Cricket Is a Gentleman's Game" असं नेहमी बोललं जातं... हे नाव सार्थ करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत आपल्या दि वॉल म्हणजेच राहुल द्रविडच नाव अग्रक्रमी ठेवावं लागेल. बघा ना १९९६-२०१३ अशी १७ वर्षांची प्रदीर्घ कारकीर्द आणि एकही controversy (वाद) नाही.. कोणीही कितीही टीका करुदेत राहुल मात्र नेहमी शांत असायचा. तो फक्त आणि फक्त बॅटनेच उत्तर द्यायचा..
संघ कोणत्याही संकटात असुदे.. मग ते संकट मैदानावरच असुदे अथवा मैदानाबाहेरच राहुल द्रविड संघासाठी नेहमी धावून यायचा... नेहमीचा सलामी फलंदाज जखमी असताना सलामीला कोण जाणार किंवा संघातील यष्टिरक्षक फलंदाज आऊट ऑफ फॉर्म आहे तर आयत्या वेळेस यष्टीरक्षण कोण करणार असे पेचप्रसंग जेव्हा जेव्हा निवडसमिती समोर उभे ठाकायचे तेव्हा डोळ्यासमोर एकच चेहरा यायचा.. तो म्हणजे राहुल द्रविड.. ज्या वेळी भारताची फलंदाजी ढेपाळायची किंवा एका भक्कम भागीदारीची गरज असायची तेव्हा तेव्हा तो भिंत बनून मैदानावर उभा राहायचा आणि भारताचा डाव सुस्तिथीत पोहोचवायचा, त्यामुळेच त्याला 'दि वॉल' आणि 'मिस्टर डीपेंडेबल' अशी ओळख मिळाली.
२००८ साली ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी सामन्यात त्याने चाळीस चेंडू खेळल्यानंतर पहिली धाव काढली होती, त्यावेळी प्रेक्षकांनी त्याला Standing Ovation दिलं होत. फक्त एक धाव काढल्यानंतर Standing Ovation मिळणारा राहुल द्रविड एकमेव क्रिकेटपटू असेल.
कारकिर्दीच्या सुरवातीला द्रविड वर कसोटी प्लेअर असा शिक्का बसला होता.. अनेकदा टीका पण झाली. अजूनही बऱ्याच लोकांच्या मनात द्रविडची प्रतिमा फक्त एक चांगला कसोटी खेळाडू अशीच आहे. एवढच काय तर १९९७-१९९८ च्या दरम्यान क्रिकेट मधील जाणकार मंडळी द्रविडचा जन्म वनडे क्रिकेट साठी झालेलाच नाही असं उघड बोलायचे. त्याला कारणही तसच होतं, वनडे कारकिर्दीच्या सुरवातीला द्रविड थोडा धीमाच खेळायचा. पण त्यांनतर द्रविड ने त्याच्या फलंदाजी तंत्रावर प्रचंड मेहनत घेतली आणि धावा काढण्याच्या गतीमध्ये सुधार केला. हाच द्रविड १९९९ च्या विश्वचषकातील सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज होता. याच राहुल द्रविडने पुढे जाऊन एकदिवसीय क्रिकेट मध्ये २२ चेंडूत अर्धशतक केले. तो एकच टी-२० सामना खेळला पण त्या सामन्यात त्याने सलग तीन षटकार मारले होते. कसोटी आणि वनडे अश्या क्रिकेट च्या दोन्ही प्रारूपात दहा हजार पेक्षा जास्त धावा काढणारे फक्त सात खेळाडू आहेत आणि त्या सातपैकी एक राहुल द्रविड आहे.
राहुल द्रविडने २५ कसोटी आणि ७९ एकदिवसीय सामन्यांत भारतीय संघाचे नेतृत्व सुद्धा केलं आहे. त्याच्या नेतृत्वाखाली खेळल्या गेलेल्या ७९ एकदिवसीय सामन्यांपैकी ४२ सामन्यांत भारत विजयी झाला आहे.
साऊथ आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू जैक कैलिस एकदा म्हणाला होता, “जर राहुल द्रविडचा जन्म भारताऐवजी दुसऱ्या देशात झाला असता तर त्याला सचिन तेंडूलकर पेक्षा जास्त प्रसिध्दी मिळाली असती." सचिन च्या प्रभावाखाली राहुल द्रविडचे भारतीय संघासाठीचे योगदान नेहमीच झाकोळले गेले... कसोटी क्रिकेट मध्ये १६४ सामन्यांत ५२.३१ च्या सरासरीने १३२८८ धावा, ३६ शतके आणि ५ द्विशतके...विक्रमी २१० झेल... ३४४ एकदिवसीय सामन्यांत ३९.१७ च्या सरासरीने १०८८९ धावा १२ शतके व ८३ अर्धशतके.. हीच कामगिरी त्याने दुसऱ्या देशासाठी केली असती तर तिथले क्रिकेट प्रेमी त्याला डोक्यावर घेऊन नाचले असते...आपण तरी काय करणार त्याच नशिबच इतकं बेकार होत की त्याने ज्या कालावधीत भारतासाठी हे योगदान दिले त्यावेळेस क्रिकेटचा देव पण त्याच संघाकडून खेळत होता.
कारकीर्दीच्या पहिल्या सामन्यापासून नेहमी त्याच्या वाट्याला साईड हिरोचीच भूमिका आली. त्याने कसोटी पदार्पणात क्रिकेट पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्डसवर ९५ धावा काढल्या पण दुर्दैवाने सौरव गांगुलीची पण ती डेब्यू (debut) मॅच होती आणि गांगुली ने त्या सामन्यात १३१ धावा केल्या... 2001 साली ऑस्ट्रेलिया विरुद्ध २ दिवस मैदानावर तग धरून त्याने ३५३ चेंडूत १८० धावा केल्या पण दुर्दैवाने त्याच सामन्यात व्ही. व्ही. एस लक्षमणने २८१ धावा काढल्या.. १९९९ च्या विश्वचषकात त्याने १२९ चेंडूत १४५ धावा काढल्या हीपण खेळी कुणाच्या लक्षात राहिली नाही कारण त्या सामन्यात गांगुलीने १८३ धावा काढल्या होत्या.
२०१३ मध्ये त्याने क्रिकेट मधून निवृत्ती घेतल्यानंतर तो प्रशिक्षक म्हणून पुन्हा मैदानात उतरला. २०१५ ते २०१९ या कालावधीत तो भारताच्या १९ वर्षाखालील आणि इंडिया A संघांचा प्रशिक्षक होता. त्याच्या मार्गदर्शनाखाली भारताने २०१८ चा अंडर -१९ विश्वचषक जिंकला. बेंगलोर स्थित नॅशनल क्रिकेट अकादमीचा प्रमुख म्हणूनही त्याची नियुक्ती केली गेली. रिषभ पंत, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, पृथ्वी शॉ, शुभमन गिल अश्या नव्या पिढीतील रत्नांना पैलू पडणारा कलाकार म्हणून राहुलच नाव घेतलं जातं. गतवर्षी राहुल द्रविडला भारताच्या मुख्य संघाचा प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले गेले. सध्याचा भक्कम संघ आणि राहुल द्रविड सारखा मार्गदर्शक यामुळे डिसेंबरला होणाऱ्या टी -२० विश्वचषक आणि पुढील वर्षी होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची विजेतेपदाची दावेदारी आणखी बळकट झाली आहे.
मला राहुल द्रविड आवडण्यापाठीमागचे मुख्य कारण म्हणजे त्याचे साधे राहणीमान... मुलांच्या शाळेत इतर पालकांसोबत रांगेत उभं राहणं, बेंगलोर च्या रस्त्यांवर रिक्षाने केलेला प्रवास, बंगळुरू विश्व विद्यालयाने दिलेली डॉक्टरेट नाकारणे या सगळ्या गोष्टी त्याला इतर क्रिकेटपटूंपासून वेगळ्या करतात. शतक झाल्यानंतर खास असं सेलिब्रेशन नाही की मीडिया मध्ये उथळ प्रतिक्रया नाही किंवा कुणावरही अनावश्यक टीका नाही. खेळाडू, प्रशिक्षक, सेलिब्रिटी या पलीकडे तो एक व्यक्ती म्हणून इतर खेळाडूंपेक्षा खूप वेगळा आहे आणि म्हणूनच तो अनेकांसाठी 'रोल मॉडेल' आहे.
काही प्रसिद्ध खेळाडूंनी राहुल द्रविड बद्दल काढलेले उदगार:
"If I have to put anyone to bat for my life, it'll be Kallis or Dravid" - Brian Lara
"All things going around is not called aggression. If you really want to see aggression, look into dravid's eyes." - Mathew Hyden
"When I am done with my profession. I wish I could go with the reputation that Rahul Dravid earned" - Harsha Bhogale
"Even though Sachin is great, I have always found Rahul more strong and hard to get out. " - shoaib Akhter
"Try to take his wicket in first fifteen minutes, if you can't then only try to get reamaning wickets."- Steve Waugh
"Sachin is God. Saurav is the God on off side. Laxman is the God of 4th innings. But when the doors of the temple are closed, even Gods are behind THE WALL."- A Fan
धन्यवाद ..!
७-८ महिन्यांपूर्वी मी महेंद्रसिंह धोनी बद्दल एक लेख लिहला होता तोपण नक्की वाचा. दुवा खाली देत आहे:
https://www.misalpav.com/node/49669
प्रतिक्रिया
4 Aug 2022 - 4:01 pm | श्रीगुरुजी
सुंदर लेख!
द्रविडला कधी सलामीला जावे लागले, कधी तिसऱ्या क्रमांकावर तर कधी पाचव्या क्रमांकावर. पण त्याने कधीही तक्रार न करता आपली जबाबदारी पार पाडली. पाकिस्तानमध्ये सेहवागबरोबर डावाची सुरूवात करायला लागली तेव्हा सलामीला दोघांनी विश्वविक्रमी ४१३ धावांची भागीदारी केली. ऑस्ट्रेलियाविरूद्ध नेहमीच्या तिसऱ्या क्रमांकाऐवजी पाचव्या क्रमांकावर पाठविल्यानंतर कोणतीही नाराजी न दर्शविता लक्ष्मणबरोबर संपूर्ण दिवस खेळून त्रिशतकी भागीदारी करून सामना जिंकण्यास प्रचंड योगदान दिले.
गरच पडली तेव्हा यष्टीरक्षकाचे काम केले. २००७ नंतर एकदिवसीय संघातून वगळल्यानंतर २००९ मध्ये पुन्हा एकदा एकदिवसीय संघात घेतल्यानंतर चांगली कामगिरी करूनही पुन्हा वगळल्यानंतर कोणतीही तक्रार केली नाही. २०११ मध्ये तर त्याला चक्क ट-२० सामन्यात घेतल्यावर १९ चेंडूत ३१ धावा अशी जोरदार फलंदाजी केली.
दुर्दैवाने त्याला योग्यतेपेक्षा फारच कमी श्रेय मिळाले. कसोटी सामन्यात २१० झेल हा जागतिक विक्रम आहे. कसोटी सामन्यात फलंदाजी करताना, सचिन फलंदाजीला यायची प्रेक्षक आतुरतेने वाट पहात आहेत, याच मानसिकतेमध्ये त्याला खेळावे लागत होते.
चंद्रशेखर, कुंबळे, प्रसन्ना, गुंडाप्पा विश्वनाथ अश्या अनेक सभ्य, वादात न पडणाऱ्या खेळाडूंची कर्नाटकची परंपरा आहे. राहुल द्रविड याच परंपरेतला मानकरी!
5 Aug 2022 - 3:18 pm | सुजित जाधव
धन्यवाद श्रीगुरुजी....
4 Aug 2022 - 6:08 pm | साहना
राहुल द्रविड ला unsung म्हणणे चुकीचे आहे. राहुल द्रविड हा भारताचा सर्वांत मोठा क्रिकेट स्टार आहे. सामने, प्रसिद्धी, मानधन इत्यादी प्रत्येक कसोटीवर द्रविड खूप वरच्या पायदानावर आहे. सचिन आणि धोनी नंतर जास्त कुणा प्लेयर बद्दल अनेकांनी मते व्यक्त केली असतील तर ती द्रविड बद्दल आहेत. मला क्रिकेट चे ज्ञान शून्य आहे पण मला सुद्धा द्रविड बद्दल बरीच माहिती आहे .
4 Aug 2022 - 6:09 pm | साहना
वासिम जाफर कदाचित खऱ्या अर्थाने unsung आहे बिचारा. लक्ष्मण, द्रविड ह्यांच्याच तोडीचा फलंदाज. पण बिचार्याला एकदा सुद्धा संधी मिळाली नाही.
5 Aug 2022 - 6:20 pm | कानडाऊ योगेशु
अमोल मुजुमदार हा अजुन एक. विनोद कांबळी आणि सचिन च्या समकालीनच त्याची कारकीर्द सुरु झाली होती. पण त्याला संधीच मिळु शकली नाही.
4 Aug 2022 - 8:04 pm | जेम्स वांड
राहुल द्रविड इज हिरो, but not unsung.
5 Aug 2022 - 9:42 am | श्वेता व्यास
राहुल द्रविड ऑल टाईम फेवरेट. त्याची कोल्ड्रिंकची जाहिरात यायची तीसुद्धा त्याच्या व्यक्तिमत्त्वाला साजेशी बनवावी लागली, यातूनच तो किती तत्त्वनिष्ठ असेल याचा अंदाज येतो. आताची त्याची CRED ची जाहिरात पण तशीच. तो नेहमी आपल्यातला एक वाटतो हेच त्याचं यश आहे.
