मी जन्मल्यापासूनच सुर्यवंशी होतो. मला जेव्हा शाळेत पाठवण्यात आलं तेव्हा मी ७.०० च्या शाळेला ७.३० वाजता पोहोचायचो. आईला जवळपास दररोजच शिक्षकांचा ओरडा खायला लागायचा. अर्थात दुपारी घरी गेल्यावर त्याबदल्यात माझी यशाशक्ती षोडोपचारे पुजा व्हायची तो भाग वेगळा. पण म्हणून मी उतलो नाही, मातलो नाही, घेतला वसा टाकला नाही. नंतर नंतर आई मला शाळेपासून अर्धा किलोमीटर लांबूनच सोडून द्यायची आणि आता एकटा जा म्हणायची. शेवटी शेवटी वैतागून वडीलांनी माझी शाळा बदलायचा निर्णय घेतला आणि चौथ्या इयत्तेत माझी रवानगी नवीन शाळेत झाली.
नवीन शाळेचे नाव'लोकमान्य टिळक' होते आणि ती नावाप्रमाणेच काही बाबतीत सुधारणावादी होती. मुख्य मुद्दा म्हणजे शाळा दुपारची होती आणि त्यामुळे तिथे वेळेवर पोहोचता यायचे.
त्याकाळी मुलांच्या शाळा / मुलींच्या शाळा वेगवेगळ्या तरी असत किंवा एकत्र शाळा असली तरी मुलींची बसायची बाके वेगवेगळी असत. एवढेच नव्हे तर मुलींच्या आणि मुलांच्या बाकांच्या रांगा देखील वेगवेगळ्या असत. एखादा नाठाळ विद्यार्थी ऐकत नसेल तर तुला मुलींच्या रांगेत बसवतो इतके बोलले तरी तो गपगुमान सरळ व्हायचा.
अशा काळात जेव्हा मी 'लोटि' (माननिय लोकमान्य टिळक विद्यालय) मधे प्रवेश घेतला ती शाळा काळाच्या बरीच पुढे होती. तिथे चक्क एका बाकावर एक मुलगा दोन मुली किंवा दोन मुले एक मुलगी अशी बसण्याची व्यवस्था असायची.
शाळेच्या पहिल्याच दिवशीच शिक्षिकेने मला माधुरी ज्या बाकावर बसली होती तिथे बसायला सांगीतले. मला पहिल्याच दिवशी शिक्षा का दिली हे कळाले नाही. कदाचित मी अगोदरच्या शाळेत उशीरा जात होतो हे यांना कळाले की काय असे मला वाटून गेले. मला फार अवघडायला झाले पण माधुरी ने हसुन माझ्याकडे पाहताच माझा गोंधळ एका क्षणात संपला. तिच्यासाठी मी आता रोज शाळेत वेळेवर जाणार होतो. मी अगदीच हुशार नसलो तरी पहिल्या ५-१० मुलांमधे यायचो त्यामुळे अजून अभ्यास करुन माधुरीला इंम्प्रेस करायचे असे मी त्याच दिवशी नक्की केले.
मी आता शाळेत बर्यापैकी रुळलो होतो. माझ्याकडे सभाधीटपणा असल्यामुळे १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला सगळ्या शाळेसमोर प्रतिज्ञा म्हणायची कामगिरी मला मिळाली. मी प्रतिज्ञेची एक ओळ म्हणायचो आणि मागे मागे शिक्षकवृंद, मुख्याध्यापक आणि प्रमुख पाहुणे प्रतिज्ञा म्हणायचे. एवढे सगळे आपल्याला फॉलो करतात हे पाहूनच माझा उर भरुन येत असे. एकदा माझा उर इतका अभिमानाने भरुन आला की मी चक्क चुकीची प्रतिज्ञा म्हटली आणि आख्या शाळेने माझ्या मागोमाग चुकीची प्रतिज्ञा कोणताही अनमान न करता प्रेमाने म्हटली. नंतर मला त्याचे फळ देखील मिळाले पण मी कर्मफलाची चिंता न करणारा प्राणी होतो त्यामुळे ते विशेष मनावर घेतले नाही.
