हा 'मी' नाही, आपण आहोत.

अनुस्वार's picture
अनुस्वार in जनातलं, मनातलं
3 Jun 2021 - 1:20 am

'त्या' विहीरीत दगड टाकून सभोवतालाकडे दुर्लक्ष करत त्याचे कान दगड आणि पाण्याचा मिलनध्वनी ऐकण्यासाठी सज्ज झाले. तळाच्या अंधारात काय झाले कुणास ठाऊक. पण आतून आवाज आला, "विहीर का बुजवताय?"
ही वाट नवी नव्हती, पण आता तो जुना 'तो' नव्हता. बदल आणि स्थिरतेच्या वजनकाट्यावर हिंदोळणारं आयुष्य त्याला नकोसं झालेलं. केवळ दोन पारड्यांत सामावतं ते आयुष्य कसलं? आणि दरवेळी वजन तोलूनच का बघायला हवं हो? जे दिसतंय त्यातच भागवून घ्यावं की. निकष बनवणारी ही माणसंच असतील ना कुणीतरी? की ते ही कुणा 'प्रेषितचा संदेश'! मला नाही फरक पडत त्याने. नशिबाचा कपाळमोक्ष करून माझी भाग्यरेषा मीच रेखाटनार.. याच मातीत. कुणा 'ब्रम्हाच्या हातून' नाही, तर माझ्याच ब्रम्हहस्ताने. हृदयाची स्पंदने हल्ली मिनिटाला ७२ तालांची कुजबुज सोडून थरथर जास्त करतात. हवा दूषित झालीच आहे पण हे वारं डोक्यात नको जायला. आणि सगळे आडोसे संपलेत हो. पैशाच्या तटबंदीवर माझा विश्वास नाही. म्हणून जरा मागे आलोय. हा प्रवास सोप्पा असतो. पुढे जायला चेंगराचेंगरी आणि मागे येताना लोक स्वत: वाट मोकळी करून देतात‌. वाटलं इथून तरी कळेल की आपण कुठे चाललो होतो. मला वाटतं तो वाळवंटाचा रस्ता आहे. लोक इतके पुढे निघून गेलेत की आता मला ते सुद्धा मृगजळाचाच एक भाग वाटतात. अशात मला ही विहीर दिसली. नाही.. उडी मारायला नाही, आसरा घ्यायला. विहीर तहान भागवते. इथे घशाला कोरड नाही पडायची. कुणीतरी मोठा 'क्रुस' टाकून ठेवलाय हिच्यात. क्षमा आणि शांती देखील इथेच असावी. क्रुसाला धरून आत उतरलो तर दगडांचा खच पडलाय इथे. प्रत्येक पत्थर बाहेर फेकावा लागेल. नव्या पाण्याचा प्रवाहच थोपावला गेलाय पार. आता मुक्काम इथेच. वर येणं झालंच तर ते नव्या पाण्यात पोहत, नाहीतर मग तळ खोदून दुसरं टोक गाठणार. पण असा दगडासारखा पडून नाही राहणार. निरूपयोगी!

मांडणीमुक्तकसाहित्यिकसमाजजीवनमानप्रकटनविचार

प्रतिक्रिया

गॉडजिला's picture

9 Jun 2021 - 2:03 pm | गॉडजिला