शब्दकोशांच्या मनोरंजक विश्वात

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
30 Jun 2017 - 7:00 pm

माध्यमिक शाळेत असताना आम्हाला रोजच्या वेळापत्रकात दोन मधल्या सुट्या असायच्या – एक लहान १५ मिनिटांची तर दुसरी मोठी ४५ मिनिटांची. मोठ्या सुटीमध्ये शाळेच्या ग्रंथालयात आमच्यासाठी वाचनाची सोय केलेली असे. तिथे बसून वाचताना समोरच्या भिंतीवर नजर जाई. तिथे मोठ्या व आकर्षक अक्षरात ‘ग्रंथ हेच गुरु’ हे वचन लिहिलेले होते. वाचनाच्या आवडीतून त्या वचनाची सत्यता पटत गेली, यात शंकाच नाही. मोठे होता होता मी विविध प्रकारचे तीन भाषांतील साहित्य वाचत गेलो आणि एका निष्कर्षाप्रत येउन ठेपलो. तो म्हणजे, या सर्व ग्रंथरूपी गुरूंचे गुरु म्हणजे शब्दकोश!

सुरवातीला वाचनात एखादा शब्द अडला, की त्याचा अर्थ पाहण्यापुरता शब्दकोश उघडला जाई. तो जमाना अर्थात फक्त छापील पुस्तकांचाच होता. त्या वयात मी शब्दकोशाच्या जाडजूड ‘प्रकृती’कडे कुतूहलाने बघत असे. शालेय जीवनात शब्दकोशाचा उपयोग शब्दार्थ पाहण्यापुरताच सीमित होता. तेव्हा इंग्लिश–मराठी, मराठी-इंग्लिश आणि हिंदी-मराठी हे शब्दकोश हाताळले जात.

महाविद्यालयीन जीवनात ‘ब्रिटीश लायब्ररी’ चा सभासद झाल्यावर काही थोर इंग्लिश लेखक वाचायला घेतले. तेव्हा इंग्लिश पुस्तकांचे वाचन म्हणजे एक अभ्यासच असायचा. हातात ते पुस्तक, टेबलावर इं-मराठी शब्दकोश आणि शब्दार्थ टिपून घ्यायला बाजूला वही-पेन. वाचलेल्या साहित्याची काही वडीलधाऱ्यांशी चर्चा होई. त्यात एका गृहस्थांनी सल्ला दिला, की आता शब्दार्थ पाहण्यासाठी तुमच्या शालेय शब्दकोशावर समाधान मानू नकोस; आता गरज आहे ती तू ‘Oxford’ ची कास धरण्याची.

मग मी Concise Oxford च्या इंग्लिश- इंग्लिश कोशाची खरेदी केली. सहज म्हणून हा कोश चाळू लागलो अन पहिल्या नजरेतच लक्षात आले, की हा निव्वळ शब्दकोश नसून साक्षात ज्ञानकोश आहे. त्यात एखाद्या शब्दाचे अनेक अर्थ देण्यासाठी पुस्तकाच्या पानाचा तब्बल एक स्तंभही खर्ची पडलेला दिसे. एखाद्या कठीण शब्दाचा अर्थ पाहण्यासाठी म्हणून कोश उघडला जाई आणि तो अर्थ पाहता पाहता एकातून दुसऱ्या व त्यातून तिसऱ्या शब्दात मी उड्या मारत असे. कित्येकदा शब्दार्थासाठी उघडलेला कोश पाहताना वाचनाचे मूळ पुस्तक बाजूलाच राही आणि बराच वेळ मी शब्दकोशातच मनसोक्त विहार करीत असे. शब्दाच्या अर्थाबरोबरच त्याचा उगम, ऐतिहासिक संदर्भ इत्यादी माहिती वाचून छान मनोरंजन होई.

बऱ्याचदा आपल्या नेहमीच्या वापरातले शब्दसुद्धा कोशात पाहण्यात मजा येते. उदाहरणार्थ ‘August’ हा शब्द पाहा. आता हे एका महिन्याचे नाव आहे हे शाळकरी पोरही सांगते. पण ते नाव रोमन साम्राज्याचा पहिला राजा ऑगस्टस सीझर याच्यावरून आहे, तसेच august चा दुसरा अर्थ ‘थोर’ असाही आहे हे ज्ञान आपल्याला शब्दकोशात डोकावल्याशिवाय कसे मिळेल? एखाद्या शब्दाला तर एकापेक्षा अनेक असे कित्येक अर्थ असतात आणि त्या अर्थांचा एकमेकाशी सुतराम संबंध नसतो. ‘set’ चे तब्बल १५६ प्रकारचे अर्थ आहेत हे जेव्हा आपल्याला कोशात दिसते तेव्हा मोठा अचंबा वाटतो.

एकच उच्चार पण भिन्न स्पेलिंग व अर्थ असणारे शब्द जेव्हा आपण कोशात पाहून पक्के करून घेतो तेव्हा होणारा आनंद काही वेगळाच असतो. सध्याच्या ‘ हॅलो, हाय’च्या युगात बहुतेकांना फोनवरचाच ‘हॅलो’ माहित असतो. पण, शब्दकोश बारकाईने पाहणाऱ्यालाच hallo, hallow & halo यांतील फरक समजलेले असतील.

आपल्या देशात गेल्या पंचवीस वर्षांत इंग्लिश माध्यमातून शालेय शिक्षण घेणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय दिसून येते. ही पिढी ‘स्पोकन इंग्लिश’ च्या बळावर येताजाता टूरटूर करीत असते. पण त्याचबरोबर त्यांचे स्पेलिंग व व्याकरण यांकडे कमालीचे दुर्लक्ष झालेले जाणवते. अशा काहींची फिरकी घ्यायला मला आवडते. त्यांना मी ‘फुलस्केप’ या परिचित शब्दाचे स्पेलिंग विचारतो. आतापर्यंत तरी मला हे अचूक स्पेलिंग सांगणारी व्यक्ती भेटलेली नाही. याचे स्पेलिंग आहे ‘foolscap’ आणि योग्य उच्चार आहे ‘फुल्झकॅप’. हे ज्ञान शब्दकोशाला आपला मित्र केल्याशिवाय प्राप्त होणे नाही! मोठ्या आकाराचा कागद म्हटल्यावर बहुतेकजण ‘full…’अशी सुरवात करतात अन fool होऊन बसतात! या शब्दाचा उगम तर किती मनोरंजक. Fool म्हणजे विदूषक. पुरातनकाळी विदूषक जी टोपी वापरत त्या टोपीचे चिन्ह ‘watermark’ म्हणून या कागदात उमटवलेले असे.

