नात म्हणजे माझी पप्पी अन तिचे आई वडीलही तेव्हा हसत होते.
खरं तर इ.स. २००० पूर्वी वॅलेंटाईनडे ला भीक घालणाऱ्यांपैकी मी नव्हतोच. पण तेव्हाच्या कॉलेज फेस्टिवल मध्ये ही रोझ क्वीन झाली होती. मी तिला २२ गुलाबं पाठवली होती. त्या २२ गुलाबांसाठी मित्रांकडून घेतलेली देणी इंजिनियरींगच्या शेवटच्या वर्षापर्यंत सुटली नव्हती. त्याच मित्रांनी दिलेल्या शिव्याशापांचा हा परिणाम असावा. आज मी वॅलेंटाईनविषयी खोटंनाटं लिहितोय. अहो कीबोर्डमधून शब्द फुटत नाहीत!
ह्याच शोचनीय अवस्थेत मला फ्लॅशबॅक दिसतो तो २००० सालच्या पहिल्या वॅलेंटाईनचा. आता पहिला वॅलेंटाईन डे म्हणजे तिच्यासाठी जणू तिचा बर्थडेच. शिवाय ६ जून. तिचा खरा बर्थडे. ५ जूनचा मॉक बर्थडे. त्याव्यतिरिक्त २० सप्टेंबर. हा माझा बर्थडे. पण ह्याही दिवशी पैसे माझ्याच खिश्यातून सांडायचे म्हणून हाही जणू तिचाच बर्थडे. "दिवाळी" किंवा "दिवाळे" ह्याला एक सुसंगत शब्द म्हणजे "माझ्या स्विटीपायचा बर्थडे".
बरं तर मी सांगत होतो, माझ्या पहिल्या वॅलेंटाईनडे ची कथा. इसविसन १४ फेब्रुवारी २०००. बांद्रा-गेईटीच्या रणांगणावर विनितभाऊ एकटे उभे ठाकले होते. माझ्या स्ट्रॉबेरीला ‘कुछ कुछ होता है’ बघायचा होता. अन मी मात्र जॅकी चानचा ‘शांघाय नाईट्स’ बघितला असता तर! ह्या स्वप्नात कानाशी घोंघावणाऱ्या माशा हाकलत गेटशी उभा होतो. खिशातल्या २०० रूपयांची सांगड आजच्या दिवशी कशी घालता येईल ह्यासाठी मी आदली रात्र प्लानिंग करत जागवली होती. त्यासाठी मी मोठ्या भावाचे एम.बी.ए.चे आपत्ती व्यवस्थापनाचे म्हणजे सोप्या भाषेत डिसॅस्टर मॅनेजमेण्टचे नोट्स वाचत आराखडे बांधले होते. पुढच्या अर्थशास्त्रीय नोबेल पारितोषकासाठी मी तोच रूपीज २०० वर्सेस वॅलेंटाईनडे हा शोधनिबंध प्रस्तुत करणार आहे. त्यासाठी लागणारे ५ वर्षांचे वॅलेंटाईनडेजचे जमाखर्च मी स्टॅटिस्टिकल डेटा म्हणून जमवून ठेवले आहेत.
गुलबक्षी आल्यावर मी जॅकी चानला ‘शेशे’ करून "कुछ कुछ होता है!" पहायला थिएटर मध्ये घुसलो. आता का घुसलो हा प्रश्न मला विचारू नका. ओव्हरॅक्टींग चे क्लासेस चालवणारा हिरो, म्हशीपेक्षा जाड अन सावळी हिरोईन, नातीच्या वयाचे चाळे करणारी आजी अन आजीच्या वयाची ऍक्टींग करणारी नात पाहून मला शॉर्ट स्कर्ट मधली टीना मेली तेव्हा ह्या चित्रपटात राम नाही म्हणून खूप रडू कोसळलेलं. त्या माझ्या रडण्याला ही आजही एक फिल्मी इमोशनल मोमेण्ट मानून चालतेय. तिला अजूनही वाटते की "कुछ कुछ होता" माझा आवडता पिक्चर असावा. पण एक मात्र मानायला हवं, तिचा हा ग्रह झाल्यानेच मी प्रेमाची पुढची पायरी चढू शकलो. शिवाय चित्रपट ५० रूपयात आटोपला. तोवर टॅक्स फ्री झाला होता न तो. (डिसॅस्टर मॅनेजमेण्ट रॉक्स!!!)