चौथीच्या वर्गाचे काही महिने संपताच वार्षिक स्नेहसंमेलनाची चाहूल लागली. कोणी गाणे म्हणणार होते तर कोणी नाच करणार होते. माझे नृत्याचे ज्ञान अगाध असल्यामुळे आणि मी दिसायला ऋषी कपूर पेक्षा शक्ती कपूर जास्त असल्यामुळे मला नृत्य गायन कला दाखवायची संधी मिळाली नाही . माधुरी ला मात्र चक्क 'डफलीवाले' गाण्यावर नृत्य करण्याची संधी मिळाली होती. त्या दिवशी ती गाण्यावर इतकी सुंदर नाचली की विचारु नका. मेकअप मुळे ती इतकी सुंदर दिसत होती की मी पुन्हा नव्याने तिच्या प्रेमात पडलो.
आता हिच्याशीच लग्न करायचे असे (मनातल्या मनातच) ठरवूनच टाकले. मात्र एके दिवशी तिने मला एकदा सांगीतले की तिने काल डुकराचे मटण खाले आणि ते खुप चविष्ट होते. मी शाकाहारी असल्यामुळे आणी समजा लग्न झाले तर चुंबन न घेता संसार करणे शक्य आहे का हे न कळाल्यामुळे तिच्याशी लग्न करायचा बेत (मनातल्या मनातच) रद्द करुन टाकला. :)
१ ली ते ४ थी दुपारी भरणारी शाळा पाचवी पासून परत सकाळची झाली आणि माझे परत मागचे पाढे पंचावन्न चालू झाले. आता माझी पहिली शाळा दुपारची झाली होती त्यामुळे माझ्या पालकांनी माझी रवानगी परत पहिल्या शाळेत केली. एकंदरीत माधुरी पर्व फारच लवकर संपले. मला शाळा बदलताना माधुरी च्या विरहाने थोडे दु:ख झाले पण एकंदरीत 'उसके नसीब मे मै था नही !'अशी मनाची समजूत घालून आणि आमिर खान महाराजांनी सांगीतल्याप्रमाणे बस, ट्रेन और लडकी ले पिछे दौडना नही, एक गयी तो दुसरी आती है हे वचन याद करुन मी पुन्हा मार्गस्थ झालो.
मात्र आजही डफलीवाले गाणे ऐकले तर मला माधुरी ची आणि डुकराची याद आल्याशिवाय राहत नाही.
वाचने
5468
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान खुसखुशीत लिहिलंय
मस्त लिहिलंय. थोडक्यात
+१११
In reply to मस्त लिहिलंय. थोडक्यात by श्रीगुरुजी
भारीच!
छान लिहिताय, सातत्य ठेवा,
रीलेट करण्यासारखी कथा. आवडली
माधुरी हे नाव प्रातिनिधिक आहे
In reply to रीलेट करण्यासारखी कथा. आवडली by गवि
आता ती काय करते?
In reply to रीलेट करण्यासारखी कथा. आवडली by गवि
तुझ्या मेल्या नस्त्या चवकषाच
In reply to आता ती काय करते? by प्रचेतस
हल्ली जरा रात्र रात्र चालणारी
In reply to तुझ्या मेल्या नस्त्या चवकषाच by गवि
म्हणजेच पूर्वी अति करत असावेत
In reply to हल्ली जरा रात्र रात्र चालणारी by प्रचेतस
काही गणिते गहन असतात, सुटता
In reply to म्हणजेच पूर्वी अति करत असावेत by गवि
हं. पोचल्या भावना. तसेही
In reply to काही गणिते गहन असतात, सुटता by प्रचेतस
अहो मी तर धाग्याच्या
In reply to हं. पोचल्या भावना. तसेही by गवि
असेच स्वकष्टाने गणितं सोडव,
In reply to काही गणिते गहन असतात, सुटता by प्रचेतस
छान लिहिलंय!
अरे वा!!
आमच्या वेळेस...
असे..
जाम भारी लिहिलय
आवडली ष्टोरी... :)