११९ वर्षांचा वेदनारहित प्रवास

Primary tabs

कुमार१'s picture
कुमार१ in दिवाळी अंक
6 Nov 2018 - 12:00 am

H

११९ वर्षांचा वेदनारहित प्रवास

“डोकेदुखी? अंगदुखी? त्यामुळे अगदी बेजार झाला आहात? मग एक अ‍ॅस्पिरीन घ्या अन या त्रासापासून लगेच मुक्ती मिळवा, ढँ ट ढँण... !” यासारख्या अनेक माध्यमांतील जाहिरातींनी गेल्या कित्येक वर्षांपासून आपल्या मनावर गारूड केले आहे. मला खातरी आहे की आपल्यातील बहुतेकांनी ही गोळी आयुष्यात कधी ना कधी नक्की घेतली आहे. अ‍ॅस्पिरीनयुक्त अनेक औषधी गोळ्या औषध-दुकानात कुणालाही अगदी सहज (ओव्हर द काउंटर) मिळतात. अ‍ॅस्पिरीनचा तात्पुरता वेदनाशामक आणि तापविरोधी गुणधर्म यामुळे रुग्णास त्याने काहीसे बरे वाटते. अ‍ॅस्पिरीन हे आधुनिक वैद्यकाच्या इतिहासातील एक मूलभूत आणि आश्चर्यकारक औषध (wonder drug) आहे. आज त्याच्या गुणधर्माची कित्येक नवी औषधे उपलब्ध असतानाही त्याने बाजारातील आपले स्थान टिकवून ठेवले आहे यात शंका नाही. अंगदुखी व तापाखेरीज हृदयविकार आणि अन्य काही आजारांतही त्याची उपयुक्तता सिद्ध झालेली आहे. अशा या वलयांकित औषधाचा शोध, त्याचे उपयोग, दुष्परिणाम आणि त्याबद्दलचे नवे संशोधन या सर्वांचा या लेखात आढावा घेत आहे.

अ‍ॅस्पिरीनचे रासायनिक नाव Acetyl salicylic acid असे आहे.

अ‍ॅस्पिरीनचा शोध:
अनेक आजारांचे एक महत्त्वाचे लक्षण असते ते म्हणजे वेदना. तिच्या तीव्रतेनुसार रुग्ण कमी-अधिक अस्वस्थ असतो. त्यामुळे वेदनाशामक औषधांचा शोध ही वैद्यकातील फार प्राचीन गरज होती.
Salicylic acidच्या वेदनाशामक उपयोगाची पहिली नोंद सुमारे ४००० वर्षांपूर्वी सुमेरिअन संस्कृतीत झालेली आढळते. हे आम्ल अनेक झाडांच्या खोडात असते. त्यात प्रामुख्याने ‘विलो’ या झाडाचा समावेश आहे. हेच ते झाड, ज्यापासून क्रिकेटची बॅट बनवली जाते. पुढे चिनी व ग्रीक संस्कृतीमध्येही वेदना व तापनिवारणासाठी त्याचा वापर केला जाई.
* विलोचे झाड (चित्र):
pict

त्यानंतरचा आधुनिक वैद्यकाचे पितामह Hippocrates यांनी त्याचा महत्त्वाचा वापर केला. ते रुग्णांना विलो झाडाचे खोड चघळण्यास देत. तसेच स्त्रियांच्या प्रसूतिवेदना कमी होण्यासाठी या खोडापासून केलेला चहा त्यांना पिण्यास देत असत.
नंतर १८व्या शतकाच्या उत्तरार्धात अ‍ॅस्पिरीनचा वापर थंडी वाजून ताप येणाऱ्या रुग्णांवर केला गेला. पुढे एक शतकानंतर विलोच्या खोडाच्या पावडरीचा प्रयोग rheumatismसाठी केला गेला आणि अशा रुग्णांची सांधेदुखी व ताप त्यामुळे कमी झाला.
यापुढील टप्प्यात विलोपासून पिवळ्या रंगाचा एक पदार्थ वेगळा करण्यात यश आले आणि त्याला Salicin हे विलोचे लॅटिन नाव दिले गेले. पुढे Salicin हे शुद्ध स्फटिक स्वरूपात तयार केले गेले आणि मग जर्मनीतील एका कंपनीने Salicylic acidचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू केले. आता त्याचा रुग्णांसाठी सर्रास वापर होऊ लागला. या रुग्णांना त्याचा गुण आला खरा, पण त्याचबरोबर खूप उलट्याही होत. हा अर्थातच औषधाचा दुष्परिणाम होता. त्यावर मात करता आली तरच हे औषध रुग्णांसाठी वरदान ठरणार होते.

मग जर्मनीतील ‘बायर’ कंपनीने यात विशेष रस घेतला. त्याकामी Felix Hoffmann या तंत्रज्ञाची निवड करण्यात आली. खुद्द त्याच्या वडिलांना खूप सांधेदुखीचा त्रास असल्याने त्याने या कामात अगदी जातीने लक्ष घातले. मग खूप विचारांती त्याने Salicylic acid च्या रेणूत एक रासायनिक बदल केला. तो म्हणजे त्यात Acetyl group घालून Acetylsalicylic acid हे नवे रसायन तयार केले. मग या नव्या औषधाचे रुग्णांवर बरेच प्रयोग झाले. आता त्यामुळे उलट्या होण्याचे प्रमाण खूप कमी झाल्याचे दिसले. अखेर या औषधाच्या सर्व चाचण्या पूर्ण होऊन मार्च १८९९मध्ये ‘बायर’ने ‘अ‍ॅस्पिरीन’ या व्यापारी नावाने त्याची रीतसर नोंदणी केली. वेदनाशामक औषधांच्या इतिहासातील हा सुवर्णक्षण म्हटला पाहिजे!

