तुमच्या लेखी मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट वाक्य कोणते ?

प्रसाद गोडबोले's picture
प्रसाद गोडबोले in काथ्याकूट
2 May 2025 - 10:50 am
गाभा: 

काल मराठी राजभाषा दिन होता.
त्या निमित्ताने मनात एक मजेशीर आणि रोचक विचार आला .

" तुमच्या लेखी मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट वाक्य कोणते ?"

म्हणजे फक्त एकच वाक्य असे नाही, 2 3 वाक्ये असतील तरी चालेल, एखादी कविता किंवा त्या कवितेतील ओळही चालेल.
पण असं काहीतरी विशेष की जे ऐकून तुम्हाला वाटत " अहाहा काय लिहिलं आहे !!".

प्रश्न वाटतो सोप्पा पण आहे अवघड. मी ज्या लोकांना विचारलं तर लोकांना मराठी पेक्षा संस्कृत मधील असे वाक्य सहज सुचले ... जसे की सत्यमेव जयते. ( अर्थात सत्य म्हणजे ट्रुथ असे भाषांतर करून जे शिकले आहेत त्यांना ह्या उपनिषदातील वाक्याची घनता लक्षात येणार नाही.)
मला स्वतःला " तत्त्वमसि " हे वाक्य प्रचंड सुंदर वाटते.
आणि फक्त अध्यात्मिक तत्त्वज्ञानाचे वाक्य असले पाहिजे असे नाही. गीत गोविंदात जयदेव कवींनी जे लिहिले आहे हे कसले लोकोत्तर आहे -

माराङ्के रतिकेलिसंकुलरणारम्भे तया साहस-प्रायं कान्तजयाय किञ्चिदुपरि प्रारम्भि यत्सम्भ्रमात् ।
निष्पन्दा जघनस्थली शिथिलता दोर्वल्लिरुत्कम्पितं वक्षो मीलितमक्षि पौरुषरसः स्त्रीणां कुतः सिध्यति ॥ ६९ ॥

असे काहीसे मराठीतील सुंदर वाक्य , कविता , तुम्हाला काय सुचते ?
म्हणजे एखाद्या पुस्तकाचे नाव सांगू नका, त्यातील तुम्हाला काय भावलं ते भारी वाक्य काय ते सांगा .
एखाद्या पुस्तकातील परिच्छेद
एखादी काव्यपंक्ती
एखादा अभंग
एखादे पत्रातील वाक्य
एखादे नाटकातील प्रवेश
एखाद्या शिलालेखातील वाक्य
एखादे पत्रातील वाक्य.
.
काहीही
जे तुमच्या लेखी अभिजात मराठी आहे !

बस वाक्य !

अवांतर : हा प्रश्न मी अनेक लोकांना विचारला , त्यानिमित्ताने
" नाही सांगता येत " हे मराठीतील सर्वात सुंदर वाक्य आहे असे तूर्तास निदर्शनास येत आहे =))))

प्रतिक्रिया

प्रसाद गोडबोले's picture

2 May 2025 - 11:44 am | प्रसाद गोडबोले

१. माझ्या लेखी

चांगदेव पासष्टी मधील ६४ वी ओवी ही मराठी भाषेतील सर्वात लोकोत्तर ओवी / वाक्य आहे :

नाहीं तेंचि काय नेणों असें । दिसें तेंचि कैसें नेणों दिसे ।
असें तेंचि नेणों आपैसे । तें कीं हो‍इजे ॥

आणि ह्याच जोडीला अध्यात्मातील इतर अनेक ओव्या श्लोक आहेत की ज्यांच्या तोडीस तोड संस्कृत वाक्ये देखील नाहीत !

