प्रास्ताविक
कित्येक वर्षांपासून बदामीला जायचं होतं पण योग काही येत नव्हता, तो ह्याच महिन्याच्या सुरुवातीस आला. झालं असं की ऑफिसमधल्या कामांमुळे सुट्ट्यांचं जुगाड काही जमवता येत नव्हतं, नोव्हेंबर महिन्यातले तर सर्व शनिवार, रविवार ऑफिसातच गेले होते, मित्रांनाही वेळेअभावी ठोस काही जमवता येत नव्हतं. तो योग अचानक जुळून आला. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात आम्हा तिघांनाही शनिवार रविवार जोडून एकूण ५ दिवस सुट्टी काढता येत होती मग ठिकाणे शॉर्टलिस्ट करायला लागलो. एकंदरीत ४ ठिकाणे निवडली आणि त्यातून एक ठिकाण निवडण्याचं पक्कं केलं. ऑल टाइम फेव्हरेट गोवा, कर्नाटकातले भद्रा व्याघ्र अभयारण्य, यवतमाळनजीकचे टिपेश्वर आणि बदामी. गोवा खूपदा झाल्याने साहजिकच मागे पडलं, भद्रा आणि टिपेश्वर तुलनेने लांबचे आणि शक्यतो डिसेंबरमध्ये वातावरण कितीही आल्हाददायक असलं तरी ह्या काळात शक्यतो वाघ दिसण्याचे प्रमाण कमी असते म्हणून ही दोन्ही ठिकाणे उन्हाळ्यासाठी ठरवली आणि शेवटी उरलं ते बदामीच. एकतर बदामी उन्हाळ्यात खूप तापतं, शिवाय पायपीटही बदामीला बर्यापैकी आहे, शिवाय तिघांपैकी कुणीही बदामीला अजून गेलं नव्हतं त्यामुळे बदामी एकमताने फायनल झालं. मग आता त्यादृष्टीने राहाण्याच्या ठिकाणाचं बुकिंग करायचं ठरवलं. कर्नाटक राज्य पर्यटन महामंडळाच्या रिसॉर्टचा हंपी येथील अनुभव उत्तम असल्याने फारसा विचार न करताच मेकमायट्रिपवरुन मयुरा चालुक्य बदामी येथे ३ रात्रींसाठी बुकिंग केलं. सेमी डिलक्स नॉन एसी तिघांसाठी मिळून ३ रात्रींसाठी ७००० रु. पडले. वास्तविक बदामीस क्लार्क्स इन, बदामी हेरीटेज, बदामी कोर्ट अशी उत्तम दर्जाची हॉटेल्स आहेत मात्र ती तुलनेने महाग, तर बसस्टॅण्डच्या आसपास भरपूर लॉजेस आहेत ती तुलनेने खूपच स्वस्त, मात्र पार्किंगचा प्रॉब्लेम येऊ शकतो. मयुरा चालुक्य तसं गर्दीपासून दूर, शांत, पार्किंग प्रशस्त आहे, मात्र चांगले असूनही मेन्टेनन्स आणि सर्व्हिसची तुलनेने बोंबच आहे ते एक असो. काय काय बघायचे, कसे कसे बघायचे ह्याबाबत कंजूसकाकांशी फोनवर सतत चर्चा चालू होत्याच. त्यांच्या मार्गदर्शनाबद्द्ल त्यांचे आभार न मानणे हे कृतघ्नपणाचेच ठरेल.
नियोजन केले ते असे.
२ डिसेंबर - कोल्हापूर मुक्काम
३ डिसेंबर- बदामी चेक आणि बदामी लेणी दर्शन
४ डिसेंबर - ऐहोळे, पट्टदकल
५ डिसेंबर - बदामी किल्ला, भूतनाथ, मल्लिकार्जुन मंदिरे, महाकूट समूह आणि बनशंकरी.
ह्या पाच डिसेंबरच्याच दिवशी सिडीलापडीच्या रूपाने एक अनपेक्षित लाभ झाला. वेळेअभावी हे ठिकाण खरं तर टाळणार होतो पण ते वेळेत बसवलेच, त्याबद्द्ल नंतर लिहिनच.
६ डिसेंबर - परतीचा प्रवास
तर २ तारखेला ऑफिसमधून लवकरच बाहेर पडलो आणि साधारण दुपारी पावणेचारच्या आसपास पुणे सोडले. बदामीला जाण्यासाठी पुण्यातून दोन प्रमुख मार्ग आहेत. एक जातो तो सोलापूर, विजयपूर-बदामी आणि दुसरा आहे तो कोल्हापूर - निपाणी - संकेश्वर - गोकाक - रामदुर्ग - बदामी. आम्ही कोल्हापूरवरुन जाण्याचे ठरवले होते. त्यादृष्टीने हॉटेल ओपलला अगोदरच बुकिंग करुन ठेवले होते. साडेसात/आठच्या आसपास ओपलला पोहोचलो, रूमवर बॅगा टाकून लगेचच रिक्षाने महालक्ष्मी मंदिरात गेलो, दर शुक्रवारी देवीच्या पालखीचा सोहळा मंदिरात असतो तो यावेळी प्रथमच बघायला मिळाला. मग रात्री निवांत ओपललाच जेवण केले आणि राऊंड ऑफ १६ मधील एक फूटबॉल वर्ल्ड कप मॅच पाहता पाहता झोपी गेलो. सकाळी ओपलचा नाष्टा ८ वाजताच सुरु होतो, कोल्हापूरपासून बदामी साधारण २२० किमी आहे आणि आमचे बदामीचे चेक इन देखील दुपारी एक वाजता असल्याने पुरेसा वेळ हाती होताच. नाष्टा करुन साधारण ९ च्या आसपास कोल्हापूर सोडले ते निपाणी, संकेश्वर, गोकाक (अर्थात हे सर्वच रस्ते गावात न जाता बाहेरुन जातात) करुन साधारण दीडच्या आसपास मयुरा चालुक्य येथे चेक इन केले. रूम अगदी प्रशस्त असून ३ सिंगल बेड आहेत, शिवाय सोलर सिस्टम असल्याने गरम पाणी २४ तास उपलब्ध असते. थोडं फ्रेश होऊन तिथेच जेवण केले. चालुक्य रेस्टोरंटची सर्व्हिस मात्र खूप स्लो आहे. पावणेतीन्/तीन पर्यंत जेवण उरकले. आता आजचा प्लान होता बदामीच्या गुहा पाहणे. संपूर्ण बदामी गावाच्या पाठीमागेच बदामीचा बदामी रंगाचा डोंगर एखाद्या खडा पहारा देत उभा आहे. डोंगरावरील शिवालये, बुरुज कोठूनही स्पष्ट दिसतात. गुहांच्या इथेच गाड्यांसाठी वाहनतळ आहे. हॉटेलपसून पाच सात मिनिटातच वाहनतळावर पोहोचून वाहन लावले आणि तिकिट काऊंटर तिकीट काढून (२५ रु. प्रत्येकी) बदामीच्या गुहा पाहण्यास निघालो. मात्र बदामीच्या गुहा पाहण्याआधी आपल्याला बदामीच्या चालुक्यांचा संक्षिप्त इतिहास जाणून घेणे गरजेचे आहे.
