कुत्रत्वाचं नातं

इरामयी's picture
इरामयी in जनातलं, मनातलं
12 Jul 2019 - 10:42 pm

काही समस्या या धाग्यावर माझ्या एका प्रतिसादाला एक संतापयुक्त प्रतिक्रिया व्यक्त केली गेली आहे.

प्रतिसाद लिहिणाऱ्यांचा (श्री. बाप्पू) राग मला समजू शकतो आणि त्यांचं मत चुकीचं आहे असंही मी म्हणणार नाही. तसंच आपल्या प्रतिक्रियेबद्दल माझ्या मनात थोडाही राग नाही कारण आपली प्रतिक्रिया प्रामाणिक आहे हे दिसून येतंय.

परंतु त्यावरून एक गोष्ट जाणवली की कुत्र्यांबाबत, विशेषतः भटक्या कुत्र्यांबाबत समाजात अनेक गैरसमज आहेत आणि त्या गैरसमजांमुळे भटके कुत्रे आणि माणूस यांच्या सह-अस्तित्वात संघर्षांचं प्रमाण वाढू लागलं आहे.

माझ्या भटक्या कुत्र्यांसोबतच्या अनुभवावरून काही गोष्टी इथे सांगत आहे.

१. कुत्रे हिंस्र होतात या गोष्टीला बरेचदा माणसं (किंवा कधीकधी परिस्थिती) जबाबदार असतात.

त्यांच्या क्रोधाने गाड्यांच्या मागून भुंकत येण्यामागे त्यांची काही दुःखद आठवणही असू शकते. माझ्या डोळ्यासमोर एका कुत्रीची दोन पिल्लं एका स्कुटर चालकाने उडवली होती. स्कुटर चालक न थांबता निघून गेला. ती कुत्री तिच्या मृत पिल्लांना चाटत तिथेच पूर्ण दिवस बसून राहिली. त्यानंतर बरेच महिने गल्लीतील सगळे कुत्रे तशी दिसणारी स्कुटर आली की तिच्यावर भुंकत तिचा पाठलाग करत असत.

त्यामुळे गाडीच्या पाठी लागलेल्या कुत्र्यांकडे, किंवा चिडून भुंकत असलेल्या कुत्र्यांकडे पूर्ण दुर्लक्ष करणंच योग्य. ते थोडावेळ धावून/भुंकून थांबतील.

तुम्ही तिथे रेंगाळत राहू नका किंवा पायी चालत असलात तर घाबरून जाऊन तुमच्या चालण्याचा वेगही वाढवू नका.

२. भटके कुत्रे instinctive असतात. ती त्यांची स्वाभाविक प्रवृत्ती आहे. त्यांच्याकडे मानवी शिक्षणातून मिळालेली नैतिक बुद्धी नसते. त्यामुळे साधारण तश्याच दिसणाऱ्या वाहनांच्या पाठी धावून आपला राग व्यक्त करणं ही त्यांची सहजप्रवृत्ती असते.

३. भटके कुत्रे हे pattern analysis मध्ये, माणसांच्या चेहऱ्यांंवर किंवा हालचालींंतून दिसून येणाऱ्या भावभावना टिपण्यामध्ये उपजतच वाकबगार असतात.

तुम्ही एक प्रयोग करून पहा. शांत बसलेल्या कुत्र्याच्या बाजूने चालत जाताना एकदम दचकल्यासारखं करा आणि चालण्याचा वेग एकदम कमी (किंवा जास्त) करा. तो शांत बसलेला कुत्रा तुमच्याकडे संशयाने बघायला लागेल. आणि हे असं तुम्ही लागोपाठ दोनतीनदा केलंत तर तो तुमच्यावर भुंकायला लागेल.

३. चिडलेल्या भटक्या कुत्र्याला शांत कसं कराल? कुत्र्याचं वागणं हे बरंचसं चिडून रडारड करणाऱ्या लहान मुलासारखं असतं. जर शक्य असेल तर त्याच्याशी प्रेमाने संभाषण करत परंतु त्याच्या थोडंसुद्धा जवळ न जाता त्याच्यासाठी एका भांड्यात दूध आणि थोडी बिस्किटं ठेवा आणि त्याच्याशी संभाषण सुरू ठेवतच तिथून सरळ निघून जा.

दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच्यासाठी खाऊ घेऊन जा. असं दोन तीनदा केल्यावर तो तुमच्यावर चिडचिड करणारा कुत्राच तुमच्याशी खूप प्रेमाने वागायला लागेल, रात्री अपरात्री तुम्हाला रस्याने जाताना स्वतःहून सोबत देईल.

४. काही कुत्रे दादागिरी करतात. इतर कुत्र्यांवर अन्याय करत त्यांच्या वाट्याचं अन्न स्वतःच संपवताना दिसतात. यामागे दोन कारणं दिसून येतात. एक , त्यांची स्वतःची भूक प्रचंड असते आणि दादागिरी करणं हा त्यांचा स्वभाव असतो.