अध्यात्म तत्त्वज्ञानाच्या कक्षेबाहेर बोलायचे म्हणाले तर श्री छत्रपती शिवाजी महाराज ह्यांनी व्यंकोजी राजे भोसले ह्यांना लिहिलेल्या पत्रातील ही व्याक्ये मला प्रचंड आवडतात --

" हे कार्य करावयाचे दिवस हायेती. वैराग्य तो उत्तरवयी कराल तो थोडे. आज पराक्रम करून आम्हांस तमासे दाखविणे. "

आणि आधुनिक काळातील म्हणायचं तर मी साताऱ्यात स्वतःच्या कानांनी प्रत्यक्ष ऐकलेले वाक्य मला मराठी भाषेतील लोकोत्तर वाक्य वाटते

" एकवेळ महाराष्ट्र देशोधडीला लागला तरी बेहत्तर पण कोनच्याबी परिस्थितीत आणाजीपंत टरबुज्या परत मुख्यमंत्री नाय व्हायला पायजेल. "

_/\_

वामन देशमुख's picture

2 May 2025 - 12:12 pm | वामन देशमुख

१. जय श्रीराम. (अर्थात या वाक्याला भाषेचे बंधन नाही.)

२. प्रीती आणि पराक्रम या तरुण मनाच्या दोन मोठ्या प्रेरणा असतात.

चित्रगुप्त's picture

2 May 2025 - 12:23 pm | चित्रगुप्त

सदा स्वरुपानुसंधान
हे मुख्य साधुचे लक्षण
जनी असोन आपण
जनावेगळा.
-- गेली पंचावन वर्षे हेच मराठीतले मला सर्वात भावलेले (वाक्य?) आहे.

मूकवाचक's picture

2 May 2025 - 1:41 pm | मूकवाचक

सर्वेंद्रियासहित वर्तमान | मन बुद्धि आणि अहंपण | आत्मारामी समर्पून | निज निवांतपण उपभोगावे ||

सदा स्वरूपानुसंधान | हेचि भक्ती हेचि ज्ञान | तेणे तुटोनी कर्म बंध | परम समाधान प्राप्त होय ||

जो जें वांछील तो ते लाहो| प्राणिजात ||

माझी आवडती मनावर परिणाम.करणारी मराठीतील काव्य पंक्ती.म्हणजे अगदी किमान शब्दात कमाल करणारी
1
आपले सर्वांचे लाडके आरती प्रभूची ही अदभुत ओळ
शब्दांवाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले.
2
कुसुमाग्रजांची फक्त एकच अंगावर रोमांच आणणारी ओळ
वेडात मराठे वीर दौडले सात.
3
केशवसुतांची ही विलक्षण ओळ
कंटक शल्ये बोथटली , मखमालीची लव वठली.
4
सुरेश भटांची ही अप्रतिम
अजून तुझे हळदीचे अंग अंग पिवळे ग
अजून तुझ्या डोळ्यातील मोठेपण कवळे ग

किती सुंदर.भाषा आहे.मराठी.एक एक ओळीत किती ते.सौंदर्य

चंद्रसूर्यकुमार's picture

2 May 2025 - 5:32 pm | चंद्रसूर्यकुमार

माझ्या मते शिवाजी महाराजांचे वाक्य- हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा.

अमरेंद्र बाहुबली's picture

2 May 2025 - 5:33 pm | अमरेंद्र बाहुबली

लाखो तलवारी पेटवणारी!
“हर हर महादेव” घोषणा!

