गळ्याशपथ.
लेखनविषय (Tags)
जगात असा एकही माणूस नसेल की ज्यानं आयुष्यात कधी शपथ घेतली नाही. आपलं म्हणणं खरं असो वा खोटं ते निक्षून, ठासून सांगण्यासाठी लोक शपथ घेतात. कोर्टात धर्मग्रंथावर हात ठेवून शपथ घेतात आणि खरं किंवा खोटं बोलतात. काहीजण खोटी साक्ष देण्याचा पैसे घेऊन धंदाही करतात. प्रत्यक्षात गुन्हा घडताना पाहिल्याचं शपथेवर सांगतात.
माॅडर्न मुलं "शपथ" न म्हणता "आय स्वेयर"म्हणतील पण शपथ घेतीलच. तर खेडवळ माणूस "आईच्यान सांगतो" असं म्हणत शपथ घेईल.
लहानपणी आम्ही वर्गातल्या आणि खेळातल्या मुली खूप शपथा घ्यायचो. पहिली "गळ्याची शपथ". तीवर विश्वास बसला नाही तर "देवाची शपथ", मग "रक्ताची शपथ". माझी एक मैत्रीण तर सेफ्टी पिन बोटावर टोचून बोटातून रक्त काढायची आणि म्हणायची,"रक्ताची शपथ"नंतर त्या जखमेवर ग्राऊंडवर असलेली माती फासून ती जखम बरी करायची. मातीतल्या जंतू संसर्गाची भीती वगैरे काही नाही. तरीही विश्वास बसला नाही तर आईची शपथ आणि कडेलोट म्हणजे आईरक्ताची शपथ. आमच्या मूर्ख बुद्धीला आपण आपल्या आईला वेठीला धरतोय हेही लक्षात यायचं नाही. मग प्रतिपक्ष म्हणायचा "खोटी शपथ घेतली तर तो माणूस मरतो." तरीही आम्ही मागे हटायचो नाही. किंवा कुणी शपथ घातली आणि ती जुमानायची नसेल तर आम्ही म्हणायचो "शपथ गेली खड्यावर घालणाऱ्याच्या मढ्यावर".
मढं वगैरे शब्द वापरायला आम्हांला काहीही वाटायचं नाही.सगळंच लाईटली घेण्याचं वय होतं ते!
शपथ ही सिनेसंगीतातही असते. प्रियकर, प्रेयसी एकमेकांना शपथा घालतात. "तुला या फुलाची शपथ" असं सुधीर फडके म्हणून जातात,तर आशाताई "शपथ ह्या बोटांची, सुगंधित श्वासाची"असं म्हणतात. हिंदी सिनेमात "कस्मे वादे निभायेंगे हम"ही म्हणतात आणि "कस्मे वादे,प्यार,वफा सब बाते हैं,बातोंका क्या"असंही म्हणतात. कसम शब्दावरून हजारो गाणी आढळतील.
अनेक ऐतिहासिक शपथा आपल्याला माहीत आहेत. क्रांतिकारक देशासाठी बलिदान देण्याची शपथ घेतात. शिवाजी महाराजांची रोहिडेश्वराची शपथ प्रसिद्ध आहे. संभाजीराजांनी हाताची करंगळी कापून स्वराज्य हितरक्षणाची शपथ घेतली होती. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आणि मदनलाल धिंग्रा सारख्या अनेक क्रांतिकारकांनी दिव्याच्या पेटत्या ज्योतीवर तळहात धरुन "मरे मरेतो झुंजेन"अशी शपथ घेतली होती. बेचाळीसच्या चळवळीत बापूजींनी चले जाव अशी घोषणा करत,अनुयायांना शपथ दिली होती. क्रांतीसिंह नाना पाटील यांनी "करा वा मारा"अशी शपथ क्रांतीकारकांना दिली होती.
संसदसदस्य शपथ घेतात. न्यायाधीश शपथ घेतात. कोर्टात शपथ घेतात. डॉक्टर्स शपथ घेतात. पोलीस,एन.डी.ए.छात्र , सैनिक, सेनाधिकारी शपथ घेतात. शपथ माणसाला एक पवित्र बंधन घालते. कर्तव्याची जाणीव करून देते.
एवढंच कशाला लग्नातही वधूवरांना सप्तपदीच्या वेळी शपथ देतातच की! मी आणि माझा नवरा आमच्यातील प्रत्येक मतभेदाच्या वेळी ह्या शपथांची आठवण एकमेकांना गमतीने करून देत असू.
माझं लग्न झालं. मला मुलगा झाला. तो अगदी लहान असतानाच त्याच्या वडिलांचे छत्र हरपले. मोठा होत असताना तो लवकर समजूतदार झाला. मला काही होत असेल तर तो मला विचारायचा,"आई, तुला रात्री ताप होता का?"
मी "नाही"म्हणायची. तो विचारायचा,"मग तुझे डोळे असे का दिसताहेत?तू थकल्यासारखी वाटतेस. बघ, आत्ताही अंग गरम लागतंय".
त्याला काळजी वाटू नये म्हणून मी सरळ खोटं बोलायची. "अरे, मला काही होत नाहीये. मी ठणठणीत आहे. तुझा हात गार आहे म्हणून तुला उगीच माझं अंग गरम लागतंय.
"तो म्हणायचा,"शपथ घे.
"मी म्हणायची,"शपथ".
तो म्हणायचा,"माझी शपथ घे".
ती मी घ्यायची नाही. मग माझं पितळ उघडं पडायचं.
कारण त्याची खोटी शपथ मी घेणं शक्यच नव्हतं. मग तो माझ्या कुशीत शिरायचा. म्हणायचा,"आई, तुला काहीही होत असेल तर ते माझ्यापासून लपवू नकोस. तुला माझी शपथ."
आता तो खूपच मोठा झालाय. त्याचं लग्न आणि पोरेबाळे झाल्यावर आता आम्ही एकमेकांना शपथा वगैरे घालत नाही. आता मी माझ्या समस्या त्याच्यापासून लपवत नाही. प्रत्येक संकट झेलण्याएवढा तो प्रगल्भ झालाय.
शपथ घेऊन ती मोडल्याचे अनेक अनुभव आयुष्यात आले आणि शपथेवरचा विश्वासच उडाला. मला वाटतं की आपण नेहमी खरंच बोलत असू तर शपथ घेण्याची गरजच काय!
आता मी कधीच शपथ घेत नाही. "गळ्याशपथ" असं म्हणत नाही..
प्रतिक्रिया
भारीच बहुतांश शपथा अगदी
काय भारी लिहलयं
छान
'नियम हे मोडण्यासाठीच असतात' तसेच काहीसे
मस्त लेख आजी!
छान लिहिलं आहे. लहानपणी रक्त
गेले कुठे निघून ते भाबडे दिवस
किती सुरेख
शपथ.... जी कधी घेतली नाही...
हा हा हा
विचारांती नंतर भूमिका बदललली
आजी अगदी खरं लिहीलंय
छान लिहिलंय.
गळ्याप्पथ, नेहमीप्रमाणे
खुप छान व भावुक लेख. हा लेख
सर्वांना धन्यवाद.
आवडला लेख..