Skip to main content

शब्दकोशांच्या मनोरंजक विश्वात

लेखक हेमंतकुमार यांनी शुक्रवार, 30/06/2017 19:00 या दिवशी प्रकाशित केले.
माध्यमिक शाळेत असताना आम्हाला रोजच्या वेळापत्रकात दोन मधल्या सुट्या असायच्या – एक लहान १५ मिनिटांची तर दुसरी मोठी ४५ मिनिटांची. मोठ्या सुटीमध्ये शाळेच्या ग्रंथालयात आमच्यासाठी वाचनाची सोय केलेली असे. तिथे बसून वाचताना समोरच्या भिंतीवर नजर जाई. तिथे मोठ्या व आकर्षक अक्षरात ‘ग्रंथ हेच गुरु’ हे वचन लिहिलेले होते. वाचनाच्या आवडीतून त्या वचनाची सत्यता पटत गेली, यात शंकाच नाही. मोठे होता होता मी विविध प्रकारचे तीन भाषांतील साहित्य वाचत गेलो आणि एका निष्कर्षाप्रत येउन ठेपलो. तो म्हणजे, या सर्व ग्रंथरूपी गुरूंचे गुरु म्हणजे शब्दकोश! सुरवातीला वाचनात एखादा शब्द अडला, की त्याचा अर्थ पाहण्यापुरता शब्दकोश उघडला जाई. तो जमाना अर्थात फक्त छापील पुस्तकांचाच होता. त्या वयात मी शब्दकोशाच्या जाडजूड ‘प्रकृती’कडे कुतूहलाने बघत असे. शालेय जीवनात शब्दकोशाचा उपयोग शब्दार्थ पाहण्यापुरताच सीमित होता. तेव्हा इंग्लिश–मराठी, मराठी-इंग्लिश आणि हिंदी-मराठी हे शब्दकोश हाताळले जात. महाविद्यालयीन जीवनात ‘ब्रिटीश लायब्ररी’ चा सभासद झाल्यावर काही थोर इंग्लिश लेखक वाचायला घेतले. तेव्हा इंग्लिश पुस्तकांचे वाचन म्हणजे एक अभ्यासच असायचा. हातात ते पुस्तक, टेबलावर इं-मराठी शब्दकोश आणि शब्दार्थ टिपून घ्यायला बाजूला वही-पेन. वाचलेल्या साहित्याची काही वडीलधाऱ्यांशी चर्चा होई. त्यात एका गृहस्थांनी सल्ला दिला, की आता शब्दार्थ पाहण्यासाठी तुमच्या शालेय शब्दकोशावर समाधान मानू नकोस; आता गरज आहे ती तू ‘Oxford’ ची कास धरण्याची. मग मी Concise Oxford च्या इंग्लिश- इंग्लिश कोशाची खरेदी केली. सहज म्हणून हा कोश चाळू लागलो अन पहिल्या नजरेतच लक्षात आले, की हा निव्वळ शब्दकोश नसून साक्षात ज्ञानकोश आहे. त्यात एखाद्या शब्दाचे अनेक अर्थ देण्यासाठी पुस्तकाच्या पानाचा तब्बल एक स्तंभही खर्ची पडलेला दिसे. एखाद्या कठीण शब्दाचा अर्थ पाहण्यासाठी म्हणून कोश उघडला जाई आणि तो अर्थ पाहता पाहता एकातून दुसऱ्या व त्यातून तिसऱ्या शब्दात मी उड्या मारत असे. कित्येकदा शब्दार्थासाठी उघडलेला कोश पाहताना वाचनाचे मूळ पुस्तक बाजूलाच राही आणि बराच वेळ मी शब्दकोशातच मनसोक्त विहार करीत असे. शब्दाच्या अर्थाबरोबरच त्याचा उगम, ऐतिहासिक संदर्भ इत्यादी माहिती वाचून छान मनोरंजन होई. बऱ्याचदा आपल्या नेहमीच्या वापरातले शब्दसुद्धा कोशात पाहण्यात मजा येते. उदाहरणार्थ ‘August’ हा शब्द पाहा. आता हे एका महिन्याचे नाव आहे हे शाळकरी पोरही सांगते. पण ते नाव रोमन साम्राज्याचा पहिला राजा ऑगस्टस सीझर याच्यावरून आहे, तसेच august चा दुसरा अर्थ ‘थोर’ असाही आहे हे ज्ञान आपल्याला शब्दकोशात डोकावल्याशिवाय कसे मिळेल? एखाद्या शब्दाला तर एकापेक्षा अनेक असे कित्येक अर्थ असतात आणि त्या अर्थांचा एकमेकाशी सुतराम संबंध नसतो. ‘set’ चे तब्बल १५६ प्रकारचे अर्थ आहेत हे जेव्हा आपल्याला कोशात दिसते तेव्हा मोठा अचंबा वाटतो. एकच उच्चार पण भिन्न स्पेलिंग व अर्थ असणारे शब्द जेव्हा आपण कोशात पाहून पक्के करून घेतो तेव्हा होणारा आनंद काही वेगळाच असतो. सध्याच्या ‘ हॅलो, हाय’च्या युगात बहुतेकांना फोनवरचाच ‘हॅलो’ माहित असतो. पण, शब्दकोश बारकाईने पाहणाऱ्यालाच hallo, hallow & halo यांतील फरक समजलेले असतील. आपल्या देशात गेल्या पंचवीस वर्षांत इंग्लिश माध्यमातून शालेय शिक्षण घेणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय दिसून येते. ही पिढी ‘स्पोकन इंग्लिश’ च्या बळावर येताजाता टूरटूर करीत असते. पण त्याचबरोबर त्यांचे स्पेलिंग व व्याकरण यांकडे कमालीचे दुर्लक्ष झालेले जाणवते. अशा काहींची फिरकी घ्यायला मला आवडते. त्यांना मी ‘फुलस्केप’ या परिचित शब्दाचे स्पेलिंग विचारतो. आतापर्यंत तरी मला हे अचूक स्पेलिंग सांगणारी व्यक्ती भेटलेली नाही. याचे स्पेलिंग आहे ‘foolscap’ आणि योग्य उच्चार आहे ‘फुल्झकॅप’. हे ज्ञान शब्दकोशाला आपला मित्र केल्याशिवाय प्राप्त होणे नाही! मोठ्या आकाराचा कागद म्हटल्यावर बहुतेकजण ‘full…’अशी सुरवात करतात अन fool होऊन बसतात! या शब्दाचा उगम तर किती मनोरंजक. Fool म्हणजे विदूषक. पुरातनकाळी विदूषक जी टोपी वापरत त्या टोपीचे चिन्ह ‘watermark’ म्हणून या कागदात उमटवलेले असे. ‘फुलस्केप’ वरून घडलेला एक किस्सा सांगतो. एका माध्यमिक शाळेत सत्राच्या पहिल्या दिवशी एक शिक्षिका विद्यार्थ्यांना म्हणाल्या, “हे बघा, सर्वांनी ‘फुलस्केप’ वह्या आणायच्या आहेत, ‘हाफस्केप’ वह्या आणलेल्या मला अजिबात चालणार नाहीत!” एखादा शब्द नीट न शिकून घेतल्याचे परिणाम एका पिढीकडून पुढच्यांकडे कसे संक्रमित होतात याचे हे उदाहरण. गडद काचांच्या चष्म्याला आपण ‘गॉगल’ म्हणतो यात नवीन काहीच नाही. पण या शब्दाचे स्पेलिंग goggles असून ते अनेकवचनी नाम म्हणूनच वापरायचे असते ही दृष्टी मला शब्दकोशानेच दिली. आपल्या समाजात एखाद्याने ‘लेस्बिअन’ हा शब्द जरी उच्चारला तर आपण पटकन चमकून त्याच्याकडे पाहतो. जर उत्सुकता म्हणून आपण हा शब्द कोशात पाहिला तर त्याचा उगम पाहून आपली करमणूक होते. ‘lesbos’ नावाच्या बेटावर ‘साफो’ नावाची कवयित्री राहत असे आणि ती समलिंगी संबंधात गुंतल्याचा लोकांना संशय होता. ही माहिती समजल्यावर या शब्दाकडे आपण अश्लील म्हणून न पाहता कुतूहलाने पाहू लागतो. आजकाल आपले एखादे कार्यालयीन काम होणे जर एखाद्या स्त्रीच्या हातात असेल तर तिच्या तेथील दर्जाचा विचार न करता आपण तिच्यापुढे सारखे ‘Madam, Madam’ करीत असतो. आता ‘madam’ चे कोशातील दोन अर्थ बघा. या शब्दाचा उगम फ्रेंचमधून आहे.त्याचा पहिला अर्थ ‘बाईसाहेब’ असा तर दुसरा चक्क ‘वेश्यागृहाची मालकीण’ असा आहे! तसेच या शब्दाचे अनेकवचन( madams असे नसून) फ्रेंच पद्धतीने Mesdames असे आहे. सध्या सर्वत्र बोकाळलेल्या मॅडमांनी हा शब्द पूर्णपणे समजून घ्यायला काही हरकत नाही. वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश घेतल्यापासून ते डॉक्टर होऊन तीस वर्षे उलटून गेल्यावरही वैद्यकीय शब्दकोश हा तर माझा जिवलग मित्र आहे. त्याच्या पातळ पांढऱ्याशुभ्र कागदावर परदेशात केलेली सुंदर छपाई, त्याचा लठ्ठ पण मोहक आकार, त्यातील अवघड शब्दांची केलेली सुरेख फोड, शब्दार्थांचा पाडलेला कीस आणि शब्दानुरूप चित्रे ही त्याची वैशिष्ट्ये मला नेहमीच मोहित करतात. सामान्य वाचकांसाठी त्यातले दोन मनोरंजक शब्द सांगतो: १. AC/DC : खरे तर आपल्या सामान्यज्ञानानुसार हे विद्युत प्रवाहाचे दोन प्रकार आहेत. पण वैद्यकीय कोशातील त्याचा अर्थ ‘bisexual individual’ असा वाचल्यावर आपण कपाळावर हात मारून घेतो! २. Hartnup disease : हा एक आनुवंशिक आजार आहे. आता Hartnup हे बहुधा ज्या शास्त्रज्ञाने तो आजार शोधला त्याचे नाव असेल असा अंदाज आपण बांधतो. पण शब्दकोशाचा पाहा काय सांगतो ते. Hartnup हा शास्त्रज्ञ नसून, तो आजार ज्या रुग्णामध्ये पहिल्यांदा आढळला त्याचे आडनाव आहे. १९५० च्या सुमारास ब्रिटनमधील श्री. हार्टनप यांनी आपल्या cousinशी लग्न केले होते. त्या दाम्पत्याला झालेल्या आठ अपत्यांपैकी चौघांमध्ये हा आजार आढळून आला. मराठी-मराठी कोश हाताळणे ही सुद्धा एक चांगली करमणूक आहे. बऱ्याचदा मराठी कोश बघण्याच्या बाबतीत मराठी माणूस उदासीन असतो. आपल्या दैनंदिन वापरातील काही मराठी शब्दांचा खरा अर्थ हा कोश पाहिल्यावरच आपल्याला समजतो. अन्यथा त्याऐवजी काहीतरी चुकीची कल्पना किंवा अर्धवट माहिती आपल्या डोक्यात असते. एकदा एका कॉलेजच्या तरुणाला मी ‘आदिवासी’ चा अर्थ विचारला. क्षणाचाही विलंब न लावता तो म्हणाला, “ते म्हणजे अति मागास गरीब लोक”. त्याच्या म्हणण्यात जरी तथ्य असले तरी खरा अर्थ तो नाही. ‘आदी’= मूळ व ‘वासी’= राहणारे. म्हणजेच, एखाद्या प्रदेशातील मूळ रहिवासी. आपल्याकडे पाटील, कुलकर्णी, कांबळे ही अगदी सर्रास आढळणारी