वक्तशीर..

आजी's picture
आजी in जनातलं, मनातलं
3 Feb 2020 - 5:31 pm

मी अतिशय वक्तशीर आहे. नोकरी करत असताना ऑफिसला मी अगदी वेळेवर जायची. इतकी की सगळेजण"तू काय ऑफिस झाडायला येतेस का?"अशी माझी चेष्टा करायचे.

मी ऑफिसात पोहोचायची तेव्हा कुणीही आलेलं नसायचं. माझी केबीनही साफ केलेली नसायची. टेबल पुसलेलं नसायचं. इतरांवर अवलंबून असलेली माझी कामं खोळंबायची. कँटीनमध्ये कॉफी,खाणं तयार नसायचं. एकूण मीच भोटम ठरायची.

कुणी मला पाच वाजता एखाद्या ठिकाणी बोलावलं तर मी पाचच्या ठोक्याला,नव्हे पाच दहा मिनिटं आधीच तिथं जाऊन पोहोचते. त्यासाठी घरातून कितीला निघायचं त्याचा मी हिशेब करते. आवरायला वीस मिनिटे, रीक्षापर्यंत जायला पाच मिनिटे, रीक्षा मिळायला वीस मिनिटे, रीक्षाचा प्रवास अंतर जितकं असेल तितकी मिनिटे, त्यानंतर त्या जागी जाण्यासाठी पाच मिनिटे. याप्रमाणे हिशेब करुन, पाचला पोहोचायचे असेल तर मी साडेतीनलाच आवरायला उठते. मला कुठेही अगदी डॉट वेळेवर जायला आवडतं. हे अगदी लहानपणापासूनचे संस्कार.

पण माझ्यासारखे वक्तशीर सगळेच असतात असे नाही. त्याचा मला मनस्ताप होतो. संताप होतो. उशीरा आलेल्या माणसाशी मी मोकळेपणाने बोलू शकत नाही.

एकदा मला एका नगरवाचनालयात भाषण देण्यासाठी बोलावलं होतं. मी वेळेआधीच जाऊन पोहोचले. साडेचारचं भाषण होतं. अपेक्षेएवढे श्रोते जमायला सव्वापाच वाजले. मी आयोजकांना म्हटलं, "आता भाषण सुरु करुयात". तर आयोजक म्हणाले, "वक्त्यानं नेहमीच थोडं उशीरा जावं, थोडी वाट पाहायला लावावी, म्हणजे वक्त्याचं महत्व वाढतं." (मी मनात म्हटलं, डोंबल!आलेले श्रोतेही वाट पाहून निघून गेले म्हणजे?माझीच फजिती!) शेवटी मी माझं महत्त्व वगैरे न वाढवता कार्यक्रम सुरु करायला आयोजकांना भाग पाडलं.

मी ज्यावेळी आकाशवाणीवर नोकरीला नव्हते तेव्हाची गोष्ट. मला एकदा आकाशवाणीवर भाषण देण्यासाठी बोलावलं.रेकॉर्डिंगची वेळ तीनची होती. मी पावणेतीनला मला बोलावणाऱ्या ऑफिसरच्या केबीनमध्ये हजर होते.ऑफिसर जागेवर नव्हते. चहा प्यायला गेले होते. बहुधा आसाममध्ये. कारण तीन वाजले,साडेतीन वाजले, चार वाजले. ऑफिसरचा पत्ता नाही. शेवटी त्याच्या टेबलावर मी येऊन, वाट पाहून गेल्याची चिठ्ठी ठेवून मी सरळ घरी परतले.

पुढे मी स्वतः आकाशवाणीवर नोकरी करायला लागले. मी वक्ता रेकॉर्डिंगला येण्याआधीच टेप इरेज करुन, फास्टफॉरवर्ड करुन(त्यावेळी कॉंप्युटर रेकॉर्डिंग नहतं. टेपवर रेकॉर्डिंग असायचं), क्यूशीट तयार करुन, (ड्यूरेशन सोडून) स्टुडिओ बुक करुन वक्त्याची वाट बघत असायची. वक्ता उशीरा आला तरी त्याचं ध्वनिमुद्रण अर्थातच करावं लागे पण तो वक्ता माझ्या मनातून उतरलेला असे.मात्र आकाशवाणीचे सर्व कार्यक्रम वेळेवरच सुरु होतात. आकाशवाणीवरुन लोक आपली घड्याळं लावतात.आकाशवाणीचे निमंत्रित श्रोत्यांसाठी असलेले रंगमंचीय कार्यक्रमही वेळेवर सुरु होतात.समोर कमी श्रोते असले तरी.

मी आमच्या सोसायटीच्या एका भिशीत आहे. तेवढीच चार बायकांची ओळख होते. मैत्री होते. एकदा काय झालं ,माझ्याचकडे भिशी होती. ती त्या वर्षीची पहिलीच भिशी होती.मी सगळ्यांना दोन दिवस आधी रिमाइंड केलं. तयारी केली. भिशी चार वाजता होती. पाच वाजले तरी एकही बाई आली नाही. शेवटी मी फोन केले. त्या म्हणाल्या, "अहो, आज अमावास्या आहे म्हणून आम्ही आलो नाही.आम्हांला वाटले तुमच्या लक्षात येईल."कपाळावर हात मारुन घेतला. मी म्हणजे प्रत्येक दिवस आणि प्रत्येक तिथी सारखीच मानणारी. अमावास्या अशुभ न मानणारी. पण लोकेच्छेपुढे आपलं काही चालत नाही. मी अजूनही त्या भिशीत जाते बरं का!बायका माझ्या वक्तशीरपणाशी ऍडजस्ट झाल्यात. त्या दुर्लक्ष करतात.

एकदा मला एका कुटुंबात "संगीत" कार्यक्रमासाठी चार वाजता बोलावलं होतं. मी गेले. बरोब्बर चार वाजता. मी गेले तर कामवालीनं दार उघडलं. ती फरशी पुसत होती. जिनं बोलावलं ती घरमालकीण बाहेर गेली होती. मी गेले त्या खोलीत जिचं लग्न ठरलंय ती मुलगी मेंदी लावत बसली होती. ती बैठिये म्हणाली. मी बैठक ठोकली.साडेचारला घरमालकीण आली.
उशीर झाल्याबद्दल, मला वाट पाहायला लागल्याबद्दल सॉरी बिरी काही नाही. बाकीच्या कुणी बायकाही आल्या नव्हत्या. मी विचारलं," ग्रुपपर आपने मेसेज भेजा था इसलिए आयी हुँ। आज संगीत है ना?" तिनं होकार दिला. त्यानंतर पावणेसहाला संगीत वाजवणाऱ्या बायका आणि आमच्या ग्रुपमधल्या इतर बायका सहा वाजता आल्या. खूप नटूनथटून. मी अगदीच साधी दिसत होते. मी साडेसहापर्यंत थांबले आणि सगळ्यांची माफी मागून घरी निघून आले.

एकदा असंच झालं. माझ्या बॉसची बदली झाली म्हणून मी त्यांना सपत्निक घरी बोलावलं. संध्याकाळी पाच वाजता. छान बेत केला. ओल्या नारळाच्या करंज्या,सुरळीच्या वड्या वगैरे. गिफ्टस् आणल्या. मी स्वतः तयार होऊन पाच वाजल्यापासून त्यांची वाट बघत बसले. तुम्हांला आश्चर्य वाटेल. पण ते दोघे रात्री ९वाजता आले.तेही मी फोन केल्यावर. आणखी एके ठिकाणी गेले होते तिथे वेळ लागला म्हणे! मी मुकाट्याने भात, आमटी, पोळी भाजी केली आणि करंज्या आणि वड्यांबरोबर त्यांना जेवायलाही वाढलं.

मी आणि माझी मैत्रीण इंदूरला गेलो होतो. तिथे मैत्रिणीच्या ओळखीचे एक पतीपत्नी होते.त्यांच्याकडे आम्हांला बोलावलं होतं चहाला.ट्रँफीकमुळे आणि नवीन गावात रस्ता चुकल्यामुळे आम्हांला दीडतास उशीर झाला. आम्हांला शरमल्यासारखं झालं.गयावया करत आम्ही माफी मागायला लागलो. ते शांतपणे म्हणाले,"अजी होता है।इतना परेशान होनेकी जरुरत नहीं। आरामसे कल आते। कोई दिक्कत नहीं! शांत हो जाईये।"

कल आते? एवढा उशीरही एखाद्याला चालू शकतो?

अलिकडे वयपरत्वे मी ताठर राहायच्याऐवजी लवचिक व्हायचं ठरवलंय. कुणी उशीरा आलं तर मी फारसं मनाला लावून घेत नाही. म्हणते, "जाने भी दो यारों.. बडे बडे शहरोंमें ऐसी छोटी छोटी बाते होती रहती हैं!" उशीरा का होईना पण भेटायला येणारा माणूस महत्त्वाचा.

जीवनमानविचारलेख

प्रतिक्रिया

वक्तशीर, व्यवस्थित, साधी राहणी, प्रामाणिकपण.. हे उत्तम गुण अनेक ठिकाणी विनोदाचे विषय ठरतात. आणि हे काही आत्ताचं नाही.. जुनंच आहे. पण ते असे का विनोदाचे विषय ठरतात हे पाह्यलं तर समजतं, जे टिंगल करतात त्यांना स्वतःला ते जमत नसल्याची लाज वाटत असते.. फक्त अशांची संख्या जास्त असल्यामुळे त्यांची टिंगल खपते. असो.

मला ना ते पुलंचं पुस्तक आहे ना गणगोत, त्यातला त्यांच्या सासर्‍यांचा त्यांनी सांगितलेला किस्सा फार आवडतो.
एका [सो कॉल्ड] महात्म्याचं दर्शन घ्यायला सकाळी सहापासून गेलेले ते, त्या न पटणारी अट न स्वीकारता, ५-६ तासांच्या झालेल्या कष्टप्रद फरपटीला बाजूला ठेवून, दर्शन न घेता तसेच वापस येतात. पुलंच्याच भाषेत सांगायचं तर, "त्यावेळी अप्पांच्या जागी असलेलं ते वज्र आम्हाला दिसलं!". किती सुंदर आहे, नाही? :-)

आपल्या वक्तशीरपणाबद्दल आपला आदर आणि कौतुक, दोन्हीही! :-)

कार्यक्रम वेळेवर होतच नाहीत. दोनतीन कामं घेऊन निघावं. दहा मिनिटे वाट पाहून दुसरीकडे जावं. एकच कार्यक्रम असल्यास मी जात नाही किंवा वेळेवर नसल्यास थांबत नाही.
काही नुकसान होत नाही. कार्यक्रम त्याच लायकीचे असतात.

समारंभाच्या हॉलवर रात्री नऊला साडेनऊला घंटी वाजवतात. कामगारांना स्वच्छता उरकून अकराला बाहेर पडायचं असतं. सकाळच्या समारंभाला तीनला हाकलतात.
एका ठिकाणी रात्री साडेनवाला एक खटारा गेटपाशी येऊन उभा राहिला. पावणेदहाला सर्व अन्न त्यात घालून समोर एका ठिकाणी भिकारी होते तिथे वाटण्यात आलं. काम खतम. जास्ती लाड नाहीत. वेळ म्हणजे वेळ.
विमान/ रेल्वेला वेळेवर कसे जातात हे लोक?

समीर वैद्य's picture

4 Feb 2020 - 5:40 am | समीर वैद्य

वेळेवर पोहोचणे ही माझी सवय आहे. 5 वाजता कोणी बोलावलं असेल तर 5/10 मिनिटे आधी पोहोचतो, पण समोरचा माणूस 5.30/5.45 ला येतो.... विचारावं तर म्हणतात रस्त्यात गर्दी खूप होती... लौकर का नाही निघालात विचारलं तर म्हणतात झाला आता उशीर, आता जीव घेणार का?
कधीतरी उशीर होत असेल तर ठीक आहे, पण प्रत्येक वेळी?
दुसऱ्यांच्या वेळेची कधीच किंमत नसते लोकांना....

विनिता००२'s picture

4 Feb 2020 - 10:16 am | विनिता००२

मी पण वक्तशीर आहे. उशीरा जात नाही आणी उशीरा येणारे आवडत नाहीत.
ह्याच कारणांस्तव साहित्यिक कार्यक्रमाला जाणे बंद केलेय, तीन तीन तास कोण वेळ वाया घालवेल!

छान लेख, आवडला.

कुमार१'s picture

4 Feb 2020 - 10:42 am | कुमार१

सहमत.
यावरुन पूर्वी च्या "आमची भारतीय प्रमाणवेळ" या लेखाची आठवण झाली:

विजुभाऊ's picture

4 Feb 2020 - 10:47 am | विजुभाऊ

वक्तशीर लोक मला आवडतात. मी स्वतः देखील वेळेवर जातो.
पण आपल्या इथे उशीर करण्यात काहीच चूक नाही असे मानणारे बरेच जण असतात.
एका नाटकाचा प्रयोग नाशीकला होता. एक जण कल्याणला रहाणारा होता. त्याला उशीर व्हायला नको म्हणून आम्ही तुला थेट कल्याण फाट्यावरून घेतो म्हणालो. दीड तास तिथे वाट पाहिल्यावर महाशय डुलत डुलत आईस्क्रीम खात खात रिक्षाने तेथे आले.
दुपारी एक चा शो होता त्या हिषेबाने पोहोचायलाच दोन वाजले. प्रेक्षकांचे तिकिटाचे पैसे परत द्यावे लागले .
त्या कलाकाराला पुन्हा नाटकात घ्यायचे धाडस करणार नाही

प्रकाश घाटपांडे's picture

4 Feb 2020 - 10:53 am | प्रकाश घाटपांडे

वेळ पाळता न आल्याचा अपराधगंड जर समोरच्याच्या चेहर्‍यावर दिसला तर मला बरे वाटते.

अनिंद्य's picture

4 Feb 2020 - 10:59 am | अनिंद्य

लेख फारच छान आहे, खूप रिलेट झाले. वेळेत पोहचले तर कोण असतंय आपण आलो ते बघायला ?

रोज माझ्या कामाच्या ठिकाणी वेळेत पोहचतो. सफाई करणारे आणि वॉचमन सोडले तर पहिला एक तास मला कोणी दिसतसुद्धा नाही. मग मी शांतपणे वाचतो, लिहितो, गझल ऐकतो आणि एकूणच आनंदी असतो. त्रास करून घेत नाही.

हिंदीत तर 'काल' आणि 'उद्या' साठी एकच शब्द आहे 'कल' ...... काळ हा अनंत आहे, सलग आहे आणि भरपूर आहे.
वेळ पाळून उपेग नाही बघा :-)

वामन देशमुख's picture

4 Feb 2020 - 4:22 pm | वामन देशमुख

क्या तो बी लिखरें, खाला!

हमारे इदर तो, रात कु नौ बजे दावतां है समजो, होर तुम्म दस बजे गये समजो, तो "इत्ता जल्दी सलादां काटने कू आये?" ऐसा बोलते लोगां.

खाला, रात नौ बजे की दावतों में अपुन ग्यारा के बाद में जाना, आराम से खा लेना, फीर दो बजे दुला आता (दुलनां लेडिस सेक्शनों में रैते), गिफ्टां दे देके, फोटुआं उतार लेके, फीर चायां पी लेके , घरोंकु आ जाना, ऐसा रैता.

धर्मराजमुटके's picture

4 Feb 2020 - 7:02 pm | धर्मराजमुटके

आज्जे, लेख आवडला गं !
याबाबतीत मी अगदी विरुद्ध टोकाचा होतो. मला लहानपणापासूनच प्रत्येक ठिकाणी उशीरा जाण्याची सवय होती. शाळेत देखील मी कधीच वेळेवर पोहोचू शकत नसे त्यामुळे आईला शिक्षकांचा ओरडा खावा लागे. त्यामुळे कंटाळून आईने माझी सकाळची शाळा बदलून दुपारच्या शाळेत प्रवेश घेऊन दिला. पण उशीर हा सकाळ किंवा दुपारचा बांधील थोडाच असतो. त्यामुळे तिथेही उशीर हा व्हायचाच. एका वर्षी माझी दुपारची शाळा सकाळी झाली आणि मला परत शाळा बदलावी लागली.
माझ्या लहानपणी रस्त्यावर पडदे बांधून त्यावर सिनेमे दाखवायचे. सिनेमा रात्री ९ ला सुरु होणार असेल तर मी फार फार तर ९.१५ पर्यंत पोहोचायचा. पण तरीही पुढील जागा अगोदरच तुडूंब भरलेल्या असायचा. त्यामुळे नाईलाजाने मला उजव्या हाताने फायटींग करणारा हिरो डाव्या हाताने फायटींग करताना बघावा लागायचा.

चाळीत राहत असताना सार्वजनिक शौचालायकडे कितीही लवकर उठून जा, माझ्यासमोर भली मोठी मारुतीच्या शेपटासारखी रांग असायचीच. त्यामुळे मला वेळेवर पोहोचणार्‍या व्यक्तींबद्दल आदर होता मात्र वेळेच्या खुप खुप आधी येणार्‍या व्यक्तींबद्द्ल सुप्त राग देखील होता.

मी नवीनच कामावर रुजू झालो होते तेव्हाची गोष्ट. माझे काम फिरतीचे होते आणि मुंबईत कोठेही वेळेवर पोहोचायचे तर खुप गोष्टी आपल्या आवाक्याबाहेरच्या असतात. विशेषतः रेल्वे सेवा, ट्रफिक जाम वगैरे ! एके दिवशी मला ओएनजीसी च्या एका साहेबांच्या घरचा कॉल दिला गेला. ते साहेव वक्तशीर पणाबद्द्ल फार्फार प्रसिद्ध होते. मला १० ची वेळ दिली होती आणि मी धावतपळत पोहोचलो मात्र पत्ता काही सापडेना. शेवटी १० वाजून ३ मिनिटानी मी त्यांच्या घराची बेल वाजवली. साहेबांनी दरवाज्यात येऊन मला घड्याळ दाखविले आणि मी ३ मिनिट उशीरा आलो आहे हे सांगून मला परत पाठवले. दुसर्‍या दिवशी झक्कत ९.५५ मिनिटांनी त्यांच्या घरी पोहोचलो. शेवटी नवीन नोकरी चा सवाल होता !

परवाच तुझ्या आकाशवाणीच्या धाकट्या भावाचा म्हणजे एफ एम चा एक कार्यक्रम ऐकत होतो. त्यात परदेशातील कोणा एका संस्थेने जगातील मोठ्या शहरांचा काही सर्वे केला होता. त्यात मुंबईबद्द्ल म्हटले होते की इथे लोकांना वेळ नाही. लोक कोणाची पडलेली वस्तू उचलून देत नाहीत कारण आपला वेळ वाया जाईल. त्यावर रेडीओ घोडी ने कमेंट केली की "हॅ, हॅ हॅ, हम आज भी गिरी हुई चीज नही उठाते" मात्र हे तितकेसे खरे नाही. अग मुंबईतच काय भारतात लोकांना वेळच वेळ आहे. त्याशिवाय "जेसीबी की खुदाई" इतकी प्रसिद्ध कशी झाली असती ? असो !

वक्तशीर माणसाचे ठीक आहे गं ! पण वेळेच्या खुपच आधी येणारी माणसे देखील मला त्रासदायक वाटतात. आता मागच्याच महिन्यातले उदाहरण घे ना ! माझ्या लेकाच्या शाळेचे स्नेहसंमेलन होते एक दिवस संध्याकाळी ५.३० वाजता. मी धावपळ करीत ५.१५ ला पोहोचलो तर पाऊण पेक्षा अधिक हॉल अगोदरच भरलेला. म्हणजे रिकामटेकडी जनता कमीतकमी ४.४.३० पासून तरी हजर झालेली असणार.

आता सिंहावलोकन केल्यास असे आढळते की उशीर होण्यामागचे कारण समोरच्याचा वेळ महत्त्वाचा आहे याची जाणिव नसणे हे नाहीच्चे मुळी. मुळ कारण आहे हे आहे की आपण ज्या कामासाठी चाललो आहे त्यात आपल्याला रस नसतो किंवा कमी असतो. त्यामुळे मग आपोआपच माणूस उशीरा पोहोचतो.

आताशा उतार वयात मी थोडा थोडा सुधारलोय. मी एखादे वेळेस ठरविले ना की अमु़क ठिकाणी अमुक वाजता पोहोचायचेच तर तिथे पोहोचण्यापासून कोणतीही अडचण मला रोखू शकत नाही. आता मी १० पैकी ७ वेळा तरी वेळेच्या अगोदर ५-१० मिनिट पोहोचतो. समजा मला ७ वाजताची वेळ दिली आहे आणि मी ६.५५ पोहोचलो तर मी समोरच्याची अडचण करत नाही. बरोब्बर ७ वाजताच त्या घराची बेल वाजवतो किंवा कार्यालयातील स्वागतिकेत हजर होतो. मात्र अशा वक्तशीरपणा मुळे समोरचा कोमात जातो असा अनुभव आहे. एखाद्याला वेळ दिली आणि ती पाळता आली नाही तर माझी प्रचंड प्रमाणात चिडचीड होते. अगदी १० च मिनिटे उशीर होणार असेल तरी मी त्याला प्रत्येक २ मिनिटाने मी इथपर्यंत पोहोचलो आहे, इतक्या वेळात पोहोचेन, सॉरी वगैरे चे संदेश पाठवतो.

अगदी इथे मिपावर देखील काल परवा पर्यंत वेळेवर येणारी माणसे होती. कोणी लेख पाडला रे पाडला की हे लोक "मी पयला" म्हणून सातबार्‍यावर आपली पिकपहाणी लावत असत. वेळेच्या बाबतीत अनेक सदगुरुंनी वेळोवेळी आपल्याला मार्गदर्शन केले आहे. माझा एक मालवणी मित्र मला भेटला की म्हणायचा, काय रे कुठे निघालास इतक्या घाईने ? मी म्हणायचो अमूक वाजता अमूक ठिकाणी पोहोचलेच पाहिजे तर तो म्हणायचा, "बाब रे, घाई करु नकोस, घाई आणी बाई वाईट!"
कधी वेळेवर बस / ट्रेन पकडायला जावे तर संत अमीरुद्दीन खान साहिबांचे वचन आठवे, " बस, ट्रेन और लडकी के पीछे भागना नही. एक गई तो दुसरी आती है !"

असो. शेवटी लवकर जाऊन काय मिळणार ! उलट कोणी घाई करत असेल तर मी त्याला म्हणतो, "बाबा रे, इतकी घाई नको करुस. उद्या वर जायची वेळ आली तर मी पयला म्हणणार आहेस काय ? " शेवटी १ ला काय आणि छेल्ला काय ! इट इज जस्ट अ नंबर ! नाही का !!

आणी वेळ तरी कशाला पाळायची नाही का ? कोणीतरी म्हटलेच आहे ना की आज करे सो कल कर, कल करे सो परसो, इतनी जल्दी क्या है जब जीना है बरसो !"

शेवटी आपण भारतीय, त्यातूनही गांधीवादी ! आता गांधीबाबानी सांगूनच ठेवलय ना "आराम हा राम आहे!"

ता. क : लेखाहूनही प्रतिसाद मोठा पाहून तू मात्र "हे राम ! " म्हणून नको बरं. काळजी घे, वरचे वर मिपावर येत जा. आणि हो वेळेवर नाही आली तरी चालेल हो !

चांदणे संदीप's picture

4 Feb 2020 - 11:28 pm | चांदणे संदीप

"आरामसे कल आते!" वर ठ्ठो! करून हसलो. त्या कॅज्युअलशा वाक्याला सारक्यास्टीक टोन मध्ये वाचल्यावर तर वारलोच! =)) =))

सं - दी - प

योगी९००'s picture

5 Feb 2020 - 12:06 pm | योगी९००

एकदम मस्त लिहीले आहे. मी पण एकदम वक्तशीर म्हणून कुप्रसिद्ध आहे. याच विषयावर पुर्वी हा https://www.misalpav.com/node/16622 धागा होता. त्यातलाच माझा प्रतिसाद थोडा modify करून टाकत आहे.

बर्‍याच वेळेला या लोकांच्या उशिर करण्याच्या सवयीमुळे संताप संताप होतो. त्यात राग अशा गोष्टीचा येतो की लोकं असे म्हणतात.. " ११ चा कार्यक्रम आहेना ...म्हणजे १२ पर्यंत लोकं येतील..मग लगेच सुरू करू..". किंवा " ११ चा कार्यक्रम आहेना ...म्हणजे १२ पर्यंत जाऊया..."

परदेशात असताना बरेचसे भारतीय हमखास उशीर करणारे भेटले होते.. त्यांना त्याची लाज ही वाटत नव्हती. ज्या कार्यक्रमास परदेशी आणि भारतीय लोंकांना बोलावले असेल तेथे फक्त परदेशी लोंक आणि काही तुरळक प्रमाणात भारतीय बरोबर वेळेला हजर असतात. कार्यक्रम सुरू होऊन १ तास झाला तरी आपले लोक येतच असतात. फार राग येतो अशावेळी.

एकदोनदा तर असे झाले होते की कोणी मला कोठेतरी भेटायला बोलावले होते. ठरल्यावेळेला मी तेथे हजर आणि ते महाशय मात्र घरातच. फोन केला तर..."अरे तू पोचलास काय..इतक्या लवकर?" हे पुन्हावर . मी एकदा एकाला विचारले पण "अरे भा*खाऊ तुच तर भेटायची वेळ ठरवली होतीस ना?". त्यावर हॅ हॅ हॅ असे उत्तर आले.

मी एकदोन वेळेला अशा लेट लतिफ लोकांना हिसका दाखवला आहे. त्यांनी समजा ११ वा. कोठे भेटायचे ठरवले आणि जर ते १५ मि. उशिरापर्यंत आले नाहीत तर सरळ मी त्यांना डावलून माझा ठरलेला कार्यक्रम सुरू केला किंवा सरळ त्याठिकाणाहून निघून गेलो होतो. नंतर त्यांच्यात थोड्याफार सुधारणा दिसल्या होत्या. तसेच मिटींगला उशिरा येणार्‍या किंवा जॉईन करणार्‍या लोकांचाही राग येतो (जर काही ठोस कारण नसेल तर). एकदा मी एका मिटींगला २० मि. लेट आलेल्याला सांगितले की "You are too early for next meeting". त्यावर सगळे त्याला हसले होते व तो माणूस फार ओशाळला होता.

आणखी एक गोष्ट..कोठेही पिकनिकला अशा उशीर करण्यार्‍या लोंकाबरोबर गेलो की ही लेट लतिफ लोकं डो़क्याचा पार भुगा करतात. उठणार उशिरा, आरामात (घरी असल्यासारखे) आवरणार..अशा लोकांमुळे माझे देशात आणि परदेशात बरेचसे स्पॉट पहायचे राहून गेलेत.

प्रथम छान विषय आणि सुरेख लेखाबद्दल धन्यवाद.

मी वक्तशीर पंथातला. बहुतेक मुंबईकर वक्तशीर असल्याम्ळे मनस्ताप झाला नाही. एकदा आद्यपेय प्राशन मंडळाच्या कार्यक्रमाला वेळेवर पोहोचलो. अर्धा तास कोणी न आल्यामुळे परत फिरलो. माहीम स्थानकावर पोहोचता पोहोचता एकाने मागून भरभर चालत येऊन मला पोलीस गुन्हेगाराला नेतात तसे कॉलर पकडून हॉटेलवर नेले होते. नंतर मात्र मी पहिला आल्यावर फार वेळ कोणी आले नाही तर हॉटेलचा मालक माझ्यासमोर बसून कोणीतरी येईपर्यंत गप्पा मारीत बसे.

मुंबईतले बहुतेक संस्कृतिक कार्यक्रम वेळेवर सुरू होतात. राजकीय नेते आणि काही अपवाद वगळता हिंदी सिनेस्टार याला अपवाद. अमिताभ बच्चन हे वक्तशीरपणाबद्दल प्रसिद्ध आहेत. एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्याला त्यांनी सिनेमात घेतले होते. किती वाजता यायची असे विचारल्यावर सकाळी सातची शिफ्ट आहे, साडेसहाला आलात तर वेषभूषा रंगभूषा करून सातला चित्रीकरण सुरू करु असे सांगितले. स्वत: अमिताभ तिथे सहापसून स्टेजतयारी करण्यास उपस्थित होते आणि पावणेसातला चित्रीकरण सुरू झाले.

१९७७ साली मी माहीमच्या सेंट झेविअर तंत्रनिकेतनात एक शिक्षणक्रम घेतला होता. सातला लेक्चर्स सुरू होत. पावणेसातपासून प्राचार्य फादर बोर्जेस गेटवर छडी घेऊन उभे राहात. ७.५० ला आलो तर छडी उगारून दम देत आणि सांगत पावणेसातला येण्याचा प्रयत्न करा म्हणजे गाड्या उशिरा धावत असतील वा वाहतूक मुरांबा असेल तर सातला तरी पोहोचता येईल. उशिरा आलेल्याला सरळ घरी पाठवीत आणि घरी तसे पत्र पाठवीत.

पुण्यातले शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम बहुतेक वेळा नियोजित वेळेपेक्षा अर्धा तास उशिरा सुरू होतात. मुंबईत मात्र ठीक वेळेवर. अपवाद अर्थातच किशोरीताईंचा.

छान लेखाबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.

सुबोध खरे's picture

6 Feb 2020 - 11:51 am | सुबोध खरे

लष्करी नोकरी मुळे अगोदरच असणारा वक्तशीरपणा माझ्या अंगात पुरता मुरलेला आहे.

त्यामुळे हिरानंदानी सारख्या कॉर्पोरेट रुग्णालयात सुद्धा माझी वेळ दुपारी १२ ते ८ असताना( माझा विभाग सकाळी ८ ते रात्री ८ चालू असे) मी वट्ट १२ च्या पाच मिनिटे अगोदर पोहोचत असे आणि ८ वाजता रुग्ण आला नाही तर त्याला खेप घालायला लावत असे.

सुरुवातीला एका रुग्णाने मला ट्राफिक जॅम मध्ये अडकलो आहे म्हणून पाऊण तास वाट पाहायला लावली होती यांनतर मी आठ वाजून दहा मिनिटांनंतर आलेल्या रुग्णांसाठी उपलब्ध नाही म्हणून परत पाठवत असे.

पुढे एशियन हार्ट रुग्णालयात विभागप्रमुख म्हणून गेलो तेथे बायोमेट्रिक उपस्थिती लावली त्याचा मला अजिबात त्रास झाला नाही.

तेथे सुद्धा माझे कामाचे तास ८ ते ४ होते तेंव्हा चार वाजता मी रुग्णालयाच्या बाहेर पडत असे आणि सव्वा चारला सी इ ओ किंवा चेअरमन किंवा सी एफ ओ यांचा संदेश आला तर मी स्पष्ट सांगत असे कि मी आता कुर्ला स्टेशन वर पोहोचलो आहे. जे काही बोलायचं आहे ते उद्या बोलू. एकंदर चेअरमन साहेब माझ्या अशा वागण्यावर फारसे खुश नव्हते परंतु मी त्यांच्या अशा वाटण्याला फारशी भीक घातली नाही.

लष्करी माणसं वक्तशीर आणि तिरसट असतात या ख्यातीचा मी पुरेपूर वापर करून घेतला आहे.

आजही माझ्या दवाखान्यात रुग्ण पंधरा मिनिटांपेक्षा उशिरा आला तर त्याला परत खेप मारायला लागते.

एखादा रुग्ण परत नाही आला तरी मला ते चालते.

आयुष्य एकच आहे आणि गेलेला वेळ कधीही परत येत नाही.

माझा वेळ मला महत्त्वाचा आहे. उगाच लुंग्या सुंग्यासाठी फुकट घालवायला माझा वेळ स्वस्त नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Feb 2020 - 1:40 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेखन आणि वक्तशीरपणा आवडला. मलाही वेळा पाळायला आवडते आणि लोकांनीही वेळ पाळाव्यात अशी अपेक्षा असते मात्र जेव्हा असे होत नाही तेव्हा माझी चिडचिड होते. भांडन करु की काय असे वाटते. संबंधित व्यक्तीशी माझा नीट संवाद होत नाही, नॉर्मल मोडला येईपर्यंत. आणि समोरच्याला आपण वेळेत येऊनही त्याचं काही वाटत नसेल तर त्रास अजूनच होतो.

माझा एक मित्र कधीच वेळेवर येत नाही, वेळा पाळायची त्याला अजिबात सवय नाही. आणि दुर्दैवाने मला त्याच्याबरोबर काम करावे लागते. मी अनेकदा तो आला नाही, येत नाही म्हणून त्याची वाट न पाहता माझ्या पुढच्या कामाला निघून जातो. आणि तोच मला म्हणतो, थोडा वेळ लागला तर काय होतं. थांबायला पाहिजे होतं.

मित्र बदलत नाही आणि मीही बदलत नाही. आमचा संवाद खुंटतो.

-दिलीप बिरुटे

राघव-तुमची प्रतिक्रिया मनाला एकदम पटली.छान लिहलंयत.
तुम्हीही वक्तशीर आहात हे वाचून बरं वाटलं.

कंजूष-खरंच काही कार्यक्रम हजर न राहण्याच्या लायकीचेच असतात.त्यात आणि उशीरामुळे वेळ वाया गेला की मनस्तापच होतो. खरंच,इतकं काटेकोर व्हायला पाहिजे प्रत्येकानंच!

समीर वैद्य-खरंय.तुम्हांला आला तसा अनुभव नेहमीच वक्तशीर माणसाला येतो.

विनीता००२-होय विनिता,तुमचं म्हणणं बरोबर आहे.

कुमार१-तुम्ही सहमत आहात हे वाचून बरे वाटले.

विजूभाऊ-कलाकार दीड तास उशीरा निघाल्यामुळं नाटकाच्या प्रेक्षकांचे तिकिटाचे पैसे परत करावे लागणे हा तुमचा अनुभव भयानक आहे.

प्रकाश घाटपांडे-निदान एवढी तरी लाज बाळगावी उशीर करणाऱ्याने.

अनिंद्य-"हिंदीत काल आणि उद्या साठी एकच शब्द आहे 'कल'ही तुमची कॉमेंट दाद देण्याजोगी.

वामन देशमुख-वा!"मिरजी हिंदी"! मस्त.

धर्मराजमुटके-ज्या कामासाठी चाललोय त्यात रस नसतो म्हणून उशीर होतो ,हे कारण पटले.माझ्या लेखापेक्षा तुमचा प्रतिसाद मोठा आहे हे खरेच पण चांगला आहे. आवडली तुमची प्रतिक्रिया.

चांदणे संदीप-द्या टाळी!

योगी९००-you are too early for next meeting. हे तुमचं खडसावणं आवडलं.तुम्हांलाही उशीरा येणाऱ्यांमुळे मनस्ताप झालेला दिसतोय.

सुधीर कांदळकर-"छान विषय आणि सुरेख लेख"हा तुमचा प्रतिसाद मनाला समाधान देऊन गेला. थँक्स.

सुबोध खरे-तुम्ही लष्करात नोकरी करता हे वाचून अभिमान वाटला. "लष्करातली माणसं वक्तशीर आणि तिरसट असतात",यातल्या तिरसट शब्दाशी सहमत नाही.तुम्ही तिरसट वाटत नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे-वक्तशीर नसलेल्या माणसाशी संवाद खुंटतो हे तुमचं मत पटलं.

सर्वांचे आभार.असाच स्नेह नेहमी राहू दे.

सुबोध खरे's picture

11 Feb 2020 - 11:46 am | सुबोध खरे

सुबोध खरे-तुम्ही लष्करात नोकरी करता हे वाचून अभिमान वाटला.

लष्करात डॉक्टर म्हणून नोकरी करत होतो निवृत्त होऊन १३ वर्षे झाली

परंतु अजूनही लोकांच्या दिरंगाई आणि ढिलेपणाशी जमवून घेता येत नाही( खरं तर घ्यावेसे वाटत नाही.)

त्यापेक्षा मी तिरसट आहे हे लोकांनी म्हटलेले मला चालते.

जालिम लोशन's picture

10 Feb 2020 - 5:03 pm | जालिम लोशन

प्रतिसाद द्यायला ऊशिर झाला. इंडिअन स्टॅंडर्ड टाईम दुसर काही कारण नाही!

चौथा कोनाडा's picture

10 Feb 2020 - 5:22 pm | चौथा कोनाडा

आजी, भारी लिहिलंय !
मी पण असाच वक्तशीर होतो, पण त्याचा त्रास व्ह्यायला लागला, स्ट्रेस बिल्ड व्ह्यायला लागला,
एका मॉडर्न गुरु कडे गेलो असताना मला स्पिरिच्युअल साक्षात्कार झाला अन मी सुधारलो.
आता सगळी कड्म नि ... वांत, .... डुलत, डुलत पोहोचतो अर्थात सर्व विचार करूनच !

मराठी_माणूस's picture

11 Feb 2020 - 11:35 am | मराठी_माणूस

मस्त लेख.

मुंबईत खुप नाटके पाहीली , एकही वेळेवर सुरु झाल्याचे आठवत नाही.

लष्करातील वक्तशीर पणा बद्दलचा एक सत्य किस्सा सांगतो आहे.

आमच्या "जिवंती या नौदलाच्या रुग्णालयाचे वार्षिक सर्वेक्षण करण्यासाठी गोव्याचे ध्वजाधिकारीFLAG OFFICER GOA AREA (FOGA) येणार होते. त्यांना वेळ ०७. ५५ ची दिली होती. त्यासाठी ते आपल्या निवास स्थानातून ०७.४५ वाजता निघाले होते. परंतू वास्को शहरात ट्रक कलंडल्यामुळे ट्रॅफिक जॅम झाला होता आणि त्यांना यायला उशीर होत होता.

त्यामुळे ते येण्याच्या अगोदर म्हणजे ठीक ०८.०० वाजता जिवंती च्या कमांडिंग अधिकारी यांनी ध्वजारोहण केले आणि ध्वज वंदनाहि केली. यानंतर नौदलाच्या बँड वर राष्ट्रगीत वाजले तोवर गोव्याचे ध्वजाधिकारी याना मैदानाचे बाहेर थांबून रहायला लागले.

अर्थात ते आल्यावर त्यांना मानवंदना दिली गेली. पण आपल्या भाषणात त्यांनी (अपरिहार्यतेमुळे) उशिरा येण्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत कार्यक्रम पुढे चालू केला.

( कोणत्याही अधिकाऱ्यापेक्षा भारतीय तिरंग्याला जास्त मान दिला जातो)

चौथा कोनाडा's picture

12 Feb 2020 - 5:45 pm | चौथा कोनाडा

कोणत्याही अधिकाऱ्यापेक्षा भारतीय तिरंग्याला जास्त मान दिला जातो

+१

जालिम लोशन- देर सही,अंधेर नहीं. जाने दो. टेन्शन नहीं लेनेका.

चौथा कोनाडा- स्ट्रेस घेऊ नका हो! इतकं सिरीयसली घेऊ नका.

मराठी माणूस- प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

Nitin Palkar's picture

12 Feb 2020 - 7:24 pm | Nitin Palkar

अतिशय सुंदर लेख आणि खूपच छान प्रतिसाद.