कॅलिफोर्नियातील ट्रेन प्रवास

Primary tabs

श्रीरंग_जोशी's picture
श्रीरंग_जोशी in दिवाळी अंक
25 Oct 2019 - 6:00 am


मिपा दिवाळी अंक  २०१९

अनुक्रमणिका


कॅलिफोर्नियातील ट्रेन प्रवास


बर्‍याच वर्षांनी यंदा परत एकदा कॅलिफोर्निया ट्रिपचा योग आला. लॉस एंजलिस, सॅन फ्रॅन्सिस्को अन आजूबाजूचा परिसर पाहायचे असे ठरले होते. सोबत दोन ज्येष्ठ नागरिक आणि लहान लेक. त्यामुळे बेतानेच पर्यटन करावे असे ठरवले होते. प्रथम लॉस एंजलिस येथे जाऊन प्रसिद्ध अशी हॉलिवूड साइन पाहिली. (हे पाहायचे उत्तम ठिकाण म्हणजे लेक हॉलिवूड पार्क). मग मोर्चा वळवला तो हॉलिवूड वॉक ऑफ फेम, डॉल्बी थिएटर इत्यादी पाहायला. येथे प्रसिद्ध कलाकारांचा नावाच्या चांदण्या, त्यांच्या हाताचे अन बुटांचे ठसे पाहिले. मग डॉल्बी थिएटर आतून पाहावे (गायडेड टूर) म्हणून त्या टूरची तिकिटे विकत घेतली. येथेच जगप्रसिद्ध असा ऑस्कर सोहळा पार पडतो. हा एक अविस्मरणीय अनुभव ठरला. हॉलिवूडपटांची आवड असल्यास आवर्जून या ठिकाणाची टूर घ्यावी.

दोन दिवस लॉस एंजलिसमध्ये घालवल्यावर तिसऱ्या दिवशी सकाळी लॉस एंजलिसच्या युनियन स्टेशनवर पोहोचलो. इथून सिअ‍ॅटलसाठी निघणार्‍या कोस्ट स्टारलाइट ट्रेनचे बुकिंग आम्ही केले होते.

युनियन स्टेशनच्या वेटिंग रूमचा हा फोटो विकीवरून साभार.

https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/d/d9/Union-Station-LA-Waiting-Ro.jpg


स्टेशनवर पोहोचताच जाणवले की सामान वाहून न्यायला ट्रॉल्या नाहीत. अन आमचे सामान अंमळ जास्त होते. त्यामुळे सगळे सामान घेऊन आधी तिकीट खिडकीवर चेक इन करावे लागले. नेमके त्या दिवशी विमानतळासारखे बॅगेज चेक इन उपलब्ध नव्हते. मग परत सगळे सामान आणि आम्ही सगळे असे फलाटाच्या दिशेने निघालो. तर फलाटही बर्‍यापैकी लांब होता. फलाटावर पोहोचल्यावर मात्र टीसींनी सर्व सामान रेल्वेत ठेवायला मदत केली. ही ट्रेन डबल डेकर प्रकारची होती. सामान ठेवायची व्यवस्था खालच्या मजल्यावर होती. तसेच बाथरूम्सही खालच्या मजल्यावर होते. आमची आसन व्यवस्था वरच्या मजल्यावर होती. आम्ही वर जाऊन आसनस्थ झालो. रिक्लायनर सीट्स एकदम ऐसपैस होत्या व पायांना आराम वाटण्यासाठी फ्लॅपची व्यवस्था होती. बरोबर १० वाजता गाडीला सौम्य असा धक्का बसला आणि आम्ही मार्गस्थ झालो.

