✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

शब्दकोशांच्या मनोरंजक विश्वात

ह
हेमंतकुमार यांनी
Fri, 06/30/2017 - 19:00  ·  लेख
लेख
माध्यमिक शाळेत असताना आम्हाला रोजच्या वेळापत्रकात दोन मधल्या सुट्या असायच्या – एक लहान १५ मिनिटांची तर दुसरी मोठी ४५ मिनिटांची. मोठ्या सुटीमध्ये शाळेच्या ग्रंथालयात आमच्यासाठी वाचनाची सोय केलेली असे. तिथे बसून वाचताना समोरच्या भिंतीवर नजर जाई. तिथे मोठ्या व आकर्षक अक्षरात ‘ग्रंथ हेच गुरु’ हे वचन लिहिलेले होते. वाचनाच्या आवडीतून त्या वचनाची सत्यता पटत गेली, यात शंकाच नाही. मोठे होता होता मी विविध प्रकारचे तीन भाषांतील साहित्य वाचत गेलो आणि एका निष्कर्षाप्रत येउन ठेपलो. तो म्हणजे, या सर्व ग्रंथरूपी गुरूंचे गुरु म्हणजे शब्दकोश! सुरवातीला वाचनात एखादा शब्द अडला, की त्याचा अर्थ पाहण्यापुरता शब्दकोश उघडला जाई. तो जमाना अर्थात फक्त छापील पुस्तकांचाच होता. त्या वयात मी शब्दकोशाच्या जाडजूड ‘प्रकृती’कडे कुतूहलाने बघत असे. शालेय जीवनात शब्दकोशाचा उपयोग शब्दार्थ पाहण्यापुरताच सीमित होता. तेव्हा इंग्लिश–मराठी, मराठी-इंग्लिश आणि हिंदी-मराठी हे शब्दकोश हाताळले जात. महाविद्यालयीन जीवनात ‘ब्रिटीश लायब्ररी’ चा सभासद झाल्यावर काही थोर इंग्लिश लेखक वाचायला घेतले. तेव्हा इंग्लिश पुस्तकांचे वाचन म्हणजे एक अभ्यासच असायचा. हातात ते पुस्तक, टेबलावर इं-मराठी शब्दकोश आणि शब्दार्थ टिपून घ्यायला बाजूला वही-पेन. वाचलेल्या साहित्याची काही वडीलधाऱ्यांशी चर्चा होई. त्यात एका गृहस्थांनी सल्ला दिला, की आता शब्दार्थ पाहण्यासाठी तुमच्या शालेय शब्दकोशावर समाधान मानू नकोस; आता गरज आहे ती तू ‘Oxford’ ची कास धरण्याची. मग मी Concise Oxford च्या इंग्लिश- इंग्लिश कोशाची खरेदी केली. सहज म्हणून हा कोश चाळू लागलो अन पहिल्या नजरेतच लक्षात आले, की हा निव्वळ शब्दकोश नसून साक्षात ज्ञानकोश आहे. त्यात एखाद्या शब्दाचे अनेक अर्थ देण्यासाठी पुस्तकाच्या पानाचा तब्बल एक स्तंभही खर्ची पडलेला दिसे. एखाद्या कठीण शब्दाचा अर्थ पाहण्यासाठी म्हणून कोश उघडला जाई आणि तो अर्थ पाहता पाहता एकातून दुसऱ्या व त्यातून तिसऱ्या शब्दात मी उड्या मारत असे. कित्येकदा शब्दार्थासाठी उघडलेला कोश पाहताना वाचनाचे मूळ पुस्तक बाजूलाच राही आणि बराच वेळ मी शब्दकोशातच मनसोक्त विहार करीत असे. शब्दाच्या अर्थाबरोबरच त्याचा उगम, ऐतिहासिक संदर्भ इत्यादी माहिती वाचून छान मनोरंजन होई. बऱ्याचदा आपल्या नेहमीच्या वापरातले शब्दसुद्धा कोशात पाहण्यात मजा येते. उदाहरणार्थ ‘August’ हा शब्द पाहा. आता हे एका महिन्याचे नाव