|| आग्र्याच्या लाल किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराज ||

मनो's picture
मनो in जनातलं, मनातलं
26 May 2019 - 11:55 pm

इ. स. १६६६. या वर्षातील महत्वाची घटना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगझेब यांची आग्रा येथे झालेली पहिली आणि शेवटचीच भेट, महाराजांची नाट्यमय सुटका आणि स्वराज्यात सुखरूप प्रयाण. या सर्व घटनाक्रमाला आता 352 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने या ऐतिहासिक भेटीविषयी हे काही नवे तपशील.

या तपशीलातून आपल्याला आज प्रथमच भेटीची जागा कशी दिसत असावी, महाराज कुठे उभे असावेत, बादशाह कुठे बसत असे याविषयी काही अंदाज बांधता येतो. तसेच आज आग्र्याच्या किल्ल्यात ती जागा कुठे आहे, ब्रिटिश काळात त्या जागेचे काय झाले हे ही आपल्याला समजते आहे.

औरंगझेब बादशहाचे प्रख्यात रजपूत सरदार मिर्झाराजे जयसिंग यांचे वकील आणि इतर कर्मचारी हे सतत मोगल बादशहाजवळ असत. दरबारात घडणारी प्रत्येक महत्वाची घटना आपले धनी मिर्झाराजे याना लिहून पाठवणे हे या मंडळींचे काम होते. त्यांनी लिहिलेले अहवाल आणि पत्रे याना वकील रिपोर्ट असे आज म्हणतात. सुदैवाने 1666 सालचे काही वकील रिपोर्ट्स आजही बिकानेर येथे जतन करून ठेवले आहेत. इतिहासकार जदुनाथ सरकार यांनी हे कागद प्रथम उजेडात आणले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा भेटीविषयी मिर्झाराजा जयसिंग यांच्या पदरी असलेल्या श्री कल्याणदासजी नावाच्या वकिलाने तपशीलवार हकीगत आपल्या धन्यासाठी (म्हणजे मिर्झाराजांसाठी) अकबाराबाद म्हणजे आग्रा इथून लिहून पाठवली आहे, त्या पत्रात आपल्याला भेटीची जागा कोणती होती याचा स्पष्ट उल्लेख सापडतो. छत्रपती शिवाजी महाराज औरंगझेबाला घुसलखाना इथल्या दरबारात भेटले असे आपल्याला यातून स्पष्ट दिसते.

(अवांतर - हे फार महत्वाचे, भेटीनंतर लगेच लिहिले गेलेले पत्र आहे. त्यातून आपल्याला भेटीत काय घडले ते कळते. हे पत्र इतिहास संशोधकांना माहित असल्याने आजच्या बातमीचा हे पत्र हा विषय नाही. यातला भेट घुसलखान्यात झाली हा उल्लेख इथे फक्त या बातमीत महत्वाचा आहे. हे मूळ पत्र मात्र बहुदा प्रथमच छापले जात असावे.

मूळ पत्रातला हा भाग भेटीचे वर्णन करतो.

मिती जेष्ठ वद्य ५
आदितवार के दिनी सेवोजी और सेवोजी को बेटो बे सिम्बुजी आग्रे आया सु. महाराज कुवरजी (म्हणजे मिर्झाराजा जयसिंग याचा मुलगा रामसिंग) व मुखलिसखानो पादशाहजी हुकम कियो यो सु पातशाही स्यो कोस एक सामहा आय सेवाजीनो ले जय मुलाजमती कराइ.

.....
(नजर दिली त्याचे तपशील)
......

मुलाजमती किया पा छो पातशाहजी पान दिया सेवोजी तसलिम करी लिया तब पातशाहजी बकाय नो फार्मयो पच हजारो कि मिसली मो खडा करो सु खडो कियो तबही शिवाजी राजी हूओ नही दिलगीर बहोत हूओ सु घुसो करी हुजुरी स्यो उठी चालो तब महाराज कुवर (रामसिंग) जी हाथ पकडो कि कहा जावो छो खडा रहो सु सेवे मानो नही आयो बेटा नो ले गुसलखाना कि ओढी नजीक जिना पाय गोधि अंगी वॊठो घुसो बहोत कियो सु. पातसाहजि सयों मालूम हुई सेवो दिलगीर धुवू तब नबाब जाफर खान दिवान व कुवर (रामसिंग) जी व असदखा नो फार्मयो दिलासा करी ले अयो सुवा आगी दिलासा करी समझायो परगी शिवाजी घुसो कियो सुना नाही तब या जाय पादशाहजी सो अर्ज पहुंचायी जु हजरती का बंदा होशीजमती मो अय हो सु हजुरी अवो नाही तब पादशाहजी कुवरजी नो फरमयो डेरो ले जाय .....
…..
)

letter

या उल्लेखातून अनेक प्रश्न उद्भवतात - घुसलखाना याचा शब्दशः अर्थ स्नानगृह. तिथे दरबार का भरवला होता?

शहाजहान बादशाहने आग्र्याच्या किल्ल्यात नवीन इमारती बांधल्या. त्यावेळी बाहेरच्या पटांगणात असणारा दिवाण-इ आम-ओ-खास म्हणजे आम आणि खास या सर्वांसाठी असणारा दिवाणखाना (हॉल), त्याच्या आतल्या चौकातील दिवाण-इ-खास असा दुसरा दिवाणखाना हे दरबारासाठी वापरले जात.

याशिवाय सर्वात आतल्या भागात, जिथे जनानखान्यात असणाऱ्या स्त्रिया सुरक्षित वावरू शकतील अश्या भागात शहाजहान बादशाहने एक फार सुंदर आणि सुबक असा ऐवान म्हणजे हॉल बांधला असा उल्लेख आपल्याला लाहोरी याच्या बाद्शाहनाम्यात सापडतो. या जागी नवीन वर्षाच्या आरंभी अथवा बादशहाच्या वाढदिवशी खास दरबार भरत असे. त्या वेळी बादशहाची तुला होत असे आणि जनानखान्यातल्या महत्वाच्या स्त्रिया अलंकार, रत्ने, वस्त्रे बादशहाच्या तुलेसाठी देत असत. शिवाजी महाराज औंरंगझेबाला भेटले त्या वेळी बादशहाच्या राज्यारोहणाचा असाच मोठा खास उत्सव चालू होता आणि त्यानिमित्त बादशहाने खास दरबार घुसलखान्यात भरावला होता. इथेच औरंगझेब शिवाजी महाराजांना भेटला.