एका अतिसामान्य मुंबईकराप्रमाणे बांद्राला फिरायला आल्यावर बॅण्डस्टॅण्डला येऊन कॉफी पिऊन काशीयात्रेचे समाधान घेऊन जाणे ह्याला मीही काही अपवाद नव्हतो. मग पिक्चर संपल्यावर उत्साहाच्या भरात रिक्षा पकडली आणि डिसॅस्टर मॅनेजमेण्टचा पुरता फज्जा उडाला. ३५ रुपये रिक्षाने चापले. आता ११५ रुपयात बॅण्डस्टॅण्डची कॉफी आणि आर्चिजचं गिफ्ट असा प्रोग्रॅम आटपायचा होता. पण नियतीने पुन्हा कच खाल्ली आणि बॅण्डस्टॅण्डवर नेहेमीच्या शंभू कॉफी हाऊस च्या ठिकाणी नवीन बरिस्ता उघडलेले होते. ते बघून रसमलाईला मोह आवरेना. तिच्या हटटापाई मग मी आढेवेढे घेत आत गेलो अन प्रेमात आकंठ बुडाल्याची ऍक्टींग करत खिशातल्या १०० च्या नोटेला गोंजारत एका टेबलावर बसलो. चॉकोलेट लाटटेच्या नावावर स्वार होऊन ११० रूपयाचं बील आलं आणि प्रेम अन पैसा ह्या रणसंग्रामात मी धारातीर्थी पडलो. मला वीरगती प्राप्त झाल्यासारखे वाटत होते.
बरिस्ताने मला बिरस्ता करून सोडले होते. समुद्राच्या काठाने चालताना भोवती दिसणारे राहुल अंजली आधीच एकमेकांना आय लव्ह यु बोलून युद्ध जिंकल्याचे मला दिसत होते. ती शेवट्ची मोक्याची लढाई मला जिंकायची होती. मी घरातल्या कुंडीतला एक गुलाब कापून तो उजवीकडच्या खिशात लपवलेलं. (माझे २० रूपये वाचले होते. डिसॅस्टर मॅनेजमेण्ट रॉक्स अगेन!!!!) मी ते काढून अन ‘आय लव्ह यु’ म्हणून तिच्या हवाली केलं. तिनं मग त्याच गुलाबासारखं हसून दाखवलं अन मला किस्स केलं. मी बससाठी उरलेले ५ रुपये विसरलो होतो!
भानावर येईस्तोवर सूर्य समुद्रात अन बॅण्डस्टॅण्डची जोडपी झुडुपात वा बागेत पांगली होती. माझ्या मेकॅनिक्सच्या सात अस्यान्मेण्ट्स लिहायच्या बाकी होत्या. त्या लिहिणे प्रेमा इतकेच गरजेचे होते. त्यामुळे अजून थांबणे शक्य नव्हते. मग तिनंही माझा निरोप घेतला अन ती बांद्राला तिच्या मावशीकडे निघून गेली. मी बांद्रा ते मालाड मासिक ट्रेन पास व नंतर २४३ नंबरच्या बस ने ४ रुपयात प्रवास करून १ रुपया वाचवला होता. मला आपत्ती व्यवस्थापन जमलं होतं.