चालुक्यांचा संक्षिप्त इतिहास
इ.स.सहाव्या शतकाच्या सुरुवातीस दक्षिणेत एका शक्तिशाली राजघराण्याचा उदय झाला. ते घराणे म्हणजे बदामीचे चालुक्य. बदामीचे पूर्वीचे नाव वातापी. इल्वल आणि वातापि हे दोघे राक्षसबंधु. इल्वल आलेल्या अतिथींना आग्रहाने भोजनास बोलवत असे आणि वातापि हा मेढ्यांचे रूप घेऊन अतिथींच्या पानात मांसाच्या रूपाने जात असे आणि अतिथींचे जेवण झाल्यावर त्यांचे पोट फाडून परत जीवंत बाहेर येत असे. एकदा अगत्स्य ऋषी तेथून जात असता इल्वल मानभावीपणाने त्यांना जेवायला घेऊन गेला, ऋषींनी वातापिरुपी मांसान्न खाल्यावर इल्वलाने वातापि, बाहेर ये अशी हाक मारली असता तो बाहेर आलाच नाही, अगत्स्याने वातापिला पचवून टाकले आहे हे ओळखून इल्वल त्यांना शरण गेला आणि त्याने ते ठिकाण कायमचे सोडले. हे जे ठिकाण आहे तीच बदामी, अर्थात चालुक्यांची राजधानी वातापी. उत्तर चालुक्यांच्या लेखात चालुक्य ह्या संज्ञेविषयी काही आख्यायिका आहेत. हे चलिक्य किंवा चलुक्य नावाच्या प्रदेशातले होते किंवा साळी हे त्यांचे कुल होते. ह्यावरुन त्यांचे चालुक्य हे कुलनाम आले असावे असा एक तर्क आहे.
चालुक्य हे सुरुवातीला बनवासीच्या कदंबाचे सरदार होते असे सर्वसाधारणपणे मानले जाते. त्या घराण्याचा पहिला पुरुष जयसिंह हा होता. जयसिंहाचा पुत्र रणराग आणि त्याचा पुत्र पुलकेशी (पहिला). पुलकेशीने बनवासीच्या कदंबांना हरवून वातापी नामक राजधानीची निर्मिती केली. पुलकेशीने अश्वमेध व इतर अनेक यज्ञ केले व हिरण्यगर्भ नामक दान दिले असा ऐहोळे प्रशस्तीत उल्लेख आहे.
तस्याभवत्तनूजः पोलेकेशी यः श्रीतेन्दुकान्तिरिप।
श्रीवल्लभोप्ययासीद्वातापिपुरीवधूवरताम्॥
यस्त्रिवर्ग्गपदवीमलं क्षितौ नानुगन्तुमधुनापि राजकम्।
भूश्व येन हयमेधयाजिना प्रापितावभृथमज्जना बभौ॥
चंद्राच्या कांतीसमान असलेला श्रीवल्लभ पुलकेशी हा (रणरागाचा) पुत्र असून वातापिरुपी वधू त्याने वरली होती. त्याने राजांना अप्राप्य असलेली त्रिवर्ग हे बिरुद धारण केले होते आणि अश्वमेध यज्ञ करुन अवभृत स्नान करुन सर्व लोकांना आश्चर्यचकित करुन सोडले होते.
पहिल्या पुलकेशीने आपल्या सार्वभौमत्वाचे द्योतक म्हणून त्याच्या पूर्वीच्या राजांच्या "राजन्" आणि "नृप" अशा साध्या विरुदाऐवजी "महाराज" हे बिरुद धारण केले. तसेच त्याने सत्याश्रय, रणविक्रम आणि श्रीपृथ्वीवल्लभ अशी विरुदेही धारण केली. त्याने इ.स. ५३५ ते ५६६ पर्यंत राज्य केले. त्याच्या मृत्यूनंतर कीर्तिवर्मन(पहिला) हा राज्यावर आला. पुलकेशीचा दुसरा पुत्र मंगलेश, हादेखील महापराक्रमी होता. मंगलेशाच्या महाकूट येथील स्तंभलेखात किर्तीवर्मनाने अंग, वंग, कलिंग इत्यादी जिंकलेल्या प्रदेशांची नावे दिली आहेत. त्याने आपल्या राज्याचा पुष्कळ विस्तार केला. ह्या किर्तीवर्मनचा पुत्र पुलकेशी (दुसरा). हा पुलकेशी चालुक्य वंशातील सर्वात महापराक्रमी राजा. मात्र किर्तीवर्मनच्या मृत्युप्रसंगी पुलकेशी अल्पवयीन असल्याने मंगलेश हा राजा झाला. ह्या मंगलेशाने कलचुरींवर आक्रमण करुन त्यांना जिंकले आणि नंतर पश्चिम किनार्यावरील रेवतीद्विपावर स्वारी करुन ते द्विप जिंकले. ह्या रेवतीद्विपाबद्द्ल काही मतभेद आहे. कुणी म्हणतात ते कोकणातले रेडी असावे किंवा रेवदंडा असावे तर कोणी हे गोवे असावे असे म्हणतात कारण कदंब त्याकाळी क्षीण झाले होते. मात्र हे रेवतीद्विप कोकणच्या मौर्यांकडून त्याने जिंकून घेतले असे शिलालेखात स्पष्ट उल्लेख असल्याने हे कोकणातलेच कुठलेतरी ठिकाण असावे असे मानता यावे. ह्या मंगलेशाला मात्र आपल्या मुलांसाठी सत्तेचा मोह सोडवेना झाला आणि त्याने पुलकेशी (द्वितीय) ह्याचा वारसा हक्क नाकारला आणि यातूनच पुलकेशी आणि मंगलेश यामध्ये ठिणगी पडली ज्याचे पुढे अग्नीत रुपांतर होऊन मंगलेशाला सत्ता आणि आपले प्राणही गमवावे लागले.
ऐहोळे प्रशस्ती म्हणते
तस्याग्रजस्य तनया नहुषानुभावे लक्ष्म्या किलभिलषिते पोलकेशिनामम्नि।
सासूयमात्मानि भवन्तमतः पितृव्यम् ज्ञात्त्वापरुद्धचरितव्यवसायबुद्धौ॥
स यदुपचित मन्त्रोत्साहशक्तिप्रयोग क्षपितवलविशेषो मङ्गलेशः समन्तात्।
स्वतनयगताराज्यारम्भयत्नेन साद्धं निजमतनु च राज्यंञ्जीवितंञ्चोज्झति स्म॥
त्याच्या (मंगलेशाच्या) भावाचा (किर्तीवर्मन) पुत्र पुलकेशी होता जो नहुषासमान असून लक्ष्मीला प्रिय होता. पित्यासमान असलेल्या मंगलेशाने आपली सारासारविवेकबुद्धी सोडून पुलकेशीविरुद्ध विपरीत आचरण केले त्यामुळे त्याने (पुलकेशीने) आपल्या मंत्र, उत्साह आणि बलप्रयोगाने मंगलेशाचे बळ नष्ट करुन टाकले. आपल्या पुत्रासाठी झालेल्या सत्तामोहामुळे मंगलेशाला राज्यासकट जीवीतही गमवावे लागले.