‘फुलस्केप’ वरून घडलेला एक किस्सा सांगतो. एका माध्यमिक शाळेत सत्राच्या पहिल्या दिवशी एक शिक्षिका विद्यार्थ्यांना म्हणाल्या, “हे बघा, सर्वांनी ‘फुलस्केप’ वह्या आणायच्या आहेत, ‘हाफस्केप’ वह्या आणलेल्या मला अजिबात चालणार नाहीत!” एखादा शब्द नीट न शिकून घेतल्याचे परिणाम एका पिढीकडून पुढच्यांकडे कसे संक्रमित होतात याचे हे उदाहरण.

गडद काचांच्या चष्म्याला आपण ‘गॉगल’ म्हणतो यात नवीन काहीच नाही. पण या शब्दाचे स्पेलिंग goggles असून ते अनेकवचनी नाम म्हणूनच वापरायचे असते ही दृष्टी मला शब्दकोशानेच दिली. आपल्या समाजात एखाद्याने ‘लेस्बिअन’ हा शब्द जरी उच्चारला तर आपण पटकन चमकून त्याच्याकडे पाहतो. जर उत्सुकता म्हणून आपण हा शब्द कोशात पाहिला तर त्याचा उगम पाहून आपली करमणूक होते. ‘lesbos’ नावाच्या बेटावर ‘साफो’ नावाची कवयित्री राहत असे आणि ती समलिंगी संबंधात गुंतल्याचा लोकांना संशय होता. ही माहिती समजल्यावर या शब्दाकडे आपण अश्लील म्हणून न पाहता कुतूहलाने पाहू लागतो.

आजकाल आपले एखादे कार्यालयीन काम होणे जर एखाद्या स्त्रीच्या हातात असेल तर तिच्या तेथील दर्जाचा विचार न करता आपण तिच्यापुढे सारखे ‘Madam, Madam’ करीत असतो. आता ‘madam’ चे कोशातील दोन अर्थ बघा. या शब्दाचा उगम फ्रेंचमधून आहे.त्याचा पहिला अर्थ ‘बाईसाहेब’ असा तर दुसरा चक्क ‘वेश्यागृहाची मालकीण’ असा आहे! तसेच या शब्दाचे अनेकवचन( madams असे नसून) फ्रेंच पद्धतीने Mesdames असे आहे. सध्या सर्वत्र बोकाळलेल्या मॅडमांनी हा शब्द पूर्णपणे समजून घ्यायला काही हरकत नाही.

वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश घेतल्यापासून ते डॉक्टर होऊन तीस वर्षे उलटून गेल्यावरही वैद्यकीय शब्दकोश हा तर माझा जिवलग मित्र आहे. त्याच्या पातळ पांढऱ्याशुभ्र कागदावर परदेशात केलेली सुंदर छपाई, त्याचा लठ्ठ पण मोहक आकार, त्यातील अवघड शब्दांची केलेली सुरेख फोड, शब्दार्थांचा पाडलेला कीस आणि शब्दानुरूप चित्रे ही त्याची वैशिष्ट्ये मला नेहमीच मोहित करतात. सामान्य वाचकांसाठी त्यातले दोन मनोरंजक शब्द सांगतो:

१. AC/DC : खरे तर आपल्या सामान्यज्ञानानुसार हे विद्युत प्रवाहाचे दोन प्रकार आहेत. पण वैद्यकीय कोशातील त्याचा अर्थ ‘bisexual individual’ असा वाचल्यावर आपण कपाळावर हात मारून घेतो!
२. Hartnup disease : हा एक आनुवंशिक आजार आहे. आता Hartnup हे बहुधा ज्या शास्त्रज्ञाने तो आजार शोधला त्याचे नाव असेल असा अंदाज आपण बांधतो. पण शब्दकोशाचा पाहा काय सांगतो ते. Hartnup हा शास्त्रज्ञ नसून, तो आजार ज्या रुग्णामध्ये पहिल्यांदा आढळला त्याचे आडनाव आहे. १९५० च्या सुमारास ब्रिटनमधील श्री. हार्टनप यांनी आपल्या cousinशी लग्न केले होते. त्या दाम्पत्याला झालेल्या आठ अपत्यांपैकी चौघांमध्ये हा आजार आढळून आला.

मराठी-मराठी कोश हाताळणे ही सुद्धा एक चांगली करमणूक आहे. बऱ्याचदा मराठी कोश बघण्याच्या बाबतीत मराठी माणूस उदासीन असतो. आपल्या दैनंदिन वापरातील काही मराठी शब्दांचा खरा अर्थ हा कोश पाहिल्यावरच आपल्याला समजतो. अन्यथा त्याऐवजी काहीतरी चुकीची कल्पना किंवा अर्धवट माहिती आपल्या डोक्यात असते. एकदा एका कॉलेजच्या तरुणाला मी ‘आदिवासी’ चा अर्थ विचारला. क्षणाचाही विलंब न लावता तो म्हणाला, “ते म्हणजे अति मागास गरीब लोक”. त्याच्या म्हणण्यात जरी तथ्य असले तरी खरा अर्थ तो नाही. ‘आदी’= मूळ व ‘वासी’= राहणारे. म्हणजेच, एखाद्या प्रदेशातील मूळ रहिवासी.

आपल्याकडे पाटील, कुलकर्णी, कांबळे ही अगदी सर्रास आढळणारी आडनावे. एकदा सहज म्हणून ‘कुलकर्णी’ ची व्युत्पत्ती कोशात बघितली आणि स्तिमित झालो. ती बघण्यापूर्वी, ‘कुलकर्णी’ हा शब्द अस्सल मराठीच – एवढेच काय, पण पक्का पुणेरीच- या भ्रमात मी होतो. शब्दकोशाने मला सांगितले, की हा शब्द मूळ तेलुगु (कुळकरणी) आहे. कुळ = शेतकरी आणि करण = हिशेब. हे वाचल्यावर मला एका ‘कुळाचा’ शोध तर लागलाच आणि त्याचबरोबर माझ्या भाषिक अस्मितेचे कुंपण गळून पडले, हे नक्की!