॥ रतीचिया बेटा, आदळती कामाचिया लाटा, जेथ जीवफ़ेन संघाटा, सैंघ दिसे ॥

ज्ञानेश्वर तसं श्रुंगारिक वा बोल्ड लिहतं नाहीत फ़ारसं ती त्यांची प्रकृतीच नाही मुळात. तरीही काही ठिकाणी बॅचलर ज्ञानेश्वर सुखद धक्के देतात उदा. कधी त्यांची रिगतां वल्लभांपुढे, नाहीं आंगी जींवीं सांकडे ,जिच्या अंगात कुठलाही संकोच राहत नाही, गळुन पडतो, अशी प्रियाच्या सहवासात फ़ुलुन येणारी स्त्री, तर माहेवणीं (गर्भवती) प्रयत्नेंसी. चुकविजे सेजे जैसी मधली शेजेला चुकवणारी , कधी तर सांडुनी कुळे दोन्ही, प्रियासी अनुसरे कामिनी, द्वंद्वत्यागें स्वचिंतनी, पडली तैसी मधली "कामिनी" येते. कधी प्रथमवयसाकाळीं, लावण्याची नव्हाळी, प्रगटे जैसी आगळी, अंगनाअंगी. तुन तरुण स्त्रीत ( अंगनाअंगी )येणारा लावण्याचा आगळा बहर देखील ते नोंदवतात. तर एक मायानदी चं भव्य रुपक आहे जे अर्थातच मुळातुनच वाचायला हवं इतक सुंदर आहे. त्यात रतीच्या बेटाची अनोखी उपमा येते. कल्पना फ़ार भव्य आहे. अखिल मानवजातीच्या संदर्भात आलेली अशी विशाल कल्पना आहे. "माया" अनेक धार्मिक ग्रंथात "समजावुन" सांगितलेली आहे पण असं सुंदर काव्यमय वर्णन अगदीच दुर्मिळ, हर्मन हेस्से च्या सिद्धार्थ मधल्या नदीची आठवण हमखास होते मात्र त्याचा विषय तसा वेगळाच आहे तर मुळ गीतेत असा श्लोक येतो..
मुळ गीता अ-७ श्लोक क्र.१४ अन्वय- एषा दैवी गुणमयी मम माया हि दुरत्यया (अस्ति), ये मां एव प्रपद्यंते, ते एतां मायां तरंति.
माझी ही माया जी त्रिगुणयुक्त आहे दैवी अशी आहे ती पार करणे मोठे कष्टाचे अवघड काम आहे, जे माझी भक्ती करुन मला प्राप्त होतात तेच हि मायानदी तरुन जातात.

जिये ब्रह्माचळाचां आधाडां, पहिलिया संकल्पजळाचा उभडा, सवेंचि महाभुतांचा बुडबुडा, साना आला । जे सृष्टीविस्ताराचेनि वोघें, चढत काळकलनेचेनि वेगें, प्रवृत्तिनिवृतीची तुंगे, तटे सांडी। जे गुणघनाचेनि वृष्टिभरें, भरली मोहाचेनि महापुरें, घेऊनि जात नगरें, यमनियमांची । जे द्वेषांचां आवर्ती दाटत, मत्सराचे वळसे पडत, माजी प्रमादादि, तळपत, महामीन । जेथ प्रपंचाचीं वळणे, कर्माकर्मांची वोभाणे, वरी तरताती वोसाणे, सुखदु:खांची । रतीचिया बेटा, आदळती कामाचिया लाटा, जेथ जीवफ़ेन संघाटा, सैंघ दिसे । अहंकाराचिया चळीया, वरि मदत्रयाचिया उकळिया, जेथ विषयोर्मीच्या आकळिया, उल्लाळे घेती । उदो अस्ताचे लोंढे, पाडीत जन्ममृत्युचे चोढे, जेथ पांचभौतिक बुडबुडे, होती जाती । (अ-७ ओ-६९ ते ७६)
आधाडां- अर्धा तुटलेला कडा, उभडा- उगम , आवर्ती- भोवर्‍यात, चळिया- चिळकांड्या, आकळिया- लाटा- उल्लाळे-उसळी

एकी वयसेचे जाड बांधले, मग मन्मथाचिये कासे लागले, ते विषयमगरीं सांडिले, चघळुनियां । आता वृद्धाप्याचिया तरंगा, माजीं मतिभ्रंशाचा जरंगा, तेणें कवळिजताती पै गा, चहुकडे । आणि शोकाचां कडा उपडत, क्रोधाचा आवर्ती दाटत, आपदागिधीं चुंबिजत, उधवलां ठायीं । (अ-७ ओ-८५ ते ८७)
जरंगा- जाळ्यात, कवळिजताती- जखडले जातात, आपदागिधीं- संकटरुपी गिधाडे,.

