कुत्रत्वाचे नाते (?) नाण्याची दुसरी बाजू

बाप्पू's picture
बाप्पू in जनातलं, मनातलं
13 Jul 2019 - 3:19 pm

कुत्रा हा माणसाचा सर्वात जवळचा मित्र आहे. इमानी आहे, प्रेमळ आहे, अमुक करतो, तमुक करतो इ इ आपण https://www.misalpav.com/node/44832 या आणि अश्या अनेक धाग्यावर आणि प्रतिक्रियांमध्ये वाचलेच असेल..

पण ज्या न्यायाने प्रत्येक माणूस एकसारखा नसतो त्याच्या न्यायाने प्रत्येक इतर प्राणी देखील एकसारखा नसतो. उदा. काही बैल आपल्या मालकाशी प्रेमाने वागतात तर काही बैल समोर येईल त्याला डोक्यावर घेतात. मग तो मालक असो वा आणखी कोणी..
मग कुत्रा देखील याला अपवाद कसा असेल??

काही लोक भटक्या तसेच पाळीव कुत्र्यामुळे होणाऱ्या समस्यांकडे कसे काय दुर्लक्ष करू शकतात बुवा?? नाही.. मान्य आहे कि तुम्हाला आणि तुमच्यासारख्या इतर बऱ्याच लोकांना कुत्रा, कुत्री, पिल्ले, त्यांचे झुंड आवडतात तर काहींना ते धार्मिक कारणांमुळे प्रिय आहेत पण.... पण फक्त ते तुम्हाला आवडतात म्हणून त्यांनी निर्माण केलेल्या समस्या तुमच्या सह इतर सर्व 100 टक्के लोकांनी सहन का करायच्या??? आता तुम्ही म्हणाल कि कोणत्या समस्या... तर त्या समस्या खालीलप्रमाणे आहेत.

1) कुत्र्यामुळे आजूबाजूला होणारी घाण वा दुर्गंधी
2) कुत्र्याने चावा घेतल्यामुळे होणारा जीवघेणा आजार - रेबीज. हा आजार होण्यासाठी कुत्र्याने चावणे गरजेचे नाही. त्याच्याशी खेळताना (?) त्याचे लाडे लाडे करताना त्याची लाळ उघड्या जखमेद्वारे आपल्या रक्तप्रवाहात गेली तरी पुरे..

3) कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडणारे वृद्ध व लहान मुले.
कोल्हापूर येथील कचरा डम्पिंग च्या बाजूला असणाऱ्या झोपडपट्टी मध्ये एका लहान मुलीच्या उडवलेल्या चिंधड्या डोळ्याने पाहिलेल्या आहेत. अशी हजारो उदाहरणे सापडतील

4) दुचाकी व चारचाकी वाहनांचे होणारे अपघात. यात अनेक जण जायबंदी झाले तर बरेचसे मृत्यमुखी सुद्धा पडले.
माझा एक मित्र अश्याच अपघातामुळे एका पायाने कायमचा अधू झालाय.

5) कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे वयोवृद्ध, आजारी व्यक्ती, विद्यार्थी यांना होणारा त्रास.

आता हे सर्व त्रास मी काही माझ्या मनाचे सांगत नाहीये.. हे सर्व रिअल आहे. आता या सर्व त्रासांच्या मुळाशी न जाता जे काही प्रवचन या धाग्यावर या धाग्यावर दिले गेले जसे कि त्यांना बिस्किटे चारा, दूध पाजा, गोंजारा, प्रेम करा, कुत्रे दिसल्यावर खाली बसा, पळू नका, या सर्वात माणसाचीच चूक आहे इ इ... या सर्व बडबडीला प्रॅक्टिकली काहीही अर्थ नाहीये.!!

मुळातच हि समस्या का निर्माण झाली याची करणे पाहू

1) मनपा आणि इतर govt संस्थांचे लसीकरण व निर्बीजीकरणाकडे केले जाणारे दुर्लक्ष.
2) कुत्राप्रेमी लोकांनी काहीबाही खाऊ घातल्यामुळे त्यांच्या नैसर्गिक वृत्तीत झालेला बदल आणि त्यांचा वाढलेला fertility rate

या दोन गोष्टिकडे साफ दुर्लक्ष करून हे कुत्राप्रेमी इतर सर्वाना बदलण्याचे आवाहन का करतात? म्हणजे तुम्हाला कुत्रे आवडतात म्हूणन तुम्ही त्यांनी निर्माण केलेल्या समस्यांकडे, त्रासाकडे दुर्लक्ष करायचे, आणि इतर सर्वांनी हि तेच करायला पाहिजे अशी बळजबरी का?