अगदी तुमच्या कडून लाड करून घेताना / खाऊ मिळवतानासुद्धा ते हक्काने मिळवतात. अश्या कुत्र्यांना वेळीच सौम्य शिक्षा करणं आणि त्यांना इतर कुत्र्यांवर अन्याय करण्यावाचून प्रवृत्त करणं हे सगळ्यात चांगलं.

परंतु आधीच उशीर झाला असेल तर नव्या सवयी लावणं शक्य होत नाही. अश्या वेळी त्यांना जाणवून द्यावं लागतं इथे खरा "दादा (किंवा खरी ताई)" कोण आहे ते.

धन्यवाद!

धर्मसमाजप्रकटनप्रतिक्रियालेखअनुभव

प्रतिक्रिया

जालिम लोशन's picture

12 Jul 2019 - 11:28 pm | जालिम लोशन

हो मी पण बर्‍याच वेळा असे प्रयोग केलेत. कुत्रामागे भुंकत यायला लागला कि एकदम खाली बसायचे कुत्री लांब पळतात.

विनिता००२'s picture

13 Jul 2019 - 3:51 pm | विनिता००२

कुत्रामागे भुंकत यायला लागला कि एकदम खाली बसायचे कुत्री लांब पळतात. >> तुमची ही युक्ती त्याला सवयीची झाली की एखादे दिवशी तो आणखी जवळ येईल. :)

मुक्त विहारि's picture

12 Jul 2019 - 11:51 pm | मुक्त विहारि

ह्या जगात सगळ्यात स्वार्थी प्राणी म्हणजे माणूस..

त्यामुळे ज्या दिवशी माणूस पृथ्वी वरून नाहीसा होईल, तो सुदिन. ...हे माझं प्रामाणिक मत आहे. ....

प्रत्येकच प्राणी स्वार्थी असतो. अगदी प्रामाणिक म्हणवला जाणारा कुत्रा सुद्धा याला अपवाद नाही.

जर दुसरा कोणताही प्राणी (कुत्रासुद्धा) मानवासारखाच उत्क्रांत / प्रगत होत गेला तर त्या प्राण्याच्यासुद्धा मानवासारख्याच स्वार्थी प्रवृत्ती दिसून येऊ शकतील.

जॉनविक्क's picture

31 Jul 2019 - 4:24 pm | जॉनविक्क

Lol :D

मुक्त विहारि's picture

12 Jul 2019 - 11:51 pm | मुक्त विहारि

ह्या जगात सगळ्यात स्वार्थी प्राणी म्हणजे माणूस..

त्यामुळे ज्या दिवशी माणूस पृथ्वी वरून नाहीसा होईल, तो सुदिन. ...हे माझं प्रामाणिक मत आहे. ....

कुमार१'s picture

13 Jul 2019 - 4:55 am | कुमार१

भटके कुत्रे आणि माणूस यांच्या सह-अस्तित्वात संघर्षांचं प्रमाण वाढू लागलं आहे. + 1

प्रकाश घाटपांडे's picture

13 Jul 2019 - 11:49 am | प्रकाश घाटपांडे

लोकसंख्या वाढल्यामुळे माणसा माणसातील सहास्तित्वाचे नात देखील संघर्षमय होत चालले आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

31 Jul 2019 - 7:29 pm | डॉ सुहास म्हात्रे

माणसा-माणसातील सहास्तित्वातील संघर्षासाठी लोकसंख्यावाढीची गरज नाही. अगदी लहान लहान गटांच्या अंतर्गत संघर्ष करण्याची खासियत माणसामध्ये आहे. :)

प्रकाश घाटपांडे's picture

13 Jul 2019 - 11:46 am | प्रकाश घाटपांडे

सायनोफोबिया नावाचा प्रकार मानसशास्त्रात आहे. भुभु लोकांचे भय वाटणे. भयातून राग व रागातून द्वेष असे तो प्रवास असतो काही लोकांबाबत.
माणसांचे जसे विविध प्रकार व पिंड असतात तसे भुभु लोकांचेही असत्तात.
आपले बुद्धीमान सोयरे असे सुबोध जावडेकरांचे प्राणीजगतावर सुंदर पुस्तक आहे

भयातून राग व रागातून द्वेष

बरोबर. अज्ञानातून भय, भयातून राग, आणि रागातून त्वेष. जर आपल्याला एकदा समजलं की भटक्या कुत्र्यांपासून आपल्याला घाबरायचं काहीही कारण नाही तर बरेच प्रश्ण आपोआप नाहिसे होतील.

