मगं ! आज काय वाचताय ?

Primary tabs

धर्मराजमुटके's picture
धर्मराजमुटके in जनातलं, मनातलं
17 Jul 2019 - 9:45 pm

नमस्कार,
आज काय वाचताय ? हा प्रश्न जरी इतरांना उद्देशून असला तरी तो तितकाच स्वतःला देखील आहे.
तर मग ! आज काय वाचलं ?

पुस्तकाचे नाव : द लास्ट माईल
मुळ लेखक : डेव्हिड बॅल्डासी
मराठी अनुवाद : सायली गोडसे
प्रकाशक : श्रीराम बुक एजन्सी पुणे
किंमत : मी वाचत असलेल्या प्रथम आवृत्तीची किंमत रु. ४५०.०० फक्त
----------------

द लास्ट माईल्स ही एका उदयोन्मुख फुटबॉलपटूची जीवन कहाणी आहे. मेलविन रॉय मार्स वयाच्या विसाव्या वर्षाच्या आतच अमेरिकेतील एक प्रसिद्ध फुटबॉलपटू बनतो. मात्र त्याच्या व्यावसायिक कारकिर्दिच्या सुरुवातीलाच त्याला आपल्या आई-वडीलांच्या हत्येप्रकरणी देहांताची शिक्षा होते. वीस वर्षे तुरुंगात घालविल्यावर जेव्हा त्याच्या देहांताची शिक्षा अंमलात आणण्याची वेळ येऊन ठेपते, त्याच्या काही सेकंद अगोदर कोणीतरी दुसराच ते खुन आपण केल्याची कबुली देतो आणि मेलविनची मृत्युच्या दारातून सुटका होते. मात्र टेक्सास राज्य आपल्याला तुरुंगाबाहेर जाऊ देणार नाही, काही ना काही कारण शोधून आपल्याला परत अटक करतील ह्या भितीच्या छायेखाली तो सतत जगत असतो. त्याच्या सुटकेची बातमी जेव्हा रेडीओवर ऐकवली जात असते तेव्हा ती नेमकी स्पेशल एजंट अ‍ॅमास डेकर याच्या कानावर पडते. तो या प्रकरणातील सत्य शोधण्याच्या कामी लागतो आणि तेथून पुढे ही कादंबरी वेगवेगळी वळणे घेत शेवटाला पोहोचते.

मेलविन निरपराध असतो काय ? जर तो निरपराध असेल तर त्याला यात कोणी गोवले ? अगदी शेवटच्या क्षणी मेलविनने केलेल्या खुनाची जबाबदारी दुसराच कोणीतरी घेतो पण तोही खरा गुन्हेगार नसतो. मेलविनच्या आईवडीलांचा भुतकाळ रहस्यमय असतो, तो कशामुळे ? शेवटी अशा काही गोष्टी उजेडात येतात ज्याची मेलविन आणि तपास अधिकारी डेकर ने कल्पना देखील केलेली नसते.

हे सगळे र हस्य जाणून घेण्यासाठी कादंबरी एक वेळा वाचण्याची शिफारस करतो.

धन्यवाद !

वाङ्मयआस्वाद

प्रतिक्रिया

जॉनविक्क's picture

29 Jul 2019 - 1:41 pm | जॉनविक्क

कारण मेहतांचे पुस्तक मी वाचलेले आहे, त्यातील रेल्वेचा प्रसंग आणि भा.रां. नी लिहलेला टपावरील ऍक्षन चेस सिन प्रसंग जमीन आसमानचा फरक आहे, भागवतांनी त्याचा थरार जसा जिवन्त केला आहे की त्याला तोडच नाही, वाचणाऱ्याला घडणाऱ्या प्रसंगाचे प्रत्यक्ष साक्षिदार बनवायचे अजब कसब त्यांना सिद्ध होते हे नक्की. थ्रिलिंग.