शब्दकोशांमध्ये काही व्यवहारोपयोगी परिशिष्टेही असतात. निरनिराळ्या लघुरुपांचे (acronyms) पूर्ण रूप देणारे परिशिष्ट हे त्यातले एक ठळक उदाहरण. सध्याच्या संगणकीय युगात कित्येक नवीन लघुरुपांचा सुळसुळाट झालेला आहे. अशी काही लघुरूपे आपल्या डोळ्यांसमोर सतत आल्याने हळूहळू आपल्याला ते जणू काही शब्दच आहेत असे वाटू लागते. एक उदाहरण देतो. सध्या कोणताही online व्यवहार करताना आपल्याला सतत भेटणारे एक लघुरूप म्हणजे ‘CAPTCHA’. त्याचे दीर्घरूप किती मनोरंजक आहे आणि त्यामागचा तांत्रिक इतिहास काय आहे, ते आपल्याला कोश पाहिल्याशिवाय कळणे नाही!

आपले ज्ञान समृद्ध करतानाच आपल्यावर मनोरंजनाचाही शिडकावा करणारे विविध शब्दकोश आपल्या वापरात जरूर असावेत. माझ्याकडे विविध प्रकारचे सुमारे डझनभर कोश आहेत. आंतरजालाच्या व्यापक प्रसारानंतर आता अनेक प्रकारचे कोश जालावर उपलब्ध आहेत. त्यामुळे जाडजूड वजनाचे छापील कोश आता एखाद्याच्या वैयक्तिक ग्रंथसंग्रहात कमी दिसतात. पण, माझी पिढी ही मुळात अशा छापील कोशांवर ‘पोसली’ गेली असल्याने माझ्याकडे ते आजही आहेत. माझे त्यांच्यावर इतके प्रेम आहे की मी त्यांना माझे कुटुंबघटकच मानतो! माझ्या घरभर ते विखुरलेले आहेत. त्यापैके एक-दोघांनी तर माझ्या पलंगावर विसावण्याचा मान पटकावलाय. वेळप्रसंगी माझ्या एकटेपणात ते माझी सुरेख सोबत करतात. धष्टपुष्ट छापील कोशाला प्रेमाने उराशी कवटाळण्याची मजा काही औरच असते. त्याची सर जालकोशाच्या ‘सर्च इंजिन’ला कशी येईल?

एखादे दिवशी जर हाताशी वाचण्यासारखे काही नसेल तर मी खुशाल एखादा कोश हाती घेऊन त्यात डोके खुपसून बसतो. दिवसाकाठी निदान एकतरी नवीन शब्द मी कोशांमधून शिकतो व समजावून घेतो. ग्रंथाचे गुरु असलेल्या शब्दकोशांनी मला ज्ञान आणि मनोरंजन या दोन्ही पातळ्यांवर अतीव समाधान दिलेले असल्याने मी त्यांचा कायमचा ऋणी आहे.
*****************************************************************************
( टीप : माझ्या या लेखाची पूर्वप्रसिद्धी : ‘अंतर्नाद’ मासिक. काही सुधारणांसह येथे प्रकाशित )

भाषालेख

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

17 Oct 2021 - 7:02 pm | कुमार१

सध्या bruhadkosh.org हा ऑनलाईन दिसत नाहीये. तिथे खालील संदेश येतोय :
This Account has been suspended

कोणी जाणकार मदत करू शकेल का ?

कुमार१'s picture

20 Oct 2021 - 1:43 pm | कुमार१

ते संस्थळआजपासून चालू झालेले आहे. इच्छुक लोक लाभ घेऊ शकतात.

कुमार१'s picture

22 Nov 2021 - 5:45 pm | कुमार१

गेल्या वीस वर्षांत ब्रिटिश इंग्लिशमध्ये जो फरक पडला आहे, त्याचा एक चांगला अभ्यास इथे आहे. त्यानुसार
whom, upon & shall

या तीन शब्दांचा वापर बऱ्याच प्रमाणात (सुमारे पन्नास टक्के) कमी झालेला आहे.

कुमार१'s picture

4 Dec 2021 - 11:47 am | कुमार१

ऑक्सफर्ड इंग्लिश शब्दकोशाचा यंदाचा (२०२१) मानाचा शब्द vax असून ते नाम व क्रियापद अशा दोन्ही अर्थाने वापरता येते :

vax = vaccine or vaccination (नाम)
= vaccinate (क्रियापद).

कुमार१'s picture

25 Dec 2021 - 9:33 am | कुमार१

कोशनिर्मिती संबंधी एक सुंदर लेख :

त्यातले काही रंजक :

कोश-योगातला आणखी एक मोठा रंजक नमुना जरूर पाहा! भलतीच निराळी माहिती आणि भरपूर आश्चर्यकारक कथा, आख्यायिका, व्युत्पत्ती त्यामध्ये आढळतील! त्या कोशाचे नाव ‘हॉबसन-जॉबसन’! इंग्रजांना भारतीय उच्चार कधी सहज आणि नीट उमगायचे नाहीत. प्राण गमावलेल्या हसन-हुसेन यांचा शोक मोहरमच्या मिरवणुकीत दरवर्षी होतो; त्या हसन-हुसेनचा उच्चार इंग्रजी कानाला हबसन जाबसन असा ऐकू येई! तसेच ते शब्द लिहिले जात. इतके की कालांतराने हे अर्धवट किवंडे आणि बोबडे शब्द इंग्रजीत रूढावले गेले. अशा शब्दांचा एक थोराड कोश म्हणजे हबसन-जॉबसन. जगन्नाथचे जगरनॉट कसे झाले? कुप्रसिद्ध फोरासरोड या भागाचे नाव तसेच का पडले? अशा कितीतरी रंजक कथा आणि चुटक्यांनी भरलेला हा कोश!

कुमार१'s picture

25 Dec 2021 - 9:38 am | कुमार१

वरील मजकुरातील ' किवंडे' चा अर्थ कोणाला माहित आहे का ?
शब्द गोड आहे...