विनिता००२'s picture

13 Jul 2019 - 3:53 pm | विनिता००२

जर आपल्याला एकदा समजलं की भटक्या कुत्र्यांपासून आपल्याला घाबरायचं काहीही कारण नाही तर बरेच प्रश्ण आपोआप नाहिसे होतील. >> तुमच्या मागे लागायला हवेत, तेव्हा घाबरु नका, त्यांना हा लेख वाचून दाखवा :)

प्रकाश घाटपांडे's picture

13 Jul 2019 - 11:52 am | प्रकाश घाटपांडे

एकदा झोपडपट्टीत माझ्या गाडीमागे कुत्रा पिंडरी पकडायला धावत आला. मी अचानक गाडी थांबवून यु यु केले तो अनपेक्शित कृतीने इतका बधीर झाला की त्याचे डोळे चक्क चकणे झाले. मग मी जवळ बोलावल्यावर तो लांब पळू लागला बिचारा.

रात्री भटक्या कुत्र्यांचे भुंकणे ऐकल्या शिवाय मला झोपसुद्धा येत नाही एवढे त्यांचे भुंकणे सवयीचे झाले होते ह्याचा शोध मला भटकी कुत्री नसलेल्या शहरी गेल्यावर लागला होता.

भटक्या कुत्र्यांचे भुंकणे ऐकल्या शिवाय झोप न येणार्‍या माझ्या सारख्या अत्यल्पसंख्यंकांसाठी भुंकणारी भटकी कुत्री आणून सर्वांचीच झोप मोडावी का ? आपल्या भटकी कुत्री प्रेमासाठी सर्वांचीच झोप मोडू इच्छित असलेला विचार करणारे कुत्री आणि प्राणि प्रेम किती जरी आदर्श म्हटले तरी कुंत्र्यांच्या भूंकण्याचा आवाज ऐकण्याची इच्छा नसलेल्यांवरील अन्यायाचे कसे परिमार्जन होऊ शकते हे माझ्या आकलना पलिकडील तर्क आहे.

रस्त्यावरील प्राण्यांना आणि कुत्र्यांना सांभाळून घेण्याचे कौशल्य, धैर्य , धीर, प्रेम वगैरे वगैरे बर्‍याच जणंकडे असेलही म्हणून प्रत्येकाकडे या सर्व खुबी असल्याच पाहीजेत का ? ज्यांच्याकडे या खुबी नाहीत तशी क्षमता आणि इच्छा नाही त्यांनी नेमके काय करायचे ?

आपण फार तर स्वतः कुत्र्यांना डिस्टर्ब करणार नाही तरी पण जेव्हा कुणाच्या गाडीच्या पाठी काहीही केलेले नसताना कुत्रा लागतो त्याला गाडी सैरावैरा काढावी लागते आणि समजा उद्या एखाद्या असंबंधित पादचार्‍याच्या / मुलाच्या / किंवा इतर गाड्यांच्या अपघातास कुत्र्यामुळे नियंत्रण सुटलेली गाडी कारणीभूत झाली तर काय करणार ?

हवेतर पुण्याच्या हिंजवाडी पोलीस स्टेशन मध्ये कुत्र्यामुळे चालकाचा वाहनावरून तोल जाऊन झालेल्या अपघाताची एफ आय आर कॉपी अपलोड करून देतो. ड्रायव्हरची चुकी नव्हती म्हणून जखमिंनी केस मागे घेतली पण दवाखान्यातील खर्च इजा शुश्रुषाकालीन दिवस नेमके कोण भरून देणार?

म्हणूनच म्हणतो अनाकलनीय तर्क की वहावलेली श्वानप्रेम भावना ?

गणामास्तर's picture

15 Jul 2019 - 1:34 pm | गणामास्तर

म्हणूनच म्हणतो अनाकलनीय तर्क की वहावलेली श्वानप्रेम भावना
तुमचा उपरोक्त विषयाचा मागोवा घेणारा कुठला धागा येऊन गेला नाहीये काय ?

भीमराव's picture

13 Jul 2019 - 3:28 pm | भीमराव

कुत्रा शिकारी प्राणी आहे, मारून खाणे त्याचा स्वभाव धर्म आहे, भटक्या कुत्र्यांचा घोळका असला तर एकट्या माणसावर हल्ला करायला कमी करणार नाहीत.

ज्ञानोबाचे पैजार's picture

13 Jul 2019 - 3:48 pm | ज्ञानोबाचे पैजार

कुत्रे आणि कुत्रे प्रेमी, कबुतर आणि कबुतर प्रेमी, मांजरे आणि मार्जार प्रेमी यांनी सध्या पुण्यात नुसता उच्छाद मांडला आहे.

सकाळी सकाळी दुकानातून किलोभर पारले जी विकत घेउन कुत्री शोधत फिरणारी मंडळी.....

प्रातःविधी साठी (कुत्र्याच्या) एका हातात काठी आणि एका हातात कुत्र्याचा पट्टा घेउन रस्त्यावर भटकणारे श्वान मालक.....कुत्तरडे रस्त्यावर हागत असताना
त्याच्याशी मोठ्या प्रेमाने गप्पा मारत उभे रहाणारे हे मालक लोक पुढे कचरा कुंडी जवळून मात्र नाकाला रुमाल लावुन "सो डर्टी" असे कुत्र्यालाच सांगत असतात.

