'काव्यप्रेमी' कायप्पा घोळका विडंबन.

निओ's picture
निओ in जे न देखे रवी...
26 Feb 2023 - 4:29 pm

कायप्पा वर कोणीतरी कवितेविषयी एका घोळक्यात मला ओढून घेतलं. असुदे काय घडतं ते पाहू म्हटलं. तर तिथे अनुभवलेल्या सदस्यांच्या काही गंमती जमती, तिथल्या सर्व मान्यवरांची माफी मागून सादर करत आहे. हि सगळी मंडळी हाडाचे कवी आहेत कारण एकमेकांच्या चारोळीला, कवितेला अजिबात दाद ना देण्याचे व्यवच्छेदक लक्षण या सर्व मान्यवरांना लागू पडतं.
एक ताई आहेत, चारोळी चं सदर चालवतात. त्याचं शीर्षक 'संस्कार शिदोरी'. या ताई सकाळी सकाळी किमान सहा वाजताच आपली शिदोरी उघडून घोळक्यातील मेम्बरांवर की मेंढरांवर उपदेशांचा मारा करतात. चारोळी असते, तिला क्रमांक व शीर्षक असते. आजचा क्रमांक 'पुष्प -३३८, मी मराठी ' वेळ पहाटे ४:५०. आशय साधारण जीवन, संघर्ष, आनंद, यश, माणुसकी, सत्य वगैरे असा असतो. चारोळी, चार ओळी सहज वाचाव्यात अशी वाचली जाते त्यातून काही उमगले, गवसले असं काही वाटत नाही. शेवटी काहीतरी उपदेशच असतो त्यामुळे काही वाचले न वाचले फारसा फरक पडत नसतो.
.
त्यानंतर एक महाशय आपली 'शब्द सुतोळी' पेटवतात. गंमत यांच्या नावापासूनच चालू होते. कवी सुभद्रासुत आंधळे....आपण जे न देखे कवी ते देखे रवी म्हणतो तर इथे कवीच आंधळे म्हणजे काय बोलायचे. हे थोडे सुधारित म्हणजे चारोळी असलेली चित्र पाठवतात. वर सुतळीची गाठ असते. काही जणाला फास वाटेल, कर्म दरिद्रीच म्हणावे यांना. गाठीच्या एका गोलात दिनक्रम व दुसऱ्या गोलात क्रमांक. सध्या दिनक्रम -५४८. खाली copyright & registration ची खूण असते. वानगीदाखल आजचीच. चालू घडामोडीवर यांची चारोळी बेतलेली असते. यांना आजपर्यंत कोणी पसंती दिलेली माझ्यातरी पाहण्यात नाही. तरी पण बंडलातून रोज एक सुतळी सुटतेच .
.

यानंतर मग एक धगधगतं व्यक्तिमत्व आपला व्हिडिओ टाकतं. हे लिखित स्वरूपात क्वचित कविता टाकतं. कारण यांचा खरा आत्मा ती आपल्या खड्या आवाजात पेश करण्यात आहे. स्वतः च नाव बेधुन्दकार असं सांगतं. हे बऱयापैकी प्रसिध्द्ध पावलेले असावेत. कारण प्रत्येक व्हिडिओ मध्ये हे कुठल्यातरी स्टेजवर आपली ज्वलंत कविता सादर करीत असतात. स्टेजवरून कविता सादर करतात याचा अर्थ इतर चुरगळलेल्या कवींपेंक्षा कड्क आहेत. गळ्याभोवती कायम मफलर. मफलर, शबनम पिशवी अशी रूपकं पहिली कि गहिवरायाला होतं. असो. कवीचं आणि रूपाचं वाकडं असावं. रूपाची भरपाई आवाजात झालेली. जीव तोडून आवेशात बोलणार, माईक शिवाय शेवटच्या व्यक्तीपर्यंत आवाज जाणार. पुढच्यांनी कानात बोळे घालावेत. बेधुंदकार आपल्याच धुंदीत असतात. त्यांच्या एका कार्यक्रमाची जाहिरात त्यांनी टाकली होती. 'बेधंदुकार' असे छापलेले. काय म्हणायचे आहे ? खरंच बेधुंद झाले! कि काही धंदा नसलेले. हे इन्कलाब ची घोषणा देतात. काही अर्थ लागत नाही पण मनोरंजन जरूर होते. यांची शिवाजी महाराजांवरची कविता खरंच खूप चांगली होती.
.
त्यानंतर अजून एक ताई 'शब्दफुले' घेऊन येतात. हि सगळी रोजचा रतीब वाली मंडळी. कोणाला आवडू नावडू आपला रतीब चुकवायचा नाही. आमच्या सारख्यांचं घोळक्यात सामील झाल्याच्या पापाचं माप प्रत्येकाच्या पदरात घालतात.
आता एक चित्रकार जागे होतात. ग्रुप आहे काव्यप्रेमी. पण इथे ते आपली चित्रकला सादर करतात. थोरामोठ्यांची व्यक्तिचित्रे. सगळ्या बारकाव्यांसहित असतात. पण मुख्य तोंडातच मार खातात.
.
नंतर एक कवी आहेत. ते रतीब नाही पण अधून मधून आपली गझल पेश करतात. डोक्याला शॉट लागलेली एक गझल. तुम्हीपण आनंद घ्या, काही ओळी चांगल्या आहेत, काहींचा झाट काही पत्ता लागत नाही.
मरताना तुझियासाठी जन्माला सुंदर केले
मृत्यूला चुंबत चुंबत मरणाला सुंदर केले.

टाळून मला तू माझ्या राखेचे चुंबन घ्यावे
मी जळता जळता इतके सरणाला सुंदर केले.

घे त्याला ओवाळाया रक्ताची पणती माझ्या
मी जळताना प्रेमाच्या किरणाला सुंदर केले.

केलीस उपेक्षा माझी अश्रूंचा गंध फुलाला
मी रडता रडता तुझिया गजऱ्याला सुंदर केले.

मी एकांती रडताना तू डोळे पुसले नाही
कुत्र्याचे अश्रू पुसुनी कुत्र्याला सुंदर केले.

होतीस म्हणाली तू की “जखमेचा मोर करावा
फुलवून पिसारा मीही दुःखाला सुंदर केले.

माझ्या राखेचे चुंबन, रक्ताची पणती, अश्रूंचा गंध फुलाला आणि हि पूर्ण ओळ ‘कुत्र्याचे अश्रू पुसुनी कुत्र्याला सुंदर केले’... वेडा झालो हो मी.
तर असो मंडळी, कायप्पा ग्रुप वर चालायचेच. प्रत्येकाची आपआपली प्रतिभा असते, रोज काहीतरी लिहायचे या नादात काही सकस घडत नाही.

निओ

विडंबनविनोद

प्रतिक्रिया

:) हा लेख आधी ,फार पूर्वी वाचल्यासारखा वाटत़ोय.

'निर्मळ हास्य विनोद' या ग्रुप वर आधी पाठविला होता तुम्ही तेथे आहात काय ?

नाही आंजावर वाचलंय.यातले काही कवी पूर्वी वाचलेत त्यामुळे विडंबन समजलं :)

संध्यानंद किलर!

कंजूस's picture

18 Mar 2023 - 8:59 pm | कंजूस

मुक्तपीठ किलर!

यातली एकही कविता दिसत नाहीये.
काय करावे काही सुचत नाहीये
काय घालतात कविगण नित्याचा रतीब
बता दे तू मेरे दोस्त, मेरे रकीब.