5 Aug 2022 - 10:39 am | Bhakti
+१ शांत ,संयमी !खरच आपल्यातल्याच वाटतो .
छान लिहिले आहे.
5 Aug 2022 - 3:43 pm | सुजित जाधव
+१ ..
5 Aug 2022 - 11:25 am | सुजित जाधव
@साहना, @जेम्स वांड
राहुल द्रविडला unsung hero म्हटले आहे कारण क्रिकेटच्या दोन्ही प्रारुपात दहा हजार पेक्षा जास्त धावा, अनेक अविस्मरणीय विजयांत मोलाचे योगदान, कर्णधार व यष्टीरक्षक अशी अष्टपैलू कामगिरी असूनपण त्याला त्याच्या पिढीतील सचिन, सेहवाग, गांगुली, युवराज या खेळाडूंइतक प्रेम चाहत्यांकडून मिळाले नाही.. आपल्याला सचिनचे एकदिवसीय क्रिकेट मधील द्विशतक लक्षात आहे, त्याची ऑस्ट्रेलिया विरुद्धची २४१ धावांची खेळी लक्षात आहे, गांगुलीची १८३ धावांची खेळी, युवराजचे सहा षटकार लक्षात आहेत पण द्रविडच्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध १८०, इंग्लंडविरुद्ध ओवलवर ४६८ चेंडूत २१७ या खेळी खूपच कमी लोकांच्या समरणात आहेत. त्याच्या नेतृत्व गुणांची कधीच वाहवा झाली नाही.
तो नेहमी सचिनच्या सावलीखाली राहिला. तो निवृत्त झाल्यानंतर त्याची जास्त वाहवा केली गेली, आजही होते पण खेळत असताना त्याला तितकी प्रसिध्दी भेटली नाही जितकी तो Deserve करत होता. एकदिवसीय क्रिकेट मध्ये चांगले आकडे असूनपण त्याच्याकडे नेहमी कसोटी खेळाडू म्हणून पाहिले जाते.
२०११ मध्ये इंग्लंड विरुद्ध कसोटीत एकामागोमाग एक खेळाडू बाद होत असताना त्याने केलेल्या नाबाद १४६ धावांची खेळी किती चाहत्यांच्या स्मरणात आहे याबद्दल शंकाच आहे...
5 Aug 2022 - 2:58 pm | राघव
कदाचित खेळत असतांना द्रविड स्वतःच बॅकस्टेजला राहिला, किंबहुना तेच त्याला जास्त आवडत असावं. यामुळं त्यानंच स्वतः प्रसिद्धीचे बाईट्स दिले नाहीत तर आपोआपच तो झोतात राहणार नाही. अर्थात् त्याच्या खेळानुसार आणि कर्तुत्वानुसार त्याला जेवढी प्रसिद्धी माध्यमांनी स्वतःहून दिली नाही हे खरे.
आणि स्ट्रोक प्लेअर्स च्या जमान्यात कुणाचे नांगर टाकणार्याकडे लक्ष जात नाही. संरक्षक भिंतीचं महत्त्व ती असतांना गृहितच धरल्या जातं, नसल्यावरच लक्षात येतं. ही शोकांतिका नाही तर फॅक्ट ऑफ लाईफ आहे. महत्त्व सगळ्यांनाच पटतं, फक्त तिचा उदो-उदो [ कोण रे तो "उधो-उधो" म्हणतोय? ;-) ] होत नाही. टी२० च्या जमान्यात नांगर टाकणार्यांची कमतरता निर्माण झाल्यामुळे ही पोकळी अधिकच जाणवते. द्रविडसोबत सतत तुलना केल्यानंतर पुजारा एकदा वैतागून म्हणाला होता की "मी एवढंच करू शकतो, माझ्याकडे याहून जास्त चांगलं तंत्र नाही!" :-)
सद्यकाळात शुभमन गिल हा द्रविडची जागा घेऊ शकेल. हा मुलगा मस्त खेळतो. एकाच वेळेस त्याच्याकडे चांगला डिफेन्सही आहे आणि अटॅकही. सोबतच विकेटच्या दोन्ही बाजूंना सहज खेळण्याची कलाही आहे. जरा मैदानात जास्तवेळ टिकण्याची तयारी केली तर नक्कीच मोठा खेळाडू बनू शकेल.
5 Aug 2022 - 5:43 pm | तर्कवादी
मला क्रिकेटमधलं फारसं काही कळत नाही आणि क्रिकेट बघतही नाही पण तरीही द्रविड unsung hero होता/आहे हे पटत नाही.