कबुतरांना किलो किलो धान्य घालणारे कबुप्रेमी पाहून तर माझी तळपायाची आग मस्तकात जाते....सगळी कबुतरे पकडून यांच्या घरात नेउन सोडली पाहिजेत

तोच प्रकार मांजरड्यांचा.. फार वैताग देतात ही मंडळी.

आपण सामाजिक आरोग्याशी खेळतो आहोत याचे भान नसलेल्या या मंडळींचे काय करावे हे समजत नाही.

अरे एवढे पशु प्रेम असेल तर गाय, म्हैस, बकरी किंवा कोंबड्या पाळा, काही तरी उपयुक्तता आहे त्यांची. कबुतराची अंडी खाता येत नाहीत की कुत्रीचे दुध पिता येत नाही.

बिबट्या कुत्रे आणि कबुतरे दोघांनाही खातो असे ऐकून आहे. खात्री झाली की दोनचार बिबटे पाळायचा विचार आहे किंवा मग एखाद्या दिवशी पिंपभर विष घेउन पुण्यातल्या सगळ्या कबुंना आणि भुभुंना खायला देणार आहे.

पैजारबुवा,

माहितगार's picture

13 Jul 2019 - 4:22 pm | माहितगार

श्वानप्रेमींनी भटक्या कुत्र्यांच्या कळपांना कंट्रोल केले नाहीतर व्हिएतनाम किंवा कोरीयात निर्यात केली जातील अशी श्वानप्रेमींना तंबी दिली तर भारतातील श्वानप्रेमी त्यांचे नियंत्रण मनावर घेऊन करतील असे वाटते.

आणि ह्या सगळ्यांत रस्त्यांवर कचरा, शिळे अन्न, प्लास्टिकच्या पिशव्या ( अजूनही, हो, हो, अजूनही) टाकून भटक्या प्राण्यांना ते खायची आणि पर्यायाने माणूस प्राण्याशी लगट करायची सवय लावणारे माणूस प्राणी सुद्धा.

मग एखाद्या दिवशी पिंपभर विष घेउन >> मी काय म्हणतेय, इतक्या पापाचे धनी होण्यापेक्षा हे असे कचरा रस्त्यावर फेकणार्या, धान्य रस्त्यावर फेकणार्या माणूस प्राण्यांना वेताच्या छडीने चोपता का? विष घालण्यापेक्षा बरे ना?

पैबुवा, आगे बढोच! बाप्पू का

पैबुवा, आगे बढोच! बाप्पू काका आप के साथ आयेंगे! *

नाखु's picture

13 Jul 2019 - 5:36 pm | नाखु

मलाही देणे महीनाभर दोन्ही वेळा भोजन करता येईल ईतकी शंभरेक कुत्री आहेत, शिवाय बिबट्या सुद्धा धष्टपुष्ट होईल.

मांजरे नेहमी मालकांच्या घरात सोडून इतरत्र हगणदारी करतात हा गेल्या दहा-बारा वर्षांत अनुभव घेतला आहे

मास्टरमाईन्ड's picture

14 Jul 2019 - 10:16 am | मास्टरमाईन्ड

+१००००००००००००००००००००००००००००

आपल्या सर्व प्रतिसादांचा आणि मतांचा आदर आहे. आणि आपण करत असलेले विचार चुकीचेही नाहीत.

कुत्रे रात्री उशिरापर्यंत वेगवेगळ्या कारणाने आवाज करतात.

१. जर त्यांना कोणी व्यक्ती संशयास्पद वाटली तर ते भुंकून भुंकून आसमंत डोक्यावर घेतात. अश्या वेळी ते आजूबाजूच्या कॉलनीतल्या सुरक्षारक्षकांनाही सजग करतात. कुत्रे खूप भुंकायला लागले की सुरक्षारक्षक हमखास मामला काय आहे हे पहायला जागेवरून उठून बघतात. कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे माणसाला ही मदतच मिळते.

२. इतकंच काय, बरेच ठिकाणी सुरक्षारक्षक कुत्र्यांना उचलून दूर नेवून टाकण्याच्या मोहीमेला विरोध करतात कारण कुत्र्यांची त्यांना मदत होते.

२. रात्री कुत्रे भुंकत रहाण्याचा सिग्नल जर फॉल्स पॉझिटीव्ह असेल तर बरेचदा सुरक्षारक्षकच त्यांना धाक दाखवून गप्प करतात.

३. कुत्रे रात्री अपरात्री गायन करताना आढळतात ते त्यांचं प्रणयाराधन असतं.

४. कुत्र्यांमुळे झोपमोड होते हे शक्य आहे. काही लोकांना तो जास्त प्रमाणातही होऊ शकतो.

परंतु जेव्हा माणूस आवाज करतो (अजान, गणेशोत्सव, गोविंदा, नवरात्र, शेजारच्या घरातले आवाजी स्पीकर, इ.) तेव्हा अशी ठिसूळ झोप असणाऱ्या व्यक्ती काय करतात?