आहे हे शाळकरी पोरही सांगते. पण ते नाव रोमन साम्राज्याचा पहिला राजा ऑगस्टस सीझर याच्यावरून आहे, तसेच august चा दुसरा अर्थ ‘थोर’ असाही आहे हे ज्ञान आपल्याला शब्दकोशात डोकावल्याशिवाय कसे मिळेल? एखाद्या शब्दाला तर एकापेक्षा अनेक असे कित्येक अर्थ असतात आणि त्या अर्थांचा एकमेकाशी सुतराम संबंध नसतो. ‘set’ चे तब्बल १५६ प्रकारचे अर्थ आहेत हे जेव्हा आपल्याला कोशात दिसते तेव्हा मोठा अचंबा वाटतो. एकच उच्चार पण भिन्न स्पेलिंग व अर्थ असणारे शब्द जेव्हा आपण कोशात पाहून पक्के करून घेतो तेव्हा होणारा आनंद काही वेगळाच असतो. सध्याच्या ‘ हॅलो, हाय’च्या युगात बहुतेकांना फोनवरचाच ‘हॅलो’ माहित असतो. पण, शब्दकोश बारकाईने पाहणाऱ्यालाच hallo, hallow & halo यांतील फरक समजलेले असतील. आपल्या देशात गेल्या पंचवीस वर्षांत इंग्लिश माध्यमातून शालेय शिक्षण घेणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय दिसून येते. ही पिढी ‘स्पोकन इंग्लिश’ च्या बळावर येताजाता टूरटूर करीत असते. पण त्याचबरोबर त्यांचे स्पेलिंग व व्याकरण यांकडे कमालीचे दुर्लक्ष झालेले जाणवते. अशा काहींची फिरकी घ्यायला मला आवडते. त्यांना मी ‘फुलस्केप’ या परिचित शब्दाचे स्पेलिंग विचारतो. आतापर्यंत तरी मला हे अचूक स्पेलिंग सांगणारी व्यक्ती भेटलेली नाही. याचे स्पेलिंग आहे ‘foolscap’ आणि योग्य उच्चार आहे ‘फुल्झकॅप’. हे ज्ञान शब्दकोशाला आपला मित्र केल्याशिवाय प्राप्त होणे नाही! मोठ्या आकाराचा कागद म्हटल्यावर बहुतेकजण ‘full…’अशी सुरवात करतात अन fool होऊन बसतात! या शब्दाचा उगम तर किती मनोरंजक. Fool म्हणजे विदूषक. पुरातनकाळी विदूषक जी टोपी वापरत त्या टोपीचे चिन्ह ‘watermark’ म्हणून या कागदात उमटवलेले असे. ‘फुलस्केप’ वरून घडलेला एक किस्सा सांगतो. एका माध्यमिक शाळेत सत्राच्या पहिल्या दिवशी एक शिक्षिका विद्यार्थ्यांना म्हणाल्या, “हे बघा, सर्वांनी ‘फुलस्केप’ वह्या आणायच्या आहेत, ‘हाफस्केप’ वह्या आणलेल्या मला अजिबात चालणार नाहीत!” एखादा शब्द नीट न शिकून घेतल्याचे परिणाम एका पिढीकडून पुढच्यांकडे कसे संक्रमित होतात याचे हे उदाहरण. गडद काचांच्या चष्म्याला आपण ‘गॉगल’ म्हणतो यात नवीन काहीच नाही. पण या शब्दाचे स्पेलिंग goggles असून ते अनेकवचनी नाम म्हणूनच वापरायचे असते ही दृष्टी मला शब्दकोशानेच दिली. आपल्या समाजात एखाद्याने ‘लेस्बिअन’ हा शब्द जरी उच्चारला तर आपण पटकन चमकून त्याच्याकडे पाहतो. जर उत्सुकता म्हणून आपण हा शब्द कोशात पाहिला तर त्याचा उगम पाहून आपली करमणूक होते. ‘lesbos’ नावाच्या बेटावर ‘साफो’ नावाची कवयित्री राहत असे आणि ती