पायातली वहाण..

Jayagandha Bhatkhande's picture
Jayagandha Bhat... in जनातलं, मनातलं
3 Nov 2021 - 11:20 am

पायातली वहाण...

तुला फक्त येते,
श्रीखंड अन् पुरी..
आवडत नाही तुला,
राईस अँड करी..
आम्ही जातो केळवणाला,
तू बस घरी..
कसं आहे, पायातली वहाण,
जरा पायातच बरी...

येऊ का रे ऑफिसला..?
मारते एक फेरी..
क्रेडिट आणि डेबिट मधलं,
कळतं का काहीतरी..?
घरी बस तुझी तिथेही,
कटकट नको भारी..
पायातली वहाण तू,
पायातच बरी..

लाव ना रे आजीला फोन,
तिची तब्येत नाही बरी..
इतक्या वेळा शिकवलं तुला,
पण विसरतेस तरी..
कधी तुझं तुला जमणार?
बावळट आहेस खरी..
पायातली वहाण तू,
पायातच बरी..

दोन पिढ्यांमधील अशीच,
वाढत जाते दरी..
हीच परिस्थिती सध्या,
तिला दिसते घरोघरी..
समजून घ्यावं ज्याचं त्यानं,
गोष्ट आहे खरी..
पायातली वहाण ती,
पायातच बरी..

कुठलीशी ही दिवास्वप्नं,
ती घेऊन बसते उरी..
छोटीशी इच्छाही तिची,
कधी झाली नाही पुरी..
आता मात्र वाटतं आतून,
ती बाजूला झालेलीच बरी..
कारण नक्की समजलंय तिला,
पायातली वहाण पायातच बरी.....

जयगंधा..
२-११-२०२१.

कविताविचार

प्रतिक्रिया

सुक्या's picture

3 Nov 2021 - 11:57 pm | सुक्या

नाही . . . जग इतकंही वाईट नाहीये . . .

मदनबाण's picture

5 Nov 2021 - 5:45 pm | मदनबाण

:(

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- सीख नहीं पा रहा हूँ मीठे झूठ बोलने का हुनर,कड़वे सच से हमसे न जाने कितने लोग रूठ गये।

तर्कवादी's picture

6 Nov 2021 - 12:24 am | तर्कवादी

दोन पिढ्यांमधील अशीच,
वाढत जाते दरी

इथे स्त्री पुरुषांतलं अंतर म्हणायचंय की दोन पिढ्यांतलं ? की माझ्या समजण्यात काहीतरी गल्लत होतेय ?