जेम्स वांड's picture

25 Dec 2021 - 10:06 am | जेम्स वांड

किवंडे - किरकिरे, किरकिर करणारे पात्र

शब्दाचा वाक्यात वापर

१. काय किवंडं पोरगं आहे (उच्चारी क्युडं)

२. खिडकी बंद झाली म्हणल्यावर नेमका तेव्हाच नंबर लागलेला माणूस किवंडायला लागला.

कुमार१'s picture

25 Dec 2021 - 10:23 am | कुमार१

धन्यवाद !
कोणाला कोश संदर्भ मिळाला तर जरूर द्या
मी पण शोधत आहे

कुमार१'s picture

25 Dec 2021 - 11:40 am | कुमार१

थोड्याफार फरकाने इथे संदर्भ मिळालाय:

किंवडा-डू, किवढ्या
पु. (तंजा.) बहिरा. [का. किवी = कान, किव्ड = बहिरा]

दाते शब्दकोश
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B0%...

पण त्यांनी कि वर अनुस्वार दाखवला आहे.
लोकसत्तातील लेखात मुद्रणदोष झालेला असू शकेल.

कुमार१'s picture

1 Feb 2022 - 6:33 pm | कुमार१

काही इंग्लिश भाषातज्ञांनी विस्मरणात गेलेल्या काही प्राचीन शब्दांचे पुनरुज्जीवन करायचे ठरवले आहे.
त्यापैकी respair (नवी आशा) हे एक ठळक उदाहरण आहे. हा शब्द सन १५२५मधला आहे.

तज्ञांच्या मते इंग्लिश भाषेला काहीसे नकारात्मक वळण जास्त लागलेले आहे. बऱ्याच मूळ सकारात्मक शब्दांचे नकारात्मक रूप काळाच्या प्रवाहात टिकवून ठेवले जाते; परंतु मूळ शब्दच मागे पडतात.

unkempt हे पण एक ठळक उदाहरण आहे. kempt हा मूळ शब्द पूर्वी विशेषण म्हणून वापरला जायचा.

कुमार१'s picture

8 Apr 2022 - 10:49 am | कुमार१

आज एका नव्या अनधिकृत शब्दाचा परिचय करून देतो. हा शब्द तुम्हाला गुगलून सापडणार नाही कारण तो अजून शब्दकोशात आलेला नाही. परंतु अलीकडे तो आरोग्यविज्ञान क्षेत्रात वापरला जातोय.

हा शब्द आहे "farmacy"
स्पेलिंग आणि उच्चारावरून थोडा अंदाज आला का ?

एखाद्या आजारावर उपचार करताना जेव्हा औषधांपेक्षा अधिक भर आहारशैली बदलण्यावर दिलेला असतो, तेव्हा अशा उपचारांना "farmacy"
असे म्हटले जाते. (farm= शेत )

गवि's picture

8 Apr 2022 - 12:31 pm | गवि

वाह. रोचक.

कुमार१'s picture

14 Apr 2022 - 11:31 am | कुमार१

मराठी व इंग्लिश भाषेतील क्रियापदांची संख्या या मुद्द्यावरील एक रोचक लघुलेख इथे

यातील हे निवडक :

इंग्रजी भाषेच्या तुलनेत मराठीच्या शब्दसंग्रहात क्रियापदांची संख्या खूपच कमी आहे. जुन्यांपैकी अनेक क्रियापदं हळूहळू मागे पडत गेली आणि त्या प्रमाणात नवीन क्रियापदं वाढलेली नाहीत. अशा वेळी मराठीत आधीच असलेली क्रियापदं जाणीवपूर्वक वापरण्याच्या प्रयत्नाबरोबरच त्यांचा अर्थविस्तार करून नवीन संकल्पनांसाठीसुद्धा ती वापरणं हा एक मार्ग आहे. याचबरोबर नवी क्रियापदं घडवणं हेही महत्त्वाचं आहे. उदा. उत्पादणे, आदरणे, क्रोधणे, नमस्कारणे अशी काही जुनी, काही नवी क्रियापदं प्रचारात आणू शकतो.

गामा पैलवान's picture

14 Apr 2022 - 4:02 pm | गामा पैलवान

कुमारेक,

इंग्रजी एखाद्या संकल्पनेचं क्रियापदात रुपांतर करून शब्दवृद्धी साधते. उदा. : watering the plant यामध्ये water हे नाम असलं तरी त्यापासनं watering हे क्रियापद बनवलं आहे. मराठीत शब्दवृद्धीसाठी क्रियापदांच्या व्यतिरिक्त इतर मार्गही आहेत. किंबहुना निरुक्त हे शास्त्र नव्या संकल्पना भाषेने कशा प्रकारे आत्मसात कराव्यात यासाथी रचलेले आहे. मराठीसाठी ही पारंपरिक बैठक प्रशस्त करायला हवीये. असं माझं मत.

आ.न.,
-गा.पै.

कुमार१'s picture

14 Apr 2022 - 5:31 pm | कुमार१

निरुक्त हे शास्त्र नव्या संकल्पना भाषेने कशा प्रकारे आत्मसात कराव्यात यासाथी

चांगली माहिती.
याबद्दल अधिक जाणून घ्यायला आवडेल

गामा पैलवान's picture

15 Apr 2022 - 1:33 pm | गामा पैलवान

कुमारेक,

मला याविषयी अधिक माहिती नाही. संस्कृतात व्याकरण आणि निरुक्त हे एकत्र शिकवले जायचे म्हणे. या बाबतीत मी शिकाऊ पातळीवर आहे.

आ.न.,
-गा.पै.

ज्ञानोबाचे पैजार's picture

14 Apr 2022 - 3:33 pm | ज्ञानोबाचे पैजार

Godown आणि infact

हे असेच एक शब्द आहेत जे वर्ड फाईल मधे लिहिले की त्याच्या खाली लाल रेघ उमटते. In-fact असे लिहिले की वर्ड गुरुजी त्याखाली लाल रेघ ओढत नाहीत.

पैजारबुवा,

कुमार१'s picture

14 Apr 2022 - 5:34 pm | कुमार१

Godown >>> समजल

In-fact असे लिहिले की वर्ड गुरुजी त्याखाली लाल रेघ ओढत नाहीत.

ही त्या संगणक गुरुजींची मर्यादा समजायची काय ?
कारण यांमध्ये आडवी रेघ द्यायची काही पद्धत नाही.

कंजूस's picture

15 Apr 2022 - 7:01 pm | कंजूस

अमुल बटर जाहिरातवाल्यांना द्यावे.

