फसवणूक-प्रकरण १९: नवी विचारसरणी
© एड्रियन लेव्ही आणि कॅथरीन स्कॉट-क्लार्क (मूळ लेखक)
© सुधीर काळे, जकार्ता (मराठी रूपांतरासाठी मूळ लेखकांच्या वतीने)
मराठी रूपांतर: सुधीर काळे, जकार्ता
(या लेखातील सर्व मते मूळ लेखकद्वयींची आहेत)
मूळ इंग्रजी लेखातील शब्द: १४१९६; मराठी रूपांतरातील शब्द: ९२८०; संक्षिप्तीकरण: ६५ टक्के
KRL कर्मचार्यांना कुठे ठेवले आहे व त्यांचे "debriefing" अडीच वर्षें चालणार आहे हे कुणालाच माहीत नव्हते. सुरक्षित केलेल्या घरांत ISI अधिकारी त्यांना सांभाळत होते. मधुमेह व उच्च रक्तदाबाचे रोगी असलेले आणि पाकिस्तानच्या परमाणूजगतात दोन नंबरची व्यक्ती समजले जाणारे ५४ वर्षीय डॉ. फरूक त्यांचे बहुतेक सारे दिवस अंधारात, आज या गांवात तर उद्या दुसर्या, काढत होते. वारंवार होणार्या चौकशीमुळे ब्रि.सजवाल कृश झाले होते आणि Parkinson's disease झालेल्या रोग्यासारखे त्यांचे अंग थरथरे! कधीकधी ISI मधून अचानक फोन येई व भेटायची अनुमती मिळे, पण त्यांच्या संभाषणातला शब्द अन् शब्द कांहीं लपविलेली माहिती बाहेर येते कां हे पहाण्यासाठी ISIचे अधिकारी ऐकत असत.
हे कर्मचारी 'प्रकल्प A/B'मध्ये लष्कराची आणि स्वतः मुशर्रफ यांची कशी साथ होती याबद्दल जिवावर उदार होऊन सांगायला तयार होते अशा अर्थाच्या वावड्या पाकिस्तानात उडत होत्या. सर्व शास्त्रज्ञांची परिस्थिती फार वाईट होती, त्यांच्या घरात चोरून ऐकण्यासाठी सूक्ष्म मायक्रोफोन्स बसविलेले होते, त्यांचे फोन काढले होते आणि अख्खी वसाहतच पोलिसी गराड्यात असल्यामुळे या शास्त्रज्ञांची मुले जणू तुरुंगवासातच होती!
कांहीं थोडी माणसे बाहेर रावळपिंडीत रहात, पण तेही एक 'कँटोनमेंट'च होते व तिथेही या कुटुंबियांवर नजर ठेवण्यासाठी खूप लोक उपलब्ध होते. त्यामुळे कुणीही आला-गेला तर ते सगळीकडे होत असे.
मुशर्रफ गादीवर आल्यापासून तर कित्येक लोक हॊटेल्समध्ये, चहा-कॉफीच्या दुकानांत कोण काय बोलतय् ते ऐकून 'वर'च्यांना त्याबद्दल सांगून चार पैसे कनवठीला लावायला बघत असत. टॅक्सीचे चालकही आत बसलेल्या गिर्हाइकांचे संभाषण ऐकून 'वर' रिपोर्ट करत असत. प्रत्येक हॉटेल्समधील प्रत्येक खोलीही असुरक्षित होती कारण पाहुण्यांच्या संगणकाची hard drives कॉपी केले जात व त्यांच्या ई-मेल्स वाचल्या जात. रेस्तोराँमधील वेटर्सही चोरून ऐकलेली संभाषणाबद्दल 'वर'च्यांना सांगून बक्षीस मिळवीत असत. असे काम करायची ISI ची नेहमीची पद्धत होती आणि गरीबी आणि भीती यांच्या जोरावर ते असले 'हेर' सहज नेमत असत. कधीकधी वेळ लागे, पण ISI अधिकारी या भुकेल्या नागरिकांना वेठीला धरून काम करून घेत.
KRL च्या परदेशी खरेदी विभागाचे प्रमुख असलेले डॉ. महंमद फरूक हे एक अतीशय साधे गृहस्थ होते. त्यांचे घरही साधे होते. पण त्यांचा मुलगा त्या दिवसात भीतीपोटी कुणाशी बोलतच नसे. घराबाहेरही जायची चोरी कारण वडिलांना भेटण्यासाठी ISI कडून कधी फोन येईल याचा भरवसा नसे[१].
डॉ. फरूक यांचे घर म्हणजे एक बेडौल आधुनिक बंगला होता. तिकडे एरवी कुणाचे लक्षही गेले नसते पण हल्ली तिथे फिक्या पिवळसर रंगाच्या कुर्त्यातले लोक गस्त घालायला उभे असल्यामुळे लक्ष जात असे. लेव्ही आणि स्कॉट-क्लार्कना या पुस्तकाच्या संदर्भात भेटायचे होते. कसेबसे त्यांचे सुपुत्र त्यांच्याशी बाहेरच येऊन बोलले कारण घर सारे मायक्रोफोन्सनी भरलेले होते. त्यांनी आपण स्वतः खूप घाबरल्याचे सांगितले. ते डॉक्टर होते त्यामुळे त्यांना रक्त पहायची संवय होती पण खानसाहेबांच्या अटकेमुळे त्यांना सगळ्यांनाच अतोनात त्रास होत होता व पाश्चात्य वृत्तपत्रांत येणार्या सर्व वार्ता सत्याचा विपर्यास करणार्या होत्या असे ते म्हणाले. त्यांचे वडील एक सज्जन कर्मचारी होते, कुठल्याही हेरगिरीत त्यांचा हात नव्हता व देशासाठी जे करायला लावले गेले ते त्यांनी केले पण तरीही त्यांना हा त्रास होत होता. एवढे कसेबसे बोलून ते लगबगीने आत गेले.
ISI अधिकार्यांनी आपले काम चोख केले होते. सगळ्याच घरांमध्ये आणि सगळ्या पातळ्यांवर हीच परिस्थिती होती. अगदी सत्ताधीशांना जवळ असलेल्या शरीफुद्दिन पीरजादा यांच्यासारख्यांनाही खानसाहेबांबद्दल बोलायची हिम्मत नव्हती. हुमायून गौहर हे प्रसिद्ध संपादकही प्रत्येक शब्द तोलून-मापून बोलत. पाकिस्तानमध्ये हे फार तणावाचे व क्लेशदायक दिवस आहेत असे सांगून ते इतर बिनमहत्वाच्या विषयांकडे वळले. 'हे लष्करी लोक जीव घ्यायलाही मागे-पुढे पहाणार नाहींत' असे सांगून बेनझीरबाई म्हणाल्या कीं अजूनही आंतरराष्ट्रीय समाज त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवायला तयार नव्हता, उलट असे बोलल्याबद्दल त्यांनाच वेड्यात काढत होता असेही त्या म्हणाल्या[२].
खानसाहेबांचे कराचीतील मानसोपचारतज्ञ डॉ.अहमद यांच्याबरोबरचे संबंधही पूर्णपणे तुटले होते कारण भरपूर देणग्या देऊन त्यांनी स्वतःची अध्यक्ष म्हणून नेमणूक करून घेतली होती व लष्करी सैनिकांसह त्यांच्या बंधूंनी तिथे येऊन डॉ.अहमदना त्यांच्या नर्सेस व इतर अधिकार्यांसह बाहेर काढले होते. डॉ.अहमदनी खानसाहेबांच्याविरुद्ध कोर्टात खटला दाखल केला होता व त्याला खूपच (कु)प्रसिद्धी मिळाली होती. पण जानेवारी २००४च्या खानसाहेबांच्या अटकेनंतर ISI अधिकारी डॉ.अहमदना भेटले व त्यांना सांगितले कीं त्यांच्या खटल्यामुळे सरकार, मुशर्रफ आणि खानसाहेबांच्यात दिलजमाई होत नसून त्यांनी डॉ.अहमदना धीर ठेवायला, गप्प बसायला आणि आपला खटला मागे घ्यायला सांगून खानसाहेबांच्या बरोबरचे त्यांच्या सार्या समस्यांचे निवारण होईल असे आश्वासन दिले. खानसाहेबांनी कमावलेला सारा पैसा सोन्याच्या रूपात दुबईच्या ARY Bankमध्ये असून डॉ.अहमदनी धीराने घावे असा सल्ला देऊन ते गेले. डॉ.अहमदनी खटला मागे घेतला नाहीं. त्यांच्यावरचा दबाव वाढविण्यासाठी ISI अधिकारी खानसाहेबांचे मित्र असलेल्या 'डॉन' वृत्तपत्राच्या एका ज्येष्ठ संपादकाकडे गेले. याने जिद्दीने खानसाहेबांविरुद्धच्या खटल्याला प्रसिद्धी देणे चालू ठेवले होते. त्यांना 'डॉन'ने तडकाफडकी नोकरीवरून कमी केले[३].
मुशर्रफनी खानसाहेब प्रकरणातले सगळे मोहरे पोतडीत बंद केले होते कीं खानसाहेबांचे आणि त्यांच्या सहकार्यांची मुस्कटदाबी केल्यावर पाश्चात्य राष्ट्रे ही भानगड आणि त्यातला लष्कराचा सहभाग विसरून जातील. लष्कराची अधिकृत भूमिका होती कीं KRL अधिकारी अटकेत आहेत, खानसाहेब आणि त्यांचे वैयक्तिक जाळे नष्ट करण्यात आले आहे आणि आणखी कुणाला अटक करण्याची जरूरी नाहीं. आणखी ज्यांची नांवे घेण्यात येत होती त्या व्यक्ती हयातच नव्हत्या. त्यात डॉ. जाफर नियाझी (जुल्फिकार भुत्तोंचे राजकीय सल्लागार) आणि ज.इम्तियाज अहमद (त्यांचे लष्करी सचीव) हे दोघे सुद्धा होते. हे दोघे बेनझीरबाईंचेही मदतनीस होते आणि इराणला परमाणू तंत्रज्ञान विकण्याचा बाईंनी आग्रह धरला होता असा आरोपही त्यांच्यावर केला जात होता. (तो आरोप बेनझीरबाईंनी साफ धुडकावून लावला होता.)
पाश्चात्य राष्ट्रांना काळजी होती अण्वस्त्रप्रसाराची आणि तो जर थांबवला गेला असेल तर त्यांना खानसाहेब आणि त्यांचे सहकार्यांच्या अटकांबाबतीत कांहींच स्वारस्य नव्हते. यात आर्मिटेज-मुशर्रफ कराराद्वारां अमेरिकेने अग्रणी भूमिका घेतली होती व त्यानुसार मुशर्रफनी अमेरिकेला खानसाहेबांची चौकशी करण्यास मोकळीक दिली होती (अर्थात् ISI द्वारा!) पण त्यानंतरच्या सहा महिन्यात ब्रिटिश गुप्तहेरसंघटना, IAEA आणि अमेरिकेच्या अण्वस्त्रप्रसारविरोधी विभागातील अधिकार्यांनुसार मुशर्रफ आपल्या वचनाला जागत नव्हते. खानसाहेब नाहींसे झाले होते व त्यांना मध्यस्थांकडून विचारल्या गेलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळत नव्हती. परराष्ट्रमंत्रालयातील खानसाहेबांच्या चौकशीतील एक महत्वपूर्ण आधिकारी आइनहॉर्न म्हणाले कीं खानसाहेबांना व त्यांच्या सहकार्यांना गृहकैद झाल्यापासून त्यांना पाकिस्तानकडून कांहींच महत्वाची माहिती मिळाली नव्हती. खानसाहेबांच्यासारखे महत्वाचे लोक अमेरिकनांपासून दूरच ठेवले जात होते. अमेरिकन अधिकारी आपल्या प्रश्नांची यादी घेऊन उभे होते आणि त्यांचे आवडते मित्रराष्ट्र त्यांच्याकडे ढुंकूनही पहात नव्हते.
थोड्याशा अवधीनंतर मुशर्रफनी सार्या 'खान चौकशी'लाच वाटाण्याच्या अक्षता लावल्या! पाकिस्तान सरकारने जाहीर करून टाकले कीं चौकशी संपली असून सर्व गोष्टींची शहानिशा करण्यात आली आहे. मे २००६ मध्ये परराष्ट्रमंत्रालयाच्या प्रवक्त्या तस्नीम अस्लम म्हणाल्या कीं अमेरिकन सरकार व IAEA पाकिस्तानने ज्या तर्हेने हा मुद्दा हाताळला त्यावर संतुष्ट असून सरकारला याहून जास्त कांहींही उघड करायचे नव्हते! थोडक्यात एका वारात मुशर्रफनी 'प्रकल्प A/B'ची प्रगती रोखली होती! ना भूतो न भविष्यति या स्तरावर ३० वर्षे सतत चालविलेले खरेदी आणि अण्वस्त्रप्रसाराचे जाळे, हजारो शास्त्रज्ञ, मध्यस्थ, दलाल, माल पुरवणारे, निर्यात करणारे, आयात करणारे या सर्वांच्यासाठी या १०-१२ जणांना बळी देऊन मुशर्रफ मोकळे झाले. अमेरिकेच्या कायद्यांच्या आणि त्यांच्या गुप्तहेरकात्यांच्या कक्षेबाहेर ठेवण्यासाठीच जणूं अटक झालेल्या सर्व KRL कर्मचार्यांना आयुष्यभर गृहकैदेची शिक्षा दिली गेली! तस्नीम अस्लमनी कबूल केले कीं जरी तांत्रिक दृष्ट्या डॉ. फरूक हे स्थानबद्धतेतून सोडले गेलेले खानसाहेबांच्या सहकार्यांमधील शेवटचे कर्मचारी असले तरी उरलेल्या आयुष्यात ते कधीही ISI च्या सोबतीशिवाय घराबाहेर पडू शकणार नव्हते!
पाकिस्तानने या कर्मचार्यांवर कुठलेही धड आरोप ठेवले नाहींत, अमेरिकेला त्यांच्या चौकशीबद्दल कुठलीही गुप्त माहिती दिली नाहीं. गालुच्ची[४] चकितच झाले. अमेरिकेच्या पाकिस्तानी मित्राने द्रोह केला होता व त्याचा राग येणे सहाजिकच होते आणि तसा राग युरोपियन राष्ट्रें, इस्रायल व भारताला आलाही. पण ते बुश-४३ सरकारला सोयीचे होते कारण मुशर्रफना वाचवून त्यांना एका नव्या राजवटीविरुद्ध वापरायचे होते. . ती राजवट होती नरसंहारक्षम शस्त्रास्त्रसज्ज इराण. त्या राष्ट्राला ही शस्त्रें मिळाली होती व ती माहिती त्यांना खानसाहेबांच्याकडून मिळाली असे दाखवायचे नव्हते कारण खानसाहेबांचेच राष्ट्र (पाकिस्तान) त्यांच्या दहशतवादाविरुद्धच्या युद्धात साथीदार होते. व असे कबूल करून बुशना त्यांचे लक्ष विचलित होऊ द्यायचे नव्हते.
अमेरिकेने खानसाहेबांच्या टोळक्याला व त्यांच्या लष्करी नियंत्रकांना जणू मुक्तच केले होते आणि आपला मोर्चा इराणकडे वळविला होता. आणि हे करताना तेथील मुरब्बी मुत्सद्द्यांना आणि अनुभवी शस्त्रास्त्रतज्ञांना बाहेर काढून परराष्ट्रमंत्रालयाची जणू 'सफाई'च केली होती व त्यांच्या जागी सरकारच्या आक्रमक धोरणाची री ओढणार्या नवशिक्यांना नेमले होते. पहिली कांहीं वर्षें बुश-४३ सरकारला अण्वस्त्रप्रसारविरोधाचा भक्कम आधार मिळाला होता, पण खानसाहेबांची चौकशी गुंडाळून टाकली तेंव्हापर्यंत ते धोरण कधीच मृत्यू पावले होते.
२००१मध्ये जेंव्हां बोल्टनना 'शस्त्रास्त्रनियमन आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा'विभागाचे उपपरराष्ट्रमंत्री या नात्याने परराष्ट्रमंत्रालयात घुसवण्यात आले तेंव्हां त्याला कोलिन पॉवेल व इतर अनुभवी अधिकार्यांचा विरोध होता. कारण त्यांना हा बदल म्हणजे परराष्ट्रमंत्रालयाला 'व्हाईट हाऊस'ची बटीक बनविण्याचा प्रयत्न वाटला होता. बुश-४३चे शस्त्रकपात विभागाचे फिरते मुत्सद्दी नॉर्म वुल्फ यांच्या आठवणीनुसार बोल्टन हे पॉवेल यांची या जागेसाठीची पहिली निवड नव्हते. त्यामुळे ते बोल्टनना टाळून थेट वुल्फ यांच्याशीच बोलायचे. पण आपल्याशी विरोध करणार्यांची पदावनती करून बुश-४३ यांच्या समर्थकांना पदोन्नती देण्याबद्दल बोल्टन यांची ख्याती होती.
बोल्टन यांचे परराष्ट्रमंत्रालयात आगमन झाले तेंव्हां शस्त्रास्त्रनियमनाच्या कार्यपद्धतींच्या मोठ्या प्रमाणावरील पुनर्रचनेला दोन वर्षें झाली होती. त्यानुसार ACDAचे[५]'शस्त्रास्त्रनियमन', अण्वस्त्रप्रसारविरोध आणि 'सत्यान्वेषण व पालन' असे तीन उपविभाग करण्यात आले होते. बोल्टन नेहमी जाहीरपणे बोलत कीं त्यांच्या लेखी अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय कारारांना व IAEAसारख्या आंतरराष्ट्रीय संघटनांना फारशी किंमत नव्हती. त्यामुळे अण्वस्त्रप्रसारविरोधी करार व त्यावर नजर ठेवणार्या संघटनांमधील दोष शोधणार्या सत्यान्वेषण उपविभागाच्या प्रमुखांशीच त्यांची गट्टी जमली.
बोल्टन यांच्या या स्वभावामुळे या तीन्ही उपविभागात संघर्षमय वातावरण असे. ती वेळ अशी होती कीं इराण व उ.कोरिया यांच्या परमाणू प्रकल्पांचा सतत मागोवा घेणे, पाकिस्तानमधील "प्रकल्प A/B" गुंडाळून टाकणे आणि आर्मिटेज यांच्या मुशर्रफ यांच्याबरोबरच्या गुप्त कराराला अंतिम स्वरूप देणे अशी महत्वाची कामे होती. पण शस्त्रास्त्रनियमन विभागातील अधिकार्यांचे लक्ष या तीन उपविभागातील आपापसातील चढाओढीमुळी विचलित होत होते व त्यात अण्वस्त्रप्रसारविरोधी उपविभागावर सगळ्यात जास्त परिणाम होत असे. अण्वस्त्रप्रसारविरोधी विभागाचे उपनिर्देशक तिथल्या कपट कारस्थानांमुळे, गुप्त बैठकांमुळे आणि त्यांना वगळून एकमेकांकडे जाणार्या निरोपांमुळे त्रासलेले होते पण बोल्टन असल्या समस्या सोडवायच्याऐवजी ते असल्या वागणुकीला उत्तेजनच देत असत. बोल्टनना अण्वस्त्रप्रसारविरोधी उपविभाग अविश्वसनीय वाटे कारण त्यांचे मतभेद ते उघडपणे मांडत. त्यामुळे अधिकार्यांमध्ये रोजची भांडणेही होत असत. त्यामुळे बर्याचदा परदेशी सरकारें आणि इतर मंत्रालयांनासुद्धा कळत नसे कीं इथे प्रमुख कोण आहे!
सावळ्यागोंधळामुळे शेवटी समरप्रसंगच आला व शेवटी परराष्ट्रमंत्रालयाच्या 'इन्स्पेक्टर जनरल'ला अन्वेषणासाठी बोलावण्यात आले. सप्टेंबर २००४मध्ये खानसाहेबांना गृहकैदेत ठेवल्याला सात महिने झाल्यानंतर इन्स्पेक्टर जनरलनी शस्त्रास्त्रनियमन आणि अण्वस्त्रप्रसारविरोध या दोन उपविभागांचे एकीकरण करून एक सर्वोच्च अधिकार असलेला विभाग बनविण्याचा सल्ला दिला. पण यावर अंमलबजवणी व्हायच्या आधीच पॉवेलनी राजीनामा दिला आणि 'पेंटॅगॉन'बरोबरचे दहशतवादाविरुद्धच्या युद्धाबद्दलचे चार वर्षांचे त्यांचे मतभेद संपुष्टात आले. दोनच दिवसात बुश-४३नी त्यांच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीवरील सल्लागार काँडोलीझा राईसबाईंची त्या जागेवर नेमणूक केली. या बदलामागे त्यांच्या मंत्रीमंडळातील मतभेद दडपण्याचा उद्देश होता. लवकरच बोल्टनना संयुक्त राष्ट्र संघटनेतील अमेरिकेचे राजदूत म्हणून नेमण्यात आले. त्या संघटनेबद्दल "सदसद्विवेकबुद्धी व परिणामकारकता नसलेली संघटना" असे मत असलेले व सार्या जगाचे नेतृत्व एकुलत्या एक अतिसमर्थ राष्ट्राने (म्हणजेच अमेरिकेने) केले पाहिजे अशी एकांगी मते असलेले बोल्टन तिथे आणखीच अनर्थ माजवतील अशी भीती होती.
बोल्टनच्या जागी लिबियातील वाटाघाटीत सहभागी असलेल्या आणि अतीशय आक्रमक धोरणांना पाठिंबा देणार्या रॉबर्ट जोसेफना नेमण्याचा राईसाबाईंचा निर्णय ऐकल्यावर अण्वस्त्रप्रसारविरोधी उपविभातील परिस्थिती सुधारण्याच्या आशेवर पाणी पडले! सर्व आंतरराष्ट्रीय करारांबद्दल आदर नेसलेले व एकतर्फी युद्ध करण्याबद्दल अनुकूलता असलेले अशी त्यांची ख्याती होती! अण्वस्त्रप्रसारात गुंतलेल्या अधम राजवटींना तोंड देण्यासाठी अमेरिकेने आपल्या नरसंहारक्षम शस्त्रास्त्रांचे शस्त्रागार संपन्न ठेवावे व अमेरिकेवर कुणी स्वारी करायच्या आधीच त्या राष्ट्राविरुद्ध अमेरिकेने अण्वस्त्रांचा वापर करावा असे त्यांचे मत होते.
इराण, इराक आणि उ.कोरिया ही तीन राष्ट्रे अमेरिकेला सगळ्यात जास्त धोकादायक आहेत अशा निष्कर्षाप्रत आलेल्या १९९८च्या रम्सफेल्ड आयोगाचे जोसेफ एक सभासद होते. नायजरकडून अशुद्ध (कच्चे) युरेनियम विकत घेण्याच्या इराकच्या प्रयत्नांबद्दलचा (चुकीचा) उल्लेख बुश-४३ यांच्या २००३सालच्या State of the Union अभिभाषणात घुसविण्याचा आग्रह धरणारेही जोसेफ आणि बोल्टनच होते. (याच उल्लेखांची परिणती वॅलरी प्लामबाईंचे CIAशी असलेले संबंध उघडकीला येण्यात झाली होती.)
सरकारातील पुनःप्रवेशानंतर जोसेफनी एक नवी चळवळ आरंभली: अण्वस्त्रप्रसारविरोधी प्रतिघात[७]. याचा अर्थ होता जी राष्ट्रें अण्वस्त्रप्रसारात गुंतली असतील अशांनी अमेरिकेवर हल्ला करण्याआधीच अमेरिकेने त्या राष्ट्रांविरुद्ध अण्वस्त्रें वापरणे! वॉशिंग्टनस्थित National Defense University येथील "अण्वस्त्रप्रसारविरोधी प्रतिघात केंद्रा"चे संस्थापक व निर्देशक म्हणून काम करताना जोसेफनी या प्रणालीचे विकसन केले होते. अण्वस्त्रप्रसारविरोधी प्रतिघात ही बुश-४३ यांच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या धोरणाची कोनशिलाही होती. हे धोरण त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सप्टेंबर २००२च्या आमसभेत जाहीर केले होते व ते त्यांच्या "अण्वस्त्रप्रसारविरोधी संरक्षणासाठी पुढाकार" या अनेक राष्ट्रांच्या सेनादलांच्या सहभागाने बनविलेल्या 'सागरी व हवाई प्रत्याघात दला'च्या मे २००३च्या स्थापनेमागील तत्व होते. हे दल संयुक्त राष्ट्रसंघाशी संबंधित नसणार होते आणि अण्वस्त्रधारी दहशतवाद्यांना आणि अण्वस्त्रप्रसार करणार्या राष्ट्रांना अटकाव करण्याची जबाबदारी त्यांना दिलेली होती. २००५च्या जुलैमध्ये राईसबाईंनी त्यांच्या आंतरराष्ट्रीय संरक्षण आणि अण्वस्त्रप्रसारविरोधासाठीचे सर्वोच्च अधिकार असलेल्या विभागाची-"ISN"ची-[८] मुहूर्तमेढ रोवली! हा बदल परराष्ट्रमंत्रालयाला आणि 'पेंटॅगॉन'ला जवळ आणेल या मुद्द्यावर जोर देत त्या म्हणाल्या होत्या कीं मोकाट शास्त्रज्ञ, शस्त्रास्त्रें काळ्या बाजारात विकणारे आणि अण्वस्त्रप्रसार करणार्या अधम राजवटींविरुद्ध आक्रमक धोरण वापरण्याची गरज आहे. त्या पुढे म्हणाल्या कीं प्रतिबंध व शस्त्रास्त्रनियमन यापेक्षा बरेच जास्त करण्याची वेळ आली होती व त्यांनी या नव्या विभागाला त्यांच्या त्यावेळच्या जबाबदार्यांहून अधीक अशा अण्वस्त्रप्रसारविरोधी प्रतिघात, डावपेचाच्या योजना आणि नरसंहारक्षम शस्त्रास्त्रांवर आधारित दहशतवादाला तोंड देणे नव्या जबाबदार्या दिल्या. आता अमेरिकेचे अण्वस्त्रप्रसारविरोधी धोरण व शत्रूच्या हल्ल्याआधीच करावयाच्या प्रत्याघाताचे नवे धोरण एकसंध केले गेले.
या विभागातील अधिकार्यांच्या नेमणूकीची जबाबदारी जोसेफनी "Peacekeeping Fiascos of the 1990s" या पुस्तकाचे लेखक फ्रेडेरिक फ्लाइत्झ यांच्यावर सोपविली. "शांतिसेना नेहमीच अयशस्वी होते" अशा मताच्या फ्लाइत्झ यांनी बोल्टन यांच्या हाताखाली काम केलेल्यांच्या (राजकीय) नेमणुका सुरू केल्या. या सर्व लोकांनी परराष्ट्रमंत्रालयातील अण्वस्त्रप्रसारविरोधी विभागातील अधिकार्यांच्या योग्यता ठरविण्यासाठी गुप्तपणे डोळा ठेवायला सुरुवात केली. तीस वर्षें सरकारी नोकरीत असलेले नॉर्म वुल्फ भ्रमनिराश झाले होते. ISNचे अधिकारी गुप्तपणे भेटून कुणाला कुठल्या कामासाठी निवडायचे याची चर्चा करीत आणि बुश-४३ यांची पकड २००८नंतरही कायम असावी या हेतूने तीस-तीस वर्षांचा अनुभव असलेल्या मुरब्बी लोकांना बाजूला सारून 'उजव्या' विचारसरणीच्या तरुण 'होयबां'ची नेमणूक करत! भूतपूर्व निर्देशक रस्ट यांचे मत तर याहूनही चमचेगिरी आणि वजन या पलीकडील एक हेतू होता आणि तो म्हणजे ९/११नंतरच्या बदललेल्या परिस्थितीत परराष्ट्रमंत्रालयातील नरसंहारक्षम शस्त्रास्त्रांबद्दलच्या जुन्या तज्ञांची जुनी विचारसरणी कामाची नसून नव्या विचारसरणीची गरज होती. आणि त्यावेळी नवी विचारसरणीचा अर्थ होता वाटाघाटी करून सर्वानुमती साधण्याऐवजी कमांडो युनिट्सद्वारा हल्ला करून किंवा प्रसंगी विमानातून एकादा अणूबाँब टाकून प्रश्न सोडविणे. त्या इराणचाही समावेश होता.
मायकेल रोझेंथाल[९] नावाचे अण्वस्त्रप्रसारविरोधी कार्यातले अमेरिकेतील एक ज्येष्ठतम तज्ञ आणि वुल्फ यांचे सहकारी आपली व्हिएन्नातील IAEAची दोन वर्षांची तात्पुरती सेवा आटोपून परत आल्यावर अमेरिकन मुत्सद्देगिरीचे संचालक या नात्याने त्यांना नेमून दिलेले इराण व उ.कोरिया यांच्याबरोबरच्या परमाणू चर्चेतली कोंडी फोडण्याचे काम एक बोल्टन यांचा पित्त्या असलेले तरुण अधिकार्याला दिलेले दिसले. रोझेंथाल यांच्यासारख्या पातळीवरील १५ लोकांनी पदावनीमुळे किंवा बाजूला सारले गेल्यामुळे सेवानिवृत्तीच्या वयाआधीच सरकारी नोकरी सोडली होती. नवीन अधिकार्यांच्या भरतीसाठी बुश-४३ व राईसबाईंबद्दलची निष्ठा हाच एकच कस धरून विश्वविद्यालयातून अर्जही मागविण्यात आले. अशा तर्हेने अतीशय कार्यक्षम असलेले खूप लोक निघून गेले व जोसेफ यांच्या हातात सर्व सत्ता आली.
जोसेफ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि फ्लाइत्झ यांच्या व्यवस्थापनाखाली बारापैकी पाच जागी ज्यांना त्या कामाबद्दल कांहींही अनुषंगिक अनुभव नसलेले नवे संचालक नेमले गेले व त्यात अण्वस्त्रप्रसारविरोधी करार, IAEA आणि सर्वात महत्वाच्या इराण व उ.कोरिया यांच्याशी व्यवहार करणार्या विभागांचा समावेश होता. या नव्या खांदेपालटामुळे सरकारकडील इराण व उ.कोरियासारख्या अधम राष्ट्रांकडून असलेल्या धोक्यांना तोंड देऊ शकणार्या कार्यक्षम मुत्सद्द्यांच्या मनुष्यबळात खूपच घट झाली!
उ.कोरियाबरोबरच्या १९९४सालच्या "सहमत करारा"चे[१०] शिल्पकार आणि "जुन्या विचारसरणी"चे अध्वर्यू गालुच्ची म्हणाले कीं रॉबर्ट ओप्पनहायमर[११] यांच्या जमान्यात अण्वस्त्रांचे नियमन याचा अर्थ होता अन्वस्त्र तंत्रज्ञानाचे आणि घटकभागांचे नियमन. यात मुत्सद्देगिरी, सहनशीलता व दडपण आणणे या सर्व बाबी येतात. गेल्या पन्नास वर्षात पाचच राष्ट्रांकडे हे तंत्रज्ञान ठेवण्यात यशस्वी झालेली (व त्यांच्या बाहेर हे तंत्रज्ञान पसरू न देणारी) प्रणाली नक्कीच चांगली होती हे सिद्धच झाले आहे. उ.कोरियासारख्या युद्धखोर राष्ट्रालाही वाटाघाटी करायला या विचारसरणीने भाग पाडले होते. पण वॉशिंग्टनमध्ये एकाएकी 'निर्बंध/मनाई' आणि 'प्रत्याघात' या शब्दांची चलती झाली आहे!
गालुच्चींच्या मते जोसेफ यांच्या विचारसरणीमुळे अमेरिका आणि सारे जग असुरक्षित बनले होते. सरकारने मुत्सद्देगिरीला डावलून आणि तिला कमी महत्वाचे लेखून आंतरराष्ट्रीय सदिच्छा व पत तर घालविली होतीच पण आता अमेरिकन सरकारला खोल जमीनीखाली लपविलेल्या अण्वस्त्रसज्ज जागा आणि विघटनशील मूलद्रव्य विकत घेऊ पहाणारी छोटी आणि विखुरलेली अल कायदाच्या दहशतवाद्यांची टोळकी अशा तर्हेच्या तोंड द्यायला अवघड अशा धोक्यांना सामोरे जावे लागत होते.
त्यांच्या मते इराणमधल्या या जमीनीखालच्या जागा कशा शोधून काढणे किंवा पाकिस्तानातून एकाद्या सूटकेसमध्ये लपविलेला अतिशुद्धीकृत युरेनियमचा एक गोळा अमेरिकेत यायला निघाल्यास त्याची माहिती मिळणे अशक्यच होते! यासाठी मुत्सद्देगिरीचीच आवश्यकता आहे पण बुश-४३भोवती प्रत्याघात विचारसरणीचे लोक जमले होते व त्यांचा तोंडून एकच उद्घोष चालू होता: इराण! 'व्हाईट हाऊस' आणि 'पेंटॅगॉन'चेही हेच टुमणे चालू होते कीं इराण अणूबाँब मिळवायचा जिद्दीने प्रयत्न करत आहे आणि त्यानंतर तो ते तंत्रज्ञान इतरांनाही विकायला मागे-पुढे पहाणार नाहीं. इतर कुठल्याही राष्ट्रापेक्षा इराणच अणूबाँबचा आपण होऊन आणि सरसकटपणे वापर अमेरिकेच्या सगळ्यात जवळच्या मित्रराष्ट्राविरुद्ध-इस्रायलविरुद्ध-करेल अशीही त्यांची खात्री होती. अमेरिकन जनतेला इराण हे एक गूढ आणि अधम राष्ट्र वाटते. अमेरिकेचे अतीशय लाडके मित्रराष्ट्र असलेले इराण १९७९ साली सर्वात कट्टर शत्रू झाले होते आणि हे परिवर्तन होताना अमेरिकेच्या दूतावासावर हल्ला करून व तिथल्या अमेरिकन मुत्सद्द्यांना दीड-दोन वर्षें ओलीस धरून इराणने अमेरिकेला अतीशय दुःखद अनुभवातून रखडवले होते. बुश-४३ सरकारच्या दृष्टीने एकच इराण होते! एक कडवी आणि एकचक्री धर्मगुरूंच्या ताब्यात असलेली राजवट असणारे, आपल्या प्रजेला ओलीस धरणारे, अणूबाँब बनविण्याचा ध्यास घेतलेले आणि तो अणूबाँब इस्रायलविरुद्ध आणि इतरांविरुद्ध वापरू इच्छिणारे राष्ट्र! पंचवीसपेक्षा जास्त वर्षें अमेरिकेचे धोरण यातच अडकले होते व तेहरानमधील स्विस दूतावास त्यांचे काम पहात असे. इराणकडे अमेरिका एक पाश्चात्य जगाशी टक्कर घेण्यासाठी पावले टाकणारे राष्ट्र याच नजरेतून पहात असे. पण इराणला जाणणार्यांना व १९७९पासून इराणच्या नेत्यांच्या संपर्कात असलेल्या अमेरिकनाना माहीत होते कीं ते एक एकसंध नसलेले, आतल्या गाठीचे, कुठलीही पारदर्शक ध्येये नसलेले, एकमेकांशी कडवी स्पर्धा करणारे राजकीय व धार्मिक पक्ष असल्याने-त्यातली बरीच प्रगतीकारक व पाश्चात्य जगाबद्दल सहानुभूती असलेले-कशाचाही संबंध जोडता न येणारे असे राष्ट्र होते. १९८६साली इराण-काँट्रा करार म्हणून (कु)प्रसिद्ध असलेल्या व्यवहारात इराणने इस्रायलची मध्यस्ती स्वीकारून आणि अमेरिकेकडून शस्त्रे खरेदी करून स्वतःच्या व्यवहारीपणाची चुणूकही दाखविली होती!
अमेरिकेच्या इराणबद्दलच्या गैरसमजांमुळे आणि बुश-४३ यांच्या मंत्रिमंडळाच्या आक्रमक धोरणामुळे आयातुल्लांच्या हाताला बळकटी देण्यापलीकडे कांहींही फायदा झालेला नव्हता! खरे तर अमेरिकेने शियाधर्मीय इराणच्या पूर्वेकडील शत्रूला-तालीबानला आणि त्यांच्या पश्चिमेकडील कट्टर शत्रू असलेल्या सद्दामला[१२] नष्ट केले होते आणि इराकमध्ये इराणशी मैत्री ठेवणारी शिया राजवट स्थापन केली होती. फोर्ड, कार्टर आणि रेगन यांच्या कारकीर्दीत अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीवर इराणबद्दलचा तज्ञ म्हणून काम केलेले गेरी सिक यांच्या मते अमेरिकेने एक बोटही न उचलता इराण या भागातले इस्रायलइतकेच सामर्थ्यवान आणि बलाढ्य राष्ट्र बनेल अशी जणूं तजवीजच केली होती.
इराणवर बोल्टन, जोसेफ व असंख्य इस्रायली गुप्तहेर गुप्त P-2 सेंट्रीफ्यूजेसची सुविधा उभारणे, अणूबाँब बनविणे, त्याचा वापर करणे किंवा ते तंत्रज्ञान इतरांना विकणे असे जे आरोप करत होते त्यातली कुठलीच गोष्ट अद्याप इराणने केली नव्हती! पण 'प्रत्याघात' तत्वानुसार इराणने असे कांहीं करण्याआधीच अमेरिकेने त्याचे पडघम वाजवायला घेतले. ओलीस धरलेल्या मुत्सद्द्यांच्या घटनेमुळे अमेरिकन सरकारच्या मनात इराणबद्दल इतकी तिरस्काराची भावना होती कीं तिथले सरकार बदलण्यासारखी अतीशय पराकोटीची कल्पनासुद्धा कांहीं डेमोक्रॅट व सगळ्या रिपब्लिकन जहालमतवाद्यांच्या पसंतीस उतरे. २००३ साली फ्रान्स, ब्रिटन आणि जर्मनी यांनी इराणबरोबर त्यांनी आपला अण्वस्त्रप्रकल्प मागे घ्यावा म्हणून वाटाघाटी सुरू केल्या होत्या, पण बुश-४३नी तिला मुळीच पाठिंबा न देता उलट ही बाब संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीकडे धाडण्याचा आग्रह धरला. बुश-४३ यांचे अधिकारी इराणच्या कुठल्याही बोलण्यावर विश्वास न ठेवण्याचा सल्ला देत असले तरी हेही खरे होते कीं युरोपियन राष्ट्रांच्या शिष्टाईला यश येऊन युरेनियम अतिशुद्धीकरणाचा कार्यक्रम त्यांनी निलंबित केला. त्याला प्रत्याघात म्हणून २००४च्या जूनमध्ये उपग्रहाद्वारे घेतलेले नातांझ सुविधेचे फोटो अमेरिकेने प्रसिद्ध केले. त्यात प्रत्येकी ५०,००० सेंट्रीफ्यूजेस बसविता येतील अशा आकाराच्या व ७५ फूट जमीनीखाली असलेल्या, RCC काँक्रीटने भक्कम केलेल्या व दगड व मातीने झाकलेल्या दोन मोठ्या दालनांवर छप्पर घातल्याचे फोटो होते. ही सुविधा इतकी मोठी होती कीं तिथे अणूबाँबसाठी विघटनशील मूलद्रव्य बनवण्याचाच उद्देश होता असा दावा अमेरिकेने केला. रोज चाळीस लाख पिपे तेल काढणार्या इराणला अणुशक्तीपासून वीजनिर्मिती करण्याची कांहींच गरज नव्हती. अशा पुराव्यांना इराणमधून बाहेर पडून बाहेरदेशी राजकीय आश्रय घेतलेल्या आणि सरकार बदलण्याची इच्छा असलेल्या इराण्याकडून पुष्टीही मिळायची. इराण 'मारेजिंग' प्रतीच्या पोलादाची खरेदीही करू पहात होता. पण इराणला सेंट्रीफ्यूजेस सातत्याने चालवायला आणि अणूबाँब बनवायला किती अवधी लागेल याबद्दल भिन्न मतें होती! 'युरेंको'मधील भूतपूर्व शास्त्रज्ञांच्या मदतीने केलेल्या अंदाजावरून अणूबाँब बनवायला कमीतकमी पाच वर्षे लागतील असे IAEAचे मत होते. गालुच्चीसारख्या या विषयाचा खूप वर्षें मागोवा घेतलेल्यांचा अंदाज होता आठ वर्षांचा. पण इस्रायली गुप्तहेरसंघटनेच्या माहितीवर अवलंणार्या अमेरिकन सरकारचा अंदाज होता तीन महिने ते एक वर्ष! हा अंदाज जास्तकरून राजकीय होता कारण इस्रायल हे इराणच्या तोंडावरचे राष्ट्र आणि त्यांना इराणच्या परमाणू महत्वाकांक्षांचा नायनाट करण्यात सगळ्यात जास्त खुमखुमी होती. म्हणून त्यांचे बोल्टन यांच्या इराणच्या P-2 सेंट्रीफ्यूजेसने भरलेल्या दुसर्या प्रकल्पाबाबत एकमत होते. 'मोसाद'च्या मतें इराण एक प्रकल्प प्रकटपणे तर दुसरा लष्कर आणि रिव्होल्यूशनरी गार्ड्सतर्फे गुप्तपणे राबवत होता. म्हणजे या बाबीचा अभ्यास करणारे दोन वेगवेगळ्या जगात रहात होते, एक व्हिएन्नाच्या माहितीच्या आधारावर तर दुसरा अमेरिकन आणि इस्रायली गुप्तहेरखात्याकडून आलेल्या माहितीच्या आधारावर! पण IAEAने, संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीने आणि युरोपीय सरकारांनी पुरावा मागितला. मग अमेरिकेने जाहीर केले कीं एक इराणी परमाणूसंशोधक एका निनावी युरोपियन दूतावासात तांत्रिक ड्रॉइंग्ज व अण्वस्रांच्या संरचनांची १०००पेक्षा जास्त पाने असलेला लॅपटॉप घेऊन आला होता. त्यात त्या 'दुसर्या' प्रकल्पाचीही माहिती होती. पण IAEA दिलेली आणि जगातल्या सार्या मीडियाला 'इराण अणूबाँब बनविण्यात कल्पनेपेक्षा जास्त जवळ आहे' असे भय निर्माण करण्यासाठी मुद्दाम 'सारलेली' ही गुप्त बातमी चुकीची होती हे जगापुढे नंतर अमेरिकेला कबूल करावे लागले होते कारण ती माहिती नेहमीच्या प्रक्षेपणास्त्रांबद्दल होती व तीही अतीशय ढोबळ अशा रेखाचित्रांच्या स्वरूपात!
एकाएकी २००५च्या ऑगस्टमध्ये जणू संगनमत केल्याप्रमाणे इराणमधील परिस्थिती तत्कालीन आक्रमक विचारसरणीच्या अमेरिकन सरकारच्या बाजूला झुकली. ४९ वर्षाचे आणि तेहेरानच्या उत्तरेस असलेल्या गर्मसार या गांवातील एका लोहाराचे सुपुत्र महमूद अहमदीनेजाद सुधारक समजले जाणार्या आणि तिसर्यांदा राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवणार्या हाशेमी रफसंजानी यांचा पराभव करून अध्यक्षपदी निवडून आले. २००३साली असेच तेहेरानची नगराध्यक्षपदाची निवडणूक जिंकून सगळ्यांना चकित केलेले अहमदीनेजाद हे आयातुल्ला खोमेनींच्या पठडीतील कट्टर सनातनी समजले जात. इराकमधील शियांच्या कत्तलीवरून भावनापूर्ण भाषणांद्वारे धार्मिक कष्टकर्यांवर्गाची मते मिळवून ते निवडून आले होते. २००४च्या शेवटी अबू मुसाब अल-झरकावींच्या नेतृत्वाखाली अनेक परदेशी लढवय्यांनी इराकमध्ये शिया व सुन्नी पंथियात यादवी युद्ध सुरू केले होते आणि २००४च्या ऑक्टोबरमध्ये झरकावींनी ओसामा बिन लादेन यांच्याबाजूने आपली निष्ठा जाहीर केली होती. बिन लादेननी झरकावींच्या हातात "मेसोपोटेमियातील अल कायदा" ही नवी संघटना स्थापून दिली व त्यांना आपले इराकमधील प्रतिनिधी म्हणून नेमले. या संघटनेने इराकमध्ये शिरच्छेद, सरसकट कत्तली आणि आत्मघाती बाँबहल्ले करून 'न भूतो न भविष्यति' असा हिंसाचाराचा हैदोस घातला. या हिंसांनी शिया पंथाच्या अतीशय आदरणीय मानल्या जाणार्या मशीदीना आणि दर्ग्यांना घेरले आणि या हिंसाचारात इराणहून गेलेल्या हजारों यात्रेकरूंचे शिरकाण झाले होते. निवडून आल्याबरोबर अहमदीनेजादनी इराणच्या परमाणूप्रकल्पाला राष्ट्रीय प्राधान्य दिल्याची घोषणा करून इराणने आपला एसफाहान येथील युरेनियम अतिशुद्धीकरणाचा कार्यक्रम पुन्हा सुरू केल्याचे उघड केले. वाटाघाटीमध्ये इराणचे प्रमुख असलेले अली लारीजानी यांनी चिथावणीखोरपणे जाहीर केले कीं इराणला NPT करारान्वये इंधनरूपात युरेनियम बनविण्याचा पूर्ण अधिकार होता.
परमाणूप्रकल्पाबद्दल बोलूनच अहमदीनेजाद थांबले नाहींत. त्यांनी वारंवार व जाहीरपणे पाश्चात्य राष्ट्रांना डिवचले. होलोकॉस्ट या नांवाने (कु)प्रसिद्ध असलेल्या नाझीकाळातील ज्यूंच्या सामूहिक हत्याकांडाच्या व्याप्तीबद्दल शंका उपस्थित करून त्यांनी त्यावर विश्वास नसल्यांची आणि त्यात बदल करू इच्छिणार्यांची दुसर्या महायुद्धातल्या या कपोलकल्पित (आणि खोट्या) घटनेच्या आंतरराष्ट्रीय राजकारणावर झालेल्या परिणामांवर चर्चा करण्यासाठी एक संमेलन बोलावले. त्यांनी या संमेलनात जगाच्या पाठीवरून ज्यू राष्ट्र (इस्रायल) पुसून टाकण्याचे आवाहन केले. हे आवाहन त्यांनी अरब जगतातील सुन्नी लोकांनी शिया इराणच्या अटळ उदयाकडे जास्त लक्ष देऊ नये यासाठी (त्यांना समजेल अशा भाषेत) केले होते! पण सुन्नी अरबी जनतेला कळले कीं नाहीं कुणास ठाऊक, पण ते अमेरिकेला आणि इस्रायलला चांगलेच झोंबले. बुश-४३ यांचे अधिकारी अहमदीनेजादना 'भावी' हिटलर असे संबोधू लागले. मध्य-पूर्व व पाकिस्तानबद्दल भरपूर लिखाण करणार्या सेमूर हर्श यांना अमेरिकन गुप्तचरसंघटनेचे एक ज्येष्ठ अधिकारी म्हणाले कीं सगळे त्यांना याच नावाने संबोधत होते आणि वर विचारत होते कीं इराणच्या हातात अणूबाँब पडल्यावर ते तिसरे महायुद्ध तर सुरू नाहीं ना करणार?
अहमदीनेजाद यांच्या उद्रेकामुळे इराणबद्दलच्या धोरणाचा गंभीरपणे आढावा घेण्यात आला व परराष्ट्रमंत्रालय, 'पेंटॅगॉन' आणि CIA यांच्यावर इराणवर स्वारी करण्याच्या उद्देशाने माहिती मिळविण्यासाठी आणि तिचे पृथःकरण करण्यासाठी 'व्हाईट हाऊस'कडून प्रचंड दबाव आणण्यात आला. AEI आणि WINEP[१३] या व यांच्यासारख्या समविचारी संघटनांसह राजवट बदलण्याची भाषाही सुरू झाली व भावी संभाव्य राज्यकर्त्यांची नावेसुद्धा विचारात घेण्यात येऊ लागली. अशीच यादी इराकसाठीही बनविण्यात आली होती व त्यात इराकी नॅशनल काँग्रेसचे बदनाम नेते अहमद चलाबींसारख्यांचीही नावे होती. चलाबी हेच सद्दाम यांच्या नरसंहारक्षम शस्त्रास्त्रांबद्दलच्या खूपशा चुकीच्या माहितीचा उगम होते.
AEI, WINEP सारख्या संस्था १९९९च्या विद्यार्थी बंडापासून सक्रीय होत्या व त्यांनी या बंडाळीचा 'इराणची सुधारणा मोहीम' असा चुकीचा अर्थ काढला होता. AEI आणि WINEP यांनी १९७९सालच्या राज्यक्रांतीच्या वेळी बाहेर पडलेल्य सहा लाख इराण्यांची वस्ती असलेल्या 'लॉस एंजेलेस' शहरात चलचित्रवाणीची इराणमध्येही दिसू शकणारी फारसी वाहिनी सुरू केली. या वाहिनीवरून रेझा पहलवी या शहांच्या मुलाने राजेशाही थाटात इराण्यांना उठाव करण्याची चिथावणी दिली. पाच महिन्यांनंतर पहलवींनी WINEPमधे दिलेल्या भाषणात या उठावाचा पुनरुच्चार केला. CIAचे समर्थन लाभलेल्या इतर रक्तरंजित हातांच्या नेत्यांच्या मानाने पहलवी फारच स्वच्छ हाताचे होते! पहलवी स्वतःला इराणचे सनदशीर सम्राट समजत आणि त्यांना शीघ्रकोपी आणि अयोग्य निवेदने देण्याची संवय होती!
२००२च्या State of the Union अभिभाषणात बुश-४३ यांनी इराणची दुष्टांच्या अक्षात इराणची गणना केल्यापासून पहलवींनी मित्रांना सांगितले कीं ते घरी जाऊ इच्छित होते. पण बुश-४३ यांच्या भाषणानंतर इराणचे अमेरिकेबरोबरचे संबंध आणखीच बिघडले आणि अमेरिकेच्या पुढच्या वर्षीच्या इराकमोहिमेनंतर ते आणखीच लयाला गेले आणि इराणस्थित नागरिक निष्क्रीय आणि नैराश्यग्रस्त झाले .
अमेरिकेचे राजवट बदलण्याचे बेत जसे पक्के होऊ लागले तशी इराणला भीती वाटणे सहाजीकच होते. २००३मध्ये 'पेंटॅगॉन'ने इतर विरोधी पक्षांशी संधान बांधण्याच्या प्रयत्नांना सुरुवात केली व त्यात नातांझच्या परमाणूप्रकल्पाची माहिती उघड करणारी मुजाहिदीन-ए-खल्क ही वादग्रस्त संघटनाही होती. 'पेंटॅगॉन'ने राष्ट्राध्यक्षांकडूनच्या राष्ट्रीय सुरक्षेबाबतच्या सूचनेचा मसूदा बनविला व त्यात इराणमधील विद्यार्थ्यांना आपापसात व परदेशस्थांबरोबर संपर्क ठेवण्यासाठी लागणारी साधने देणे, 'पासदाराने इन्किलाब'च्या[१४] सदस्यांना विकत घेणे किंवा निकामी करणे आणि लॉस एंजेलिसमधील उपग्रहाद्वारे कार्यरत मीडियाच्या कळीला समर्थन देणे यांचा समावेश होता. कॅन्सस राज्यातील रिपब्लिकन सिनेटर ब्राऊनबॅक यांनी १० कोटी डॉलर्स इराणमधील अशा सक्रीय विरोधी गटाना पोचविण्यासाठीच्या बिलावर सहीसुद्धा केली.
वॉशिंग्टनमधून 'राणा भीमदेवी'छाप गर्जना वाढत होत्या. अहमदीनेजाद १९८३च्या बेरूतमधील अमेरिकन दूतावास व अमेरिकन बराकीवरील हल्ला घडवून आणणार्या दहशतवादी संघटनेचे[१५] सभासद असल्याचा 'तर्क' एक वस्तुस्थिती म्हणून 'व्हाईट हाऊस'कडून प्रसृत करण्यात आला आणि इराणच्या नातांझ व इस्फाहान येथील परमाणूप्रकल्प उध्वस्त करण्याचे उल्लेख सुरू करून तणाव वाढविण्यात आला. असले उल्लेख आणि दहशतवादाविरुद्धचे युद्ध आणि अण्वस्त्रप्रसारविरोध हा कळीचा शब्द यांना एकत्र वापरून एक ताकीद देण्यात आली, "दहशतवादी गटांना अण्वस्त्रे पुरवणे चालू देता कामा नये. ते फार धोक्याचे आहे!"
बुश जे करावे लागत होते ते करण्याची हिंमत भविष्यकाळातल्या कुठल्याच राष्ट्राध्यक्षात-डेमोक्रॅटिककिंवा रिपब्लिकन-असणार नाहीं असा उदो-उदो करायला बुश-४३ यांच्या अधिकार्यांनी सुरुवात केली. इराकमधील दोन पंथातल्या रक्तपातामुळे "इराक मोहिमेचे अध्वर्यू" ही प्रतिमा कुठल्याच नेत्याला नको होती, म्हणून इराणला वाचवणारे राष्ट्राध्यक्ष अशी प्रतिमा बुशना बनवायची होती. झाल्मय खलिलजाद यांच्यासारख्या अफगाणी-अमेरिकन मुस्लिम अधिकार्याला इराकचे राजदूत म्हणून पाठवूनही तिथला नरसंहार थाबला नव्हता आणि तिथे एक आदर्श लोकशाही स्थापण्याचे स्वप्न पूर्ण होण्याची लक्षणे दिसत नव्हती असे अमेरिकन अधिकारी मान्य करू लागले होते. इराकमधील आणीबाणीची स्थिती इतक्या पराकोटीला गेली होती कीं अमेरिकेच्या मध्य-पूर्वेतील मित्रराष्ट्रांनाही चिंता वाटू लागली होती. एरवी कधीही न बोलणारे सौदीचे परराष्ट्रमंत्री व फैसल या सौदीच्या राजाचे सुपुत्र सौद अल-फैसल यांनी त्यांच्या २००५च्या सप्टेंबरच्या अमेरिकावारीत इराकच्या ठिकर्या होण्याच्या शक्यतेबद्दल ताकीद दिली होती.
रम्सफेल्ड यांच्या हुकुमानुसार इराकमधून इराणमध्ये गुप्तपणे गेलेल्या अमेरिकेच्या सैनिकांनी जमा केलेल्या माहितीवरून अमेरिकेच्या विमानदलाने इराणमधल्या ४०० जागा बाँबहल्ल्यासाठी हेरून ठेवल्या. अमेरिकेच्या कायद्यातील पळवाटांचा उपयोग करून, प्रतिनिधीगृहाची परवानगी न घेता टोळीवाल्यांना आणि धनगरांना पैसे देऊन मिळविलेली ही माहिती अचूक नव्हतीच. 'व्हाईट हाऊस'ला अवैध मार्गाने महिती मिळविण्याचे आणखी इतर मार्गही सापडले. बुश-४३ इराकवरील त्यांच्या चढाईला समर्थन देणार्या कांहीं निवडक राजकीय नेत्यांना आपल्या इराणच्या योजनांबद्दल माहिती देत असत. कांहीं नेत्यांनी असहमती दाखविली पण त्यांनी जे मार्मिक प्रश्न विचारले त्यावरून 'पेंटॅगॉन'चे युद्धाचा व्यूह रचणारे अधिकारी हे युद्ध कुठल्या दिशेने नेत होते याबद्दलची धक्कादायक माहिती बाहेर येत होती. उदाहरणार्थ जेंव्हां या नेत्यांनी एकाच वेळी इराणच्या परमाणूप्रकल्पाच्या सगळ्या जागा एकसमयावच्छेदेकरून नष्ट करण्याच्या काय योजना होत्या असे रम्सफेल्डना विचारले तेंव्हां त्यांचे उत्तर थक्क करणारे होते. बंकर्स भेदून जाऊ शकणारे 'B61-11' प्रकारचे अणूबाँब वापरण्याची त्यांची योजना होती व ही विमाने अमेरिकेच्या अरबी समुद्रात उभ्या असलेल्या विमानवाहू नौकांवरून उड्डाण करणार होती व या उडाणांचा सरावही सुरू केला होता. युद्धाची ही कल्पना रॉबर्ट जोसेफ यांच्या २००१ सालच्या डावपेचांच्या एका खास व्युहपत्रिकेबरहुकूम होता. 'B61-11' अणूबाँब हा जमीनीत भोक पाडून आत घुसणारा आणि नंतर होणार्या स्फोटामुळे जमीनीखाली मुद्दाम ठेवलेल्या परमाणूप्रकल्पांवरील काँक्रीटचे अनेक स्तर उद्ध्वस्त करण्याची शक्ती असलेला बाँब होता.
जोसेफ यांच्या सूचनेचा परिणाम युद्धात अगदी प्रत्यक्ष अनुभव घेतलेल्या अशा ज्येष्ठ लष्करी अधिकार्यांतही दोन भाग पडण्यात झाला. अणूबाँबचा वापर केल्यास किरणोत्सर्ग, प्रचंड नरसंहार आणि सर्व वातावरण अनेक वर्षें दूषित होणे असे गंभीर परिणाम होणार होते. अणूबाँब वापरण्याच्या सर्व विध्वंसक पर्यायाचा 'जगन्नाथाचा रथ' काहींहीं करून थांबवायलाच हवा होता. ज्येष्ठ लष्करी अधिकार्यांकडून अणूबाँब वापरण्याच्या पर्यायाला अधिकृतरीत्या विरोध असल्याची सूचना जारी करण्यात आली. दरम्यान IAEA च्या एलबारादेईंचा सल्ला होता कीं वाटाघाटींचा सातत्याने पाठपुरावा करणे हा एकच ही समस्या सोडविण्याचा मार्ग होत. मार्च २००६मध्ये एलबारादेईंनी ताकीद दिली कीं इराणमुळे निर्माण झालेल्या आणीबाणीला तोंड देण्यासाठी एक सर्वंकश राजकीय समझोत्याची गरज होती. पण बुश-४३ यांनी ही ताकीद धुडकावून लावली आणि सांगितले कीं आमचे मित्रराष्ट्र असलेल्या इस्रायलचे संरक्षण करण्यासाठी अमेरिका लष्करी शक्तीचा उपयोग करेल. फुशारकी राहू दे बाजूला, पण अमेरिकेची लष्करी शक्ती शेजारच्याच इराकमध्ये अपयशी ठरत होती. अमेरिकेच्या मताला न जुमानता संयुक्त राष्ट्रसंघाने या युद्धाचे वर्णन यादवी युद्ध असेच केले होते. अहमदीनेजादनी आपल्या निवडणूक प्रचारात भाकित केल्याप्रमाणे २००६च्या फेब्रूवारीमध्ये शियापंथियांच्या सर्वात पवित्र समजल्या जाणार्या मशीदीत अल-झरकावींच्या आत्मघाती बाँबर्सनी घडवून आणलेल्या स्फोटात शेकडो इराणी यात्रेकरू मृत्यू पावले होते व त्याचा बदला म्हणून सुन्नी समाजावर आणि सुन्नी मशीदींवर हल्ले घडवून आणण्यात आले.
अमेरिकेची परिस्थिती कमकुवत असल्याचे जाणविल्यामुळे इराणने आपण नातांझ येथील युरेनियम अतिशुद्धीकरणाच्या सेंट्रीफ्यूजेस पुन्हा सुरू करीत आहोत असे जाहीर केले. मग अमेरिकेने IAEAवर दबाव आणून इराणची बाब संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीकडे पाठविण्यासाठी बैठक घेण्यास भाग पाडले. जोसेफ व्हिएन्नाला गेले व त्यांनी एलबारादेईंना इराण अमेरिकेच्या आणि अमेरिकेच्या मित्रराष्ट्रांच्या सुरक्षिततेला एक थेट धोका बनला असून तो धोका अमेरिका सहन करणार नाहीं व म्हणून इराणमध्ये एकही सेंट्रीफ्यूज फिरता कामा नये असा स्पष्ट निरोप दिला. नुकतेच नोबेल पारितोषिक जिंकलेल्या एलबारादेईंना युरेनियम प्रकल्पात जरी इराणच्या लष्कराची लुडबूड दिसत असली तरी इराणमध्ये विघटनशील मूलद्रव्यांचा अणूबाँब बनविण्यात वापर होतोय् हे पटले नव्हते. युरोपीय देशही अमेरिकेने इराणबरोबर बोलणी करावीत या पक्षाचे होते. शेवटी IAEAने इराणची बाब सुरक्षा समितीकडे सोंपविण्याला मान्यता दिली पण बुश-४३ इराणशी वाटाघाटी न करण्यावर ठाम राहिले. वॉशिंग्टनला सरकार उलथून टाकायचे होते व रेडियो/टीव्हीप्रसारण अमेरिकेतून इराणला करण्याच्या सुविधेसाठी साडेआठ कोटींच्या निधीची मागणी राईसबाईंनी प्रतिनिधीगृहाकडे केली. कॅलीफोर्नियातील 'रेडियो फर्दा' या स्टेशनाने मोसादने एक बक्षिसे मिळविलेले इराणी परमाणू वैज्ञानिक अर्देशीर हसनपूर यांची हत्या केल्याची बातमी थेट प्रक्षेपित करून आपली अशा थेट प्रक्षेपणाची क्षमता सिद्ध केली होती. इस्रायल आता थेट हल्ला करेल कीं काय याबद्दलच्या अटकळी चर्चेत आल्या.
अमेरिकेचा बोलणी न करण्याबद्दलचा हट्टीपणा तसाच राहिला. २००६च्या मार्चमध्ये निकोलास बर्न्स[१६] यांनी परमाणूप्रकल्पाबद्दल इराणशी थेट वाटाघाटी करणे परिणामकारक होईल ही कल्पनाच धुडकावून लावली. अमेरिकेचे IAEAचे राजदूत 'ग्रेगरी शूत्झ' इराणशी बोलणी करण्याविरुद्धच्या धोरणाबद्दल जास्त विस्ताराने बोलताना म्हणाले परमाणूप्रकल्पाबाबत इराणशी थेट वाटाघाटी करण्याचा अमेरिकेचा अजीबात इरादा नसून फक्त त्यांच्या इराकमधील अस्थिरतेमधील योगदानाबद्दलच अमेरिका त्यांच्याशी बोलायला तयार होती. या वेळेपासून तसा कुठलाही विश्वसनीय पुरावा नसतानादेखील बगदादमधील रक्तपात आणी तेहरान यांच्यातील दुवा ('पासदाराने इन्किलाब'च्या[१४] जिहादींनी इराकमधील अतिरेक्यांना प्रशिक्षण दिल्याचे आरोप) वारंवार पुढे करणे सुरू केले. असे आरोप करण्यामागे इराणला हल्लेखोर ठरवून त्याच्यावर पुढे-मागे हल्ला करण्यासाठी पार्श्वभूमी करण्याचा व त्यातून इराकमधील हाताबाहेर चाललेल्या युद्धावर नियंत्रण आणण्याचाच होता असे मत ब्रेझिन्स्कींनी[१७] व्यक्त केले.
अहमदीनेजाद यांची प्रतिक्रिया अपेक्षित अशीच होती. २००६च्या एप्रिलमध्ये त्यांनी नातांझ येथील युरेनियमचे शुद्धीकरण ३.५ टक्क्यापर्यंत पोचल्याचे जाहीर केले. या यशाचा अर्थ होता कीं इराणी वैज्ञानिकांनी सेंट्रीफ्यूजेस चालविण्याची अवघड पद्धती आत्मसात केली होती. आणखी ३००० सेंट्रीफ्यूजेस एक वर्षाच्या आत कार्यरत करण्याची योजना वेळापत्रकानुसार चालू होती व यावरून इराण याहून जास्त शुद्धीकरणाची पातळी गाठेल असे भाकित करण्यात येऊ लागले. चार आठवड्यांनंतर इराणने ४.८ टक्क्याची पातळी गाठल्याचे जाहीर करण्यात आले व शुद्धीकरणाची पातळी याहून जास्त वर नेऊन विघटनशील मूलद्रव्य बनविणे शक्य होईल यात शंका राहिली नाहीं. १९७९नंतरच्या अमेरिकन आणि इराणी राष्ट्राध्यक्षांत झालेल्या पहिल्यावहिल्या थेट संदेशात अहमदीनेजादनी बुश-४३ना आंतरराष्ट्रीय समस्यांतून आणि त्यावेळच्या जागतिक नाजुक परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी बोलणी करण्याची मागणी करणारे पत्र लिहिले.
२००६च्या मेमध्ये दिलेल्या अमेरिकेने दिलेल्या उत्तरात राईसबाईंनी लिहिले होते कीं जर इराणने परमाणूसंबंधीच्या सर्व हालचाली थांबविल्या व IAEA च्या भेदक तपासणीला परवानगी दिली तर अशा तपासणीनंतर बोलणी करायला अमेरिकेची तयारी होती. अहमदीनेजादनी याला नकार देऊन IAEAचा ऑगस्टमध्ये ठरलेला तपासणीदौराही रद्द केला. जेंव्हां सुरक्षा समितीने युरेनियम अतिशुद्धीकरण थांबविण्यासाठी इराणला त्यांच्याच एका ठरावानुसर दिलेली निर्वाणीची तारीख ३१ ऑगस्टपासून ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवून दिल्यावर अमेरिका नाराज झाली व तिने एकतर्फी कारवाईला जास्त श्रेयस्कर ठरवून इराण स्वातंत्र्य समर्थन ठराव संमत करून घेतला ज्या अन्वये इराणच्या परमाणू कार्यक्रमाला मदत करणार्या सर्व राष्ट्रांवर आर्थिक निर्बंध घालण्याची धमकी दिली. पाठोपाठ इराणने नातांझला सेंट्रीफ्यूजेसच्या आणखी १६४ मालिका (Cascades) सुरू करून सडेतोड प्रत्युत्तर दिले.
प्रलोभन नाहीं, प्रहार नाहीं, बोलणीही नाहींत! अमेरिकेचे हे धोरण अमेरिकेला नाशवंत अशा आगीच्या डोंबाकडे नेते होते याची प्रचीती २००६च्या ऑक्टोबरमध्ये आली. उ.कोरियाने आपला युरेनियम अतिशुद्धीकरणाचा प्रकल्प मागे घेण्याची तयारी दर्शवण्याच्या पर्यायापासून अण्वस्त्रप्रसारविरोधी करारातून[१८] बाहेर पडण्याच्या पर्यायापर्यंतचा प्रवास बोल्टन आणि जेम्स केली यांच्या हस्तक्षेपानंतर थोड्याच महिन्यांत ऑक्टोबर २००२मध्ये पार पाडला होता. २००६च्या ऑक्टोबरमध्ये उ.कोरियाने प्योंग्यांगच्या २४० मैल ईशान्येला एका जमीनीखाली खणलेल्या बोगद्यात आपली पहिली अण्वस्त्रचांचणी केली. ही ऐतिहासिक घटना असून स्वतःचे शक्तिशाली संरक्षणसामर्थ्य हवे असलेल्या कोरियाच्या सैन्याला आणि जनतेला मुदित केले आहे अशी घोषणाही सरकारी प्रवक्त्याने केली. चीनने या चांचणीचे "मुर्दाड" असे वर्णन केले तर जपानने तिचे वर्णन अक्षम्य असे केले. अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहात सभापती डेनिस हेस्टर्ट यांनी या चांचणीला तुच्छ लेखत हा स्फोट एका गुन्हेगार सरकारची अविचारी कारवाई आहे असे निवेदन दिले. पण गालुच्चींसारख्या अनुभवी लोकांच्या दृष्टीने हे अमेरिकच्या नव्या अण्वस्त्रप्रसारविरोधी परराष्ट्रनीतीचा पहिला लक्षणीय पराभव होता आणि इराणबरोबरही याच परराष्ट्रनीतीचा वापर केला जात होता.
यानंतर इराणवरचा मानसिक दबाव वाढविण्यात आला. २००६च्या नोव्हेंबरमध्ये "इराणने "झिरजमीन-२७"[१९] अशा परवलीच्या शब्दाचा एक गुप्त लष्करी प्रकल्प सुरू केला आहे" असा लंडनच्या 'डेली टेलिग्राफ'ने आरोप केला. या प्रकल्पाचा उद्देश अण्वस्त्रयोग्य शुद्धता असलेले युरेनियम बनविणे आणि त्याला पुरावा होता IAEAच्या शास्त्रज्ञांनी कापसाचा बोळा वापरून आणलेल्या इराणच्या साधनसामुग्रीवरील युरेनियमच्या धुळीच्या नमुन्यात सापडलेली अण्वस्त्रयोग्य शुद्धता[२०]. पण ही सारी साधनसामुग्री 'चोरी-चोरी' पाकिस्तान किंवा चीनकडून आलेली होती व म्हणून IAEAने या उच्च शुद्धतेचा उगम पाकिस्तान किंवा चीनकडून आलेली ही सामुग्री किंवा 'प्रकल्प A/B'साठी पाठविलेल्या अतिशुद्ध युरेनियमच्या ड्रम्समधील अवशेष असल्याचे IAEAने अनुमान काढले होते. 'डेली टेलिग्राफ'चा हा लेख कदाचित् खोडसाळ असेल, पण त्याबद्दल माहिती पुढे येत आहे.
२००६च्या निवडणुकीत सिनेट व प्रतिनिधीगृह ही दोन्ही गृहे रिपब्लिकन पक्षाने डेमोक्रॅटिक पक्षाला गमावली. त्यात ८ नोव्हेंबरला रम्सफेल्डना राजीनामा द्यावा लागला होता. तरीसुद्धा बुश-४३ यांची 'ब्रिंकमनशिप'चे[२१] धोरण चालूच राहिले! तीन महिन्यानंतर तर रम्सफेल्ड, वुल्फोवित्झ व उपसंरक्षणमंत्री एरिक एडल्मन यांच्यावर इराकवरील गुप्तहेरखात्यांच्या माहितीत हेराफेरी केल्याचा आरोप झाला! त्यांनी चक्क 'पेंटॅगॉन'मध्ये मुलकी अधिकार्यांना नोकरीवर नेमून त्यांच्याकडून CIAकडून मिळालेल्या माहितीला शह द्यायचा प्रयत्न केला. या चमूने अस्तित्वात असलेल्या गुप्त फायलीतील माहिती पिंजून काढली. या माहितीकडे दुर्लक्ष करण्यात आले होते आणि त्याचे पृथःकरण नीट केले गेले नव्हते असा दावा बुश-४३ यांच्या अधिकार्यांनी केला होता! पण सत्यपरिस्थिती अशी होती कीं या चमूला जहाल गटाच्या मतांशी जुळणारी माहिती निवडून ती राष्ट्राध्यक्षांकडे पोचवायची जबाबदारी दिली होती. त्यांचा रोख इराण, उ.कोरिया आणि इराकवर होता. २००२च्या उन्हाळ्यात[२२] या चमूचे सारे प्रयत्न सद्दाम हुसेन यांचा अल कायदाशी कसा संबंध होता हे दाखविण्याकडे होते. याची परिणिती शेवटी संरक्षण धोरणाच्या विभागाचे उपपरराष्ट्रमंत्री डग्लस फाईथ यांना "इराक व अल कायदा यांच्यात संबंध आहेत" या अर्थाचा अहवाल देण्यात झाला व त्याच्या आधारें इराकमधील राजावट बदलायचे धोरण आखण्यात आले.
२००४च्या जुलैमध्ये ९/११वरील आयोगाने इराकी सरकार आणि अल कायदा यांच्यातील संबंध कधीही परस्परसहाय्य करून एकाद्या घटनेत सक्रीय सहभाग घेण्याइतके जवळचे झाले असल्याचा कुठलाही पुरावा मिळाला नाहीं निष्कर्ष काढला. याच आरोपाबद्दलची चौकशी सिनेटच्या सेनादल समितीवरील डेमोक्रॅटिक पक्षाचे ज्येष्ठ सभासद सिनेटर लेविन यांनी केली होती. त्या चौकशीत अधिकृत गुप्तहेरसंघटना साशंक असतांना अयोग्य प्रकारे वैकल्पिक पृथक्करण करून इराक व अल कायदा यांच्यातील संबंध अतिरंजित करणार्या रम्सफेल्ड यांच्या अनधिकृत गुप्तहेरचमूबाद्दलची माहिती बाहेर आली. मग इन्स्पेक्टर जनरलना पाचारण करण्यात आले आणि २००७च्या फेब्रुवारीत त्यांनी अधिकृत गुप्तहेरखात्यातील अधिकार्यांच्या एकमताने काढलेल्या निष्कर्षांपासून वेगळे अशी वैकल्पिक गुप्त माहितीच्या मूल्यांकनाची निर्मिती, विकसन आणि प्रसारण करणार्या 'पेंटॅगॉन'मधील या अनधिकृत मुलकी अधिकार्यांवर टीका केली. थोडक्यात सांगायचे तर रम्सफेल्ड यांच्या या 'सेने'ने इराकबरोबरच्या युद्धाच्या बाजूने चुकीने जनमत बनविले होते. एव्हाना सिनेटच्या सेनादल समितीचे अध्यक्ष झालेले लेविन म्हणाले की कितीही अपुरा संबंध असो, या चमूला तो पुरावा म्हणून वापरायचा होता!
इराकनंतर आता इराणबद्दलही हाच प्रयोग सुरू झाला होता. खोटे-नाटे लेख अमेरिकन आणि ब्रिटिश वृत्तपत्रात येऊ लागले होते त्यात इराण 'अल कायदा'वर हुकूमत आणू इच्छित आहे हीही बातमी आली होती. म्हणजे एका कट्टर शिया पंथाचे पुनरुत्थापन करण्याच्या चळवळीने सुन्नींच्या वाहाबी गटाच्या अतिरेक्यांना हाताशी धरत आहे ही बातमीच अतर्क्य होती. पण AEI[१३] या संस्थेला तो पुरावा ग्राह्य वाटला आणि या संघटनेच्या मुरावचिक नावाच्या निवासी अभ्यासकाने २००४च्या नोव्हेंबरमध्ये बुशच्या अधिकार्यांना दिलेल्या व्याख्यानाची सुरुवातच "आपण इराणवर बाँबहल्ले केले पाहिजेत"या वाक्याने केली.
मुरावचिक हा बुश-४३ यांच्या जहालमतवादी गटाला चांगला माहीत होता. त्यांनी जाहीर केले कीं शिया पंथीय सुन्नी लोकांचे मतपरिवर्तन करण्यात यशस्वी होत आहेत व म्हणून ते अल कायदावर ताबा मिळवू शकतील. इराण दहशतवाद्यांना प्रशिक्षण देऊ लागलेला असून हे लेबॅननमधील शिया हिजबोल्ला आणि गाझापट्टीतील पॅलेस्टिनी सुन्नी यांच्यातील करारावरूनही उघड होते असे आरोपही 'डेली टेलिग्राफ'मधील लेखांत आले. या परिस्थितीवर विजय मिळविण्यासाठी इराकवर केली तशी स्वारी करणे हा योग्य उपाय नसून इराणच्या सर्व परमाणूसुविधा हवाई हल्ले.करून नष्ट करणे हा योग्य उपाय होता असे मुरावचिक यांनी लिहिले होते. त्यांच्या मते १५०० परमाणूकेंद्रे लक्ष्य म्हणून निवडता येतील. यातील बहुसंख्य लक्ष्यें जर कांही दिवसांच्या प्रखर बाँबहल्ल्यात उद्ध्वस्त करता आली तर इराणचे कंबरडेच मोडेल. असा हल्ला न करणे हे चर्चिल यांनी सांगूनसुद्धा १९१७ साली बोल्शेविक चळवळीला नेस्तनाबूत न केल्याच्याच पातळीचे इतिहासाचे विडंबनच ठरेल असेही त्यांनी लिहिले होते. नवे लेनिन बनू इच्छिणार्या अहमदीनेजादना शक्तीचा उपयोग करून थांबवता येईल असेही त्यांचे मत होते.
२००६च्या निवडणुकांपूर्वी रिपब्लिकन पक्षाचे बहुमत असलेल्या प्रतिनिधीगृहाने इराकमधील वाढत्या रक्तपाताच्या दंगलीपासून मुक्त होण्याचा मार्ग शोधण्यासाठी एक द्विपक्षीय "इराक अभ्यास समिती" नेमली होती. या समितीने डिसेंबरमध्ये आपला अहवाल सादर केला व त्यात इराक युद्ध नजीकच्या भविष्यकाळात संपेल असे वाटत नसल्याने यातून मार्ग काढण्यासाठी इराण आणि सीरियाबरोबरच्या मुत्सद्देगिरीत वाढ करून व टप्प्याटप्प्याने अमेरिकन सैन्य परत आणणे यातच अमेरिकेचे हित आहे असा निष्कर्ष काढला. पण त्यानंतर कांहींच आठवड्यांनंतर इराकमधील शिया राजवटीने सद्दामना फासावर चढविले. त्यावेळी फास त्यांच्या गळ्याभोवती घालतांना रक्षकांनी त्यांच्यावर टोमणे मारून डिवचल्याची चित्रफीत प्रसृत झाली व बुश-४३ पुन्हा बलप्रयोगाकडे वळले. १० जानेवारीला 'व्हाईट हाऊस'च्या वाचनालयातून राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात त्यांनी इराकमध्ये चुकीचे डावपेच वापरल्याची कबूली राष्ट्रीय चित्रवाणीद्वारा दिली पण फौजा मागे घेण्याऐवजी आणखी २१,५०० सैनिक तिथे पाठविण्याच्या आपल्या निर्णयाला राष्ट्राकडून पाठिंबा मागितला.
या 'सैनिक लाटे'चे जनक फ्रेडरिक कागन[२३] होते. त्यांच्या मते विजय हा अद्यापही एक विकल्प होता व इराकमध्ये आज पराजय स्वीकारल्यास याहून जास्त जालिम परिस्थितींत भविष्यकाळात याहूनही जास्त त्याग करावा लागणार होता. विजयाच्या बाजूला उभे राहिल्यास आपल्या मित्रांना आणि शत्रूंना अमेरिका आपले सामर्थ्य दाखवू शकेल असेही त्यांनी सांगितले. बुश-४३ यांना ते पटले व त्यांनी लगेच जास्तीचे सैनिक पाठवायला सुरुवात केली. अमेरिकन आणि ब्रिटिश नैसेनादलांनीही अनेक लढाऊ जहाजे व विमानवाहक जहाजे पाठविली. नुकत्याच सुरक्षा समितीकडून मर्यादित निर्बंधांचा फटका बसलेल्या इराणचेही तिकडे पूर्ण लक्ष होते. इराणच्या परमाणूप्रकल्पावरून सुरू झालेली ही समस्या २००७च्या जानेवारीपर्यंत चालूच राहिली. अहमदीनेजादनी ३८ परमाणू अन्वेषकांना इराणमध्ये यावयास मनाई केली आणि इराणचा परमाणू इंधन निर्मितीचा प्रकल्प नातांझ येथे कार्यरत असलेल्या ३००० सेंट्रीफ्यूजेस वापरून युरेनियमच्या ४.८ टक्के शुद्धीकरणासह कांहीं आठवड्यातच संपेल असे जाहीर केले.
इराणच्या अण्वस्त्रधोक्याला छिद्र पाडण्याऐवजी अमेरिकेच्या अण्वस्त्रप्रसारविरोधी प्रतिघात धोरणामुळे तो धोका वाढलाच होता. अहमदीनेजाद यांच्या युद्धखोर परराष्ट्रीय धोरणावर आधी टीका झाली होती त्या धोरणाला आता पुष्टीच मिळाली. इराणने असा संभाव्य युद्धाचा पवित्र घेतल्यावर सारे इराण त्यांच्यामागे उभे राहिले. २००७च्या एप्रिलमध्ये नातांझ येथील भाषणात अहमदीनेजादनी जाहीर केले कीं इराणच्या शास्त्रज्ञांनी एक मोठी छलांग मारली असून आता त्यांची अतीशय सुसूत्रपणें चालणारी ३००० सेंट्रीफ्यूजेस एका औद्योगिक स्तरावर युरेनियम अतिशुद्धीकरण करण्यात यशस्वी झाली आहेत. याचा अर्थ होता कीं नऊ महिन्यात एक अणूबाँब बनवता येईल इतके शुद्ध युरेनियम इराण बनवू शकणार होता. अहमदनेजाद हे स्वतःच स्वतःचे सर्वात मोठे शत्रू असून अमेरिकेतील जहालमतवादी नेते त्यांचे सर्वात चांगले मित्र आहेत असे मत अली अन्सारींनी[२४] व्यक्त केले. IAEAच्या एलबारादेईंनी दोन्ही बाजूंनी थंड होण्यासाठी वेळ मागितला तर एक युरोपियन मुत्सद्दी म्हणाले कीं यावेळी जर अमेरिकेने इराणवर हल्ला केला तर अहमदीनेजादसुद्धा अरब विश्वाचे[२५] सद्दामपेक्षा जास्त विश्वासार्ह व समर्थ असे नवे सद्दाम बनतील!
परराष्ट्रमंत्रालयात चिंतेचे वातावरण होते. कारण अण्वस्त्रप्रसारविरोधी प्रतिघात धोरणामुळे दुष्टांच्या अक्षातल्या एका देशाने अण्वस्त्रचांचणी केली होती आणि दुसरा ती करायला तयार होत होता. दरम्यान बुश सरकारने उ.कोरियाबरोबरचे आपले युद्धखोर धोरण सोडल्याचे २००७च्या फेब्रुवारीत जाहीर केले. चीनच्या दबावाखाली वाटाघाटीला तयार झालेल्या बुश-४३च्या अधिकार्यांनी चीनच्या दबावामुळे गेली पाच वर्षें उ.कोरियावर घातलेले बहुतेक निर्बंध उठवलेच होते. अमेरिका पूर्वी होती त्याच जागी परत आली होती आणि अमेरिकेच्या धाकदपटशामुळे कांहींच साध्य झाले नव्हते असे मत या वाटाघाटीत पूर्वी भाग घेतलेल्या उ.कोरियाच्या भूतपूर्व परराष्ट्रमंत्र्यांनी व्यक्त केले.
उ.कोरियाने इराणला एका वर्षात अण्वस्त्रचांचणीसज्ज करण्यासाठी मदत देण्याचे आश्वासन दिल्याचा निनावी गुप्तहेर अधिकार्यांनी केलेल्या आरोपाचे वृत्त लंडनच्या 'डेली टेलिग्राफ'ने प्रसिद्ध केले. तीन आठवड्यानंतर बुश-४३ सरकारने पुन्हा जुना सूर लावला. इराणच्या नेत्यांवर इराकला शस्त्रास्त्रें आणि अनेक अमेरिकन आणि ब्रिटिश सैनिकांना कंठस्नान घालण्यात यशस्वी ठरलेल्या डावपेचांबद्दलचे ज्ञान देऊन इराकमध्ये हस्तक्षेप केल्याचा आरोप केला.
पण साधारणपणे होकारात्मक स्वभावाच्या ज.पेसना हे पटले नाहीं. इराकमधील परिस्थितीचे आशादायक चित्र रंगविण्याबद्दल प्रसिद्ध असलेल्या पेसना यात इराणचा हात आहे हे मान्य नव्हते. नुकताच निवडणुकीत झालेला दारुण पराभव लक्षात घेऊन बुशनी पुन्हा एकदा आपले पाऊल मागे घेतले. सिनेटमध्ये बोलताना सिनेटर हिलरी क्लिंटननी ताकीद दिली कीं इराकमधील चुकांतून आपण सगळेच शिकलो आहोत. ते ज्ञान इराणच्याबाबतीत केल्या जाणार्या आरोपांमध्ये वापरले पाहिजे. बुश-४३ना संबोधून त्या पुढे म्हणाल्या कीं पुन्हा जुन्याच चुकांची पुनरावृत्ती होत आहे असे दिसते. आपण पुन्हा कधीही चुकीच्या गुप्त माहितीवर अवलंबून निर्णय घेता कामा नये. पण बुश फारसे बधले नाहींत.
अमेरिकेच्या इराणबरोबरच्या धोरणात फारसा बदल झाला नाहीं याचा सर्वात जास्त आनंद अल कायदाच्या डवपेच आखणार्या विभागाला झाला असणार कारण इराणबरोबरचे अमेरिकेचे युद्ध त्यांच्या सर्वंकष योजनांना सोयीचे होते. २००१च्या नोव्हेंबरच्या युद्धात अल कायदाला दारुण पराभव पत्करावा लागला होता व त्यांच्या ७५ टक्के प्रशिक्षित सैनिकांची कत्तल झाली होती. त्यामुळे तेही काय चेकले व त्यातून काय धडा घेतला पाहिजे याबद्दल विचार करत होते. मुस्ताफा सेत्मारियम नासर या सीरियन तरुणाने भूमिगत असताना अबू मुसाब अल सुरी[२६] या टोपणनावाखाली अरबी भाषेत एक "Call to Worldwide Islamic Resistance या नावाचे १६००-पानी सुस्पष्ट पुस्तक लिहिले होते आणि ते तो इंटरनेटवर चढवत होता. त्या पुस्तकात मुस्लिमांना शस्त्रास्त्रे धरण्याचे आवहन होते व युद्धाच्या एका नव्या स्तराच्या आगमनाची पूर्वसूचना होती. या प्रणालीनुसार अमेरिकेच्या आणि तिच्या मित्रराष्ट्रांच्या मानवी व भौतिक संपत्तीचे कसे अतोनात विनाश होईल याची चर्चा होती व त्यात दहशतवाद्यांच्या हातात अण्वस्त्रें येणे हा महत्वाचा भाग होता.
अल-सुरींनी वापरलेली 'आयुष्याची पायवाट' बर्याच नव्या जिहादींच्या नेत्यांनी निवडलेली (व म्हणून परिचित) होती. सीरियात यंत्रशास्त्रातल्या अभियंत्याचे शिक्षण घेतलेले अल सुरी मग जॉर्डनला गेले व 'मुस्लिम ब्रदरहुड' या संघटनेत शिरले. स्फोटके व गनिमी काव्याच्या युद्धात तज्ञ समजले जाणारे अल सुरी त्यांचा भ्रमनिरास झाल्यावर स्पेनला अश्रयाला गेले. १९८०साली विवाहबद्ध झाल्यावर ते स्पेनचे नागरिकही झाले. १९८७साली स्पेन सोडून ते अफगाणिस्तानला गेले व तिथे ओसामांना भेटले. इतरांप्रमाणे ते मृदुभाषिक आणि तपस्व्यासारखे रहाणार्या ओसामांमुळे प्रभावित झाले नाहींत. त्यांना ओसामांच्या वाळवंटातील शिबिरांत अव्यवस्था आणि योजनांचा अभाव दिसला. अल सुरींच्या मते ओसामा हे आपले काम पुरेशा गांभिर्याने करत नव्हते. लोक रिकाम्या डोक्याने इथे येतात आणि रिकाम्या डोक्याने इथून जातात असे त्यांचे मत झाले.
असंतुष्ट होऊन अल सुरी स्पेनला व तिथून इंग्लंडला गेले. इंग्लंडमध्ये ते धर्मगुरू आणि वृत्तपत्राचे संपादक असलेल्या अबू कताडा यांच्यासाठी बातम्या लिहू लागले. ब्रिटिश व अमेरिकन अधिकारी अल कायदासाठी युरोपमध्ये टेहळणी करणारे नेते असा अबू कताडांचा उल्लेख करू लागले. पुढे 'शू बाँबर' रिचर्ड रीड आणि ९/११च्या हल्ल्याचे योजक म्हणून २००६ साली जन्मठेप झालेल्या झकारियास मुसावी यांना अध्यात्मिक मार्गदर्शन केल्याबद्दल ते (कु)प्रसिद्ध झाले. पॅरिसमधल्या १९९५सालच्या मेट्रोवरील बाँबहल्ल्यात त्याचा संबंध असल्याचे बरोबर अनुमान ब्रिटिश पोलिसांनी केले असल्याची पूर्वसूचना मिळाल्यामुळे ते १९९७साली अल सुरी पुन्हा अफगाणिस्तानला गेले तेंव्हां तालीबानने काबूल घेतल्याला एक वर्ष झाले होते. पाश्चात्य देशात "wanted" असलेल्या अल सुरींना इथे एका सार्वभौमिक राष्ट्राकडून त्यांच्या जमातीच्या पाहुणचाराच्या प्राचीन नियमानुसार संरक्षण मिळत होते ही एक सुवर्णसंधीच वाटली. जिहादी तत्वांच्या भट्टीत एकसंध बनलेले हे राष्ट्र अल कायदाच्या कारवायांनाही लपवणार होते!
नेहमीच आघाडीवर असलेल्या अल सुरींनी लपलेले असताना काबूलजवळील अल घुराबा प्रशिक्षणकेंद्रात काम केले. तिथे त्यांची मिधात मुर्सी अल-सायिद (उर्फ अबू खबाब अल-मस्री) या इजिप्शियन रसायनशास्त्रज्ञाशी गट्टी जमली. ते अल-कायदाच्या नरसंहारक्षम शस्त्रास्त्रांच्या विभागाचे प्रमुख होते आणि त्यांना अल सुरींनी अल कायदाकडचे शस्त्रागार सुधारण्यास मदत केली. अल सुरींना संहाराचा, अरिष्टांचा आणि प्रलयंकारी घटनांचा 'दादा' व्हायचे होते. एव्हाना ते उघड-उघड पुराणमतवादी ('सालाफी'[२७]) झाले होते.
अल सुरींनी नंतर दावा केला कीं ओसामांना सालाफी बनविण्यास आणि जोपर्यंत सार्या अरबी पवित्र भूमीवरून अमेरिकन सैन्य बाहेर जात नाहीं तोपर्यंत जिहाद चालूच राहिले पाहिजे असे त्यांच्या मनात विश्वास जागविण्यास तेच जबाबदार होते. पण १९९९मध्ये त्यांच्यात अध्यात्मिक व अधिभौतिक कारणावरून मतभेद निर्माण झाले होते. त्यात ओसामांची प्रसिद्धीची आवड हेही एक कारण होते. त्यांच्या उस्फूर्त शाब्दिक हल्ल्याला सीएनएन आणि अल जझीरावर मिळालेल्या महत्वानंतर ओसामांना चित्रवाणीचा पडदा, कॅमेर्यांचे फ्लॅशबल्ब्स, चाहते आणि टाळ्या यांचा आजार जडलेला दिसतो असे अल सुरींनी लिहिले होते. पुढच्याच वर्षीं अल सुरी बाहेर पडले व अल मस्री नरसंहारक्षम शस्त्रास्त्रप्रकल्पाचे प्रमुख बनले व लपलेले असतानाच अल सुरींनी आपला धोरणविषयक जाहीरनामा लिहून संपविला.
अफगाणिस्तानात त्यांनी जे पाहिले होते त्यावरून त्यांनी अल कायदाचा एक खडे लष्कर या नात्याने पाडाव होईल असे भाकित केले होते. त्यांच्या मते अल कायदाने पाश्चात्य राष्ट्रांच्या हल्ल्यापुढे टिकू न शकणारी एक अवजड शस्त्रधारी वाळवंटात रहाणारी जमात न रहाता केवळ एक मूलतत्व, एक मार्गदर्शक हात बनले पाहिजे. अल कायदा ही एक संघटना किंवा चमू नसून एक आरोळी, एक निमंत्रण, एक संदर्भ आणि एक कार्यपद्धती आहे. २००२पर्यंत तालीबान उद्ध्वस्त झाली व अल कायदाच्या सभासदांनी पलायन केले त्यावरून अल सुरींनी निष्कर्ष काढला होता कीं आता नवीन युद्धें मध्यवर्ती 'निर्नेतृत्व प्रतिकार' असतील व छोट्या-छोट्या कप्प्यातून शत्रूला नमवून, जेंव्हां पूर्ण तयारी होईल तेंव्हां नरसंहारक्षम शस्त्रास्त्रांसह जास्त महत्वाकांक्षी युद्ध अल कायदा खुल्या आघाडीवर लढेल.
अल-सुरींनी अशा रणभूमींचा उल्लेखही केला होता: १) अफगाणिस्तान. इथे उरले-सुरले तालीबानी त्यांच्या पाकिस्तानी समर्थकांसह राज्यकर्त्यांना राज्य करायला अशक्य करू पहात होते. २) मध्य आशिया: इथला सोवियेत डिंक निघाला होता व त्याची जागा रशियाच्या बेफाम दडपशाहीने घेतली होती. या दडपशाहीमुळे स्वातंत्र्य मिळवू इच्छिणार्य़ा इस्लामी शक्ती मोकळ्या झाल्या होत्या. ३)येमेन आणि मोरोक्को: येथील पाश्चात्यधार्जिण्या राजवटींनी तृणमूल इस्लामी चळवळ दडपली होती. ४) इराक: येथे अमेरिकेच्या स्वारीनंतर एक नव्या तर्हेच्या संघर्षाचे भाकित अल सुरींनी केले होते. पाकिस्तानचा आक्रमण सुरू करण्यासाठी वापरायची एक फळी म्हणून उपयोग होता याचाही त्यात उल्लेख होता. पाकिस्तानच्या क्वेट्टा या शहरात जैश-ए-मुहम्मद संघटनेच्या 'सुरक्षित घरा'त अल सुरींना अटक झाली व त्यांना अमेरिकेच्या हवाली करण्यात आले व या पुस्तकप्रकाशनाच्या वेळेपर्यंत एका अज्ञात स्थळी ते अटकेत होते.
अल सुरीचे लिखाण म्हणजे एक बंदुकीच्या चापासारखे होते. त्यांच्या अनुपस्थितीत इतर सभासद त्यांनी दाखविलेल्या धोक्यांना विचारात घेऊन त्यांच्या योजनेबरहुकूम तारा खेचत राहिले. २००४च्या डिसेंबरला अल सुरींनी आपला जाहीरनामा इंटरनेटवर अपलोड केल्याच्या कांहीं महिन्यांतच आणखी एक प्रबंध प्रकट झाला व त्यात अल कायदाच्या मते कुठकुठल्या गोष्टी होऊन गेल्या होत्या व यापुढे काय होईल याबद्दल उहापोह केलेला होता. हे पुस्तकही अल कायदा चळवळीच्या वितळलेल्या गाभ्यातून अनेक प्रथितयश प्रशिक्षित सैनिकांच्या विचारांवर आधारित होते. हा प्रबंध फुआद हुसेन या नावाच्या एका जॉर्डनच्या पत्रकाराने लिहिला होता आणि त्यावेळी फारसा कुणाला माहीत नसलेले जिहादी अबू मुसाब अल-झरकावी[२८] यांच्याबरोबरच्या त्यांच्या तुरुंगातील कोठडीत झालेल्या संभाषणावर आधारित होता. १९६६मध्ये 'अल-झरका' या जॉर्डनमधील गावात जन्मलेले 'झरकावी' आधीपासूनच एक चळवळ्या, आंदोलक म्हणून जॉर्डनमध्ये आणि इतरत्र ओळखला जात होता. ते त्यावेळी गुंडांच्या टोळक्याचे प्रमुख व दारुडे होते. त्यांचे धर्मपिता आणि मानसिक जडणघडण करणारे होते एक जॉर्डनमध्ये रहाणारे पॅलेस्टीनी अबू महम्मद अल-मक्दीसी. तेही तुरुंगात झरकावींच्या कोठडीतच होते.
हे तीघेही जॉर्डनच्या सुवाका तुरुंगात बंदिस्त होते. फुआद हुसेन कुठल्याशा किरकोळ राजकीय गुन्ह्यासाठी त्या तुरुंगात होते तर अल-झरकावी आणि अल-मक्सीदी जॉर्डनमधील राजेशाही उलथून पाडण्याच्या कटाबद्दल. अल-मक्सीदींनी लिहिलेल्या सौदी राजघराण्याला वाळीत टाकण्याची आणि त्यांच्या विनाशाची मागणी करणार्या "सौदी राजवटीने केलेला पवित्र वस्तूंबद्दल उघड अनादर"[२९] या पुस्तकामुळे सार्या अरब जगताला मूर्छा आली होती आणि सौदी अरेबियामध्ये ९०च्या दशकाच्या मध्यापासून आतापर्यंत उठाव झाले होते. त्यांची आणि अल-झरकावींची ओळख झाली ते दोघे सोवियेत सेनेबरोबर लढायला अफगाणिस्तानला जात असताना. अल झरकावी स्वत:चा उद्धार करून घेण्यासाठी जिहाद लढायला निघाले होते. ते गुलबुद्दिन हेकमतियारच्या सैन्याच्या साथीने लढले व काबूलपर्यंत गेले. युद्ध संपल्यावर या दोघांना कुठलेही ध्येय राहिले नाहीं. पुन्हा राजेशाहीशी लढायला ते परत जॉर्डनला आले व तिथे तिथल्या गुप्त पोलिसांनी तुरुंगात टाकले. दोन वर्षांनंतर त्यांची ओळख फुआद हुसेनशी झाली.