मुक्त विहारि's picture

29 Jul 2019 - 10:12 am | मुक्त विहारि

जेम्स बाँड आणि त्याच्या ललना, हा वाचनाचा विषय नसून, चित्रपट बघण्याचा आनंद लुटण्याचा आहे.

"फ्राॅम रशिया विथ लव्ह" हे पुस्तक वाचले तरी सिनेमातली हिराॅइन जास्त मादक वाटली....

पसंद अपनी अपनी. ....

मुक्त विहारि's picture

29 Jul 2019 - 10:16 am | मुक्त विहारि

जेम्स बाँड आणि त्याच्या ललना, हा वाचनाचा विषय नसून, चित्रपट बघण्याचा आनंद लुटण्याचा आहे.

"फ्राॅम रशिया विथ लव्ह" हे पुस्तक वाचले तरी सिनेमातली हिराॅइन जास्त मादक वाटली....

पसंद अपनी अपनी. ....

धर्मराजमुटके's picture

29 Jul 2019 - 11:41 am | धर्मराजमुटके

जेम्स बाँड आणि त्याच्या ललना

आता ललना पैशाला पासरी झाल्यात. त्यामुळे त्यांचे काही कौतुक नाही.

जॉनविक्क's picture

29 Jul 2019 - 1:42 pm | जॉनविक्क

रशियन व्होडका असतेच परिणाम कारक :)

इरसाल's picture

30 Jul 2019 - 1:32 pm | इरसाल

मी सध्या " इस्रायलची मोसाद" आटोपली, (पंकज कालुवाला)
आता " बॉन्ड.....जेम्स बॉन्ड" चालुय (डॉ. श्रीकांत मुंदरगी)
पुढचे " पहिले महायुद्ध " (दत्ता कुलकर्णी)

समीरसूर's picture

30 Jul 2019 - 2:24 pm | समीरसूर

थॉमस वूल्फ लिखित "यू काण्ट गो होम अगेन" वाचतोय. अमेरिकेत प्रिंट झालेली युज्ड कॉपी आहे. नवीन खूपच महाग होती. ही वापरलेली प्रत मला अ‍ॅमेझॉनवरून दीड महिन्याने मिळाली (रु. ५७० ला). कथानक १९२९-३० च्या दरम्यान घडते. जगण्याची एकच दिशा - पुढची ही या कादंबरीची थिम आहे. कादंबरी १९३८ मध्ये प्रकाशित झाली. इंटरेस्टिंग आहे पण जरा समजायला अवघड आहे.

नुकतीच खालील पुस्तके संपवली:

टू किल अ मॉकिंग्बर्ड - हार्पर ली - एक नंबर पुस्तक!
अ‍ॅनिमल फार्म - एक्सलंट!
द अ‍ॅडवेंचर्स ऑफ टॉम सॉयर - मार्क ट्वेन - आवर्जून वाचावे असे पुस्तक!
विश्वस्त - वसंत वसंत लिमये - चांगले आहे पण काही ठिकाणी अनावश्यक लांबवलेले आहे असे वाटते
यक्षांची देणगी - मस्त!
जेन्सविल - अ‍ॅन अमेरिकन स्टोरी - जीएमचा प्लँट बंद झाल्यावर या गावातील लोकांचे काय होते ही कथा. रिपोर्ताज प्रकारातले पुस्तक. ठीक आहे. खूप खास नाही वाटले पण माहिती रंजक आहे.

प्रचेतस's picture

30 Jul 2019 - 2:51 pm | प्रचेतस

विश्वस्त खूपच रटाळ वाटले.