समलिंगी संबंधात गुंतल्याचा लोकांना संशय होता. ही माहिती समजल्यावर या शब्दाकडे आपण अश्लील म्हणून न पाहता कुतूहलाने पाहू लागतो. आजकाल आपले एखादे कार्यालयीन काम होणे जर एखाद्या स्त्रीच्या हातात असेल तर तिच्या तेथील दर्जाचा विचार न करता आपण तिच्यापुढे सारखे ‘Madam, Madam’ करीत असतो. आता ‘madam’ चे कोशातील दोन अर्थ बघा. या शब्दाचा उगम फ्रेंचमधून आहे.त्याचा पहिला अर्थ ‘बाईसाहेब’ असा तर दुसरा चक्क ‘वेश्यागृहाची मालकीण’ असा आहे! तसेच या शब्दाचे अनेकवचन( madams असे नसून) फ्रेंच पद्धतीने Mesdames असे आहे. सध्या सर्वत्र बोकाळलेल्या मॅडमांनी हा शब्द पूर्णपणे समजून घ्यायला काही हरकत नाही. वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश घेतल्यापासून ते डॉक्टर होऊन तीस वर्षे उलटून गेल्यावरही वैद्यकीय शब्दकोश हा तर माझा जिवलग मित्र आहे. त्याच्या पातळ पांढऱ्याशुभ्र कागदावर परदेशात केलेली सुंदर छपाई, त्याचा लठ्ठ पण मोहक आकार, त्यातील अवघड शब्दांची केलेली सुरेख फोड, शब्दार्थांचा पाडलेला कीस आणि शब्दानुरूप चित्रे ही त्याची वैशिष्ट्ये मला नेहमीच मोहित करतात. सामान्य वाचकांसाठी त्यातले दोन मनोरंजक शब्द सांगतो: १. AC/DC : खरे तर आपल्या सामान्यज्ञानानुसार हे विद्युत प्रवाहाचे दोन प्रकार आहेत. पण वैद्यकीय कोशातील त्याचा अर्थ ‘bisexual individual’ असा वाचल्यावर आपण कपाळावर हात मारून घेतो! २. Hartnup disease : हा एक आनुवंशिक आजार आहे. आता Hartnup हे बहुधा ज्या शास्त्रज्ञाने तो आजार शोधला त्याचे नाव असेल असा अंदाज आपण बांधतो. पण शब्दकोशाचा पाहा काय सांगतो ते. Hartnup हा शास्त्रज्ञ नसून, तो आजार ज्या रुग्णामध्ये पहिल्यांदा आढळला त्याचे आडनाव आहे. १९५० च्या सुमारास ब्रिटनमधील श्री. हार्टनप यांनी आपल्या cousinशी लग्न केले होते. त्या दाम्पत्याला झालेल्या आठ अपत्यांपैकी चौघांमध्ये हा आजार आढळून आला. मराठी-मराठी कोश हाताळणे ही सुद्धा एक चांगली करमणूक आहे. बऱ्याचदा मराठी कोश बघण्याच्या बाबतीत मराठी माणूस उदासीन असतो. आपल्या दैनंदिन वापरातील काही मराठी शब्दांचा खरा अर्थ हा कोश पाहिल्यावरच आपल्याला समजतो. अन्यथा त्याऐवजी काहीतरी चुकीची कल्पना किंवा अर्धवट माहिती आपल्या डोक्यात असते. एकदा एका कॉलेजच्या तरुणाला मी ‘आदिवासी’ चा अर्थ विचारला. क्षणाचाही विलंब न लावता तो म्हणाला, “ते म्हणजे अति मागास गरीब लोक”. त्याच्या म्हणण्यात जरी तथ्य असले तरी खरा अर्थ तो नाही. ‘आदी’= मूळ व ‘वासी’= राहणारे. म्हणजेच, एखाद्या प्रदेशातील मूळ रहिवासी. आपल्याकडे पाटील, कुलकर्णी, कांबळे ही अगदी सर्रास आढळणारी