पुलकेशी आणि मंगलेशातील या संघर्षामुळे अराजक माजले होते. त्यांचे शत्रू, सामंत, मांडलिक, इतर सरदार घराणी ह्या अराजकाचा फायदा न घेते तरच नवल.
तावत्तच्छत्रभङ्गो जगदखिलमरात्यन्धकोरापरुद्धं यस्यासह्यप्रद्युतिततिभिरिवाक्क्रान्तमासीत्प्रभातम्।
मंगलेशाच्या अंतानंतर संपूर्ण जग शत्रूरूपी अंधःकाराने व्याप्त झाले होते मात्र पुलकेशीच्या प्रचंड प्रभावाने पुन्हा पहाटेचे आगमन झाले.
या सर्व शत्रूंचा पराभव करुन पुलकेशीने आपले लक्ष दक्षिणेकडे वळवले. त्याने वनवासीवर स्वारी करुन कदंबांना पुन्हा जिंकले आणि गंग आणि अलूपवंशीयांना धडा शिकवला. नंतर कोंकण मौर्यांना हरवून त्यांची राजधानी पुरी (घारापुरी) जिंकली. त्यानंतर पुलकेशी लाट, सौराष्ट्र आणि माळवा आपल्या अधिपत्याखाली घेतले आणि त्यानंतर सम्राट हर्षवर्धनावर विजय मिळवला व त्याला नर्मदेपलीकडे माघार घ्यावयास भाग पाडले.
अपरिमितविभूतिस्फीतसामन्तसेना मुकुटमणिमयूखाक्क्रान्तपादारविन्दः।
युधि पतितगजेंद्रानीकबीभत्सभूतो भयविलगित हर्षों येन चाकारि हर्षः॥
अपरिमित ऐश्वर्याने युक्त असलेल्या विभूतीसमान सामंतांच्या मुकुटमण्यांनी युक्त असलेला हर्ष सुद्धा त्याचे प्रचंड गजसैन्य नष्ट झाल्यामुळे अहर्ष (दु:खी) होऊन गेला.
यानंतर पुलकेशीने संपूर्ण महाराष्ट्र जिंकला. ऐहोळे प्रशस्तीत महाराष्ट्र या नामाचा सर्वप्रथम उल्लेख येतो तो असा.
विधिवदुपचिताभिश्शक्तिभिश्शक्रकल्पस्तिसृभिरपि गुणौधैस्वैश्च माहाकुलाद्यैः।
अगमदधिपतित्वं यो महाराष्ट्टकाणां नवनवतिसहस्रग्रामभाजां त्रयाणाम्॥
आपल्या विविध गुणांनी आणि कुलिनतेने इंद्रासमान असलेल्या पुलकेशीने तिन्ही महाराष्ट्र प्रदेशांवर त्यातील ९९००० गावांसह स्वामित्व प्राप्त केले.
त्यापाठोपाठ पुलकेशीने कोसल आणि गंगांचा पराभव केला, आणि आंध्र जिंकले, लगोलग त्याने चोल आणि पांड्यांशी मैत्री संपादन करुन पल्लवांवर स्वारी केली. त्याला कांची जिंकता आली नाही मात्र पल्लवांचे साम्राज्य बरेच खिळखिळे झाले. इ. स. ६४२ मध्ये आपल्या पित्याच्या पराभवाचा सूड घेण्याच्या दृष्टीने महेंद्रवर्मन याचा उत्तराधिकारी पहिला नरसिंहवर्मन याने अचानकपणे चालुक्यांच्या राज्यावर आक्रमण केले. हा हल्ला एवढ्या तडकाफडकी करण्यात आला की, त्यात पुलकेशी देखील बेसावध अवस्थेत पकडला गेला. पल्लव सैन्याने चालुक्यांचा प्रदेश पादाक्रांत करून वातापीस वेढा टाकला. पुलकेशीने सैन्याची जमवाजमव करून राजधानी वाचविण्यासाठी प्रखर प्रतिकार केला. परंतु या लढाईत स्वतः पुलकेशी मारला गेल्यामुळे युद्धाचे पारडे पल्लवांच्या बाजूने झुकले. नरसिंहवर्मनने वातापीचा जिंकली आपल्या विजयाचे प्रतीक म्हणून त्याने "वातापीकोंडा" हे विरुद धारण केले व या पराक्रमाचे स्मारक म्हणून वातापी येथील प्रस्तरावर आपल्या राजाज्ञेचा शिलालेख कोरविला. चालुक्य वंशातील सर्वश्रेष्ठ आणि प्राचीन भारतातील श्रेष्ठ असलेल्या पुलकेशीचा असा दुर्दैवी अंत झाला.
त्यानंतर १२/१३ वर्षे चालुक्यांसाठी कसोटीची ठरली, त्याच्या पुत्रांमध्येही बेदिली माजली, त्यानंतर त्याचा पुत्र विक्रमादित्य हा सत्तेवर आला. आपला भाऊ आदित्यवर्मन आणि त्याचा पुत्र अभिनवादित्य ह्यांचा पराभव करुन वातापीवर आपला ताबा पुनःस्थापित केला आणि राज्य स्थिरस्थावर झाल्यावर आपले परंपरागत शत्रू असलेल्या पल्लवांवर मोर्चा वळवला. पल्लव प्रदेश व्यापून व कांची शहर जिंकून वातापीच्या पाडावाचा व पुलकेशीच्या मृत्यूचा पूर्ण बदला घेतला. विक्रमादित्याच्याच काळात चालुक्यांच्या प्रदेशात शांततेचे युग सुरु झाले आणि पट्टदकल येथील मंदिरांची उभारणी सुरु झाली. ६८१ मध्ये त्याच्या मृत्युनंतर युवराज विनयादित्य हा सत्तेवर आला. हाही पित्यासमान पराक्रमी होता. पल्लव पाण्ड्य, चोल, केरळ, कलभ्र, हैहेय, विल, मालव, अलूप व गंग इत्यादी अनेकांचा याने पराभव केला. कनोजच्या यशोवर्मनशी चालुक्यांचा संघर्ष होऊन त्यात विनयादित्याची अखेर झाली व विजयादित्य सत्तेवर आला. ह्याची कारकिर्द प्रदीर्घ आणि शांततेची ठरली.
विजयादित्यानंतर इस ७३३ साली विक्रमादित्य (द्वितीय) हा सत्तेवर आला. ह्याच्या कारकिर्दित पुन्हा पल्लवांविरुद्धच्या लढाईला तोंड फुटले. पल्लवांचा पराभव करुन याने पांड्य, चोल, केरळ आणि कलचुरींचा पराभव केला आणि हिंदी महासागराच्या तीरावर विजयस्तंभ उभारला. याच्यानंतर इसवी ७४५ मध्ये त्याचा पुत्र किर्तीवर्मन (द्वितीय) सत्तेवर आला. मात्र आता मांडलिक सत्ता प्रबळ होऊ लागल्या होत्या, मान्यखेतच्या राष्ट्रकूटांनी त्यांना आव्हान दिले. कर्क राष्ट्रकूटाने चालुक्यांचे राज्यादेश झुगारुन स्वतंत्र शासन जारी केले. वेरुळ लेण्यात शिलालेख असणार्या दंतिदुर्गाने किर्तीवर्मनचा पराभव करुन महाराष्ट्र आणि कोंकण जिंकले आणि राष्ट्रकूटांच्या सार्वभौमत्वाची घोषणा केली आणि इसवी सन ७५० साली वातापीचे राज्य खालसा झाले.
अर्थात राष्ट्रकूटानंतर परत बदामीच्या चालुक्यांच्या दोन शाखा पुन्हा उदयाला आल्या. ते स्वतःस बदामीच्या चालुक्यांचे वंशज म्हणवून घेत. एक शाखा आंध्रप्रदेशाच्या समुद्रकिनार्यानजीक असलेल्या वेंगी येथे राज्य करु लागली ते म्हणजे वेंगीचे अथवा पूर्वेचे चालुक्य आणि दुसरी शाखा दक्षिण कर्नाटकातील बसवकल्याण येथून राज्य करु लागली ते म्हणजे कल्याणीचे चालुक्य. हे कल्याणीचे चालुक्यही महापराक्रमी होते. अर्थात विस्तारभयास्तव त्यांच्याबद्द्ल येथे अधिक लिहिणे शक्य नाही.
येथे आपण चालुक्यांचा संक्षिप्त इतिहास जाणून घेतला आहे. चालुक्यांनी कित्येक शिलालेख, प्रशस्ती कोरवल्यामुळे त्यांच्याबद्द्ल इतिहासात विपुल माहिती उपलब्ध आहे. ह्याच बदामीच्या चालुक्यांच्या कालखंडात बदामीच्या लेण्यांची निर्मिती झाली, बदामीची मंदिरे, ऐहोळे, पट्टदकल, महाकूट यांसारख्या असंख्य मंदिर समूहांची निर्मिती झाली आता त्यांच्याबद्दलच आपण एकेक करुन जाणून घेऊयात. सर्वप्रथम जाऊ बदामीची लेणी पाहायला.
बदामीची लेणी
बदामीच्या लेण्यांकडे जाताच आपली नजर फिरते ती तिथल्या भव्य कड्यांभोवती. निव्वळ अद्भूत आहे हे सर्व. एखाद्याला मानवनिर्मित कलेची आवड नसेल तरीही तो निसर्गाच्या निर्माण केलेल्या कलेत ह्या कलेत रममाण होणार यात यत्किंचितही शंका नाही. वाहनतळातूनच आपल्या पहिल्या लेणीचे दर्शन होते. बाजूच्याच अंगावर येणार्या प्रचंड कड्यातूनच पुढे जाण्यासाठी मार्ग निर्माण केला आहे.
लेणी क्र. १
हे लेणे शैव आहे. साधारण सहाव्या शतकाच्या सुरुवातीचे हे लेणे असावे. उभ्या कड्यात आयताकृती आकारात खोदून हे लेणे तयार केले असून चार स्तंभांवर तोललेले आहे. मुखमंडप (व्हरांडा) त्याच्या बाजूला एक अर्धमंडप, पुढे सभामंडप व त्यापुढे गुहेच्या सर्वात शेवटी गर्भगृह अशी याची रचना.
लेणी क्र. १ चे मुखदर्शन
ह्या लेणीच्या व्हरांड्यात नटराजाची अप्रतिम मूर्ती असून बाजूच्या त्यावर असलेल्या कोनाड्यात महिषासुरमर्दिनी आणि कार्तिकेयाची मूर्ती आहे.
नटराज
१८ हातांचा हा नटराज अतिशय सुंदर असून ह्याच्य नृत्यमुद्रा सुमारे ८१ होतात. डाव्या बाजूस नंदी व बाजूस नृत्यगणेश असून एक सेवक तालवाद्य वाजवत आहे.
व्हरांड्याची आतील बाजूस महिषासुरमर्दिनी आणि कार्तिकेय आहेत.
महिषासुरमर्दिनी
मोरावर आरुढ कार्तिकेय
व्हरांड्यातून आत गेल्यावर डाव्या बाजूस आहे हरिहर तर उजव्या बाजूस आहे अर्धनारीश्वर
हरिहर
हे एक जबरदस्त सुंदर शिल्प आहे. शैव आणि वैष्णवांमधला संघर्ष मिटवण्याच्या दृष्टीने या दोन देवतांना एकत्र आणून हरिहराच्या रूपाने ह्यांचे संयोजन करण्यात आली. ह्या शिल्पात असंख्य बारकावे आहेत. अर्धी बाजू शैव तर अर्धी वैष्णव असल्याने दोन्ही देवतांच्या विविध लक्षणांचे येथे सुंदर दर्शन होते. विष्णूचा मुकुट हा भरजरी आहे तर शिवाच्या जटायुक्त असून त्यात अर्धचंद्र आहे. विष्णूचा बाहू दागिन्यांनी युक्त असून शिवाने आपल्या बाहूत नाग धारण केला आहे. विष्णूचे कटिवस्त्र भरजरी असून शिवाने गजचर्म परिधान केले आहे. विष्णूने आपल्या हातात शंख आणि पद्म धारण केले असून शिवाच्या हाती नाग आणि त्रिशूळ आहे. विष्णूच्या बाजूस त्याचे वाहन गरुड असून शिवाकडे त्याचे वाहन नंदी आहे. विष्णूच्या बाजूस लक्ष्मी असून शिवाच्या बाजूस पार्वती आहे.
ह्याच्या समोरील बाजूस आहे अर्धनारीश्वर
अर्धनारीश्वर
हेही येथील एक अत्यंत देखणे शिल्प. पुरुष आणि प्रकृतीचे मिलन या शिल्पाद्वारे दाखवले जाते. अर्धी बाजू शिवाची तर अर्धी पार्वतीची.
पार्वतीने केस शृंगारले असून शिवाचे जटायुक्त आहेत व त्यात अर्धचंद्र आहे. पार्वतीने हातात कमळ तर शिवाने हातात त्रिशूळ धारण केला आहे. पार्वतीने साधेच पण नक्षीदार कटीवस्त्र परिधान केले आहे तर शिवाच्या कमरेला नागबंधन आहे. पार्वतीच्या हातात बांगड्या तर शिवाच्या हातात रूद्राक्षाची माळ आहे. पार्वतीने पायात पैंजण घातले असून शिवाचे पाय मोकळेच आहेत. पार्वतीच्या बाजूला करंडा घेतलेली सखीपार्वती असून शिवाच्या बाजूला परमभक्त भृंगी आहे व बाजूस नंदी हे वाहन उभे आहे.