तर असा गेला माझा पहिला वॅलेंटाईन डे. नंतरचेही तसेच गेले. वॅलेंटाईनडेचा स्पेशल पाल्य भत्ता २०० रुपयांवर कधी गेला नाही. नोकरी लागल्यावरही आज माझी अवकात ५०० रुपयांवर नाही हे नमूद करावे.
फ्रेण्ड्स ५०० रूपयात वॅलेंटाईनडे परवडला पण मी वॅलेंटाईनवर लिखाण करावे असा जाचक विचार हिच्या मनात आला कुठून असेल? मी ह्यातली पाळेमुळे शोधत असतो तोच दारावर बेल वाजते! पप्पी आली असेल, पण अजून लिखाण पूर्ण नाहीये! काय करावे? मी बिचकत बिचकत दार उघडतो....
... ही माझीच बेब असते. क्युट स्माईल देत. "हाय हनी", असं म्हणून मी तिला बिलगतो अन तोच लाईट जाते.... "ओह नो! मी वॅलेंटाईनवरचा लेख लिहित होतो. तो सेव्ह केला नव्हता!!"..... अशा मोक्याच्या क्षणाचा फायदा मी ऊठवला नसता तर माझ्या सारखा लुख्खा कुणी नसेल.... (आय ऍम सो विक्केड!)... ती मला बघून मधाळ आवाजात वॅलेंटाईनडे गिफ्ट मागते.... मी तिला माझ्या उजव्या खिशातलं गुलाब काढून देतो अन ती गुलाबासारखं हसून दाखवते अन मला किस्स करून कवेत घेते....
..... तिनं मला अजूनही कवेत घेतलेय. मी मात्र अगदी मोक्याच्या क्षणी वीज गायब केल्याबद्दल रीलायन्स एनर्जीला वॅलेंटाईनडे गिफ्ट म्हणून कुंडीतला गुलाब पाठवायचा विचार करतोय.....
-- विनित संखे
प्रतिक्रिया
24 Mar 2011 - 3:13 pm | परिकथेतील राजकुमार
छान लिहिताय. :)
विनितशेठ तुम्ही लिहिता सुंदरच, फक्त हरकत नसेल तर एक वाचक म्हणुन २ विनंत्या आहेत :-
१) तुमच्या दोन लिखाणांमध्ये शक्यतो अंतर ठेवा. रोज एक लेख ह्या दराने लेख आले तर मग लेखकात आणि लेखनात नाविन्य राहात नाही आणि इतर लेखकांना देखील व्यासपीठावर जाग उपलब्ध होत नाही.
२) तुमचे हे लिखाण खुप आधी तुमच्या ब्लॉगवर वाचलेले आहे (आता पुनर्वाचनात देखील आनंद मिळालाच हे नक्की) त्यामुळे तुम्हाला जमेल तेंव्हा आणि शक्य असल्यास आम्हा मिपाकरांसाठी काही नविन तर्री मारलेली मिसळ द्याल तर मजा येईल.
24 Mar 2011 - 7:10 pm | असुर
मस्त लिहीलंय!!! पहिल्यांदाच वाचलंय! आजपर्यंत व्हॅलेंटाईन डे ची मॅनेजमेंट करायला लागली नसल्याने तुमचा (कल्पित/असली) अनुभव रोचक वाटला.
गविनंतर अजून एक दणदणीत लिहीणारा मिपाच्या मिरवणुकीत जॉईन झाल्याचा आनंद! :-)
--असुर
24 Mar 2011 - 3:31 pm | ५० फक्त
+१ टु परा आणि असुर दोघांनाही.
अरे विनीतशेट, ते शेवट्चा पॅरॅच्छेद तीन वेळा च्यॉप पास्ते झालंय का रे ? तुला खरड पण टाकली होती याबद्दल.
