११९ वर्षांचा वेदनारहित प्रवास

कुमार१'s picture
कुमार१ in दिवाळी अंक
6 Nov 2018 - 12:00 am

H

११९ वर्षांचा वेदनारहित प्रवास

“डोकेदुखी? अंगदुखी? त्यामुळे अगदी बेजार झाला आहात? मग एक अ‍ॅस्पिरीन घ्या अन या त्रासापासून लगेच मुक्ती मिळवा, ढँ ट ढँण... !” यासारख्या अनेक माध्यमांतील जाहिरातींनी गेल्या कित्येक वर्षांपासून आपल्या मनावर गारूड केले आहे. मला खातरी आहे की आपल्यातील बहुतेकांनी ही गोळी आयुष्यात कधी ना कधी नक्की घेतली आहे. अ‍ॅस्पिरीनयुक्त अनेक औषधी गोळ्या औषध-दुकानात कुणालाही अगदी सहज (ओव्हर द काउंटर) मिळतात. अ‍ॅस्पिरीनचा तात्पुरता वेदनाशामक आणि तापविरोधी गुणधर्म यामुळे रुग्णास त्याने काहीसे बरे वाटते. अ‍ॅस्पिरीन हे आधुनिक वैद्यकाच्या इतिहासातील एक मूलभूत आणि आश्चर्यकारक औषध (wonder drug) आहे. आज त्याच्या गुणधर्माची कित्येक नवी औषधे उपलब्ध असतानाही त्याने बाजारातील आपले स्थान टिकवून ठेवले आहे यात शंका नाही. अंगदुखी व तापाखेरीज हृदयविकार आणि अन्य काही आजारांतही त्याची उपयुक्तता सिद्ध झालेली आहे. अशा या वलयांकित औषधाचा शोध, त्याचे उपयोग, दुष्परिणाम आणि त्याबद्दलचे नवे संशोधन या सर्वांचा या लेखात आढावा घेत आहे.
अ‍ॅस्पिरीनचे रासायनिक नाव Acetyl salicylic acid असे आहे.
अ‍ॅस्पिरीनचा शोध:
अनेक आजारांचे एक महत्त्वाचे लक्षण असते ते म्हणजे वेदना. तिच्या तीव्रतेनुसार रुग्ण कमी-अधिक अस्वस्थ असतो. त्यामुळे वेदनाशामक औषधांचा शोध ही वैद्यकातील फार प्राचीन गरज होती.
Salicylic acidच्या वेदनाशामक उपयोगाची पहिली नोंद सुमारे ४००० वर्षांपूर्वी सुमेरिअन संस्कृतीत झालेली आढळते. हे आम्ल अनेक झाडांच्या खोडात असते. त्यात प्रामुख्याने ‘विलो’ या झाडाचा समावेश आहे. हेच ते झाड, ज्यापासून क्रिकेटची बॅट बनवली जाते. पुढे चिनी व ग्रीक संस्कृतीमध्येही वेदना व तापनिवारणासाठी त्याचा वापर केला जाई.
* विलोचे झाड (चित्र):pict
त्यानंतरचा आधुनिक वैद्यकाचे पितामह Hippocrates यांनी त्याचा महत्त्वाचा वापर केला. ते रुग्णांना विलो झाडाचे खोड चघळण्यास देत. तसेच स्त्रियांच्या प्रसूतिवेदना कमी होण्यासाठी या खोडापासून केलेला चहा त्यांना पिण्यास देत असत.
नंतर १८व्या शतकाच्या उत्तरार्धात अ‍ॅस्पिरीनचा वापर थंडी वाजून ताप येणाऱ्या रुग्णांवर केला गेला. पुढे एक शतकानंतर विलोच्या खोडाच्या पावडरीचा प्रयोग rheumatismसाठी केला गेला आणि अशा रुग्णांची सांधेदुखी व ताप त्यामुळे कमी झाला.
यापुढील टप्प्यात विलोपासून पिवळ्या रंगाचा एक पदार्थ वेगळा करण्यात यश आले आणि त्याला Salicin हे विलोचे लॅटिन नाव दिले गेले. पुढे Salicin हे शुद्ध स्फटिक स्वरूपात तयार केले गेले आणि मग जर्मनीतील एका कंपनीने Salicylic acidचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू केले. आता त्याचा रुग्णांसाठी सर्रास वापर होऊ लागला. या रुग्णांना त्याचा गुण आला खरा, पण त्याचबरोबर खूप उलट्याही होत. हा अर्थातच औषधाचा दुष्परिणाम होता. त्यावर मात करता आली तरच हे औषध रुग्णांसाठी वरदान ठरणार होते.
मग जर्मनीतील ‘बायर’ कंपनीने यात विशेष रस घेतला. त्याकामी Felix Hoffmann या तंत्रज्ञाची निवड करण्यात आली. खुद्द त्याच्या वडिलांना खूप सांधेदुखीचा त्रास असल्याने त्याने या कामात अगदी जातीने लक्ष घातले. मग खूप विचारांती त्याने Salicylic acid च्या रेणूत एक रासायनिक बदल केला. तो म्हणजे त्यात Acetyl group घालून Acetylsalicylic acid हे नवे रसायन तयार केले. मग या नव्या औषधाचे रुग्णांवर बरेच प्रयोग झाले. आता त्यामुळे उलट्या होण्याचे प्रमाण खूप कमी झाल्याचे दिसले. अखेर या औषधाच्या सर्व चाचण्या पूर्ण होऊन मार्च १८९९मध्ये ‘बायर’ने ‘अ‍ॅस्पिरीन’ या व्यापारी नावाने त्याची रीतसर नोंदणी केली. वेदनाशामक औषधांच्या इतिहासातील हा सुवर्णक्षण म्हटला पाहिजे!