प्रेम कसं मोजणार ?
अवांतर :
unsung म्हणजे (जवळपास) पुर्णतः दुर्लक्षित राहिलेला असा. क्रिक्रेटपेक्षा मला चित्रपटांत जास्त रस आहे म्हणून चित्रपटाचे उदाहरण देवू शकतो - माधूरीच्या समकालीन जूही, करिष्मा, रवीना, इत्यादी अनेक अभिनेत्री लोकप्रिय झाल्यात, पुढील काळात ऐश्वर्या, करीना , प्रियंका चोप्रा, कटरीना अगदी अलिकडे इलिना वगैरे नायिका बर्याच लोकप्रिय झाल्यात .. फार काय बिपाशा बसू , सुश्मिता सेन सारख्या नायिकांनाही लोकप्रियता लाभली.
पण खरेतर सहज कुणाच्याही मनात भरावी अशी सुंदर, गोड नायिका अमृता राव खूपशी दुर्लक्षितच राहिली. तिला unsung heroine म्हणता येईल. उगाच माधूरीच्या तुलनेत जूहीला चाहत्यांचं प्रेम कमी लाभलं, म्हणून जूही unsung राहिली असे म्हणण्यात अर्थ नाही.
5 Aug 2022 - 6:28 pm | कानडाऊ योगेशु
येस्स. मै हु ना मधल्या तुमसे मिलके दिलका है जो हाल क्या कहे गाण्यातल्या नेमक्या बीट्स वर तिने केलेल्या कमरेच्या हालचाली दिलखेचक होत्या आणि काही क्षणांपुरते नेक्स्ट माधुरी असे वाटुन गेले होते. पण नंतर फार पुढे आली नाही. कदाचित काही जण बहुदा अल्पसंतुष्टी असावेत असे वाटते. ह्यावरुन एक टेनिस प्लेयर आठवला तो म्हणजे रिचर्ड क्रॅजिसेक. एका विम्बल्डन मध्ये त्याने सॅम्प्रास ला लिलया हरवले होते.त्याची त्याकाळात लागणारे हुकमी अस्त्र म्हण्जे सर्विस ही धारदार होती. त्याने त्याकाळचा नंबर १ प्लेयर स्म्प्रास ला २-३ वेळेला वेगवेगळ्या लढतीत हरवले होते पण तो ही पुढे नंतर काही दिसला नाही.
5 Aug 2022 - 11:40 am | कानडाऊ योगेशु
प्रसिध्दीचा निकष जर मिळणार्या जाहीराती,इथे तिथे होणारी चमकोगिरी असेल तर राहुल द्रविड चे व्यक्तिमत्व पाहता त्याने ह्या गोष्टींपासुन चार हात दूर राहणेच पसंत केले असावे असे वाटते. हीच गोष्ट पुलेला गोपीचंदची. शीतपेयाची जाहिरात करण्यास त्याने चक्क नकार दिला होता व वर ठासुन हे ही सांगितले होती कि असे एरिएटेड वॉटर हानिकारक आहे. बाकीचे प्रसिध्द खेळाडु हमखास ह्या व ह्यासारख्या तत्सम उत्पादनांचीच जाहीरात करत असतात.
त्याला अनसंग म्हणण्यापेक्षा चारित्र्यवान म्हणणे जास्त योग्य ठरेल.
5 Aug 2022 - 12:08 pm | चावटमेला
९९६-२०१३ अशी १७ वर्षांची प्रदीर्घ कारकीर्द आणि एकही controversy (वाद) नाही..
