वास्तव- चिंतन- तत्वज्ञान मंडनाची कादंबरी (‘मी गोष्टीत मावत नाही’)

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture
डॉ. सुधीर राजार... in जनातलं, मनातलं
20 Aug 2021 - 12:16 pm

- डॉ. रवींद्र नेवाडकर

मी एक सामान्य वाचक आहे. “मी गोष्टीत मावत नाही” या डॉ. सुधीर देवरे यांच्या हटके कादंबरीवर एक वाचक म्हणून प्रतिक्रिया देत आहे. मी देवरे सरांच्या ब्लॉगवर प्रतिक्रिया म्हणून काहीतरी लिहीत असतो, हेच माझे साहित्य लिखाण संचित आहे.
हे पुस्तक वाचण्यास सुरुवात केली आणि मला विश्राम बेडेकर यांचे आत्मचरित्र “एक झाड आणि दोन पक्षी” याची आठवण झाली. त्यात लेखकाने आपले जीवनचरित्र लिहितांना एक वेगळाच फॉर्म निवडला आहे. माणसाचे दोन मने असतात. एक जीवनाचा अनुभव घेते तर दुसरे त्याचे विश्लेषण व चिंतन करते. चिंतन करणाऱ्या मनाने अनुभव घेणाऱ्या मनाचे जीवन कथन केलेले आहे. अतिशय वास्तवदर्शी असे आत्मचरित्र. “आत्मचरित्र” या लेखन प्रकारात हे पुस्तक मैलाचा दगड ठरले आहे. या पुस्तकातील एक वाक्य खूप भावले, “माणसाचा आत्मगौरव त्याने गोळा केलेल्या अनेक असत्यांवर उभा केलेला असतो.” प्रत्येकाच्या मनात असे दोन कप्पे असतात हे पटायला लागते. आपण देखील त्याला अपवाद नाहीत. आपली निर्णय प्रक्रिया या दोन मनामधील द्वंद यातून होत असते.
“मी गोष्टीत मावत नाही” या पुस्तकाची मांडणी अतिशय आगळी वेगळी आहे हे पुस्तक वाचायला घेतल्यावर लगेच लक्षात येते. पुस्तक छोटेखानी असले तरी नाविन्यपूर्ण आहे. लेखकाने लि‍हिलेली पुस्तक निर्मिती पार्श्वभूमी- निर्मितीप्रक्रियाही एका नियतकालिकात वाचण्यात आली. ह्या लिखाणाचा अवकाश काळ हा २१ ते २२ वर्षांचा आहे. त्यावेळी त्यांचे (लेखकाचे) वय हे १९ ते ४१ असे आहे. हे लिहिण्याचे प्रयोजन म्हणजे त्यांचे अनुभवविश्व लक्षात घेणे हा आहे.
यातील नायक सुधर्म देवकिरण आहे. लेखकाने हे नाव व आडनाव का निवडले आहे हे पण त्यांनी निर्मिती प्रक्रियेत सांगितले आहे. मला मात्र या नावात स्वतः लेखकाचे नाव दडले आहे असे वाटते. सुधर्म म्हणजे चांगला धर्म, उत्तम धर्म थोडक्यात जे उत्तम आहे असे ते. लेखकाचे नाव आहे सुधीर. सुधीर म्हणजे उज्ज्वल, विचारशील, प्रतिक, बहादूर, समजदार, उत्तम. सुधर्म व सुधीर या दोन नावात तसा खूप फरक नाही. लेखकाचे आडनाव आहे देवरे. देवकिरण हे आडनाव त्यांनी जातीपातीच्या पलीकडे असावे असे म्हणून निवडले आहे. माझे मत असे आहे, की देवरे शब्दाची फोड केली तर देव + रे = देवरे. इंग्रजीतील रे म्हणजे मराठीत किरण. देव + किरण= देवकिरण.
थोडक्यात नायकाच्या नावात लेखकाचे नाव दडलेले आहे असे वाटते. पुस्तकाचे मुखपृष्ठ छानच आहे. मला चित्रातले जास्त कळत नाही. पुस्तकाचे नाव व त्यातील आशय एकमेकास पूरक आहेत त्यामुळे ते अतिशय चपखल बसले आहे. लेखकाने प्रस्ताविकातच स्पष्ट केले आहे, की नायक सुधर्म हा “मी” म्हणजे मी नव्हे. हा “ मी” म्हणजे मी नाहीच असेही नाही. पण “मी” हा “तू” अथवा “तुम्ही” ही असू शकता.