हरीहर आणि अर्धनारीश्वर या दोन मूर्तीच्या मध्ये असलेल्या छतावर वेटोळ्यावर आरुढ झालेल्या नागराजाचे अप्रतिम शिल्प आहे जे चुकवू नये असेच. बदामी, ऐहोळे, पट्ट्दकल या भागातील लेणी, मंदिरे पाहताना एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवावी ती म्हणजे छताची आतील बाजू पाहाणे. येथील परिसरातील छतांवर देखण्या मूर्ती आहेत, नक्षीदार कलाकुसरी आहेत.
छतावरील भारवाहक यक्षही बघण्यासारखे आहेत.
आतमध्ये गाभार्यात शिवलिंग आहे, येथे आत वटवाघुळे मोठ्या संख्येने आहेत. नटराजाच्या समोरील बाजूस एका शैव द्वारपालाचे सुरेख शिल्प कोरलेले आहे. त्याच्या वरील बाजूस शिवपार्वती नंदीवर आरुढ झालेले आहेत तर खालील बाजूस बैल आणि हत्ती यांचे एकत्रित असे शिल्प आहे.
चला तर आता लेणी क्र. २ ला जाऊयात.
लेणी क्र. २
ह्या लेणीत जाताना बदामीच्या कड्यांचे सुंदर दर्शन होत राहते.
बदामीचे कडे
समोर दिसणारे वरचे शिवालय
हे लेणे वैष्णव असून याची रचनाही लेणी क्र. १ सारखीच आहे.
व्हरांड्यातील एका बाजूस विष्णूचा त्रिविक्रम अवतार तर आहे दुसर्या बाजूस विष्णूचा वराह अवतार आहे.
त्रिविक्रम अवतार
खालच्या बाजूला बटूरूपातील छत्रीधारी वामन उभा असून त्याच्या हातावर उदक सोडून तीन पावले मावतील इतकी भूमी देणार्या बळीराजाची मूर्ती कोरलेली आहे तर त्याच्या बाजूला दैत्यगुरु शुक्राचार्य उभा असून तो बळीला त्यापासून परावृत्त करतो आहे. पण बळीने अखेर दानाचे उदक सोडल्यावर विष्णूने आपले त्रिविक्रमाचे मूळ रूप प्रकट केले. एक पाय अतिशय उंच करून त्याने जणू स्वर्गच पादाक्रांत केला आहे तर दुसर्या पायाने त्याने सर्व पृथ्वी व्यापून टाकिली आहे आता जणू तो बळीला तिसरा पाय कुठे ठेऊ असे विचारत आहे. बळीचे सेवक त्रिविक्रमावर धावून जात आहेत तर गरुड एका पायाला धरुन बसला आहे.
त्रिविक्रम संपूर्ण पट
वामन, मध्ये शुक्राचार्य आणि वामनाला अर्ध्य देतांना बळीराजा
ह्याच्याच समोरील बाजूस वराह अवतार आहे. वराहाने आपल्या सुळ्यावर पृथ्वी तोललेली असून तो शेषनागावर आरुढ आहे तर बाजूलाच पृथ्वीचे हरण करणारा हिरणाक्ष्य राक्षस विष्णूस शरण जात आहे.
व्हरांड्यातील छतावर अप्रतिम कोरीवकाम असून चक्र, स्वस्तिकचिन्हरुपी भुलभुलय्यासारखी कमालीची मोहक नक्षी कोरलेली आहे. त्याच्या आजूबाजूस समुद्रमंथनासारखे देखावे आहेत.
छतावरील कोरीवकाम
छतावरच एका बाजूला गरुडारूढ विष्णूची मूर्ती कोरलेली आहे.
गर्भगृहात विष्णूपीठ असून त्यावरची मूर्ती मात्र आज नष्ट झालेली आहे.
लेणी क्र. २ आणि तीनच्या मध्ये वरच्या किल्ल्यावर जाणारा खोदीव प्रवेशमार्ग आहे तो मात्र आज पुरातत्व खात्याने बंद ठेवला आहे. येथे किल्ल्यावर जायचे असल्यास बनशंकरी रस्त्यवरुन एका पायवाटेने जाता येते.
लेणी क्र. ३
हे येथले सर्वात प्रचंड आणि भव्य लेणे. वरच्या स्तरात असलेल्या ह्या लेणीत जायचा मार्ग कातळातून खोदून काढला आहे. हेही लेणे महाविष्णूला समर्पित आहे. समोर भव्य प्रांगण, व्हरांडा, त्यातील स्तंभांवर कोरलेल्या सुरसुंदरी, वादकांची शिल्पे, दोन्ही बाजूस असणारे विष्णूचे अवतार, छतांवरील दिक्पाल, विस्तीर्ण सभामंडप आणि आतमध्ये गर्भगृह अशी याची रचना. केवळ ह्याच लेण्यात लेणी कोरल्याचा शिलालेख आहे. हे लेणे मंगलेशाने शके ५०० (इसवीसन ५७८) मध्ये कोरवून विष्णूस समर्पित केले अस सर्वसाधारण आशय.
लेणीत जायचा कोरीव जीना
लेणी क्र. ३ चे मुखदर्शन
मुखमंडप हा ६ पूर्णस्तंभ आणि दोन अर्धस्तंभांवर तोलला गेलेला असून सर्व बाजूस कमालीचे देखणे मूर्तीकाम आहे.
मुखमंडपातील उजव्या बाजूस त्रिविक्रमाची मूर्ती कोरलेली असून त्याची रचना लेणी क्र. २ मधील त्रिविक्रमासारखीच आहे, मात्र येथील मूर्ती अधिक देखणी आणि अधिक भव्य आहे.
त्रिविक्रम
ह्याच्याच आतील बाजूस नृसिंहावताराची उभी मूर्ती कोरलेली आहे.
तर नृसिंहाच्या शेजारी हरिहर आहे.
नृसिंहाच्या बरोबर समोर अष्टभुज विष्णू असून मुखमंडपाच्या आतील बाजूस शेषनागाच्या वेटोळ्यावर बसलेला महाविष्णूची अतीव देखणी मूर्ती आहे. तर त्याच्या बाजूस वराहावतार आहे.
शेषावर बसलेला महाविष्णू
महाविष्णू आणि वराहावतार
मुखमंडपातील प्रवेशद्वाराच्या आतील बाजूस गरुडाची अतिशय भव्य मूर्ती आहे जी अगदी आवर्जून पहावी अशीच. प्रत्यक्षाहूनी प्रतिमा उत्कट असे म्हणतात, इथे मात्र प्रतिमेपेक्षा प्रत्यक्षच उत्कट असे म्हणावेसे वाटते. ह्या मूर्तीची भव्यता छायाचित्रात कदापिही येणार नाही.
गरुड
येथील छतांवर रंगीत नक्षीकाम आहे तर स्तंभशिल्पे देखणी आहेत. यातील एक विशेष शिल्प म्हणजे मद्याच्या नशेत चूर झालेली तरुणी आणि तिला सावरणार्या तिच्या प्रियकराचे शिल्प.
रंगांचे नमुने
मुखमंडप आणि सभामंडपातील छतांवर अष्टदिक्पाल, कार्तिकेय, ब्रह्मादिक देवता कोरलेल्या आहेत.