एकच वाद जो अजूनही द्रविडची पाठ सोडत नाहीये - मुलतान कसोटीत सचिन १९५ वर खेळत असताना डाव घोषित करणे. बाकी लेख आवडला, पण द्रविड हिरोच आहे, unsung नक्कीच नाही. द्रविड ला मिळलेल्या यशाचं श्रेय तत्कालीन संघ व्यवस्थापन आणि निवड समितीलाही थोडंफार द्यावं लागेल, कारण कारकीर्दीच्या सुरुवातीच्या सात एकदिवसीय सामन्यांमध्ये तो सपशेल अपयशी ठरला होता. त्याची सात सामन्यांमध्ये सर्वोच्च धावसंख्या ११ होती. पण स्वतंत्र कसोटी आणि एकदिवसीय संघ नसण्याच्या जमान्यात सुध्दा निवड समितीने त्याच्यावर विश्वास टाकून ९६ च्या इंग्लंड दौर्यासाठी त्याची निवड केली and rest is history
5 Aug 2022 - 2:25 pm | श्रीगुरुजी
अजून एक वाद २००१ मध्ये कलकत्ता कसोटीत झाला होता. द्रविडने मिडविकेटकडे मारलेला चेंडू मायकेल स्लॅटरने अगदी जमिनीलगत झेलला. परंतु पंचांना चेंडूने झेल घेण्यापूर्वी जमिनीला लागला नव्हता याची खात्री नव्हती. त्यामुळे पंचाने तिसऱ्या पंचाला खात्री करण्यास सांगितले. त्यामुळे स्लॅटरचा संताप अनावर झाला. आपण निर्दोष झेल घेतल्याघी त्याला खात्री होती. पण तरीही तृतीय पंच झेल तपासून पाहणार हे त्याला अजिबात आवडले नाही व त्याने रागारागाने बडबड सुरू केली. तेव्हा माईक नसल्याने तो काय बडबडत होता, शिव्या देत होता ते ऐकता आले नाही, पण त्याच्या चेहऱ्यावर संताप दिसत होता. काही वेळाने संथ गतीने झेल पाहताना चेंडू आधी जमिनीला स्पर्शल्याचे दिसल्याने तृतीय पंचाने द्रविड नाबाद असा निर्णय दिला. परंतु आपण अत्यंत निर्दोष झेल घेतल्याची स्लॅटरची खात्री होती. त्यामुळे तो संतापून द्रविडजवळ जाऊन त्याला रागारागाने बोलू लागला. शेवटी द्रविडचा संयम संपला. त्यानेही रागारागाने स्लॅटरला प्रत्युत्तर द्यायला सुरूवात केली. शेवटी लक्ष्मण व पंचांना येऊन भांडण सोडवावे लागले.
राजस्थानविरूद्ध एका आयपीएल सामन्यात राजस्थानची प्रथम फलंदाजी होती. पाठलाग करताना काही विशिष्ट षटकांतच (बहुतेक १३ षटकांत) मुंबईने सामना जिंकला तरच मुंबई अंतिम ४ संघात गेले असते. अन्यथा राजस्थान गेले असते. राजस्थानचा प्रशिक्षक द्रविड होता. १३ व्या षटकाचा दोन चेंडू शिल्लक असताना मुंबई ४ धावांनी मागे होते. ५ व्या चेंडूवर मुंबईचा फलंदाज बाद झाल्यावर मुंबईचा यष्टीरक्षक तारे खेळायला आला. त्याला नेमका लेगच्या बाजूला फुलटॉस चेंडू पडल्यावर त्याने षटकार मारला. ते पाहून द्रविड संतापून डोक्यावरची टोपी फेकून निघून गेला होता.
अजून एक प्रसंग २००१ मध्ये लंकेविरूद्धच्या एकदिवसीय सामन्यातील आहे. विजयासाठी शेवटच्या षटकांत ९ धावा हव्या होत्या व द्रविड खेळत होता. कुमार धर्मसेनाने अजिबात उंची न देता लेगस्टंपवर चेंडू टाकल्याने द्रविडला धावा घेता येत नव्हत्या. त्या षटकांत फक्त ३ धावा निघून भारत हरला. तेव्हा द्रविडने रागारागाने बॅट आपटली होती.
5 Aug 2022 - 3:04 pm | राघव
मैदानात ऑस्ट्रेलियन खेळाडू हे माजोरड्या तोंडानंच जास्त खेळतात. त्यामुळे अरे ला कारे म्हणणारे कुणी आले की यांच्या अंगाची लाही होते. तशी ती झालीच पाहिजे!
सचिन एकदा म्हणाला होता की "इतर कोणाही सोबत खेळत असतांना आऊट झालो तर पंचांच्या निर्णयाची वाट न बघता मी स्वत: निघून जाईन, पण पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया सोडून!"
5 Aug 2022 - 7:01 pm | बेकार तरुण
लेख आवडला... द्रविड अनसंग हिरो नसावा पण त्याला सचिन ईतके स्टारडम नाही मिळाले एवढेही नक्कीच खरे...
अनसंग हिरो खूप आहेत ईतर भारतीय क्रिकेटमधे... अमोल मुजुमदार, पद्माकर शिवलकर वगैरे...