pict
(Felix Hoffmann)
या मूलभूत औषधाच्या शोधासाठी अनेकांकडून समांतर संशोधन चालू होते. त्यामुळे हा शोध नक्की कोणी लावला याबाबत काही प्रवाद आहेत.
आता ही कंपनी दवाखान्यांना व रुग्णालयांना अ‍ॅस्पिरीनची पांढरी पावडर पुरवू लागली. ‘अ‍ॅस्पिरीन’ शब्दाची व्युत्पत्ती रोचक आहे:A = acetyl,Spiraea हे विलो झाडाच्या गटाचे शास्त्रीय नाव आणिin हा अंत्य प्रत्यय त्याकाळी औषधी नावांना लावला जाई.
pict
ही औषधी पावडर आता मोठ्या प्रमाणावर वापरात आली. मात्र रुग्णांना ती पुडीत बांधून देणे हे तसे कटकटीचे वाटे. मग वर्षभरातच कंपनीने अ‍ॅस्पिरीनची गोळी तयार केली. त्यामुळे त्याची लोकप्रियता आणखीनच वाढली. किरकोळ अंगदुखीसाठी कुणालाच डॉक्टरकडे जायला नको वाटते. त्या दृष्टीने ही गोळी डॉक्टरांच्या चिठ्ठीविना उपलब्ध होणे आवश्यक होते. मग तिला या औषध नियमातून मुक्त करण्यात आले. १९१५पासून अ‍ॅस्पिरीन हे औषध दुकानात कुणालाही सहज (OTC) मिळू लागले. किंबहुना OTC हा शब्दप्रयोग तेव्हापासून रूढ झाला. त्यानंतर आजतागायत या गोळीने बहुतेक कुटुंबांत औषधांच्या घरगुती बटव्यात स्थान मिळवले आहे.
आता जरा अ‍ॅस्पिरीनचा औषधी गुणधर्म व्यवस्थित समजावून घेऊ. ते मुख्यतः वेदनाशामक आहे आणि काही अंशी तापविरोधी. जेव्हा एखाद्याला जंतुसंसर्ग अथवा कुठलीही इजा होते, तेव्हा शरीरपेशी त्याचा प्रतिकार करतात. या प्रतिकाराला दाह (inflammation) असे म्हणतात. या दाह-प्रक्रियेत पेशींत अनेक रसायने सोडली जातात. त्यांच्यामुळे मग रुग्णास वेदना व ताप ही लक्षणे जाणवतात. ती कमी करण्यासाठी ही दाह-प्रक्रिया नियंत्रित करावी लागते. अ‍ॅस्पिरीन नेमके हेच काम (anti inflammatory)करते. आता सूक्ष्म पातळीवर हे नेमके कसे होते हे जाणून घेणे ही संशोधनातील पुढची पायरी होती. त्या दृष्टीने संशोधकांचे अथक प्रयत्न चालू होते.
ही उकल व्हायला १९७१ साल उजाडावे लागले.
वर उल्लेखिलेल्या पेशींतल्या दाह-प्रक्रियेत पेशींत जी रसायने सोडली जातात, त्यापैकी एक प्रमुख म्हणजे Prostaglandins. त्यांच्यामुळेच वेदना जाणवते. अशा वेळेस जर रुग्णास अ‍ॅस्पिरीन दिले, तर ते या रसायनांच्या निर्मितीत अडथळा आणते. परिणामी दाह कमी होऊन वेदनेपासून आराम मिळतो. अत्यंत मूलभूत स्वरूपाचे हे संशोधन होते. म्हणून कालांतराने त्यासाठी नोबेल परितोषिक दिले गेले.
एव्हाना अ‍ॅस्पिरीन हे वेदनाशामक औषध म्हणून प्रस्थापित झाले होते. तरीही त्यावरील संशोधन अद्याप चालूच होते. त्यातून त्याच्या आणखी एका पैलूचा शोध लागला. हा पूर्णपणे वेगळ्या संदर्भात होता. आपल्या रक्तात बिम्बिका या वैशिष्ट्यपूर्ण पेशी (platelets) असतात. जेव्हा आपल्याला एखादी जखम होते, तेव्हा रक्तस्राव होतो आणि थोड्याच वेळात तो थांबवण्याची नैसर्गिक प्रक्रिया सुरू होते. या प्रक्रियेत बिम्बिकांमध्ये Thromboxane हे रसायन तयार होते आणि ते या पेशींना घट्ट एकत्र आणते. एक प्रकारे त्यांचे ‘बूच’ तयार होते आणि ते जखमेला ‘सील’ करते. इथे एक महत्त्वाचा मुद्दा ध्यानात घ्यावा. जेव्हा जखमेतून रक्त वाहते तेव्हाच हे ‘बूच’ तयार झाले पाहिजे. परंतु, या बिम्बिकांची एक गंमत आहे. एरवीही जेव्हा त्या रक्तप्रवाहात असतात, तेव्हासुद्धा त्यांच्यात एकत्र येऊन चिकटण्याचा गुण असतो. जर का हे नेहमीच्या रक्तप्रवाहात होऊ लागले, तर मात्र आफत ओढवेल. कारण आता त्यांची गुठळी तयार झाली तर त्यामुळे रक्तवाहिनीत अडथळा होईल. त्याचे परिणाम अर्थातच गंभीर असतील. अर्थात असे होऊ न देण्याची नैसर्गिक यंत्रणा रक्तवाहिन्यांत असते. त्यांच्या पेशींतून असे एक रसायन सोडले जाते, ज्यामुळे बिम्बिका एकत्र येऊ शकत नाहीत.