आडनावे. एकदा सहज म्हणून ‘कुलकर्णी’ ची व्युत्पत्ती कोशात बघितली आणि स्तिमित झालो. ती बघण्यापूर्वी, ‘कुलकर्णी’ हा शब्द अस्सल मराठीच – एवढेच काय, पण पक्का पुणेरीच- या भ्रमात मी होतो. शब्दकोशाने मला सांगितले, की हा शब्द मूळ तेलुगु (कुळकरणी) आहे. कुळ = शेतकरी आणि करण = हिशेब. हे वाचल्यावर मला एका ‘कुळाचा’ शोध तर लागलाच आणि त्याचबरोबर माझ्या भाषिक अस्मितेचे कुंपण गळून पडले, हे नक्की! शब्दकोशांमध्ये काही व्यवहारोपयोगी परिशिष्टेही असतात. निरनिराळ्या लघुरुपांचे (acronyms) पूर्ण रूप देणारे परिशिष्ट हे त्यातले एक ठळक उदाहरण. सध्याच्या संगणकीय युगात कित्येक नवीन लघुरुपांचा सुळसुळाट झालेला आहे. अशी काही लघुरूपे आपल्या डोळ्यांसमोर सतत आल्याने हळूहळू आपल्याला ते जणू काही शब्दच आहेत असे वाटू लागते. एक उदाहरण देतो. सध्या कोणताही online व्यवहार करताना आपल्याला सतत भेटणारे एक लघुरूप म्हणजे ‘CAPTCHA’. त्याचे दीर्घरूप किती मनोरंजक आहे आणि त्यामागचा तांत्रिक इतिहास काय आहे, ते आपल्याला कोश पाहिल्याशिवाय कळणे नाही! आपले ज्ञान समृद्ध करतानाच आपल्यावर मनोरंजनाचाही शिडकावा करणारे विविध शब्दकोश आपल्या वापरात जरूर असावेत. माझ्याकडे विविध प्रकारचे सुमारे डझनभर कोश आहेत. आंतरजालाच्या व्यापक प्रसारानंतर आता अनेक प्रकारचे कोश जालावर उपलब्ध आहेत. त्यामुळे जाडजूड वजनाचे छापील कोश आता एखाद्याच्या वैयक्तिक ग्रंथसंग्रहात कमी दिसतात. पण, माझी पिढी ही मुळात अशा छापील कोशांवर ‘पोसली’ गेली असल्याने माझ्याकडे ते आजही आहेत. माझे त्यांच्यावर इतके प्रेम आहे की मी त्यांना माझे कुटुंबघटकच मानतो! माझ्या घरभर ते विखुरलेले आहेत. त्यापैके एक-दोघांनी तर माझ्या पलंगावर विसावण्याचा मान पटकावलाय. वेळप्रसंगी माझ्या एकटेपणात ते माझी सुरेख सोबत करतात. धष्टपुष्ट छापील कोशाला प्रेमाने उराशी कवटाळण्याची मजा काही औरच असते. त्याची सर जालकोशाच्या ‘सर्च इंजिन’ला कशी येईल? एखादे दिवशी जर हाताशी वाचण्यासारखे काही नसेल तर मी खुशाल एखादा कोश हाती घेऊन त्यात डोके खुपसून बसतो. दिवसाकाठी निदान एकतरी नवीन शब्द मी कोशांमधून शिकतो व समजावून घेतो. ग्रंथाचे गुरु असलेल्या शब्दकोशांनी मला ज्ञान आणि मनोरंजन या दोन्ही पातळ्यांवर अतीव समाधान दिलेले असल्याने मी त्यांचा कायमचा ऋणी आहे. ***************************************************************************** ( टीप : माझ्या या लेखाची पूर्वप्रसिद्धी : ‘अंतर्नाद’ मासिक. काही सुधारणांसह येथे प्रकाशित )
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
भाषा
लेखनप्रकार (Writing Type)
लेख