pict
(Felix Hoffmann)

या मूलभूत औषधाच्या शोधासाठी अनेकांकडून समांतर संशोधन चालू होते. त्यामुळे हा शोध नक्की कोणी लावला याबाबत काही प्रवाद आहेत.
आता ही कंपनी दवाखान्यांना व रुग्णालयांना अ‍ॅस्पिरीनची पांढरी पावडर पुरवू लागली. ‘अ‍ॅस्पिरीन’ शब्दाची व्युत्पत्ती रोचक आहे:
A = acetyl,
Spiraea हे विलो झाडाच्या गटाचे शास्त्रीय नाव आणि
in हा अंत्य प्रत्यय त्याकाळी औषधी नावांना लावला जाई.

pict

ही औषधी पावडर आता मोठ्या प्रमाणावर वापरात आली. मात्र रुग्णांना ती पुडीत बांधून देणे हे तसे कटकटीचे वाटे. मग वर्षभरातच कंपनीने अ‍ॅस्पिरीनची गोळी तयार केली. त्यामुळे त्याची लोकप्रियता आणखीनच वाढली. किरकोळ अंगदुखीसाठी कुणालाच डॉक्टरकडे जायला नको वाटते. त्या दृष्टीने ही गोळी डॉक्टरांच्या चिठ्ठीविना उपलब्ध होणे आवश्यक होते. मग तिला या औषध नियमातून मुक्त करण्यात आले. १९१५पासून अ‍ॅस्पिरीन हे औषध दुकानात कुणालाही सहज (OTC) मिळू लागले. किंबहुना OTC हा शब्दप्रयोग तेव्हापासून रूढ झाला. त्यानंतर आजतागायत या गोळीने बहुतेक कुटुंबांत औषधांच्या घरगुती बटव्यात स्थान मिळवले आहे.

आता जरा अ‍ॅस्पिरीनचा औषधी गुणधर्म व्यवस्थित समजावून घेऊ. ते मुख्यतः वेदनाशामक आहे आणि काही अंशी तापविरोधी. जेव्हा एखाद्याला जंतुसंसर्ग अथवा कुठलीही इजा होते, तेव्हा शरीरपेशी त्याचा प्रतिकार करतात. या प्रतिकाराला दाह (inflammation) असे म्हणतात. या दाह-प्रक्रियेत पेशींत अनेक रसायने सोडली जातात. त्यांच्यामुळे मग रुग्णास वेदना व ताप ही लक्षणे जाणवतात. ती कमी करण्यासाठी ही दाह-प्रक्रिया नियंत्रित करावी लागते. अ‍ॅस्पिरीन नेमके हेच काम (anti inflammatory)करते. आता सूक्ष्म पातळीवर हे नेमके कसे होते हे जाणून घेणे ही संशोधनातील पुढची पायरी होती. त्या दृष्टीने संशोधकांचे अथक प्रयत्न चालू होते.

ही उकल व्हायला १९७१ साल उजाडावे लागले.

वर उल्लेखिलेल्या पेशींतल्या दाह-प्रक्रियेत पेशींत जी रसायने सोडली जातात, त्यापैकी एक प्रमुख म्हणजे Prostaglandins. त्यांच्यामुळेच वेदना जाणवते. अशा वेळेस जर रुग्णास अ‍ॅस्पिरीन दिले, तर ते या रसायनांच्या निर्मितीत अडथळा आणते. परिणामी दाह कमी होऊन वेदनेपासून आराम मिळतो. अत्यंत मूलभूत स्वरूपाचे हे संशोधन होते. म्हणून कालांतराने त्यासाठी नोबेल परितोषिक दिले गेले.

एव्हाना अ‍ॅस्पिरीन हे वेदनाशामक औषध म्हणून प्रस्थापित झाले होते. तरीही त्यावरील संशोधन अद्याप चालूच होते. त्यातून त्याच्या आणखी एका पैलूचा शोध लागला. हा पूर्णपणे वेगळ्या संदर्भात होता. आपल्या रक्तात बिम्बिका या वैशिष्ट्यपूर्ण पेशी (platelets) असतात. जेव्हा आपल्याला एखादी जखम होते, तेव्हा रक्तस्राव होतो आणि थोड्याच वेळात तो थांबवण्याची नैसर्गिक प्रक्रिया सुरू होते. या प्रक्रियेत बिम्बिकांमध्ये Thromboxane हे रसायन तयार होते आणि ते या पेशींना घट्ट एकत्र आणते. एक प्रकारे त्यांचे ‘बूच’ तयार होते आणि ते जखमेला ‘सील’ करते. इथे एक महत्त्वाचा मुद्दा ध्यानात घ्यावा. जेव्हा जखमेतून रक्त वाहते तेव्हाच हे ‘बूच’ तयार झाले पाहिजे. परंतु, या बिम्बिकांची एक गंमत आहे. एरवीही जेव्हा त्या रक्तप्रवाहात असतात, तेव्हासुद्धा त्यांच्यात एकत्र येऊन चिकटण्याचा गुण असतो. जर का हे नेहमीच्या रक्तप्रवाहात होऊ लागले, तर मात्र आफत ओढवेल. कारण आता त्यांची गुठळी तयार झाली तर त्यामुळे रक्तवाहिनीत अडथळा होईल. त्याचे परिणाम अर्थातच गंभीर असतील. अर्थात असे होऊ न देण्याची नैसर्गिक यंत्रणा रक्तवाहिन्यांत असते. त्यांच्या पेशींतून असे एक रसायन सोडले जाते, ज्यामुळे बिम्बिका एकत्र येऊ शकत नाहीत.

काही रुग्णांत मात्र हा नैसर्गिक समतोल बिघडतो आणि बिम्बिका विनाकारण एकत्र येऊन चिकटण्याची प्रक्रिया जास्तच होऊ लागते. परिणामी रक्तवाहिन्यांत गुठळ्या होउन रक्तप्रवाहास अडथळा होतो. जर ही प्रक्रिया कॉरोनरी वाहिनीत झाली, तर त्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो. तर मेंदूच्या रक्तवाहिन्यातील अडथळ्याने Strokeचा आजार होतो. अशा रुग्णांवर उपचार करताना बिम्बिका एकत्र येण्याला विरोध करणारी औषधे देतात. त्यामध्ये अ‍ॅस्पिरीनचा समावेश आहे. त्याचे दीर्घकालीन उपचार या रुग्णांसाठी लाभदायी असतात. अ‍ॅस्पिरीनच्या इतिहासातील हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरला. त्यामुळे आता ते निव्वळ किरकोळ अंगदुखीवरचे औषध न राहता एका ‘वरच्या’ पातळीवरचे औषध म्हणून मान्यता पावले. आता रक्त- गुठळीने होणाऱ्या ह्रदयविकाराच्या आणि मेंदूविकाराच्या रुग्णांसाठी ते प्रतिबंध आणि उपचार अशा दोन्ही आघाड्यांवर सररास वापरले जाते.

हृदयविकाराच्या प्रतिबंधात्मक वापराबद्दल मात्र तज्ज्ञांमध्ये काही मतभेद आहेत. या संदर्भात रुग्णांचे दोन गट पडतात:
१. ज्यांना हा विकार होण्याचा धोका अधिक संभवतो - यात आनुवंशिकता, मधुमेह, रक्तदाब व लठ्ठपणा हे घटक येतात.
२. ज्यांना विकाराचा प्रत्यक्ष एक झटका येऊन गेलेला आहे.

यातील दुसऱ्या गटातील रुग्णांना पुढचा झटका येऊ नये म्हणून अ‍ॅस्पिरीनचा उपयोग बऱ्यापैकी होतो. परंतु, पहिल्या प्रकारच्या रुग्णांना ते झटका न येण्यासाठी कितपत उपयुक्त आहे यावर अलीकडे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. किंबहुना यावर वैद्यक विश्वात खडाजंगी चालू आहे. विशेषतः सत्तरी ओलांडलेल्या लोकांना ते न देण्याची सूचना पुढे आली आहे. एखाद्या औषधाचा प्रतिबंधात्मक वापर करताना त्याच्या दीर्घकाळ वापराने होणाऱ्या दुष्परिणामांकडेही लक्ष द्यावे लागते. तेव्हा अपेक्षित फायदा आणि संभाव्य धोका यांचा तुलनात्मक विचार करून निर्णय घ्यावा लागतो. त्यामुळे रुग्णतपासणीनुसार हा निर्णय वेगवेगळा असतो.
एव्हाना आपण अ‍ॅस्पिरीनची उपयुक्तता पहिली. वैद्यकात त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. पण हेही लक्षात घेतले पाहिजे की ते एक आम्ल आहे आणि त्याचे काही दुष्परिणामदेखील होतात. त्याबद्दल आता माहिती घेऊ.

दुष्परिणाम:
वर आपण पहिले की मूळ Salicylic acid तर जठराम्लता खूपच वाढवायचे. अ‍ॅस्पिरीन ही जरी त्याची सुधारित आवृत्ती असली, तरी त्यानेही काही प्रमाणात जठराम्लता वाढते. त्यामुळे रुग्णास मळमळ व तोंड आंबट होणे हा त्रास कमीअधिक प्रमाणात होतो. काहींना उलट्या होऊ शकतात. अशा रुग्णांना जर अ‍ॅस्पिरीन दीर्घकाळ घ्यावी लागली तर जठराचा वा आतड्यांचा ulcer आणि त्यानंतर रक्तस्रावदेखील होऊ शकतो.
काही लोकांना या औषधाची allergy असू शकते. त्यांना त्यामुळे अंगावर पुरळ वा गांधी उठू शकतात. तर काहींना श्वासनलिका आकुंचनाचा त्रास होतो. त्यामुळे जरी हे औषध OTC मिळणारे असले, तरी ते नेहमी वैद्यकीय सल्ल्यानेच घ्यावे, हे बरे !
विशेषतः पोटाचे अल्सर, गाऊट, यकृताचे आजार आणि रक्तस्राव होणाऱ्या रुग्णांनी अ‍ॅस्पिरीन टाळले पाहिजे. अतिरिक्त मद्यपानानंतर ते घेणे धोक्याचे आहे (hangoverमुळे जे डोके दुखते, त्यावर हा उपाय नाही!).

लहान मुलांच्या बाबतीत तर ते चुकूनही वैद्यकीय सल्ल्याशिवाय घेऊ नये. मुलांत विषाणू संसर्गामुळे ‘फ्लू’सारखे आजार वारंवार होतात आणि त्यात तापही येतो. अशा वेळेस अ‍ॅस्पिरीन कटाक्षाने घेऊ नये. अन्यथा त्यातून आजाराची गुंतागुंत वाढते आणि मेंदूस व यकृतास गंभीर इजा होते.
गरोदर स्त्रियांनीदेखील ते दीर्घकाळ अथवा मोठ्या डोसमध्ये घेऊ नये. इथेही वैद्यकीय सल्ला अत्यावश्यक.

अ‍ॅस्पिरीन हे वेदना, ताप आणि विशिष्ट हृदयविकार आणि मेंदूविकार यासाठी वापरले जाणारे औषध म्हणून विसाव्या शतकात चांगलेच रुळले आहे. अन्य काही गंभीर आजारांत त्याचा वापर करता येईल का, यावर चालू शतकाच्या गेल्या दोन दशकांत तुफान संशोधन होत आहे. त्यापैकी दोन महत्त्वाचे आजार म्हणजे कर्करोग आणि अल्झायमर आजार. विशेषतः मोठ्या आतड्याच्या कर्करोगाबाबत खूप संशोधन झाले आहे. त्याचा आढावा आता घेतो.

अ‍ॅस्पिरीन व आतड्याचा कर्करोग:
पन्नाशीनंतर सतावणाऱ्या कर्करोगांत हा एक महत्त्वाचा आणि गंभीर आजार आहे. त्यामुळे त्याच्या प्रतिबंधावर बरेच लक्ष केंद्रित झालेले आहे. या रोगाचा धोका अधिक संभवणाऱ्या लोकांना अ‍ॅस्पिरीन कमी डोसमध्ये दीर्घकाळ दिल्यास रोगप्रतिबंध होऊ शकतो, असे गृहीतक आहे. यासंबंधीचे अनेक प्रयोग जगभरात झाले आहेत. ५०–५९ या वयोगटांतील लोकांना जर १० वर्षे सलग अ‍ॅस्पिरीन दिले, तर रोगप्रतिबंध होऊ शकेल असे काही संशोधकांना वाटते. तसेच प्रत्यक्ष हा रोग झालेल्या रुग्णांना जरी ते देत राहिले, तरी या पूरक उपचाराने त्यांचा जगण्याचा कालावधी वाढू शकेल असेही काहींचे मत आहे.

“कर्करोगावर अ‍ॅस्पिरीन? कसे काय बुवा?” हा प्रश्न सामान्यांना तसा बुचकळ्यात टाकणारा आहे. या संदर्भात ते नक्की कसे काम करते हे अद्याप पुरेसे स्पष्ट झालेले नाही. ती प्रक्रिया गुंतागुंतीची आहे. कर्करोगाच्या पेशींचा शरीराच्या प्रतिबंधक यंत्रणेकडूनच नाश करवणे, अशी काहीशी ती क्रिया आहे. अ‍ॅस्पिरीनच्या या उपयुक्ततेबाबत संशोधकांत अद्याप एकवाक्यता नाही. एखादी वैद्यक संघटना त्याचा हिरिरीने पुरस्कार करतेय, तर दुसरी एखादी त्याचा तितकाच विरोध करतेय. सध्या याबाबतचा पुरेसा पुरावा नसल्याने ही स्थिती आहे. तसेच दीर्घकाळ अ‍ॅस्पिरीन दिल्याने आतड्यांत रक्तस्राव होऊ शकतो, हाही मुद्दा दुर्लक्षिता येत नाही. भविष्यातील संशोधन यावर अधिक प्रकाश टाकेल. अ‍ॅस्पिरीनच्या सखोल आणि व्यापक संशोधनासाठी आंतरराष्ट्रीय अ‍ॅस्पिरीन ‘फाउंडेशन’ची स्थापना झालेली आहे. यावरून अ‍ॅस्पिरीनचे वैद्यकातील महत्त्व अधोरेखित होते.

‘विलो’चे खोड चघळण्यापासून या औषधाचा ऐतिहासिक प्रवास सुरू झाला. आज अ‍ॅस्पिरीन विविध प्रकारच्या गोळ्यांच्या आकर्षक रूपात उपलब्ध आहे. अचंबित करणारे हे वैविध्यपूर्ण प्रकार असे आहेत -
१. साधी गोळी
२. पाण्यात लगेच विरघळणारी
३. चघळण्याची गोळी व च्युइंग गम
४. लेपित (coated) गोळी
५. शरीरात हळूहळू विघटित होणारी आणि
६. दीर्घकाळ प्रभाव टिकणारी कॅप्सूल

pict

रुग्णाचा आजार आणि वैद्यकीय सल्ल्यानुसार यांपैकी योग्य त्या गोळीची निवड केली जाते. अर्थातच आजारानुसार तिचे ‘डोस’ वेगवेगळे असतात. गोळ्यांचे काही प्रकार हे OTC मिळतात, तर अन्य काहींसाठी (नियमानुसार) डॉक्टरांची चिठ्ठी आवश्यक असते. हे औषध दीर्घकाळ स्वतःच्या मर्जीने कधीही घेऊ नये. त्यासाठी वैद्यकीय सल्ला आवश्यकच. तसेच हृदयविकाराच्या व मेंदूविकाराच्या ज्या रुग्णांना अ‍ॅस्पिरीनचे उपचार चालू आहेत, त्यांनी कधीही स्वतःच्या मनाने ते बंद करू नयेत. गोळी थांबवणे अथवा डोसचे फेरफार करणे हा सर्वस्वी डॉक्टरांचा अधिकार आहे.
अ‍ॅस्पिरीन हे Salicylates या कुळातील औषध आहे. त्याच प्रकारातील एक रसायन हे विविध वेदनाशामक मलमांच्या रूपात उपलब्ध असते. अंगदुखी, सांधेदुखी इ.साठी बरेचदा अशी मलमे त्वचेवरून चोळण्यासाठी वापरतात.

......
एक सामान्य रसायन असलेले अ‍ॅस्पिरीन हे आज कुठल्याही स्वामित्वहक्कापासून मुक्त आणि सहज उपलब्ध असलेले औषध आहे. पुन्हा बऱ्यापैकी स्वस्त आणि जगभरात उपलब्ध. वर उल्लेखिलेल्या गंभीर आजारांत जर ते भविष्यात खरोखर उपयुक्त ठरले, तर ते आपल्यासाठी वरदान असेल. अनेक संशोधक त्या बाबतीत आशावादी आहेत. या पिटुकल्या गोळीचा एखाद्या जादूच्या कांडीप्रमाणे अनेक आजारांत उपयोग व्हावा असे त्यांना मनोमन वाटते. अशा या बहुमूल्य संशोधनास मी मनापासून शुभेच्छा देऊन थांबतो.
****************************************
लेखातील सर्व चित्रे जालावरून साभार.

H

दिवाळी अंक २०१८तंत्रज्ञान

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

6 Nov 2018 - 11:04 am | कुमार१

सुधारणा झाली आहे.
दिवाळी शुभेच्छा !

वन's picture

6 Nov 2018 - 12:28 pm | वन

छान लेख. विलो झाडाची रंजक माहिती.

अ‍ॅस्पिरीन व क्रोसिन ही नेहमीची OTC औषधे आहेत. त्यापैकी नेमके कोणते कधी वापरायचे ते कळेल का?

कुमार१'s picture

6 Nov 2018 - 12:44 pm | कुमार१

धन्यवाद.

अ‍ॅस्पिरीन हे मुख्यतः वेदनाशामक आणि कमी प्रमाणात तापविरोधी आहे.
तर क्रोसिनचे याच्या बरोबर उलट आहे. फक्त ताप आला असेल तर क्रोसिन घेतात.

टर्मीनेटर's picture

6 Nov 2018 - 3:00 pm | टर्मीनेटर

फारच छान माहितीपूर्ण लेख.

अशा या बहुमूल्य संशोधनास मी मनापासून शुभेच्छा देऊन थांबतो.

+१
तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

सुधीर कांदळकर's picture

6 Nov 2018 - 4:15 pm | सुधीर कांदळकर

अ‍ॅस्पिरीनच्या गोळ्या बरीच वर्षे कुटल्या पण ते शरीरात वेदनाशामन कसे करते याची किंचित कल्पना आज आली. रक्तगुठळीचे अ‍ॅस्पिरीन कसे नियमन करते त्याचीही आजच थोडीफार कल्पना आली. अनेक, अनेक, धन्यवाद.

रच्याकने: अ‍ॅस्पिरीन फारच जलसंवेदनाशील आहे. अ‍ॅसिटाईल सॅलिसायलिक अ‍ॅसिडचे जलविश्लेषण होऊन सॅलिसायलिक अ‍ॅसिड निर्माण होते ते मूत्रपिंडांना घातक आहे आणि अ‍ॅस्पिरीनमधील फ्री सॅलिसायलिक अ‍ॅसिडवर फार्माकोपियात आणि विविध औषध नियमन कायद्यांत कडक नियंत्रणे आहेत. त्यामुळे मुंबईसारख्या आर्द्र हवामानात अ‍ॅस्पिरीनच्या गोळ्या बनवणे तसे किचकटच, पावसाळ्यात तर उत्पादक तज्ञांची परीक्षा पाहणारे ठरते.

कुमार१'s picture

6 Nov 2018 - 5:06 pm | कुमार१

पूरक माहिती व प्रोत्साहनाबद्दल आभार.
सर्वच प्रतिसादकांचे मनापासून आभार

मुक्त विहारि's picture

6 Nov 2018 - 4:35 pm | मुक्त विहारि

धन्यवाद.....

तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना दिवाळीच्या शुभेच्छा...

स्मिता.'s picture

6 Nov 2018 - 4:55 pm | स्मिता.

अ‍ॅस्पिरीनच्या वेदनाशमतेची महती आपण नेहमीच अनुभवतो, पण त्यामागचा इतिहास आता कळला.

पॅरासिटेमोल हे सुद्धा अ‍ॅस्पिरीनचे भाऊबंद रसायन आहे का? आमच्या घरी बहुदा पॅरासिटेमोल हे 'लाख दुखो की एक दवा' म्हणून वापरलं जातं, अर्थातच वय आणि वजन यांच्यानुसार सुरक्षित असलेल्या डोसनुसारच!

अ‍ॅस्पिरीन हे मुख्यतः वेदनाशामक आणि कमी प्रमाणात तापविरोधी आहे.

तर क्रोसिनचे याच्या बरोबर उलट आहे. फक्त ताप आला असेल तर क्रोसिन घेतात.

कुमार१'s picture

6 Nov 2018 - 5:17 pm | कुमार१

'पॅरासिटेमोल ' चे व्यापारी नाव क्रोसीन आहे.
धन्यवाद

गुल्लू दादा's picture

6 Nov 2018 - 5:22 pm | गुल्लू दादा

अतिशय आवडला आहे....लेखमाला येऊ द्या....वारंवार वापरात येणाऱ्या औषधांवर..☺

तुषार काळभोर's picture

6 Nov 2018 - 8:01 pm | तुषार काळभोर

घरच्या औषधांच्या डब्यात डिस्प्रिन, क्रोसिन, सेट्रीजीन, नेहमीच असतात.

मित्रहो's picture

6 Nov 2018 - 8:08 pm | मित्रहो

अस्पिरीन बद्दल बरीच माहीती मिळाली. सतत अॅस्पिरीन घेतल्याने किडनीचा त्रास होउ शकतो असे ऐकले होते पण तुमच्या लेखात तसे काही नाही. तेंव्हा ती माहीती ऐकीव असावी.

वरील सर्वांचे आभार.

एरवी निरोगी व्यक्तीत ऍस्पिरिन योग्य डोस मध्ये घेतल्यास सहसा मूत्रपिंडास इजा होत नाही. मात्र त्याचे खूप जास्त डोस अनेक वर्षे घेतल्यास इजा होऊ शकते.

मात्र ज्यांना आधीच दीर्घकालीन मूत्रपिंड विकार आहे त्यांना ते अत्यंत जपून दिले पाहिजे.

यशोधरा's picture

7 Nov 2018 - 9:05 am | यशोधरा

माहितीपूर्ण लेख.

मनिमौ's picture

9 Nov 2018 - 4:38 am | मनिमौ

रोज कानावर पडणार्या औषधाच्या मागची कथा आवडली

कुमार१'s picture

9 Nov 2018 - 8:30 am | कुमार१

यशोधरा व मनी मौ.
या सामान्य व सहज मिळणाऱ्या गोळीचे काही असामान्य उपयोग सर्वांना समजावेत हा लेखाचा उद्देश .

सविता००१'s picture

9 Nov 2018 - 10:32 am | सविता००१

खूप नवीन आणि अत्यंत उपयुक्त माहिती कळली. धन्यवाद

अनिंद्य's picture

9 Nov 2018 - 12:01 pm | अनिंद्य

@ कुमार१,

अतिपरिचयात अवज्ञा झालेल्या ऍस्पिरीनबद्दल छान माहिती मिळाली.

८०-९०च्या दशकात बूट्स कंपनीचे APC नामक औषध 'सब दुखों की एक दवा' पद्धतीने वापरल्या जायचे ते आठवले. (ऍस्पिरीन + पॅरासिटेमॉल + कॅफेन ?)

ऍस्पिरीन हे blood thiner म्हणूनही काम करते ना ?

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Nov 2018 - 1:09 pm | डॉ सुहास म्हात्रे

APC = Aspirin + phenacetin + caffeine

प्रथमतः अशी तयार काँबिनेशन्स आधुनिक वैद्यकात सहसा अमान्य असतात.

याशिवाय, Phenacetin मुळे मुत्रपिंडाला धोका पोहोचतो (kidney failure), त्यामुळे, APC वर भारतासह अनेक देशांत बंदी आहे.

अनिंद्य's picture

9 Nov 2018 - 8:18 pm | अनिंद्य

..... APC वर भारतासह अनेक देशांत बंदी आहे.....

आता असे असेल तर सर्वथा योग्यच. पण भारतात / महाराष्ट्रातच बूट्सनिर्मित APC १००० गोळ्यांच्या बरण्या भरभरून विकल्या जातांना पाहिले आहे.

वन's picture

10 Nov 2018 - 2:07 pm | वन

लहानपणी फ्यामिली डॉक्टर बऱ्याच गोळ्या कागदी पाकीटातून देत असत. मोठे झाल्याव कळले की त्यातल्या बऱ्याच गोळ्या या ‘Bombay Market’ या नावाने कुप्रसिद्ध होत्या. त्यात हे APC नक्की असावे.

सुबोध खरे's picture

10 Nov 2018 - 8:49 pm | सुबोध खरे

ए पी सी या औषधातील फेनासेटिन या द्रव्यामुळे मूत्रपिंडावर परिणाम होतो आणि त्यामुळे मूत्रमार्गाचा कर्करोगात वाढ झाल्याचे आढळले त्यामुळे त्यावर १९८३ साली अमेरिकेत बंदी घालण्यात आली. पुढच्या २ वर्षात हि बंदी भारतासह जगभर घालण्यात आली.

बॉम्बे मार्केट मधील औषधे लहान कंपन्या बनवत असत आणि त्यांना विपणनाचा(मार्केटिंग) खर्च परवडत नसल्याने त्या कंपन्या ती घाऊक विक्रेत्यांना विकत देत असत. आणि हे घाऊक विक्रेते ती थेट डॉक्टरांना विकत असत. यामुळे हि औषधे साधारण ब्रँडेड औषधांच्या १५ ते २० % किमतीत मिळत असत. कारण यात किरकोळ विक्रेते, केमिस्ट आणि जाहिरातबाजीचा खर्च पूर्ण वगळला जात असे.
(बॉम्बे मार्केट मध्ये मिळणाऱ्या औषधांना आता जेनेरिक औषधे म्हटले जाते.)

हि औषधे मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या मुळावर येत असल्याने त्यांनी आपल्या औषध विक्रेते ( मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह) यांच्या कडून सामान्य जनतेत मोठ्या प्रमाणावर त्या विरुद्ध दुष्प्रचार केला. ( उदा डॉक्टरांना यात भरपूर फायदा होतो, औषधे वाईट दर्जाची असतात इ इ).

याचा परिणाम म्हणून सर्व साधारण फॅमिली डॉक्टरांनी रुग्णांना औषधे स्वस्तात देणे बंद करून केवळ प्रिस्क्रिप्शन देणे चालू केले. यामुळे सामान्य माणसांच्या वैद्यकीय खर्चता मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. उदा. डॉक्टर गरज असेल तितक्याच दिवसांची औषधे देत असत आता पूर्ण स्ट्रीप घ्यावी लागते. मग दिवसात तीन वेळेस घ्यायचे औषध सुद्धा १० च्या स्ट्रीप मध्ये आले कि तीन दिवस घेतले कि १ गोळी फुकट जाते (फार्मा कंपनीचा १० % खप वाढला). पण कोणीतीही कंपनी दिवसात तीन वेळेस घ्यायचे औषध ९ गोळ्यांच्या स्ट्रीपमध्ये विकत नाही.

(जेनेरिक औषधे पुनरागमन करीत आहेत हि एक स्वागतार्ह गोष्ट आहे.)
असो

बऱ्याच सुरस आणि चमत्कारिक कथा आहेत.

विषयांतर नको म्हणून ते पुन्हा केंव्हा तरी.

याचा परिणाम म्हणून सर्व साधारण फॅमिली डॉक्टरांनी रुग्णांना औषधे स्वस्तात देणे बंद करून केवळ प्रिस्क्रिप्शन देणे चालू केले. >>>

जेव्हा फार्मसी शाखा विकसित नव्हती तेव्हा डॉक्टरनेच रुग्णास औषधे देणे हे ठीक होते. त्यावरूनच दवा’खाना’ हा शब्द ala असावा. जशी फार्मसी प्रगत झाली तसे औषध ‘देणे’ हे औषधविक्रेत्याचे काम ठरले. तेव्हा आता डॉक्टरने औषध फक्त लिहून द्यावे हेच योग्य आहे.

जेव्हा डॉक्टर रुग्णास पुडीत बांधून गोळ्या देतो तेव्हा त्या कसल्या आहेत हे रुग्णास काहीच कळत नाही. हे समजणे हा रुग्णाचा हक्क आहे. तो त्या पद्धतीत डावलला जातो.
डॉक्टरने जेनेरिक औषध लिहून द्यावे हे सर्वात उत्तम !

कुमार१'s picture

11 Nov 2018 - 10:32 am | कुमार१

वन, तुमचा मुद्दा बरोबर आहे.
प्रगत देशांत हे लवकर साध्य झाले. गरीब देशांत अशिक्षितपणा मुळे डॉक्टरनेच औषध देणे हा प्रकार अजूनही टिकून आहे.
पुन्हा डॉक्टरने फक्त औषधाची चिठ्ठी लिहून द्यायचे पैसे घ्यायचे हा मुद्दा गरीबी मुळे पचनी पडत नाही.

सुबोध खरे's picture

12 Nov 2018 - 11:19 am | सुबोध खरे

जेव्हा डॉक्टर रुग्णास पुडीत बांधून गोळ्या देतो तेव्हा त्या कसल्या आहेत हे रुग्णास काहीच कळत नाही. हे समजणे हा रुग्णाचा हक्क आहे.
हक्क नक्कीच आहे. आमच्या दवाखान्यात आम्ही जी औषधे देतो ती सर्व डोस कसा घ्यायचा तेही लिहून देतो आणि जी औषधे बाहेरून आणायची असतील तीही व्यवस्थित लिहून आणि रुग्णाला समजावून देतो. ज्याला साटे लोटे करायचे आहेत तो डॉक्टर स्वतः असे काही न करता केमिस्ट कडून सर्वात महाग औषध लिहून देतात किंवा महागड्या औषध कंपनीकडून भेटी घेतात हि वस्तुस्थिती आहे.

बाकी जे आपल्याला फार्मसी म्हणून अपेक्षित आहे त्यापैकी किती दुकानांत B PHARM झालेला फार्मसीस्ट २४ तास उपलब्ध आहे हा एक संशोधनाचा विषय आहे. बाकी १० वि नंतर २ वर्षाचा डी फार्म कोर्स केलेला केमिस्ट आणि १२ नंतर ४ वर्षे B PHARM झालेला फार्मसीस्ट यात जमीन अस्मानाचा फरक आहे हे आपल्याला मान्य असावे.
आज बहुतांश केमिस्ट च्या दुकानात फार्मसिस्ट हा केवळ "उरला सहीपुरता" हि स्थिती आहे. त्यामुळे बाहेरून औषधे आणायला प्रिस्क्रिप्शन दिले तरीही रुग्णाला औषध आणून दाखव असे सांगायला लागते.

आपण म्हणता त्या सर्व गोष्टी आदर्श आरोग्य व्यवस्थेत शक्य आहेत. आज पाश्चात्य देशात या सर्व गोष्टी होत आहेत पण त्यामुळे तेथे आरोग्याचा खर्च सामान्य सोडाच उच्च मध्यम वर्गाच्या आवाक्याच्या बाहेर गेला आहे.

कुमार१'s picture

9 Nov 2018 - 12:35 pm | कुमार१

APC नामक औषध >>>> होय, एकेकाळी हे बाजारात खूप खपे. परंतु हे तिघांचे मिश्रण अत्यंत अशास्त्रीय आहे. ही बाब आम्हाला औषधशास्त्र विषय शिकताना ठसवली होती.

ऍस्पिरीन हे blood thiner म्हणूनही काम करते ना ? >>>

‘थिनर’ हा तसा सामान्य शब्द आहे. अशा औषधांचे २ गटांत वर्गीकरण करतात:
१. बिम्बिका एकत्र येण्याला विरोध करणारी औषधे : यात अस्पीरिन येते.
२. रक्तगुठळ्या विरघळवणारी औषधे (anticoagulants) : यात heparin वगैरे येतात.

अभ्यासू प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Nov 2018 - 1:12 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्तं.

सर्वसामान्यांच्या हातात सहजपणे येणार्‍या (OTC), पण त्याबद्दल सर्वसामान्यांत सर्वसामान्यपणे अज्ञान असलेल्या एका अत्यंत गुणी औषधाची, अत्यंत रोचक व माहितीपूर्ण कर्मकहाणी !

अभ्या..'s picture

9 Nov 2018 - 2:32 pm | अभ्या..

जरी अ‍ॅस्परिन, आयब्युप्रोफेन आणि सल्फाची अ‍ॅलर्जी असली तरी लेख आवडला. मस्तच आणि माहितीपूर्ण.

डॉ सुहास, Phenacetin प्रकरण माझ्या विस्मरणात गेले होते. धन्यवाद, पूरक माहितीबद्दल.
अभ्या,
अ‍ॅलर्जी वाल्या त्या गोळ्या घेण्याची वेळच न येवो !

शैलेन्द्र's picture

9 Nov 2018 - 6:25 pm | शैलेन्द्र

वा , सुरेख विषयावर छान लिखाण,

अत्यंत कमी प्रमाणात रोज ऍस्पिरिन घेणे चांगले असा एक स्ट्रॉंग मतप्रवाह आढळतो.

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Nov 2018 - 9:15 pm | डॉ सुहास म्हात्रे

अत्यंत कमी प्रमाणात रोज ऍस्पिरिन घेणे चांगले असा एक स्ट्रॉंग मतप्रवाह आढळतो.
हे सरसकटपणे करणे धोकादायक ठरू शकते. यामध्ये बरेच जर-तर आहेत, म्हणून, आपल्या डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय रोज अ‍ॅस्पिरिन घेऊन नये.

खालील खात्रीलायक दुव्यात बरेच तपशील सापडतील...

https://www.mayoclinic.org/diseases-conditions/heart-disease/in-depth/da...

कुमार१'s picture

9 Nov 2018 - 9:10 pm | कुमार१

असे माझे मत.
धन्यवाद !

वरुण मोहिते's picture

10 Nov 2018 - 12:25 am | वरुण मोहिते

आणि प्रतिसाद वाचून ज्ञानात भर पडते. लिहीत राहा.

चामुंडराय's picture

10 Nov 2018 - 4:33 am | चामुंडराय

खूप छान माहिती डॉक्टर साहेब.

शरीरकें दर्द के लिये हि सगळी वेदनाशामक औषधे म्हणजे वरदानच म्हणावे लागेल.
परंतु मन के दर्द के लिये फक्त चपटी उपयोगी पडते का?

कुमार१'s picture

10 Nov 2018 - 8:47 am | कुमार१

वरुण व चामुंडराय. आपणा सर्वांचे सहभागाने चर्चा छान होत आहे.
परंतु मन के दर्द के लिये फक्त चपटी उपयोगी पडते का? >>>>

हा विषय मना इतकाच गहन आहे !

बांवरे's picture

10 Nov 2018 - 9:04 am | बांवरे

११९ वर्षांचा इतिहास !
चांगली माहिती कळाली, धन्यवा द कुमारेक !

राघवेंद्र's picture

10 Nov 2018 - 6:02 pm | राघवेंद्र

धन्यवाद कुमार खूप रोचक पद्धतीने माहिती सांगितली.

Nitin Palkar's picture

10 Nov 2018 - 7:30 pm | Nitin Palkar

अतिशय छान माहिती सामान्यांना समजणाऱ्या शब्दांत. तुमच्या लेखात सामान्यांकरता ज्या सावधगिरीच्या सूचना असतात त्यामुळे आजच्या काळातील गुगलीय डॉक्टरगिरी करणाऱ्यांना छानशी चपराक बसते. (मी स्वतः सुद्धा त्यामध्ये आहे).

कुमार१'s picture

10 Nov 2018 - 8:06 pm | कुमार१

धन्यवाद,
राघवेंद्र व नितीन.
या मूलभूत औषधाबद्दल लिहायचे अनेक दिवस मनात होते. या विशेषांकामुळे तो योग आला. वाचकांना आवडल्याने समाधान वाटले.

गुगलीय डॉक्टरगिरी करणाऱ्यांना >>> मस्त शब्दप्रयोग !

नूतन सावंत's picture

11 Nov 2018 - 3:41 pm | नूतन सावंत

माहितीपूर्ण व रोचक लेख.

निशाचर's picture

11 Nov 2018 - 4:56 pm | निशाचर

लेख आवडला.

महिलांच्या मासिक पाळीतील पोटदुखीसाठी ऍस्प्रीन उपयोगी नाही का? थोडे अवांतर, पण यावर काहीच उपाय नाही का? कितीतरी महिला ह्या त्रासाने त्रस्थ आहेत

कुमार१'s picture

11 Nov 2018 - 10:34 pm | कुमार१

या वेदनेसाठी ऍस्पिरिन तितकेसे उपयुक्त नसते. त्यापेक्षा Diclofenac , Fenamates या गटातील औषधे अधिक उपयुक्त आहेत.

अर्थात वैद्यकीय सल्ला आवश्यक.

मासिक पाळीतील पोटदुखीसाठीही एक वेगळा लेख लिहाल का?

कुमार१'s picture

12 Nov 2018 - 3:33 pm | कुमार१

विचार करतो.
संजय, दु वि , अभिप्रायाबद्दल आभार !

वन's picture

15 Nov 2018 - 11:57 am | वन

डॉक्टर, या विषया वर ही आपण लिहावे अशी विनंती आहे. खूप लोक याने त्रस्त आहेत आणि कुठले औषध घ्यावे याबाबत सगळा गोंधळ आहे

संजय पाटिल's picture

12 Nov 2018 - 12:29 pm | संजय पाटिल

माहितीपूर्ण लेख....
बर्‍याच गोष्टी नव्याने कळल्या!!

दुर्गविहारी's picture

12 Nov 2018 - 2:53 pm | दुर्गविहारी

उत्तम माहिती. मस्त धागा. बर्याच गोष्टी नव्याने समजल्या.

माझीही शॅम्पेन's picture

13 Nov 2018 - 8:12 pm | माझीही शॅम्पेन

नेहमी प्रमाणेच अत्यंत माहितीपूर्वक लेख , दिवाळीच्या शुभेच्छाही देतो :)