1

अंधाधुंद

Primary tabs

मित्रहो's picture
मित्रहो in जनातलं, मनातलं
12 Jul 2019 - 11:48 pm

जरा जास्तच दिस झाले आपल काही बोलण झाल नाही. पण आता का करता जी उनच अस तापल होत का काही लिहूशाच वाटत नव्हत. वरुन लगनसराईचा टाइम तवा टायमच नव्हता. म्या इचार केला पाउस पडून जाउ दे मंगच बोलू. पाउस बी असा दडी मारुन बसला का बोलाच काम नाही. अख्या मिरग गेला पण येक थेंब पावसाचा पता नाही. आता कोठ दोन पाणी झाले. पऱ्हाटी टोबली आन म्हटल आता तुम्हाले सांगतो मायी गोष्ट. मायी लय मोठी पंचाइत झालती राजेहो. आजकाल आमच्यासारख्या गाववाल्यायले शिनेमे पायन कठीण होउन गेल. लय बेक्कार दिस आले पाहा. पिक्चर पायला तर डोक्याले झिणझिण्या आल्या. नाही म्हणाले साहा महिने तरी झाले असन. आमच्या गावचा नथ्थू पाटील तो पिंपळाच्या वावरवाला, कावीळान मेला. तस म्हातारं खाटेवरच होत. त्याची तेरवी होती नागपूरले, म्या मारत्या आन गावातले दोनचार पोट्टे गेलतो. तेरवीची खीरगीर खाल्ली. आता हिंगणघाटले जाउन बी का कराच म्हणून तेथच मॉलमंधी म्या आन मारत्या पिक्चर पाहाले गेलो.

आम्ही पायला अंधाधुन, आन अस डोक सटकल म्हणता का काही इचारु नका. पिक्चरच नावच समजत नव्हत. आता तुम्ही म्हणान जानराव ते नांव अंधाधुन नाही अंधाधुंद असन. मले बी तसच वाटल होत. आपण पेपरात वाचत नाही का अंधाधुंद गोळीबार, अंधाधुंद कारभार तसच काहीतरी अंधाधुंद असन बा. पण नाही ते अंधाधुन असच होत. मले सांगा अंधाधुन म्हणजी का? दिवार म्हणजी भित, कुली म्हणजी हमाल, बॉडीगार्ड म्हणजी बाडीगार्ड तस अंधाधुन म्हणजी का? आपण आपल्या पोराच नाव बी इचार करुन ठेवतो. येथ हे पिक्चरचे नाव अस ठेवून रायले. जेथ नावच नाही समजल तेथ पिक्चर का समजन जी. अस फसल होत माणूस. मोंबइच्या गर्दीत दम घुटते ना तसा दम घुटल्यवाणी वाटत होत. एशी नसता तर कवाच उठून परालो असतो. मले समजतच नव्हत आपण येथ पिक्चर पाहाले आलो सारेचा पेपर सोडवाले आलो ते.

पिक्चरमंधी का पायजे येक हिरो, येक हिरोइन आन येक गुंडा. हिरो हिरोइनच लगन होते आन गुंडा मरते नाहीतर जेलात जाते. आजवरी कधी अस पायल का बंदा पिक्चर पायला पण आपल्याले समजलच नाही हिरो कोण हाय आन गुंडा कोण हाय ते. भाउ हाय, भाई हाय म्हणजे हिरो जो कोणी यायले तरास देइन तो गुंडा. साध गणित रायते. आस साध गणित कठीण काहून कराच म्हणतो मी? या पिक्चरमंधी बंदे नवे अॅक्टर हायेत, येक तब्बू सोडली तर कोणी वळखीच नाही. ते तब्बू बी कोठ आठवते जी आता. नवे तर नवे आम्ही का नाही म्हणतो. त्यायच वागण त्याहून इचित्र काही समजत नाही. परिक्षल्या बसल्यावाणी येकच प्रश्न पडत होता या शिनमाचा हिरो कोण हाय आन गुंडा कोण हाय. पिक्चर संपला पण अजून समजल नाही हिरो कोण आन गुंडा कोण.

आम्हाले का पिक्चर समजत नाही म्हणता का. पिक्चर तीन टाइपचा रायते येक बदला, बदला म्हणजे हिरोइनचा बाप हिरोच्या बापाले मारते. मंग मोठा झाल्यावर हिरो हिरोइनच्या बापाले मारुन नाहीतर त्याले जेलात टाकून त्याचा बदला घेते. तरीबी हिरोइन त्या हिरोशीच लगन करते. दुसर लव स्टोरी येखाद गरीब पोट्ट कोण्या अमीराच्या पोरीच्या प्रेमात पडते. कोण्या पोरीचा बाप अशा लगनाले तयार होइल तो नाही म्हणते मारामाऱ्या होते, रडारडी होते आन मंग येकतर हिरो हिरोइन दोघबी मरते नाहीतर दोघ सुखान लगन करते. तिसर रायते सस्पेंस पिक्चर त्याच्यात पहिल्यांदी मर्डर होते आन पिक्चरच्या येंडंमधी हिरो त्या मर्डरचा तपास लावते. बंद समजावून सांगते कोण मर्डर केला, कसा मर्डर केला आन काहून मर्डर केला. ज्यायन ज्यायन हा पिक्चर पायला त्यायन मले सांगा अंधाधुन कोण्या टाइपचा हाय. याच्यात ना बदला हाय ना लव्ह स्टोरी होती, ना सस्पेंस.

एक पोरग हाय नाही म्हणजे जेवढे दिसले त्यात तोच एक चिकना होता, त्यान येक गाण बी म्हटल तवा तो हिरो असन. तो आंधळा रायते. त्याच्यासंग येक पोरगीबी फिरते. म्या म्हटल मारत्याले

"मारत्या पाय लय गहरी लव ष्टोरी हाय. नवा हिरो हाय नवी हिरोइन हाय. आता अमीरीगरीबीचा जमाना गेला. येथ हिरो आंधळा हाय म्हणून हिरोइनचा बाप लग्नाले नाही म्हणन पायजो. ”
"नवे कोठचे जी जानराव. म्या टिव्हीवर गाणे पायले याचे. हे हिरोइन तर तो आपला लयाभारीवाला माऊली नाही त्याची हिरोइन व्हय.”
"मारत्या लेका मायाच पैशान पिक्चर पायते आन मलेच शिकवते का बे?”
"शिकवत नाही जी म्या पायल ते सांगून रायलो.”
“माया पॉइंट काय हाय तो आंधळा हाय म्हणून तिचा बाप नाही म्हणन. मले अस बी वाटून रायला तो म्हातारा नाही त्याचा त्या पोरीवर डोळा असन.”
"काहून जी?”
"अबे येका विलनन नाही होत आजकाल अजून येखादा सोबतीले लागते. तवा कोठ हिरोची पावर दिसते.”
"हे बारक का पावर दाखवनार हाय. येक गचांडी देली का लंब होते.”
"मले शिकवू नको तू.”

म्या अस वरडून मारत्याले चूप केल. म्या कितीबी बोंबललो तरी मारत्याच बराबर होता. पिक्चरची ष्टोरी मायीच गंडली होती. हिरो काय आंधळा राहत नाही नाटक करते लेकाचा. हिरोइनले समजते न ते त्याले सोडून जाते. तुम्ही म्हणान का जानराव पिक्चरचा मजाच खराब केला. अशी ष्टोरी सांगतली तर आम्ही पिक्चर कायले पाहाचा. तुम्हाले सांगतो हा पिक्चरचा येंड नाही हे स्टार्टिंगलेच हाय. येथूनच मोरं का होते ते त्याचा काही म्हणता काही पता लागत नाही. कोण आंधळा हाय कोणाले डोळे हाय, कोण चांगला हाय कोण वांगला हाय काही समजत नाही. बंदा पिक्चर संपते पण कायचाबी पता लागत नाही. असा कोणता सस्पेंस रायते का बा पिक्चर संपला तरी समजत नाही.

मले सांगा माणूस पिक्चर कायले पायते डोक्याले ताप द्यायले का डोक शांत कराले. येखादा हिरो येखादी हिरोइन त्यायच लव्ह, येखाद दोन डायलाग आन दोनचार फायटा झाल अजून का पायजेन जी? असा साध सोप सोडून हे अस भलतसलत कायले बनवते का बा? या पिक्चर बनवऱ्याले का वाटते आम्ही रिकामटवळे आहोत, आम्हाले काही कामधंदे नाही. तवा द्या यायच्या डोक्याले ताप लावून. लय म्हणजे लयच डोस्क दुखाल. म्हणून म्हणतो राजेहो आताच्या जमान्यात आम्हा कास्तकाराले आता पिक्चर पाहाचीबी सोय राहिली नाही. अशी पंचाइत झाली हाय पाहा.

लिहिनार
जानराव जगदाळे
ता. हिंगणघाट जिं. वर्धा

मित्रहो
https://mitraho.wordpress.com/

विनोदलेख

प्रतिक्रिया

सोत्रि's picture

13 Jul 2019 - 7:23 am | सोत्रि

झक्कास!

- (अंधाधुंद झालेला) सोकाजी

पिंट्याराव's picture

13 Jul 2019 - 1:12 pm | पिंट्याराव

झक्कासच लिहिलंय. एक नंबरी.

पिंट्याराव's picture

13 Jul 2019 - 1:12 pm | पिंट्याराव

झक्कासच लिहिलंय. एक नंबरी.

धमाल होता. प्रत्येकालाच चांगल्या वाईट अशा दोन्ही बाजू असतात आणि हे त्यात धक्कातंत्र वापरून व्यवस्थित दाखवले आहे, बालसंस्कारासाठी नायकांच्या आदर्शीकरणाचे दिवस गेले आता

मित्रहो's picture

13 Jul 2019 - 11:49 pm | मित्रहो

सोत्रि, पिंट्याराव, जॉनविक्क प्रतिसादाबद्दल धन्यवाद

गड्डा झब्बू's picture

14 Jul 2019 - 3:27 am | गड्डा झब्बू

भैताड पिक्चर होता!
भारी लिहिलंय.

जुइ's picture

14 Jul 2019 - 4:20 am | जुइ

जमलय अगदी!

मुक्त विहारि's picture

14 Jul 2019 - 10:05 am | मुक्त विहारि

एकदम खुसखुशीत परीक्षण. ...

खूप दिवसांनी आमची व्हराडी भाषा वाचली.

मज्जा आली. ....

उगा काहितरीच's picture

14 Jul 2019 - 12:45 pm | उगा काहितरीच

मस्त लिहीलंय ! भाषा व्य व स्थि त जमली आहे.

जालिम लोशन's picture

14 Jul 2019 - 2:55 pm | जालिम लोशन

:-)

सस्नेह's picture

14 Jul 2019 - 3:21 pm | सस्नेह

नंबरी... व-हाडी पंचनामा =))

मित्रहो's picture

15 Jul 2019 - 10:07 am | मित्रहो

प्रतिसादाबद्दल धन्यवाद स्नेहांकिता, जालिम लोशन, उगा काहितरीच, मुक्त विहारि, जुइ, गड्डा झब्बू.

उपेक्षित's picture

15 Jul 2019 - 11:35 am | उपेक्षित

गेल्या काही वर्षातील उत्तम चित्रपटांपैकी असलेल्या 'अंधा-धून' बळच पीस काढल्यासारख वाटत आहे, बाकी वर्हाडी भाषा वाचायला गोड वाटते त्याबद्दल तुमचे आभार.

अभ्या..'s picture

15 Jul 2019 - 4:16 pm | अभ्या..

सहमत आहे,
आणि ते ही चाराण्याची कोंबडी(समीक्षण) आन बाराण्याचा मसाला ( बाकी लेख) झालाय.

नाही हो अभ्या भाऊ, मला तर उलट मसाला कमी आहे असेच वाटले. समीक्षण वगैरे जानरावचे काम नाही. मसाला आणि फक्त मसाला हवा.
भट्टी हवी तशी जमली नाही हे कबूल आहे. याची कल्पना होती. कथा फारशी न सांगता काय लिहायचे ते चार महिने सुचले नाही. लेखकाच्या कल्पनाशक्तीच्या मर्यादा दुसरे काय. बघू पुढल्या वेळेला.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद उपेक्षित, अभ्या

Namokar's picture

15 Jul 2019 - 7:34 pm | Namokar

भारी लिहिलय ..

मित्रहो's picture

16 Jul 2019 - 7:05 am | मित्रहो

प्रतिसादाबद्दल धन्यवाद Namokar