मी जन्मल्यापासूनच सुर्यवंशी होतो. मला जेव्हा शाळेत पाठवण्यात आलं तेव्हा मी ७.०० च्या शाळेला ७.३० वाजता पोहोचायचो. आईला जवळपास दररोजच शिक्षकांचा ओरडा खायला लागायचा. अर्थात दुपारी घरी गेल्यावर त्याबदल्यात माझी यशाशक्ती षोडोपचारे पुजा व्हायची तो भाग वेगळा. पण म्हणून मी उतलो नाही, मातलो नाही, घेतला वसा टाकला नाही. नंतर नंतर आई मला शाळेपासून अर्धा किलोमीटर लांबूनच सोडून द्यायची आणि आता एकटा जा म्हणायची. शेवटी शेवटी वैतागून वडीलांनी माझी शाळा बदलायचा निर्णय घेतला आणि चौथ्या इयत्तेत माझी रवानगी नवीन शाळेत झाली.
नवीन शाळेचे नाव'लोकमान्य टिळक' होते आणि ती नावाप्रमाणेच काही बाबतीत सुधारणावादी होती. मुख्य मुद्दा म्हणजे शाळा दुपारची होती आणि त्यामुळे तिथे वेळेवर पोहोचता यायचे.
त्याकाळी मुलांच्या शाळा / मुलींच्या शाळा वेगवेगळ्या तरी असत किंवा एकत्र शाळा असली तरी मुलींची बसायची बाके वेगवेगळी असत. एवढेच नव्हे तर मुलींच्या आणि मुलांच्या बाकांच्या रांगा देखील वेगवेगळ्या असत. एखादा नाठाळ विद्यार्थी ऐकत नसेल तर तुला मुलींच्या रांगेत बसवतो इतके बोलले तरी तो गपगुमान सरळ व्हायचा.
अशा काळात जेव्हा मी 'लोटि' (माननिय लोकमान्य टिळक विद्यालय) मधे प्रवेश घेतला ती शाळा काळाच्या बरीच पुढे होती. तिथे चक्क एका बाकावर एक मुलगा दोन मुली किंवा दोन मुले एक मुलगी अशी बसण्याची व्यवस्था असायची.
शाळेच्या पहिल्याच दिवशीच शिक्षिकेने मला माधुरी ज्या बाकावर बसली होती तिथे बसायला सांगीतले. मला पहिल्याच दिवशी शिक्षा का दिली हे कळाले नाही. कदाचित मी अगोदरच्या शाळेत उशीरा जात होतो हे यांना कळाले की काय असे मला वाटून गेले. मला फार अवघडायला झाले पण माधुरी ने हसुन माझ्याकडे पाहताच माझा गोंधळ एका क्षणात संपला. तिच्यासाठी मी आता रोज शाळेत वेळेवर जाणार होतो. मी अगदीच हुशार नसलो तरी पहिल्या ५-१० मुलांमधे यायचो त्यामुळे अजून अभ्यास करुन माधुरीला इंम्प्रेस करायचे असे मी त्याच दिवशी नक्की केले.
मी आता शाळेत बर्यापैकी रुळलो होतो. माझ्याकडे सभाधीटपणा असल्यामुळे १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला सगळ्या शाळेसमोर प्रतिज्ञा म्हणायची कामगिरी मला मिळाली. मी प्रतिज्ञेची एक ओळ म्हणायचो आणि मागे मागे शिक्षकवृंद, मुख्याध्यापक आणि प्रमुख पाहुणे प्रतिज्ञा म्हणायचे. एवढे सगळे आपल्याला फॉलो करतात हे पाहूनच माझा उर भरुन येत असे. एकदा माझा उर इतका अभिमानाने भरुन आला की मी चक्क चुकीची प्रतिज्ञा म्हटली आणि आख्या शाळेने माझ्या मागोमाग चुकीची प्रतिज्ञा कोणताही अनमान न करता प्रेमाने म्हटली. नंतर मला त्याचे फळ देखील मिळाले पण मी कर्मफलाची चिंता न करणारा प्राणी होतो त्यामुळे ते विशेष मनावर घेतले नाही.