आणि तुम्ही जर खरेच कुत्रा प्रेमी असाल तर त्यांनी केलेली घाण देखील साफ करण्याची तयारी दाखवा कि मग..!! कारण ते तुम्ही लोकच आहात ज्यांच्यामुळे सरकारी यंत्रणा सुद्धा भटक्या कुत्र्यांवर कारवाई करायला बिचकते.
तुम्हाला कुत्र्यांना खायला घालायला जमते मग त्यांनी केलेली घाण साफ करायला हात का आखडता घेता?? कि त्या वेळेला कुत्राप्रेम उडून जाते.

भटकी कुत्री सोडून दया अगदी पाळीव कुत्री देखील सकाळी सकाळी फिरवून आणण्याच्या बहाण्याने हागवुन आणली जातात. त्याची दुर्गंधी आणि त्रास हे इतर लोकांनी का सहन करायचा बरे..??

तुम्हाला भटक्या कुत्र्यांना बिस्किटे खाऊ घालायला आवडतात मग तुम्ही ते खुशाल करा मी त्याला विरोध करत नाही. पण त्यांचा त्रास जेव्हा इतरांना होऊ लागतो (जसे कि मी आणि अजुन बरेच ) तर मी देखील त्यांना बिस्किटे खायला घालून त्यांच्याशी प्रेमाने वागत बसावे हा अट्टाहास का??
आणि तुम्हा लोकांना इतकेच त्यांची काळजी आणि प्रेम असेल तर मग त्यांना असे रस्त्यावर बोंबलत का सोडून देता? सरळ त्यांना घरी घेऊन जाऊन त्यांचे लाड का पुरवत नाही?

तुम्हाला एका स्कुटर ने कुत्र्याचे पिल्लू उडवल्यावर माणसांचा इतका राग येतो. त्या पिलाबद्दल आणि आईबद्दल इतकी सहानुभूती वाटते तर मग कुत्र्यांमुळे जे अपघात होतात आणि त्यात जे मृत होतात किंवा जायबंदी होतात, रेबीज मुळे मरतात, त्यांची जबाबदारी कुत्राप्रेमी म्हणून तुम्ही घेणार का?? कि तेव्हा देखील माणसाचीच चुकी होती???

आणि शेवटी प्रश्न हा हि येतो फक्त कुत्र्यालाच हि वागणूक का.?? इतर प्राणी देखील आहेत कि इथे..
समजा मला साप आणि नाग आवडतात त्यांच्याशी खेळायला आवडते मग त्यांना मी रस्त्यावर सोडून दिले आणि येता जाता त्यांना उंदीर खायला घातले.. त्यांचे लाड पुरवले.. त्यांच्याशी खेळत बसलो.. आणि तुम्ही तक्रार केली तर तुम्हाला देखील माझ्यासारखेच करायचा सल्ला दिला तर तुम्हाला काय वाटेल??
नाही.. मान्य आहे अतिशयोक्ती होतेय पण माझ्या मते उदाहरण म्हणून बरोबर आहे..

अजुन काही महत्वाच्या गोष्टी -

तुम्ही लोक भटक्या कुत्र्यांना ज्या चपात्या ( रात्री शिळ्या राहिलेल्या फेकून द्यायला नको म्हणून ) खायला देता.. जी बिस्किटे चारता हे कुत्र्यांचे नैसर्गिक अन्न नाहीये.. हे सर्व देऊन मला नाही वाटत कि तुम्ही त्यांचे भले करता.. मिपावर कोणी जाणकार असतील तर अजुन स्पष्टीकरण देऊ शकतील..

भटकी कुत्री तुम्हाला इतकीच प्रिय असतील तर मी वर सांगितलेल्या मुद्द्यांवर विचार करून त्यांना खरी "मदत" करा . त्यांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न करा.. जेणेकरून त्यांचे स्वतःचे आणि त्याचबरोबर इतर सर्वाचे जगणे सुसह्य होईल.

धन्यवाद.. !!!

समाजजीवनमानआरोग्यप्रकटनविचारप्रतिक्रियाप्रश्नोत्तरेवाद

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

13 Jul 2019 - 3:26 pm | कुमार१

+ १

अमर विश्वास's picture

13 Jul 2019 - 3:43 pm | अमर विश्वास

पूर्वी मनपा वाले भटकी कुत्री उचलून न्यायचे आणि ....

पण मनेका गांधी आणि तत्सम प्रभुतींच्या कचकड्यासारख्या प्रेमामुळे यांची संख्या बेफाट वाढलीये ... त्रास नुसता

माहितगार's picture

13 Jul 2019 - 3:45 pm | माहितगार

तिकडच्या धाग्यातला माझा प्रतिसाद पुर्न उल्लेखाचा दोष स्विकारून डकवतो आहे.

अनाकलनीय तर्क की वहावलेली श्वानप्रेम भावना ?