अर्थ- ही मायानदी ब्रह्मरुपी पर्वताच्या अर्ध्या तुटलेल्या कड्यावरुन ( आधाडा) खाली कोसळली, मी अनेक रुपांनी व्हावे असा संकल्परुपी पाण्याचा पहीला लोट जिला आला आणि सोबतच पंचमहाभुतांचा लहानसा बुडबुडाही आला. जी मायानदी सृष्टीविस्ताराच्या ओघात, कालक्रमाने चढत्या वाढत्या प्रवृत्ती-निवृत्ती या दोन उंच तटावरुन सैरावैरा कोसळली. जी सत्व-रज-तम गुणरुपी मेघांच्या वृष्टीने, मोहाच्या महापुराने भरली जाऊन, तिच्या लोंढ्यात यम-नियमांची नगरे च वाहुन नेत आहेत. या मायारुपी महानदीत द्वेषाचे खोल भोवरे आहेत व मत्सराची जिला अनेक वळणे पडलेली आहेत आणि जिच्या प्रवाहात प्रमाद, मद, मोह इ. दोषरुपी मोठाले मासे चमकत आहेत. या मायानदीत कर्म अकर्माच्या पुरात वेगात, सुखदु:खांचा केरकचरा तरंगत असतो आणि जिच्यात संसाराची असंख्य वळणे आहेत. मायानदीत स्त्री-पुरुषांच्या मैथुनरुपी रतीचे बेट आहे, ज्या बेटावर काम वासनेच्या लाटा सातत्त्याने आदळत असल्याने तेथील किनार्‍यावर जीवरुपी फ़ेसांचे असंख्य पुंजके अडकलेले दिसुन येतात. या मायानदीत अहंकाराच्या चिळकांड्या उडत आहेत, त्यावर कहर तीन प्रकारच्या मदांच्या लाटा उकळत आहेत, आणि विषयरुपी उर्मींच्या लाटा उसळी मारत आहेत. या नदीत चंद्र-सुर्यांचे उदयास्तांचे लोंढे वरचेवर येत असतात, आणि या नदीत ती प्रत्येक ठीकाणी जन्ममरणांचे खळगे पाडीत जाते, यात देहादी पदार्थांचे पंचमहाभुतांपासुन झालेले अनेक बुडबुडे उत्पन्न होऊन नष्ट होत असतात.

कित्येकांनी तारुण्याची घट्ट कंबर बांधली, आणि मदनाच्या कासेला लागले, त्यांना विषयरुपी मगरींनी चघळुन फ़ेकुन दिले. आणि पुढे या मायनदीत जी म्हातारपणाची लाट येते त्यात जी बुद्दीभ्रंशाची अनेक जाळी आहेत त्यात अनेकजण अडकतात जखडले जातात. आणि पुढे ते शोकाच्या कड्यावर आदळतात. क्रोधाच्या भोवर्‍यात गटांगळ्या खाउ लागतात, त्या गाळातुन जर मुष्कीलीने कधी डोके वर काढण्यात यशस्वी झालेच तर संकटरुपी गिधाडे त्यांचा कडाडुन चावा घेतात.

प्रसाद गोडबोले's picture

2 May 2025 - 9:27 pm | प्रसाद गोडबोले

आईशप्पथ.

कसलं लिहिलं आहे हे . अफलातून. कृपया संदर्भ लिंक द्या.

फक्त विचार करून पहा की आपण ह्यातील प्रत्येक वाक्य AI ला प्रोंट म्हणून दिली आणि व्हिडिओ बनवायला सांगितला तर काय व्हिडीओ असेल तो अफलातून !!

प्रसाद गोडबोले's picture

3 May 2025 - 12:05 am | प्रसाद गोडबोले

हे तुम्ही स्वतः लिहिले आहे काय ??

https://www.aisiakshare.com/index.php/node/4482

हो माझाच एक जुना लेख होता त्यातील एक उतारा वरती दिलेला होता.

काही चुकले आहे का लेखात ?

प्रसाद गोडबोले's picture

3 May 2025 - 7:44 am | प्रसाद गोडबोले

खूपच अप्रतिम लिहिलं आहे!!

मारवा's picture

3 May 2025 - 7:51 am | मारवा

धन्यवाद इथे मिसळपाववर टाकला नव्हता.
आता टाकतो.

प्रचेतस's picture

4 May 2025 - 12:47 pm | प्रचेतस

यावरून ज्ञानदेवांचा खर दृष्टांत आठवला

खरी टेंकों नेदी उडे । लातौनि फोडी नाकाडें ।
तऱ्ही जेवीं न काढे । माघौता खरु ॥
तैसा जो विषयांलागीं । उडी घाली जळतिये आगीं ।
व्यसनाची आंगीं । लेणीं मिरवी ॥

श्रीगुरुजी's picture

2 May 2025 - 6:04 pm | श्रीगुरुजी

गो-ब्राह्मण प्रतिपालक यवन-परपीडक प्रौढ़ प्रताप धुरंधर, क्षत्रिय कुलवतंस राजाधिराज योगीराज श्री छत्रपति शिवाजी महाराज की जय ।

हे माझे आवडते वाक्य.