इंद्र
ब्रह्मा
शिव आणि वरुण
--
येथेही गर्भगृहात मूर्ती नाही.
लेणी क्र. ४
ह्याच्याच वरील बाजूस ही लेणी आहेत. चालुक्यांचे काही महाल जैन होते, तसेच जैन धर्मालाही त्यांचा उदार आश्रय होता. हे लेणे म्हणजे एक जिनालय आहे. खुला मुखमंडप, आयताकार सभामंडप आणि गर्भगृह अशी याची रचना. सातव्या शतकात कोरले गेलेले हे लेणे येथील सर्वात लहान लेणे असून आत जैन तीर्थकरांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत.
मुखमंडपातील आतल्या उजव्या बाजूस महावीरांचे गुरु पार्श्वनाथ यांची मूर्ती आहे.
तर त्याच्या समोरील बाजूस बाहुबलीची सुबक मूर्ती कोरलेली आहे.
समोरील देवकोष्ठात तीर्थकरांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत.
जैनांचे पहिले तीर्थंकर आदिनाथ
येथीलच एका बाजूस महावीरांच्या बाजूस बसून संलेखना करणारी जैन साध्वी जक्कावे हीचे शिल्प कोरलेले आहे.
तर गर्भगृहात महावीरांची आसनस्थ मूर्ती आहे.
येथे आपले लेणीदर्शन समाप्त होते. आधी म्हटल्याप्रमाणे केवळ लेणीदर्शन हा हेतू न ठेवताही येथे येणार्यांसाठी निसर्ग आपले अनेक विभ्रम दाखवत असतो. बदामीचे भव्य कडे, त्यातून समोरच्या किल्ल्याचे होणारे दर्शन, खालील बाजूस असणारा नयनरम्य अगस्ती तलाव, त्याच्या काठावरील भूतनाथ, मल्लिकार्जुन मंदिरे केवळ अद्भुतरम्य.
अगस्ती तलाव आणि समोरील बाजूचे वरचे शिवालय आणि बदामीचा किल्ला
भूतनाथ मंदिराचे होणारे मोहक दर्शन
अगस्ती तलाव, वरचे शिवालय
निसर्ग आपले विभ्रम दाखवताना
सूर्य मावळतीला लागला आणि त्याच सुमारास चंद्र उगवू लागला. आम्ही बदामीच्या गुहा उतरुन वाहनतळानजीक आलो.
तिथून लगेचच मशिदीच्या बाजूने अगस्ती तलावावर गेलो. काठावर एक अत्यंत सुंदर मंदिर आहे. वेस्सर (द्राविड आणि नागरी मिश्र शैली) शैलीतील हे मंदिर कमालीचे देखणे आहे. मूर्तीकाम नाही.
मंदिराच्या पुढ्यातील अगस्ती तलाव व समोरील बाजूस असणारे भूतनाथ मंदिर
आता अंधार वेगाने पडू लागला होता व आमचे उद्याचे लक्ष्य होते ते ऐहोळे आणि पट्टदकल येथील मंदिरसमूह. सकाळी लवकरच निघायचे असल्याने रूमवर जाऊन जेवण करुन थोड्याफार गप्पा मारुन लगेचच झोपी गेलो.
अर्थात दुसर्या दिवशी जरी आम्ही ऐहोळेला गेलो असलो तरी लेखमाला भौगोलिक दृष्ट्या संलग्न व्हावी म्हणून आम्ही तिसर्या दिवशी केलेल्या बदामी लेण्यांच्या समोरील बाजूस असलेल्या खालचे आणि वरचे शिवालय, बदामी किल्ला आणि भूतनाथ मंदिराची सफर आधी सांगेन अणि मगच ऐहोळे-पट्टदकलविषयी लिहायला घेईन.
क्रमशः
प्रतिक्रिया
13 Dec 2022 - 9:49 am | कर्नलतपस्वी
आपण हाक मारली होती पण विधिलिखित काही वेगळेच होते. मागेवळून पहाता नाही जमले एक प्रकारे बरे झाले .
निर्विवाद, लेख सुदंर आहे. तुमच्या व्यासंगाला सलाम.
13 Dec 2022 - 9:54 am | कंजूस
सुंदर फोटो, इतिहास आणि समर्पक वर्णन यामुळे लेख वाचनीय झाला आहे. सर्व भाग आल्यावर पुन्हा सलग वाचणार. बदामी किल्ला अगस्ती तलावाच्या दोन्ही बाजूंच्या डोंगरांवर वाटला गेला आहे तसेच वेगळ्याच तांबूस रंगाच्या खडकाचा आहे त्यामुळे इथे फोटोग्राफीचा भरपूर वाव आहे. सूर्यास्त आणि चंद्रोदयही लेणी डोंगराच्या पार्श्वभूमीवर फारच सुंदर आले आहेत.
इथे आल्यावर आपण अचानक त्या काळात जातो आणि गावाचा विसर पडतो.
13 Dec 2022 - 10:23 am | सौंदाळा
जबरदस्त
वल्ली होमपीचवर. प्रवास वर्णन, चालुक्य ईतिहास, शिल्पांची माहिती आणि अर्थातच सुंदर फोटो. सगळेच आवडले.
पुभाप्र.
13 Dec 2022 - 10:44 am | आंद्रे वडापाव
ये बात कुछ हजम नही हुई ...
त्याकाळी ९९००० हजार गावे महाराष्ट्रात असतील का ?
आज सुद्धा महाराष्ट्रात तेव्हडी गावे नाहीत ...
13 Dec 2022 - 12:32 pm | प्रचेतस
हा आकडा अतिशयोक्त आहेच ह्यात काहीच शंका नाही, प्रशस्ती म्हणजे थोडीफार अतिशयोक्ती आलीच. अर्थात प्रस्तुत लेखातील ३ महाराष्ट्र कोणते याचा उलगडा आजतागायत पूर्णपणे झाला नाहीये. उत्तर कर्नाटक, मध्य व पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ व मध्यप्रदेशातील मिळून तो भाग असावा असे ढोबळमानाने म्हणता येईल, आजच्या महाराष्ट्रातील सीमांशी प्रस्तुत लेखातील महाराष्ट्राशी तुलना करणे अयोग्य होईल.
13 Dec 2022 - 11:07 am | मनो
काही शिल्पे काळी पडली आहेत ती पाण्यामुळे?
13 Dec 2022 - 12:39 pm | प्रचेतस
शिल्पे काळी पडली नसून बदामीचे खडकात लाल, गुलाबी, पांढरा, पिवळ्या, करड्या, काळ्या, राखाडी अशा असंख्य रंगांच्या विविध छटा आहेत. त्यानुसार येथील शिल्पांचा रंग देखील बदलत असतो, शिवाय येथील काही शिल्पे ही अंधारात असून छायाचित्रेही केवळ मोबाईलवरच काढलेली आहेत त्यामुळेही ती काहीशी काळी दिसतात.
14 Dec 2022 - 2:31 am | मनो
अरे हो, फोटो नीट पाहिल्यावर समजले, धन्यवाद.
13 Dec 2022 - 1:26 pm | आंद्रे वडापाव
चालुक्यांचे आजचे वंशज, हे आजचे साळुंखे / सोळंकी / चाळके आहेत असे म्हटले जाते ...
तसेच मौर्यांचे मोरे , वाकाटकांचे वाकटे कोकाटे, सातवाहनांचे सातकर्णीचे सातपुते, गुप्तांचे गुप्ते, होयसळांचे भोसले, यादवांचे यादव जाधव,
परमारांचे पवार, क्षहारातचे खरात, कदंबाचे कदम ... असे अनेक ... राठोड चव्हाण अशी अनेक आडनावे यांची नाळ इतिहासात जोडली जाते ... त्यात कितपत तथ्य आहे ?
14 Dec 2022 - 7:49 am | प्रचेतस
ह्याबद्दल खरेच काही सांगता येणार नाही, आपले आडनाव एखाद्या श्रेष्ठ कुलाला जोडले गेले पाहिजे अशीही अनेकांना सुप्त इच्छा असते. देवगिरीच्या यादवांनी आपले कुल श्रीकृष्णाच्या यादव कुलाला जोडले होते. खुद्द उत्तर चालुक्यांच्या एका लेखात ते ईक्ष्वाकू यांची राजधानी हे चालुक्यांचे मूळ स्थान असल्यानचे म्हणतात तसेच त्यांची वंशावळ पांडवांपासून आली आहे असे म्हणतात, अर्थातच ह्यात तथ्य नाही पण आपले कुल एखाद्या श्रेष्ठ कुलाला जोडण्याची परंपरा प्राचीन काळापासून सुरू होती हे यात दिसून येते.
13 Dec 2022 - 1:28 pm | सस्नेह
जबरी इतिहास आणि फोटो.
कित्येक वेळा बदामीला गेले असेन पण लेण्यांची खरी ओळख आज या लेखामुळे झाली.
धन्यवाद.
13 Dec 2022 - 2:14 pm | श्वेता२४
चालुक्यांचा इतिहास व लेण्यांची इत्थंभूत माहिती वाचत असताना प्रत्यक्षात तिथेच जाऊन पाहत आहोत हे सगळं असं वाटलं मला. तुमचे लेख वाचून नेहमीच ज्ञानात भर पडत असते. फोटोही सुंदरच. पुढील भागांची आतुरतेने वाट पाहत आहे. धन्यवाद.
13 Dec 2022 - 4:08 pm | गोरगावलेकर
फोटोसहित सविस्तर वर्णन इतिहास, इतर माहिती सर्वच भारी.
13 Dec 2022 - 8:40 pm | चित्रगुप्त
अतिशय अद्भुत आहे हे सगळे. शिरसाष्टांग नमस्कार.
द्रोण DRONE चा वापर करून केलेले इटली वगैरेंचे विडियो अलिकडे खूप बघितले. तसे करण्याची शक्यता कितपत आहे ?
(याविषयी काही कायदेशीर , तांत्रिक अडचणी असू शकतात त्याबद्दल मला काहीच माहिती नाही)
(आत्ताच बदामीबद्दल Amazing Places on Our Planet या तूनळीवरील चॅनेलचा विडियो पण बघितला).
आणखी एका अमूल्य धाग्याबद्दल अनेक आभार.
14 Dec 2022 - 7:50 am | प्रचेतस
धन्यवाद काका.
बदामीचे ड्रोन व्हिडिओ नक्कीच असतील, अर्थात पाहिले नाहीत कधी.
14 Dec 2022 - 2:17 pm | पॉइंट ब्लँक
खुप सुंदर फोटोज आणि माहिती वाचुन ज्ञानात बरिच भर पडली.
एक शंका - अर्धनारीश्वर च्या फोटोमध्ये वरती ज्या छोट्या मुर्ती आहेत त्या काय आहेत? निधि/यक्ष्/गण?
15 Dec 2022 - 2:34 pm | प्रचेतस
छोट्या मुर्ती आहेत त्या काय आहेत? निधि/यक्ष्/गण?
ते आकाशगामी गंधर्व किंवा विद्याधर असतात.
14 Dec 2022 - 3:07 pm | Bhakti
खुपचं सुंदर वारसा आहे.चालुक्य इतिहासही लिहिला हे छान झालं.(योगायोगाने PS-1 सिनेमा पाहत आहे, त्यामुळे हे वाचतांना अधिक रंजक वाटले) महाराष्ट्रमधील आणि इथले शिल्पांसाठीचे दगड वेगळे वाटत आहेत.
विष्णू -महेश वैष्णव -शैव संगम अद्भुत आहे.
महिषासुर मर्दिनी मुर्तीं एकमेवद्वितीय वाटतेय.पहिल्यांद पाहतेय.
त्रिविक्रम पेडगाव मंदिर लेखापासूनच समजला होता.
14 Dec 2022 - 3:08 pm | Bhakti
खुपचं सुंदर वारसा आहे.चालुक्य इतिहासही लिहिला हे छान झालं.(योगायोगाने PS-1 सिनेमा पाहत आहे, त्यामुळे हे वाचतांना अधिक रंजक वाटले) महाराष्ट्रमधील आणि इथले शिल्पांसाठीचे दगड वेगळे वाटत आहेत.
विष्णू -महेश वैष्णव -शैव संगम अद्भुत आहे.
महिषासुर मर्दिनी मुर्तीं एकमेवद्वितीय वाटतेय.पहिल्यांद पाहतेय.
त्रिविक्रम पेडगाव मंदिर लेखापासूनच समजला होता.
14 Dec 2022 - 4:18 pm | आंद्रे वडापाव
पण PS 1 तर चोला साम्राज्यातील कथानक आहे ना ?
चालुक्यां चा काय संबंध ?
14 Dec 2022 - 4:45 pm | Bhakti
संबंध नाहीये का? मी रोज १/२ तासच पाहते सिनेमा,आठवडाभर बघेन.
पण चोला, राष्ट्रकुट आहे वाटलं चालुक्य पण असेल.
14 Dec 2022 - 5:12 pm | आंद्रे वडापाव
14 Dec 2022 - 5:18 pm | आंद्रे वडापाव
चालुक्य मराठी-कन्नड
चोला तामिळ
14 Dec 2022 - 5:13 pm | आंद्रे वडापाव
17 Dec 2022 - 3:56 pm | Bhakti
@आंद्रे
ती शेवटी पाण्यातली देवी ऐश्वर्या म्हणजे मंदाकिनी ना.
15 Dec 2022 - 5:53 am | प्रचेतस
अर्थात पीएस -१ हा चोळ राजवटीवर आधारीत सिनेमा असला तरी भावांच्या मुलांमध्ये सत्तेसाठी होणारी यादवी पार महाभारत काळापासून चालत आलेली आहे. अगदी देवगिरीच्या यादवांमध्येही असाच संघर्ष झाला. कृष्ण यादवांच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा रामदेव हा अल्पवयीन असल्याने कृष्णाचा धाकटा बंधू महादेव हा देवगिरीवर सत्तेवर आला. महादेवाच्या मृत्यूनंतर सिंहासन रामदेवाला न मिळता महारदेवाच्या मुलाला आमणदेवाला मिळाले. रामदेवाला हे सहन न होऊन त्याने सामतांच्या साहाय्याने आमणदेवाला पदच्युत केले आणि स्वतः राजा झाला. आमणाचे डोळे काढियले अशी एक महानुभवी गाथा आहे.