दुर्दैवाने शिवाजी-औरंगझेब भेटीचे अथवा औरंगझेब बादशहाचे या दरबाराचे असे चित्र उपलग्ध नाही. पण काही दशके अगोदर शहाजहान बादशहाचे अगदी याच हॉल मधले तुला होतानाचे चित्र मात्र लाहोरी याच्या बाद्शाहनामा या ग्रंथात आहे. हे एकमेव असे चित्र सध्या ब्रिटिश राजघराण्याच्या खासगी संग्रहात विंड्सर कासल इथे आहे. या चित्रावरून आपल्याला घुसलखाना इथला दरबार कसा दिसत होता, औरंगझेब बादशाह कुठे बसलाअसावा, सरदार उभे राहण्याची जागा किती दूर होती, छत्रपती शिवाजी महाराज कुठे उभे असावेत याचा अंदाज आपल्याला बांधता येतो.

darbar

हा ऎवान हा एका बाजूने घुसलखाना याला लागून होता असा उल्लेख लाहोरी याने केला आहे. त्याने त्या जागेची गजामध्ये मापेही दिलेली आहेत. त्यावरुन आपल्याला आजच्या लाल किल्ल्यातील या हॉलच्या जागेचा चौथरा शोधून काढता येतो. ही जागा आज अशी दिसते.

today

ही जागा दिवाण-ए-खासच्या अगदी समोर यमुनेच्या काठी असलेल्या गच्चीवर आहे. तिला अगदी लागूनच आजचा घुसलखाना आहे. हीच जागा आणि हा हॉल एका जुन्या नकाशात हमाम म्हणजे घुसलखाना याला लागून असलेली दिसते. या नकाशात मात्र हा हॉल शाबूत असलेला दिसतो.

map

या सुंदर संगमरवरी हॉलचा पुढील इतिहासही मोठा रोचक आणि शोकजनक आहे. ऑस्ट्रियन संशोधक एब्बा कोक यांनी त्याचे पुढे काय झाले याची माहिती मोठ्या मेहेनतीने जमा केली आहे.

१८०३ साली दौलतराव शिंदे यांच्या पराभवानंतर आग्रा आणि दिल्ली इंग्रजांनी शिंदे यांच्याकडून आपल्या ताब्यात घेतली. त्यानंतर १८१५ साली गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्स याच्या हुकुमाने हा संगमरवरी हॉल तोडण्यात आला. त्यातून जे संगमरवर निघाले त्याचा लिलाव झाला. आणि त्यातले सुंदर तुकडे परदेशी इंग्लंडला नेले गेले. तिथे ते काही ठिकाणी प्रदर्शित केले गेल्यावर सध्या कोक यांच्या शोधानुसार आज या हॉलचे काही तुकडे लंडन येथील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युसियम या संग्रहालयाच्या तळघरात काही खोक्यांमध्ये ठेवलेले आहेत.

1876
या जुन्या चित्रात आपल्याला हॉल तोडल्यानंतर तिथे बांधलेली झोपडी आणि त्यानंतर तिचे उरलेला मोकळा चौथरा, जो आजही तसाच आहे तो दिसतो. (1876)

1880
नंतर उरलेली रिकामी जागा (1880)

आज आग्र्याचा किल्ला उत्तर प्रदेश सरकारच्या ताब्यात आहे. श्री. राम नाईक यांच्या रूपाने एक मराठी व्यक्ती या राज्याच्या राज्यपालपदी विराजमान आहे. त्यामुळे या जागेचे ऐतिहासिक महत्व ओळखून जर सरकार तिथे एखादा फलक आणि त्या जागेचे मूळ चित्र जर उभारू शकेल तर महाराष्ट्राच्या आणि भारताच्या मानबिंदूत छत्रपती शिवाजी महाराज ज्या जागी औरंगझेबासमोर मानाने वागले त्या एका जागेची भर पडेल !!!

संस्कृतीकलाइतिहासमाहिती

प्रतिक्रिया

कंजूस's picture

27 May 2019 - 4:49 am | कंजूस

लेख,फोटो आवडले.

औरंगजेबासमोर वाकले नाहीत असे हवे बहुधा..

असुदे. छिद्रांवेषण, दुसरे काय.

लेख नेहमीप्रमाणे छान आहे, बरीच नवीन माहिती.

नावातकायआहे's picture

27 May 2019 - 12:24 pm | नावातकायआहे

औरंगझेबासमोर मानाने वागले त्या एका जागेची भर पडेल

आज आग्र्याचा किल्ला उत्तर प्रदेश सरकारच्या ताब्यात आहे. श्री. राम नाईक यांच्या रूपाने एक मराठी व्यक्ती या राज्याच्या राज्यपालपदी विराजमान आहे. त्यामुळे या जागेचे ऐतिहासिक महत्व ओळखून जर सरकार तिथे एखादा फलक आणि त्या जागेचे मूळ चित्र जर उभारू शकेल तर महाराष्ट्राच्या आणि भारताच्या मानबिंदूत छत्रपती शिवाजी महाराज ज्या जागी औरंगझेबासमोर मानाने वागले त्या एका जागेची भर पडेल !!!

डॉ आंबेडकर यांच्या बी आर बद्दल खुलासा करणारा लेख म. टा मध्ये प्रकाशित झाला होता. त्यातील ईमेल आयडी वर एक पत्र पाठवले होते. काही उत्तर आले नाही म्हणून त्यांच्या मुलीशी संपर्क साधला होता. ते आलेल्या मेल जरूर पाहतात पण वेळ लागेल असे म्हटले गेले. त्या नंतर नाईकांना मी आधून मधून भेटत असतो म्हणणार्‍या एका व्यक्तींनी पाहतो काय झाले ते असे म्हटले होते. जे झाले ते झाले.
या निमित्ताने त्या मेलची आठवण झाली. त्यातील मजकूर काय होता याची कोणी उत्सुकता दाखवली तर ती शोधून सादर करेन.

तुषार काळभोर's picture

27 May 2019 - 6:02 am | तुषार काळभोर

तुमच्या प्रत्येक लेखातून नवीन, रोचक माहिती मिळते.

ह्या लेखाची वाटच पाहात होतो.
उत्तम माहिती.

यशोधरा's picture

27 May 2019 - 9:26 am | यशोधरा

उत्तम माहिती. धन्यवाद!

पुष्कर's picture

27 May 2019 - 10:25 am | पुष्कर

उत्तम माहिती!

रमेश आठवले's picture

27 May 2019 - 11:06 am | रमेश आठवले

ताजमहाल हा आधी शिव मंदिर होते आणि जयपूरच्या महाराजांच्या मालकीचे होते असा एक दावा आहे. शहाजहानने त्या जागेची मागणी केली आणि त्या प्रमाणे ही मिळकत महाराजानी त्याला सुपुर्द केली व त्यासम्बंधीचे कागदपत्र जयपूर च्या संग्रही आहेत असे म्हणतात. मनो ह्यावर काही प्रकाश टाकु शकतील का ?

पु ना ओक यांच्या पुस्तकात असे दावे आहेत. शहाजहानने ताज महालाची जागा मिर्झाराजा जयसिंग यांच्याकडून घेतली आणि त्याला मोबदला म्हणून दुसऱ्या जागा दिल्या. जयपूरच्या राज्यात असलेल्या संगमरवरी खाणीतून दगड मागवला, त्या संबधी काही फर्माने 'राजस्थान स्टेट अर्काइव्हज' या दप्तरात आज आहेत. या फर्मानामध्ये तिथे शिव-मंदिर असल्याचा उल्लेख नाही. जागा मिर्झाराजा जयसिंग यांची होती एवढेच नक्की सांगता येते, तिथे काय होते याचा उल्लेख या कागदात नाही.

रमेश आठवले's picture

4 Jun 2019 - 9:57 pm | रमेश आठवले

शहाजहानने ताज महालाची जागा मिर्झाराजा जयसिंग यांच्याकडून घेतली आणि त्याला मोबदला म्हणून दुसऱ्या जागा दिल्या. जयपूरच्या राज्यात असलेल्या संगमरवरी खाणीतून दगड मागवला, त्या संबधी काही फर्माने 'राजस्थान स्टेट अर्काइव्हज' या दप्तरात आज आहेत. या फर्मानामध्ये तिथे शिव-मंदिर असल्याचा उल्लेख नाही. जागा मिर्झाराजा जयसिंग यांची होती एवढेच नक्की सांगता येते, तिथे काय होते याचा उल्लेख या कागदात नाही. असे आपण लिहिले आहे.
पण याचा अर्थ त्या जागेवर कोणतीही वास्तू नव्हती असाही होत नाही.
त्या बाबत हा विडिओ
http://www.phenomenalplace.com/2018/03/hidden-underground-zone-of-taj-ma...
असे दाखवतो कि कि यमुना तीरावर असलेलया ताजमहालच्या बाजूला एक प्रवेश द्वार होते. या प्रवेशद्वाराच्या लाकडाचा तुकडा घेऊन त्याचे वय ठरवण्यात आले आहे आणि ते ताजमहालच्या बांधकामाच्या उल्लेखा पेक्षा ३०० वर्षे जास्त निघाले. शहाजाहान ने ताजमहाल हा आधी असलेल्या वास्तूवर किंवा तीच्या चोथर्यावर बांधला असल्याचा पुरावा असा मिळतो.
. Carbon-14 dating places the Taj Mahal three centuries earlier in history
In 1972, Marvin Mills, a professor of history of architecture with degrees from Columbia University, took a sample from a river-level wooden doorway of the Taj Mahal for Carbon-14 dating. This sample was tested by Dr. Evan Williams, director of the Brooklyn College Radiocarbon Laboratory. The date of the sample was determined to be 1359 with a spread of plus or minus 89 years and a probability of 67%. Thus, the wood in the doorway was milled nearly 300 years before Mumtaz’s death. (Subsequent to this report, the door in question was removed to prevent future testing.) Note 14
Numerous historians and archeologists have called for a systematic Carbon-14 survey of the Taj Mahal, but they have been refused access by the Muslim waqf that controls the historical site.
Ref. http://www.faithfreedom.org/the-twisted-tale-of-the-taj-mahal/ at point 7.

मनो's picture

4 Jun 2019 - 11:53 pm | मनो

आठवले सर, एका लाकडी तुकड्यावरून तिथे मंदिर होते असा दावा नाही करता येत. इतरही कारणे असू शकतील ना, जसे ते लाकूड इतर कुठून उचलून त्या दारात लावले असेल.

त्या काळात मंदिर पाडून त्यावर मशीद बांधणे ही काही लपवण्याची गोष्ट नव्हती, तसे कित्येक उल्लेख मिळतात. ताजमहालबद्दल तसा उल्लेख आजपर्यंत मिळालेला नाहीये. त्यामुळे तिथे नक्की मंदिर होते किंवा नव्हते असा सिद्ध करण्यासाठी आपल्याकडे ठाम पुरावे नाहीत.

रमेश आठवले's picture

5 Jun 2019 - 3:45 am | रमेश आठवले

मी या पुराव्या वरून तेथे मंदिर होते असा दावा केलेला नाही. तेथे आधीची वास्तु होती असे सिद्ध होते असे म्हटले आहे. ती वास्तु काय होती हे इतिहासाचे अभ्यासक ठरवु शकतात. सरकारने परवानगी दिली तर आणखी लाकडाचे नमुने मिळु शकतात. ताजमहाल हा जमिनीत खोल जाणाऱ्या लाकडी खांबावर आधारित आहे असे मानतात. हैदराबाद स्थित national geophysical research institute या संस्थेने या पाया बाबत संशोधन केले आहे.

योगविवेक's picture

12 Jun 2019 - 6:06 pm | योगविवेक

सत्य काय असत्य काय याची शहानिशा करावी. या विचारांना कोणी ही मान्यता देईल.
सध्या आगऱ्याच्या कोर्टात एक नवी केस तेथील वकिलांनी केली आहे. ( आधीच्या केसेसचा सुप्रीम कोर्टाने पु ना ओकांच्या कथनाला उडवून लावले होते.)
नवी केस ताजमहालातील तळघरातील बंद खोल्यांच्या आतील भागात काय आहे? याचा शोध घेतला जावा अशा आशयाची आहे.
ताश्कंद फाईल्स मधून कै नमस्कार लाल बहादूर शास्त्री यांच्या रहस्यमय निधनाच्या शोध घेतला जावा असे सरकारकडे साकडे घातले आहे आणि तसेच ताजमहालाच्या बाबतीत व्हावे अशी अपेक्षा करू या.