धर्मराजमुटके's picture

17 Aug 2019 - 8:51 pm | धर्मराजमुटके

नुकतच एस. एल. भैरप्पांचे, उमा कुलकर्णी अनुवादित "मंद्र" वाचून झाले. कादंबरी जवळजवळ ४००-४५० पानांची आहे. (नक्की पृष्ठसंख्या लक्षात नाही). भैरप्पांच्या एक एक कादंबर्‍या बघीतल्या की त्यांची विषयाची जाण बघून थक्क व्हायला होते. ही कादंबरी वाचताना हा लेखक नक्की शास्त्रीय संगीताचा जाणकार असला पाहिजे असे वाटते. उमा कुलकर्णी यांनी भैरप्पांचे सर्वचे सर्व लिखाण इतके सुंदर भाषांतरीत केले आहे की हे लेखन मुळ मराठी की कन्नड इतपत शंका येते.

मोहनलाल एका गरीब घरातला मुलगा आहे जो देवळांसमोर बसून पाठांतर केलेली भजने म्हणून पैसे कमावित असतो. एकेदिवशी स्वामी हरीदास त्याचे गायन ऐकून त्याला आपल्या आश्रमात घेऊन जातात, त्याचे गायनाचे शिक्षण चालू करतात. मात्र स्वामींची गायकी भगवदभक्तीला पुरक असते. ते त्यांचे साधन असते मात्र मोहनलाल ला शास्त्रीय संगीताचा इतका ध्यास जडतो की "गायन हेच जीवन" हे त्याचे सुत्र बनते. पुढील शिक्षणाच्या शोधात इकडे तिकडे भटकत असताना एका मित्राच्या मदतीने ते एका संस्थानाच्या राजाच्या संपर्कात येतात.

हे राजेसाहेब उच्च दर्जाचे गायक असतात आणि ते रोज त्यांच्या कुलाचे दैवत असलेल्या शिवमंदिरात बसून गायन शिकतात. मात्र त्यांना शिकविणारे जे गुरु त्यांना आपला मुलगाच या क्षेत्रात पुढे यावा म्हणून ते राजा साहेबांना हातचे राखून शिकवतात. एके दिवशी राजासाहेबांना त्यांची ही चलाखी माहित पडते तेव्हा ते त्या गुरुंच्या अपरोक्ष त्यांच्या मुलाकडूनही स्वतंत्रपणे गायनाचे शिक्षण घ्यायची सुरुवात करतात. एकेदिवशी गुरुला त्यांची ही गोष्ट माहिती पडते. महाभारतातील द्रोणाप्रमाणे ते देखील गुरुदक्षिणा म्हणून अशी गोष्ट मागतात की राजेसाहेबांच्या संपुर्ण गायन तपश्चर्येवर झाकोळ येतो. त्यांची कला जगापुढे येऊ शकत नाही.

गुरु त्यांना गुरुदक्षिणा मागताना सांगतात की तुम्ही मला वचन द्या की तुम्ही हे मंदिर सोडून इतर कोठेही गायन करणार नाही. राजेसाहेब सर्वगुणसंपन्न / सामर्थ्यशाली असताना देखील गुरुंची आज्ञा अव्हेरु शकत नाहीत. कपटी गुरुदेव एका क्षणांत त्यांचा एकलव्य / कर्ण करुन टाकतात.

तर मोहनलाल या राजेसाहेबांच्या संपर्कात येतात. आपली कला जगापुढे न्यायची असेल तर ती प्रतिभा फक्त मोहनलाल मधेच आहे हे जाणून राजेसाहेब मोहनलालला शिष्य म्हणून स्वीकारतात आणि आपल्याला जे काही येते ते सर्व काही मोहनलालला देतात. तिथून पुढे मोहनलाल एक सर्वसामान्य गायक ते महान गायक पंडीत मोहनलाल असा थक्क करणारा प्रवास करतात.