चौथीच्या वर्गाचे काही महिने संपताच वार्षिक स्नेहसंमेलनाची चाहूल लागली. कोणी गाणे म्हणणार होते तर कोणी नाच करणार होते. माझे नृत्याचे ज्ञान अगाध असल्यामुळे आणि मी दिसायला ऋषी कपूर पेक्षा शक्ती कपूर जास्त असल्यामुळे मला नृत्य गायन कला दाखवायची संधी मिळाली नाही . माधुरी ला मात्र चक्क 'डफलीवाले' गाण्यावर नृत्य करण्याची संधी मिळाली होती. त्या दिवशी ती गाण्यावर इतकी सुंदर नाचली की विचारु नका. मेकअप मुळे ती इतकी सुंदर दिसत होती की मी पुन्हा नव्याने तिच्या प्रेमात पडलो.
आता हिच्याशीच लग्न करायचे असे (मनातल्या मनातच) ठरवूनच टाकले. मात्र एके दिवशी तिने मला एकदा सांगीतले की तिने काल डुकराचे मटण खाले आणि ते खुप चविष्ट होते. मी शाकाहारी असल्यामुळे आणी समजा लग्न झाले तर चुंबन न घेता संसार करणे शक्य आहे का हे न कळाल्यामुळे तिच्याशी लग्न करायचा बेत (मनातल्या मनातच) रद्द करुन टाकला. :)
१ ली ते ४ थी दुपारी भरणारी शाळा पाचवी पासून परत सकाळची झाली आणि माझे परत मागचे पाढे पंचावन्न चालू झाले. आता माझी पहिली शाळा दुपारची झाली होती त्यामुळे माझ्या पालकांनी माझी रवानगी परत पहिल्या शाळेत केली. एकंदरीत माधुरी पर्व फारच लवकर संपले. मला शाळा बदलताना माधुरी च्या विरहाने थोडे दु:ख झाले पण एकंदरीत 'उसके नसीब मे मै था नही !'अशी मनाची समजूत घालून आणि आमिर खान महाराजांनी सांगीतल्याप्रमाणे बस, ट्रेन और लडकी ले पिछे दौडना नही, एक गयी तो दुसरी आती है हे वचन याद करुन मी पुन्हा मार्गस्थ झालो.
मात्र आजही डफलीवाले गाणे ऐकले तर मला माधुरी ची आणि डुकराची याद आल्याशिवाय राहत नाही.
प्रतिक्रिया
17 Jun 2023 - 11:20 pm | सुखी
छान खुसखुशीत लिहिलंय
17 Jun 2023 - 11:32 pm | श्रीगुरुजी
मस्त लिहिलंय. थोडक्यात आटोपण्याऐवजी अजून खुलवायला हवे होते.
19 Jun 2023 - 8:34 am | प्राची अश्विनी
+१११
18 Jun 2023 - 7:14 am | Bhakti
भारीच!
18 Jun 2023 - 7:42 pm | प्रचेतस
छान लिहिताय, सातत्य ठेवा, लिहित राहा.
19 Jun 2023 - 9:51 am | गवि
रीलेट करण्यासारखी कथा. आवडली. चौथी पाचवीत देखील असे शुद्ध स्वच्छ संसारी विचार मनात येणारे आपण एकटेच नव्हतो हे कळून बरे वाटले. माधुरी हे नाव प्रातिनिधिक आहे. तिथे अन्य नावे घालून प्रत्येकाची स्टोरी बरीचशी याच्याशी मॅच होईल असे वाटते.
अर्थात आमच्या शाळेतल्या अशा माधुरीकडे उत्तम चविष्ट डुकराचे मटण बनते हे कळल्यावर अधिकच आकर्षण उत्पन्न झाले असते असे म्हणता येईल. आमच्या कोंकणात डुकराचे मटण म्हणजे मुख्यत: शिकार करून आणलेल्या रानडुकराचे असणार हे अध्याहृत असे. पिग फार्म किंवा पोल्ट्री पिग्स तेव्हा तिथे अस्तित्वात नव्हती आणि रस्त्यातले डुकर पकडून मटण करणे हे शक्यतो होत नसे. मुळात गावठी डुकरे दिसायचीच नाहीत. आता या सर्व पार्श्वभूमीवर माधुरीचे बाबा शिकारी असण्याची आणि त्यामुळे त्यांजकडे बंदूक असण्याची काहीशी जोखीमयुक्त शक्यता गृहीत धरून पावले उचलावी लागली असती. तर ते एक असो.