15 Dec 2022 - 8:58 am | आंद्रे वडापाव
मी असं ऐकलंय / वाचलंय (चू भू दे घे )... कि
जय काव्य (महाभारत) हे सातवाहनांनी , तत्कालीन थोर कवी ऋषींना आश्रय देऊन लिहवून घेतले ...
म्हणजे सातवाहन काळात हे काव्य लिहिण्यास सुरुवात झाली ... पुढं सर्वानी आपल्याला रुचेल त्या प्रमाणे त्यात भर घातली , किंवा वगळलं किंवा संपादन केले ...
15 Dec 2022 - 2:36 pm | प्रचेतस
सातवाहनांनी , तत्कालीन थोर कवी ऋषींना आश्रय देऊन लिहवून घेतले ...
यात काही तथ्य नाही. भर त्याआधीच पडत होती.
16 Dec 2022 - 7:59 am | गवि
श्री. रा. रा. प्रचेतस यांसी, सादर प्रणाम.
आपण थोर आहात. संदर्भसंपृक्त, मुद्देसूद, सचित्र, सटीप लिहिण्यात आपले नाव अव्वल आहे. आपण प्रा. डॉ. प्रचेतस बनण्याचे कधी मनावर घेतले आहे का? सहज होईल.
बदामी हे ठिकाण अद्भुत आहे हे आता कळलं. बकेट लिस्टमध्ये हंपीनंतर ही भर पडली. हा लेख वास्तविक ३ भागांचे मट्रीयल आहे.
असेच भटकंती करून लिहीत रहा.
16 Dec 2022 - 10:48 am | कंजूस
ओडिओ फाईल काढाव्यात. त्या ऐकत एकेका लेण्यासमोर,मूर्तीसमोर उभे राहून ओडिओ ऐकत समजून घ्यायला सोपे पडेल. काही म्युझियममध्ये ही व्यवस्था असते. नेहरू सेंटर,वरळी येथे तिथले डिस्कवरी ओफ इंडिया प्रदर्शन पाहता येते.
16 Mar 2023 - 2:58 pm | राजेंद्र मेहेंदळे
वल्लीचे ज्ञान म्हणजे मिपासाठी मोठाच ठेवा आहे. तो जतन व्हायला हवा. ऑडिओ फाईल केल्या तर सहज जमुन जाईल. मोबाईलवर रेकॉर्ड करायला अनेक पर्याय आहेत. मी "ऑडिओ रेकॉर्डर" नावाचे अॅप वापरतो. त्यत एम पी३ फाईल्स बनतात ज्या नंतर ईमेल करता येतात. लॅपटोपवर असल्यास ऑडासिटी पण छान आहे. पण तुम्हाला विनंती की पुस्तक नाही तर हे रेकॉर्डिंगचे मात्र मनावर घ्याच. आणि जिथे जिथे जाल तिथे तिथे रेकॉर्ड करत चला. जर व्हिडिओ केलेत तर तूनळीवर लाखानी हिट्स मिळतील. मी तांत्रिक मदत करायला तयार आहे.
अवांतर--रेवतीद्विप कोकणच्या मौर्यांकडून त्याने जिंकून घेतले रेवतीद्विप कोकणच्या मौर्यांकडून त्याने जिंकून घेतले अप्पा परब म्हणतात की जावळीचे मोरे हे समुद्रा पासुन मागे हटत हटत शेवटी जावळीत आले. तेही प्रचंड मोठे कुटंब होते. तेच हे मौर्य असावेत काय?
16 Mar 2023 - 3:11 pm | गवि
ऑस्ट्रियातील एका नाझी छळछावणीत (जिचं रुपांतर आता स्मारकात केलं आहे) असे ॲप बेस्ड ऑडियो लावून फेरफटका मारता येतो. अनेक एकरांचा भव्य परिसर आहे. गाईड वगैरे नाहीच. आपण हेडफोन लावून फिरायचे. जिथे महत्त्वाचे स्पॉट्स आहेत तिथे एखाद्या स्तंभ किंवा पाटीच्या रुपात एक क्रमांक असतो. जर मोबाईल सेटिंगमध्ये लोकेशन ऑन करायचे नसेल तर तो नंबर सिलेक्ट करायचा. लोकेशन चालू असल्यास ॲप आपोआप तुम्ही कुठे आहात ते जाणून तेथील माहिती द्यायला सुरुवात करते.
अशीच साधारण व्यवस्था अमस्टरडॅम येथील कॅनाल मधून बोटीने फिरताना आहे. त्यात तर भाषा बदलण्याची देखील सोय आहे. अगदी मराठी हिंदीत देखील ऐकता येते. Gps लोकेशन वरून बरेच काही करता येते. अजिंठा वेरुळ येथे अशी सोय नसल्यास प्रचेतस यांची माहिती वापरून तसे बनवले जावे. फार उत्कृष्ट होईल.
17 Mar 2023 - 10:13 am | प्रचेतस
रेकॉर्डिंगचा प्रयोग कधी केला नाही पण एकदा करून बघावा म्हणतो.
जावळीचे मोरे यांचे पूर्वज हे कोकणचे मौर्य असण्याची शक्यता आहेच, मात्र ह्या कोकण मौर्यांबद्दल इतिहास बराचसा मुग्ध आहे. घारापुरीची लेणी ह्यांनीच कोरवली असा एक समज आहे.
18 Dec 2022 - 11:45 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अतिशय सुंदर, आणि माहितीपूर्ण लेखन. सर्वशिल्पे चित्रेही स्पष्ट आली आहेत.
लिहिते राहा.
-दिलीप बिरुटे
20 Dec 2022 - 11:07 am | अनिंद्य
तुमचे लेख आवर्जून वाचावे असे असतात, हा तसाच लेख - माहिती, चित्रे, तपशील सगळेच लक्षवेधी.
मालिका उत्तम होणार यात शंका नाही, पुढील भागांची वाट बघतो आहे.
22 Dec 2022 - 6:31 pm | टर्मीनेटर
वाह! सुंदर लेख आणि फोटो. चलुक्यांचा इतिहासही आवडला 👍
सर्वच लेण्यांतली शिल्पे आवडली पण 'हरीहर' आणि 'अर्धनारीश्वर' ह्या शिल्पांतले बारकावे समजल्यावर ही दोन विषेश आवडली.
पुढिल भागाच्या प्रतिक्षेत आहे!
30 Dec 2022 - 4:37 pm | प्रशांत
प्रवास वर्णन...
ईतिहास तसेच शिल्पांची माहिती...
आणि हो फोटो बेस्ट.
21 Jan 2023 - 3:38 pm | अत्रुप्त आत्मा
प्रच्ण्ड मोहक परिसर आहे.