५. कृपया याला जस्टीफिकेशन म्हणू नये. जर इतर वेळी माणसं स्वतःची सहनशीलता वाढवू शकतात तर मग कुत्र्यांच्या आवाजाबाबतही तोच प्रयत्न का बरं करता नाही येणार? कठीण असेल पण नक्की जमेल.

६. कुत्र्यांमुळे अपघात होतात हे पूर्णपणे मान्य परंतु म्हणून समस्त श्वानवर्गाला त्यासाठी का बरं दोषी मानावं?

७. मानवाने संपूर्ण पृथ्वीवर स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे आणि एक एक करत जमिनीचे भाग काबीज करत समस्त चतुष्पाद वर्गाच्या वाट्याला खूपच कमी जमीन शिल्लक ठेवली आहे. अश्या वेळी चतुष्पाद प्राण्यांनी कुठे रहायचं? प्रणयाराधन कुठे करायचं, आणि स्वतःच्या निसर्गाने बहाल केलेल्या क्षमतांचा वापर कुठे बरं करायचा?

आपण सर्वच जण या पृथ्वीवरचे सहनिवासी आहोत हे आपण समजून घेतलं तर कुत्र्यांच्या भुंकण्याचा, त्यांच्या गायनाचा, त्यांच्या अपघातप्रवण वर्तनाचा, एकूणच त्यांच्या अस्तित्वाचा आपल्याला कमी त्रास होईल. कारण ते अस्तित्व आपण मनापासून स्विकारलेलं असेल.

माहितगार's picture

13 Jul 2019 - 5:00 pm | माहितगार

उपरोक्त प्रतिसादातील सबंध इमला एका चुकीचे समर्थन दुसर्‍या चुकीने करण्याच्या प्रकारातील नाही ना अशी साधार शंका वाटते.

१) माणसांची लोकसंख्या वाढल्यामुळे जसे ढेकुण झुरळांच्या लोकसंख्या वृद्धीचे समर्थन होत नाही तसे कुत्र्यांच्याही लोकसंख्यावाढीचे समर्थन होत नसावे. कुत्र्यांची लोकसंख्या जंगलात आणि व्हिएतनाम मध्ये वाढत नाही कारण प्रत्येक पशु दुसर्‍या पशुस खातो हा नियम लागू पडतो. मानवीवस्तीत कुत्र्यांना पुरवले जाणारे संरक्षण कृत्रिम आहे, जे ऑदरवाईज माणसांना उपलब्ध असते. माणसांची लोक्संख्या कमी करण्याची समस्या आहे ती वेगळी आहे , कुत्र्यांची लोक्संख्या कमी करण्याची समस्या वेगळी आहे एका चुकीचे दुसर्‍या सुकीने समर्थन साशंकीत आणि अनाकलनीय आहे.

२) त्यांच्या अपघातप्रवण वर्तनाचा, एकूणच त्यांच्या अस्तित्वाचा आपल्याला कमी त्रास होईल

हे व्याख्यान ज्यांचे प्रियजन अपघातात दगावले आहेत त्यांना देऊन त्यांची किती प्रमाणपत्रे गोळा करता येऊ शकतील ?

३) अश्या वेळी चतुष्पाद प्राण्यांनी कुठे रहायचं? प्रणयाराधन कुठे करायचं, आणि स्वतःच्या निसर्गाने बहाल केलेल्या क्षमतांचा वापर कुठे बरं करायचा?

एखाद्या प्रदेशाचे वाळवंट पडले जंगलात दुष्काळ पडला तर कितीही पाद प्राणी कुठे जातात ? माणसा शिवाय कोणता चतुष्पाद प्राणी स्वतःचे सोडून इतर प्राण्यांचे जीवन जपतो. माणसे आहात तर इतर प्राण्यांचे जिवन जपा पण माणसासारख्या माणसाला प्राधान्य न देता आपल्याच वंशीयांच्या जिवाला धोका पोहचवून कसले चतुष्पाद प्रेम आहे ते आमच्या तरी तर्क बुद्धीस अनाकलनीय आहे.

६. कुत्र्यांमुळे अपघात होतात हे पूर्णपणे मान्य परंतु म्हणून समस्त श्वानवर्गाला त्यासाठी का बरं दोषी मानावं?

श्वानवर्गाला नव्हे त्यांचे नियंत्रणाची जबाबदारी स्वतःच्या घरात न घेता बाहेरून दिखाऊ प्रेम करणार्‍या कुत्र्यांना हकनाक मोकाट सोडणार्‍या मानवी प्राण्यांनाच दोषी मानावे लागते (व्यक्तिशः घेऊ नये हि नम्र विनंती)

४. कुत्र्यांमुळे झोपमोड होते हे शक्य आहे. काही लोकांना तो जास्त प्रमाणातही होऊ शकतो.
परंतु जेव्हा माणूस आवाज करतो (अजान, गणेशोत्सव, गोविंदा, नवरात्र, शेजारच्या घरातले आवाजी स्पीकर, इ.) तेव्हा अशी ठिसूळ झोप असणाऱ्या व्यक्ती काय करतात?
५. कृपया याला जस्टीफिकेशन म्हणू नये. जर इतर वेळी माणसं स्वतःची सहनशीलता वाढवू शकतात तर मग कुत्र्यांच्या आवाजाबाबतही तोच प्रयत्न का बरं करता नाही येणार? कठीण असेल पण नक्की जमेल.