आडनावे. एकदा सहज म्हणून ‘कुलकर्णी’ ची व्युत्पत्ती कोशात बघितली आणि स्तिमित झालो. ती बघण्यापूर्वी, ‘कुलकर्णी’ हा शब्द अस्सल मराठीच – एवढेच काय, पण पक्का पुणेरीच- या भ्रमात मी होतो. शब्दकोशाने मला सांगितले, की हा शब्द मूळ तेलुगु (कुळकरणी) आहे. कुळ = शेतकरी आणि करण = हिशेब. हे वाचल्यावर मला एका ‘कुळाचा’ शोध तर लागलाच आणि त्याचबरोबर माझ्या भाषिक अस्मितेचे कुंपण गळून पडले, हे नक्की! शब्दकोशांमध्ये काही व्यवहारोपयोगी परिशिष्टेही असतात. निरनिराळ्या लघुरुपांचे (acronyms) पूर्ण रूप देणारे परिशिष्ट हे त्यातले एक ठळक उदाहरण. सध्याच्या संगणकीय युगात कित्येक नवीन लघुरुपांचा सुळसुळाट झालेला आहे. अशी काही लघुरूपे आपल्या डोळ्यांसमोर सतत आल्याने हळूहळू आपल्याला ते जणू काही शब्दच आहेत असे वाटू लागते. एक उदाहरण देतो. सध्या कोणताही online व्यवहार करताना आपल्याला सतत भेटणारे एक लघुरूप म्हणजे ‘CAPTCHA’. त्याचे दीर्घरूप किती मनोरंजक आहे आणि त्यामागचा तांत्रिक इतिहास काय आहे, ते आपल्याला कोश पाहिल्याशिवाय कळणे नाही! आपले ज्ञान समृद्ध करतानाच आपल्यावर मनोरंजनाचाही शिडकावा करणारे विविध शब्दकोश आपल्या वापरात जरूर असावेत. माझ्याकडे विविध प्रकारचे सुमारे डझनभर कोश आहेत. आंतरजालाच्या व्यापक प्रसारानंतर आता अनेक प्रकारचे कोश जालावर उपलब्ध आहेत. त्यामुळे जाडजूड वजनाचे छापील कोश आता एखाद्याच्या वैयक्तिक ग्रंथसंग्रहात कमी दिसतात. पण, माझी पिढी ही मुळात अशा छापील कोशांवर ‘पोसली’ गेली असल्याने माझ्याकडे ते आजही आहेत. माझे त्यांच्यावर इतके प्रेम आहे की मी त्यांना माझे कुटुंबघटकच मानतो! माझ्या घरभर ते विखुरलेले आहेत. त्यापैके एक-दोघांनी तर माझ्या पलंगावर विसावण्याचा मान पटकावलाय. वेळप्रसंगी माझ्या एकटेपणात ते माझी सुरेख सोबत करतात. धष्टपुष्ट छापील कोशाला प्रेमाने उराशी कवटाळण्याची मजा काही औरच असते. त्याची सर जालकोशाच्या ‘सर्च इंजिन’ला कशी येईल? एखादे दिवशी जर हाताशी वाचण्यासारखे काही नसेल तर मी खुशाल एखादा कोश हाती घेऊन त्यात डोके खुपसून बसतो. दिवसाकाठी निदान एकतरी नवीन शब्द मी कोशांमधून शिकतो व समजावून घेतो. ग्रंथाचे गुरु असलेल्या शब्दकोशांनी मला ज्ञान आणि मनोरंजन या दोन्ही पातळ्यांवर अतीव समाधान दिलेले असल्याने मी त्यांचा कायमचा ऋणी आहे. ***************************************************************************** ( टीप : माझ्या या लेखाची पूर्वप्रसिद्धी : ‘अंतर्नाद’ मासिक. काही सुधारणांसह येथे प्रकाशित )
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 94291
प्रतिक्रिया 177