कुमार१'s picture

16 Apr 2022 - 9:29 am | कुमार१

farmacy >>> यावरून आठवले :

एखादा नवा इंग्लिश शब्द कोशात कसा समाविष्ट होतो याची रोचक माहिती मी COEDच्या प्रस्तावनेत वाचली होती. इंग्लंडमध्ये इंग्लिश भाषेतील शब्दांचा एक महासंग्रह असतो. त्यात जगभरात इंग्लिश बोलल्या जाणाऱ्या देशांमधून जे जे नवे शब्द तयार होत राहतात त्यांचा समावेश केला जातो.

दरवर्षी भाषा समितीची एक बैठक होते. त्यात नव्या शब्दांचा आढावा घेतला जातो. पुढे त्याला संख्याशास्त्रीय निकषही लावले जातात. त्यातून काही नव्या शब्दांची निवड होते आणि मग ते बृहदकोशात समाविष्ट केले जातात. मूळ महासंग्रह हा बृहदकोशाच्या कित्येक पट मोठा असतो.

कंजूस's picture

16 Apr 2022 - 9:34 am | कंजूस

बरोबर.

कुमार१'s picture

18 Apr 2022 - 12:43 pm | कुमार१

समाजातील अनेक घडामोडींचा शब्दार्थावरही परिणाम होत असतो. एखाद्या शब्दाचा मूळ अर्थ काही काळानंतर पूर्णपणे विरुद्ध असाही होऊ शकतो. मराठीतली दोन सर्वपरिचित उदाहरणे म्हणजे :

परोक्ष आणि राजीनामा

त्यांचे मूळ अर्थ कालौघात बरोबर विरुद्ध होऊन बसले आहेत !
अशाच एका इंग्लिश शब्दाच्या उत्क्रांतीचा हा वृत्तांत.

fact हा सर्वपरिचित शब्द. त्याचा अर्थ आपण सगळे जाणतोच. परंतु त्यात आमूलाग्र बदल आता होऊ घातले आहेत.

2017 मध्ये अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष ट्रम्प यांच्या वरिष्ठ सल्लागारांनी “alternative facts” हा शब्दप्रयोग लेखनात वापरला. त्यानंतर तो अक्षरशः साथ आल्याप्रमाणे विविध माध्यमांमध्ये फैलावला.

भाषा अभ्यासकांच्या मते आता हळूहळू fact अर्थ बदलाच्या किंवा विस्तारण्याचा दिशेने प्रवास करीत आहे. काही वर्षात त्याचा अर्थ
any information, whether correct or incorrect, true or untrue
असा शब्दकोशात येऊ शकतो !

https://thestandardspeaks.com/fact-is-fiction/amp/

कुमार१'s picture

3 May 2022 - 12:36 pm | कुमार१

लैंगिक अल्पसंख्याक ("sexual minority") असा शब्द प्रयोग आता वैद्यकात रूढ झाला आहे.
त्यामध्ये खालील सर्वांचा समावेश होतो :

Lesbian, gay,
bisexual, transgender
आणि
asexual / pansexual = जी व्यक्ती स्वतःला स्त्री किंवा पुरुष असे संबोधू इच्छित नाही.

कुमार१'s picture

17 May 2022 - 12:16 pm | कुमार१

इंग्लिश लघुरुपांचे विविध अर्थ हा एक रंजक विषय आहे.
एकाच लघुरूपाचे निरनिराळ्या क्षेत्रांमध्ये अनेक वेगवेगळे अर्थ असतात.
लघुरुपांचे काही शब्दकोशही अलीकडे जालावर लोकप्रिय झाले आहेत.

PA हे एक नेहमीचे उदाहरण.
याचे तब्बल 128 अर्थ (दीर्घरुपे) आहेत !

कुमार१'s picture

23 Jun 2022 - 4:33 am | कुमार१

संपादकीय लिहिणार्‍या व्यक्तीला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणू ?
editor असे आपण पटकन म्हणतो.

पण याहून एक विशेष शब्द आज वाचला तो म्हणजे:
editorialist

कुमार१'s picture

30 Jun 2022 - 12:15 pm | कुमार१

Hysteria हा शब्द इंग्लिशमध्ये सुमारे दोन हजार वर्षापासून वापरात आहे. परंतु त्याचे अर्थ मात्र आश्चर्यकारकरीत्या बदलत गेलेले दिसतात.

१. प्राचीन काळी त्याला बायकांचा शारीरिक आजार समजले गेले होते. Hystera याचा शब्दशः अर्थ आहे गर्भाशय. तत्कालीन समजूत अशी होती, की ज्या स्त्रीचे गर्भाशय जागेवरून 'हलते किंवा फिरते' , तिच्या वागण्यात विचित्र बदल होऊ लागतात.

२. या समजूतीमुळे या अवस्थेवर काही भन्नाट उपचार केले जात. जसे की, तीव्र वासाचे काही पदार्थ हुंगायला देणे किंवा ते योनीतून आत सोडणे.

३. कालांतराने या शब्दार्थात, एखाद्या स्त्रीला मूल न होणे किंवा तिने लग्न न करणे अशीही विचित्र भर पडली !

४. विसाव्या शतकात जेव्हा मानसशास्त्राचा रीतसर अभ्यास झाला तेव्हा hysteria हा शारीरिक आजार नसून ती एक मनोवस्था असल्याचे मत मांडले गेले. तेव्हापासून हा शास्त्रीय अर्थ लागू झाला.
अर्थातच ती स्त्री किंवा पुरुष अशा दोघांतही दिसू शकते.

गामा पैलवान's picture

30 Jun 2022 - 5:49 pm | गामा पैलवान

कुमारेक,

हा शब्द 'हिंसक स्त्री' यावर बेतलेला वाटतो. Hys म्हणजे हिंसा व Steria म्हणजे स्त्रीय.

आ.न.,
-गा.पै.

कुमार१'s picture

30 Jun 2022 - 6:34 pm | कुमार१

भारीच की !

कुमार१'s picture

1 Jul 2022 - 11:18 am | कुमार१

Cobalt हा एक परिचित धातू. या शब्दाची जन्मकथा रंजक आहे.
शब्दाचा उगम जर्मन असून तो kobold या शब्दापासून तयार झालाय.