नरेश माने's picture

27 May 2019 - 11:08 am | नरेश माने

छान माहितीपुर्ण लेख. छायाचित्रांमुळे समजण्यास अजून मदत होते.

समीरसूर's picture

27 May 2019 - 11:15 am | समीरसूर

माफ करा पण थोडे वेगळे मत मांडतोय. माझं असं मत आहे की अशा पद्धतीचं संशोधन बंद करता येईल का या दृष्टीने थोडी चाचपणी करायला पाहिजे. आपण खूप जास्त इतिहासात रमतोय असं मला वाटतं. या माहितीचा तसा उपयोग शून्य आहे. ढोबळ मानाने काय झालं होतं वगैरे आपल्याला माहिती आहे आणि तेवढं पुरेसं आहे. आपल्याकडे इतिहासाचा शस्त्र म्हणून वापर होतो. अतिरंजित इतिहासाचा टोकदार अस्मितेची प्रतिके म्हणून राजकीय वापर होतो. कित्येक काल्पनिक कथांचा जाती-धर्मामध्ये द्वेष पसरवण्यासाठी सर्रास उपयोग केला जातो. हे सगळं आपण उघड्या डोळ्यांनी पाहतोच आहोत. इतिहासाच्या संशोधनामुळे आपण आत्ताच्या घडीला जे आवश्यक आहे ते संशोधन करत नाही आहोत. तिथे चीन आपल्या कित्येक लाख किलोमीटर पुढे निघून गेलंय.

चुकत असल्यास माफ करा...आपल्या व्यासंगाचा आदर आहेच.

इतिहास संशोधन आणि इतिहासात रममाण होणे या वेगळ्या गोष्टी आहेत. त्यांची गल्लत करु नका. इतिहासाच्या संधोधनामुळे किमान इतिहास आपल्याला हवा तसा वाकवणे बंद होते, हे काय कमी आहे का?

समीरसूर's picture

27 May 2019 - 1:19 pm | समीरसूर

पण कित्येक वेळा सोयीस्कर संशोधन होते आणि मग गदारोळ होतो. कुठले संशोधन अस्सल हे ठरवणे तसेही अवघड आहे. मग एकमेकांवर कुरघोड्यांचे राजकारण सुरू होते. त्यापेक्षा नकोच ते संशोधन. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची गोष्ट काल्पनिक आहे असे कुठल्यातरी लेखात वाचल्याचे स्मरते. अशा कपोलकल्पित कथांचे पेव फुटते; त्यापेक्षा हे कुठेतरी थांबले पाहिजे असे वाटते. अर्थात, इतिहाससंशोधकांच्या मेहनतीचे, व्यासंगाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे हे मान्यच आहे.

तुमचा मुद्दा रास्त आहे, पण गल्ली चुकलाय.. या न्यायाने उत्खनन, इतिहाससंशोधन, वाङ्मय याचा अभ्यासच करायला नको.
पण तसे नाही, तसे झाले तर आपण आणि शांतताप्रिय लोक यांच्यामध्ये फरक तो काय?

उपेक्षित's picture

27 May 2019 - 12:28 pm | उपेक्षित

इतक्या माहितीपूर्ण आणि मेहनत घेऊन केलेल्या लिखाणाला इतिहासात रमणे असे म्हणणे म्हणजे निव्वळ करंटेपणा आहे.
तुम्हाला नसेल आवड तर नका वाचू न पण जिथ तिथ उग पिंका नका टाकू साहेब.

समीरसूर's picture

27 May 2019 - 1:21 pm | समीरसूर

सल्ले दिलेच पाहिजेत का? ते ही उर्मट भाषेत? कुणी मागीतलाय का तुमचा सल्ला? तुमच्या निरर्थक सल्ल्यांच्या पिंका आधी बंद करा बघू. मग बाकीचं बघू आपण. ओके?

उपेक्षित's picture

27 May 2019 - 1:26 pm | उपेक्षित

चीलमाडी समीर काका, नका मनाला लावून घेऊ :)

समीरसूर's picture

27 May 2019 - 1:54 pm | समीरसूर

मनाला नाही लावून घेतले हो उपेक्षित आजोबा! तुम्हीच मनाला लावून घेतले सगळे...एखाद्या हट्टी आजोबांसारखे! मी तर चांगल्या चर्चेची अपेक्षा ठेवून होतो; वैयक्तिक टीकेची नाही! असो. होतं कधी कधी.

इतिहासातल्या वांग्याची आणि कांदे-बटाट्याची आज भाजी नाही होऊ शकत, मान्य आहे. तरीपण काही राजकारण्यांनी आपले दुकान इतिहासातल्या वांग्यांवर चालू ठेवले आहे. पण हा दोष इतिहासाचा कसा?

माझ्या लेखनाचा हेतु स्वतःचे कुतुहुल भागवणे आणि त्यातून समजलेल्या गोष्टी इतरांना सांगणे यापुरता आहे. गेले ते दिवस आणि तो काळ आजच्यापेक्षा चांगला असा माझा कधीच दावा नाही. माझा लेख वाचून कुणाला जर चित्रे वाचता आली, एखादी नवीन भाषा अथवा लिपी शिकता आली, याची प्रेरणा मिळाली तर मला आनंद होईल.

मनो's picture

27 May 2019 - 8:51 pm | मनो

आणि चीनबद्दल -

त्यांचे तिबेट, तैवान आणि अरुणाचल प्रदेशवरचे दावे इतिहासावरच अवलंबून आहेत. जपान बरोबर आत्यंतिक तिरस्कार असण्याचे कारण दुसऱ्या महायुद्धाच्या इतिहास आणि आजही अमेरिकेविरुद्धच्या ट्रेड-वॉरमध्ये पाश्चात्य देशांना संशयाने बघितले जाते कारण 'अफूचे युद्ध अथवा ओपियम वॉर'.

