मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बल्लाळरायना दुर्ग

सूड · · दिवाळी अंक

मिपा दिवाळी अंक  २०१९

अनुक्रमणिका


बल्लाळरायना दुर्ग




बंगळुरात तसे ट्रेकला जायचे पर्याय कमीच. जे आहेत तेही मूळ शहरापासून साधारण दोन-अडीचशे किलोमीटर दूर. त्यापैकीच एक नुकताच पाहिलेलं ठिकाण म्हणजे बल्लाळरायना दुर्ग. कन्नडमध्ये 'ना' हा षष्ठी विभक्तीचा प्रत्यय आहे. आपल्या मराठीत सांगायचं तर याचा अर्थ 'बल्लाळरायाचा दुर्ग'. आंतरजालीय माहितीनुसार हा किल्ला होयसळ साम्राज्याचा राजा वीर बल्लाळ याच्या पत्नीने बाराव्या शतकात बांधून घेतला. हे ठिकाण समुद्रसपाटीपासून साधारण १५०९ मीटर उंचीवर वसलं आहे. आपलं स्वतःचं वाहन नसताना इथे जायचं असल्यास कोट्टीगेरे गावात उतरावं लागतं. या गावात खास मंगलोरी पदार्थांचा आस्वाद घेऊन मग निवांत पुढे जाता येऊ शकतं.

पायथ्यापर्यंतचा प्रवास हा सुंदर दुतर्फा हिरवळीतून जातो. दुतर्फा पोफळीच्या, मसाल्याच्या बागा दिसतात.


Photo-Collage-20191012-134924342

Photo-Collage-20191012-134841900

ह्या वळणावळणाच्या साधारण तीनेक किलोमीटरच्या प्रवासानंतर आपण गडाच्या पायथ्याशी पोहोचतो. पायथ्यापासून गडाच्या सुरक्षारक्षकाच्या चौकीपर्यंत पोहोचायला पुढे दीडेक किलोमीटर चालायला लागतं. ह्या वाटेत आपल्याला वेगवेगळ्या तर्‍हेची फुलं, रोपं दिसतात.


3

खालच्या चित्रात दिसतेय तिथे सुरक्षारक्षकाची चौकी आहे. वाट रानातून जात असल्याने आणि कधीकधी या भागात रानटी हत्ती फिरत असल्याने किती माणसं सोबत आली आहेत त्यांची माहिती देऊन वर जाता येतं.


4

गडापर्यंतच्या प्रवासात तर्‍हेतर्‍हेचे कीटकही पाहायला मिळतात, तसंच जळवाही असतात. जळवांपासून खबरदारी घ्यायला, एक भाग डेटॉलसारखं एखादं जंतुनाशक आणि तीन भाग पाणी घेऊन द्रावण करून घेतल्यास बरं पडतं. एखादी जळू चिकटल्यानंतर त्यावर हे द्रावण फवारल्यास जळू लगेच आपल्या शरीरापासून वेगळी होते.
सुदैवाने या प्रवासात आम्हाला जळवा दिसल्या नाहीत, पण हे असे कधी न पाहिलेले कीटक दिसले.


5

6

आम्ही ज्या दिवशी या गडाला भेट दिली, तेव्हा सगळी वाट धुकटात हरवून गेलेली होती. तिथल्या चौकीदारांपैकी एक आमच्या सोबत आला होता त्यामुळे वाट शोधण्यात फारसे अडथळे आले नाहीत.


7

8

देखभालीअभावी गडाचं अस्तित्व दाखवणार्‍या फक्त या अशा काही भिंती शिल्लक आहेत. गड असा म्हणायला फारसा उरला नसला, तरी इथवर पोहोचायची वाट मात्र अतिशय सुंदर आहे.


9

10

गडापासून पुढे चालत गेल्यास पुढे अरबी नावाच्या धबधब्यापाशी पोहोचता येतं.


11

12

रात्री बंगळुरातून निघून सकाळी कोट्टीगेरेमध्ये पोहोचल्यास त्या दिवशीच बंगळुरात परत येता येतं. त्यामुळे शुक्रवारी रात्री सुरू केल्यास शनिवारी परत येता येतं आणि रविवार आराम करायला हाताशी राहतो.


20191016-122815
अनुक्रमणिका

वाचन 6146 प्रतिक्रिया 0