प्रतिक्रिया

In reply to by गवि

सारांश या शब्दाबद्दल मला शंका वाटल्याने लिहीला नाही. blurb मध्ये खरंच पुस्तकसारांश असतो की फक्त ठळक भाग अधोरेखित केलेला ? अरुण नेरूरकर यांच्या भाषा या पुस्तकात पुस्तकासंबंधीच्या इतर सर्व घटकांना मराठी नावे वापरलेली आहेत परंतु blurb हे मूळ इंग्लिश नाव तसेच ठेवलेले आहे. ते अन्य शब्द म्हणजे :
  • मुखपृष्ठ व मलपृष्ठ
  • ग्रंथांगिका ( = पाश्चात्य देशात dust जॅकेट , तर भारतात रॅपर)
  • पाखा = ग्रंथांगिकेच्या आतल्या चिकटवलेल्या बाजू असतात त्या = flaps )
  • स्मृतीपर्ण (= बुक मार्क) अर्थात याला वाचनखूण हा सोपा पर्याय आहे.
व कणा = spine

In reply to by हेमंतकुमार

ब्लर्ब मधे सारांश असतो. पण रहस्यभेद नसतो. पुस्तकाच्या आत काय आहे हे थोडक्यात सांगून वाचकाचे लक्ष वेधून घेण्यासाठी ती एक प्रकारे जाहिरात असे म्हणता येईल.

In reply to by कंजूस

= बीजक = कापड इ॰ च्या गठ्ठ्यांत घालतात किंवा वर लावितात ती किमंत, वजन, जात इ॰ ची चिठ्ठी. दाते शब्दकोश पण हा रुळलेला नसल्याने मनासारखा नाही 😀

थायलंड मधील ऑटोरिक्षांना tuk-tuk असे मजेदार नाव आहे. त्या रिक्षांच्या इंजिनाच्या आवाजानुसार हा शब्द निर्माण झाला आहे - नादानुकारी शब्द.

काही स्वच्छतागृहांमध्ये कमोडच्या शेजारी स्वतंत्र Bidet असते. Bidet हा फ्रेंच शब्द मजेदार आहे. त्याचा शब्दशा अर्थ "लहान घोडा" (pony) असा आहे. ज्याप्रमाणे आपण लहान घोड्यावर स्वार होतो तीच कल्पना यावर बसताना आहे !

In reply to by कंजूस

मूळ संस्कृत आहे असे दिसते. तिथून हिंदी आणि मग इंग्लिश. लुटणें luṭaṇēṃ v c (लुंठन S) https://bruhadkosh.org/words?shodh=+%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%A… Loot : https://www.etymonline.com/word/loot

नुकतेच केंब्रिज शब्दकोशाने woman आणि man यांच्या व्याख्या विस्तारित केल्या आहेत. त्या अशा : * "woman" to include "an adult who lives and identifies as female though they may have been said to have a different sex at birth." * “man” is someone who “identifies as male though they may have been said to have a different sex at birth. गेले 267 वर्षे अस्तित्वात असलेल्या शब्दकोशातील मूळ अर्थात हा महत्त्वाचा बदल आता झालेला आहे. यासंदर्भात पाश्चिमात्य जगात बऱ्यापैकी नाराजीचा सूर उमटला आहे :