रात्री भटक्या कुत्र्यांचे भुंकणे ऐकल्या शिवाय मला झोपसुद्धा येत नाही एवढे त्यांचे भुंकणे सवयीचे झाले होते ह्याचा शोध मला भटकी कुत्री नसलेल्या शहरी गेल्यावर लागला होता.
भटक्या कुत्र्यांचे भुंकणे ऐकल्या शिवाय झोप न येणार्‍या माझ्या सारख्या अत्यल्पसंख्यंकांसाठी भुंकणारी भटकी कुत्री आणून सर्वांचीच झोप मोडावी का ? आपल्या भटकी कुत्री प्रेमासाठी सर्वांचीच झोप मोडू इच्छित असलेला विचार करणारे कुत्री आणि प्राणि प्रेम किती जरी आदर्श म्हटले तरी कुंत्र्यांच्या भूंकण्याचा आवाज ऐकण्याची इच्छा नसलेल्यांवरील अन्यायाचे कसे परिमार्जन होऊ शकते हे माझ्या आकलना पलिकडील तर्क आहे.
रस्त्यावरील प्राण्यांना आणि कुत्र्यांना सांभाळून घेण्याचे कौशल्य, धैर्य , धीर, प्रेम वगैरे वगैरे बर्‍याच जणंकडे असेलही म्हणून प्रत्येकाकडे या सर्व खुबी असल्याच पाहीजेत का ? ज्यांच्याकडे या खुबी नाहीत तशी क्षमता आणि इच्छा नाही त्यांनी नेमके काय करायचे ?
आपण फार तर स्वतः कुत्र्यांना डिस्टर्ब करणार नाही तरी पण जेव्हा कुणाच्या गाडीच्या पाठी काहीही केलेले नसताना कुत्रा लागतो त्याला गाडी सैरावैरा काढावी लागते आणि समजा उद्या एखाद्या असंबंधित पादचार्‍याच्या / मुलाच्या / किंवा इतर गाड्यांच्या अपघातास कुत्र्यामुळे नियंत्रण सुटलेली गाडी कारणीभूत झाली तर काय करणार ?
हवेतर पुण्याच्या हिंजवाडी पोलीस स्टेशन मध्ये कुत्र्यामुळे चालकाचा वाहनावरून तोल जाऊन झालेल्या अपघाताची एफ आय आर कॉपी अपलोड करून देतो. ड्रायव्हरची चुकी नव्हती म्हणून जखमिंनी केस मागे घेतली पण दवाखान्यातील खर्च इजा शुश्रुषाकालीन दिवस नेमके कोण भरून देणार?
म्हणूनच म्हणतो अनाकलनीय तर्क की वहावलेली श्वानप्रेम भावना ?

विनिता००२'s picture

13 Jul 2019 - 3:47 pm | विनिता००२

बरोबर लिहीलेत

ज्ञानोबाचे पैजार's picture

13 Jul 2019 - 3:58 pm | ज्ञानोबाचे पैजार

वाक्या वाक्याशी सहमत
पैजारबुवा,

नाखु's picture

13 Jul 2019 - 5:29 pm | नाखु

लिहीलं आहे.
माझ्या परिसरात जवळपास १०० एक भटकी कुत्री आहेत आणि ती मुख्य चौकापासून ते आतील गल्ल्यांपर्यंत पाठलाग करत असतात त्यांचे उदरभरण परिसरातील प्राणिमित्र आणि सामिष अन्न टाकणारे विस पंचवीस उपहारगृह यांनी उचलली आहे.
आवाज,त्रास आणि उपद्रव फक्त स्थानिक रहिवाशांनी भोगायला पाहिजे असं या प्राणिमित्रांचे प्रामाणिक मत आहे.
अगदी पिशवीतून आणून बिस्किटे वगैरे वगैरे दिली जातात.

खरेच मनपाच्या कर्मचारी यांची घाण साफ करावी काय.

ज्यांना आक्षेप असेल त्यांनी येऊन खातरजमा करून घ्यावी हीच नम्र विनंती

पांढरपेशा मध्यमवर्गीय मिपाकर नाखु

बाप्पू's picture

13 Jul 2019 - 8:15 pm | बाप्पू

वामन देशमुख जी..
मग याच न्यायाने कोंबडी, घोडे, गाय, बैल, मासे बकरी, बोकड इ इ यांच्यासाठी कधी मोर्चे निघणार??
कुत्र्यांना क्रूर पद्धतीने मारले जाते असे चीन कोरिया व्हिएतनाम इथल्या कुत्राप्रेमी लोकांना वाटते.. तर मग हे इतर प्राणी जे खाण्यासाठी मारले जातात त्यांना हसवून, गुदगुल्या करून मारले जाते का??? हिच कुत्राप्रेमी इतर प्राण्यांचे मांस कुत्र्यांना खायला देतात आणि स्वतः देखील मिटक्या मारत खातात.. किती हि हिप्पोक्रसी.. !!!

सुधारणार नाही कधी हि " मनेका गांधी " ची सेना..!!

वामन देशमुख's picture

13 Jul 2019 - 10:32 pm | वामन देशमुख

तसं नाही हो बाप्पू जी.

