आई घरी जायला निघते तेव्हा...

प्राची अश्विनी's picture
प्राची अश्विनी in जे न देखे रवी...
13 Jun 2020 - 9:35 am

आई घरी जायला निघते तेव्हा,
प्रवासासाठी म्हणून केलेले तिचे पराठे थोडे जास्तच होतात, चुकून.
फ्रिजमध्ये केलेली असते माझ्या आवडीची
केळफुलाची भाजी, रसाची आमटी..
बाबांकडून खवून घेतलेलं खोबरं, सोललेला लसूण..
डब्बा भरलेला असतो तिखट पु-या, चकलीनं..
दाण्याचं कूट, जीरेपूड, धणेपूड..
कधी करते कोण जाणे!

आवरून ठेवलेला असतो बेड.
उशांचे अभ्रे, अंथरूण पांघरूण धुवायच्या कपड्यात,
कपाटात असतो पाठदुखीवरचा संपत आलेला स्प्रे,
डायबेटीसच्या गोळ्यांची पाकिटं.
ड्रॉवरमध्ये असतं मी दिलेलं पर्फ्युम, क्रीम वगैरे
"राहू दे इथंच, पुढच्या वेळेला मलाच होईल म्हणून"
नातींची नावं लिहून ठेवलेली पाकिटं
हमखास विसरलेले मी दिलेले पैसे..

मला आठवतात उगाच तिच्याशी घातलेले वाद
तिच्यावर काढलेला सगळ्या जगाचा राग
माझा चढलेला आवाज
अन् तिच्या डोळ्यतलं पाणी.
निघताना सामान ठेवायच्या गडबडीत राहून गेलेला नमस्कार, मिठी..

डोळ्यातलं पाणी अडवत मी फोन करते, कुठे पोचलीस विचारायला.
ते बोलून ती वर म्हणते, "लोणी कढवायचं राहिलंय, आज कर ते . आणि पायात आठवणीनं मोजे घाल, भेगा पडतील नाहीतर...."

आई घरी जायला निघते आणि मी पुन्हा मोठी होते..

कवितामुक्तक

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

13 Jun 2020 - 10:12 am | ज्ञानोबाचे पैजार

या आया अशाच असतात.. आणि मुली पण...

पैजारबुवा,

रातराणी's picture

13 Jun 2020 - 10:42 am | रातराणी

सुरेख!! अगदी मनातली कविता!

शब्द न् शब्द आपलासा वाटला. जीव गुंतलेला असतो पण सोडून जायला लागतंच. आणि मुली मोठ्या होतात! खूप सुंदर लिहिलं आहे. _/\_

गणेशा's picture

13 Jun 2020 - 11:01 am | गणेशा

वा मस्त कविता.. आवडली..
मनात बसली कविता..

असेच अविनाश काकांची आणि त्यावरुन तेंव्हा मी लिहिलेली हि सासरला मुलगी जाते ती कविता आठवली..
लिंक देतो

ह्या कविता आठवल्या.. तुमच्या कवितेवरून..
तुमची कविता पण अशीच आवडली

कारण लग्न करून तू सासरी गेली आहेस

प्राची अश्विनी's picture

13 Jun 2020 - 3:25 pm | प्राची अश्विनी

वाह!

बिपीन सुरेश सांगळे's picture

13 Jun 2020 - 11:28 am | बिपीन सुरेश सांगळे

आत डोकवायला लावणारी कविता

सतिश गावडे's picture

13 Jun 2020 - 11:43 am | सतिश गावडे

छान आहे कविता. आमच्याकडे आईला सोडून निघायचं असतं, तेव्हा पावलं निघत नाहीत ते आठवलं.

आई घरी जायला निघते आणि मी पुन्हा मोठी होते..

असं काही वाचलं की मला संदिप खरेच्या "नसतेस घरी तू जेव्हा" कवितेचं शेवटचं कडवं आठवतं. कविता बायकोला उद्देशून असली तरी हे शेवटचं कडवं का कोण जाणे आईसाठी जास्त योग्य वाटतं.

ना अजून झालो मोठा
ना स्वतंत्र अजुनी झालो
तुजवाचून उमगत जाते
तुजवाचून जन्मच अडतो !

प्राची अश्विनी's picture

13 Jun 2020 - 3:26 pm | प्राची अश्विनी

करंय, हे आईसाठी जास्त योग्य वाटतं

प्रचेतस's picture

14 Jun 2020 - 6:33 am | प्रचेतस

खूपच सुरेख

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Jun 2020 - 10:37 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अहाहा.... !क्लास. आवडली कविता. पुस्तक करा निवडक कवितेचं विसरु नका.

-दिलीप बिरुटे

प्राची अश्विनी's picture

14 Jun 2020 - 10:50 am | प्राची अश्विनी

पैजारबुवा, रारा , गणेशा, पलाश, सगा, बिपीन सांगळे, प्रचेतस, बिरुटे सर.... धन्यवाद!

राघव's picture

14 Jun 2020 - 3:19 pm | राघव

आवडली कविता. सुंदर.

सस्नेह's picture

15 Jun 2020 - 12:31 pm | सस्नेह

मोठं होऊन पुन्हा लहान करुन गेली कविता..

वीणा३'s picture

15 Jun 2020 - 9:17 pm | वीणा३

अप्रतिम!!!

प्राची अश्विनी's picture

16 Jun 2020 - 12:40 pm | प्राची अश्विनी

सस्नेह, वीणा आणि राघव... धन्यवाद.

मन्या ऽ's picture

21 Jun 2020 - 10:41 am | मन्या ऽ

कविता आवडली..

श्रीकांतहरणे's picture

22 Jun 2020 - 10:43 pm | श्रीकांतहरणे

हम्म .... छान फार संवेदनशील ... आमच्याकडे आम्ही मुंबईला परत येतो, तेव्हा आमची बॅग आईच्या मायेने भरते. माझ्याकडून एक शर्ट घे रे, म्हणून अजूनही ती खिशात पैसे ठेवते. आमची काळजी करू नको, स्वतःला जप वारंवार सांगते. तिला का तर काय माहीत? मी नेहमी रोड झालो असेच वाटते. अरे तब्बेतीकडे लक्ष दे ....अशी न संपणारी लिस्ट .....शेवटी ती आईच ना.

प्राची अश्विनी's picture

23 Jun 2020 - 4:50 pm | प्राची अश्विनी

खरंय. आई म्हणजे आईच.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

23 Jun 2020 - 11:53 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

वाह छानच!

मीअपर्णा's picture

25 Jun 2020 - 2:11 am | मीअपर्णा

असा अनुभव नाही कारण आम्हा बाहेरच्या देशात राहणार्‍यांची परिस्थिती थोडी वेगळी. हे वर्णन वाचून तेही सत्य डोळ्यापुढे उभे राहिले. छान लिहिलंय काव्य :)

प्राची अश्विनी's picture

25 Jun 2020 - 6:51 pm | प्राची अश्विनी

मिका, मीअपर्णा धन्यवाद!