---------------------------------------------------------------------------------------------
शेवटी द्रविडचा संयम संपला. त्यानेही रागारागाने स्लॅटरला प्रत्युत्तर द्यायला सुरूवात केली. शेवटी लक्ष्मण व पंचांना येऊन भांडण सोडवावे लागले. >>>
ह्याची बॅकग्राउंड अशी होती की.... दर सीरीज आधी कांगारू कप्तान समोरच्या टीमसमोर प्रस्ताव ठेवायचे (अन बर्याचदा मान्य करुन घ्यायचे) की क्षेत्ररक्षकाने झेल नीट घेतला की नाही ह्यात पंचांना शंका असेल तर ज्याने झेल घेतला आहे त्या क्षेत्ररक्षकाचे म्हणणे दोन्ही संघ ग्राह्य धरतील... त्या सीरीजमधे गांगुली (किंवा जो कोण कर्णधार असेल त्याने प्रस्ताव ऐकुन घेतला पण मान्य आहे/नाही यावर काहीच बोलला नाही)...
स्लॅटर हा अत्यंत नालायक ईसम द्रविडला सांगत होता की मी सांगत आहे की मी नीट झेल प़कडला आहे तर तु चालायला लाग... पण द्रविड अजिबात हलला नाही कारण त्याने नीट चेंडुचा टप्पा पडलेला पाहिला होता....
सचिन एकदा म्हणाला होता की "इतर कोणाही सोबत खेळत असतांना आऊट झालो तर पंचांच्या निर्णयाची वाट न बघता मी स्वत: निघून जाईन, पण पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया सोडून!">>> ९९% हे सचिन नाही तर सुनिल गावस्कर म्हणला होता... गावसकर बर्याच वेळा एज लागली असेल तर निर्णयासाठी न थांबता चालु लागायचा, अन डोस्के फिरले असेल तर पंचांच्या निर्णयाविरोधात सहकारी फलंदाजालाही वॉक आउट करायचा आग्रह करायचा ;)
चुक बरोबर जाउदे, पण सचिन फारसा चालु वगैरे लागायचा नाही, तोवर क्रिकेट खूप बदलले होते - संगक्कारा, गिलख्रिस्ट वगैरे १-२ च लोक्स स्वतःहुन चालायला लागायचे...
5 Aug 2022 - 8:04 pm | श्रीगुरुजी
९९% हे सचिन नाही तर सुनिल गावस्कर म्हणला होता...
१९७८ मध्ये पाकिस्तानातील तिसऱ्या कसोटी सामन्यात सुनीलने पहिल्या डावात १११ धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावात सुनील यष्टीरक्षकाकडे झेल देऊन बाद झाला होता. परंतु कोणी अपीलच केले नाही. सुनील सुद्धा शांतपणे पुढचा चेंडू खेळायला तयार झाला. नंतर त्याने १३७ धावा केल्या.
8 Aug 2022 - 11:25 am | बेकार तरुण
हो बरोबर गुरुजी... मला तेच म्हणायचे होते.. सुनील ईतर (संघाविरोधात) एज लागली असेल तर चालु लागायचा, पण पाकि अन कांगारू विरुद्ध नाही....
सचिन फारसा स्वतःहुन वगैरे जायचा नाही, एखाद दोन वेळा असेल कदाचित....
9 Aug 2022 - 3:51 pm | राघव
तसे असेलही कदाचित. माझी चूक सुधारल्याबद्दल धन्यवाद.
7 Aug 2022 - 4:07 pm | मित्रहो
छान लेख
खेळत असताना मला राहुल द्रविड खूप आवडला असे नाही आणि नाही आवडला असेही नाही. मला तो नेहमी मॅच सेव्हर वाटायचा मॅच विनर नाही. असे माझे मत होते.
त्याने कोच म्हणून जी कामगिरी केली ती मात्र भन्नाट आहे. भारताचा कोच म्हणून काय होईल ते कळेल पण India A सोबत त्याचे काम जबरदस्त होते. निवृत्तीनंतरही गांगुली, द्रवीड, कुंबळे ही मंडळी तितकीच मोलाची कामगिरी करीत आहेत.
14 Jan 2024 - 10:36 pm | सुजित जाधव
14 Jan 2024 - 11:01 pm | सुजित जाधव
15 Jan 2024 - 10:48 am | अमरेंद्र बाहुबली
राहूल द्रविड कधीहा चांगला खेळाडू नव्हता. वनडेत सेहवाग वगैरेंनी चांगल्या रनरेटने केलेली ओपनींग हा ३ नंबरला येऊन टीचूक टीचूक खेळून एवरेजच्या ही खाली आणायचा. नंतर २०-३० रन करून नी त्याच्या दुप्पट बाॅल खाऊन आऊट व्हायचा नी चांगल्या मॅचची वाट लावायचा. कुठे ते ओस्ट्रेलीयन खेळाडू नी कुठे हे असले दळभद्री खेळाडू, मी निवड समीतीचा अध्यक्ष असतो तर राहूल द्रविडला सर्वात आधी हकलला असता.
15 Jan 2024 - 6:30 pm | असा मी असामी
"म्हणजे आपण कोण आहोत, आपला शैक्षणिक दर्जा काय, एकूण कर्तृत्त्व काय, याचा अजिबात विचार न करता मत ठोकून द्यायचं"
15 Jan 2024 - 6:32 pm | अमरेंद्र बाहुबली
माझ्या बद्दल काय माहीत आहे तुम्हाला??? अभ्यासोनी प्रकटावे. ऊचलली जाभ लावली टाळ्याला असं करू नये.
15 Jan 2024 - 11:02 pm | सुजित जाधव
कधीतरी कोणत्यातरी विषयावर सकारात्मक प्रतिसाद देत जा राव.. सगळ्यांपेक्षा एकदम वेगळं मत मांडलं तर आपल्याला लोक attention देतील किंवा आपण इतरांपेक्षा वेगळं दिसू असं काही समजत असाल तर तुमचा तो अंदाज एकदम चुकीचा आहे...
हो.. आणि तुम्हाला वाटतच असेल ना तुमचं मत बरोबर आहे तर पुरावे व आकडेवारीच्या माध्यमातून पटवून द्या..अभ्यासोनी प्रकटावे असं तुम्हीच बोललात ना वरती.. मग बघुयात तुमचा अभ्यास..
16 Jan 2024 - 12:39 am | अमरेंद्र बाहुबली
सगळीकडेच गोड गोड गुळगुळीत / खोटं खोटं बोललंच पाहीजे असं काही नाहीये, माणसाने परखड रहावं, जे आहे ते सांगावं. चांगलं असेल तर चांगलं म्हणावं की. अनेक आवडलेल्य् धाग्याना आवर्जून दाद दिलीय. आता हा मोठा शाॅट न खेळू शकनारा. आला बाॅल की कर प्लेट नी कर टाईमपास छाप कुचकामी खेळाडूला तुम्ही वाॅल बील म्हणत असाल तर ते तुमच्याचकडे असूदे.
16 Jan 2024 - 7:50 am | सुजित जाधव
नुसतं फेकतच बसणार आहात की तुमचे मत पटवून देण्यासाठी काही दाखले किंवा आकडेवारी देणार आहात..
बाहुबली साहेब, आतापर्यंत तुमचे जितके प्रतिसाद वाचलेत ते सगळे नकारात्मक किंवा विरोधाचे सुर काढणारेच होते.. आणि तुमची ही मते पटवून देता येत नसतील तर शांत बसा, उगाच काहीही फेकत नका बसू....
16 Jan 2024 - 8:49 am | अमरेंद्र बाहुबली
स्ट्राईकरेट वगैरे पहा. ह्यावर वादविवाद होऊ शकतो, पण मा जितक्या वनडे मॅचेस पाहील्यात त्यात द्रविडने तिसर्या नंबर वर येऊन घाणचं केल्याचं दिसलंय.
16 Jan 2024 - 10:10 am | धनावडे
https://www.cricbuzz.com/profiles/27/rahul-dravid
७२ चा strike rate आहॆ. ज्या काळात द्रविड खेळालाय त्यानुसार हा strike rate उत्तमच आहे .
16 Jan 2024 - 11:02 am | अदित्य सिंग
अबा - तुमच्या मताचा आदर आहेच...
पण तुम्ही जितक्या वन डे पाहिल्या त्यावर मत बनवले आहे... त्यातील काही सांगु शकाल का? कारण माझ्या मते द्रविड कायमच संघाने जो रोल सांगितला तसे खेळला आहे... सचिन ईतकी नैसर्गिक गुणवत्ता अन सेहवागला पूर्ण करीयर लाभलेले फ्री लायसन्स अन दादाईतकी टायमिंगची देणगी नसतानाही द्रविडने आपले स्थान नक्कीच निश्चित केले होते एकदिवसीय संघात... फक्त स्थान नाही तर १०,०००+ धावा करणार्या अ त्यंत कमी फलंदाजांपैकी एक आहे...
तर एकूण तुमचे मत कोणत्या सामन्यांमुळे बनले आहे ते जाणुन घ्यायला नक्कीच आवडेल...
कसोटी सामन्यात तर द्रविड भारतातील (सचिनमागे) सर्वोत्तम खेळाडु होता त्या संघातील.. अन तेही बरेच वर्षे.. फक्त २/४ वर्षे नाही...
बा द वे... स्ट्राईक रेट एकदिवसीय सामन्यातील --
द्रविड - ७१.२३
गांगुली - ७३.७