हे कथन व त्यातील भावविश्व म्हणजे लेखक, मी व तुम्ही सगळ्यांचे कमी अधिक प्रमाणात असू शकते. या लेखनशैलीचे वैशिष्ट्य म्हणजे तुटक तुटक असे जीवन अनुभव लेखकाने कधी मोकळेपणाने तर कधी सरगाठ बांधलेले, कधी स्पष्ट तर कधी धूसर, कधी संदर्भ असलेले तर कधी संदर्भ नसलेले, कधी नरमाईचे तर कधी बंडखोरीचे, कधी वास्तवातले तर कधी स्वप्नातले मांडलेले वाटतात. वैयक्‍तिक, कौटुंबिक, सामाजिक, व्यावसायीक, राजकीय, शास्त्रीय, देशीय, विदेशीय अशा सगळ्या विषयांवर सुधर्म व्यक्‍त होताना दिसतो. अहिराणी शब्द मोजके पण अगदी योग्य रीत्या योग्य ठीकाणी वापरले आहेत.
सुधर्मचे कथन म्हणजे फक्‍त डायरीतील नोंदी नाहीत. प्रथमदर्शनी तसे वाटते खरे. परंतु मधेच कुठेतरी त्याचे कथन मोठे वास्तवातील तत्त्वज्ञान सांगून जाते. उदाहरणार्थ, “अपेक्षा वाढल्या की नात्या नात्यात तेढ उत्पन्न होते. मग माणूस म्हणतो कोणी कुणाचं नसतं...’ हे वाक्य आपल्या सर्वांचा अनुभव सांगून जाते. आणि असं बरंच काही. सुधर्म मनचावळ करत असतो पण त्याला काही सविस्तर मांडणी करता येत नाही, असे तो मुद्दाम सांगताना दिसतो. तो लेखक वा कवी बनण्याची स्वप्ने बघत असतो. पण भोवताली लेखक, कवी यांचे टोळके, कंपू यांचा जमावडा पाहून घाबरलेला दिसतो. यशस्वी लेखक व कवी व्हायला केवळ प्रतिभा असून चालत नाही तर त्याला आधुनिक मार्केटिंगचे तंत्र सुध्दा लागते. चाळीस पानाच्या पुस्तक प्रकाशनाला चारशे लोक हे त्याला भयानक वाटत राहतं. एक पुस्तक तो साध्या पद्धतीने प्रकाशित करतो.
सुज्ञ म्हणा किंवा तडजोड स्वीकारणारा सुधर्म जीवनप्रवाहात सामावण्याचा प्रयत्न करत असतो. पण त्याच्या आतील बंडखोर सुधर्म त्याला सतत चिथावत असतो. प्रस्तापित व्यवस्थेला धक्का देण्याचे आव्हान करत असतो. सुधर्म आपल्या पुढे गेलेल्या म्हणजे आर्थिकदृष्ट्या पुढे गेलेल्या मित्रांचा हेवा करत असतो. सुधर्मचे वय असे की त्या वयात हेवा करणे, तुलना करणे साहजिक असते. सुधर्म पुढे गेलेल्यांचा विचार करतो पण किती तरी लोक योग्यता असून भोवतालच्या परीस्थितीमुळे अपेक्षित यश मिळवू शकत नाहीत. हे आपल्याप्रमाणे तो पण विसरतो. आर्थिक सुबत्ता म्हणजेच यश हे अर्धसत्य आहे, हे ही सुधर्मला समज‍त असले तरी तो आपले प्रतिनिधीत्व करतो हे लक्षात घ्यावे लागते.
असा हा सुधर्म जगातील सर्व घटनांची नोंद ठेवत असतो आणि व्यक्‍त होत असतो. बंडखोरीचे विचार मनात खेळवत असतो. प्राप्त परिस्थितीला आव्हान देत राहतो. त्याला मोर्चे काढायला आवडते पण कधी एकही मोर्चा काढला नाही की कुठल्या मोर्च्यात सामील झाला नाही. कारण पोटापाण्यासाठी त्याला व्यवस्थेने बांधून ठेवले आहे. मंदिरातले राजकारण, अर्थकारण तसेच राजकारणातले देव त्यांची ज्ञानमंदिरे, तेथील लाचार पुजारी व गणंग भक्‍त यांचा लेखाजोखा अफलातून आणि हटके अभिव्यक्त झाला आहे.
असा हा सुधर्म विवेकशील आहे, विचार करू शकतो, व्यक्‍त होवू शकतो पण आव्हान देईल असे पाठबळ त्याला मिळत नाही. म्हणून ‘एकला चलो रे’ असे मनाला समजावत तो प्रवाहपतीत.
आपण आपल्यातल्या लपलेल्या सुधर्म बरोबर याची तुलना केली तर टोपी किती घट्ट बसते? पटते की नाही तुम्हाला? लेखक उगीचच नाही म्हणत की गोष्टीतला “मी” हा “तू” किंवा “तुम्ही” पण असू शकता. ही वास्तव- चिंतन- तत्वज्ञानाची कादंबरी असून तिच्यात वाचकाला दिसणारे स्वत:चे प्रतिबिंब हेच या कथानकाचे यश आहे. हे पुस्तक वाचून संपायलाच नको असे वाटत राहते. म्हणजे ते अजून विस्तारित पाहिजे होते असेही वाटते. धन्यवाद.
(‘अक्षर वाड्‍.मय’, एप्रिल – मे – जून 2021 च्या अंकात प्रकाशित)