तर त्याची कथा अशी:
जर्मनीतल्या चांदीच्या खाणीमध्ये काम करणाऱ्या कामगारांना एकदा एक चांदीसारखा दिसणारा पण वेगळा धातू सापडला. जेव्हा त्याचे शुद्धीकरण करून चांदी मिळवण्याचा प्रयत्न त्यांनी केला तेव्हा मात्र चांदी काही मिळाली नाही. उलट त्या प्रक्रियेदरम्यान निघालेल्या वाफांमुळे कामगारांचे आरोग्य बिघडले ; प्रसंगी काहींचा मृत्यू झाला. त्यातून कामगारांनी या अनोळखी धातूला भूगर्भातील सैतान किंवा वेताळाची उपमा दिली (kobold).

कालांतराने वैज्ञानिकांनी या धातूचे स्वतंत्र अस्तित्व सिद्ध केले. त्याचे नामकरण करताना वरील जुन्या ऐतिहासिक घटनेचीच नोंद घेतली.

कुमार१'s picture

6 Jul 2022 - 3:52 pm | कुमार१

Icterus = कावीळ
हा शब्द मूळ ग्रीक (ikteros) असून त्याची व्युत्पती रंजक आहे. या शब्दाचा दुसरा अर्थ एक पिवळा पक्षी असाही आहे (चित्र पहा):

ok

एका प्राचीन समजुतीनुसार जर काविळीच्या रुग्णाने या पक्षाकडे पाहिले तर त्याची कावीळ बरी होते आणि तो पक्षी मरतो !

(अर्थात सामान्य व्यवहारात Icterus पेक्षा jaundice अधिक वापरला जातो )

कुमार१'s picture

8 Jul 2022 - 10:26 am | कुमार१

लेखनकला अस्तित्वात येण्यापूर्वीपासून मौखिक वाङमयाची परंपरा अस्तित्वात आहे. या प्रकारच्या साहित्यासाठी एक सुरेख इंग्लिश संयुक्त शब्द वाचनात आला : orature. त्याची फोड अशी :

Oral + literature

हा शब्द केनियाचे कादंबरीकार Ngugi wa Thiong'o यांनी भाषेमध्ये प्रचलित केला.

कुमार१'s picture

15 Jul 2022 - 10:52 am | कुमार१

इंग्लिश शब्दांमधील अनुच्चारित (सायलेंट) अक्षरे हा एक रंजक विषय आहे. debt, doubt, psalm, psyche ही नेहमीची उदाहरणे बहुतेकांना माहीत आहेतच. अन्य काही मजेदार माहिती २-३ प्रतिसादांत लिहीन.

१.
संपूर्ण इंग्रजी वर्णमालेत V हे एकमेव अक्षर असे आहे की जे शब्दांमध्ये असताना नेहमीच त्याचा उच्चार होतो. (https://www.dictionary.com/e/silent-letters-in-english/ ).

या मुद्द्यावर भाषेशी खेळणाऱ्या अनेक आंतरजालीय मंडळींनी अनुच्चारित v चा शोध घेतलेला आहे. परंतु अद्याप V अनुच्चारित असलेला अधिकृत शब्द शब्दकोशांमध्ये आलेला नाही.

अर्थात कवितेमध्ये e’er & ne’er ही जी रूपे वापरली जातात त्यामध्ये v लिहिताना सुद्धा उडवून टाकलेला आहे.

कुमार१'s picture

18 Jul 2022 - 7:35 am | कुमार१

अनुच्चारित इंग्लिश अक्षरांच्या क्रमवारीत V नंतर J व Q ही दोन अक्षरे आहेत. प्रमुख शब्दकोशांनुसार ती अनुच्चारित असणारा प्रत्येकी एक शब्द आहे.

* J हे अक्षर अनुच्चारित असणारा एकच शब्द म्हणजे :
Marijuana

* Q हे अक्षर अनुच्चारित असणारा एकच शब्द म्हणजे :
lacquer

कंजूस's picture

19 Jul 2022 - 4:56 pm | कंजूस

या शब्दांत रेल्वेही गल्लत करते.
Indian rail dot guv dot in site 'seating' शब्द वापरते तो बरोबर आहे.
Irctc वाले 'sitting' म्हणतात ते चुकीचे आहे.

गूगलने एक छान संयोगशब्द तयार केलाय:

Imagen
= image + generation.

काही सुंदर प्रतिमा इथे आहेत:

गामा पैलवान's picture

20 Jul 2022 - 12:45 pm | गामा पैलवान

कुमारेक,

imagine या मूळ शब्दात image generation असाच अर्थ अपेक्षित असावासं वाटतं.

आ.न.,
-गा.पै.

कुमार१'s picture

20 Jul 2022 - 12:54 pm | कुमार१

बरोबर.
म्हणता येईल तसे:

Latin imaginare = ‘form an image of, represent’

कुमार१'s picture

9 Aug 2022 - 4:32 pm | कुमार१

तीव्र उष्णता आणि शब्द निर्मिती !
जगातील बर्‍याच देशांमध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये उष्ण तापमानाने कहर केला आहे. एरवी त्या देशांना अशा उच्च तापमानाची सवय नसल्यामुळे त्यांच्या भाषेत त्यासाठी खास विशेषणे नाहीत.

जपानचे उदाहरण पाहू.
त्यांच्याकडे एरवीचे उच्च तापमान (C) असल्यास हे शब्द वापरात आहेत :
दिवसा >३५ C : moshobi
रात्री > २५ : nettaiya

परंतु आता वाढलेल्या तापमानामुळे एका खाजगी हवामान संस्थेने खालील नवे शब्द योजले आहेत :
दिवसा >४० C : kokushobi
रात्री > ३० : chounettaiya

ok

सागरसाथी's picture

16 Aug 2022 - 7:32 pm | सागरसाथी

सुंदर माहितीपूर्ण,असेच शब्दांबद्दल आणखीनही लिहा

कुमार१'s picture

16 Aug 2022 - 7:58 pm | कुमार१

Cynic या शब्दाची व्युत्पत्ती रंजक आहे.
या शब्दाचे मूळ ग्रीक असून त्याचा अर्थ कुत्र्याप्रमाणे असा आहे.

अशा लोकांना कुत्र्याची उपमा का दिली असावी याची चार कारणे इथे वाचता येतील

कुमार१'s picture

4 Sep 2022 - 6:08 pm | कुमार१

Inter- हा जास्ती करून उपसर्ग म्हणून परिचित आहे.
पण inter हे क्रियापद सुद्धा आहे आणि त्याचा अर्थ जमिनीत पुरणे असा आहे.
व्युत्पत्ती : in + terra

कुमार१'s picture

3 Oct 2022 - 9:59 am | कुमार१

uppity हा एक मजेदार अनौपचारिक शब्द वाचण्यात आला. शब्दाकडे पाहिल्यावर पटकन वाटते की तो 'हुच्च प्रवृत्ती' साठीचे नाम असेल. परंतु तसे नसून ते व्यक्तीविशेषण आहे.

( an uppity MP and his lady wife).

कुमार१'s picture

18 Oct 2022 - 5:54 pm | कुमार१

त्यांना पध्दतशीरपणे अध्यक्षमहोदयांनी संपवलंय.

कुमार१'s picture

18 Oct 2022 - 5:56 pm | कुमार१

वरचे वाक्य मी लिहिलेले नसताना इथे कुठून आले ???

कुमार१'s picture

18 Oct 2022 - 5:58 pm | कुमार१

Overton window असा एक शब्दप्रयोग वाचनात आला. त्याला आपण समाजमनाची चौकट असे म्हणू शकू.

प्रत्येक काळात समाजाचे एकंदरीत विचार हे ठराविक चौकटीत किंवा परिघातच असतात. त्या पलीकडचे विचार समाजाला झेपत नाहीत. अमेरिकेतील Overton या नावाच्या धोरणकर्त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नावाने हा शब्दप्रयोग रूढ आहे.

याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे मागच्या शे-दोनशे वर्षांपूर्वी समलैंगिकता ही कल्पनाच त्याज्य /निषिद्ध/ गुन्ह्यास पात्र होती. आज ती खुलेपणाने स्वीकारली जाते.
कालानुरूप ‘विंडो’ किंवा चौकट विस्तारत जाते. परंतु काही विषयांबाबत ती आक्रसताना देखील दिसते ! याची काही उदाहरणे आपल्या आसपास आहेतच.

कुमार१'s picture

1 Nov 2022 - 7:26 pm | कुमार१

Collins शब्दकोशाने 2022 चा
त्यांचा विशेष बहुचर्चित शब्द काहीसा लवकर जाहीर केलेला आहे. तो आहे:

Permacrisis.
= अस्थिरता आणि असुरक्षिततेने व्यापलेला व लांबलेला कालावधी.

रेंगाळलेला कोविड, युक्रेन युद्ध इत्यादी गोष्टींची त्याला पार्श्वभूमी आहे.

https://www-thehindu-com.cdn.ampproject.org/v/s/www.thehindu.com/news/in...

कुमार१'s picture

5 Nov 2022 - 9:41 am | कुमार१

एखाद्या पुस्तकाच्या मलपृष्ठावर त्याचा अल्प गोषवारा दिलेला असतो. तो कुतूहल चाळवणारा
असतो. त्याला इंग्लिश मध्ये blurb म्हणतात हे बहुतेकांना परिचित आहे.
या शब्दाचा उगम ग्रीक/ लॅटिन वगैरे असा काहीही नसून ते एका लेखकाने निर्माण केलेल्या विनोदी स्त्री पात्राचे नाव आहे :

Miss Belinda Blurb !

https://www.merriam-webster.com/words-at-play/word-history-blurb-publishing
या blurb पासून एक संयोगशब्द असा तयार झाला आहे :

blad =
bl(urb) + ad

कुमार१'s picture

30 Nov 2022 - 9:52 am | कुमार१

थायलंड मधील ऑटोरिक्षांना tuk-tuk
असे मजेदार नाव आहे. त्या रिक्षांच्या इंजिनाच्या आवाजानुसार हा शब्द निर्माण झाला आहे - नादानुकारी शब्द.

कुमार१'s picture

2 Dec 2022 - 10:08 am | कुमार१

काही स्वच्छतागृहांमध्ये कमोडच्या शेजारी स्वतंत्र Bidet असते.
Bidet हा फ्रेंच शब्द मजेदार आहे. त्याचा शब्दशा अर्थ "लहान घोडा" (pony) असा आहे.

ज्याप्रमाणे आपण लहान घोड्यावर स्वार होतो तीच कल्पना यावर बसताना आहे !

कंजूस's picture

2 Dec 2022 - 6:40 pm | कंजूस

मूळ कुठले आहे?

कुमार१'s picture

2 Dec 2022 - 7:18 pm | कुमार१

मूळ संस्कृत आहे असे दिसते. तिथून हिंदी आणि मग इंग्लिश.

लुटणें luṭaṇēṃ v c (लुंठन S)

https://bruhadkosh.org/words?shodh=+%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%A3...

Loot :
https://www.etymonline.com/word/loot

कुमार१'s picture

21 Dec 2022 - 6:13 pm | कुमार१

नुकतेच केंब्रिज शब्दकोशाने woman आणि man यांच्या व्याख्या विस्तारित केल्या आहेत. त्या अशा :

* "woman" to include "an adult who lives and identifies as female though they may have been said to have a different sex at birth."

* “man” is someone who “identifies as male though they may have been said to have a different sex at birth.

गेले 267 वर्षे अस्तित्वात असलेल्या शब्दकोशातील मूळ अर्थात हा महत्त्वाचा बदल आता झालेला आहे. यासंदर्भात पाश्चिमात्य जगात बऱ्यापैकी नाराजीचा सूर उमटला आहे :

कुमार१'s picture

28 Dec 2022 - 4:45 pm | कुमार१

2022 मध्ये इंग्लिशमधील प्रमुख शब्दकोशांनी ठरवलेले बहुचर्चित वैशिष्ट्यपूर्ण शब्द :

1. Oxford : goblin mode
अगदी स्वत:च्याही भल्याची पर्वा न करता जगणं

हे वर्णन चपखलपणे या चित्रात दाखवले आहे.
या निमित्ताने 'कोसला' च्या मुखपृष्ठाची आठवण झाली.
..
२. Merriam webster : Gaslighting
स्वतःच्या फायद्यासाठी एखाद्याची दिशाभूल करणे; जणू काही त्याला ‘येडा’ ठरवायचा प्रयत्न करणे.
..
3. Dictionary.com : woman

तृतीयपंथीयांच्या संदर्भात या मूलभूत शब्दाचा अनेकांनी कोशात पुन्हा शोध घेतला.
..

