✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

|| आग्र्याच्या लाल किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराज ||

म
मनो यांनी
Sun, 05/26/2019 - 23:55  ·  लेख
लेख
इ. स. १६६६. या वर्षातील महत्वाची घटना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगझेब यांची आग्रा येथे झालेली पहिली आणि शेवटचीच भेट, महाराजांची नाट्यमय सुटका आणि स्वराज्यात सुखरूप प्रयाण. या सर्व घटनाक्रमाला आता 352 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने या ऐतिहासिक भेटीविषयी हे काही नवे तपशील. या तपशीलातून आपल्याला आज प्रथमच भेटीची जागा कशी दिसत असावी, महाराज कुठे उभे असावेत, बादशाह कुठे बसत असे याविषयी काही अंदाज बांधता येतो. तसेच आज आग्र्याच्या किल्ल्यात ती जागा कुठे आहे, ब्रिटिश काळात त्या जागेचे काय झाले हे ही आपल्याला समजते आहे. औरंगझेब बादशहाचे प्रख्यात रजपूत सरदार मिर्झाराजे जयसिंग यांचे वकील आणि इतर कर्मचारी हे सतत मोगल बादशहाजवळ असत. दरबारात घडणारी प्रत्येक महत्वाची घटना आपले धनी मिर्झाराजे याना लिहून पाठवणे हे या मंडळींचे काम होते. त्यांनी लिहिलेले अहवाल आणि पत्रे याना वकील रिपोर्ट असे आज म्हणतात. सुदैवाने 1666 सालचे काही वकील रिपोर्ट्स आजही बिकानेर येथे जतन करून ठेवले आहेत. इतिहासकार जदुनाथ सरकार यांनी हे कागद प्रथम उजेडात आणले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा भेटीविषयी मिर्झाराजा जयसिंग यांच्या पदरी असलेल्या श्री कल्याणदासजी नावाच्या वकिलाने तपशीलवार हकीगत आपल्या धन्यासाठी (म्हणजे मिर्झाराजांसाठी) अकबाराबाद म्हणजे आग्रा इथून लिहून पाठवली आहे, त्या पत्रात आपल्याला भेटीची जागा कोणती होती याचा स्पष्ट उल्लेख सापडतो. छत्रपती शिवाजी महाराज औरंगझेबाला घुसलखाना इथल्या दरबारात भेटले असे आपल्याला यातून स्पष्ट दिसते. (अवांतर - हे फार महत्वाचे, भेटीनंतर लगेच लिहिले गेलेले पत्र आहे. त्यातून आपल्याला भेटीत काय घडले ते कळते. हे पत्र इतिहास संशोधकांना माहित असल्याने आजच्या बातमीचा हे पत्र हा विषय नाही. यातला भेट घुसलखान्यात झाली हा उल्लेख इथे फक्त या बातमीत महत्वाचा आहे. हे मूळ पत्र मात्र बहुदा प्रथमच छापले जात असावे. मूळ पत्रातला हा भाग भेटीचे वर्णन करतो. मिती जेष्ठ वद्य ५ आदितवार के दिनी सेवोजी और सेवोजी को बेटो बे सिम्बुजी आग्रे आया सु. महाराज कुवरजी (म्हणजे मिर्झाराजा जयसिंग याचा मुलगा रामसिंग) व मुखलिसखानो पादशाहजी हुकम कियो यो सु पातशाही स्यो कोस एक सामहा आय सेवाजीनो ले जय मुलाजमती कराइ. ..... (नजर दिली त्याचे तपशील) ...... मुलाजमती किया पा छो पातशाहजी पान दिया सेवोजी तसलिम करी लिया तब पातशाहजी बकाय नो फार्मयो पच हजारो कि मिसली मो खडा करो सु खडो कियो तबही शिवाजी राजी हूओ नही दिलगीर बहोत हूओ सु घुसो करी हुजुरी स्यो उठी चालो तब महाराज कुवर (रामसिंग) जी हाथ पकडो कि कहा जावो छो खडा रहो सु सेवे मानो नही आयो बेटा नो ले गुसलखाना कि ओढी नजीक जिना पाय गोधि अंगी वॊठो घुसो बहोत कियो सु. पातसाहजि सयों मालूम हुई सेवो दिलगीर धुवू तब नबाब जाफर खान दिवान व कुवर (रामसिंग) जी व असदखा नो फार्मयो दिलासा करी ले अयो सुवा आगी दिलासा करी समझायो परगी शिवाजी घुसो कियो सुना नाही तब या जाय पादशाहजी सो अर्ज पहुंचायी जु हजरती का बंदा होशीजमती मो अय हो सु हजुरी अवो नाही तब पादशाहजी कुवरजी नो फरमयो डेरो ले जाय ..... ….. ) letter या उल्लेखातून अनेक प्रश्न उद्भवतात - घुसलखाना याचा शब्दशः अर्थ स्नानगृह. तिथे दरबार का भरवला होता? शहाजहान बादशाहने आग्र्याच्या किल्ल्यात नवीन इमारती बांधल्या. त्यावेळी बाहेरच्या पटांगणात असणारा दिवाण-इ आम-ओ-खास म्हणजे आम आणि खास या सर्वांसाठी असणारा दिवाणखाना (हॉल), त्याच्या आतल्या चौकातील दिवाण-इ-खास असा दुसरा दिवाणखाना हे दरबारासाठी वापरले जात. याशिवाय सर्वात आतल्या भागात, जिथे जनानखान्यात असणाऱ्या स्त्रिया सुरक्षित वावरू शकतील अश्या भागात शहाजहान बादशाहने एक फार सुंदर आणि सुबक असा ऐवान म्हणजे हॉल बांधला असा उल्लेख आपल्याला लाहोरी याच्या बाद्शाहनाम्यात सापडतो. या जागी नवीन वर्षाच्या आरंभी अथवा बादशहाच्या वाढदिवशी खास दरबार भरत असे. त्या वेळी बादशहाची तुला होत असे आणि जनानखान्यातल्या महत्वाच्या स्त्रिया अलंकार, रत्ने, वस्त्रे बादशहाच्या तुलेसाठी देत असत. शिवाजी महाराज औंरंगझेबाला भेटले त्या वेळी बादशहाच्या राज्यारोहणाचा असाच मोठा खास उत्सव चालू होता आणि त्यानिमित्त बादशहाने खास दरबार घुसलखान्यात भरावला होता. इथेच औरंगझेब शिवाजी महाराजांना भेटला. दुर्दैवाने शिवाजी-औरंगझेब भेटीचे अथवा औरंगझेब बादशहाचे या दरबाराचे असे चित्र उपलग्ध नाही. पण काही दशके अगोदर शहाजहान बादशहाचे अगदी याच हॉल मधले तुला होतानाचे चित्र मात्र लाहोरी याच्या बाद्शाहनामा या ग्रंथात आहे. हे एकमेव असे चित्र सध्या ब्रिटिश राजघराण्याच्या खासगी संग्रहात विंड्सर कासल इथे आहे. या चित्रावरून आपल्याला घुसलखाना इथला दरबार कसा दिसत होता, औरंगझेब बादशाह कुठे बसलाअसावा, सरदार उभे राहण्याची जागा किती दूर होती, छत्रपती शिवाजी महाराज कुठे उभे असावेत याचा अंदाज आपल्याला बांधता येतो. darbar हा ऎवान हा एका बाजूने घुसलखाना याला लागून होता असा उल्लेख लाहोरी याने केला आहे. त्याने त्या जागेची गजामध्ये मापेही दिलेली आहेत. त्यावरुन आपल्याला आजच्या लाल किल्ल्यातील या हॉलच्या जागेचा चौथरा शोधून काढता येतो. ही जागा आज अशी दिसते. today ही जागा दिवाण-ए-खासच्या अगदी समोर यमुनेच्या काठी असलेल्या गच्चीवर आहे. तिला अगदी लागूनच आजचा घुसलखाना आहे. हीच जागा आणि हा हॉल एका जुन्या नकाशात हमाम म्हणजे घुसलखाना याला लागून असलेली दिसते. या नकाशात मात्र हा हॉल शाबूत असलेला दिसतो. map या सुंदर संगमरवरी हॉलचा पुढील इतिहासही मोठा रोचक आणि शोकजनक आहे. ऑस्ट्रियन संशोधक एब्बा कोक यांनी त्याचे पुढे काय झाले याची माहिती मोठ्या मेहेनतीने जमा केली आहे. १८०३ साली दौलतराव शिंदे यांच्या पराभवानंतर आग्रा आणि दिल्ली इंग्रजांनी शिंदे यांच्याकडून आपल्या ताब्यात घेतली. त्यानंतर १८१५ साली गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्स याच्या हुकुमाने हा संगमरवरी हॉल तोडण्यात आला. त्यातून जे संगमरवर निघाले त्याचा लिलाव झाला. आणि त्यातले सुंदर तुकडे परदेशी इंग्लंडला नेले गेले. तिथे ते काही ठिकाणी प्रदर्शित केले गेल्यावर सध्या कोक यांच्या शोधानुसार आज या हॉलचे काही तुकडे लंडन येथील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युसियम या संग्रहालयाच्या तळघरात काही खोक्यांमध्ये ठेवलेले आहेत. 1876 या जुन्या चित्रात आपल्याला हॉल तोडल्यानंतर तिथे बांधलेली झोपडी आणि त्यानंतर तिचे उरलेला मोकळा चौथरा, जो आजही तसाच आहे तो दिसतो. (1876) 1880 नंतर उरलेली रिकामी जागा (1880) आज आग्र्याचा किल्ला उत्तर प्रदेश सरकारच्या ताब्यात आहे. श्री. राम नाईक यांच्या रूपाने एक मराठी व्यक्ती या राज्याच्या राज्यपालपदी विराजमान आहे. त्यामुळे या जागेचे ऐतिहासिक महत्व ओळखून जर सरकार तिथे एखादा फलक आणि त्या जागेचे मूळ चित्र जर उभारू शकेल तर महाराष्ट्राच्या आणि भारताच्या मानबिंदूत छत्रपती शिवाजी महाराज ज्या जागी औरंगझेबासमोर मानाने वागले त्या एका जागेची भर पडेल !!!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
कला
इतिहास
लेखनप्रकार (Writing Type)
माहिती

प्रतिक्रिया द्या
48214 वाचन

💬 प्रतिसाद (64)

प्रतिक्रिया

सुंदर आणि रोचक माहिती दिली

खिलजि
Mon, 05/27/2019 - 20:05 नवीन
सुंदर आणि रोचक माहिती दिली आहेत ..
  • Log in or register to post comments

नेहमीप्रमाणेच सुंदर, सचित्र

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 05/28/2019 - 13:23 नवीन
नेहमीप्रमाणेच सुंदर, सचित्र असल्याने समजायला सोपा आणि रोचक माहिती देणारा लेख. अजून येऊद्या.
  • Log in or register to post comments

१)बसलेले लोक तेव्हा मांडी

कंजूस
Tue, 05/28/2019 - 15:14 नवीन
१)बसलेले लोक तेव्हा मांडी घालत नव्हते, पालथी बैठक घालत. पायाचा अंगठा वर नाही, खाली आहे. २) सरदारांचे चेहरे, दाढ्या,नाकं वेगवेगलळी आहेत. कपाळ ,भुवयाही वेगळ्या आहेत. ३)तरुण आणि वयस्कर (५०)ही आहेत. हीसुद्धा ऐतिहासिक नोंदच झाली.
  • Log in or register to post comments

१)बसलेले लोक तेव्हा मांडी

कंजूस
Tue, 05/28/2019 - 15:16 नवीन
१)बसलेले लोक तेव्हा मांडी घालत नव्हते, पालथी बैठक घालत. पायाचा अंगठा वर नाही, खाली आहे. २) सरदारांचे चेहरे, दाढ्या,नाकं वेगवेगलळी आहेत. कपाळ ,भुवयाही वेगळ्या आहेत. ३)तरुण आणि वयस्कर (५०)ही आहेत. हीसुद्धा ऐतिहासिक नोंदच झाली.
  • Log in or register to post comments

त्या चित्रातल्या जवळजवळ

मनो
Tue, 05/28/2019 - 20:18 नवीन
त्या चित्रातल्या जवळजवळ प्रत्येकाची नावे संशोधकांनी निश्चित केली आहेत. त्यात दारा, औरंगझेब, शहजहांचा सासरा असफखान, जाफरखान आणि शाहिस्तेखानही आहेत. ते पुस्तक सापडले तर नावे पण टाकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

अजून काही विशेष म्हणजे बादशाह

मनो
Tue, 05/28/2019 - 20:27 नवीन
अजून काही विशेष म्हणजे बादशाह सोडून सगळे उभे आहेत. पायात कोणीही जोडे घालायचे नाहीत. उभे राहण्यासाठी आधार म्हणून लाकडी / लोखंडी / सोन्याची काठी वापरायची. माणूस जितका वरच्या हुद्द्यावर तितका बादशहाच्या जवळ दाखवतात. अगदी शेजारी चार शहजादे, फक्त त्यांनीच मोत्यांच्या माला घातल्या आहेत. त्यांच्या मागे असफखान आणि मग त्यामागे जांभळ्या जाम्यात जाफरखान, त्याचे काळे जॅकेट सुंदर आणि उल्लेखनीय. बाहेर उभे असणार्यात, हिरवे पागोटे आणि दाढी, कॅमेरात ढाल तो शाहिस्तेखान.
  • Log in or register to post comments

बारीक निरीक्षण

योगविवेक
Wed, 06/12/2019 - 11:32 नवीन
मुघलांच्या दरबारातील चित्रातून त्या काळातील अनेक बारीकसारीक गोष्टींची कल्पना येते. मनोज यांनी आपल्याकरता वेळ काढून कष्ट पुर्वक मिळवलेले विचार आणि चित्र धन महत्त्वाचे आहे... विषयांतर करून आपापल्यातील वैयक्तिक विचारधारेचा पसारा न लांबलेला बरा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनो

सुरेख लेख! उत्तम माहिती आणि

रुपी
Wed, 05/29/2019 - 02:00 नवीन
सुरेख लेख! उत्तम माहिती आणि चित्रे, पत्र सर्वच खूप माहितीपूर्ण आहे.
  • Log in or register to post comments

इतिहास व टोकदार अस्मिता

गामा पैलवान
Fri, 06/14/2019 - 12:39 नवीन
समीरसूर, तुमचा इथला संदेश वाचला. माझं मत सांगेन म्हणतो. १.
अशा पद्धतीचं संशोधन बंद करता येईल का या दृष्टीने थोडी चाचपणी करायला पाहिजे. आपण खूप जास्त इतिहासात रमतोय असं मला वाटतं.
यावर अनेकांनी सांगितलंय तेच सांगतो. इतिहासाचं संशोधन करायचं ते त्यातनं शिकण्यासाठी, रमण्यासाठी नव्हे. २.
या माहितीचा तसा उपयोग शून्य आहे.
आजिबात नाही. उलट शिवाजीमहाराजांच्या सैनिकी व नागरी हालचालींचा अभ्यास करायला हवा. दुसऱ्या महायुद्धातला प्रसिद्ध जनरल माँटगोमेरीने थोरल्या बाजीरावांच्या पालखेडच्या लढाईचा केला होता तसाच. ३.
ढोबळ मानाने काय झालं होतं वगैरे आपल्याला माहिती आहे आणि तेवढं पुरेसं आहे.
माहिती पुरेशी कधीच नसते. एखादा नवं तथ्य नवा पैलू उघड करून जाऊ शकतं. कुणास ठाऊक काय नवीन शिकायला मिळेल त्यातनं. ४.
आपल्याकडे इतिहासाचा शस्त्र म्हणून वापर होतो.
तसा तो व्हायलाच हवा. नाहीतर परचक्र नशिबी येईल. ५.
अतिरंजित इतिहासाचा टोकदार अस्मितेची प्रतिके म्हणून राजकीय वापर होतो.
प्रस्तुत इतिहास अतिरंजित आजिबात नाही. उलट तो व्यवहारी ( = down to earth ) आहे. ६.
कित्येक काल्पनिक कथांचा जाती-धर्मामध्ये द्वेष पसरवण्यासाठी सर्रास उपयोग केला जातो.
काल्पनिक कथांचा इतिहासाशी संबंध नाही. तसंच काल्पनिक कथांचा दुरुपयोग होतो म्हणून खरा इतिहास शोधायचा नाही, हे योग्य नव्हे. ७.
तिथे चीन आपल्या कित्येक लाख किलोमीटर पुढे निघून गेलंय.
चीनमध्ये लोकशाही नसून हुकुमशाही आहे. ८.
इतिहासाच्या संशोधनामुळे आपण आत्ताच्या घडीला जे आवश्यक आहे ते संशोधन करत नाही आहोत.
आवश्यक संशोधन कोणते व ते इतिहासाच्या संशोधनामुळे कसे अडून राहिले आहे हे कृपया स्पष्ट करावे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

इतिहास व टोकदार अस्मिता...

जॉनविक्क
Fri, 06/14/2019 - 15:50 नवीन
परवा एक आसामी भेटली त्यांनी एका मराठी शासकाच्या इतिहासाबाबत काही दाखले(सत्य गोष्टी त्यांच्या नजरेत) सांगितले. बराच वेळ पकवून ते निघून गेले आणि मी अजूनही विचार करतोय या व्यक्तीने त्याची उर्जा आत्ता भेडसावणाऱ्या प्रश्नावर उपाय शोधण्यात / लढा देण्यात केंद्रित करण्याऐवजी निव्वळ दोन विशिष्ट लोकसमुदायात नक्कीच तेढ वाढेल आशा गोष्टी पसरवण्यात का घालवली ? ज्ञान ही दुधारी तलवार आहे जर तिचा विनियोग साकल्याने समाजहितासाठी होत नसेल तर..! आणि ज्ञानाचा उपयोग विधायक कार्यास होत असेल तर कोणताच अभ्यास वा संशोधन वर्ज्य ठरत नाही. म्हणून आपण आपले विशिष्ठ ज्ञानार्जन का करत आहोत याचे प्रामाणिक आत्मपरीक्षण नक्कीच करावे व ठाम असावे.
  • Log in or register to post comments

?

माहितगार
Fri, 06/14/2019 - 17:18 नवीन
आपणच नव्हे समिर सूर सुद्धा मनमोकळ होऊन जाणे चांगली बाब आहे पण हे बोधामृत ज्यांना दिले जावयास हवे त्यांना सोडून एका समतोल अभ्यासकाच्या धाग्यावर उगाळण्याचे सुद्धा काही विशेष फायदे आहेत काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॉनविक्क

धागा सर्वजण वाचतात

जॉनविक्क
Fri, 06/14/2019 - 20:46 नवीन
आणि या व्यासपीठावर फक्त लेखकच न्हवे तर वाचक व प्रतिसादकही इतरांशी आणि स्वतःशी विषयानुषगाने संवाद साधतच असतात, म्हणूनच प्रतिसाद हा विशिष्ट व्यक्ती, लेखक यांना न देता विचार आणि विषयराधन करणाऱ्या सर्वांसाठी लिहला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

या मुद्द्याला उत्तर म्हणून हा

मनो
Tue, 06/18/2019 - 12:58 नवीन
या मुद्द्याला उत्तर म्हणून हा एक व्हिडिओ पुरेसा आहे. मूळ इंग्रजीत ते जे जसं सहज सुंदर आहे तसं मराठी भाषांतरात येणार नाही म्हणून इंग्रजीतच थोडा बदल करून देतो What will your verse be? https://youtu.be/-7OE6bDfM2M Medical , Business, Law, Engineering are noble pursuits necessary to sustain life, but history, poetry, beauty , love that's what we live for.
  • Log in or register to post comments

खुप रोचक माहीती, मनोजी, असे

खटपट्या
Wed, 09/16/2020 - 22:07 नवीन
खुप रोचक माहीती, मनोजी, असे लेख अजुन येउदेत.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा