गळ्याशपथ.

आजी's picture
आजी in जनातलं, मनातलं
7 Dec 2022 - 12:07 pm

जगात असा एकही माणूस नसेल की ज्यानं आयुष्यात कधी शपथ घेतली नाही. आपलं म्हणणं खरं असो वा खोटं ते निक्षून, ठासून सांगण्यासाठी लोक शपथ घेतात. कोर्टात धर्मग्रंथावर हात ठेवून शपथ घेतात आणि खरं किंवा खोटं बोलतात. काहीजण खोटी साक्ष देण्याचा पैसे घेऊन धंदाही करतात. प्रत्यक्षात गुन्हा घडताना पाहिल्याचं शपथेवर सांगतात.

माॅडर्न मुलं "शपथ" न म्हणता "आय स्वेयर"म्हणतील पण शपथ घेतीलच. तर खेडवळ माणूस "आईच्यान सांगतो" असं म्हणत शपथ घेईल.

लहानपणी आम्ही वर्गातल्या आणि खेळातल्या मुली खूप शपथा घ्यायचो. पहिली "गळ्याची शपथ". तीवर विश्वास बसला नाही तर "देवाची शपथ", मग "रक्ताची शपथ". माझी एक मैत्रीण तर सेफ्टी पिन बोटावर टोचून बोटातून रक्त काढायची आणि म्हणायची,"रक्ताची शपथ"नंतर त्या जखमेवर ग्राऊंडवर असलेली माती फासून ती जखम बरी करायची. मातीतल्या जंतू संसर्गाची भीती वगैरे काही नाही. तरीही विश्वास बसला नाही तर आईची शपथ आणि कडेलोट म्हणजे आईरक्ताची शपथ. आमच्या मूर्ख बुद्धीला आपण आपल्या आईला वेठीला धरतोय हेही लक्षात यायचं नाही. मग प्रतिपक्ष म्हणायचा "खोटी शपथ घेतली तर तो माणूस मरतो." तरीही आम्ही मागे हटायचो नाही. किंवा कुणी शपथ घातली आणि ती जुमानायची नसेल तर आम्ही म्हणायचो "शपथ गेली खड्यावर घालणाऱ्याच्या मढ्यावर".
मढं वगैरे शब्द वापरायला आम्हांला काहीही वाटायचं नाही.सगळंच लाईटली घेण्याचं वय होतं ते!

शपथ ही सिनेसंगीतातही असते. प्रियकर, प्रेयसी एकमेकांना शपथा घालतात. "तुला या फुलाची शपथ" असं सुधीर फडके म्हणून जातात,तर आशाताई "शपथ ह्या बोटांची, सुगंधित श्वासाची"असं म्हणतात. हिंदी सिनेमात "कस्मे वादे निभायेंगे हम"ही म्हणतात आणि "कस्मे वादे,प्यार,वफा सब बाते हैं,बातोंका क्या"असंही म्हणतात. कसम शब्दावरून हजारो गाणी आढळतील.

अनेक ऐतिहासिक शपथा आपल्याला माहीत आहेत. क्रांतिकारक देशासाठी बलिदान देण्याची शपथ घेतात. शिवाजी महाराजांची रोहिडेश्वराची शपथ प्रसिद्ध आहे. संभाजीराजांनी हाताची करंगळी कापून स्वराज्य हितरक्षणाची शपथ घेतली होती. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आणि मदनलाल धिंग्रा सारख्या अनेक क्रांतिकारकांनी दिव्याच्या पेटत्या ज्योतीवर तळहात धरुन "मरे मरेतो झुंजेन"अशी शपथ घेतली होती. बेचाळीसच्या चळवळीत बापूजींनी चले जाव अशी घोषणा करत,अनुयायांना शपथ दिली होती. क्रांतीसिंह नाना पाटील यांनी "करा वा मारा"अशी शपथ क्रांतीकारकांना दिली होती.

संसदसदस्य शपथ घेतात. न्यायाधीश शपथ घेतात. कोर्टात शपथ घेतात. डॉक्टर्स शपथ घेतात. पोलीस,एन.डी.ए.छात्र , सैनिक, सेनाधिकारी शपथ घेतात. शपथ माणसाला एक पवित्र बंधन घालते. कर्तव्याची जाणीव करून देते.

एवढंच कशाला लग्नातही वधूवरांना सप्तपदीच्या वेळी शपथ देतातच की! मी आणि माझा नवरा आमच्यातील प्रत्येक मतभेदाच्या वेळी ह्या शपथांची आठवण एकमेकांना गमतीने करून देत असू.

माझं लग्न झालं. मला मुलगा झाला. तो अगदी लहान असतानाच त्याच्या वडिलांचे छत्र हरपले. मोठा होत असताना तो लवकर समजूतदार झाला. मला काही होत असेल तर तो मला विचारायचा,"आई, तुला रात्री ताप होता का?"
मी "नाही"म्हणायची. तो विचारायचा,"मग तुझे डोळे असे का दिसताहेत?तू थकल्यासारखी वाटतेस. बघ, आत्ताही अंग गरम लागतंय".

त्याला काळजी वाटू नये म्हणून मी सरळ खोटं बोलायची. "अरे, मला काही होत नाहीये. मी ठणठणीत आहे. तुझा हात गार आहे म्हणून तुला उगीच माझं अंग गरम लागतंय.

"तो म्हणायचा,"शपथ घे.

"मी म्हणायची,"शपथ".

तो म्हणायचा,"माझी शपथ घे".
ती मी घ्यायची नाही. मग माझं पितळ उघडं पडायचं.
कारण त्याची खोटी शपथ मी घेणं शक्यच नव्हतं. मग तो माझ्या कुशीत शिरायचा. म्हणायचा,"आई, तुला काहीही होत असेल तर ते माझ्यापासून लपवू नकोस. तुला माझी शपथ."

आता तो खूपच मोठा झालाय. त्याचं लग्न आणि पोरेबाळे झाल्यावर आता आम्ही एकमेकांना शपथा वगैरे घालत नाही. आता मी माझ्या समस्या त्याच्यापासून लपवत नाही. प्रत्येक संकट झेलण्याएवढा तो प्रगल्भ झालाय.

शपथ घेऊन ती मोडल्याचे अनेक अनुभव आयुष्यात आले आणि शपथेवरचा विश्वासच उडाला. मला वाटतं की आपण नेहमी खरंच बोलत असू तर शपथ घेण्याची गरजच काय!

आता मी कधीच शपथ घेत नाही. "गळ्याशपथ" असं म्हणत नाही..

समाजप्रकटनविचार

प्रतिक्रिया

सौंदाळा's picture

7 Dec 2022 - 12:56 pm | सौंदाळा

भारीच बहुतांश शपथा अगदी रक्तबिक्त काढून मी पण घेतल्या आहेत.
शाळेत मुलामुलींच्या भांडणात तर जास्तच. किंवा बहिणींबरोबरच्या भांडणात. शक्यतो मुला-मुलांच्या भांडणात आम्हीतरी शपथा क्वचितच घ्यायचो.
आता मुलीबरोबर पक्का प्रॉमिस, गॉड प्रॉमिस असते.

सर टोबी's picture

7 Dec 2022 - 6:38 pm | सर टोबी

तुमच्यातलं लहान मुल अजून जसं न तसं आहे. त्यामुळे लिखाणात त्यावेळी असलेला निरागसपणा जसा न तसा ऊतरला आहे. मस्त अनुभव!

सरिता बांदेकर's picture

7 Dec 2022 - 8:52 pm | सरिता बांदेकर

छान लिहीलं आहे तुम्ही शप्पथ…..

'नियम हे मोडण्यासाठीच असतात' तसेच काहीसे शपथेच्या बाबतीतही असावे 😀
नेहमीप्रमाणेच छान लिहिलंय आजी... आवडले.

नचिकेत जवखेडकर's picture

8 Dec 2022 - 7:19 am | नचिकेत जवखेडकर

मस्त लेख आजी!
मला आठवतंय एका मॅच मध्ये सौरव गांगुली गोलंदाजी करत असताना पंचांनी एक अपील फेटाळून लावलं. तेव्हा तो पण गळ्यावर हात ठेवून पंचांशी हुज्जत घालत होता.म्हणजे आपण शपथ घेताना जसा हात ठेवतो तसा ठेवून :D

श्वेता व्यास's picture

8 Dec 2022 - 10:39 am | श्वेता व्यास

छान लिहिलं आहे. लहानपणी रक्त वगैरे काढलं नसलं तरी शपथ प्रकार एका ठराविक वयापर्यंत खरा वाटायचा, तरी अजूनही खोटी शपथ घ्यायला मन धजावत नाही.
आजकाल तर कागदोपत्री सख्ख्या नातेवाईकांची फसवणूक करण्याचा काळ आहे, शपथेवर विश्वास ठेवण्याचा जमाना गेला.

गेले कुठे निघून ते भाबडे दिवस, शपथा घेण्याचे अन त्यावर विश्वास ठेवण्याचे ...!
किती छानहोते पण...

आंबट गोड's picture

8 Dec 2022 - 12:08 pm | आंबट गोड

लिहीलं आहे! अगदी साधं-सरळ पण मनाला भिडणारं.
तुमचा मुलगा किती निरागस, प्रेमळ होता.... अजूनही असेल तसाच..!! त्याला अनेक शुभेच्छा!
मला वाटतं की आपण नेहमी खरंच बोलत असू तर शपथ घेण्याची गरजच काय!...हे अगदी पटले.
(पण समोरच्याला पटावे म्हणून तर शपथ घ्यायची ना!!... आपल्याला तर माहितीच असते आपण खरे बोलतोय ते! किंवा नाही बोलत आहोत ते! :-))

चांगला आणि हलका फुल्का लेख.
लहानपणी खेळताना, दोन मित्रांचा काही वाद झाला, आणि त्यातील एकाने 'आई शप्पथ.... ' असं म्हणून गळ्याला हात लावला. त्या वेळेस दुसरा मुलगा चटकन म्हणाला, 'खोटी शपथ घेतलीस तर आई मरेल.....' हे ऐकल्या नंतर आयुष्यात कधीच शपथ घेतली नाही.
कागदोपत्री ठामपणे प्रतिज्ञा (I solemnly affirm...) मात्र काही वेळा केल्या.