प्रत्येक संसारी मानव आपला वारसा आपल्या पुत्र / कन्येद्वारे पुढे नेत असतो. तसेच गुरुचा वारसा शिष्याने पुढे न्यायचा असतो. मात्र मोहनलाल आपल्या प्रवासाच्या अंतापर्यंत एकही वारस पुढे आणू शकत नाही. त्याचे कारण म्हणजे त्याची कामवासना. त्याच्या आयुष्यात अनेक स्त्रिया येतात त्यापैकी मधूमिता ही शिष्या त्याची वारस होण्यास पुर्ण पात्र असते मात्र मोहनलालची वासना त्याच्या आड येते. चुन्नी नावाची एका शेतकर्‍याची बायको ( हिला मोहनलाल पासून एक मुलगा आणि मुलगी होते) , राम प्यारी (मोहनलालची अशिक्षित पहिली बायको), चंपा (सुशिक्षित आणि संगीताचे ज्ञान असणारी मात्र व्यवहारापुढे संगीत गौण मानणारी दुसरी बायको), जवाहरी बाई नावाची वेश्या, मनोहारी दास नावाची प्रसिद्ध नर्तिकी, लॉरेन स्मिथ नावाची परदेशी शिष्या अशा अनेक स्त्रिया मोहनलालच्या आयुष्यात येतात आणि निघून जातात.

त्यांना तीन स्त्रियांपासून सहा मुले होतात पण कोणीही संगीताचा वारसा पुढे नेऊ शकत नाही. त्यामुळे वैयक्तीक बाजूने बघता मोहनलाल सपशेल अपयशी ठरतो. संगीताच्या दुनियेत मात्र तो अढळ स्थानावर पोहोचतो. या प्रवासात साथ देणारे वादक, मोहनलाल चे दुर्गुण माहित असून त्याच्यावर / संगीतावर मनापासून प्रेम करणारे श्रोते असा विस्तिर्ण पट घेऊन भैरप्पांनी जी मांडणी केली आहे ती खरोखर थक्क करणारी आहे.

त्यांच्या इतर कादंबर्‍या प्रमाणेच ही देखील दु:खांत असलेली कादंबरी आहे. किंबहुना वाचकाला विषण्ण करणारा अनुभव देणे हेच भैरप्पांचे खरे बलस्थान आहे. त्यांच्या कादंबर्‍यातील नायक / नायिका व्यावसायिक क्षेत्रांत नावाजलेले असतात मात्र वैयक्तीक जीवनात नेहमीच असमाधानी असतात असे जाणवते. किंबहूना कोणतीही धार्मिक शिकवण न देता त्यांच्या कादंबर्‍या वाचल्यावर मनाला काही काळ तरी वैराग्य येते असा माझा अनुभव आहे.

संपुर्ण कादंबरीत अनेक पात्रे आहेत, बरीचशी पात्रे कर्तुत्ववान आहेत, आपापल्या क्षेत्रात उच्च पदाला पोहोचली आहेत. मात्र ती स्खलनशील आहेत. मात्र मला भावलेली पात्रे म्हणजे स्वामी हरीदास आणि राजेसाहेब. त्यांच्या जीवनाला जे नैतिकतेचे अधिष्ठान आहे त्यामुळे ते आपल्या क्षेत्रात भलेही उच्चपदाला पोहोचले नसतील मात्र मनाची शांती राखून आहेत.

ही कादंबरी वाचल्यावर अचानक पणे मला शास्त्रीय संगीतात देखील गोडी वाटू लागली. अर्थात मी केवळ आरंभशूर आहे त्यामुळे हे वेड जास्त दिवस टिकेल असे वाटत नाही. बघू या काय होते ते....! शिवाय ह्याची उपासना करणारे वयाच्या ४-५ व्या वर्षापासूनच सुरुवात करतात. आता आपल्याला ह्या वयात एखाद दुसरा राग ओळखता आला तरी पुरेसा आहे इत पत निष्कर्षापर्यंत मी आलो आहे.

एकदा केवळ वाचावी एव्हढेच नव्हे तर संग्रही असावी अशी ही कादंबरी आहे. एकदा जरुर वाचा अशी शिफारस करतो.

यशोधरा's picture

17 Aug 2019 - 9:07 pm | यशोधरा

मलाही खूप आवडली होती ही कादंबरी.

मायमराठी's picture

18 Aug 2019 - 12:39 am | मायमराठी

एक वेगळं पुस्तक सुचवू का?
"पाप्याचं पितर" - हर्षद सरपोतदार, श्रीविद्या प्रकाशन, पुणे.
खूपच ताजा, खुमासदार विनोद. विषय सांगून चव घालवत नाही. एकदा तरी हसता हसता डोळ्यातून पाणी येईल वगैरे असं काहीतरी आहे.

हे नुकतंच वाचून संपवलं.

book

गोविंद सखाराम सरदेसाई आणि जदुनाथ सरकार यांच्या पत्रव्यवहार यावर ते आधारित आहे.

एक दोन प्रकरणं थोडी जड आहेत वाचायला, पण बाकी सुरेख.

धर्मराजमुटके's picture

20 Aug 2019 - 8:57 am | धर्मराजमुटके

'द व्हाईट टायगर' हे अरविंद अडिगा लिखित, लीना सोहोनी अनुवादित पुस्तक वाचले. वाराणसीतील एक गरीब मुलगा चीनच्या राष्ट्राधक्षांना आपली कहाणी सांगतोय अशा स्वरुपात लिखाण आहे. बलराम हलवाई हा मुलगा एका मोठ्या उद्योगपतीकडे ड्रायव्हर म्हणून कामाला लागतो. एके दिवशी मालकाचा खुन करुन त्याचे पैसे घेऊन पळून जातो आणि नंतर मोठा उद्योगपती बनतो अशी साधारण कहाणी आहे.
पुस्तक नाही वाचले तरी चालण्यासारखे आहे.

... तेव्हा मूळ इन्ग्रजी मिळवून वाचलेलं... बंडल आहे!

मारियो पुझोचं 'द गॉडफादर' परत एकदा वाचायला सुरुवात केलीय. मार्क वाइनगार्डनर ह्याने 'द गॉडफादर' चा सिक्वेल 'द गॉडफादर रिटर्न्स' ह्या कादंबरीद्वारे आणला होता. तो वाचण्याआधी द गॉडफादर पुन्हा एकदा वाचून स्वत:ला रिफ्रेश करुन घेतोय.

जॉनविक्क's picture

20 Aug 2019 - 5:30 pm | जॉनविक्क

प्रचेतस's picture

20 Aug 2019 - 5:34 pm | प्रचेतस

मराठी अनुवाद

धर्मराजमुटके's picture

20 Aug 2019 - 8:40 pm | धर्मराजमुटके

"द गॉडफादर" मस्त आहे. पण 'द गॉडफादर रिटर्न्स' फारच रटाळ वाटले मला. परत त्याच्या वाटेला जाणार नाही.

जॉनविक्क's picture

20 Aug 2019 - 9:31 pm | जॉनविक्क

इनकेस मूड आला तर आमिर खान, रजनीकांत अभिनित आतंक ही आतंक तुनळी वर बघू शकता. बॉलीवूड ने त्याची भ्रष्ट नक्कल केली आहेच.

mayu4u's picture

20 Aug 2019 - 5:55 pm | mayu4u

वि स वाळिंबे यांचं "वॉर्सा ते हिरोशिमा" वाचतोय.

गेल्या आठवड्यात शेहान करुनतिलका चं "चायनामन" (दुसर्‍यांदा) संपवलं.

त्या आधी अ‍ॅंडी वीर (वियर?) चं "द मार्शियन". आधी चित्रपट पाहिला. पुस्तक (अर्थातच) सरस आहे!

धर्मराजमुटके's picture

29 Aug 2019 - 7:56 pm | धर्मराजमुटके

पुस्तकाचे नाव : शोध
लेखक : मुरलीधर खैरनार
प्रकाशक : राजहंस प्रकाशन
किंमत : रु. ५०० फक्त

१६७० साली शिवाजी महाराजांनी दुसर्‍यांदा सुरत लुटली मात्र तो खजिना स्वराज्यात आणताना त्यातला बराचसा मोठा भाग गडप होता. थोडे सत्य, बरेचसे काल्पनिक मुद्दे वापरुन लिहिलेली ही रोचक कादंबरी आहे. वाचताना मजा आली. कुठेही कंटाळा आला नाही. एकदा वाचावी आणि संग्रही ठेवावी अशी कादंबरी आहे हे नक्की.

mayu4u's picture

30 Aug 2019 - 10:29 am | mayu4u

ही डौन्लोडवली आहे. लिष्टीत अ‍ॅडवतो.

सतिश गावडे's picture

12 Sep 2019 - 11:22 am | सतिश गावडे

मोफत उपलब्ध असेल तर दुवा मिळेल का?

mayu4u's picture

14 Sep 2019 - 5:48 pm | mayu4u

... भरपूर पुस्तकं मिळतिल.

ज्ञानोबाचे पैजार's picture

30 Aug 2019 - 11:57 am | ज्ञानोबाचे पैजार

काही दिवसांपूर्वी एका पुस्तक प्रदर्शनात सहज चाळले आणि बरे वाटले म्हणून विकत घेतले.
इतिहास वगेरे काही डोक्यात न ठेवता एक कादंबरी म्हणून वाचले तर जबराट पुस्तक आहे.
पैजारबुवा,

लेखकाने दिलेल्या क्रेडीट्स मध्ये बॅटमॅनचे नाव आहे :)

GOD DELUSION
या पुस्तकाचा मुग्धा कर्णिक यांनी केलेला अनुवाद वाचतोय. देव नाकारताना निव्वळ एकाच धर्माला टार्गेट केले जाते अशी ओरड करणाऱ्या लोकांनी तर अवश्य वाचावे असे पुस्तक आहे.

सतिश गावडे's picture

12 Sep 2019 - 11:20 am | सतिश गावडे

माझ्याकडे इंग्रजी प्रत आहे. मराठी प्रतीतील भाषांतर कसे आहे? किंमत किती आहे?

जॉनविक्क's picture

12 Sep 2019 - 12:09 pm | जॉनविक्क

भाषांतर चांगलेच आहे. फक्त (बायबलचे आणि इतर ग्रंथांचे) संदर्भ उतारे वाचताना विषयाची आवड अपेक्षित आहे. अन्यथा दीर्घ वाचन करून आपण नक्की नवीन असे काय समजून घ्यायचा प्रयत्न करतोय असे वाटू शकते.

सतिश गावडे's picture

12 Sep 2019 - 3:32 pm | सतिश गावडे

होय होय आवड आहे. अशीच जवळपास सोळाशे पुस्तकं संग्रही आहेत. :)

आम्हाला सहा पुस्तके वाचता वाचता डोक्यावरुन पाणी जाते अन तुम्ही अशी जवळपास सोळाशे बुक्स पालथी घातली ? कमाल आहे.

त्यातील टॉप 61-62 पुस्तके सांगू शकाल का ? तुमच्या नजरेतुन ?

सतिश गावडे's picture

15 Sep 2019 - 8:47 am | सतिश गावडे

त्यातील टॉप 61-62 पुस्तके सांगू शकाल का ?

लोक शक्यतो ५०-६० अशा संख्या वापरतात. तुम्ही उल्लेख केलेल्या ६१-६२ या जादूई संख्या रोचक आहेत. जर त्या त्याच कुत्सित हेतूने वापरल्या असतील तर अवघड आहे. :)

जॉनविक्क's picture

15 Sep 2019 - 2:34 pm | जॉनविक्क

खरे तर 75 पुरेसे होते.

पण एखादी राउंड फिगर सोडून (कुत्सित अर्थाने न्हवे बरेका) मुद्दाम ऑड संख्या दिली की सोर्टइंग करणाऱ्याचा खरा कस लागतो व चोख सोनेच निर्माण होते असा अनुभव आहे. पण पुन्हा संख्या ऑड असावी की इव्हन हा निर्णयही तुम्ही घ्यावा ज्यातून अपेक्षित Search Result मिळेल म्हणून 61 की 62 हे तुमच्यावर सोडले.

खरे तर कुत्सितपणे जरी विचारले असते तरी तुम्हाला योग्य उत्तर देणे अजिबात अवघड नाही पण ते सोडून तुम्ही...

असो अचानक उपटलेला हा कुत्सितपणा मनातून बाजूला जाऊदे आणी आपली लिस्ट येऊदे. अतिशय उत्सुकता आहे.

mayu4u's picture

14 Sep 2019 - 5:49 pm | mayu4u

... वाचलं आणि आवडलं आहे.

कुमार१'s picture

20 Sep 2019 - 4:02 pm | कुमार१

अच्युत गोडबोलेंचे 'गुलाम' वाचतोय. त्यात स्पार्टाकस ते ओबामा हा पूर्ण इतिहास आहे.

सगळे तपशील वाचवणार नाहीत. भयानक.
आधी शेवटचे ओबामा प्रकरण वाचले. त्यांच्या आईचा तरुण फोटो काय देखणा आहे.

धर्मराजमुटके's picture

20 Sep 2019 - 8:57 pm | धर्मराजमुटके

पुस्तकाचे नाव : शोधितो मार्ग स्वप्नाचा
मुळ मल्याळी लेखक : सी. राधाकृष्णन्
मराठी अनुवाद : धनश्री हळबे
प्रकाशक : साहित्य अकादमी

एकाच दिवशी ठिकठिकाणी प्रचंड स्फोट घडवून आणून सारी वैज्ञानिक केंद्रे उध्वस्त करुन पुन्हा नव्याने सुरुवात करायची आणी सर्व सत्ताकेंद्रे वैज्ञानिकांच्या हाती आणायची असा साधारण कादंबरीचा विषय आहे. कादंबरीस साहित्य अकादमी चा पुरस्कार प्राप्त झाला आहे.

गणेशोत्सवाच्या अगोदर हे पुस्तक आणले होते, त्यानंतर १० दिवस धावपळीत गेले आणि पुस्तकास हात लावायसास जमले नाही. ५३२ पानांची कादंबरी मी जेमतेम ७०-७५ पानांपर्यंत वाचून हार मानली. कदाचित माझ्या चित्तवृत्ती थार्‍यावर नसतील. पुस्तकाची समीक्षा करणे उचित होणार नाही. उद्या ही कादंबरी बदलून आणायचे ठरवले आहे.

कोणी ही कादंबरी वाचली आहे काय ? असेल तर आपले अभिप्राय लिहा…

कुमार१'s picture

24 Sep 2019 - 6:25 pm | कुमार१

पुस्तकाचे नाव : सेपिअन्स
मुळ लेखक : युव्हाल हरारी
मराठी अनुवाद : वासंती फडके
पाने ४४५
प्र. : डायमंड पब्लिकेशन्स
किंमत : रु ५००.

हे पुस्तक मानवजातीचा अनोखा इतिहास वर्णन करते. इतिहासात डॉक्टरेट केलेल्या या लेखकाचे हे अभ्यासपूर्ण पुस्तक. या विषयावरील एकूण ३ खंड प्रकाशित झालेले आहेत. त्यातला हा पहिला. संशोधनात्मक पुस्तक असल्याने दिवसाला ६ पाने या गतीनेच वाचणार आहे. एकदम जास्त झेपत नाही !

धर्मराजमुटके's picture

26 Sep 2019 - 2:57 pm | धर्मराजमुटके

२००६ ची जगभरातील वर्तमानपत्रे पाहता त्यात भारतीय वंशाचे आणि ब्रिटनमधे स्थायिक असलेल्या लक्ष्मी मित्तल यांची मित्तल स्टील आणी लक्सेम्बर्ग या छोट्याश्या देशातील आर्सेलर ही बलाढ्य पोलाद कंपनी यांच्या विलीनीकरणाच्या सुरस कथा आपल्यापैकी बर्‍याच जणांनी वाचल्या असतील.
आर्सेलर वर ताबा मिळविण्यासाठी तब्बल सहा देश, खुद्द आर्सेलर, आपल्या क्षेत्रातील इतर प्रतिस्पर्धी यांच्याशी लढून यश पदरात पाडून घेणार्‍या मित्तल यांची ही अद्वितीय कहाणी आहे. पुस्तक उत्कंठावर्धक आहे.

पुस्तकाचे नाव : कोल्ड स्टील
मुळ लेखक : बायरॉन उसी
मराठी अनुवाद : सुभाष जोशी
प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस
किंमत : रुपये ३००.०० (मी वाचलेल्या आवृत्तीची किंमत)

धर्मराजमुटके's picture

2 Apr 2020 - 12:58 pm | धर्मराजमुटके

श्री कृष्ण अक्षरी - वर्णमालेतील अक्षरे अ ते ज्ञ पर्यंत क्रमाने घेऊन त्यातून दोहे लिहायचे ही आणी त्यातून वर्णन केलेली कृष्णलिला मोठी सरस आहे.

हा दुवा :

तेजस आठवले's picture

2 Apr 2020 - 4:56 pm | तेजस आठवले

लॉकडाऊन काळात पु. ल. देशपान्डे लिखित "गोळाबेरीज" हे पुस्तक वाचून झाले. ठीकठाक आहे. आता 'माझा साक्षात्कारी ह्रुदयरोग' वाचणे चालू आहे.

जेम्स वांड's picture

13 Apr 2020 - 12:54 pm | जेम्स वांड

माझा साक्षात्कारी हृदयरोग वाचताना डॉ.नितु मांडकेंचे बीजे मेडिकलमधील कॉलेजजीवन वाचू लागलो की हमखास हल्लीच सुप्रसिद्ध झालेल्या कबीर सिंग किंवा अर्जुन रेड्डीमधील नायक आठवतात एकदम, विलक्षण टॅलेंटेड, विलक्षण तिरसट, विलक्षण तापट पण सर्जरीमध्ये बाप माणूस!

धर्मराजमुटके's picture

4 Apr 2020 - 8:02 pm | धर्मराजमुटके

लोकसत्तामधील हा वाचनीय लेख

चौकस२१२'s picture

11 Apr 2020 - 6:38 pm | चौकस२१२

"आपला स्वतःचा समाज कसा सुधारता आहोत हे दृश्य स्वरूपामध्ये दाखवण्याची जबाबदारी लिबरल मुस्लिमांनी उचलावी. यातून हिंदूंचे हळूहळू मन परिवर्तन होणे शक्य आहे. आधी आत्मपरीक्षण करून आपल्या चुका स्वीकाराव्यात आणि नंतर त्याप्रमाणे सुधारणा कराव्यात. "
इथपर्यंत ठीक हा घरचा आहेर पण लगेच पुढील.. दोष परत हिंदूंवरच
" मात्र सध्या समाजामध्ये एकूणच वाढत असलेल्या मुस्लिम समाजाबाबतच्या विद्वेषामुळे समाजाला आत्मपरीक्षण करणे मुश्कील होऊन बसले आहे"
आज जगभरात बघा का ईसमोफोबिया वाढलं आहे ते? केवळ भारतात नव्हे, यांचे सगळ्यांशीच का भांडण? बुद्ध, शीख , ख्रिस्ती धर्माशी तर शतकानुशतके ..आणि जु न याबरोबर तर काय ... याचा पण विचार हे शेख करतील का?

सूक्ष्मजीव's picture

11 Apr 2020 - 5:29 pm | सूक्ष्मजीव

नामदेवराव जाधव यांचे 'गनिमी कावा' हे पुस्तक आताच संपवले.

राम गुहा यांचे 'मेकर्स ऑफ मॉडर्न इंडिया चालू आहे.