कादंबरी: मी गोष्टीत मावत नाही
लेखक: डॉ. सुधीर राजाराम देवरे
मुखपृष्ठ: सरदार जाधव
प्रकाशक: पद्मगंधा प्रकाशन, पुणे
प्रथम आवृत्ती: 25 फेब्रुवारी 2019
पृष्ठ संख्या: 137 , मूल्य: 170 रुपये
परीक्षण कर्त्याचे नाव व पत्ता:
डॉ. रवींद्र नेवाडकर,
ठाणे.

साहित्यिकसमीक्षा

प्रतिक्रिया

गॉडजिला's picture

21 Aug 2021 - 6:19 am | गॉडजिला

माणसाचे दोन मने असतात. एक जीवनाचा अनुभव घेते तर दुसरे त्याचे विश्लेषण व चिंतन करते.

बिलकुल करेक्ट पकडे हैं आप...

आपल्याला शरीराला हात पाय असे विवीध कामे असणारे वेगवेगळे अवयव आपण मान्य करतो पण आपल्या मनाचेही असेच भाग आहेत ज्याला त्यांचे त्यांचे काम आहे हे मात्र आपण मानत नाही. ते आपण एकसंध अखंड मानतो ही फार मोठी चुक आहे.

हे जे विश्लेषण व चिंतन करू शकणारा मेंदूचा (मनाचा) जो भाग आहे तो भावना निर्माण करणाऱ्या भागापासून वेगळा आहे. म्हणूनच जेंव्हा पंचेंद्रियामार्फत जेंव्हा जेंव्हा संवेदना मेंदूकडे झेपावतात (हे अखंड चालूच राहते मरे पर्यंत) मनाच्या या विवीध भागांचे कामं त्याच्या कुवतीनुसार (ज्ञान, संस्कार व सभोवतालच्या अनुभवानुसार) त्याच्यावर फक्त प्रतिक्रिया देणे इतकेच आहे, हया प्रतिक्रिया, संवेदना, विचार, व पुढे कृती यारुपाने प्रकट होतात. म्हणून उभे आयुष्य आपण फक्त प्रतिक्रिया देण्यात घालवतो ज्याला आपण, जगणे, कर्म करणे अथवा विचार कारणे असे मानतो... वस्तूत: वरील कोणत्याही प्रकारात माणूस त्यांची फ्री विल अर्थात तठस्तता वापरत नाही...

ती वापरता येऊ शकते, ही बाब जैवभौतिकदृष्ट्या मनुष्यास शक्य आहे आणि तेच अध्यात्माचे सारही