लॉस एंजलिस मागे पडू लागले आणि मन भूतकाळात रमले. लहानपणापासून अनेकदा लहान-मोठे ट्रेनचे प्रवास केले आहेत. पॅसेंजर, मेल, एक्स्प्रेस, राजधानी एक्स्प्रेस इत्यादी. सर्वाधिक प्रवास केला आहे छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेसने. अनेकांची नावडती असली तरी ती माझी आवडती ट्रेन आहे. शेगाव स्टेशन आले की शेगावची प्रसिद्ध कचोरी खायला मिळणे हा त्यातला आनंददायक अनुभव असायचा. ट्रेनमध्ये येणारे विविध विक्रेते, जळगाव-भुसावळ भागांतले अप-डाउन करणारे प्रवासी, तिकिट तपासनिसाबरोबर चालणाऱ्या वाटाघाटी, नगर जिल्ह्यातल्या साखर कारखान्यांच्या शेजारून जाताना येणारे विशिष्ट गंध या गोष्टी स्मृतिपटलावर कायमच्या कोरल्या गेल्या आहेत.

आम्हाला पोहोचायचे होते ते सॅन होजे येथे. ही ट्रेन तिथे पोहोचायची निर्धारित वेळ रात्री आठ वाजताची होती. त्यामुळे प्रवासात निवांत वेळ भरपूर होता. सुरुवातीचा अर्धा तास लेकीने सगळीकडे फिरून लांब पल्ल्याची ट्रेन कशी असते याचे तिचे कुतूहल शमवले. तेवढ्यात घोषणा झाली की जेवण्याच्या रिझर्वेशनसाठी लवकरच नोंदणी होणार. त्याप्रमाणे डायनिंग कारमधील कर्मचार्‍यांनी प्रवाशांजवळ येऊन नावनोंदणी केली. आता थोडे आरामात बसून बाहेरचे निरीक्षण करू लागलो.

ट्रेनच्या खिडकीतून ट्रॅकशेजारच्या वस्त्यांमधल्या घरांचे दर्शन होत होते. बऱ्याच घरांची मागची अंगणे दिसत होती. त्यात छोटेखानी बागा, लहान मुलांची खेळणी, काही ठिकाणी स्विमिंग पूल्सही होते. काही अंगणांमध्ये लिंबांची अन संत्र्याची झाडेही दिसली.

बाहेर आता शहराची वस्ती मागे पडून डोंगराळ प्रदेश सुरू झाला. लवकरच बरबँक एअरपोर्ट हे स्टेशन आले. तिथे जवळच विमानतळाची धावपट्टीही दिसली. इथे थोडा वेळ थांबून पुन्हा मार्गस्थ झालो. आता हिरव्यागार डोंगररांगांबरोबर मळे दिसू लागले. आता सिमी व्हॅली हे स्टेशन आले. इथे स्टेशनलगतच निरनिराळ्या रंगांचे आकर्षक गुलाब फुललेले दिसले.

यानंतर लागलेले सॅन्टा बार्बारा स्टेशन

त्यानंतर आमच्या जेवणाच्या वेळेची घोषणा झाली. आम्ही डायनिंग कारच्या दिशेने निघालो. वाटेत निरीक्षण करत आरामात बसायची सोय आहे. या बोगीत सभोवती छतापर्यंत मोठमोठ्या काचेच्या खिडक्या होत्या. इथे नंतर परत येण्याचे ठरवून डायनिंग कारमध्ये पोहोचलो. तेथील होस्टने आम्हाला आमच्या नियोजित टेबलवर स्थानापन्न केले. अ‍ॅमट्रॅकमधील डायनिंग कारमधे भोजन करणे हा एक अविस्मरणीय अनुभव ठरला. आम्ही आमच्या खाण्याची ऑर्डर देऊन आम्ही बाहेरची दृश्य बघू लागलो. रेल्वे आता प्रशांत महासागराच्या किनार्‍यावरून धावू लागली होती. महासागरावरून उडणारे सी गल पक्षी, सर्फर्स पाहण्यात वेळ छान जात होता.

तेवढ्यात जेवण पुढ्यात आले. ते खाण्यात, गप्पा मारण्यात आणि महासागर पाहण्यात व्यग्र झाल्यामुळे डायनिंग कारचे फारसे फोटो घ्यायचे राहून गेले. आम्ही जालावर इथे मिळणाऱ्या जेवणाचे जे अभिप्राय वाचले होते ते फारसे उत्साहवर्धक नव्हते. परंतु आम्हाला जेवण चवदार वाटले.