चक्क एका चुकीने दुसर्‍या चुकीचे समर्थन करणयचा प्रयत्न आहे. सर्व ध्वनी प्रदुषणास जसा प्रतिबंध असावा तसा श्वान ध्वनी प्रदुषणासही प्रतिबंध असावा. कुत्रा प्रेमिंनी जाड काचेच्या बंद घरात कुत्र्यांचे आणि बाकी ध्वनी प्रदुषण करत ध्वनीशांतीचा आनंद जरुर घ्यावा. ज्यांना ध्वनी प्रदुषणाचा त्रास नको आहे त्यांच्यावर अन्याय करू नये

३. कुत्रे रात्री अपरात्री गायन करताना आढळतात ते त्यांचं प्रणयाराधन असतं.

श्वानप्रेमींच्या काचेने बंद घरात करु देत केवढे हवेते प्रणय राधन . त्यांच्या प्रणय राधनाने शांत झोप घेऊ इच्छिणार्‍यांच्या झोपा का मोडाव्यात ?

१. जर त्यांना कोणी व्यक्ती संशयास्पद वाटली तर ते भुंकून भुंकून आसमंत डोक्यावर घेतात. अश्या वेळी ते आजूबाजूच्या कॉलनीतल्या सुरक्षारक्षकांनाही सजग करतात. कुत्रे खूप भुंकायला लागले की सुरक्षारक्षक हमखास मामला काय आहे हे पहायला जागेवरून उठून बघतात. कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे माणसाला ही मदतच मिळते.
२. इतकंच काय, बरेच ठिकाणी सुरक्षारक्षक कुत्र्यांना उचलून दूर नेवून टाकण्याच्या मोहीमेला विरोध करतात कारण कुत्र्यांची त्यांना मदत होते.
२. रात्री कुत्रे भुंकत रहाण्याचा सिग्नल जर फॉल्स पॉझिटीव्ह असेल तर बरेचदा सुरक्षारक्षकच त्यांना धाक दाखवून गप्प करतात.

चोरांचा प्रतिरोध करु शकणारी प्रशिक्षीत कुत्री आणि अप्रशिक्षीत भटकी कुत्री यात जमिन असमानचे अंतर कल्पना असूनही मांडायचे म्हणून दिशाभूल करणारे तर्क मांडण्यातला पॉईंट अपनी समझ के बाहर आहे. बंगल्यांच्या सुरक्षा रक्षकांना गरज असल्यास प्रशिक्षीत कुत्रि पाळता येतात श्वानप्रेमी साठी झवी तर वेगळी अपार्टमेंट आणि कॉलन्या उभाराव्यात ज्यांना असले काही प्रेम होणे शक्य नाही त्यांच्यावर जबरदस्ती करु नये.

आजकाल गेटेड अपार्टमेंटमध्ये आपसूक सेक्युरीटी अधिक वाटल्यास बरीच इलेक्ट्रॉनिक गॅजट सुरक्षेसाठी उपलब्ध असतात उगाचच कुत्र्यांच्या प्रणयरधनासाठी स्वतःची झोप खराब करण्याची जबरदस्ती सहन करण्याचे कारण समजणे अस्मादिकास तरी कठीण जाते.

गणामास्तर's picture

15 Jul 2019 - 1:36 pm | गणामास्तर

तुमचे प्रतिसाद वाचण्यापेक्षा कुत्रे मागे लागलेले परवडले असं वाटायला लागलंय ता.

बाप्पू's picture

13 Jul 2019 - 8:04 pm | बाप्पू

पुन्हा तेच.. पहिले पाढे पंचावन्न..

२. रात्री कुत्रे भुंकत रहाण्याचा सिग्नल जर फॉल्स पॉझिटीव्ह असेल तर बरेचदा सुरक्षारक्षकच त्यांना धाक दाखवून गप्प करतात.

तुम्ही तुमच्या सोसायटी च्या बाहेरच जग कधी पाहिलेय कि नाही अशी मला आता शंका येऊ लागलीये.. पुण्यात नेमके किती भटके कुत्रे आहेत याची थोडी तरी माहिती आपणास आहे का? आमची गल्ली मुख्य रस्त्यापासून 400 मिटर आतपर्यंत आहे.
मेन रोड ते गल्ली संपण्याचा पॉईंट या 400 मिटर मध्ये जवळपास 14-15 लहान मोठी भटकी कुत्री आहेत... हे प्रमाण असेल तर पूर्ण पुण्यात काय परस्थिती असेल याचा अंदाजच केलेला बरा..
आणि फाल्स पॉसिटीव्ह आणि नेगेटिव्ह सिग्नल समजून घ्यायला कोणता कोर्स करतात तुमच्या इथले सुरक्षा रक्षक??? कायच्या काय तर्क..