प्रतिक्रिया द्या
93682 वाचन

💬 प्रतिसाद (177)

प्रतिक्रिया

२०२२ : बहुचर्चित शब्द

हेमंतकुमार
Wed, 12/28/2022 - 16:45 नवीन
2022 मध्ये इंग्लिशमधील प्रमुख शब्दकोशांनी ठरवलेले बहुचर्चित वैशिष्ट्यपूर्ण शब्द : 1. Oxford : goblin mode अगदी स्वत:च्याही भल्याची पर्वा न करता जगणं हे वर्णन चपखलपणे या चित्रात दाखवले आहे. या निमित्ताने 'कोसला' च्या मुखपृष्ठाची आठवण झाली. .. २. Merriam webster : Gaslighting स्वतःच्या फायद्यासाठी एखाद्याची दिशाभूल करणे; जणू काही त्याला ‘येडा’ ठरवायचा प्रयत्न करणे. .. 3. Dictionary.com : woman तृतीयपंथीयांच्या संदर्भात या मूलभूत शब्दाचा अनेकांनी कोशात पुन्हा शोध घेतला. .. ४. Collins Dictionary : Permacrisis अस्थिरता आणि असुरक्षिततेने व्यापलेला व लांबलेला कालावधी. रेंगाळलेला कोविड, युक्रेन युद्ध इत्यादी गोष्टींची त्याला पार्श्वभूमी आहे.
  • Log in or register to post comments

'उदाहरणार्थ नेमाडे' या चित्रपटाबद्दल माहिती आहे का ?

चित्रगुप्त
Mon, 09/01/2025 - 03:53 नवीन
अतिशय रोचक धागा आहे.
या निमित्ताने 'कोसला' च्या मुखपृष्ठाची आठवण झाली.
भालचंद्र नेमाडे यांच्यावर निर्मित 'उदाहरणार्थ नेमाडे' या चित्रपटाचे ट्रेलर यूट्यूबवर आहे. पण संपूर्ण चित्रपट कुठे उपलब्ध आहे का, हे कळू शकले नाही. बघण्याची खूप इच्छा आहे. कुणाला माहिती असेल तर कळवा. https://youtu.be/ZyT7RIh5z9E?si=-2gj4ClSiV_0lUSt
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

ओह!

हेमंतकुमार
Sat, 02/11/2023 - 12:05 नवीन
आज एका कोड्यात सहा अक्षरी शब्द जमताना नाकी नऊ आले. पण अखेरीस eureka हे उत्तर मिळाले तेव्हा त्या उद्गारासारखाच आनंद झाला ! आपल्या सर्वांना शालेय जीवनापासून eureka हा शब्द आश्चर्यभरीत उद्गारांसाठी माहीत असतो. परंतु त्याचा दुसरा अर्थ पूर्ण वेगळा आहे : तांबे व निकेल यांचा मिश्रधातू !
  • Log in or register to post comments

२०२३ : आकर्षकता !

हेमंतकुमार
Mon, 12/04/2023 - 18:34 नवीन
ऑक्सफर्डने 2023 चा मानाचा शब्द जाहीर केला आहे : rizz = आकर्षकता, भुरळ. हा लघुशब्द charisma या शब्दातील मधली दोन अक्षरे घेऊन तयार केलेला आहे. सध्या तो तरुणांमध्ये लोकप्रिय आहे.
  • Log in or register to post comments

कुमार सर,

रामचंद्र
Mon, 12/25/2023 - 02:25 नवीन
कुमार सर, जाई निंबकर आणि मॅक्सीन बर्नसन यांच्या मराठी-इंग्रजी कोशावर आपण लिहावे अशी विनंती.
  • Log in or register to post comments

धन्यवाद !