मंडळी, या डायनिंग कार हा एक सांस्कृतिक ठेवा आहेत. याचा खरा उद्देश प्रवाशांनी एकमेकांची ओळख करून जेवण घेत गप्पा माराव्यात यासाठी केला. आता मात्र नव्या बदलांच्या वादळात या डायनिंग कार हळूहळू बंद करण्यात येणार आहेत आणि त्याजागी तयार भोजनाची पाकिटे ठेवण्यात येणार आहेत, जी विमानप्रवासाप्रमाणे प्रवाशांनी स्वतःच्या सीटवर बसून खावीत ही अपेक्षा.

प्रवासादरम्यान काही शेतांमध्ये नव्या प्रकारच्या पवनचक्क्या दिसल्या.

बरेचदा किनाऱ्यापासून जवळ प्रशांत महासागरामध्ये खनिज तेलविहिरी दिसल्या. एकदा जमिनीवरच्या तेलविहिरींचेही दर्शन झाले.

जेवण करून परत येऊन बसलो. या रेल्वेमध्ये अधूनमधून घोषणा होत त्या की अ‍ॅमट्रॅकवर आपले स्वागत आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी स्वच्छ बाथरूम्स आहेत! आता परत बाहेर बघत वेळ घालवू लागलो. हिरव्यागार डोंगरांच्या रांगा आणि डोंगरांच्या माथ्यावर उतरलेले ढग. सगळीकडे वसंत ऋतूने बहार आणली होती. डोंगरावर, रस्ताच्याकडेला फुले उमललेली होती. वाटत नव्हते की बरीच वर्ष कॅलिफोर्नियात दुष्काळ होता म्हणून. डोळे ती हिरवाई आणि फुले पाहून निवले. अधूनमधून इतर गाड्यांना आधी जाऊ देण्यासाठी आमची गाडी थांबत होती. असे करीत एकापेक्षा बरेच थांबे झाले. आम्हाला रात्री पोहोचायला उशीर होणार असे वाटू लागले. एक मात्र लक्षात आले की असे थांबे झाले तरी गाडी काही तिची विशिष्ट 'गती' सोडत नव्हती, जेणेकरून वाया गेलेला वेळ भरून निघेल. आमच्या निरीक्षणाप्रमाणे या ट्रेनचा वेग भारतीय ट्रेन्सच्या तुलनेत बराच कमी होता. कदाचित याच कारणाने ट्रेनमधल्या निम्म्याहून अधिक सीट्स रिकाम्या होत्या.

जेवणानंतरच्या प्रवासात प्रशांत महासागरासह ट्रॅकशेजारी गावे-वस्त्या दिसणे पूर्णपणे बंद झाले अन निर्मनुष्य तसेच काही वेळा वैराण प्रदेशही दिसला. या प्रदेशांत आमच्या फोन्सची रेंज पूर्णपणे गेली होती, त्यामुळे सतत ऑनलाइन असण्यापासून एक जरा विश्राम मिळाला.

एक हिरवेगार शेत

त्यानंतर दुपारी खालच्या डेकवरच्या स्नॅक्सच्या दुकानातून कॉफी खरेदी करून निरीक्षण करायच्या बोगीत (ऑब्झर्वेशन कारमध्ये) जाऊन बसलो. इथे खूप छान वेळ गेला. मग परत आपल्या बोगीत आलो. आता बाहेरचे दृश्य बदलू लागले. हिरवेगार डोंगर मागे पडून थोडे वैराण माळराने लागू लागली. लांबपर्यंत पिवळे पडलेल्या डोंगरांखेरीज काहीच दिसत नव्हते. बराच काळ असा गेल्यानंतर मग काही तेलाच्या विहीर दिसल्या. पुढे मग एअरफोर्सचे स्टेशन लागले. इथे फक्त तिथे काम करणारे लोक आणि आमच्यासारखे रेल्वे प्रवासी येऊ शकत होते!तसेच आणखीन पुढे गेल्यावर 'SpaceX' कंपनी लागली.