श्रीगुरुजी's picture

2 May 2025 - 6:07 pm | श्रीगुरुजी

टिळकपथावरील लोकमान्य टिळक स्मारक मंदिराजवळील एका ग्रंथविक्री दुकानाच्या फलकावर खालील वाक्य होते जे मला खूप आवडले.

शब्दकोशातील सर्व शब्द येथे सुंदर होऊन मिळतात.

मारवा's picture

2 May 2025 - 7:17 pm | मारवा

वाह !

मारवा's picture

2 May 2025 - 7:12 pm | मारवा

कवी ग्रेस
सुन्न देखणा चेहरा माझा, बिगुल मुखातून वाजे
पराभवाच्या पर्वामध्ये जसे उजळती राजे

मर्ढेकरांची
जाऊ दे कार्पण्य मी चे., दे धरू सर्वांस पोटी
भावनेला येऊ दे गा शास्त्रकाट्याची कसोटी

धामणस्करांची

विसर्जनासाठी गणपती नेताना
मला मूर्ती जड झाली, तेव्हा
उसळत्या तारुण्याचा
माझा मुलगाच मला म्हणाला: द्या इकडे.

मी मूर्ती तात्काळ मुलाच्या हातावर ठेवली
चौरंगासहित.
मुलानेही मूर्ती हातात घेतली नीट सावरून, तर
मी एका दैवी आनंदात अकल्पित
परंपरा पुढे सरकल्याच्या..

मी पुन्हा तरूण ययातीसारखा;
माझा मुलगा जख्ख म्हातारा,
परंपरेच्या ओझ्याने वाकलेला..

चिगो's picture

3 May 2025 - 12:23 pm | चिगो

धामणस्करांची कविता आवडली..

*कधी शारदा तू, कधी लक्ष्मी तू कधी भाविनी वा कधी रागिणी सहस्त्रावधी सूर्य झुकतात जेथे स्वयंभू अशी दिव्य सौदामिनी

*मोगरा फुलला,फुले वेचिता बहरू कळियांसी आला...

*अवचिता परिमळु, झुळुकला अळुमाळु...

*फक्त तुझ्यासाठी..

*माझा आत्मा तुझा आत्मा बाहेर..ओम भट स्वाहा..

माझा आत्मा तुझ्यात तुझा आत्मा बाहेर...

प्रसाद गोडबोले's picture

2 May 2025 - 9:20 pm | प्रसाद गोडबोले

मला कधी कधी हा "लग्नाचा " मंत्र वाटतो.

म्हणजे जसे की बायको नवऱ्याला म्हणत आहे , आता तू नाहीच फक्त मीच
मी आहे, तुझ्या अंतर्बाह्य. माझा आत्मा तुझ्यात अन् तुझा बाहेर =))))

ओं फट स्वाहा

हम्म..तोडलस मित्रा,जिकलस तू भावा !
(ह्यांना वाक्य आणि प्रतिक्रिया असं दोन्ही धरा ,हा हा :))

झाकून डोळे एकांताचे जवळी मजला घेशील का ?

कल्पतरूला फुल नसे का वसंत सरला तरी?

मरण कल्पनेशी थांबे तर्क जाणत्यांचा

मी पदर पसरते जन्मदायीनी आई

प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट

चौथा कोनाडा's picture

2 May 2025 - 7:57 pm | चौथा कोनाडा

संध्याकाळचा पिवळा प्रकाश हा
विश्वजननी च्या अंगावर उमटलेली
सुंदर गर्भ छाया आहे,
असे मला वाटते

- दुर्गा भागवत

१. जो जे वांच्छील तो ते लाहो.

२. निंदकाचे घर असावे शेजारी.

३. देणा-याने देत जावे घेणा-याने घेत जावे
घेता घेता एक दिवस देणा-याचे हात घ्यावेत.

तुर्रमखान's picture

3 May 2025 - 12:26 am | तुर्रमखान

क्षणभर मिटले डोळे, सुख न मला साहे ।
विरघळून चंद्र आज रक्तातून वाहे ।
- मंगेश पाडगावकर

मारवा's picture

3 May 2025 - 7:48 am | मारवा

तुयासारखी नाही तूच पाहिजेस !

तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार !

आमची माती आमची माणसं !

येथे कामगारांना रोज पगार दिला जातो

आमच्या येथे सर्व पदार्थ वनस्पती तेलात तळले जातात.

कृपया पादत्राणे आपल्या जागेवर ठेवावीत.

खबरदार ! गाठ आमच्याशी आहे .

कर्नलतपस्वी's picture

3 May 2025 - 8:21 am | कर्नलतपस्वी

तरी आतापुरते....
वाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे
पुस्तकांतून पाहिलेली माणसे गेली कुठे

कितीतरी सांगता येतील.

मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट वाक्य एकच !
जेवलीस का ?
यातून प्रेम,काळजी, आपुलकी सगळ्याच भावना एकत्रच व्यक्त होतात.

चौथा कोनाडा's picture

3 May 2025 - 10:40 am | चौथा कोनाडा

ग्रेट !

+१

एक नंबर !

Vichar Manus's picture

3 May 2025 - 9:29 am | Vichar Manus

*हे पण दिवस जातील*

Bhakti's picture

5 May 2025 - 12:47 pm | Bhakti

सुख आणी दु:ख या एकाच नाण्याच्या दोन बाजू. सुखानंतर दु:ख आणी दु:खानंतर सुख असा आवरत प्रवास सुरुच असतो.

अमरेंद्र बाहुबली's picture

5 May 2025 - 3:40 pm | अमरेंद्र बाहुबली

अनंत अंबानीच्या आयुष्यात आहे का सुख मग दुःख?

राजा असो वा रंक सुख दुःखाचा पाठशिवणीचा खेळ कोणालाही चुकला नाही.
हा व्हिडिओ तू पाहिला नाही का? अनंत अंबानीच्या दुःखाची कहाणी ऐकून मुकेश अंबानी -एक बाप किती ढसढसा रडला .... _/\_

Bhakti's picture

5 May 2025 - 6:24 pm | Bhakti
चंद्रसूर्यकुमार's picture

5 May 2025 - 5:32 pm | चंद्रसूर्यकुमार

भरपूर पैसे असले की दु:ख नसते असे थोडीच आहे? डेल कार्नेगीच्या How to start worrying and start living या पुस्तकात एक उदाहरण दिले आहे. नेपोलिअन बोनापार्ट हा फ्रान्सचा सम्राट होता. सत्ता, पैसे, प्रसिध्दी सगळे त्याच्याकडे होते. तरीही राजा असतानाही त्याला एक दिवसही शांत झोप नव्हती. त्याउलट हेलन केलर जन्मतः अंध होती. तरीही तिने म्हटले होते- I find life so beautiful. तेव्हा भरपूर पैसे असले की माणूस दु:खी असू शकत नाही असे नाही. सीसीडीचा मालक व्ही.जी.सिध्दार्थ याच्याकडे ५ हजार कोटींची मालमत्ता होती म्हणे. पण शेवटी त्याने आत्महत्या केली. म्हणजे त्याला काहीतरी दु:ख असेलच ना?

अमरेंद्र बाहुबली's picture

5 May 2025 - 7:41 pm | अमरेंद्र बाहुबली

हायला! इतका पैसा असून दुःख :(

वामन देशमुख's picture

5 May 2025 - 9:59 pm | वामन देशमुख

भरपूर पैसे असले की दु:ख नसते असे थोडीच आहे? ...

सहमत आहे.

ज्यांच्याकडे पुरेसे पैसे नसतात त्या लोकांना पैसा आज आयुष्यातील प्रत्येक प्रश्नावर, समस्येवर वा दुःखावर रामबाण इलाज आहे असे वाटते. त्यातून मग त्यांच्यापेक्षा अधिक पैसे असलेल्या एखाद्याला काही दुःख किंवा समस्या आहे असे दिसले तर मग "हायला! इतका पैसा असून दुःख" असे त्यांना वाटते.‌

"पैसा हे केवळ साधन आहे, समस्यांवरचा उपाय नाही", हे प्रत्येकाला कळेलच असे नाही ("पैसा महत्वाचा नाही" असा या विवेचनाचा अजिबात अर्थ नाही हे मुद्दामून नमूद करतो).