काही रुग्णांत मात्र हा नैसर्गिक समतोल बिघडतो आणि बिम्बिका विनाकारण एकत्र येऊन चिकटण्याची प्रक्रिया जास्तच होऊ लागते. परिणामी रक्तवाहिन्यांत गुठळ्या होउन रक्तप्रवाहास अडथळा होतो. जर ही प्रक्रिया कॉरोनरी वाहिनीत झाली, तर त्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो. तर मेंदूच्या रक्तवाहिन्यातील अडथळ्याने Strokeचा आजार होतो. अशा रुग्णांवर उपचार करताना बिम्बिका एकत्र येण्याला विरोध करणारी औषधे देतात. त्यामध्ये अ‍ॅस्पिरीनचा समावेश आहे. त्याचे दीर्घकालीन उपचार या रुग्णांसाठी लाभदायी असतात. अ‍ॅस्पिरीनच्या इतिहासातील हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरला. त्यामुळे आता ते निव्वळ किरकोळ अंगदुखीवरचे औषध न राहता एका ‘वरच्या’ पातळीवरचे औषध म्हणून मान्यता पावले. आता रक्त- गुठळीने होणाऱ्या ह्रदयविकाराच्या आणि मेंदूविकाराच्या रुग्णांसाठी ते प्रतिबंध आणि उपचार अशा दोन्ही आघाड्यांवर सररास वापरले जाते.
हृदयविकाराच्या प्रतिबंधात्मक वापराबद्दल मात्र तज्ज्ञांमध्ये काही मतभेद आहेत. या संदर्भात रुग्णांचे दोन गट पडतात:
१. ज्यांना हा विकार होण्याचा धोका अधिक संभवतो - यात आनुवंशिकता, मधुमेह, रक्तदाब व लठ्ठपणा हे घटक येतात.
२. ज्यांना विकाराचा प्रत्यक्ष एक झटका येऊन गेलेला आहे.
यातील दुसऱ्या गटातील रुग्णांना पुढचा झटका येऊ नये म्हणून अ‍ॅस्पिरीनचा उपयोग बऱ्यापैकी होतो. परंतु, पहिल्या प्रकारच्या रुग्णांना ते झटका न येण्यासाठी कितपत उपयुक्त आहे यावर अलीकडे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. किंबहुना यावर वैद्यक विश्वात खडाजंगी चालू आहे. विशेषतः सत्तरी ओलांडलेल्या लोकांना ते न देण्याची सूचना पुढे आली आहे. एखाद्या औषधाचा प्रतिबंधात्मक वापर करताना त्याच्या दीर्घकाळ वापराने होणाऱ्या दुष्परिणामांकडेही लक्ष द्यावे लागते. तेव्हा अपेक्षित फायदा आणि संभाव्य धोका यांचा तुलनात्मक विचार करून निर्णय घ्यावा लागतो. त्यामुळे रुग्णतपासणीनुसार हा निर्णय वेगवेगळा असतो.
एव्हाना आपण अ‍ॅस्पिरीनची उपयुक्तता पहिली. वैद्यकात त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. पण हेही लक्षात घेतले पाहिजे की ते एक आम्ल आहे आणि त्याचे काही दुष्परिणामदेखील होतात. त्याबद्दल आता माहिती घेऊ.
दुष्परिणाम:
वर आपण पहिले की मूळ Salicylic acid तर जठराम्लता खूपच वाढवायचे. अ‍ॅस्पिरीन ही जरी त्याची सुधारित आवृत्ती असली, तरी त्यानेही काही प्रमाणात जठराम्लता वाढते. त्यामुळे रुग्णास मळमळ व तोंड आंबट होणे हा त्रास कमीअधिक प्रमाणात होतो. काहींना उलट्या होऊ शकतात. अशा रुग्णांना जर अ‍ॅस्पिरीन दीर्घकाळ घ्यावी लागली तर जठराचा वा आतड्यांचा ulcer आणि त्यानंतर रक्तस्रावदेखील होऊ शकतो.
काही लोकांना या औषधाची allergy असू शकते. त्यांना त्यामुळे अंगावर पुरळ वा गांधी उठू शकतात. तर काहींना श्वासनलिका आकुंचनाचा त्रास होतो. त्यामुळे जरी हे औषध OTC मिळणारे असले, तरी ते नेहमी वैद्यकीय सल्ल्यानेच घ्यावे, हे बरे !
विशेषतः पोटाचे अल्सर, गाऊट, यकृताचे आजार आणि रक्तस्राव होणाऱ्या रुग्णांनी अ‍ॅस्पिरीन टाळले पाहिजे. अतिरिक्त मद्यपानानंतर ते घेणे धोक्याचे आहे (hangoverमुळे जे डोके दुखते, त्यावर हा उपाय नाही!).
लहान मुलांच्या बाबतीत तर ते चुकूनही वैद्यकीय सल्ल्याशिवाय घेऊ नये. मुलांत विषाणू संसर्गामुळे ‘फ्लू’सारखे आजार वारंवार होतात आणि त्यात तापही येतो. अशा वेळेस अ‍ॅस्पिरीन कटाक्षाने घेऊ नये. अन्यथा त्यातून आजाराची गुंतागुंत वाढते आणि मेंदूस व यकृतास गंभीर इजा होते.
गरोदर स्त्रियांनीदेखील ते दीर्घकाळ अथवा मोठ्या डोसमध्ये घेऊ नये. इथेही वैद्यकीय सल्ला अत्यावश्यक.
अ‍ॅस्पिरीन हे वेदना, ताप आणि विशिष्ट हृदयविकार आणि मेंदूविकार यासाठी वापरले जाणारे औषध म्हणून विसाव्या शतकात चांगलेच रुळले आहे. अन्य काही गंभीर आजारांत त्याचा वापर करता येईल का, यावर चालू शतकाच्या गेल्या दोन दशकांत तुफान संशोधन होत आहे. त्यापैकी दोन महत्त्वाचे आजार म्हणजे कर्करोग आणि अल्झायमर आजार. विशेषतः मोठ्या आतड्याच्या कर्करोगाबाबत खूप संशोधन झाले आहे. त्याचा आढावा आता घेतो.
अ‍ॅस्पिरीन व आतड्याचा कर्करोग:
पन्नाशीनंतर सतावणाऱ्या कर्करोगांत हा एक महत्त्वाचा आणि गंभीर आजार आहे. त्यामुळे त्याच्या प्रतिबंधावर बरेच लक्ष केंद्रित झालेले आहे. या रोगाचा धोका अधिक संभवणाऱ्या लोकांना अ‍ॅस्पिरीन कमी डोसमध्ये दीर्घकाळ दिल्यास रोगप्रतिबंध होऊ शकतो, असे गृहीतक आहे. यासंबंधीचे अनेक प्रयोग जगभरात झाले आहेत. ५०–५९ या वयोगटांतील लोकांना जर १० वर्षे सलग अ‍ॅस्पिरीन दिले, तर रोगप्रतिबंध होऊ शकेल असे काही संशोधकांना वाटते. तसेच प्रत्यक्ष हा रोग झालेल्या रुग्णांना जरी ते देत राहिले, तरी या पूरक उपचाराने त्यांचा जगण्याचा कालावधी वाढू शकेल असेही काहींचे मत आहे.
“कर्करोगावर अ‍ॅस्पिरीन? कसे काय बुवा?” हा प्रश्न सामान्यांना तसा बुचकळ्यात टाकणारा आहे. या संदर्भात ते नक्की कसे काम करते हे अद्याप पुरेसे स्पष्ट झालेले नाही. ती प्रक्रिया गुंतागुंतीची आहे. कर्करोगाच्या पेशींचा शरीराच्या प्रतिबंधक यंत्रणेकडूनच नाश करवणे, अशी काहीशी ती क्रिया आहे. अ‍ॅस्पिरीनच्या या उपयुक्ततेबाबत संशोधकांत अद्याप एकवाक्यता नाही. एखादी वैद्यक संघटना त्याचा हिरिरीने पुरस्कार करतेय, तर दुसरी एखादी त्याचा तितकाच विरोध करतेय. सध्या याबाबतचा पुरेसा पुरावा नसल्याने ही स्थिती आहे. तसेच दीर्घकाळ अ‍ॅस्पिरीन दिल्याने आतड्यांत रक्तस्राव होऊ शकतो, हाही मुद्दा दुर्लक्षिता येत नाही. भविष्यातील संशोधन यावर अधिक प्रकाश टाकेल. अ‍ॅस्पिरीनच्या सखोल आणि व्यापक संशोधनासाठी आंतरराष्ट्रीय अ‍ॅस्पिरीन ‘फाउंडेशन’ची स्थापना झालेली आहे. यावरून अ‍ॅस्पिरीनचे वैद्यकातील महत्त्व अधोरेखित होते.
‘विलो’चे खोड चघळण्यापासून या औषधाचा ऐतिहासिक प्रवास सुरू झाला. आज अ‍ॅस्पिरीन विविध प्रकारच्या गोळ्यांच्या आकर्षक रूपात उपलब्ध आहे. अचंबित करणारे हे वैविध्यपूर्ण प्रकार असे आहेत -
१. साधी गोळी
२. पाण्यात लगेच विरघळणारी
३. चघळण्याची गोळी व च्युइंग गम
४. लेपित (coated) गोळी
५. शरीरात हळूहळू विघटित होणारी आणि
६. दीर्घकाळ प्रभाव टिकणारी कॅप्सूल
pict
रुग्णाचा आजार आणि वैद्यकीय सल्ल्यानुसार यांपैकी योग्य त्या गोळीची निवड केली जाते. अर्थातच आजारानुसार तिचे ‘डोस’ वेगवेगळे असतात. गोळ्यांचे काही प्रकार हे OTC मिळतात, तर अन्य काहींसाठी (नियमानुसार) डॉक्टरांची चिठ्ठी आवश्यक असते. हे औषध दीर्घकाळ स्वतःच्या मर्जीने कधीही घेऊ नये. त्यासाठी वैद्यकीय सल्ला आवश्यकच. तसेच हृदयविकाराच्या व मेंदूविकाराच्या ज्या रुग्णांना अ‍ॅस्पिरीनचे उपचार चालू आहेत, त्यांनी कधीही स्वतःच्या मनाने ते बंद करू नयेत. गोळी थांबवणे अथवा डोसचे फेरफार करणे हा सर्वस्वी डॉक्टरांचा अधिकार आहे.
अ‍ॅस्पिरीन हे Salicylates या कुळातील औषध आहे. त्याच प्रकारातील एक रसायन हे विविध वेदनाशामक मलमांच्या रूपात उपलब्ध असते. अंगदुखी, सांधेदुखी इ.साठी बरेचदा अशी मलमे त्वचेवरून चोळण्यासाठी वापरतात.
......
एक सामान्य रसायन असलेले अ‍ॅस्पिरीन हे आज कुठल्याही स्वामित्वहक्कापासून मुक्त आणि सहज उपलब्ध असलेले औषध आहे. पुन्हा बऱ्यापैकी स्वस्त आणि जगभरात उपलब्ध. वर उल्लेखिलेल्या गंभीर आजारांत जर ते भविष्यात खरोखर उपयुक्त ठरले, तर ते आपल्यासाठी वरदान असेल. अनेक संशोधक त्या बाबतीत आशावादी आहेत. या पिटुकल्या गोळीचा एखाद्या जादूच्या कांडीप्रमाणे अनेक आजारांत उपयोग व्हावा असे त्यांना मनोमन वाटते. अशा या बहुमूल्य संशोधनास मी मनापासून शुभेच्छा देऊन थांबतो.
****************************************
लेखातील सर्व चित्रे जालावरून साभार.
H

दिवाळी अंक २०१८

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

13 Nov 2018 - 8:23 pm | कुमार१

तुम्हाला ही हार्दिक शुभेच्छा !
वाचकांना लेख आवडल्याचे समाधान आहे.

लई भारी's picture

15 Nov 2018 - 1:37 pm | लई भारी

माहितीपूर्ण लेख. अनेक धन्यवाद.

अगदीच बाळबोध प्रश्न :)

तेव्हा शरीरपेशी त्याचा प्रतिकार करतात. या प्रतिकाराला दाह (inflammation) असे म्हणतात.

आपण ही औषध वापरून दाह कमी करतोय म्हणजे शरीरपेशी जो प्रतिकार करत आहेत त्यात अडथळा आणतो का? की दाह/वेदनाशामक औषध फक्त दाह/वेदना कमी करतात?

एकदा पॅरासिटामोल, आयबुप्रोफेन, डायक्लोफिनॅक इ. बद्दल सविस्तर लिहाल का? कुठले कधी देतात? काय निकष असतात?
पॅरासिटामोल जास्त सुरक्षित मानले जाते का?
अर्थात डॉक्टरच्या सल्ल्याने घेणे उत्तम पण आम्हाला सुद्धा गूगलज्वर चढत असल्यामुळे ह्या शंका! :)

अभ्या यांनी म्हटल्याप्रमाणे आमच्या घरात पण एकाला 'कॉम्बीफ्लाम' घेतले कि प्रचंड पोटदुखी सुरु होते; कदाचित आयबुप्रोफेन ची ऍलर्जी असेल, कारण पॅरासिटामोल-६५० चा डोस मानवतो.

(शेपूट वाढतंयच )

त्वचेवर लावली जाणारी मलम(उदा. डायक्लोफिनॅक असणारी) कशी काम करतात याबद्दल पण कुतूहल आहे :P

सुबोध खरे's picture

15 Nov 2018 - 7:53 pm | सुबोध खरे

@ लै भारी
INFLAMMATION याचा अर्थ दाह /सूज येणे असे आहे.
याचे पाच घटक आहेत. लालसरपणा, वेदना, गरम होणे आणि प्रत्यक्ष सूज येणे आणि अवयवाचे काम थांबणे/ कमी होणे.
या चारही गोष्टी एखाद्या अवयवाला इजा झाली तर तो अवयव बारा करणे किंवा ठीक करणे आहे. जेंव्हा आपण दाह/सूज येण्यावर औषध देतो तेंव्हा ती सूज अतिरिक्त जास्त असते ज्यामुळे आपला तो अवयव नीट काम करू शकत नाही. अशा वेळेस दाह/सूज कमी करणारी औषधे घेणे श्रेयस्कर असते. पण याचा अर्थ असा नव्हे कि साधं डोकं आपटलं कि घे औषध. तेंव्हा प्रत्येक वेळेस जरा काही दुखलं कि घे कॉम्बीफ्लाम हे केलंत तर तुम्ही स्वतःला जास्त अपाय करणार आहात. कंबर दुखते आहे त्याचे कारण शोधणे आवश्यक आहे. स्लिप डिस्क असणारे रुग्ण अशा तर्हेचे वेदना शामक औषध घेऊन काम केल्याने रोग बळावल्याची उदाहरणे सगळ्या डॉक्टरांनी पाहिलेली असतात. दिवसभराच्या थकव्याने आपले डोके दुखत आहे पण घरी पाहुणे आले आहेत अशा वेळेस एखादी पॅरासेटेमॉलची गोळी घेणे ठीक आहे. सर्दीमुळे डोकं दुखत आहे तर एक ऍस्पिरिन किंवा पॅरासेटेमॉलची गोळी घेणे ठीक आहे. पण लोक लगेच जालावर वाचून वेगवेगळ्या गोळ्या घेऊन नाक एकदम साफ होईल अशा गोळ्या घेतात. पण वारंवार दुखणाऱ्या अवयवांकडे दुर्लक्ष करणे आपल्याला महाग पडू शकते.
लक्षात ठेवा-- वेदना हा एक अत्यंत महत्त्वाची अशी संरक्षक संवेदना आहे. आपला हात बधिर झाला तर तो आपण विस्तवावर जाळून घेऊ शकता किंवा मधुमेही/ कुष्ठरोगी लोकांना हि संवेदना नाहीशी झाल्यामुळे हाताची किंवा पायाची बोटे झडून जातात.
संधिवात असलेल्या लोकांना हा दाह/सूज हे शरीराची प्रतिकार शक्ती आपल्याच सांध्यांविरुद्ध हल्ला चढवण्यामुळे होत असते. अशा वेळेस डॉक्टरांच्या सल्ल्याने सूज उतरवणारी औषधे घेणे हे आवश्यक ठरते कारण अनेक रुग्णांना (विशेषतः स्त्रियांना) सकाळी गोळी घेतल्याशिवाय आखडलेले सांधे सुटतच नाहीत. अशा वेळेस नाईलाज असतो.
कॉम्बीफ्लामने जर पोटदुखी होत असेल तर ती न घेणे हे श्रेयस्कर आहे. पॅरासेटेमॉलची प्रथम ५०० मिग्रॅमची गोळी घेऊन अर्धा तास थांबून पहा नाही तर पुढच्या वेळेस ६५० घ्या.अगोदरच ३० % जास्त डोस का घ्यायचा आजकाल लोकांना थोडा सुद्धा धीर नसतो हि वस्तुस्थिती आहे.
पॅरासेटेमॉल सुरक्षित आहे याचा अर्थ असा नव्हे कि केंव्हाही कितीही घ्या. पॅरासेटेमॉलचा यकृतावर सूक्ष्म प्रमाणात का होईना वाईट परिणाम होत असतो. त्यामुळे दारू पिणार्यांनी किंवा यकृताचा आजार असणार्यांनि पॅरासेटेमॉल डॉक्टरच्या सल्ल्यानेच घ्यावे.
त्वचेवर लावणारी मलमे त्यातील जवसाच्या तेलामुळे खोलवर सांध्यात शोषली जातात आणि तेथे नवणाऱ्या वेदना कमी करतात. डायक्लोफिनॅक थेट पोटात जात नसल्यामुळे जठराचा दाह होत नाही हा त्याचा फायदा आणि दुखत असलेल्या जागीच औषध जात असल्याने एकंदर औषधाची मात्रा शरीरात कमी जाते. पण जास्त खोल दुखत असेल तर तेथपर्यंत औषध पोचत नाही हा त्याचा तोटा आहे.

सहमत.
या गोळ्या दुकानातून घेऊन साठवून नंतर त्या खूप एकदम खाऊन आत्महत्या केल्याची घटना माझ्या ओळखीत घडली आहे.

कुमार१'s picture

16 Nov 2018 - 9:48 am | कुमार१

पाश्चिमात्य जगात औषधांमुळे होणाऱ्या विषबाधेत (drug overdose) पॅरासिटामॉल चा प्रथम क्रमांक आहे.

औषधाची सहज उपलब्धता असे प्रश्न निर्माण करते.

कुमार१'s picture

15 Nov 2018 - 2:09 pm | कुमार१

तुमचा प्रश्न सुयोग्य आहे.

आपण ही औषध वापरून दाह कमी करतोय म्हणजे शरीरपेशी जो प्रतिकार करत आहेत त्यात अडथळा आणतो का? “>>>>>>>

पेशींचा प्रतिकार काही वेळेस असह्य पातळीवर जातो. म्हणून त्यात थोडा अडथळा आणून तो नियंत्रित करावा लागतो. म्हणून औषधांचा डोस महत्वाचा आहे.

….. इतर सूचनांची नोंद घेत आहे, शेपटाची काळजी नका करू ! शेवटी वाचक का लेखकाचा ग्राहक आहे. दखल जरूर घेणार.

पद्मावति's picture

15 Nov 2018 - 6:35 pm | पद्मावति

माहीतीपुर्ण लेख. आवडला.

कुमार१'s picture

18 Nov 2018 - 2:28 pm | कुमार१

चर्चेत सहभागी सर्वांचे आभार.
दिवाळी अंकासाठी एखाद्या औषधाबद्दल लिहावे की नाही या संभ्रमात होतो कारण सणाचे दरम्यान वाचकांना आजाराची चर्चा नको वाटते. तरीपण धाडस करून लिहिले. तुम्हा सर्वांच्या येथील सहभागाने त्याचे चीज झाले असे वाटते.

ऍस्पिरिन व इतर काही वेदनाशामक औषधांची तुलना या विषयातील वाचकांचे औत्सुक्य दिसले. मासिक पाळीतील वेदना हा समस्त स्रीजातीला पिडणारा विषय आहे. त्यासंबंधीची सूचना इथे आली.

भविष्यात यावर वाचन व विचार करून काही लिहिता येईल

एक सर्वांगसुंदर अंक प्रकाशित केल्याबद्दल येथील संपादक व प्रशासक यांचे आभार !

कुमार१'s picture

18 Nov 2018 - 2:28 pm | कुमार१

चर्चेत सहभागी सर्वांचे आभार.
दिवाळी अंकासाठी एखाद्या औषधाबद्दल लिहावे की नाही या संभ्रमात होतो कारण सणाचे दरम्यान वाचकांना आजाराची चर्चा नको वाटते. तरीपण धाडस करून लिहिले. तुम्हा सर्वांच्या येथील सहभागाने त्याचे चीज झाले असे वाटते.

ऍस्पिरिन व इतर काही वेदनाशामक औषधांची तुलना या विषयातील वाचकांचे औत्सुक्य दिसले. मासिक पाळीतील वेदना हा समस्त स्रीजातीला पिडणारा विषय आहे. त्यासंबंधीची सूचना इथे आली.

भविष्यात यावर वाचन व विचार करून काही लिहिता येईल

एक सर्वांगसुंदर अंक प्रकाशित केल्याबद्दल येथील संपादक व प्रशासक यांचे आभार !

charming atheist's picture

23 Nov 2018 - 6:23 am | charming atheist

aspirin हे NSAID आहे असे तुम्ही म्हणालात. सूज येणे हे टिश्यु रिपेरींगचे काम चालू असण्याचे लक्षण आहे . जर सूज कमी केली तर हिलिंग प्रोसेस लांबली जाऊ शकते का? Delayed tissue healing?
जसे टॉपिकल डिक्लोफिनॅक आहे तसे टॉपिकल ॲस्पिरीन स्प्रे वगैरे असतो का?

कुमार१'s picture

23 Nov 2018 - 8:31 am | कुमार१

१. जर सूज कमी केली तर हिलिंग प्रोसेस लांबली जाऊ शकते का?>>>>>

दाह प्रक्रिया हा शरीराच्या प्रतिकाराचाच भाग आहे. पण काही वेळेस त्याची पातळी इतकी होते की ते रुग्णास असह्य होते. म्हणून ती औषध देऊन नियंत्रित करावी लागते. अन्यथा “दाह हा शरीर प्रतिकारच आहे ना, मग शांत बसा” हा दृष्टीकोन ठेवल्यास रुग्ण वेदनेने बोंब मारेल, जे हितावह नाही.
कुठलाही आजार हा आपल्या प्रतिकारशक्तीनेच बरा होतो; औषधे फक्त लक्षणे सुसह्य करतात.

२. Methyl salicylate हे ऍस्पिरिनच्या कुळातले औषध अनेक वेदनाशामक मलमांत असते. ही मलमे वरून चोळतात.

वन's picture

23 Nov 2018 - 2:02 pm | वन

दाह हा शरीर प्रतिकारच आहे ना, मग शांत बसा” हा दृष्टीकोन ठेवल्यास रुग्ण वेदनेने बोंब मारेल, जे हितावह नाही.>>>
डॉक्टर, हा मुद्दा सही. औषधाची उपयुक्तता आता नीट कळाली.

सुमीत भातखंडे's picture

23 Nov 2018 - 6:57 pm | सुमीत भातखंडे

अतिशय माहितीपूर्ण लेख

प्रचारात होते.
१. माझ्या लहानपणी माहीम येथील डॉ. भेंडे एमबीबीएस हे आमचे फॅमिली डॉ. होते. ते दाढदुखीवर अ‍ॅस्पिरीनची गोळी कुटून दाढेवर ठेवायला सांगत आणि नंतर दाताच्या डो. कडे जायला सांगत. त्यामुळे बराच उतार मिळत असे. ..... स्वानुभव.

२. वरील लोकल अ‍ॅक्शनप्रमाणेच आमच्या मालवणनजीकच्या गावातले डॉ. विंचूदंशावर देखील इतर औषधोपचारांबरोबर अ‍ॅस्पिरीनचे कूट दंशस्थानी ठेवायला सांगत. मला विंचू कधी चावला नाही त्यामुळे हा अनुभव नाही. औषधशास्त्रानुसार बरोबर की चूक ठाऊक नाही.

कुमार१'s picture

24 Nov 2018 - 7:54 am | कुमार१

रोचक आहे. हेच तत्व ‘पाण्यात विरघळणारी ऍस्पिरिन’ करताना वापरले आहे. अशी गोळी आपण ती तोंडात ठेवून न घेता आधी पाण्यात विरघळवतो. मग ते पाणी पितो. त्याने शोषण जलद होते.

सुमीत, आभार. बरेच दिवसांनी तुमची भेट झाल्याने आनंद झाला.

कुमार१'s picture

7 Jan 2020 - 10:51 am | कुमार१

साध्या वाटणाऱ्या पण बहुगुणी ऍस्पिरीनवरचे जागतिक संशोधन सतत चालू आहे. अलीकडे सुमारे दीड लाख रुग्णांवर त्याचे प्रयोग करून असे निष्कर्ष हाती आले आहेत:

१. पचनसंस्थेच्या ( विशेषतः मोठे आतडे) कर्करोगात जर ऍस्पिरीनचे पूरक उपचार चालू असतील, तर या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण बऱ्यापैकी कमी होते.

२. तीव्र डोकेदुखीच्या (migraine) रुग्णांना देखील या औषधाचा उपयोग होतो. या आजाराचे वारंवार attacks कमी करण्यातही ऍस्पिरीनचा चांगला उपयोग होत आहे.

सुधीर कांदळकर's picture

8 Jan 2020 - 6:48 am | सुधीर कांदळकर

हे आपल्याकडे पूर्वीपासूनच (अर्थातच डॉक्टरी सल्ल्याशिवाय) तात्पुरता उपाय म्हणून अ‍ॅस्पिरीन घेत आलेत. आणखी एक गंमत. मुंबईत, कोकणात कित्येक अर्धशिशीग्रस्त तात्पुरता उपाय म्हणून अ‍ॅस्पिरीनबरोबर जिलेबी पण खातात. हा गावठी वैदूंनी शोध लावलेला निरुपद्रवी उपचार असावा. आमच्या एका मित्राची आम्ही यावरून यथेच्छ टिंगल करीत असू. असे 'गोड' औषधविरहित उपाय प्रत्येक रोगावर शास्त्रीय रीतीने संशोधनातून निघाले तर मज्जा येईल.

कुमार१'s picture

8 Jan 2020 - 7:47 am | कुमार१

असे 'गोड' औषधविरहित उपाय प्रत्येक रोगावर शास्त्रीय रीतीने संशोधनातून निघाले तर मज्जा येईल.

>>>
अगदी !

कुमार१'s picture

29 May 2020 - 10:03 am | कुमार१

हे बहुगुणी औषध सध्या पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले आहे. सध्या जगभर कोविडने घातलेला धुमाकूळ आपण जाणतोच.

ऍस्पिरिनचे पुढील गुणधर्म सध्या लक्षात आलेले आहेत:

१. विषाणूची पेशींमधली वाढ रोखणे, आणि
२. विषाणूमुळे फुफ्फुसांना होणारी इजा कमी करणे.

त्या दृष्टीने अधिकृत रुग्णप्रयोग चालू झालेले आहेत. पुढील संशोधनाअंती यावर अधिक माहिती मिळेल.