2022 मध्ये इंग्लिशमधील प्रमुख शब्दकोशांनी ठरवलेले बहुचर्चित वैशिष्ट्यपूर्ण शब्द : 1. Oxford : goblin mode अगदी स्वत:च्याही भल्याची पर्वा न करता जगणं हे वर्णन चपखलपणे या चित्रात दाखवले आहे. या निमित्ताने 'कोसला' च्या मुखपृष्ठाची आठवण झाली. .. २. Merriam webster : Gaslighting स्वतःच्या फायद्यासाठी एखाद्याची दिशाभूल करणे; जणू काही त्याला ‘येडा’ ठरवायचा प्रयत्न करणे. .. 3. Dictionary.com : woman तृतीयपंथीयांच्या संदर्भात या मूलभूत शब्दाचा अनेकांनी कोशात पुन्हा शोध घेतला. .. ४. Collins Dictionary : Permacrisis अस्थिरता आणि असुरक्षिततेने व्यापलेला व लांबलेला कालावधी. रेंगाळलेला कोविड, युक्रेन युद्ध इत्यादी गोष्टींची त्याला पार्श्वभूमी आहे.

In reply to by हेमंतकुमार

अतिशय रोचक धागा आहे.
या निमित्ताने 'कोसला' च्या मुखपृष्ठाची आठवण झाली.
भालचंद्र नेमाडे यांच्यावर निर्मित 'उदाहरणार्थ नेमाडे' या चित्रपटाचे ट्रेलर यूट्यूबवर आहे. पण संपूर्ण चित्रपट कुठे उपलब्ध आहे का, हे कळू शकले नाही. बघण्याची खूप इच्छा आहे. कुणाला माहिती असेल तर कळवा. https://youtu.be/ZyT7RIh5z9E?si=-2gj4ClSiV_0lUSt

आज एका कोड्यात सहा अक्षरी शब्द जमताना नाकी नऊ आले. पण अखेरीस eureka हे उत्तर मिळाले तेव्हा त्या उद्गारासारखाच आनंद झाला ! आपल्या सर्वांना शालेय जीवनापासून eureka हा शब्द आश्चर्यभरीत उद्गारांसाठी माहीत असतो. परंतु त्याचा दुसरा अर्थ पूर्ण वेगळा आहे : तांबे व निकेल यांचा मिश्रधातू !

ऑक्सफर्डने 2023 चा मानाचा शब्द जाहीर केला आहे : rizz = आकर्षकता, भुरळ. हा लघुशब्द charisma या शब्दातील मधली दोन अक्षरे घेऊन तयार केलेला आहे. सध्या तो तरुणांमध्ये लोकप्रिय आहे.

कुमार सर, जाई निंबकर आणि मॅक्सीन बर्नसन यांच्या मराठी-इंग्रजी कोशावर आपण लिहावे अशी विनंती.

In reply to by रामचंद्र

चांगली सूचना. मी फक्त त्याबद्दल ऐकले आहे. सवडीने मला त्याबद्दल माहिती काढावी लागेल.

In reply to by हेमंतकुमार

धन्यवाद सर. तशी म्हणजे मा. का. देशपांड्यांच्या मराठी -इंग्रजी कोशाच्या तुलनेत याची शब्दसंख्या कमी आहे पण यात खास मराठी संस्कृती विचारात घेऊन रचना केली आहे असे वाटते म्हणून आपल्या दृष्टीने तो कसा वाटतो याविषयी उत्सुकता आहे.

In reply to by रामचंद्र

इ आवृत्ती इथे आहे. बरेच शब्द त्यात घालून बघावे लागतील. पाहूया पुढील वर्षात सवडीने ! :) दरम्यान, तुम्ही या जुन्या धाग्याला चालना दिलीच आहे तर अन्य काही रंजक पुढील स्वतंत्र प्रतिसादात लिहितो

ok या घोड्याला Hackney असे नाव आहे. त्या नावाचा इतिहास रंजक आहे. लंडनजवळील Hackney या नावाच्या खेड्यात एकेकाळी या घोड्यांची पैदास करीत असत. हे घोडे भाड्याने वापरायच्या घोडागाडीसाठी वापरले जाऊ लागले. या घोडागाड्यांचा वापर कोणीही सर्वसामान्य नागरिक सर्रास करत असे. या घटनेवरून अतिसामान्य/नीरस गोष्टीसाठी hackneyed हे विशेषण अस्तित्वात आले. साहित्यात ते बऱ्यापैकी वापरतात. वापरून वापरून गुळगुळीत झालेल्या शब्दप्रयोग किंवा वाक्प्रचारांना hackneyed quotations/phrases असे म्हणतात.

In reply to by हेमंतकुमार

टाइम्स ऑफ इंडिया मध्ये सहसा ‘अस्थानी’ किंवा’मिळमिळीत’ अशा क्रियाविशेषण स्वरूपात वापरला जायचा. खासकरून परराष्ट्र खात्याचा भारतीय हितसंबंधांना बाधा आणणाऱ्या आंतरराष्ट्रीय घडामोडींवर जो प्रतिसाद असतो त्यावर बातमी देतांना हा शब्द वापरला जातो.

ok हे दोन वेगळे पदार्थ एकाच चित्रात का घेतले असावेत ? जरा विचार करून तर बघा.. .. .. .. .. या दोघांनाही एकच इंग्लिश शब्द आहे : clove अर्थानुसार ती दोन स्वतंत्र नामे असून त्यांच्या व्युत्पत्ती वेगवेगळ्या आहेत : लवंग : (Latin) clavus = a nail लसणाची पाकळी : ( Old English) clufu = cleft, thing cloven.

ebook हा एक सलग ५ अक्षरी शब्द म्हणून आता स्वीकारला गेला आहे : शब्दकोडे सोडवताना हे लक्षात घ्यावे लागते.

bridewell या शब्दाचा वधूशी काही संबंध नाही परंतु विहिरीशी मात्र आहे ! या शब्दाचा विशेषनामाकडून सामान्यनामाकडे झालेला प्रवास पाहणे रंजक ठरेल. अगदी सुरुवातीस लंडनमधील एका विहिरीला St. Bride यांचे नाव देण्यात आले. म्हणजेच ते झाले Bridewell. पुढे या जागेचे रूपांतर क्रमाक्रमाने चर्च, राजवाडा, अनाथालय, रुग्णालय आणि शेवटी तुरुंगात झाले. ok सध्या हा शब्द शहरातील मोठ्या व महत्त्वाच्या तुरुंगासाठी वापरला जातो.

सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ! ... मराठीत एकाक्षरी शब्द असून असून किती असतील ? अंदाज बांधायला गेलो तर आपल्याला वाटते- असतील ३०-४० … :) परंतु संख्या इतकी मर्यादित नाही ! नुकताच मी मराठीतील एकाक्षरी शब्दांचा लघुकोश आणला. तो प्राध्यापक भा म गोरे यांनी लिहिलाय. या छोटेखानी पुस्तकातील तब्बल ६८ पाने या एकाक्षरी शब्दांनी व्यापलेली आहेत !! एकूण शब्द मोजावे लागतील :) ण, ळ आणि अन्य एक दोन किचकट अक्षरे वगळता बाकी सर्व अक्षरांची बाराखडी एकाक्षरी शब्द म्हणून अस्तित्वात आहे.

hobosexual = घरदार नसलेली भटकी व्यक्ती जेव्हा निवाऱ्यासाठी दुसऱ्या व्यक्तीजवळ राहते आणि प्रेमसंबंध ठेवते तेव्हा हा शब्द वापरतात. (hobo = घरदार नसलेला) अलीकडे महानगरांमधील घरांचे भाव आवाक्याबाहेर गेलेले असल्यामुळे अनेकांना त्यासाठी असा मार्ग स्वीकारावा लागत आहे. या संकल्पनेचा सर्व इतिहास व सद्यस्थिती इथे. आता त्यातून होणारे गैरप्रकार हा देखील एक कटकटीचा विषय झालेला आहे.

एखादे दिवशी जर हाताशी वाचण्यासारखे काही नसेल तर
-- हे वाचून मला एकदम माझ्या (१९७८ साली दिवंगत झालेल्या) वडिलांची आठवण झाली. बरेचदा ते (कुठेही जायचे नसताही-) रेल्वेचे टाईमटेबल घेऊन वाचत बसायचे, मधूनच जोराजोरात हसायचे. मी एकदा का हसताय, विचारल्यावर म्हणाले, "अमूक स्टेशनहून अमूक गाडीने बेगूसरायला (किंवा असेच कोणतेतरी स्टेशन) रात्री दहाला पोचल्यावर पुढे तमूक गावी जायला गाडी चार दिवसांनंतर आहे" ... आता यात एवढे हसण्यासार्खे काय होते ते मला समजले नाही, पण वडिलांना त्यात खूप मजा वाटत असे. -- मलाही 'चिमणराव' त्यांच्या मुलाबाळांसकट रात्रीच्या वेळी 'बेगुसराय' रेल्वे स्टेशनावर उतरून आता काय करावे या विचाराने कावरेबावरे झालेले 'दिसले' आणि हसू आले. कै. वसंत सरवटे यांनी ‘ललित’ मासिकाच्या दिवाळी १९७८ च्या अंकातील कै. चिं. वि. जोशी आणि कै. सी. गं. जोशी या तत्कालीन लेखक – चित्रकार जोडीविषयी लिहिलेला रोचक लेख खालील दुव्यावर वाचता येईलः https://maitri2012.wordpress.com/2020/04/08/%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%B6…

In reply to by चित्रगुप्त

रेल्वेचे टाईमटेबल घेऊन वाचत बसायचे,
हा लेख जेव्हा मासिकात प्रथम प्रसिद्ध झाला होता तेव्हा त्यावर एका वाचकाची अशीच प्रतिक्रिया आलेली होती. :)
चिं. वि. जोशी आणि कै. सी. गं. जोशी या
पाहतो सवडीने

खिरापत याच्या अनेक व्युत्पत्ती आहेत : क्षिरापत = कथाकीर्तनाच्या शेवटी श्रोत्यांना द्यायचा प्रसाद (पूर्वी पळीभर दूधसाखर देण्याची चाल होती.) / क्षीराब्धी खिरनी/णी =खीर, गोड लापशी, प्रसाद. शेरणी= नवस फेडण्याकरितां वाटलेली मिठाई, खैर + आफियत्? (फा.) : मंगल, कुशल ( अर्थात हा फार वेगळा अर्थ झाला. म्हणूनच दाते कोश प्रश्नचिन्ह देतो आहे).

काकेहाशि हा जपानी-मराठी शब्दकोश जपानी भाषेच्या शिक्षिका स्नेहा असईकर यांनी लिहिला असून त्याचे आज संध्याकाळी पुण्यात प्रकाशन होणार आहे. अभिनंदन ! जपानी आणि मराठी भाषांतील व्याकरण सारखेच असल्याचे लेखिकेने म्हटले आहे.

हा एक वैशिष्ट्यपूर्ण वाक्प्रचार असून त्याचा उगम अमेरिकेच्या Kmart मधून झालेला आहे. दुकानातील एखादी वस्तू अत्यंत सवलतीच्या दरात मिळाली असता तो वापरतात. विसाव्या शतकातत Kmart मध्ये अशा सवलतीच्या दरातील वस्तू मॉलमध्ये जिथे ठेवलेल्या असत त्याच्याभोवती लकाकणारा निळा दिवा लावलेला असे. अशा वस्तू बहुधा हलक्या दर्जाच्या असत.

(मॅगी) नूडल्सशी काही संबंध नसलेला एक मस्त अनौपचारिक वाक्प्रचार : Use your noodle = डोकं खाजवा जरा ! (नुसतं ठोंब्यासारखं बसू नका) 😇 जुन्या इंग्लिशमध्ये डोक्याच्या मागच्या भागाला noodle म्हणत असत. त्यावरून हा आला असावा.