---

आयुष्यात समस्या कोणाला चुकल्यात? प्रभू श्रीरामचंद्रापासून ते या अस्मादिक किरकोळ मिपाखरापर्यंत प्रत्येक मानवाच्च्या आयुष्यात काही ना काही काही ना काही समस्या आहेतच.

---

किमान पैशांच्या बाबतीत तरी माझी तर प्रभू श्रीराम चरणी प्रार्थना आहे, "देवा, मला माझ्या आयुष्यात किमान शे-पाचशे कोटींच्या समस्या येऊ देत!" लहान लहान रकमांच्या समस्यांशी झगडून खूप झालं आता!
;-)

चामुंडराय's picture

3 May 2025 - 6:50 pm | चामुंडराय

बघतोस काय रागाने ओव्हरटेक केलंय वाघाने

आणि दुसरे

हॉर्न ओके प्लिज

कानडाऊ योगेशु's picture

3 May 2025 - 11:15 pm | कानडाऊ योगेशु

सर्वोत्कृष्ठ नाही पण सर्वात भयभीत करणारे वाक्य.
शुभमंगल सावधान! :)

*विवाह म्हणजे दोन जीवांचे मधुर मिलन सनई चौघड्यांच्या मंजुळ स्वरात नवजीवनात केलेले पदार्पण सुख स्वप्नांच्या पाकळ्यांचे नाजूक उन्मीलन सासर - माहेरच्या नात्याची मंगळसूत्रात केलेली पवित्र गुंफण यासाठी हवा शुभ आशीर्वाद व शुभेच्छांची. सुखद रम्य पाखरण!!

*आमच्या ताईच्या लग्नाला यायचं हं...व्यर्थ लुडबुड..

*कृपया भेटवस्तू आणू नये..आपला आहेर हीच खरी उपस्थिती!
आता पत्रिका प्रकारचं कालबाह्य झालाय.कायप्पाने काम सोप्पे केलंय.

श्री अमुक अमुक टीकोजीराव यांचा अमुक अमुक सत्यभामा बरोबर शरीरसंबंध निश्चित करण्याचे योजिले आहे अशा अर्थाचा बेधडक मजकूर असे.

पुढे मराठी समाज सुसंकृत आल्यानंतर मराठी विवाह पत्रिकांमध्ये ही असे लिहिण्याची पद्धत मागे.पडली.

वामन देशमुख's picture

6 May 2025 - 5:09 pm | वामन देशमुख

हो, हे असं आधी लिहायचे असे मी पण कुठेतरी वाचले आहे.

प्रसाद गोडबोले's picture

6 May 2025 - 7:05 pm | प्रसाद गोडबोले

Lt

अर्थात ह्यातील शरीर संबंध ह्या शब्दाला खूप खोल अर्थ आहे. आजच्या काळात सेक्स हा अर्थाने हा शब्द वापरतात हा अर्थ खूपच उच्छृंखल आहे.
ह्या विषयावर सविस्तर लेख लिहिण्यात येत.

वा वा. खुद्द बळवंतरावांच्या मुलीच्या लग्नाची पत्रिका. ती ही 'ईस्ट इंडिया पोस्ट कार्ड' वर छापिलेली. कुठून मिळाली बुवा ?
झोकदार इंग्रजी अक्षरात लिहीलेला पत्ता. वरती ' श्री लक्ष्मीकेशव प्रसन्न' पण चित्र गणपतीचे. ' विश्वनाथ राव यास वर नेमस्त केले आहे" ... मजेदार आहे. तिकीट किती पैश्यांचे आहे, आणि त्यावरील 'राणी'कोणती ? व्हिक्तुरिया का ?

अर्थात ह्यातील शरीर संबंध ह्या शब्दाला खूप खोल अर्थ आहे. आजच्या काळात सेक्स हा अर्थाने हा शब्द वापरतात हा अर्थ खूपच उच्छृंखल आहे.
ह्या विषयावर सविस्तर लेख लिहिण्यात येत.

--- लवकर लिहा सविस्तर लेख. वाट बघिंग.

आपली उपस्थिती हाच खरा आहेर...
हम्म उलट कॉपी पेस्ट झालं ;)

कार्य सिध्दीस नेण्यास श्री समर्थ आहे. तरी या मंगल प्रसंगी आपण सहकुटुंब, सहपरिवार उपस्थित राहून वधू-वरास शुभाशीर्वाद द्यावेत, ही नम्र विनंती_/\_

प्रचेतस's picture

4 May 2025 - 12:45 pm | प्रचेतस

हे आमचे आवडते शिलावाक्य :)

शिलाहार अपरादित्य (द्वितीय) याचा लोनाड शिलालेख (इ.स. ११८४)

इये शासने लिखिता भाषा जो लोपि अथवा लोपावि यो गर्दभनाथु गर्दभु
तेहाचिए मांए सूर्यपर्वे गर्दभु झवे इति विचार्य तथा यस्य यस्य यदा भूमिस्तस्य

कॉमी's picture

4 May 2025 - 8:34 pm | कॉमी

हाहाहाहाहा
हे असले काही इतिहासाच्या पुस्तकात का देत नाहीत? मुलं आनंदाने वाचतील :)

शेवगा

फुलवून पंखा
शुभ्र फुलांचा
तुरा टपोरा
तलम उन्हाचा
टाकीत टाकीत
सुने उसासे
टिपे शेवगा
धुंद कवडसे.

शेवटी

सर्व वस्तुमात्र
पुसून टाकलं
तरी शेवटी
हात उरलेच
नि हातातलं
हे फडक

सर्वोतक्रूष्ट वाक्य असे नाही पण मला सर्वात आवडलेले वाक्य म्हणजे , १)"मला वाटले मला खूप पुस्तके लेख अभ्यासावे लागतेय या राजाचे मी काय देणे लाघतोय पण नाही हा राजाच माझे काही दैणे लागत होता, तयाचयावर पुस्तक लिहता लिहिता हया राजानेच मला इतके काही दिले की माझया पामराची झोळी काय ती पुरणार ( यातला सर्वात सुदर भाग शेवटचा म्हणजे राजाचेच देणे ते माझी पामराची झोळी काथ ती पुरणार? इति स्वामी कादमबरी ---रणजित देसाई यानचया पुस्तकातील प्रस्तावनेतील वाक्य. सर्वात छान वाक्य

अभिमानाने ऊर भरून आणणारे व थोरले माधवराव पेशव्यावरचे छोटटयाशा आयुष्यात खूप कर्तुत्व गाजवणारा राजा !!."
२) याच राजाने स्वामी कादमबरीत म्हटलेले वाखम ""आम्हाला सत्तेचा लोभ नाही केवळ धोरल्या महाराजाचे ( छत्रपती शिवाजी महाराजाचे ) विश्वस्त म्हणून आम्ही राज्यकारभार बघतोय..
३) ज्ञानेश्वराचे प्रसिद्ध पसायदान मधील शेवट सर्वे सन्तु निरामय:सर्वे भद्राणी पश्यन्तु मा कश्चिद दु:खम् आप्नुयात जो जे वान्छिल तो ते लाभो प्राणीजात| व लताबाईन्चया आवाजात व सगीतकार ह्रुदनाथाचया चालीवर ते अप्रतिमपणे आपलया मनात या बुद्धीमान भावन्डानी रुजवलेय.. ज्ञानेश्वर माऊ
ली थोर व थोर ही मनगेशकर भावन्डे !

अनन्त अवधुत's picture

5 May 2025 - 12:23 am | अनन्त अवधुत

पण ज्याशिवाय मराठी बाण्याची अपूर्ण आहे ते

बचेंगे तो और भी लडेंगे

सौन्दर्य's picture

5 May 2025 - 9:49 am | सौन्दर्य

"हाती धनुष्य ज्याच्या
त्याला कसे कळावे ?
हृदयात बाण ज्याच्या
त्यालाच दुःख ठावे "

किल्लेदार's picture

5 May 2025 - 5:04 pm | किल्लेदार

"काय म्हटलंय यापेक्षा कुणी म्हटलंय याला जगात जास्त महत्त्व आहे !!!"

याहून मोठे सत्यवचन कुठले असेल ?

कंजूस's picture

7 May 2025 - 4:27 pm | कंजूस

"आता माझी सटकली."
"अरे, तुझी केव्हा सटकत नाही?"

"श्री चामुंडराये करवियले, गंगाजे सुत्ताले करवियले"