24 Mar 2011 - 3:38 pm | गणेशा
अप्रतिम लेखन प्रेयशी बद्दल दरवेळेस नविन नाव वापरल्याने खुपच छान वाटले
असेच लिहित रहा .. वाचत आहे
24 Mar 2011 - 3:40 pm | वपाडाव
गुलबक्षी, कॅडबरी, लाडू, पप्पी , स्विटीपाय, स्ट्रॉबेरी, रसमलाई
काय एकाहुन एक विशेषणे/विषेशणे (पहिलं बरोबर असावं, दुसरं वाचल्यासारखं वाटत नाही.)...
आम्हाला आमच्या पेपरमिंटीला यातलं काही देता आलं तर लै भारी !!
24 Mar 2011 - 4:02 pm | कच्ची कैरी
कॅडबरी,लाडु स्ट्रॉबेरी,रसमलाई व्वा काय उपमा दिल्या आहेत ,ह्यावरुन एक शंका येते तुम्ही विंजिनेर कि हलवाई ?;)
बाकि लेख एकदम मनोरंजक
24 Mar 2011 - 4:49 pm | आत्मशून्य
हा....हा....
24 Mar 2011 - 5:21 pm | प्राजक्ता पवार
मस्तं लिहलंय .
24 Mar 2011 - 6:28 pm | मृत्युन्जय
मस्त लिहिलय रे विनित. असुर म्हणतो त्याप्रमाणे गविंनंतर अजुन एक चांगला लेखक गावलाय.
आणि बादवे पराला पण + १
24 Mar 2011 - 6:39 pm | सूर्यपुत्र
कॅडबरी,लाडु स्ट्रॉबेरी,रसमलाई, स्विटीपाय.... अश्या अनेक आपत्त्या असल्यावर 'आपत्तींचे (योग्य) व्यवस्थापन' कसे करावे, याचे मार्गदर्शन घ्यावे लागणारच. ;)
(ह.घ्या. :) )
लेख छानच.
-सूर्यपुत्र.
24 Mar 2011 - 6:40 pm | शुचि
मजा आली. लिहीत रहा.
24 Mar 2011 - 6:58 pm | रेवती
मनोरंजक लेखन!
तुमच्या मैत्रिणीला दिलेली नावे वाचून हसू आले.
शेवट तिनदा कॉपी केलाय ते मुद्दाम्हून असेल अशी आशा आहे.;)
24 Mar 2011 - 9:31 pm | विनीत संखे
तीनदा कॉपी झाल्याबद्दल क्षमस्व!
25 Mar 2011 - 12:10 am | प्रास
स्वसंपादन सोय वापरा की भौ.....
बाकी लेख छानच जमलाय हं.....
पुलेशु.
25 Mar 2011 - 12:19 am | पिवळा डांबिस
अजून लिहीत जा हो!
इथे मिपावर मुंबईकर लेखकांचं सॉल्लीड शॉर्टेज आहे!!!
:)
26 Mar 2011 - 2:58 am | निनाद मुक्काम प...
सहमत
आमचे त्या वरण वोहर सारखे आहे .
मुंबईकर असा शिक्का पासपोर्ट वर आहे
पण आमच्या बाता त्यांच्या सिनेमातील गाण्यासारख्या एकदम आल्प आणी अश्याच परदेशातील निसर्ग रम्य स्थळांवर फिरत असतात .
तुम्ही लेखातून अस्सल मुंबईचा फिल आणला .
ह्याच परिसरात हॉटेल व्यवस्थापनाची मुळाक्षरे गिरवली .त्यामुळे जुन्या आठवणी ताज्या झाल्या .
26 Mar 2011 - 12:01 pm | नन्दादीप
+१०००००००००००००००००००००
25 Mar 2011 - 7:21 am | पप्पुपेजर
मस्त लेख, अजुन वाचायला आवडेल
25 Mar 2011 - 11:21 pm | दीप्स
मस्त लेख, अजुन वाचायला आवडेल.
26 Mar 2011 - 10:37 am | sneharani
मस्त लेखन!!