ऑब्झर्वेशन कारचा हा फोटो जालावरून साभार

http://3.bp.blogspot.com/-SGKqO8UWIWQ/UbUKFLyDsbI/AAAAAAAADbo/L1qRzKEXnrY/s1600/amtrak+observation+car.jpg

डोंगर व पिवळी फुले असलेले माळरान

वळणावर दिसणारे आमच्या ट्रेनचे दृश्य

लांबवर चरणार्‍या गायी

एकदा ट्रेन डोंगरावर असताना पलीकडे कॅलिफोर्नियातल्या एका इंटरस्टेट हायवेचे दर्शन झाले.

बहुतांश प्रवासात आभाळी वातावरण होते, दिवस मावळतीला आल्यावर सूर्यनारायणाचे दर्शन झाले.

अंधार पडण्यापूर्वी पश्चिमेकडे दिसलेला सूर्यास्त

संध्याकाळ होऊ लागली होती आणि परत काही फळबागांच्या रांगा दिसू लागल्या. काही बागांमध्ये पाणी देण्याचे काम चालू होते. संध्याकाळच्या जेवणाच्या वेळेच्या घोषणा होऊ लागल्या होत्या. लवकरच सूर्यास्त झाला. या वेळी आम्ही आमच्या जवळचे खाऊन जेवण करून घेतले. आमचे स्टेशन येण्याची वाट पाहू लागलो. स्टेशन यायला उशीर होणार हे माहीतच होते. उशीर होता होता नियोजित वेळेच्या तब्बल २ तास उशीर होऊन रात्री १० वाजता आम्ही सॅन होजेच्या फलाटावर उतरलो.

संपूर्ण ट्रेनमध्ये स्वच्छता वाखाणण्याजोगी होती. आमचे बरेच असलेले सामान चढवायला अन उतरवायला अ‍ॅमट्रॅकच्या कर्मचाऱ्यांनी मदत केली. इथले स्टेशनच बंद होते व स्टेशनच्या इमारतीला वळसा घालून आम्ही बाहेर पडलो.

इतर कुठल्याही प्रवासापेक्षा मला ट्रेनचा प्रवास अधिक भावतो. ट्रेनला स्वतंत्र मार्ग असतो, जो इतर वाहनांबरोबर वाटून घ्यावा लागत नाही. ट्रेनच्या आत सहजपणे पाय मोकळे करण्याचा पर्याय असतो. ट्रेन धावू लागली की तिच्या हलण्यात अन आवाजात एक प्रकारची लय असते. हिंदी चित्रपट संगीतातही या लयीचा वापर अनेकदा परिणामकारकपणे केला गेला आहे उदा. 'अपनी तो हर आह एक तुफान है' ते 'छैया छैया' इत्यादी. तसेच ट्रेनमध्ये भेटणाऱ्या सहप्रवाशांबरोबर गप्पा रंगण्याची शक्यताही असते. या प्रवासाच्या आनंददायक अनुभवामुळे यापुढेही असेच दीर्घ पल्ल्याचे ट्रेनचे प्रवास करण्याचा मनोदय आहे.

20191016-122815

अनुक्रमणिका

प्रतिक्रिया

चौकटराजा's picture

26 Oct 2019 - 9:49 am | चौकटराजा

या प्रवासाचे व्हिडीओ मी पाहिले आहेत पण आपला कोणी तरी त्या गाडीतून जातोय याचा मनस्वी आनंद झाला. बाहेरचे फोटो ही उत्तम आलेत. जालावरच तो फोटो अचाट आहे.

चौकटराजा's picture

26 Oct 2019 - 9:53 am | चौकटराजा

या प्रवासाचे व्हिडीओ मी पाहिले आहेत पण आपला कोणी तरी त्या गाडीतून जातोय याचा मनस्वी आनंद झाला. बाहेरचे फोटो ही उत्तम आलेत. जालावरच तो फोटो अचाट आहे.