भटक्या कुत्र्यांचा त्रासाबाबतीत आपण दोघेही जण एकाच पानावर आहोत. मी केवळ मीडियामधली एक बातमी इथे डकवली.

रच्याकने,

१. माझा एक उंच धिप्पाड तरणाबांड मित्र अवघ्या तिशीत कुत्र्याचा चाव्यांमुळे दगावला. आज पाच वर्षे झाली त्या गोष्टीला.

२. अनिर्बंधपणे वाढत चाललेल्या कबुतरांमुळे माझ्या सोसायटीत आणि ऑफिस च्या परिसरात अनेकांचं दरवर्षी हजारो रुपयांचे नुकसान होत आहे.

जेम्स वांड's picture

13 Jul 2019 - 11:12 pm | जेम्स वांड

कुत्रेप्रेमी मंडळीने आपल्या हस्तिदंती मनोऱ्यात बसून अतिरेकी "वाहतो ही दुर्वांची जुडी" करत बसू नये अन प्रॅक्टिकल श्वानद्वेष्टे गेला बाजार भटके कुत्रे विरोधी लोकांनी आपल्या "ऑन ग्राउंड" सडकेवर उभारून पार विषाचा ड्रमही उपडा करू नये इतकं बोलून मी खाली बसतो बापडा.

टीप - आम्ही एका प्रथितयश राजकारणी कुत्रे आहोत आम्हाला दोन्ही डगरींवर तंगडी वर करणे जमते, तरीही स्वतंत्र भारताचे नागरिक म्हणून तुम्हाला आम्हांस दगड मारायची पूर्ण मुभा आहे, एकमेकांना मारण्यापरी आम्हास दगडे मारा वाटल तितकी, फक्त हाड म्हणायचं नाही, आवं हाडा की वैच, किंवा आवं हाडा साहेब म्हणायचं, आमच्या नेतृत्वाची तितकी आब राखली नाही तर दर धाग्यावर चावणेत येईल हे लक्षात घेणे

(भू:भू:कार) वांडो

खास सूचना - आम्ही हा प्रतिसाद पूर्ण शुद्धीत कसलीही नशापाणी न करता टंकलेला असून पोस्टिंग टाईम वरून भलते अंदाज बांधू नयेत, सदरहू कॉमेंट ही फक्त मामला गरमचा जरा गार करायला केलेली आहे तरीही संपादक/मालक आम्हांस टिरीवर टिब्बा हाणून हाकलणार नाहीत इतकी अपेक्षा, हाकलून लावलेस श्रीमान नादखुळा साहेबांनी एका मजेदार गमतीशीर पण निरुपद्रवी कुत्र्याला घालवल्याचा निषेध म्हणून चळवळ वाचकांची पत्रे सदरातून चालवावी ही नम्र विनंती.

वाचकांची (बुडे) गरम (पत्रे) वांडो - ताजा कलम समाप्त अब तुम्हारे हवाले साखळी साथीयो

गड्डा झब्बू's picture

14 Jul 2019 - 1:47 am | गड्डा झब्बू

माझा श्वान प्रेमाबद्दलचा प्रवास प्रो ते अँटी झाल्याने पहिला प्रतिसाद प्रो धाग्यावर दिला आहे.
आता दुसरा या अँटी धाग्यावर देत आहे.
एके दिवशी तातडीची पैशांची गरज भासल्याने माझ्या वडिलांचे मित्र रात्री ११ वाजता घरी आले. त्यांची गरज भागवण्यासाठी आमच्या बिल्डींग पासून दोन बिल्डींग सोडून तिसऱ्या बिल्डींग मधे असलेल्या ATM मधून पैसे काढण्यासाठी मि गेलो होतो.
काम झाल्यावर बाहेर पडल्यावर गल्लीच्या कोपऱ्यापासून धावत येऊन दोन भटक्या कुत्र्यांनी एकाच वेळी माझ्या दोन्ही पोटऱ्यांचा चावा घेतला.
ATM चा वॉचमन धावत आला आणि हातातल्या दंडुक्याने त्याने कुत्र्यांना पिटाळून लावले. आजच्या दिवसात तुम्ही तिसरे आहात ज्यांना हि कुत्री चावली असे त्याने सांगितले. माझ्या आधी त्याच बिल्डींग मधे असलेल्या कोचिंग क्लासच्या एका विद्यार्थ्याला आणि रस्त्यावरून जाणाऱ्या एका वृध्द स्त्रीला हे कुत्रे अशाच प्रकारे चावले होते. दोघांनी मिळून एकाच वेळी एकाच व्यक्तीला चावणे हि जणू त्या कुत्र्यांची मोडस ऑपरेंडी झाली होती.
सहा महिने आधी माझी पाळीव कुत्री जिंजर तिचे दात शिवशिवत असल्याने चावली म्हणून इंजेक्शन्स घ्यावी लागली होती तर यावेळी दोन पिसाळलेले भटके कुत्रे विनाकारण चावल्याने घ्यावी लागली.
माझ्या श्वानप्रेमाला गेलेला हा पहिला तडा होता.

माझ्या एका सिव्हील इंजिनियर मित्राला त्याच्या कंपनीच्या साईटवर नुकतीच व्यायलेली कुत्री कॉक्रीट मिक्सरच्या खालून बाहेर येऊन अचानक चावली. इंजेक्शन देताना डॉक्टरांनी सांगितले कि प्रसुतीनंतर वेदनाग्रस्त, भुकेल्या अवस्थेतील कुत्री स्वतःचाच एखाद्या पिल्लाला खाणे, आजूबाजूने जाणाऱ्याला चावणे असे प्रकार होतात.
चार महिन्यांपूर्वी त्या साईटच्या कामावर रुजू झाल्या पासून त्या कुत्रीला नित्यनेमाने बिस्किटे खायला घालणाऱ्या व्यक्तीलाच जेव्हा ति कुत्री चावली तेव्हा कुठे गेली होती ओळख, कुठे गेले ईमान?
माझ्या श्वानप्रेमाला गेलेला हा दुसरा तडा होता.

आमच्या लाडक्या आठ महिन्यांच्या जिंजरने फक्त दोन तीन तास घरात एकटी ठेवल्याने रागावून, जेव्हा आम्ही परत आलो तेव्हा आक्रमक होत हल्ला करून तिच्या नखांनी माझ्या बायकोच्या चेहऱ्यावर उमटवलेल्या खुणा पुसण्यासाठी कॉस्मेटिक सर्जरी करायची वेळ आणली त्या दिवसापासून कुत्रा हा माणसाचा सर्वात जवळचा मित्र आहे, इमानी आहे, प्रेमळ आहे एवढेच नव्हे तर कुत्रा हा पाळीव प्राणी आहे या गोष्टीवरून पण माझा विश्वास उडाला.
माझ्या श्वानप्रेमाला गेलेला हा तिसरा तडा होता.

दुसऱ्याच दिवशी जिंजरची रवानगी मित्राच्या फार्म हाउसवर करून श्वानप्रेमातून मुक्त झालो.

भटक्या कुत्र्यांमुळे होणारे अपघात, त्यांच्या भुंकण्याने/रडण्याने होणारी झोपमोड, त्यांच्याकडून होणारे पाठलाग, घाण-दुर्गंधी,चावणे हे सार्वत्रिक अनुभव आहेत.
ज्यांना कुणाला भटक्या/पाळीव कुत्र्यांविषयी प्रेम, आपुलकी, माया, ममता, वात्सल्य, दया, भूतदया, जिव्हाळा वगैरे ज्या काही भावना असतील त्या त्यांनी त्यांच्या घरात त्यांना आणून/पाळून व्यक्त कराव्यात. स्वखर्चाने किंवा समविचारी लोकांना संघटीत करून वर्गणी/देणगी जमा करून त्यांच्यासाठी निर्दयी, निष्ठुर, स्वार्थी माणसांपासून दूर अशा सुरक्षित ठिकाणी निवारा उपलब्ध करून द्यावा. त्यांच्या श्वानप्रेमापोटी इतरांना वेठीस धरू नये हि विनंती.

रच्याक- भारतात लोकशाही आहे ना? लोकशाही म्हणजे बहुसंख्य लोकांच्या इछेचा मान राखणे. मनेका गांधी आणि इतर पशु,पक्षी,सरपटणारे प्राणी,जलचर,उभयचर,कीटक,सूक्ष्मजीव प्रेमींच्या संख्ये पेक्षा जास्त संख्या त्यांना विरोध करणाऱ्यांची असेल तर कित्येक फालतू निर्णयांवर/कायद्यांवर सरकारला फेरविचार करावा लागेलच कि! काय म्हणता?

जेम्स वांड's picture

14 Jul 2019 - 7:46 am | जेम्स वांड

एखाद चांगल्या जोष्याला पत्रिका दाखवून पहा. कुत्रं मेंटेन न करता येण्याचा एखाद कुयोग असेल भाळी. पटण्यासारखे सगळे असताना एकदम कॉस्मेटिक सर्जरी वगैरे वाचले अन टोटलच हुकली. तुम्ही खोटे बोलताय असे म्हणणे नाही पण तांत्रिकदृष्ट्या कुत्र्यांच्या नख्यांनी असे स्कार पडतील कसे ते कळले नाही.

उगा काहितरीच's picture

14 Jul 2019 - 8:57 am | उगा काहितरीच

सैन्याची मदत करणारे, राखण करणारे वगैरे कुत्रे (खरं तर यांना कुत्रे म्हणणे त्यांचा अपमान वाटतो) आणि रस्त्यावर भटकणारे कुत्रे यात खूप फरक आहे. ५ रुपये किंमतीचा बिस्कीट पुडा घेऊन खाऊ घालणे म्हणजे खरं तर त्यांना स्लो पॉयझन देणेच आहे. उगा फालतू लाड करू नये राव ! ३-४ वर्षांपूर्वी दुपारी ३ ते रात्री १२ असे वर्किंग आवर्स होते तेव्हा रोज रात्री घरी येताना जो मनस्ताप भोगलाय ना तो कारणीभूत आहे कुत्र्यांचा राग यायला. अक्षरशः एक लेन चुकवायला २ किमीचा फेरा मारून यावे लागत होते. वैताग होता राव या प्राण्याचा.

अजून एक महत्वाचं म्हणजे कुत्रा पाळीव प्राणी आहे, भटकता कुत्रा हा पाळीव नाहीये.

फुटूवाला's picture

14 Jul 2019 - 9:02 am | फुटूवाला

भटकता कुत्रा हा पाळीव नाहीये.

नाखु's picture

14 Jul 2019 - 10:53 am | नाखु

भटकता कुत्रं आणि छेडछाड करणाऱ्या मवाली टोळी तर फारसा फरक नाही फक्त फुकट खायला अन्न उपलब्ध करणार्या गणंगाना कुत्री चावत नाहीत इतरांना उपद्रव होत असतो हेच कुणीही लक्षात घेत नाही.

वाचकांची पत्रेवाला नाखु

मास्टरमाईन्ड's picture

14 Jul 2019 - 10:33 am | मास्टरमाईन्ड

सहमत.
आणी तथाकथित प्राणि प्रेमीनी या कुत्रे / मांजर / कबुतरं यांना स्वतः च्या मालकीच्या जागेत पाळून स्वतःचं प्राणी प्रेम व्यक्त करावं की.
अर्थात हे माझं वैयक्तिक मत आहे. माझ्याकडे मी स्वतः पाळलेली ३ कुत्री आणि २ मांजरं होती (गावाकडच्या बंगल्यात.) त्यामुळं त्याचा ही अनुभव आहे.
असंही वाचनात आलंय की कबुतरं उडताना त्यांच्या पंखांतून वगैरे जे अत्यंत बारीक केस / पिसं बाहेर उडतात ती श्वसनावाटे फुफ्फुसांत जाऊन श्वसनाचे रोग जडतात. मिपा वरचे डॉ. लोक यावर कदाचित प्रकाश पाडू शकतील.
मांजरं पार्किंग मधल्या दुचाकींची सीट कव्हर्स फाडणे रात्री अपरात्री विचित्र आवाज काढणे वगैरे करत असल्यानं त्यांचा ही उपद्रव आहेच.

फुटूवाला's picture

14 Jul 2019 - 1:10 pm | फुटूवाला

नेमकं आकाड महिन्यातच कुत्र्यांचा विषय निघालाय...

बाप्पू's picture

19 Jul 2019 - 10:29 am | बाप्पू

संदर्भ -
दैनिक लोकमत. 18 जुलै. हॅलो पुणे पान नं 3
---------------

कालच आणखी एका श्वानप्रेमी मुळे एका व्यक्तीला कोठडी ची हवा खायला लागली.

वाकड येथे एका हॉटेल व्यवसायिकेचे आणि चिकन शॉप मालकाचे भटक्या कुत्र्यांमुळे रोज भांडण व्हायचे.
हॉटेल व्यवसाययिका रोज आपल्या हॉटेलातील शिळे पाके पदार्थ हॉटेल समोरील भटक्या कुत्र्यांना खायला घालत ( वाह रे तुमचे प्राणी प्रेम. _^_) परंतु त्यामुळे होणाऱ्या अस्वच्छता आणि घाण यामुळे शेजारील चिकन शॉप मालक परेशान होता.. त्याने एके दिवशी वैतागून कुत्र्याला मारहाण केली त्यामुळे कुत्र्याचा मृत्यू झाला..

काल नेहमी प्रमाणे कुत्राप्रेमी हॉटेल व्यावसायिका आपल्या हॉटेल मधील शिळेपाके अन्न घेऊन कुत्र्यांना घास भरवायला आल्या पण आपला नेहमीचा कुत्रा दिसत नसल्याने त्यांनी चौकशी केली असता मारहाणीबाबत त्यांना समजले आणि आता चिकन शॉप चा मालक न्यायालयीन कोठडीत आहे..

-- बाप्पू मोड ऑन

च्या आयला.. तुम्हाला भटकी कुत्री म्हणजे काय तुमच्या घरातील आणि हाटेलातील शिळे पदार्थ फेकण्याची कचराकुंडी वाटले काय.. एवढीच जर कुत्र्यांची माया असेल तर त्यांना घरी किंवा हाटेल च्या दारात बांधून त्यांचे मुके घेत बसा ना .. उगाच त्यांना काही बाही खायला घालून सार्वजनिक ठिकाणी घाण करायला लाज वाटत नाही का? आणि हो.. तुम्हाला भटकी कुत्री पाहिजेत मग त्यांनी केलेली घाण पण काढत जा ना.. रोज शिळे पदार्थ फेकायला शोधत शोधत येता त्यांना.. मग त्याच प्रकारे रोज सकाळी त्यांचे हागलेले मूतलेले पण काढायला तुमचे हात झाडलेत काय??? सार्वजनिक ठिकाणी घाण करून रोगराई आणि दुर्गंधी पसरवण्यास तुम्हाला लाज कशी वाटत नाही...

बाप्पू मोड ऑफ.

वरील घटनेत चिकन शॉप मालकाची देखील थोडी चूक आहे. त्याने प्रथम महानगरपालिका आणि पोलिस स्टेशन येथे हॉटेल व्यवसायिकेविरुद्ध गुन्हा दाखल करायला हवा होता. कारण कि तिने सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकून अस्वछता केल्यामुळे..

पण त्याच्या तक्रारीला कोणी दाद दिली नसती.. या मनेका गांधी आणि फेक कुत्राप्रेमींची संख्या खूप आहे आणि त्यांनी खूप मोठी लॉबी तयार केलीये..

So feeling sad for that shop owner...!!!

इरामयी's picture

19 Jul 2019 - 8:00 pm | इरामयी

आपल्या मताशी पूर्ण सहमत.

१. कुत्रा हा प्राणी मुळात शिकार करणारा परंतु स्कॅव्हेंजर या वर्गातला -- तरस, कोल्हा, लांडगा इ. प्राणी इतर मोठ्या प्राण्यांनी केलेल्या शिकारीतला उरलासुरला भाग खाऊन गुजराण करणारे. त्यातला कुत्रा हा प्राणी माणसांच्या जवळपास राहू लागला आणि या प्राण्यांपेक्षा वेगळ्या प्रकारे उत्क्रांत झाला. मनुष्यवस्तीला त्याचं चिकटून रहाण्याचं मुख्य कारण म्हणजे माणूस प्रचंड प्रमाणात निर्माण करत असलेला कचरा. त्यामुळे भटके कुत्रे माणसांनी टाकून दिलेलं अन्न (यात शिळं अन्नही आलं) फस्त करतात आणि ते (सामान्यपणे) पचवू शकतात. परंतु म्हणून त्यांना मुद्दामून फक्त शिळं झालेलंच अन्न द्यावं हे मलाही पटत नाही.

२. भटके कुत्रे इथे तिथे हगून ठेवतात हा त्यांच्याबद्दल घेतला जाणारा एक महत्त्वाचा आक्षेप आहे. परंतु आपण पाहिलं असेल की भटके कुत्रे मातीत
आपलं शौचकर्म मातीत उरकतात आणि स्वतःच्या विष्ठेवर माती टाकून ती झाकून टाकतात. कुत्रा या प्राण्यामध्ये स्वच्छतेची ही अशी नैसर्गिक प्रवृत्ती असते. इतकंच काय ज्यांनी कुत्रा पाळला असेल ते सांगू शकतील की पिल्लांना जर लहानपणापासून सवय लावली तर कुत्रे स्वतःहून संडासात जाऊन शौच करतात. शहरांमध्ये जिकडेतिकडे बांधकामं करून फरश्यांनी किंवा सिमेंटने माती झाकून टाकली जाते. त्यामुळे कुत्र्यांची जी निसर्गसुलभ सवय -- विष्ठा मातीत सोडायची आणि त्यावर माती पसरून ती झाकून टाकायची -- हे त्यांना करताच येत नाही. आणि त्यामुळे आपल्याला रस्तोरस्ती कुत्र्यांची विष्ठा पसरलेली दिसते. शहरांमध्ये रस्त्यांच्या बाजूला आणि घरांच्या भोवती थोडीतरी माती ठेवणं जर अनिवार्य केलं तर बर्‍याच प्रमाणात ही समस्या कमी करता येऊ शकेल.

कुत्र्यांचा माणसाला होणारा त्रास आणि तसंच माणसांचा कुत्र्यांना होणारा त्रास हे दोन्हीही अहिंसक मार्गाने केवळ माणूसच दूर / कमी करू शकतो, कुत्रा नाही. कारण माणसाकडे दयाबुद्धी, समबुद्धी आणि संकल्प सिद्धीस नेण्याची कुवत हे सर्व आहे. धन्यवाद!

सुबोध खरे's picture

1 Aug 2019 - 9:35 am | सुबोध खरे

भटके कुत्रे मातीत आपलं शौचकर्म मातीत उरकतात आणि स्वतःच्या विष्ठेवर माती टाकून ती झाकून टाकतात.
हि वस्तुस्थिती नाही.

कुत्रे आपली चतुस्सीमा आपले मूत्र शिंपडून अधोरेखित करतात. त्यात विष्ठेचाही भाग असतो. त्यामुळे श्वानकुलातील कोणताही प्राणी आपली विष्ठा मातीने झाकण्याचा फंदात पडत नाही. कुत्रा हा बुद्धिमान प्राणी आहे त्यामुळे त्याला मलमूत्र बाहेर करावे यासाठी शिकवता येते परंतु विष्ठा मातीने झाकावी हि त्याची नैसर्गिक उर्मी नव्हे.

काही मार्जारवर्गी प्राणी ( उदा. मांजर) तसे करतात. कारण मांजरात स्त्रीबीज निर्मिती हि समागमानंतर होते यामुळे मांजराची मादी समागमासाठी अजिबात उत्सुक नसते म्हणून आपल्या मागे मलमूत्राचा वासावर नर येऊ नये म्हणून आपले मलमूत्र मातीने झाकून टाकतात. परत परत वास घेऊन तो वास नाहीसा होईपर्यंत त्यावर माती टाकताना आपण मांजरीला पहिले असेलच.

प्रकाश घाटपांडे's picture

1 Aug 2019 - 11:29 am | प्रकाश घाटपांडे

परंतु विष्ठा मातीने झाकावी हि त्याची नैसर्गिक उर्मी नव्हे. आमचा बिट्टू भुभु शी झाल्यावर नाकाने चोहोबाजूने त्यावर माती टाकत असे. नुकतेच डोळे उघडल्यानंतर त्याला भटक्या कुत्रीच्या पिल्लातून मंदिरातून उचलून आणले होते.

जॉनविक्क's picture

1 Aug 2019 - 1:02 pm | जॉनविक्क

कुत्रा मागील पाय झाडून अगदी डांबरी रस्त्यावर देखील विष्ठा झाकायचा प्रयत्न करताना आढळून येतो

धर्मराजमुटके's picture

1 Aug 2019 - 6:42 pm | धर्मराजमुटके

शी उघडी ठेवली तर कमीत कमी पाय खराब होणार नाही. त्याला बहुतेक माणसांना फसवायचे असते. डँबिस कुठले :)

चष्मेबद्दूर's picture

23 Jul 2019 - 10:12 am | चष्मेबद्दूर

जसे या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करणं आवश्यकच आहे तसंच कबुतर संख्या आटोक्यात आणायला काही उपाय आहे का?

विजुभाऊ's picture

23 Jul 2019 - 12:31 pm | विजुभाऊ

कधी मुंबईतल्या आरे कॉलनीत जाउन पहा. सकाळी फिरायला गेलो तर कुत्र्यांची टोळी अंगावर चालून येते.
हाच अनुभव सातार्‍यात देखील आला.
आय टी आय परीसरात काही खाटकांची दुकाने आहेत. तेथून एकदा रात्री चालत येत होतो अक्षरशः वीस ते बावीस कुत्र्यांनी मला घेरले होते.
शेजारून एक रिक्षावाला जात होता त्यांच्या मदतीमुळे बचावलो

कुत्रे आपली चतुस्सीमा आपले मूत्र शिंपडून अधोरेखित करतात. त्यात विष्ठेचाही भाग असतो. त्यामुळे श्वानकुलातील कोणताही प्राणी आपली विष्ठा मातीने झाकण्याचा फंदात पडत नाही. कुत्रा हा बुद्धिमान प्राणी आहे त्यामुळे त्याला मलमूत्र बाहेर करावे यासाठी शिकवता येते परंतु विष्ठा मातीने झाकावी हि त्याची नैसर्गिक उर्मी नव्हे.

काही मार्जारवर्गी प्राणी ( उदा. मांजर) तसे करतात. कारण मांजरात स्त्रीबीज निर्मिती हि समागमानंतर होते यामुळे मांजराची मादी समागमासाठी अजिबात उत्सुक नसते म्हणून आपल्या मागे मलमूत्राचा वासावर नर येऊ नये म्हणून आपले मलमूत्र मातीने झाकून टाकतात. परत परत वास घेऊन तो वास नाहीसा होईपर्यंत त्यावर माती टाकताना आपण मांजरीला पहिले असेलच.

धन्यवाद खरे सर..
इरावती यांच्या जस्टिफिकेशन ला नेमका हाच प्रतिसाद द्यावा असा विचार मी बरेच दिवस करत होतो..
परंतु... कुत्रे रस्त्यावर घाण करतात याला सुद्धा माणूस च कसा जबाबदार आहे हे येनकेन प्रकारे सिद्ध करण्याचा केविलवाणा प्रयत्न बघून मी मनातून त्यांना साष्टांग नमस्कार केला आणि गप्प बसलो. यांना बोलण्यात काही अर्थ नाही कारण कुत्राप्रेम आणि कुत्रत्वाच्या नात्याच्या पुढे जाऊन प्रॅक्टिकल विचार करण्याच्या मानसिकतेत हे लोक येतील असे वाटत नाही..