गवि's picture

8 Dec 2022 - 1:03 pm | गवि

हा हा हा

शपथ घेण्याचे उल्लेख लेखात आणि प्रतिसादांत आहेत. तसेच अनेक प्रसंग लहानपणी शाळेच्या दिवसांत घडत असत.

आणि शपथ घेणे हा ऐच्छिक भाग झाला. आमच्या इकडे वरुन बळंच शपथ देणे, घालणे असाही भाग असे. म्हणजे जणू हत्यार म्हणून वापर.

एखाद्या गोष्टीची खात्री द्यावी म्हणून किंवा प्रतिज्ञास्वरुप शपथ घेतली जाते. इथे शाळकरी पोरे आमच्या आमच्यात उगीच शपथ घालतही असू. म्हणजे तुझ्याकडचा स्टिकर मला दे, नाहीतर तुला आयची शप्पत घालीन.

अनेकदा हा भात्यातला शेवटचा बाण असे. साम दाम दंड भेद शपथ.:-)

प्रकाश घाटपांडे's picture

8 Dec 2022 - 1:24 pm | प्रकाश घाटपांडे

विचारांती नंतर भूमिका बदललली तर शपथ मोडल्याचे पाप लागू नये. आपद्धर्म म्हणुन खोटी शपथ घेतली तरी पाप लागू नये. :)

श्वेता२४'s picture

8 Dec 2022 - 1:46 pm | श्वेता२४

आम्हीही लहानपणी आईची शपथ घेत असू. मी व माझा नवरा खरं काय ते जाणून घ्यायचं असेल तर मुलाची शपथ घ्यायला लावतो. कारण त्याची खोटी शपथ आम्ही कधीच घेत नाही. अर्थात भांडणे फार गंमतीची असतात. उदा. फ्रीजमधले आईसक्रीम कुणी खाल्ले? औषधाच्या गोळ्या वेळेवर घेेतल्या की नाही इ.इ. मग कितीही रेटून खोटे बोललो तरी शपथ घ्ययला लावली की खरं ते बाहेर येतंच:))

अनिंद्य's picture

8 Dec 2022 - 3:23 pm | अनिंद्य

छान लिहिलंय.

वामन देशमुख's picture

8 Dec 2022 - 5:58 pm | वामन देशमुख

गळ्याप्पथ, नेहमीप्रमाणे candid लिखाण आवडले, आजी!

शानबा५१२'s picture

9 Dec 2022 - 8:02 am | शानबा५१२

खुप छान व भावुक लेख. हा लेख लक्षात राहील असा आहे. आपणास खुप शुभेच्छा!.

आजी's picture

14 Dec 2022 - 9:41 am | आजी

सर्वांना धन्यवाद.

सौंदाळा-तुम्हीही शपथा घेतल्या आहेत तर!

सर टोबी -माझ्या लिखाणातला निरागसपणा आवडला? धन्यवाद.

सरीता बांदेकर -थॅंक्यू.
टर्मीनेटर-माझं लिखाण तुम्हांला आवडलं , हे वाचून आनंद झाला.
नचिकेत जवखेडकर-सौरव गांगुलीचं उदाहरण आवडलं.
श्वेता व्यास-अजूनही खोटी शपथ घ्यायला तुमचं मन धजावत नाही."हा तुमचा पापभीरूपणा भावला.

सस्नेह -गेले ते दिन गेले"-खरंच.
आंबटगोड -धन्यवाद.
Nitin Parekar-"खोटी शपथ घेतली तर आई मरेल"हे ऐकून तुम्ही शपथ घेतली नाही."हे हृदयस्पर्शी आहे.
श्वेता २४-मुलांची शपथ घ्यायला लावायची ही युक्ती चांगली आहे.
अनिंद्य, वामन देशमुख -थॅंक्स.

शानबा ५१२-"लक्षात राहील असा लेख."-हा तुमचा अभिप्राय वाचून समाधान वाटले.
गवि-साम,दाम,दंड,भेद, आणि शपथ! व्वा पटलं.

प्रकाश घाटपांडे -आपद्धर्म म्हणून शपथ घेणं पाप नाही. हे तुमचं म्हणणं पटलं.

सर्वांचेच अभिप्रायांबद्दल पुन्हा आभार.

खेडूत's picture

14 Dec 2022 - 10:53 am | खेडूत

आवडला लेख..
शपथेवर इतका विचारच केला नव्हता.. गळ्याशप्पथ!