हेमंतकुमार
Mon, 12/25/2023 - 07:47 नवीन
चांगली सूचना. मी फक्त त्याबद्दल ऐकले आहे. सवडीने मला त्याबद्दल माहिती काढावी लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामचंद्र

धन्यवाद सर. तशी म्हणजे मा. का

रामचंद्र
Mon, 12/25/2023 - 20:10 नवीन
धन्यवाद सर. तशी म्हणजे मा. का. देशपांड्यांच्या मराठी -इंग्रजी कोशाच्या तुलनेत याची शब्दसंख्या कमी आहे पण यात खास मराठी संस्कृती विचारात घेऊन रचना केली आहे असे वाटते म्हणून आपल्या दृष्टीने तो कसा वाटतो याविषयी उत्सुकता आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

त्या कोशाची

हेमंतकुमार
Mon, 12/25/2023 - 21:27 नवीन
इ आवृत्ती इथे आहे. बरेच शब्द त्यात घालून बघावे लागतील. पाहूया पुढील वर्षात सवडीने ! :) दरम्यान, तुम्ही या जुन्या धाग्याला चालना दिलीच आहे तर अन्य काही रंजक पुढील स्वतंत्र प्रतिसादात लिहितो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामचंद्र

या दुव्याबद्दल मन:पूर्वक आभार

रामचंद्र
Tue, 12/26/2023 - 01:08 नवीन
या दुव्याबद्दल मन:पूर्वक आभार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

घोड्यावरून ..

हेमंतकुमार
Mon, 12/25/2023 - 21:29 नवीन
Image removed. या घोड्याला Hackney असे नाव आहे. त्या नावाचा इतिहास रंजक आहे. लंडनजवळील Hackney या नावाच्या खेड्यात एकेकाळी या घोड्यांची पैदास करीत असत. हे घोडे भाड्याने वापरायच्या घोडागाडीसाठी वापरले जाऊ लागले. या घोडागाड्यांचा वापर कोणीही सर्वसामान्य नागरिक सर्रास करत असे. या घटनेवरून अतिसामान्य/नीरस गोष्टीसाठी hackneyed हे विशेषण अस्तित्वात आले. साहित्यात ते बऱ्यापैकी वापरतात. वापरून वापरून गुळगुळीत झालेल्या शब्दप्रयोग किंवा वाक्प्रचारांना hackneyed quotations/phrases असे म्हणतात.
  • Log in or register to post comments

Hackneyed चा उपयोग

सर टोबी
Tue, 12/26/2023 - 08:06 नवीन
टाइम्स ऑफ इंडिया मध्ये सहसा ‘अस्थानी’ किंवा’मिळमिळीत’ अशा क्रियाविशेषण स्वरूपात वापरला जायचा. खासकरून परराष्ट्र खात्याचा भारतीय हितसंबंधांना बाधा आणणाऱ्या आंतरराष्ट्रीय घडामोडींवर जो प्रतिसाद असतो त्यावर बातमी देतांना हा शब्द वापरला जातो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

छान !

हेमंतकुमार
Mon, 01/01/2024 - 08:25 नवीन
चांगली माहिती दिलीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर टोबी

लवंग व लसूण !

हेमंतकुमार
Sat, 01/13/2024 - 11:21 नवीन
Image removed. हे दोन वेगळे पदार्थ एकाच चित्रात का घेतले असावेत ? जरा विचार करून तर बघा.. .. .. .. .. या दोघांनाही एकच इंग्लिश शब्द आहे : clove अर्थानुसार ती दोन स्वतंत्र नामे असून त्यांच्या व्युत्पत्ती वेगवेगळ्या आहेत : लवंग : (Latin) clavus = a nail लसणाची पाकळी : ( Old English) clufu = cleft, thing cloven.
  • Log in or register to post comments

ebook

हेमंतकुमार
Mon, 02/05/2024 - 20:16 नवीन
ebook हा एक सलग ५ अक्षरी शब्द म्हणून आता स्वीकारला गेला आहे : शब्दकोडे सोडवताना हे लक्षात घ्यावे लागते.
  • Log in or register to post comments

विहिर ते तुरुंग !

हेमंतकुमार
Tue, 02/20/2024 - 16:47 नवीन
bridewell या शब्दाचा वधूशी काही संबंध नाही परंतु विहिरीशी मात्र आहे ! या शब्दाचा विशेषनामाकडून सामान्यनामाकडे झालेला प्रवास पाहणे रंजक ठरेल. अगदी सुरुवातीस लंडनमधील एका विहिरीला St. Bride यांचे नाव देण्यात आले. म्हणजेच ते झाले Bridewell. पुढे या जागेचे रूपांतर क्रमाक्रमाने चर्च, राजवाडा, अनाथालय, रुग्णालय आणि शेवटी तुरुंगात झाले. Image removed. सध्या हा शब्द शहरातील मोठ्या व महत्त्वाच्या तुरुंगासाठी वापरला जातो.
  • Log in or register to post comments

एकाक्षरी शब्दकोश

हेमंतकुमार
Tue, 04/09/2024 - 10:30 नवीन
सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ! ... मराठीत एकाक्षरी शब्द असून असून किती असतील ? अंदाज बांधायला गेलो तर आपल्याला वाटते- असतील ३०-४० … :) परंतु संख्या इतकी मर्यादित नाही ! नुकताच मी मराठीतील एकाक्षरी शब्दांचा लघुकोश आणला. तो प्राध्यापक भा म गोरे यांनी लिहिलाय. या छोटेखानी पुस्तकातील तब्बल ६८ पाने या एकाक्षरी शब्दांनी व्यापलेली आहेत !! एकूण शब्द मोजावे लागतील :) ण, ळ आणि अन्य एक दोन किचकट अक्षरे वगळता बाकी सर्व अक्षरांची बाराखडी एकाक्षरी शब्द म्हणून अस्तित्वात आहे.
  • Log in or register to post comments

hobosexual !

हेमंतकुमार
Fri, 08/29/2025 - 16:49 नवीन
hobosexual = घरदार नसलेली भटकी व्यक्ती जेव्हा निवाऱ्यासाठी दुसऱ्या व्यक्तीजवळ राहते आणि प्रेमसंबंध ठेवते तेव्हा हा शब्द वापरतात. (hobo = घरदार नसलेला) अलीकडे महानगरांमधील घरांचे भाव आवाक्याबाहेर गेलेले असल्यामुळे अनेकांना त्यासाठी असा मार्ग स्वीकारावा लागत आहे. या संकल्पनेचा सर्व इतिहास व सद्यस्थिती इथे. आता त्यातून होणारे गैरप्रकार हा देखील एक कटकटीचा विषय झालेला आहे.
  • Log in or register to post comments

माझ्याकडे सुमारे १५-१६ तरी

युयुत्सु
Sun, 08/31/2025 - 11:12 नवीन
माझ्याकडे सुमारे १५-१६ तरी कोश आहेत, असा या लेखाच्या निमित्ताने साक्षात्कार झाला!
  • Log in or register to post comments

वा !

हेमंतकुमार
Sun, 08/31/2025 - 12:22 नवीन
चांगली गोष्ट आहे. वाचून आनंद वाटला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

रेल्वे टाईम टेबल आणि चिमणराव.

चित्रगुप्त
Mon, 09/01/2025 - 04:17 नवीन
एखादे दिवशी जर हाताशी वाचण्यासारखे काही नसेल तर
-- हे वाचून मला एकदम माझ्या (१९७८ साली दिवंगत झालेल्या) वडिलांची आठवण झाली. बरेचदा ते (कुठेही जायचे नसताही-) रेल्वेचे टाईमटेबल घेऊन वाचत बसायचे, मधूनच जोराजोरात हसायचे. मी एकदा का हसताय, विचारल्यावर म्हणाले, "अमूक स्टेशनहून अमूक गाडीने बेगूसरायला (किंवा असेच कोणतेतरी स्टेशन) रात्री दहाला पोचल्यावर पुढे तमूक गावी जायला गाडी चार दिवसांनंतर आहे" ... आता यात एवढे हसण्यासार्खे काय होते ते मला समजले नाही, पण वडिलांना त्यात खूप मजा वाटत असे. -- मलाही 'चिमणराव' त्यांच्या मुलाबाळांसकट रात्रीच्या वेळी 'बेगुसराय' रेल्वे स्टेशनावर उतरून आता काय करावे या विचाराने कावरेबावरे झालेले 'दिसले' आणि हसू आले. कै. वसंत सरवटे यांनी ‘ललित’ मासिकाच्या दिवाळी १९७८ च्या अंकातील कै. चिं. वि. जोशी आणि कै. सी. गं. जोशी या तत्कालीन लेखक – चित्रकार जोडीविषयी लिहिलेला रोचक लेख खालील दुव्यावर वाचता येईलः https://maitri2012.wordpress.com/2020/04/08/%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A3-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%BE/
  • Log in or register to post comments

छान आठवण.

हेमंतकुमार
Mon, 09/01/2025 - 07:35 नवीन
रेल्वेचे टाईमटेबल घेऊन वाचत बसायचे,
हा लेख जेव्हा मासिकात प्रथम प्रसिद्ध झाला होता तेव्हा त्यावर एका वाचकाची अशीच प्रतिक्रिया आलेली होती. :)
चिं. वि. जोशी आणि कै. सी. गं. जोशी या
पाहतो सवडीने
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

उत्सव विशेष शब्द

हेमंतकुमार
Mon, 09/01/2025 - 19:18 नवीन
खिरापत याच्या अनेक व्युत्पत्ती आहेत : क्षिरापत = कथाकीर्तनाच्या शेवटी श्रोत्यांना द्यायचा प्रसाद (पूर्वी पळीभर दूधसाखर देण्याची चाल होती.) / क्षीराब्धी खिरनी/णी =खीर, गोड लापशी, प्रसाद. शेरणी= नवस फेडण्याकरितां वाटलेली मिठाई, खैर + आफियत्? (फा.) : मंगल, कुशल ( अर्थात हा फार वेगळा अर्थ झाला. म्हणूनच दाते कोश प्रश्नचिन्ह देतो आहे).
  • Log in or register to post comments

जपानी-मराठी

हेमंतकुमार
Sat, 09/20/2025 - 07:40 नवीन
काकेहाशि हा जपानी-मराठी शब्दकोश जपानी भाषेच्या शिक्षिका स्नेहा असईकर यांनी लिहिला असून त्याचे आज संध्याकाळी पुण्यात प्रकाशन होणार आहे. अभिनंदन ! जपानी आणि मराठी भाषांतील व्याकरण सारखेच असल्याचे लेखिकेने म्हटले आहे.
  • Log in or register to post comments

कार्यक्रमाला येणाऱ्यांना....

कंजूस
Sat, 09/20/2025 - 15:10 नवीन
कार्यक्रमाला येणाऱ्यांना.... सुशी मिळेल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

सुशी !

हेमंतकुमार
Sat, 09/20/2025 - 16:09 नवीन
तुमची सूचना बरीच उशिरा आली. आता तासाभरात तो कार्यक्रम चालू होणार आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

‘Blue light special’

हेमंतकुमार
Sat, 09/27/2025 - 09:29 नवीन
हा एक वैशिष्ट्यपूर्ण वाक्प्रचार असून त्याचा उगम अमेरिकेच्या Kmart मधून झालेला आहे. दुकानातील एखादी वस्तू अत्यंत सवलतीच्या दरात मिळाली असता तो वापरतात. विसाव्या शतकातत Kmart मध्ये अशा सवलतीच्या दरातील वस्तू मॉलमध्ये जिथे ठेवलेल्या असत त्याच्याभोवती लकाकणारा निळा दिवा लावलेला असे. अशा वस्तू बहुधा हलक्या दर्जाच्या असत.
  • Log in or register to post comments

डोकं खाजवा . . .

हेमंतकुमार
Sun, 12/21/2025 - 11:48 नवीन
(मॅगी) नूडल्सशी काही संबंध नसलेला एक मस्त अनौपचारिक वाक्प्रचार : Use your noodle = डोकं खाजवा जरा ! (नुसतं ठोंब्यासारखं बसू नका) 😇 जुन्या इंग्लिशमध्ये डोक्याच्या मागच्या भागाला noodle म्हणत असत. त्यावरून हा आला असावा.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा