जोरदार, शानदार, मिरासदार!

जेम्स वांड's picture
जेम्स वांड in दिवाळी अंक
25 Oct 2019 - 6:00 am

body {
background-image: url("https://i.postimg.cc/mZ0mm9NL/diwali-fireworks.png");
}

/* जनरल */

h1, h2, h3, h4 {font-family:'Laila',serif}
p {font-family: 'Noto Sans', sans-serif; font-size:16px; text-align:justify;}
h5 {font-size:15px!important; text-decoration:underline;}

.shirshak {
background-image: url("https://i.postimg.cc/YqkfF6BT/Orange-Gradient-Background.png");
padding:16px;
margin-top: -54px;
height:80px;
}

.glow {
font-size: 40px;
text-shadow: 1px 1px 0 #444;
font-family: 'amita',cursive;
color: #fff;
padding:16px;
line-height: normal !important;
margin-top: -27px;
}

.majkur {padding:10px;}

#slide-nav .navbar-toggle { display: none !important;}

.input-group {
display: none !important;
}
.navbar-nav { display: none !important;}

.page-header { padding-top:16px !important;}

.col-sm-9 {
background-image: url("https://i.postimg.cc/kMS0JTBP/main-bg.png");
}
.chitra {
background-color: white;
padding:10px;
border: 1px solid #ccc;
}

मिपा दिवाळी अंक  २०१९
अनुक्रमणिका

जोरदार, शानदार, मिरासदार!

तर मंडळी, गरिबाचा रामराम घ्या.

विषय सल्ला थोर. सण आलाय दिवाळीचा, वेळ आली आहे आनंदाची.

आनंद म्हणजे काय?

'ह्या टोकासनी त्या टोका सुदीक दातकड़ काडायची मज्जा.'

वाचनवेड्या मराठी समाजाला बेकार व्यसन असतं ते दिवाळी अंकांचं. मिपा सभासद झाल्यापासून विशेषांक आले-गेले, पण आपण इमानदारीत वाचते राहिलो, कारण मिपाची लेव्हल पाहूनच आपली छाती दडपल्याली हुती. ह्या वेळी मात्र मनाचा हिय्या करून काही मिपाकर मित्रांच्या प्रेमापोटी अन काही वरिष्ठ सभासदांच्या आदेशापोटी, अंकाच्या विषय बरहुकूम 'रसग्रहण' करावं म्हणतो.

"तुमच्या कथा वाचून मिरासदार आठवतात!" खुद्द गुरुदेव टागोरांस नोबेल मिळाल्यावर जितका आनंद झाला नसेल, त्याच्या तिपटीने आमचं (खकानं) छाताड ह्या कॉमेंटनं फुलून जातं. मिरासदारांचं वेड मला कधी लागलं हे नेमकं आठवणं कठीण आहे. पण 'व्यंकूनं बाई ठेवली' म्हणजे एखादी बाई उचलून कुठेतरी नेऊनश्यानी ठिवली इतपत समजायचं ते वय होतं, इतकं मात्र नक्की. मला वाटतं मिरासदारीची दीक्षा घेतलेल्या सगळ्यांचा 'बाप्तिस्मा' करणारं पहिलं चोपडं म्हणजे 'माझ्या बापाची पेंड' हेच असावं. एरवी रसग्रहण फक्त दाढेला दाबलेल्या तंबाखू चुना डबल गोळीचंच करायचं असतं अशी आमच्या गावाकडे निस्सीम श्रद्धा असताना मी मात्र असं आमचं गाव केवळ लेखणीने चितारणाऱ्या मिरासदाराच्या लेखनाचं रसग्रहण करावं म्हणतोय. तर मंडळी, नमनाला घडाभर तेल ओतून पुढे सरकतो.

मला वाटतं अधिकारिक कार्यक्रम असल्यागत 'अमुक साली अमुक ठिकाणी अमुक ह्यांच्या पोटी द मा जन्माला आले' वगैरे खुलासेवार करण्यात काही खास अर्थ नसावा. अधीरतेने उडी मारतो ती सरळ द मांच्या कथांवरच.

Photo-Collage-20191013-190317177

कथेचा प्राण? भाषा.... जो आसमंत आपण वर्णन करतोय त्याचं चित्र लोकांसमोर उभं करायची खास कला साधते फक्त भाषेने. मिरासदारांची पात्रं भाषा कुठली बोलतात? तर माणदेशी सातारीत बोलतात. सातारा-पंढरपूर रस्त्यावरच्या जवळपास सगळ्या गावांत बोलली जाणारी बोली. भाषेला रसवंती म्हणणाऱ्या शब्दकाराला कदाचित आमचा हा माणदेश ठाऊक नसावा. नाहीतर इतकं मधुर अन रसिक नाव भाषेला देण्याऐवजी 'कट' नाव दिलं असतं! कारण ही भाषाच तसली आहे. स्वभावाने अतिशय भोळसट पण तितकीच तिरसट माणसं 'रसवंती' बोलतील ह्या विचारानेच अजीर्ण होतं. तर असा हास्याचा मसाला घोटायला लागल्यावर आमचे द मासुद्धा असाच फर्मास कट काढतात. बरं, ग्रामीण असली तरी ह्या भाषेला प्रवाह आहे भरपूरच एकंदरीत, कारण 'पाइण्ट' 'आयड्या', 'शील', 'हाल्ट' वगैरे इंग्लिश शब्द ह्या भाषेने आत्मसात केले आहेत. 'कधीही कुठल्या प्रश्नाला सरळ उत्तर न देणं' आणि 'सतत दुष्काळी वातावरणात जगत आलेलं एक ठसकेबाज स्वरूप' ह्या दोनखांबी तंबूवर ही मस्ती तोललेली आहे. आता इतकी रग्गड भाषा विनोदी लेखनाला वापरणं म्हणजे लिंबू चिरायला दांडपट्टा परजणं झालं, पण द मा ते लीलया करतात. ग्रामीण पश्चिम महाराष्ट्रीय बोली म्हटली की स्त्री पात्राच्या तोंडी "आता ग बया" बळेच कोंबण्याइतका हा विषय सोपा खचित नाही. गावात काय नवीन पेव फुटलं/गटाळ्या घातल्या/चमत्कारिक माणसं आली की त्याची वर्दी द्यायला बाबू पैलवानाच्या उंबऱ्यावर धडकलेल्या नाना चेंगटला बाबूची बायको "आलं दोड मेलं, आता काय चिपटभर श्यांगांना मरण न्हाई, गप बसून रहा उंबऱ्याला तू मेल्या बातमी घिऊन आलास का सरळ कोणीतरी गचकल्याचीच बातमी आणतुयस." असं म्हणत उद्गारते. दुसरं म्हणजे पात्रं - पात्रवैविध्य प्रचंड जास्त असलेलं लेखन म्हणजे द मा. ग्रामीण सातारी परिवेशात असलेल्या अठरापगड जाती, त्यांच्या लकबी, सवयी, एकमेकांना हाळ्या घालायची पद्धत, एकंदरीत अंगकाठी ह्याचं प्रचंड सूक्ष्म पण कुठेच रटाळ न वाटणारं चित्रण द मा सहजी करतात. दुकानात सोनं गाळायला बसलेल्या सोनाराचे वर्णन पण करताना द मा 'पायात बंकनळी धरून चांदीची तार ओढताना काम जोरदार सुरू होते' असं काहीसं करतात.

Photo-Collage-20191013-190141004

द मांच्या कथांत मध्यवर्ती पात्रं पाच - पहिला बाबू पैलवान, दुसरा नाना चेंगट, तिसरा गणामास्तर, चौथा रामा खरात अन पाचवा शिवा जमदाडे. प्रत्येकाची एक एक लकब अन सवय आहे. रस्त्यावरून चालताना सरळ नाकासमोर न पाहता आजूबाजूची मौज पाहत चालणं, अर्धवट काहीतरी ऐकून मंडळींना काहीतरी करायला लावणं ही नाना चेंगट उर्फ चेंगट्या उर्फ चेंगटूची लकब. खुशीत असो वा रागात, शेजारी (मुद्दामच) बसवून घेतलेल्या चेंगटला धबेलदिशी दणका ठेवून देत भावना व्यक्त करणारा बाबू पैलवान, विडीची पूर्ण मजा यावी म्हणून तिच्या जळत्या टोकाकडूनच धूर ओढणाऱ्या रामाची तऱ्हा तिसरीच अन नानाच्या नादाला लागून कायतरी करत बसणारा शिवा एकीकडे, ह्या सगळ्यात जरा सुशिक्षित म्हणजे बुआ रोजचा पेपर तालुक्याला असलेल्या सिनेमाच्या जाहिराती अन सरकारी लिलाव नोटिशीचंसुद्धा वाचन करणारा गणामास्तर. पात्रांचं वर्णन करताना द मा हमखास वापरतात ते प्राणिजगतातील रूपकं, त्यातही गाढव हे सगळ्यात जास्त वापरलेलं रूपक.

"अरेच्या, हा माणूस असा का करतोय, गाढवच दिसतोय की लेकाचा" पासून ते 'बाबू पैलवानानं खुशीत मारलेला रट्टा खाऊन कळवळत चेंगट बेदम मार खाल्लेल्या गाढवासारखे तोंड करत गणामास्तर मागं सरकला' किंवा 'शिवानं एकदम हसऱ्या गाढवसारखं तोंड केलं' ह्या सगळ्यात पात्रं काय करतायत हे मजेशीररित्या दर्शवून द्यायला गाढवंच वापरलेली दिसतात.

द मांच्या पात्रांची ताकद आहे त्यांनी केलेलं व्यक्तिचित्रण. पूर्ण पुस्तकात एकही चित्र नसताना इतकं नळ फुटेस्तोवर हसवणाऱ्या कथा लिहिणं मला वाटतं मिरासदारांच्या लेखनाचं बलस्थान असावं. त्याला दुसरं कारण म्हणजे कथानक खुलवत न्यायची विलक्षण हातोटी. मिरासदारांची कथा खुलवण्याचे काही काही सेक्शन पाडता येतील -

१. गावातील भौगोलिक परिस्थिती - उन्हाने मी म्हणून मरगळलेली दुपार होती, संध्याकाळचे गार वारे अन पानांची सळसळ होती, अवशेची रात होती, ओलीगच्च पावसाळी रात्र होती वगैरे वगैरे.

२. वरील वातावरणाच्या पार्श्वभूमीवर जे काही 'मिसमॅच असेल ते' म्हणजे 'अशा ह्या सर्द राती एक मुडदा आपला मजेत तिठ्यावर आडवा पडला होता', किंवा साधीशी गोष्ट मजेशीर पद्धतीने मांडणं, उदाहरणार्थ 'शिवाच्या रानात इतर चार लोकांच्या असतात तसलीच एक विहीर होती' किंवा 'देवळाच्या गाभाऱ्यात एकदम पाकोळी फडफडल्यामुळे मंडळी सज्जड दचकली' वगैरे वर्णनं.

३. तिसऱ्या भागात अशा सगळ्या आसमंतात आपली पात्रं काय करत होती त्याचं वर्णन - उदाहरणार्थ, 'त्या आवशेच्या रात्री रानाकडून घरी जायला निघालेला नाना चेंगट झपझप पावले उचलत होता' किंवा 'करायला काय नसल्यामुळं बाबूनं उगाच कानातून माती काढायचा उद्योग चालवला होता' किंवा 'गणामास्तर काय सांगतोय त्यापेक्षा जास्त रामाला उलट्या विडीचा झुरका मजेशीर ठसका देऊन गेला.'

ही सहसा सुरुवात करून गावात मुडदे सापडणं, अमक्याची बाई तमक्याबरोबर पळून गेली, अमक्या तमक्याचा कज्जा होणार, तमक्याच्या विहिरीत राकेल सापडलं, वगैरे विषयांवर तुफान विनोदी बार उडवण्यात द मांचा हातखंडा आहे. कधीकधी एखादं भोळसट पात्र खंगरी कायतरी करून जातं - उदाहरणार्थ, 'चल नाना चल' ही कथा.

मुद्दल असं की एक बाई रोज मळवट भरून केस मोकळे सोडून नानाच्या स्वप्नात येई आणि "माझ्याबरुबर चल नाना" म्हणत त्याला घाबरवून सोडी. आता ह्या विचित्र आजाराचा इलाज काय? तर मंडळी पत्ते कुटत गप्पांचा फड रंगवत नानाच्या सोबतीला रात्री येऊन बसू लागली. गडी झोपलाच नाही, तर कसली येतेय टवळी स्वप्नात वगैरे उपाय. ते फसल्यावर देवऋषी आणून गंडेदोरे. शेवटी ठरतं की नानाला अडमाप दारू पाजून लास करायचं, म्हणजे नाना उताणा झोपला की स्वप्न नाही का काही नाही. अशी बिलंदर आयडिया डोसक्यात आणून कंपनीतली मंडळी नानाला चांगले सात-आठ ग्लास दारू पाजतात, पण त्यानंतर झोपायच्याऐवजी 'नानानं घरीच आरडाओरडा करीत दंगा चालवला, कधी नाही ते थोरल्या भावालाच शिव्या घातल्या, बायकोला शिस्तीत चोपून काढलं, अन रात्रभर आळी डोसक्यावर घेतली' असा विनोदी प्रकार घडतो.

इतकंच काय, तर बाबू पैलवानालासुद्धा नाना "काय रे बाब्या, फार मस्ती आलीय का तुला फोकलीच्या??" करत आव्हान देतो. तसं नाना हे पात्र जसं कायम पिचकं, पोचट, बाबूचे दणके खाणारं वगैरे असतं, ते एकदम असा विचित्र हलकल्लोळ उडवतं, तो मासला होतो परिस्थितिजन्य विनोदाचा.

ह्याशिवाय द मांच्या लेखनात मध्येच एखादी गंभीर अन प्रसंगी हेलावून सोडणारी गोष्ट सापडते. कधी ती दुःखान्ती असते. 'रानमाणूस'मधल्या पोटच्या पोराच्या अंतिम संस्काराच्या सामानावरून मर्तिकाचं सामान विकणाऱ्या दुकानदाराला तिरडीच्या किमतीचा जाब विचारणाऱ्या बापूदेवासारखी, कधी पावसाने ओढ दिल्यामुळे आबा देशपांड्याकडे कर्जाऊ पैसे घ्यायला गेलेल्या विठोबाला नेमकं तेव्हाच बदाबदा कोसळणाऱ्या पावसाने दिलेले बळ, त्यापोटी त्याने आबाला म्हटलेलं "नग मालक तुमचं पैसं आता, ठेवा तुमच्यापाशीच" असा सुखान्तसुद्धा असतो.

द मांच्या पुस्तकांत चित्रं नसतातच, पण मुखपृष्ठावर मात्र पुस्तकाच्या अग्रभागी असणाऱ्या मुख्य कथेबद्दल मजेशीर काहीतरी दर्शवणारं एकच सशक्त चित्र असतं. चित्र सशक्त असणारच, कारण ती कला मनसोक्त साकारणारे कलाकारही आपले लाडके शि.द. फडणीस उर्फ 'एस फडणीस' हे आहेत. ते ज्या प्रकारे मुख्य कथा पकडून मुखपृष्ठ चितरतात, तसं न आजवर बघितलं, न पुढे बघायला मिळेल असं वाटतं.

Photo-Collage-20191013-191952645

एकंदरीतच, दमांच्या लेखणीने मंडित कुठलंही पुस्तक हा माझ्यासाठी तरी एकाच बैठकीत फडशा पाडायचा मेवा असतो. दमांच्या लेखनाचं रसग्रहण करणं म्हणजे खरं तर झणझणीत अशा रश्याचा किंवा उडदाच्या घुट्याचा भुरका मारण्यासारखं आहे. तिखट भाषा पण हसवून हसवून डोळ्यांंतून पाणी येणं फिक्स असणं हे ह्याचं व्यवच्छेदक लक्षण. मध्येच संवेदना हादरवून सोडणाऱ्या एखाद्या कथेची पेरणी कदाचित वाचकांना हास्याची किंमत कळून यावी म्हणून केलेली योजना वाटते.

गावात (तत्कालीन) असलेली संसाधनांची तूट दमांच्या लेखनात जाणवते. कुठे ढणढणत्या चिमण्या असतात, कुठे घरातल्या बाया संध्याकाळ झाली की कंदिलाच्या काचा पुसत असतात. पण अशातही रोजची कामं करणारी माणसं असतात, त्यांचं ज्ञान-अज्ञान, समज-गैरसमज, धारणा-अवधारणा असतात, त्यातून उत्पन्न होणारा विनोदरस असतो, करुणरस असतो, प्रचंड विचारवैविध्य असतं अन मुख्य म्हणजे गावातली माणसं नेहमी गोडगोड, मेहनती, सालस वगैरे असतात ह्या कविकल्पनांना उभा-आडवा दिलेला छेद असतो. दमांची पुस्तकं वाचून पंधरा मिनिटं डोळे मिटून स्वस्थ पडा कधी, मनातल्या मनात नाही 'भोकरवाडीला' पोहोचलात तर बघा. बैठकी सुरू असताना बाबू, नाना, गणामस्तर, रामा, शिवा ह्यांच्यात कंदील धरून स्वतःला बसलेलं पाहणं एक अनुभव असतो. एकदा नक्की बुडून पहा.

असं म्हणतात रसग्रहण थांबवायची खरं तर एक वेळ असते, मधुरता. भरपूर ग्रहण होतंय जाणवलं की सहसा रसग्रहण थांबवलं जातं. पण मला आता तसं करणं जड जातं आहे. मिरासदारांचं काम प्रचंड आहे. एकदोन जिल्ह्यातल्या चारपाच तालुक्यांत विखुरलेल्या गावातील एक गाव बारा भानगडी अन त्यातले मजेशीर, तर प्रसंगी हादरवून सोडणारे प्रसंग ह्यांची मेजवानी म्हणजे आमची मिरासदारी. मी इतक्या मोठ्या लेखकाला न्याय देऊ शकलो असा माझा दावा अजिबातच नसेल अन एका लेखात तर ते शक्य नाहीच, तरीही मी माझ्या अल्पमतीने केलेलं हे रसग्रहण तुम्ही मायबाप वाचक गोड मानून घ्याल ही विनंती.

सगळ्यांना शुभ दीपावली.

श्रेयनिर्देश: चित्रे आंतरजालावरून साभार.

20191016-122815

अनुक्रमणिका

प्रतिक्रिया

दुर्गविहारी's picture

25 Oct 2019 - 11:02 pm | दुर्गविहारी

वा मालक ! एका दमात धागा वाचला. पुर्ण मिरासदार डोळ्यासमोर तरळून गेले. दिवाळीच्या सुट्टीत आता दमामि. :-)

सुधीर कांदळकर's picture

26 Oct 2019 - 7:18 am | सुधीर कांदळकर

दमा आणि अजूनही मनांत तस्सेच आहेत. दमांनी अमर केलेल्या पात्रांच्या आठवणी जागविल्यात. त्या पण त्याच भाषेच्या बाजात.


पण 'व्यंकूनं बाई ठेवली' म्हणजे एखादी बाई उचलून कुठेतरी नेऊनश्यानी ठिवली इतपत समजायचं ते वय होतं, इतकं मात्र नक्की.


आता इतकी रग्गड भाषा विनोदी लेखनाला वापरणं म्हणजे लिंबू चिरायला दांडपट्टा परजणं झालं,


भाषेला रसवंती म्हणणाऱ्या शब्दकाराला कदाचित आमचा हा माणदेश ठाऊक नसावा.


पूर्ण पुस्तकात एकही चित्र नसताना इतकं नळ फुटेस्तोवर हसवणाऱ्या कथा लिहिणं मला वाटतं मिरसदारांच्या लेखनाचं बलस्थान असावं.


हे एकदम झकास. धन्यवाद.

कुमार१'s picture

26 Oct 2019 - 8:49 am | कुमार१

छान रसग्रहण.

माझ्या महाविद्यालयीन जीवनात ‘दमा – व्यंमा – शंपा’ हे कथाकथनाचे त्रिकुट जोरात होते. त्यांचे मनोहारी कार्यक्रम प्रत्यक्ष ऐकलेले आहेत. या लेखाने ते स्मरणरंजन झाले.

पाषाणभेद's picture

26 Oct 2019 - 11:47 am | पाषाणभेद

आता है का!

काये म्हणजे सकाळच्याला आंगूळीचा लय कंटाळा आला व्हता. म्हनलं बसू जराकस आथरूणातच. तर तेवढ्यात बायलीचा खकाना उठला. गोधडी आंगावरून ओढूनच घेतल्यावर उठावंच लागलं. मग तंबाखू मळली. डब्बल चुना लावला. मस्त बार बनवून दाढंखाली ठेवली. सकाळच्याला तर एवढी लागतेच.

मग अंगणात आलो. आंगोळ तर करायचीच नव्हती. बसलो निवांत उन खात.
आमच्या घरासमोरच मिपाचा चौक आहे. त्या रस्त्यावर लय लोकं येत जात राहत्येत. तसाच जेम्स वांड जात व्हता. लय वांड हाय लेकाचा.
मी काखा कराकरा खाजवतच होतो तेव्हढ्यात जेम्स वांडानं हाळी दिली.

"ए पाभ्या, काय करतू? श्येतात जायाचं का न्हाय? श्येतात लेखांचं लय तण आलं आसंल ना? ते काढायचं का न्हाय?"

माझ्या तोंडात तंबाखूची लाळ मस्त तयार झाली होती. अन ह्ये बेनं मलाच ज्ञान देत व्हतं. म्हनं लेखांच तण आलय श्येतात.

म्या तोंडातली पिंक पचकन सत्यावर टाकत म्हनलं, "वांडया, तुला रं लय चवकशा त्या चित्रगुप्तासारख्या. त्याला नाय काम. तुला पण नाय का? जा की लेका जा, बहुगूणी नाय तर बेसनलाडू सारखं काम कर."

जेम्स बोलला, "आरं त्या दुर्गविहारीचं घर गळतंय या पावसाळ्यात. त्याचं लक्ष सारं किल्ले भटकण्यात जातं. त्याच्या बायकूनी लगूलग घराच्या धाब्यावर माती टाकाया बोलंवलंय. ते काम करतो अन संध्याकाळी दुर्गविहारी घरी आला का मग त्याच्याकडून पैकं घ्यायचं आहे मला."

तो टेकला माझ्या ओट्यावर. मग मी परत तंबाखू मळली. डब्बल घेतली. त्याच्यापुढे हात करून त्याल दिली अन म्या पन तंबाखू दाढंखाली ठेवली.

तिकडून सुबोध खरे जात व्हता. आमच्या गावातला लय श्येना आन हुषार मानूस. तिकडं बोटीवर सैनिक व्हता. सायबांनं घरी जायला सांगिटल तर हा बाद्दर राजिनामाचं देवून आला. आसा रांगडा गडी. त्याला हाळी दिली. तो आला. तो काय तंबाखू बिंबाखू खात नाही ते बरं. तो अन श्रीरंग_जोशी एकाच माळंच मणी. सारकेच. नाय तर तो सूड लेकाचा. कायम दुसर्‍याच्या तंबाखूकडे अन दुसर्‍याच्या कामाकडे लक्ष.

मुटे मामा पेपर घेवून जात होते. त्यांनीच जेम्स वांडचा लेख मिपाच्या दिवाळी अंकात आल्याचं सांगितलं. आसा जेम्स वांड आतल्या गाठीचा. भाड्या एवढा लेख छापून आला तरी सांगत नव्हता. मंग आमी दोघांनी त्याला धरला अन लय हानला.

मुटे मामा हासायला लागले. "अरे मरेल ते. सोडा त्या वांडाला", आसं बोलले.

मग आमी त्याला सोडलं आन किल्लेदाराच्या हाटेलीत च्या प्यायला गेलो.

आशी आमची कथा.

जेम्स वांड's picture

26 Oct 2019 - 1:32 pm | जेम्स वांड

पारच भोकरवाडी सीन केलात म्हणायचं पावनं... लैच झ्याक

किल्लेदार's picture

29 Oct 2019 - 12:04 pm | किल्लेदार

अहो पण किल्लेदारापेक्षा सरनौबतांच्या टपरीवर जास्त चांगला "च्या" मिळतो...

मनिष's picture

26 Oct 2019 - 12:12 pm | मनिष

मस्त रे. दमांच्या नाती थोड्याफार ओळखीच्या आहेत - त्यांच्यापर्यंत पोहोचवतो हा लेख. :-)

जेम्स वांड's picture

26 Oct 2019 - 1:33 pm | जेम्स वांड

त्यांना आवर्जून सांगा की हा लेखक आजोबांना अन त्यांच्या लेखणीला पाव टक्काही न्याय देऊ शकलेला नाही. ग्रामीण साहित्य आवडणाऱ्या लोकांवर अभाळा इतके उपकार आहेत म्हणावं त्यांचे.

चौकटराजा's picture

26 Oct 2019 - 12:21 pm | चौकटराजा

मस्त रसग्रहण ... एकदा गोनिदान्च्या घरी त्यान्च्याशी गप्पा मारताना त्यानी " दत्ताराम " असा उल्लेख केला . मी विचारले अप्पा हा दत्ताराम कोण ? " आमचा एक जीवलग मित्र " द मा मिरासदार " त्यावरून मला कळले दमामि गोनीदान्चे एक जवळचे मित्र. तसे दमा व गदिमा यान्ची पण मैत्री होती असे ऐकिवात आहे. एकदा दमाना गदिमाकडून एक लावणी गीत हवे होते. गदिमाना ते काही सुचेना .आण्णा माड्गूलकर जसे माडीवर जाण्यासाठी जिन्यात शिरले ,खालून दमा विचारते झाले " गीताचे काय झाले ? अण्णा मगे वळून म्हणाले दमा , जर दमादमानं घ्या की ! झाले आण्णाना मुखडा सुचला !

जेम्स वांड's picture

26 Oct 2019 - 1:34 pm | जेम्स वांड

ह्याला म्हणायचं एक अस्सल अन अट्टल आठवण...

पद्मावति's picture

26 Oct 2019 - 1:39 pm | पद्मावति

खुप सुंदर लेख.

मस्त लिहिले आहे. द मां च्या लेखनशैलीबद्दल अगदी, अगदी.

आधी ग्रामीण बोलीभाषेत लिहिणारे माझे आवडते लेखक केवळ दोनच होते, 'द. मा. मिरासदार' आणि 'शंकर पाटील'. मिपावर आल्यावर त्यात आणखीन तीन नावांची भर पडली, 'जव्हेरगंज' 'अभ्या..' आणि 'जेम्स वांड'. तुम्हा तिघांनाही ग्रामीण भाषेचा बाज राखत लेखन करण्याची देणगी लाभली आहे.

मिरासदारीची दीक्षा मी कधी घेतली हे सांगणे अवघड असले तरी 'माझ्या बापाची पेंड' ही माझी सर्वात आवडती कथा. त्यातला 'काठेवाडी घोड्यावरती' ह्या गाण्याचा प्रसंग तर कळसच! खरेच असे काही गाणे आहे का ह्याचा बराच शोध मी घेतला पण तसे गाणे आजतागायत काही सापडले नाही बुवा.

'माझ्या बापाची पेंड' चा विषय निघालाच आहे तर थोडेसे अवांतर:
रात्री ड्रायव्हिंग करायला मला खरेतर अजिबात आवडत नसले तरी ,अनेकदा तशी वेळ येतेच. अशावेळी गाडीत ऐकण्यासाठी गाण्यां ऐवजी द.मा., शंकर पाटील, पुलं आणि वपुंच्या कथा कथानांची 'Night Journey' नामक एक खास प्ले लिस्ट मी बनवली आहे, तिची सुरुवातच होते 'माझ्या बापाची पेंड' ह्या कथेने.

तिच्या पाठोपाठ येणाऱ्या 'भोकरवाडीतील श्रमदान', 'माझी पहिली चोरी', 'बाबांचा अभ्यास', 'धिंड', 'मिटिंग', 'पाहुणचार', 'नाटक', 'असा मी असामी', 'बटाट्याची चाळ' 'पंतवैद्य', 'बदली', 'जे. के. मालवणकर' अशा कथा मूळ लेखकांच्या आवाजात, त्यांच्या मिश्कील शैलीत ऐकत गाडी चालवायला मजा येते. शेजारच्या सीटवर बायको निद्रादेवीच्या अधीन झाली असली तरी आपण एकटेच जागे आहोत असे वाटतच नाही!
नकळत पणे नाईट ड्रायव्हिंगचे कंटाळवाणे काम पूर्ण होऊन मुक्कामी पोहोचे पर्यंतचा वेळही हसतखेळत जातो!

असो, मझ्या आवडत्या लेखकांपैकी एक असलेले द.मा., त्यांची लेखनशैली आणि पात्रांच्या खोडी / लकबी त्यातल्या बारकाव्यांसाहित उलगडून दाखवणारे हे 'जोरदार, शानदार आणि दमदार' रसग्रहण आवडले! धन्यवाद.

पाषाणभेद's picture

26 Oct 2019 - 8:45 pm | पाषाणभेद

चांगलीच आयड्या केलीत राव.
आमाला शेर करा की ती प्ले लिस्ट.

शेअर करायला नक्कीच आनंद होईल पण लिस्ट मधल्या सर्व mp3 फाइल्स ची एकूण Size 900 MB च्या वर आहे! एवढी मोठी फाईल मला अपलोड करणे आणि तुम्हाला डाऊनलोड करणे तापदायक होईल. एक उपाय करता येईल, ह्या सगळ्या फाईल्स मी youtube वरून mp3 format मध्ये डाऊनलोड केल्या आहेत त्यांच्या लिंक्स देऊ का? तुम्ही पण तिथून त्यातल्या हव्या त्या फाईल्स डाऊनलोड करू शकाल, ते सोपे पडेल.

पाषाणभेद's picture

27 Oct 2019 - 11:32 am | पाषाणभेद

'माझ्या बापाची पेंड', 'भोकरवाडीतील श्रमदान', 'माझी पहिली चोरी', 'बाबांचा अभ्यास', 'धिंड', 'मिटिंग', 'पाहुणचार', 'नाटक', 'पंतवैद्य', 'बदली', 'जे. के. मालवणकर' आदी लिंक द्या.
पु लं चे भेटून जाईल.

यांची प्ले लिस्टची आयड्या आवडली आहे एकदम.

पाषाणभेद's picture

27 Oct 2019 - 11:45 am | पाषाणभेद

किंवा अशा लिंक कशा सर्च केल्या ते किंवा केवळ ऑडीओ लिंक कशी सर्च करायची किंवा एखादा विडीओ ते ऑडीओ कन्व्हर्टर सांगा.
आमच्या गावाच्या घरी जुन्या काळात कॅसेट टेप आणला होता.
त्यावेळी गल्लीतले गोळा झाले होते ऐकायला. त्यात पुलंची म्हैस कथाकथन जास्त लावायचे.

ह्या घ्या लिंक्स...वांड भाऊ तुमच्या सुंदर धाग्यावर थोडे अवांतर प्रतिसाद होत आहेत, पण आपल्या मिरासदार पंथी भाऊबंधांच्या प्रेमा खातर ह्या चुकीला माफी असावी...

Windows वर mp3 format मध्ये डाऊनलोड करण्यासाठी 4K Video Downloader वापरा.

जेम्स वांड's picture

27 Oct 2019 - 2:15 pm | जेम्स वांड

हरकत नाही! हा मेवा वाटण्याचा आनंद वेगळा असतोय.

भंकस बाबा's picture

26 Oct 2019 - 7:45 pm | भंकस बाबा

जेम्सजी , असेच लिहित रहा

राघव's picture

27 Oct 2019 - 2:37 pm | राघव

हे माईलस्टोन सारखे लेख खूप मोठं काम करत असतात. :)

राघव
--
आपणां सर्वांस दीपावलीच्या प्रकाशमय शुभेच्छा!

विजुभाऊ's picture

27 Oct 2019 - 2:54 pm | विजुभाऊ

लेख एकदम चुरचुरीत झालाय.
दमांनी एकदा त्यांचे गाव पंढरपूर बद्दल आणि तिथल्या वेड्याम्बद्दल लिहीले होते.
गवत नावाची दमांची कथा आहे. खूपच वेगळी आहे.
तशीच एक विजयस्तंभ ही कथा.

नाॅस्टॅल्जिक करणारं अतिशय झक्कास रसग्रहण!

- (माझ्या बापाची पेंडचा पंखा) सोकाजी

नूतन's picture

28 Oct 2019 - 3:09 pm | नूतन

गणेशोत्सवात ऐकलेल्या द.मा. शंकर पाटील ..यांच्या कथाकथनाच्या आठवणी जाग्या झाल्या.

मीअपर्णा's picture

29 Oct 2019 - 6:34 am | मीअपर्णा

मी अगदी सातवीत वगैरे म्हणजे तेच तुमचं “बाई उचलून ठेवली“ वगैरे वयात द.मा. वाचले आहेत. मुख्य पात्र थोडीफार आठवताहेत पण संदर्भ लागले त्यामुळे लेख वाचायला मजा आली. तुमचा अभ्यास दांडगा आहे आणि लिहिण्याचं कसबही.
माझा नंतर जास्त ओढा व्यं. मा. वाचण्याकडे होता :)

मित्रहो's picture

29 Oct 2019 - 10:54 am | मित्रहो

मस्त हो वांड साहेब. द मा मिरासदार आणि शंकर पाटील या दोन लेखकांनी ग्रामीण साहित्य ग्रामीण जीवनातील बारकावे टिपत जिवंत ठेवले. तुम्ही रसग्रहण काय भारी लिहिले आहे. परत एकदा दमा आठवले. परत एकदा वाचावेसे वाटले. मला माझ्या बापाची पेंड ही कथा सर्वात जास्त आवडते. तसेच निरोप, साक्षीदार या कथा सुद्धा खूप आवडतात.
मी, मिपा आणि मिरासदार हा योग परत जुळून आला. मी परत लिहायला सुरवात केल्यानंतर २०१४ साली मिपाने माझा लेख खुमासदार मिरासदार दिवाळी अंकात समाविष्ट केला होता. परत एकदा तो लेख आणि प्रतिसाद वाचले. त्या लेखावर बोका-ए-आझम यांची एक खूप सुदंर प्रतिक्रिया होती. ती आजही लागू पडते. ती प्रतिक्रिया इथे देतो.

सध्या विनोदाच्या नावाखाली जो हास्यास्पद गोंधळ सगळ्या वाहिन्यांवर चाललेला असतो, त्याला मिरासदारांच्या कथा नक्कीच सुसह्य करू शकतील. पण कोणत्याही वाहिन्यांच्या कार्यक्रम निवड करणा-या अधिका-यांचा अाणि अकलेचा काही संबंध नसला पाहिजे अशी प्राथमिक अट असल्यामुळे तसे होणे कठीणच दिसते.

जेम्स वांड's picture

29 Oct 2019 - 2:21 pm | जेम्स वांड

मिरसदारांवर मिसळपाव संस्थळावर आधी काही लेखन झालं आहे की नाही?? असल्यास मला माझा बेंचमार्क काय सेट करून लिहावं लागेल हे संशोधन करताना मला खुमासदार मिरासदार सापडला होता लेख. तिथे मला मिपाची लेव्हल कळली दादाहो! तुम्ही लिहिलं आहे तो एक बेंचमार्क होता माझ्यासाठी, त्यामुळे ह्या लेखावर खुमासदार मिरासदारचा पुरेपूर प्रभाव दिसू शकतो कारण तो तसा आहे(च).

दुसरं म्हणजे तुमचं आमचं मिरासदारी गोत्र जमलं तशी तुमचं लेखन काढून वाचलं आणि मला प्रचंड मोठा खजिना सापडला, एरवी वैदर्भीय बोलीशी कधीही संबंध न आलेला मी त्या लेखनात पूर्णपणे गढून गेलो, खासकरून तुमची सिनेमा परीक्षणे आणि कथा ह्यामुळे तर प्रचंड मजा आली. वर्धा जिल्ह्यातील बोली समजली अन विदर्भाचा एक संस्कृतीक पैलू उलगडला. तुमची "सरप धसला कुपात" वाचून तर मी गडाबडा लोळून हसलो होतो राजे. तुम्ही आज इतकी उन्मुक्त आणि मनःपूर्वक दाद दिली माझ्या लेखनाला त्याची ही छोटीशी पोचपावती माझ्याकडूनही स्वीकार करावीत ही नम्र विनंती.

मित्रहो's picture

1 Nov 2019 - 4:41 pm | मित्रहो

बेंचमार्क वगैरे काही नाही. मी मनात आले ते लिहितो. तुम्ही तो वाचला होता हे वाचून खूप आनंद झाला.

अनिंद्य's picture

29 Oct 2019 - 11:19 am | अनिंद्य

उत्तम रसग्रहण.

मिरासदारांची मिरासदारी नीटच कळली :-)

जेम्स वांड's picture

29 Oct 2019 - 2:22 pm | जेम्स वांड

आपले असंख्य आभार अनिंद्य.

वाह वा! अगदी सुरेख रसग्रहण केलय. भारीच!

स्मिताके's picture

29 Oct 2019 - 7:41 pm | स्मिताके

सध्या विनोदाच्या नावाखाली जो हास्यास्पद गोंधळ सगळ्या वाहिन्यांवर चाललेला असतो, त्याला मिरासदारांच्या कथा नक्कीच सुसह्य करू शकतील.
सहमत.

मुक्त विहारि's picture

1 Nov 2019 - 7:39 am | मुक्त विहारि

आवडले

सुबोध खरे's picture

1 Nov 2019 - 12:17 pm | सुबोध खरे

सुंदर लेख
बाकी दमामि व्यंकटेश माडगूळकर आणि शंकर पाटील या त्रयीचा मी लै फ्यान आहे.
दमामिंच्या पुस्तकांचा अख्खा संच कुठे मिळेल का?
(व्यंकटेश माडगूळकर आणि शंकर पाटील यांचा संच आहे)

जेम्स वांड's picture

1 Nov 2019 - 8:15 pm | जेम्स वांड

संच असा माझ्याही माहितीत नाही, पण तुम्ही बुकगंगा किंवा अक्षरधाराला संपर्क करून पाहवा. ते लोक कदाचित एक संच बनवून पण देतील तुम्हाला. अन हो संच असा नसलेली प्रकाशने कस्टमाईज करून घेताना घसघशीत डिस्काउंट पदरी पडू शकतो तो वेगळाच...

गुल्लू दादा's picture

2 Nov 2019 - 10:19 am | गुल्लू दादा

खूप आवडले..द.मा. नक्की वाचणार

द.मा. एकदम फेव्हरेट. मी सातवीत असताना पहिल्यांदा त्यांचे पुस्तक वाचले. नंतर झपाटल्यासारखी त्यांची सर्व पुस्तके वाचून काढली. मी व माझी बहिण एकमेकांशी बोलतानासुद्धी त्यातील पात्रे, प्रसंग व कोट्या करुन हसायचो. अतीशय निर्मळ विनोद. त्या लेखनाची तुलनाच होऊ शकत नाही.

प्रचेतस's picture

4 Nov 2019 - 9:01 pm | प्रचेतस

मस्त लेखन.
मिरासदारांचे जवळपास सर्वच लेखन वाचलेले आहे. तुमच्या लिखाणाने अधिक रंगत भरली.
दमांची 'कोणे एके काळी' ही अतिशय वेगळी कथा. खूप वेगळ्या शैलीत लिहिलेली. ती पण भन्नाट आहे.

विजुभाऊ's picture

8 Nov 2020 - 3:37 pm | विजुभाऊ

हा लेख कितव्यांदा वाचला ते माहीत नाही. प्रत्येक वेळेस वेगळी मजा येते

रंगीला रतन's picture

4 Oct 2021 - 1:05 am | रंगीला रतन

ज्येष्ठ साहित्यिक आणि कथाकथनकार द.मा. मिरासदार यांना भावपुर्ण श्रध्दांजली _/\_