19 Jun 2023 - 1:50 pm | श्रीगणेशा
+१
किंबहुना, "मेरा नाम जोकर" चित्रपट कथेप्रमाणे, आयुष्य पुढे सरकतं, तसं नावे बदलत जातात :-)
19 Jun 2023 - 1:53 pm | प्रचेतस
आता ती काय करते?
19 Jun 2023 - 2:09 pm | गवि
तुझ्या मेल्या नस्त्या चवकषाच फार. काही गणित, अभ्यास वगैरे नाही वाटते आज?
19 Jun 2023 - 2:14 pm | प्रचेतस
हल्ली जरा रात्र रात्र चालणारी गणितं सोडवणं, काव्यशास्त्रविनोद अंमळ कमी झालेत.
19 Jun 2023 - 2:18 pm | गवि
म्हणजेच पूर्वी अति करत असावेत असे दिसते. सुटली का मग काही गणिते? की रात्रभर नुसते प्रयत्नच?
19 Jun 2023 - 2:19 pm | प्रचेतस
काही गणिते गहन असतात, सुटता सुटत नाहीत, मग पहाट होते :)
19 Jun 2023 - 2:23 pm | गवि
हं. पोचल्या भावना. तसेही तुम्ही रँग्लर आहातच. अनुभवी अन जुणे जाणते.
बाकी तुम्ही इथे असे अवांतर करताना पाहून एक मिपाकर म्हणून शरम वाटली.
19 Jun 2023 - 2:26 pm | प्रचेतस
अहो मी तर धाग्याच्या अनुषंगाने 'आता ती काय करते' इतकाच साधा प्रश्न विचारला होता, तुम्ही मात्र खुबीने त्याचे उत्तर टाळून अवांतर सुरु केलंत हे चाणाक्ष मिपाकरांच्या लक्षात आलंच असेल :)
19 Jun 2023 - 2:25 pm | खेडूत
असेच स्वकष्टाने गणितं सोडव, गाईड नको हो वापरुस श्याम!
-(माने गुरुजी)
19 Jun 2023 - 1:45 pm | श्रीगणेशा
छान लिहिलंय!
पण कथा आटोपती घेतली असं वाटलं.
19 Jun 2023 - 2:25 pm | राजेंद्र मेहेंदळे
तुमची पण माधुरी का? मस्त चालली होती कथा. डुकराने मात्र घोळ केला, पण जाउदे.
रच्याकने--नव्या शाळेत पुढे काय झाले ते पण लिहा की.
19 Jun 2023 - 4:53 pm | कर्नलतपस्वी
माधुरीची शाळा वेगळी असायची. घरात,गल्लीत मुच्छड बाप,आजोबाचा पहारा असायचा.परत सातच्या आत आई बरोबर घरात.
आता मात्र सर्व पहारेकरी निजधामास गेले ,आत्मज्ञानी झाली म्हणून खुप टिवटिवते. लहानपणीची कसर निघून गेली.
आता बिनधास्त कावळा शिवेल.
बाकी स्मरण रंजन भारी.
19 Jun 2023 - 4:58 pm | कर्नलतपस्वी
अर्धोन्मीलित शृंगारिक स्मरण रंजन वाचले की कविवर्य वसंत बापट यांची जिना ही कवीता आठवते.
कळले आता घराघरातुन
नागमोडिचा जिना कशाला
एक लाडके नाव ठेवुनी
हळूच जवळी ओढायाला
जिना असावा अरूंद थोडा
चढण असावी अंमळ अवघड कळूनही नच जिथे कळावी अंधारातिल अधीर धडधड
मूक असाव्या सर्व पाय-या
कठडाही सोशिक असावा
अंगलगीच्या आधारास्तव
चुकून कोठे पाय फसावा
वळणावरती बळजोरीची
वसुली अपुली दयावी घ्यावी
मात्र छतातच सोय पाहुनी चुकचुकणारी पाल असावी
जिना असावा असाच अंधा
कधी न कळावी त्याला चोरी
जिना असावा मित्र इमानी
कधी न करावी चहाडखोरी
मी तर म्हणतो स्वर्गाच्याही सोपानाला वळण असावे पृथ्वीवरल्या आठवणींनी
वळणा वळणावरती हसावे
22 Jun 2023 - 11:38 pm | रंगीला रतन
जाम भारी लिहिलय
14 Jul 2023 - 4:02 pm | अनिल हटेला
आवडली ष्टोरी...
:)