४. Collins Dictionary : Permacrisis
अस्थिरता आणि असुरक्षिततेने व्यापलेला व लांबलेला कालावधी.

रेंगाळलेला कोविड, युक्रेन युद्ध इत्यादी गोष्टींची त्याला पार्श्वभूमी आहे.

कुमार१'s picture

11 Feb 2023 - 12:05 pm | कुमार१

आज एका कोड्यात सहा अक्षरी शब्द जमताना नाकी नऊ आले. पण अखेरीस eureka हे उत्तर मिळाले तेव्हा त्या उद्गारासारखाच आनंद झाला !

आपल्या सर्वांना शालेय जीवनापासून eureka हा शब्द आश्चर्यभरीत उद्गारांसाठी माहीत असतो. परंतु त्याचा दुसरा अर्थ पूर्ण वेगळा आहे :
तांबे व निकेल यांचा मिश्रधातू !

कुमार१'s picture

4 Dec 2023 - 6:34 pm | कुमार१

ऑक्सफर्डने 2023 चा मानाचा शब्द जाहीर केला आहे :
rizz = आकर्षकता, भुरळ.

हा लघुशब्द charisma या शब्दातील मधली दोन अक्षरे घेऊन तयार केलेला आहे.

सध्या तो तरुणांमध्ये लोकप्रिय आहे.

रामचंद्र's picture

25 Dec 2023 - 2:25 am | रामचंद्र

कुमार सर,
जाई निंबकर आणि मॅक्सीन बर्नसन यांच्या मराठी-इंग्रजी कोशावर आपण लिहावे अशी विनंती.

कुमार१'s picture

25 Dec 2023 - 7:47 am | कुमार१

चांगली सूचना. मी फक्त त्याबद्दल ऐकले आहे.
सवडीने मला त्याबद्दल माहिती काढावी लागेल.

रामचंद्र's picture

25 Dec 2023 - 8:10 pm | रामचंद्र

धन्यवाद सर. तशी म्हणजे मा. का. देशपांड्यांच्या मराठी -इंग्रजी कोशाच्या तुलनेत याची शब्दसंख्या कमी आहे पण यात खास मराठी संस्कृती विचारात घेऊन रचना केली आहे असे वाटते म्हणून आपल्या दृष्टीने तो कसा वाटतो याविषयी उत्सुकता आहे.

कुमार१'s picture

25 Dec 2023 - 9:27 pm | कुमार१

इ आवृत्ती इथे आहे.
बरेच शब्द त्यात घालून बघावे लागतील. पाहूया पुढील वर्षात सवडीने ! :)

दरम्यान, तुम्ही या जुन्या धाग्याला चालना दिलीच आहे तर अन्य काही रंजक पुढील स्वतंत्र प्रतिसादात लिहितो

या दुव्याबद्दल मन:पूर्वक आभार.

कुमार१'s picture

25 Dec 2023 - 9:29 pm | कुमार१

ok
या घोड्याला Hackney असे नाव आहे. त्या नावाचा इतिहास रंजक आहे.

लंडनजवळील Hackney या नावाच्या खेड्यात एकेकाळी या घोड्यांची पैदास करीत असत. हे घोडे भाड्याने वापरायच्या घोडागाडीसाठी वापरले जाऊ लागले. या घोडागाड्यांचा वापर कोणीही सर्वसामान्य नागरिक सर्रास करत असे.

या घटनेवरून अतिसामान्य/नीरस गोष्टीसाठी hackneyed हे विशेषण अस्तित्वात आले. साहित्यात ते बऱ्यापैकी वापरतात. वापरून वापरून गुळगुळीत झालेल्या शब्दप्रयोग किंवा वाक्प्रचारांना hackneyed quotations/phrases असे म्हणतात.

सर टोबी's picture

26 Dec 2023 - 8:06 am | सर टोबी

टाइम्स ऑफ इंडिया मध्ये सहसा ‘अस्थानी’ किंवा’मिळमिळीत’ अशा क्रियाविशेषण स्वरूपात वापरला जायचा. खासकरून परराष्ट्र खात्याचा भारतीय हितसंबंधांना बाधा आणणाऱ्या आंतरराष्ट्रीय घडामोडींवर जो प्रतिसाद असतो त्यावर बातमी देतांना हा शब्द वापरला जातो.

कुमार१'s picture

1 Jan 2024 - 8:25 am | कुमार१

चांगली माहिती दिलीत.

कुमार१'s picture

13 Jan 2024 - 11:21 am | कुमार१

ok

हे दोन वेगळे पदार्थ एकाच चित्रात का घेतले असावेत ?
जरा विचार करून तर बघा..
..
..
..
..
या दोघांनाही एकच इंग्लिश शब्द आहे : clove

अर्थानुसार ती दोन स्वतंत्र नामे असून त्यांच्या व्युत्पत्ती वेगवेगळ्या आहेत :
लवंग : (Latin) clavus = a nail
लसणाची पाकळी : ( Old English) clufu = cleft, thing cloven.

कुमार१'s picture

5 Feb 2024 - 8:16 pm | कुमार१

ebook
हा एक सलग ५ अक्षरी शब्द म्हणून आता स्वीकारला गेला आहे :
शब्दकोडे सोडवताना हे लक्षात घ्यावे लागते.

कुमार१'s picture

20 Feb 2024 - 4:47 pm | कुमार१

bridewell
या शब्दाचा वधूशी काही संबंध नाही परंतु विहिरीशी मात्र आहे !

या शब्दाचा विशेषनामाकडून सामान्यनामाकडे झालेला प्रवास पाहणे रंजक ठरेल. अगदी सुरुवातीस लंडनमधील एका विहिरीला St. Bride यांचे नाव देण्यात आले. म्हणजेच ते झाले Bridewell.

पुढे या जागेचे रूपांतर क्रमाक्रमाने चर्च, राजवाडा, अनाथालय, रुग्णालय आणि शेवटी तुरुंगात झाले.
ok

सध्या हा शब्द शहरातील मोठ्या व महत्त्वाच्या तुरुंगासाठी वापरला जातो.