भंकस बाबा's picture

27 May 2019 - 10:56 pm | भंकस बाबा

समीरसुर सारख्या लोकांच्या अपेक्षेकड़े दुर्लक्ष करा. तुम्ही चांगली माहिती देत आहात.
वर कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेच्या हकीकतबद्दल लिहिले आहे की ती काल्पनिक आहे म्हणून! असू दे , त्यावेळी इतिहासकार मोंगली जरी असले तरी त्यानी शिवाजी महाराजांबद्दल कुठेही स्त्रियांविषयी अनादर असलेला शासक म्हणून केलेला नाही, पण अल्पसंख्यक तुष्टिकरण करण्याच्या नादात आपले नेहरू मात्र वावगे बोल लिहून जातात. वर आम्ही सेक्युलर असे बोम्ब ठोकायला कमी करत नाही.
अशा प्रकारचे लेखन आजच्या टोपिबदलु सेक्युलराना दाखवायला बरे पडते.

"समीरसुर सारख्या लोकांच्या अपेक्षेकड़े" - जरा स्पष्टीकरण दिल्यास बरे होईल. माझी ओळख मला नव्याने पटण्यास मदत होईल.

तुमचा हा प्रतिसाद माझं नाव न घेता देता आला असता का? पहिल्या वाक्याने तुमच्या प्रतिसादाच्या क्वालिटीमध्ये काही फरक पडला का? जरा तपासून पाहिल्यास बरे होईल...

भंकस बाबा's picture

28 May 2019 - 1:02 pm | भंकस बाबा

तुमचे नाव घेण्याचा उद्देश्य स्पष्ट होता. फक्त तुम्ही व तुम्हीच हा सुर लावला होता कि इतिहास का उगाळला जातोय.
तुमच्या माहितिसाठी सांगतो मी माझ्या शालेय जीवनात आमच्या शालेय पुस्तकात 1857चे बंड हा शब्द वाचत आलो(1984 ते1989) . शिवाय ह्या युद्धाला गाइची व डुकराची चरबी लावून धार्मिक उन्माद असे दाखवायचा प्रयत्न पण केला गेला होता. सावरकरानी फार वर्षापूर्वी लिहिलेले पुस्तक '1857 एक स्वातंत्र्यसमर' हे पुस्तक प्रकाशित झालेले होते. मग आमचे मायबाप सरकार असा अपप्रचार का चालू देत होते?
पुस्तक वाचा, पुष्कळ गैरसमज दूर होतील

समीरसूर's picture

28 May 2019 - 2:35 pm | समीरसूर

माझं म्हणणं आहे की कुठला इतिहास खरा आणि कुठला खोटा हे शाबित करणं अतिशय कठीण आहे. दोन्ही बाजू हिरीरीने एकमेकांच्या दाव्यांचं खंडन करतात. प्रत्येक गट आपण शोधून काढलेला (पुस्तकांमधून, लेखांमधून, हस्तलिखितांमधून वगैरे) इतिहासच खरा आहे असं छातीठोकपणे सांगत असतो. नेमके काय घडले होते हे सिद्ध करणे अशक्य आहे. यातूनच द्वेष, हेवेदावे, तिरस्कार वाढीला लागतात. राजकारणी याचा फायदा उचलतात आणि या सगळ्या इतिहास संशोधनाचं फायनल प्रॉडक्ट सामाजिक दुही हेच होतं. हे आजवर होत आलेलं आहे. त्याची झळ सगळ्यांनी सोसलेली आहे. त्यापेक्षा इतिहासाला इतिहासातच राहू दिलेलं अधिक श्रेयस्कर नाही का? आता त्याकाळी काय झालं होतं हे अप्रस्तुत आहे. त्याकाळातला पराक्रम इतिहासजमा झाला. त्याचा आजच्या वर्तमानात काहीही संबंध नाहीये. नंतर मुघल, इंग्रज यांनी तीनशे वर्षे आपल्यावर राज्य केलं यातच आपल्याला इतिहासाचं कितपत महत्व आहे आणि आपण त्याचा कसा उपयोग करून घेतो हे दिसून येतं. अगदी नेहमी इतिहासाचा धर्मिक आणि जातीय अस्मिता टोकदार करून तेढ वाढवण्यासाठी म्हणून दुरुपयोग केला जातो. तुमच्या प्रतिसादातूनदेखील हेच दिसून येतं. शेकडो वर्षांनंतर ही कुरघोडीची भावना असण्याचं काहीच कारण नाही. भारतीयांना इतिहास शिकता येतो पण इतिहासातून मात्र काही शिकता येत नाही हे नेहमीच सिद्ध झालंय. जितक्या लवकर आपण आपला इतिहास मागे टाकू तितक्या लवकर आपण प्रगतीच्या दिशेने कूच करणार आहोत हे नक्की!

आजकाल शिवज्योत नामक एक फॅड आलेलं आहे. मागे एका तरुणाला यात जीवदेखील गमवावा लागला होता. तरुण मुले कितीतरी दिवस ही ज्योत घेऊन कुठे कुठे फिरत असतात. इतिहासातल्या पराक्रमांच्या घटनांचं उदात्तीकरण आणि त्याला आजच्या जातीय आणि राजकीय वर्चस्वाच्या भावनांची दिलेली फोडणी यातून हा प्रकार उदयाला आलेला आहे. खरंच असल्या उपक्रमांची गरज आहे का? त्यातून आपल्या समाजाचा काय फायदा होतो? टोकदार अस्मितांमुळे सामाजिक सलोखा बिघडतो हे नक्की. "आमचं कुणीच काही वाकडं करू शकत नाही" हा माज वाढीला लागतो हे निराळंच. म्हणून माझं मत आहे की इतिहास संशोधन ही खूप जोखमीची बाब आहे. एका दुसर्‍या धाग्यावर नुसत्या चित्रांवरून किती रणकंदन माजले होते हे तुम्ही पाहिले असेलच. हा घ्या दुवा: https://www.misalpav.com/node/8075. आणि ज्या धाग्यावर ही माहिती आली त्याचा हा दुवा: http://misalpav.com/node/44591

आपल्या भावना खूप नाजूक असतात. चारशे वर्षांपूर्वीचा पराक्रम आपण अजूनही छातीवर घेऊन मिरवत असतो. हे जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत आपल्याला इतिहासाचा खरा अर्थ कळणार नाही.

माझं नाव न घेतादेखील तुम्ही तुमचं म्हणणं व्यवस्थित मांडू शकला असता. दुसर्‍याला कमी लेखायचं आणि त्याच्याशी उद्धटपणेच बोलायचं हा सध्या इथला शिरस्ताच झालेला आहे. असो.

भंकस बाबा's picture

28 May 2019 - 5:45 pm | भंकस बाबा

आपले नाव घेतल्याचे आपल्याला फारच दुःख झालेले दिसते. असे म्हणतात की इतिहास पाहुन आपण आपल्या चुका दुरुस्त करत असतो. आता तुमच्या म्हणन्याप्रमाणे वागायचे म्हटले तर सपूर्ण भारतवर्षात ओरंगजेब, अकबर, बाबर हे फार मोठे संत होऊन गेले. ज्याना येथील बहुसंख्यक लोकांनी खलनायक ठरवले असाच इतिहास लिहावा लागेल. तरी बरे ओरंगजेबाचा इतिहास लिहिताना संभाजी महाराजाचा उल्लेख पूसटसा तरी शालेय पुस्तकात येतो, शिखांचे गुरु गोविंदसिंगना तर आमच्या इतिहासाच्या पुस्तकात अनुल्लेखाने मारले होते. या न्यायाने मग गुरु गोविंदसिंग कविकल्पना मानायचे का?
इतिहासातून जातीय तेढ़ पसरते ही फ़ेकुलरवादयाची आवडती संकल्पना होती, आहे. कारण त्या आड़ शान्तिप्रिय धर्माची कृष्णकृत्य लपवायला मदत होत होती. पण आज जर काश्मीर, केरल व पश्चिम बंगाल येथील हिंदुची स्थिति बघितली तर तिथे खरा इतिहास फार लवकर शिकवला गेला पाहिजे होता हे पटते.

समीरसूर's picture

29 May 2019 - 9:24 am | समीरसूर

नुसते नाव घेतल्याने नव्हे; ते ज्या पद्धतीने घेतले त्यामुळे दु:ख झाले. अर्थात, ते इथल्या परंपरेला अनुसरूनच आहे. चटकन वैयक्तिक पातळीवर घसरून उपहासात्मकपणे, उद्धटपणे दुसर्‍याची लायकी काढणे हे इथे नॉर्मल झालेले आहे. असो. बाकी सगळं चालू द्या.

भंकस बाबा's picture

29 May 2019 - 5:28 pm | भंकस बाबा

उद्धटपणा कोणत्या शब्दात दिसला हे दाखवून द्याल क़ाय?
मी माझी गोष्ट करत आहे, इतरांचे माहित नाही.

भंकस बाबा's picture

29 May 2019 - 5:37 pm | भंकस बाबा

टिपू सुलतानचा गोडवा गाताना इतिहास असा शिकवला जातो की टिपू इंग्रजांशी लढताना धारातीर्थी पडला. पण या गोष्टी लपवल्या जातात की इंग्रज, मराठे आणि निजाम यांची युती झाली होती टीपुला मारण्यासाठी! जर युती झाली होती हे सांगितले तर का झाली होती हे सांगणे आले, मग पुरावे, मग चीरफाड़, मग टिपूची बदमाशी जगासमोर येणार! हे सगळे टाळण्यासाठी इतिहासाचीच गळचेपी करायची, मग टिपू हुतात्मा बनायला मोकळा!

समीरसूर's picture

30 May 2019 - 11:26 am | समीरसूर

जाऊ द्या हो...इतके दिवस वाद सुरु ठेवण्यात काही मजा नाही. या इकडे...थंडगार कोकम पिऊ...

भंकस बाबा's picture

30 May 2019 - 6:12 pm | भंकस बाबा

पण टोस्ट करताना ग्लास जरा हलकाच स्पर्श करा हो!

हलकेच घ्या

समीरसूर's picture

28 May 2019 - 11:52 am | समीरसूर

आपला हेतू स्वच्छ आहे हे अगदी मान्य आहे. भारतात कुठला तपशील कसा, कुठे, आणि किती मोडून-तोडून वापरला जाईल याचा भरवसा नाही म्हणून कधी कधी भीती वाटते इतकेच. आपल्या व्यासंगाचा आदर आहेच.

समीरसूर's picture

28 May 2019 - 11:53 am | समीरसूर

माझा वरील प्रतिसाद मनो यांना आहे.

एकाच मुद्द्यावर थोडं जास्त स्पष्टीकरण देतो - वर म्हणलं आहे की खरं-खोट्यात फरक करणे अवघड आहे. त्याबद्दल बोलतो.

माझ्या पाहण्यात असं आलं आहे की ज्यांना खोटा इतिहास तयार करायचा असतो अथवा खऱ्या गोष्टी मोडून-तोडून वापरायच्या असतात, ते ९९% वेळा पुरावे आणि संशोधन याच्या भानगडीत पडतच नाहीत. त्यामुळे तुम्ही त्यांना याला आधार काय असे विचारले तर बहुतेक खोटा इतिहास लगेच ओळखता येतो. फेसबुक अथवा व्हाट्स-अँप यावर फिरणाऱ्या मजकुराची हीच गत असते.

काही वेळा असं झालं आहे की, खोटे कागद तयार केले गेले आहेत. पण ते ओळखण्याच्या पद्धती संशोधकांना माहित असतात. बाकी गणित अथवा इतर संशोधनात जसे पिअर- रिव्यू होतात आणि इतर लोकांची मान्यता मिळवावी लागते तसेच इतिहास संशोधनात आहे.

खोटे कागद तयार करण्याची परंपरा दुर्दैवाने खरे कागद जितके जुने तितकीच जुनी आहे - आजही वतनासाठी केलेले असे अनेक कागद मिळतात.

जयंत कुलकर्णी यांची 'नाल !' कथा आठवली :)
https://www.misalpav.com/node/40927

योगविवेक's picture

12 Jun 2019 - 11:41 am | योगविवेक

ऐतिहासिक पुराव्यांना असली व नकली या तराजूत टाकून त्याची शहानिशा करण्यासाठी एक समिती नेमली जावी.
फेसबुक, व्हॉट्स अॅप वगैरे वर विशेष करून हिंदी भाषा भाषेतील उपलब्ध लेखनातून जे काही वाचायला मिळते ते वाचून इतिहासाला आपापल्या परीने कलाटणी देणारी वक्तव्ये वाचून डोके भणभणायला लागते.

शशिकांत ओक's picture

20 Jun 2020 - 11:34 am | शशिकांत ओक

विविध अभ्यासकांनी काय म्हटले आहे ते समजून घेतले पाहिजे.

जालिम लोशन's picture

28 May 2019 - 1:00 pm | जालिम लोशन

जे ईतिहास विसरतात त्यांना भविष्यकाळ नसतो. तेंव्हा समीरसर तुमचा रोख जरा बेसुर वाटतो आहे.

इतिहास विसरायचा नाही; पण उगाळतदेखील बसायचा नाही असं माझं म्हणणं आहे. आपण उगाळत बसतो. चारशे वर्षांपूर्वीचा पराक्रम घेऊन नाचत बसतो. तो तद्दन मूर्खपणा आहे.

राघव's picture

27 May 2019 - 1:10 pm | राघव

घुसलखाना म्हणजे स्नानगृह हे मला माहित नव्हते. मला वाटायचे गुप्त मसलत करण्यासाठीची जागा..! धन्स. :-)

खूप मेहनत घेऊन माहिती संकलीत केलेली आहे हे स्पष्टच आहे. खूप खूप शुभेच्छा!

राघव

यशोधरा's picture

27 May 2019 - 1:29 pm | यशोधरा

मनो, तुम्ही मिसळपाववर एक मालिका लिहावी, खरे तर. तुमच्या संशोधनाविषयी, त्यात येणाऱ्या अडचणी, लाल फितीचा कारभार आणि त्या योगे होणारे नुकसान, अशा संशोधनाविषयी गम्य आणि अनास्था बाळगणारे नोकरशहा आणि एकंदरच उदासीन समाजमन ह्या विषयी जरूर लिहावे आणि त्याच बरोबर ह्या लेखात दिल्याप्रमाणे माहिती, रोचक प्रसंग, त्यामागील माहिती झालेली सत्ये.. असे सारे वाचायला फार मजा येईल.

हे फार अद्भुत जग आहे सारे, त्यात डोकावून बघायची संधी तुमच्यामुळे आम्हांला मिळेल. प्लीज, घ्या मनावर.

* संशोधनाविषयी गम्य नसलेले, असे वाचावे.

मुळात संशोधनासाठी वेळ पुरत नाही, कारण दिवसभर IT मध्ये नौकरी आणि बाकी व्याप सांभाळताना फार कसरत होते. थोडा निवांतपणा मिळाला की नक्की विचार करीन.

उपेक्षित's picture

30 May 2019 - 11:59 am | उपेक्षित

मनो भाऊ, काही मदत लागली तर नक्की सांगा, आम्हाला करण्यासारखे काम असेल तर जरूर आवडेल करायला कारण तुम्ही इतके मनापासून काम करत आहात तेवढाच आमचा खारीचा वाटा.

तुम्ही जे संशोधन करता त्याचे दस्तावेजीकरण ( बरोबर आहे का शब्द? Documentation म्हणायचे आहे) करत असालच ना? त्याबद्दल सुद्धा लिहा प्लीज.

त्या documentation मधून बहुतेक काही लिहिता येईल - जसं वेळ मिळेल तसं अर्थात.

अभ्या..'s picture

27 May 2019 - 1:36 pm | अभ्या..

अप्रतिम लेख आणि सुंदर चित्रांची जोड आहे मनोसर तुमच्या ह्या लेखात. खूप आवडले.
आग्र्याच्या किल्ल्यातून दिसणार्‍या ताजचे छायाचित्र आणि वुडकट प्रिंट दोन्हिही प्रचंड आवडले आहे. चित्रातले परस्पेक्टिव्ह दाद देण्याजोगे आहे.

पद्मावति's picture

27 May 2019 - 6:10 pm | पद्मावति

सुंदर लेख. रोचक आणि माहितीपूर्ण.

सुंदर आणि रोचक माहिती दिली आहेत ..

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 May 2019 - 1:23 pm | डॉ सुहास म्हात्रे

नेहमीप्रमाणेच सुंदर, सचित्र असल्याने समजायला सोपा आणि रोचक माहिती देणारा लेख. अजून येऊद्या.

१)बसलेले लोक तेव्हा मांडी घालत नव्हते, पालथी बैठक घालत. पायाचा अंगठा वर नाही, खाली आहे.
२) सरदारांचे चेहरे, दाढ्या,नाकं वेगवेगलळी आहेत. कपाळ ,भुवयाही वेगळ्या आहेत.
३)तरुण आणि वयस्कर (५०)ही आहेत.
हीसुद्धा ऐतिहासिक नोंदच झाली.

१)बसलेले लोक तेव्हा मांडी घालत नव्हते, पालथी बैठक घालत. पायाचा अंगठा वर नाही, खाली आहे.
२) सरदारांचे चेहरे, दाढ्या,नाकं वेगवेगलळी आहेत. कपाळ ,भुवयाही वेगळ्या आहेत.
३)तरुण आणि वयस्कर (५०)ही आहेत.
हीसुद्धा ऐतिहासिक नोंदच झाली.

त्या चित्रातल्या जवळजवळ प्रत्येकाची नावे संशोधकांनी निश्चित केली आहेत. त्यात दारा, औरंगझेब, शहजहांचा सासरा असफखान, जाफरखान आणि शाहिस्तेखानही आहेत. ते पुस्तक सापडले तर नावे पण टाकतो.

अजून काही विशेष म्हणजे बादशाह सोडून सगळे उभे आहेत. पायात कोणीही जोडे घालायचे नाहीत. उभे राहण्यासाठी आधार म्हणून लाकडी / लोखंडी / सोन्याची काठी वापरायची. माणूस जितका वरच्या हुद्द्यावर तितका बादशहाच्या जवळ दाखवतात. अगदी शेजारी चार शहजादे, फक्त त्यांनीच मोत्यांच्या माला घातल्या आहेत. त्यांच्या मागे असफखान आणि मग त्यामागे जांभळ्या जाम्यात जाफरखान, त्याचे काळे जॅकेट सुंदर आणि उल्लेखनीय. बाहेर उभे असणार्यात, हिरवे पागोटे आणि दाढी, कॅमेरात ढाल तो शाहिस्तेखान.

योगविवेक's picture

12 Jun 2019 - 11:32 am | योगविवेक

मुघलांच्या दरबारातील चित्रातून त्या काळातील अनेक बारीकसारीक गोष्टींची कल्पना येते.
मनोज यांनी आपल्याकरता वेळ काढून कष्ट पुर्वक मिळवलेले विचार आणि चित्र धन महत्त्वाचे आहे...
विषयांतर करून आपापल्यातील वैयक्तिक विचारधारेचा पसारा न लांबलेला बरा.

सुरेख लेख! उत्तम माहिती आणि चित्रे, पत्र सर्वच खूप माहितीपूर्ण आहे.

गामा पैलवान's picture

14 Jun 2019 - 12:39 pm | गामा पैलवान

समीरसूर,

तुमचा इथला संदेश वाचला. माझं मत सांगेन म्हणतो.

१.

अशा पद्धतीचं संशोधन बंद करता येईल का या दृष्टीने थोडी चाचपणी करायला पाहिजे. आपण खूप जास्त इतिहासात रमतोय असं मला वाटतं.

यावर अनेकांनी सांगितलंय तेच सांगतो. इतिहासाचं संशोधन करायचं ते त्यातनं शिकण्यासाठी, रमण्यासाठी नव्हे.

२.

या माहितीचा तसा उपयोग शून्य आहे.

आजिबात नाही. उलट शिवाजीमहाराजांच्या सैनिकी व नागरी हालचालींचा अभ्यास करायला हवा. दुसऱ्या महायुद्धातला प्रसिद्ध जनरल माँटगोमेरीने थोरल्या बाजीरावांच्या पालखेडच्या लढाईचा केला होता तसाच.

३.

ढोबळ मानाने काय झालं होतं वगैरे आपल्याला माहिती आहे आणि तेवढं पुरेसं आहे.

माहिती पुरेशी कधीच नसते. एखादा नवं तथ्य नवा पैलू उघड करून जाऊ शकतं. कुणास ठाऊक काय नवीन शिकायला मिळेल त्यातनं.

४.

आपल्याकडे इतिहासाचा शस्त्र म्हणून वापर होतो.

तसा तो व्हायलाच हवा. नाहीतर परचक्र नशिबी येईल.

५.

अतिरंजित इतिहासाचा टोकदार अस्मितेची प्रतिके म्हणून राजकीय वापर होतो.

प्रस्तुत इतिहास अतिरंजित आजिबात नाही. उलट तो व्यवहारी ( = down to earth ) आहे.

६.

कित्येक काल्पनिक कथांचा जाती-धर्मामध्ये द्वेष पसरवण्यासाठी सर्रास उपयोग केला जातो.

काल्पनिक कथांचा इतिहासाशी संबंध नाही. तसंच काल्पनिक कथांचा दुरुपयोग होतो म्हणून खरा इतिहास शोधायचा नाही, हे योग्य नव्हे.

७.

तिथे चीन आपल्या कित्येक लाख किलोमीटर पुढे निघून गेलंय.

चीनमध्ये लोकशाही नसून हुकुमशाही आहे.

८.

इतिहासाच्या संशोधनामुळे आपण आत्ताच्या घडीला जे आवश्यक आहे ते संशोधन करत नाही आहोत.

आवश्यक संशोधन कोणते व ते इतिहासाच्या संशोधनामुळे कसे अडून राहिले आहे हे कृपया स्पष्ट करावे.

आ.न.,
-गा.पै.

जॉनविक्क's picture

14 Jun 2019 - 3:50 pm | जॉनविक्क

परवा एक आसामी भेटली त्यांनी एका मराठी शासकाच्या इतिहासाबाबत काही दाखले(सत्य गोष्टी त्यांच्या नजरेत) सांगितले. बराच वेळ पकवून ते निघून गेले आणि मी अजूनही विचार करतोय या व्यक्तीने त्याची उर्जा आत्ता भेडसावणाऱ्या प्रश्नावर उपाय शोधण्यात / लढा देण्यात केंद्रित करण्याऐवजी निव्वळ दोन विशिष्ट लोकसमुदायात नक्कीच तेढ वाढेल आशा गोष्टी पसरवण्यात का घालवली ?

ज्ञान ही दुधारी तलवार आहे जर तिचा विनियोग साकल्याने समाजहितासाठी होत नसेल तर..!

आणि ज्ञानाचा उपयोग विधायक कार्यास होत असेल तर कोणताच अभ्यास वा संशोधन वर्ज्य ठरत नाही. म्हणून आपण आपले विशिष्ठ ज्ञानार्जन का करत आहोत याचे प्रामाणिक आत्मपरीक्षण नक्कीच करावे व ठाम असावे.

माहितगार's picture

14 Jun 2019 - 5:18 pm | माहितगार

आपणच नव्हे समिर सूर सुद्धा मनमोकळ होऊन जाणे चांगली बाब आहे पण हे बोधामृत ज्यांना दिले जावयास हवे त्यांना सोडून एका समतोल अभ्यासकाच्या धाग्यावर उगाळण्याचे सुद्धा काही विशेष फायदे आहेत काय ?

जॉनविक्क's picture

14 Jun 2019 - 8:46 pm | जॉनविक्क

आणि या व्यासपीठावर फक्त लेखकच न्हवे तर वाचक व प्रतिसादकही इतरांशी आणि स्वतःशी विषयानुषगाने संवाद साधतच असतात, म्हणूनच प्रतिसाद हा विशिष्ट व्यक्ती, लेखक यांना न देता विचार आणि विषयराधन करणाऱ्या सर्वांसाठी लिहला.

या मुद्द्याला उत्तर म्हणून हा एक व्हिडिओ पुरेसा आहे. मूळ इंग्रजीत ते जे जसं सहज सुंदर आहे तसं मराठी भाषांतरात येणार नाही म्हणून इंग्रजीतच थोडा बदल करून देतो

What will your verse be?
https://youtu.be/-7OE6bDfM2M

Medical , Business, Law, Engineering are noble pursuits necessary to sustain life, but history, poetry, beauty , love that's what we live for.

खटपट्या's picture

16 Sep 2020 - 10:07 pm | खटपट्या

खुप रोचक माहीती, मनोजी, असे लेख अजुन येउदेत.