हुसेन पहिल्याच दिवशी त्यांच्या कोठडीकडे गेले तेंव्हां ते दोघे एका कोपर्यात बसले होते व स्वतःची ओळख 'राजकीय बाबींवर लिहिणारा वार्ताहार' अशी करून दिली. 'कुठल्याही इस्लामी गटाशी माझा संबंध नाहीं, पण मी तुमच्या केसचा मीडियामधून मागोवा घेतला आहे व त्यामुळे मला तुमच्या केसमध्ये रस आहे' अशी पुस्ती जोडली. 'जिहादचे सिंह' म्हणून प्रख्यात अल-झरकावींनी त्यांना चहा दिला आणि स्मितहास्य केले. त्यामुळे हुसेन यांचे त्यांच्याबद्दलचे भय निघून गेले.
अल झरकावींनाही हुसेन यांची गरज होती. त्यांना एकांतकोठडीत आठ महिने टाकले होते व त्यांना खूप छळले होते. इतके कीं त्यांच्या पायाच्या बोटांची नखे नव्हतीच. त्यांना शिपायांबरोबर उद्धटपणे वागल्याबद्दल पुन्हा शिक्षा करणार होते, पण तुरुंगातले कैदी बंड आणि दंगल करतील अशी चिन्हे दिसू लागली होती. हुसेननी मध्यस्ती केली व त्यातून एक तडजोड झाली. अल-झरकारी सामान्य तुरुंगात आणले गेले. य़ा उपकारांमुळे अल-झरकावी आणि अल-मक्दीसींनी आपले मनातले सगळे विचार हुसेनना भडाभडा सांगून टाकले. फुआद हुसेन यांच्या सुटकेनंतर ही मुलाखतीद्वारा मिळालेली माहिती वापरून अल कायदा चळवळीची अनेक कुलुपे खोलण्यात (गुपिते ओळखण्यात) त्यांना यश आले. व या माहितीमुळे इतर नेत्यांनीही आपले विचार व लिखाण जे हुसेनना ते 'बाहेरचे' असल्यामुळे देत नव्हते ते मिळू लागले व या सर्वांचे संकलन करून हुसेननी भावी युद्धाबद्दलचे पुस्तक लिहिले. हे पुस्तक अल-सुरींच्या पुस्तकातल्या सल्ल्याच्या पाठोपाठ प्रकाशित झाले व त्यामुळे ही योद्ध्यांची जमात व मूलगामी, सनातनी इस्लामी विचारवंत आपल्या विचारांची देवाणघेवाण करत होते आणि जे आधीच घडले होते त्यावरून पुढे काय करायला हवे याबद्दल एक धोरण बनवू पहात होते.[३०]
अल-झरकावी आणि अल-मक्दीसींची १९९९मध्ये तुरुंगातून सुटका झाली. अल-मक्दीसी सलाफी तत्वाच्या बाजूने लढायला जॉर्डनमध्येच राहिले व अल-झरकावी अम्मानमधील रॅडिसन होटेल ऐन १९९९च्या डिसेंबर ३१ला उडवून देण्याचा कट करून अराजक माजविण्यासाठी जॉर्डनम्ध्येच राहिले. पण तो कट फसला व ते आपले कांहीं साथीदार बरोबर घेऊन पाकिस्तानमधून चेचन्याकडे रवाना झाले. पण तिथे त्यांचे सरहद्दीवरील भ्रष्ट जवानांबरोबर बाचाबाची झाली व त्यांनी त्यांची प्रवासासाठी लागणारी कागदपत्रें चुकीची असल्याचे सांगून त्यांना अफगाणिस्तानमध्ये हद्दपार केले. तिथे ते तात्पुरते 'अल-कायदा'त सामील झाले. भांडखोर अल-झरकावींचे म्हणणे होते कीं 'अल कायदा'चे जाळे मऊ झाले आहे. 'अल कायदा'बरोबर भांडून त्यांनी पश्चिम अफगाणिस्तानमधील हेरत या शहरात एक वेगळे प्रशिक्षण केंद्र उघडले. आपापसातील निष्ठा पक्की करण्यासाठी त्यांनी आपल्या अनुयायांमध्ये आपापसात लग्ने करण्यास उत्तेजन दिले जेणे करून तो गट एक मोठे विस्तारित कुटुंब बनेल. पण नोव्हेंबर २००१मध्ये पाश्चात्यांशी मैत्रीचे संबंध असणार्या उत्तरीय एकजूट संस्थेचे (Northern Alliance) तालीबानविरोधी सैन्याच्या दबावाखाली त्यांना आपला तळ सोडावा लागला होता. अमेरिकेच्या इराकमधील बेतांबद्दल अंदाज करून आणि अमेरिका तिथल्या चिखलात रुतणार असल्याचा अंदाज करून अल-झरकावी पायी इराकला गेले कारण इराकमध्ये आपले बेत जास्त उपयोगी पडतील अशी त्यांची खात्री होती. बिन लादेन यांचाही होरा तोच होता. मग अल कायदाने डिवचणे आणि प्रलोभन दाखविणे या तंत्राचा उपयोग सुरू ठेवला म्हणजे बुश-४३ इराकमध्ये गुंतून रहातील आणि अमेरिकन सैनिकांविरुद्ध सतत रक्तस्त्रावाचे युद्ध दहशतवाद्यांना सुरू करता येईल. CIAने शस्त्रसज्ज केलेल्या आणि CIA आणि पाकिस्तानच्या ISIकडून प्रशिक्षण मिळविलेल्या बिन लादेन व त्यांच्या अनुयायांनी हे डावपेच अफगाणिस्तानमधील पर्वतामध्ये रशियन सैन्याविरुद्ध वापरून आत्मसात् केले होते.
लवकरच अल-झरकावी 'अल तव्हीद वा अल-जिहाद' (एकेश्वरवाद आणि जिहाद) या छोट्या गटाचा 'अमीर' म्हणून आपल्या बालपणीच्या मित्रांबरोबर व नव्य़ा कुटुंबाबरोबर प्रवास करू लागले व लढू लागले आणि लवकरच त्यांनी तायग्रिस आणि युफ्रेटीस[२९] या दोन नद्यांमधील गाळाने बनलेल्या सपाट प्रदेशात इराकमधील अल जझीरा या ओसाड पठारावर त्यांनी आपला तळ ठोकला व त्यांनी आपले जाळे तयार केले. जेंव्हां २००३च्या मेमध्ये अधिकृतरीत्या मुख्य युद्ध संपले तेंव्हा त्यांनी कांही आठवड्यातच हल्ले करायला सुरुवात केली व थोड्याच काळात ते हल्ले इतके क्रूर झाले कीं अल कायदाऐवजी या गटाचेच नांव सगळ्या मथळ्यांत झळकू लागले. या गटाने पाश्चात्य आणि इराकी गोटातही अस्वस्थता निर्माण केली. त्यांनी "फाटाफूट पाडा आणि राज्य करा" हे तत्व अंगिकारले होते. युद्धोत्तर युतीमधील 'आंतरराष्ट्रीय' घटकाला त्यांनी सुरुंग लावला. संयुक्त राष्ट्रसंघटनेचे बगदादमधील मुख्यालय त्यांनी एका ट्रकबाँबने उडवले. त्यात संयुक्त राष्ट्रसंघटनेचे इराकमधील राजदूत डिमेलो मरण पावले. युतीच्या लष्करालाही करबाला येथे, इटालियनांना अल-नसीरिया येथे, अमेरिकनांना अल-खलीडिया पुलावर, अमेरिकन गुप्तहेरकेंद्राला अल-रशीद हॉटेलमध्ये आणि पोलिश सेनेला अल-हिल्ला येथे सतत सतावण्यात आले. मग जातीय दुफळीचे लक्ष्य करून २००४च्या फेब्रूवारीत अल-झरकावींनी वारंवार व अतीशय क्रौर्यासह करबाला आणि अल-काझीमिया येथील शिया जमातीच्या शेकडोंची कत्तल घडवून आणली आणि हजारोंना जखमी केले तर मार्चमध्ये शिया बहुसंख्य असलेल्या बसरा बंदरावर हल्ला केला. त्याचा धसका इतका होता कीं अमेरिकेने त्यांना पकडून देण्यास मदत करणार्याला १ कोटी डॉलर्सचे बक्षीस जाहीर केले आणि अल कायदाला इराक युद्धाने जन्म दिलेल्या या उपजमातीतील राक्षसी नरसंहारात कसलाही सहभाग नव्हता असे अतीशय मुलखावेगळे निवेदन प्रसृत करावे लागले. पण अल-झरकावींना केल्याचा पश्चात्ताप नव्हता. २००४च्या मे महिन्यात निकोलास बर्ग या ओलीस ठेवलेल्या अमेरिकन व्यवसायिकाचे 'अल तव्हीद' गटाने केलेले व चित्रफितीवर मुद्रित केलेले शिरविच्छेदन इंटरनेटवर दाखवून ते जगापुढे प्रकाशझोतात आले. जगाला त्यांनी जाहीरपणे सांगितले कीं त्यांनी डोक्यांची 'फसल' केली असून त्यांचे शरीराचे तुकडे करून त्याचे भाग इकडे-तिकडे टाकले होते. अजून बरीच लक्ष्ये त्यांच्यापुढे होती आणि आता कांहीं प्रकरणे संपली असून येणारी प्रकरणे अजून जास्त इन्शाल्ला ती अधीक दारुण आणि कडू असतील असेही त्यांनी जाहीर केले!
अल-झरकावींची रक्तपिपासू युद्धनीती त्यांनी २००४मध्ये बिन लादेनना लिहिलेल्या पत्रात उघड झाली होती. अमेरिकन सैन्याने इराकमध्ये अटक केलेल्या हसन जाल नावाच्या पाकिस्तानी जिहादीकडून घेतलेल्या CDवर ते पत्र मिळाले होते. त्यात अल--झरकावीही अल-सुरींनी म्हटल्याप्रमाणे केवळ अमेरिकेबद्दलचा द्वेष हे एकच उद्दिष्ट अल-कायदाला चळवळीला वाढवण्यास यशस्वी झाले नव्हते याचेच प्रतिपादन करत होते. ९/११च्या घटनेमुळे अरबी जनता चकित झाली पण प्रभावित झाली नाहीं. अल कायदा ही एक एकसंध संघटना बनली होती व तिच्या अमेरिकेवर हल्ला करायच्या एकुलत्या एक उद्दिष्टाने संपन्न अरब जनतेत दीर्घकालपर्यंतचे समर्थन मिळू शकले नव्हते कारण ही जनता पाच वेळा नमाज तर पढायचीच पण डोक्याची टोपी उतरवून डॉलरला सलामही करायची. अल-झरकावींनी बिन लादेनना सल्ला दिला कीं त्यांनी खूप जुन्या कडवट अढ्यांवर भिस्त ठेवावी आणि शिया त्यांना धोका निर्माण करत आहेत असे सुन्नींना पटवून द्यावे जेणेकरून महंमद पैगंबरांच्या वंशावरून उदभवलेल्या बाचाबाचीपर्यंत पोचणार्या जातीयवादाचा डोंब उसळू द्यावा. जर शियांना जातीय युद्धात खेचता आले तर आपण उदासीन सुन्नींना त्यांना धोका निर्माण झाला आहे असे जाणवून देऊन पुन्हा जागृत करता येईल असेही त्यांनी बिन लादेनना सांगितले. फुआद हुसेन यांच्या अनुसार ओसामांना हे पटले व २००४च्या हिवाळ्यापासून इराकमधला आपापसातला रक्तपात वाढला आणि अल-झरकावींच्या अनुनायांनी हजारो शियांना आणि पाश्चात्य नागरिकांना कंठस्नान घातले आणि त्या प्रसंगांतील अतिहिंसक तुकडे चित्रित केले आणि अल कायदा संघटनेला मुळापासून हादरविले.
त्यांच्या अनुयायांनी आणखी एक सिद्धांतही अनुसरला. धार्मिक सूडाच्या भावनेने बेसुमार फुगलेल्या अनुयायांना त्यांनी इराकमधील मुख्य गटापासून विखरवले. एक=एक, दोन-दोन जणांना त्यांनी पश्चिमेला दौडवून न कळत युरोपमध्ये घुसविले. त्यांचे छोटे गट बनवले आणि त्यांना अल कायदाचे मार्गदर्शन मिळेल पण नेतृत्व स्वतःचेच असेल असे संघटन केले. अल कायदाच्या गुप्तहेरसंघटनांनी या गटांना २००४च्या माद्रिदच्या रेल्वेस्टेशनवरील बाँबहल्ल्यात आणि २००५च्या लंडनमधील मेट्रो आणि बसहल्ल्यात एकत्र आणले होते.
पण अल-सुरींच्या या योजना फुआद हुसेननी अरबी भाषेत त्यांच्या वर्षानुवर्षे घेतलेल्या मुलाखतींची माहिती २००५मध्ये प्रकाशित झाल्यावरच बाहेर आल्या. यामुळे ९/११ आणि १९९८च्या आफ्रिकेतील दूतावासांवर झालेल्या हल्ल्यांसंबंधात हवे असलेले, ओसामांच्या सुरक्षिततेबद्दलचे सल्लागार, सध्या अदृश्श पण इराणमध्ये भूमिगत असण्याची शक्यता असलेले सैफ अल-अद्ल यांचे विचारही वेचले गेले. हुसेन यांचे पुस्तक १०० टक्के काटेकोर नसले तरी त्या पुस्तकाचा विक्रमी खप झाला. त्यात भविष्यकाळातील वीस वर्षांचा प्रवास आखलेला होता व त्याचा शेवट २०२०मध्ये एका भीतीदायक अखेरीत होणार होता. ही जणू अल कायदाची दैदिप्यवान, खिलाफतीला पुन्हा जुने वैभव देऊ पहाणारी आणि पाश्चात्य जगाबरोबरच्या निर्वाणीच्या लढाईची योजना होती व त्यानुसार जिहादी अण्वस्त्रें वापरून खराखुरा भीषण दहशतवाद उलगडतील आणि त्यात 'काफीर' जगताचा शेवट होईल अशी योजना आखली होती.
पहिला टप्पा होता जागृती. या टप्प्यात सापाच्या डोक्यावर वार करून त्याला असंघटित प्रतिहल्ला करातला प्रोत्साहन देणे. हा टप्पा २००० ते २००३च्या दरम्यान घडला होता व त्यात अमेरिकेच्या सैनिकांवर, जहाजांवर, दूतावासांवर हल्ले करत-करत ९/११च्या मोठ्या हल्ल्यात त्या टप्प्याचा नेत्रदीपक शेवट झाला होता व हा टप्पा यशस्वी रीत्या पार पडला असाच निर्वाळा जाणत्यांनी दिला. या हल्ल्यामुळे डिवचली गेलेली अमेरिका प्रतिहल्ला करण्यासाठी मध्यपूर्वेत ओढली गेली होती व त्यामुळे अमेरिकन लक्ष्यें जवळ आली व सोपी झाली. आता 'अल कायदा'ला जणू श्रोतृवर्ग लाभला होता!
दुसर्या टप्प्याचे नाव होते 'डोळे उघडणे'. २००६ साली संपलेल्या या टप्प्याचे उद्दिष्ट होते अमेरिकाविरोधी चळवळीचा शियाविरोधी बंडात विस्तृती.होणे. अल-झरकावींच्या या योजनेलाही ओसामांची संमती मिळाली. या टप्प्यात अमेरिका आणि युरोपीय देश मुस्लिमविरोधी आहेत असा आभास निर्माण करणे हेही उद्दिष्ट होते. हाही टप्पा यशस्वी झाला होता.
हे पाकिस्तानसारख्या देशात दिसू लागले होते कारण मुस्लिम देशवासियांना व्हिसा देण्याबाबतचे निर्बंध कडक झाल्यामुळे सुखवस्तू मुसलमनांनाही आपला देश सोडणे कठीण होऊ लागले होते. त्यामुळे मुस्लिम पैसा पाश्चात्य देशांत यायच्याऐवजी पाकिस्तानसारख्या देशांत परत जाऊ लागला. बँकांना वैभव आले, स्थावर वास्तूंचे भाव वाढले, इस्लामचे पुनरुत्थान झाले आणि पाकिस्तानचा पश्चिमेकडे कलणारा मध्यमवर्ग मशीदींकडे वळला. श्रीमंत व्यवसायी लोक मद्रासांना आणि तत्सम सेवाभावी संस्थांना जाऊ लागला. भयामुळे आणि तिटकार्यामुळे सर्व स्तरांतील पाकिस्तान्यांना बाजू निवडणे आवश्यक बनले व उच्चभ्रू समाज-लष्करातील कंपूच नव्हे तर पाकिस्तानचा परमाणूप्रकल्प चालविणारे सुशिक्षित शास्त्रज्ञसुद्धा इस्लामकडे व पाश्चात्यांच्या विरुद्ध झुकले.
हुसेन यांच्या पुस्तकात इस्रायलबद्दलही विचार होते. इस्रायलवर २००६मध्ये झालेल्या युद्धासारखी नवी आणि खर्चिक युद्धे लादली पाहिजेत, युद्धाला कंटाळलेले इस्रायली युद्ध हरतील व त्यातून हिजबुल्लासारख्या संघटना सशक्त होतील आणि असे विजय मिळाल्यास जिहादींची संख्याही फुगेल अशी मतें त्यात व्यक्त केलेली आहेत.
इंटरनेटचा उपयोग करण्याबद्दलही यात चर्चा आहे. अल सुरी आणि फुआद हुसेन यांच्या पुस्तकातील विचार येथे कुणालाही वाचता येतील. एकाद्या विश्वविद्यालयाला नागरी युद्धे, अण्वस्त्रांबद्दलची माहिती आणि धार्मिक विचारांचा प्रसार याचे काम इंटरनेटद्वारा करता येईल. पाश्चात्यांची नीतिमूल्ये आणि संस्कृती यांच्यावर बाँबहल्ला वापरणार्या संस्कृतीने हल्ला केला आहे आणि त्यांच्याकडे याच्याशिवाय इतर कांहींच देण्यासारखे नाहीं अशा प्रचाराला तोंड देण्यासाठी अल कायदाला विचारांच्या युद्धात पडावे लागणार होते. पण आता अनेक पुस्तके अपलोड केलेली होती व अनेक विचार त्यांत उपलब्ध होते.
या पुस्तकातला तिसरा टप्पा होता 'उठणे आणि उभे रहाणे' हा होता. मध्यपूर्वेतील कुठल्याही राष्ट्राने जर सत्ता गमावली तर त्याचा फायदा घ्यायला अल कायदाने तयार असले पाहिजे असा विचारही होता. जरी हे राष्ट्र सुन्नी असले तरी राजनैतिक कारणांसाठी इराणच्या शियांबरोबर उभे होते. पण तिथली मुस्लिम सनातनी लोक बशर अल-अस्साद यांची हुकुमशाही संपविण्याच्या संधीचीच वाट पहात होते. लेबॅनॉनचेही तुकडे पाडायचे होते. या सर्व देशातल्या आणि जॉर्डनच्या सुन्नींना एका उद्देशासाठी एकत्र आणणे जरूरीचे होते.
२०१०पासून तीन वर्षें अल कायदा चौथ्या टप्प्यात शिरायचा होता (हे पुस्तक २००७साली प्रसिद्ध झाले आहे. एव्हाना शिरलाही असेल). तोवर नावडत्या/तिरस्कृत अरबी सरकारांचा पाडाव झालेला असेल असा लेखकाचा होरा होता. या काळात डॉलरऐवजी सोने हे चलन वापरून जागतिक आर्थिक परिस्थितीला धक्का लावण्यासाठी अरब तेल जाळायची त्यांची योजना होती. तसेच सायबर-दहशतवादही.सुरू करणार आहेत. तोवर अमेरिका बरीच कमजोर होऊन सुपरपॉवर उरणार नाहीं, ती आपल्या कोशात जाईल व इस्रायल स्वत:चे रक्षण करू शकणार नाही. २०१३पर्यंत ही परिस्थिती आली कीं योजना पाचव्या टप्प्यात जाऊ शकेल व एका इस्लामी राजवटीची घोषणा करता येईल. इस्लामी जगतात पाश्चात्यांचा पगडा कमजोर झाल्यामुळे अल कायदाच्या विचारांना विरोध रहाणार नाहीं. व त्यातून शेवटचा "संपूर्ण (शक्तीनिशी) टक्कर" हा टप्पा सुरू होईल. हा 'काफीरां'विरुद्धचा शेवटचा व प्रलयंकारी संघर्ष असणार होता आणि यात नरसंहाराची सर्व-परमाणू, रासायनिक व जैविक-अस्त्रें वापरून संपूर्ण हुकुमत मिळवून जागतिक खिलाफतीची स्थापना करण्याची योजना होती. कुराणातील एक श्लोकाचा उल्लेख करून हुसेन लिहितात कीं "आता सत्याचे आगमन झाले असेल आणि असत्याचा विनाश. कारण असत्याचा साहजीकच विनाश होणार. आम्ही शत्रूला घाबरवून सोडू आणि त्याला पळवून लावू!" २०२०पर्यंत सारे जग १५० कोटी मुसलमानांच्या मालकीचे असेल!
अल कायदाच्या विचारवंतांच्या मते शेवटी या सर्व योजनेला पुढे नेण्यासाठी लागणारा प्रज्वलक कोण असेल याचा अंदाज हुसेननी लावला आणि तो होता इराण! १९९६ आणि २००२च्या दरम्यान ज्यांनी हुसेन यांच्याशी संभाषण केले होते त्यांनी असे प्रतिपादन केले कीं अण्वस्त्रप्रकल्पाच्या प्रश्नावरून अमेरिकेने सुरू केलेले युद्ध हे साध्य करून देईल म्हणून ते हेतुपुरस्सर तसा प्रयत्न करत होते. इराणच्या परमाणूसुविधांवर हल्ला करण्याचा मोह अमेरिका टाळू शकणार नाहीं असे भाकित त्यांनी केले होते. हुसेननी २००५साली लिहिले कीं अल-झरकावी आणि अल कायदा यांनी ही योजना आधीच कार्यरत केलीच होती. इराणने अणूबाँब बनविण्यासाठी लागणारे सर्व घटकभाग आता मिळविले आहेत या गुप्तचरांनी आणलेल्या माहितीवर त्यांचे हे डावपेच आधारलेले होते. त्यांच्या प्रत्येक परमाणू, औद्योगिक आणि लष्करी सुविधांवर अमेरिका आणि इस्रायल एकाएकी जोरदार हवाई हल्ले करतील अशी इराणची अटकळ होती आणि इराणने असेल-नसेल त्या साधनांनी प्रतिहल्ला करण्याची योजनाही आखली होती. त्यात तेल उद्योगावर हल्ला करणाचा मनसुबा होता. पण त्यानंतऱच्या योजनेनुसार अमेरिकनांची आणि ब्रिटिशांची इराण इराकमध्ये गोंधळ माजविण्याचा कट करेल अशी भीती अटकळ खोटी ठरवून इराणने गुप्तपणे प्रशिक्षण दिलेले ३०,००० सैनिक दोन लबॅनीज जिहादींच्या नेतृत्वाखाली सार्या जगभरातील अमेरिकन आणि इस्रायली लक्ष्यांवर हल्ले करणार होते. गाझातून हमास आणि लेबॅनॉनमधून हिजबुल्ला इस्रायलवरही हल्ले करणार होते. या हल्ल्यामुळे सुन्नींचे समाधान होईल आणि इराणमध्ये गोंधळ माजून त्यांच्या सीमा उघड्या होतील आणि मग अल कायदाचे हस्तक तिथे घुसतील अशी योजना होती. सीरियालाही धोका निर्माण केला जाईल आणि अमेरिकेने अपेक्षेप्रमाणे सीरियावर हल्ला केल्यास अल कायदाचे हस्तक तिथे मुक्तसंचार करून इराकच्या प्रचंड मोठ्या सीमेवरून लेबॅनॉनमध्ये घुसणार होते.
एकाद्याला हा कल्पनाविलास वाटला असता, पण ज्या अचूकतेने आणि पद्धतशीरपणे या योजनेतील आधीच्या घटना घडविण्यात आलेल्या होत्या त्यावरून अशी कल्पना करणे धोक्याचेच ठरले असते. पाश्चात्यांना सतावणार्या सदसद्विवेकबुद्धीपासून मुक्त असलेले हे मुस्लिम तरुण आणि या मुस्लिम तरुणी भयंकर विनाशकारी शस्त्रास्त्रें वापरून या चक्रवाताचा फायदा घेणार होती. या तर्हेच्या संघर्षांत, त्यातही एक बाजू अण्वस्त्रे वापरत असताना, पाश्चात्यांच्या मित्रराष्ट्रांची निष्ठा त्यांच्या शत्रूंच्या क्रूरतेइतकीच महत्वाची ठरेल.!
----------------------------------------------
[१] अशा देशभक्त शास्त्रज्ञांना असे छळण्याची ही सारी पापे मुशर्रफ कधी व कुठे फेडणार आहे देव जाणे!
[२] शेवटी त्यांना मारले गेले त्यात कुणाकुणाचा किती हात होता हे कधी कळेल काय?
[३] 'डॉन'सारख्या मातब्बर वृत्तपत्रालासुद्धा कसे लष्करशहांपुढे लांगूलचालन करावे लागायचे याचे हे बोलके पण 'न पचणारे' उदाहरण आहे!
[४] रॉबर्ट गालुच्ची जवळ-जवळ तीस वर्षें खानसाहेबांच्या मागावर होते.
[५] राष्ट्राध्यक्ष केनेडींनी स्थापलेली Arms Control and Disarmament Agency ही संघटना.
[६] Verification and Compliance
[७] Counter-proliferation
[८] Bureau of International Security and Non-Proliferarion
[९] मायकेल रोझेंथाल याच्याबद्दलची माहिती इथे मिळेल: http://www.bnl.gov/education/nnss/Rosenthal.asp. परराष्ट्रमंत्रालयातून बाहेर पडल्यावर त्यांनी मे २००७मध्ये Brookhaven National Laboratory मध्ये अण्वस्त्रप्रसारविरोध आणि संरक्षण विभागाचे प्रमुख म्हणून नोकरी घेतली.
[१०] Agreed Framework with North Korea
[११] रॉबर्ट ओप्पनहायमर हे मॅनहॅटन प्रकल्पाचे संचालक होते. या प्रकल्पातूनच अणूबाँबचा शोध लागला.
[१२] हे पुस्तक लिहिले गेले तेंव्हा तालीबानचा पुनर्जन्म झालेला नव्हता!
[१३] American Enterprise Institute आणि Washington Institute on Near East Policy
[१४] Revolutionary Guardसाठी फारसी भाषेतला शब्द (इराणमध्ये अनेक वर्षें राहिलेल्या श्री. विनायक रानडे यांच्या सौजन्याने)
[१५] यात ३०४ अमेरिकन सैनिक मृत्युमुखी पडले होते.
[१६] Under Secretary of State for Political Affairs
[१७] हे कार्टर यांच्या कारकीर्दीत अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री होते.
[१८] Nuclear Non-Proliferation Treaty
[१९] झिरजमीन-२७". फारसी भाषेत 'झिरजमीन' म्हणजे जमीनीखाली. आणि '२७' हा आकडा खोमेनींच्या १९७९च्या क्रांतीनंतर झालेल्या २७ वर्षांसाठी होता!
[२०] IAEAच्या असेल त्या परिस्थितीत सत्य शोधण्याच्या चिकाटीचे कौतुक केले पाहिजे.
[२१] Brinkmanship म्हणजे एकादी धोकादायक परिस्थिती किंवा एकादे भांडण दुसरा पक्ष नमते घेईल या आशेने सुरक्षिततेच्या रेघेपलीकडे जाईल इतके ताणायचे! पण दोन्ही पक्ष जर Brinkmanship करत असतील तर युद्ध/महायुद्ध पेटू शकते.
[२२] या पुस्तकात गोष्ट सदैव मागच्या-पुढच्या काळात येत-जात रहाते! २००६च्या हिवाळ्यातील निवडणुकांनी सुरू झालेला हा परिच्छेद मधेच २००२च्या उन्हाळ्यात जातो व त्यामुळे वाचक एकाग्रचित्ताने ते वाचू शकत नाहींत! या पुस्तकाचे संपादन अजून सुधारायला हवे होते असे वाटते.
[२३] या कारवाईला अमेरिकेत Troop Surge या नावाने संबोधले जाते! फ्रेडरिक कागन AEIचे अभ्यासक आणि West PointMilitary Academyचे इतिहासतज्ञ होते.
[२४] अली अन्सारी हे स्कॉटलंडच्या University of St. Andrews मधील Iranian Instituteचे संचालक होते.
[२५] मध्यपूर्वेचे असे लिहायला हवे होते कारण अहमदीनेजाद अरब नसून फारसी आहेत!
[२६] विकिपीडियातील शोधातून कळले कीं अबू या शब्दाचा अर्थ संत किंवा बाप असा आहे. अबू हसन म्हणजे हसनचा बाप. ('बिन'च्या उलटा. बिन म्हणजे "son of"). पण हे नांव दहशतवादी स्वतःसाठी कां निवडतात हे एक कोडेच आहे!
[२७] अरबी भाषेत साला म्हणजे प्राचीन ("ancient one"). प्रेषक महंमद यांच्या सोबत्यांसाठी हा शब्द वापरला जातो आणि सालाफी म्हणजे अतीशय शुद्ध असे मुसलमान जे त्यांच्या धर्माला पुन्हा त्या काळात आणि प्राचीन ग्रंथांच्या शब्दश: विवरणाकडे नेऊ इच्छितात व ज्याला बाकीचे जग प्रगती म्हणते त्या शेकडो वर्षांच्या र्हासाला काढून टाकू इच्छितात.
[२८] झरकावींबद्दल जास्त माहिती http://en.wikipedia.org/wiki/Abu_Musab_al-Zarqawi या दुव्यावर उपलब्ध आहे.
[२९] The Evident Sacrileges of the Saudi State
[३०] आपल्यातल्या कुणी अरबी भाषा जाणणार्याने Al-Zarqawi: The Second Generation of Al Qaeda या हुसेनलिखित पुस्तकाबद्दल भारतीयांना परिचित करायला हवे. फुआद हुसेनबद्दल माहिती वाचा http://en.wikipedia.org/wiki/Fouad_Hussein या दुव्यावर!
प्रतिक्रिया
28 Jul 2010 - 5:06 pm | सुधीर काळे
आता फक्त दोन "अध्याय" उरले!
28 Jul 2010 - 9:13 pm | सुधीर काळे
या प्रकरणातल्या शेवटच्या १० टक्के भागात अल कायदा संघटनेच्या गेल्या ५-७ वर्षातली ’कामगिरी’ची आणि पुढील १० वर्षातल्या ध्येयांबद्दलची फारच धक्कदायक व साधारणपणे भारतीयांना माहीत नसलेली माहिती आहे.
नक्की वाचायला हवी प्रत्येकाने!
28 Jul 2010 - 6:24 pm | तर्री
काळे साहेब ,
ह्या लेखा बद्द्ल आपले अनेक आभार.
28 Jul 2010 - 8:25 pm | Dhananjay Borgaonkar
उत्तम लेख. बरीच नविन माहिती मिळाली. शेवटचे ३,४ परीच्छेद वाचुन अंगावर काटा आला आहे.
28 Jul 2010 - 9:12 pm | सुधीर काळे
पहिल्यांदा हे प्रकरण मी वाचले तेंव्हां तर आलाच होता, पण आज मी भाषांतर करताना अंगावर पुन्हा आलेला काटा तर अजूनही गेलेला नाहीं! काय भयंकर मनसुबा आहे या अल-कायदाचा!