कंजूस's picture

26 Oct 2019 - 10:49 am | कंजूस

डाइनिंग कार पाच ते आठ डब्यांच्या गाड्यांना शक्य आहे. सव्वीस डबेवाल्यांना नाही. छान फोटो. वर्णन आवडले.

जेम्स वांड's picture

26 Oct 2019 - 10:55 am | जेम्स वांड

अमेरिकन रेल्वेज चक्क दोन तास लेट! हे लैच झाले की श्रीरंग दादा! बाकी तुमची वर्णनशैली आणि फोटोग्राफी स्किल्सनं मजा आणली पूर्ण लेखात. ते पिवळ्या फुलांचं पठार तर एकदम कॅलिफोर्नियाचं कास पठार वाटलं मला.

अनुभव कथन आवडले. फोटोही छान.

किल्लेदार's picture

29 Oct 2019 - 4:30 pm | किल्लेदार

वाह... मस्त !!!

पैलवान's picture

29 Oct 2019 - 6:43 pm | पैलवान

आणि प्रवासवर्णन. वेटींग हॉल, observation car , डायनिंग कार पाहून हेवा वाटला .

अवांतर: कितीही नाही म्हटलं, तरी मनात तुलना झालीच. पण असं काही आपल्याकडं करायचं म्हटलं तर तिकीट दर किमान चौपट ते दहापट करावे लागतील, जे कुणालाच रुचणार नाही.

पद्मावति's picture

29 Oct 2019 - 7:10 pm | पद्मावति

वाह, तुम्ही तुमच्याबरोबर आमचीपण छान सफर घडवलीत.

मीअपर्णा's picture

29 Oct 2019 - 9:38 pm | मीअपर्णा

फोटो आणि वर्णन झकास आहे.

वरती अमेरिकन रेल्वे चक्क दोन तास लेट लिहिलं आहे त्यांच्यासाठी, ही रेल्वे नेहमीच लेट असतात. त्यांचे दोन तास तर कमीच वाटताहेत मला. आम्ही ग्लेशियर नॅशनल पार्कच्या वेळी बुकिंगच्याच वेळी काही कारणाने फोन करावा लागला तेव्हा परतीची ट्रेन नेहमी पाच सहा तास उशीरा असते असं आधीच सांगितलं होतं. दुसर्या कुणीतरी त्याचं कारण अ‍ॅमट्रॅकचा स्वतःचा रेल्वे ट्रॅक नाही आहे त्यामुळे मला वाटतं बीएनएसएफ वगैरेच्या मालगाड्या वगैरे सुद्धा ते आधी काढतात आणि ही डुलत डुलत त्यांच्या मागे(च) ठेवतात.असो.
एकदा अनुभव म्हणून आम्ही प्रवास केला मजा आली. ती व्हुइंग कार मस्त आहे. तिथे आमच्या इतर प्रवाशांबरोबर गप्पा, एकमेकांची मुलं खेळणे वगैरे प्रकार झाले जे इतर प्रकारच्या प्रवासात शक्यतो होत नाहीत. मला इथे रेल्वेचा प्रवास महागही वाटला पण ते असोच.

समीरसूर's picture

31 Oct 2019 - 2:53 pm | समीरसूर

उत्तम लेख आणि फोटो! मजा आली.

अनिंद्य's picture

1 Nov 2019 - 10:52 am | अनिंद्य

प्रवास झोकात झालाय.
ऑब्झर्वेशन कारचा हेवा वाटला.
अमेरिकेत(ही) रेल्वे तोट्यातच चालते असे वाचले आहे.

चित्रगुप्त's picture

1 Nov 2019 - 2:39 pm | चित्रगुप्त

अरे वा. मस्त प्रवास, वर्णन आणि फोटो.
अमेरिकेतील एक जुना अग्निरथ:
.

बांधेसूद लेखन आणि त्याला सुंदर फोटोंची जोड!
लेख आवडला, धन्यवाद.

श्वेता२४'s picture

4 Nov 2019 - 4:38 pm | श्वेता२४

फोटोही सुरेख.

मुक्त विहारि's picture

21 Nov 2019 - 11:03 pm | मुक्त विहारि

रेल्वेतील सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे. ..पाय मोकळे करता येतात. .

मित्रहो's picture

22 Nov 2019 - 1:24 pm | मित्रहो

प्रवास छान झाला आणि फोटोही छान होते.
कॅलिफोर्निया माझ्या आपल्या गाड्या घेऊन हिंडा आणि बाजूला बघितले तर आपण कुठेतरी भारत चीन च्या सीमेवर आहोत असा भास. हेच वाटत होते. इथे ट्रेन आहे अशी कल्पना नव्हती पण मागे एकाने सांगितले होते ट्रेन बद्दल. आता नक्की आठवत नाही पण रेल्वेची कहानी रक्तरंजित संघर्षाची आहे असे ऐकले होते.

स्मिताके's picture

22 Nov 2019 - 10:26 pm | स्मिताके

आणि छान फोटो. ऑब्झर्वेशन कारची कल्पना आवडली.

पाषाणभेद's picture

6 Dec 2019 - 1:54 am | पाषाणभेद

लेख वाचता वाचता सुंदर प्रदेशाचा प्रवास घडवला.

श्रीरंग_जोशी's picture

30 Dec 2019 - 2:29 am | श्रीरंग_जोशी

सर्वप्रथम या लेखाचा समावेश यंदाच्या दिवाळी अंकामध्ये केल्याबद्दल निवड समिती चे अनेक धन्यवाद.
सर्व वाचकांचे व प्रतिसादकांचे मनपूर्वक धन्यवाद.

  • चौरा - मनपूर्वक धन्यवाद. तुमच्या युरोप सफरींमुळे माझीही अशीच भावना झाली. माझे जाणे जमेल तेव्हा जमेल पण आपल्या जवळचं कुणी इतका व्यवस्थित आस्वाद घेऊन आलंय याचा आनंद वाटला.
  • जेम्स वांड - अमेरिकेतला इशान्येकडचा व पूर्व किनाऱ्याजवळचा काही भाग सोडला तर उरलेल्या सर्व भागातली रेल्वे सेवा अतिशय विरळ आहे अन कशी बशी चालवली जात आहे.
  • पैलवान - माझ्या मते भारतीय रेल्वेची आव्हाने खूपच वेगळी आहे. कदाचित प्रवाशांची संख्या व घनता या बाबतीत ती जगात सर्वोच्च स्थानी असेल.तसेच गेल्या काही वर्षांत वेगाने सुधारणा होत आहेत असे दिसते.
  • मीअपर्णा - तुमचा अनुभव लिहिल्याबद्दल धन्यवाद. आम्हाला सुदैवाने या प्रवासाची तिकिटे रास्त दरात मिळाली.
  • अनिंद्य - हो काही राज्ये सोडल्यास संपूर्ण अमेरिकेत रेल्वे तोट्यातच चालत आहेत. हाय स्पीड ट्रेन्सचे प्रकल्पही आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य होत नसल्याने एक तर गुंडाळले जात आहेत किंवा ठरल्यापेक्षा लांबी कमी केली जात आहे.
  • चित्रगुप्त - धन्यवाद. हा फोटो पाहून हाऊ द वेस्ट वॉज वन चित्रपट आठवला. शोले चित्रपटातला सुरुवातीचा ट्रेनवरच्या हल्ल्याचे दृश्य या चित्रपटातल्या दृश्यावरून घेतले असावे असे वाटते.

प्रवास वर्णन आणि फोटो दोन्ही आवडले ! :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Teri Meri Dori... ;) - Sonali Vajpayee | Tera Mera Pyar

बापू मामा's picture

11 Feb 2020 - 1:22 pm | बापू मामा

छान लेख आहे. वाचल्यावर मला परत एस.एफ.ओ., एस.जे.एस.च्या आठवणी ताज्या झाल्या .
दत्तात्रय कुंभार