कुत्रे रात्री अपरात्री गायन करताना आढळतात ते त्यांचं प्रणयाराधन असतं.

आमच्या घराच्या मागे थोडीशी मोकळी जागा आहे तिथे त्यांचे हे "प्रणयाराधन " रोज च चालू असतें. एकदा सुरु झाले कि 2-3 तास काय संपत नाही.. च्यायला यांची होते मजा. आणि आम्हाला बिन काय करता सजा.. कित्येक वेळेला रात्री बेरात्री उठून यांना हाकलत बसावे लागते.. आपली हरकत नसेल तर हा 14-15 कुत्र्यांचा स्टॉक तुमच्या सोसायटी त घेऊन जाल का.. नाही... तेवढीच तुमच्या सुरक्षा रक्षकांना मदत..

नाखु's picture

13 Jul 2019 - 5:42 pm | नाखु

आमच्याच घरी चोर आले तेंव्हा ही भटकी कुत्री अगदी चूपचाप होती आणि पोलिसांनी सांगितले की ती या चोरांवर भुंकत नाहीत.
का ते चोर, कुत्री आणि पोलिस जाणे पण आम्हाला हा अनुभव आला खरा आता चोरांनी कुत्तासायकालॉजीचा अभ्यास केला असावा असा अंदाज आहे.

कुठल्याही प्राण्याचे कोडकौतुक (आपलं लेकरांसकट) आपल्या घरीच करावे आणि इतरांना उपद्रव होउ नये म्हणून खबरदारी घ्यावी या मताचा पांढरपेशा मध्यमवर्गीय नाखु

चौकटराजा's picture

13 Jul 2019 - 7:04 pm | चौकटराजा

माझ्या लहानपणी म्हणजे १९६० चे सुमारास आज इतकी भटकी कुत्री नक्कीच नव्हती. एकूण कुत्र्यानी देवाला आर्टिकल १५ सारखे काहीतरी दाखवून आम्ही देखील पृथिवीचे मालक आहोत हे सांगितले असावे. आता पाळीव कुत्र्यानी सर्व सरकारी नियम पाळायाचे भटक्यांनी मात्र सिग्नल ओलांडून जायचे असे झाले आहे. सर्व भटकी कुत्री ही ,महापालिकेनी पाळलेली कुत्री आहेत व प्राणीप्रेमींनी पाळलेली आहेत असा कायदा करून ती प्राणिप्रेमीच्या बाल्कनीत राहातील वा सरकारी पाहुणे होतील असे काहीतरी झाले पाहिजे . सध्या कुत्र्यानी अचानक लीचिंग करून माणसाचे बळी घेतल्याच्याही घटना अशक्य नाहीत .आज कुत्र्यानी सुरुवात होते आहे उद्या व्याघ्रप्रेमी ही वाघांनी चौका चौकात लोकांवर हल्ले केले तरी चालतील असे म्हणू लागतील . प्राणी प्रेमींनी भटक्या कुत्र्यांना दत्तक घेऊन आपलया पगारातून त्यांचे संगोपन जरूर करावे उगीच उंटावरून शेळी हाकण्याचे स्वात्रंत्र्य कुणालाली नसले पाहिजे .

बाकी इतका इंटॉलरन्स कुत्र्याच्या का आला असावा .... ? माणसाची कुसंगत त्याला लागली नसेल ना ... ?

Rajesh188's picture

13 Jul 2019 - 9:01 pm | Rajesh188

मी दोन पारशी मुली बागितल्या गिरगाव चौपाटी वर खूप त्यांच्या कुत्र्या ना फिरवताना .
पण त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे .
त्या नेहमी स्वतःकडे प्लास्टिक पिशवी ठेवायच्या आणि हातात ग्लोव्हज कुत्रा रस्त्यावर हागला तर स्वतः chya हातांनी प्लास्टिक chya पिशवीत जमा करायच्या .
असेच वागणे सर्व कुत्रा मालकांच असले पाहिजे .
जे नोकर ठेवतात कुत्री सांभाळल्या साठी त्या नोकरांना सुद्धा समज दिली पाहिजे .
नाहीतर कडक fine लावणे संडास केली की १००० रुपये अश्या पद्धतीने .
मुक्या प्राण्यांना दोष देण्यात काही अर्थ नाही .
भटकी कुत्री म्हणजे ज्यांचे कोण्ही मालक नाही त्यांचे प्रजनन होवू नये म्हणून काळजी घेता येईल आणि संख्या नियंत्रणात येईल .
ह्याला कोण्ही विरोध करणार नाही .
ग्रामीण भागात कुत्रा हा माणसाचा खरा मित्र असतो आणि त्याचा त्रास कोणाला होत नाही
तर कुत्रा प्रेमी लोकांनी फंड जमा करून ग्रामीण भागात वाटावा .

सुबोध खरे's picture

15 Jul 2019 - 8:13 pm | सुबोध खरे

पण त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे .

कुत्र्याने घाण केली तर ५०० रुपये भरावे लागतील म्हणून प्लास्टिक पिशवी ठेवायच्या आणि हातात ग्लोव्हज

उगाच नको त्यांचे कौतुक करू नका

https://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/pick-up-pets-poop-or-pay...

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Jul 2019 - 8:35 pm | डॉ सुहास म्हात्रे

पण त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे .
त्या नेहमी स्वतःकडे प्लास्टिक पिशवी ठेवायच्या आणि हातात ग्लोव्हज कुत्रा रस्त्यावर हागला तर स्वतः chya हातांनी प्लास्टिक chya पिशवीत जमा करायच्या .

सद्या आपल्या सामाजिक भानाच्या व जबाबदारीच्या कल्पना इतक्या खालच्या पातळीवर गेल्या आहेत की, "सर्वसामान्य प्रतिचे सामाजिक कर्तव्य (उदा : आपल्या कुत्र्याने सार्वजनिक ठिकाणी केलेली घाण साफ करणे आपली स्वतःचीच जबाबदारी आहे हे मानणे)" केले तरी त्याचे कौतुक करण्याच्या मनःस्थितीत आपण गेलेलो आहोत.

हे इतर बाबतीतही सहजपणे दिसते...

उदा : नोकरीला रोज वेळेवर येणार्‍या कर्मचार्‍याचा सत्कार केला जातो. त्यावेळेस, हे सहज विसरले जाते की...
(अ) नोकरीत वेळेवर येणे ही कर्मचार्‍याची शून्य स्तराची जबाबदारी असते
आणि
(आ) नोकरीच्या मुलाखतीत सर्व कर्मचार्‍यांनी ती जबाबदारी इमाने इतबारे पाळण्याचे उघड अथवा गृहीत वचन दिलेले असते.

म्हणजे, नोकरीची वेळ पाळणे ही सर्वमान्य/सामान्य गोष्ट झाली आणि वेळ पाळली तर उत्तम कार्यक्षमता दाखवली असे होते, नाही का?!

भटकी माणसे म्हणजे बेवारस त्यांची अवस्था आणि बेवारस कुत्री काय फरक आहे दोघात मिळेल ते खाणे आणि मिळेल तिथे झोपणे .
माणसाची माणसाला kiv येत नाही तिथे कुत्र्यांची कशी येईल

पण कुत्र्यांची येते ना बऱ्याच जणांना .. तोच तर मूळ पोस्ट काही समस्या ही आणि त्याच्याशी सहमत इतर प्रतिक्रिया मांडलेल्यांचा मुद्दा आहे . किलोभर पार्ले जी घेऊन कुत्र्यांच्या शोधात फिरणे वगैरे ... खरं तर कोणाची कीव येणे हे ज्याच्या त्याच्या स्वभावावर अवलंबून आहे ... कोणाचं मन पोराला घेऊन भीक मागणारी भिकारीण पाहून द्रवेल तर कोणाचं भुकेने भुंकणारा कुत्रा पाहून ... कोणाचं यातल्या एकाच प्रसंगी द्रवेल दुसऱ्यासाठी नाही तर कोणाचं दोन्ही प्रसंगी द्रवेल ... तर काहींना दोन्हीनी काही फरक पडणार नाही ...

मला कुत्री आवडत असून आणि भटक्या कुत्र्यांची दया येत असून सुध्दा इरामयी ताईंची पोस्ट आणि त्यावर त्यांनी समर्थनार्थ मानलेले मुद्दे पोकळ , अव्यवहारी वाटले ... पोट खपाटीला गेलेली कुत्री पाहिली आणि खाण्याची काही वस्तू जवळ असेल किंवा हॉटेल जवळ असेल तर पाव वगैरे घेऊन मी काही वेळा घातले आहेत .. खूप नाही 10 - 12 वेळा फार तर... शहरात राहत नाही त्यामुळे आमच्या इथे त्यांचं प्रमाण फार नाही .

पण ताईंनी सांगितलेले उपाय अव्यवहारी वाटतात ... मुळातच कुत्र्यांचा त्रास होणारे आणि त्यांचा राग येणारे लोक ते उपाय का म्हणून करतील ? माणसाने पृथ्वीवरची जास्त जागा काबीज केली आणि त्यामुळे बऱ्याच प्राण्यांचं घर नष्ट झालं हे सत्य आहे , पण ते स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही . सहनिवासी म्हणून वाघ , सिंह , कोल्हे , लांडगे आपल्याबरोबर राहू शकत नाहीत तसेच कुत्रे आणि मांजरं सुद्धा जास्त संख्या झाली तर राहू शकत नाहीत ... गोंडस आणि माणसाळणारे , वाघ - बिबट्या सारखा हल्ला वगैरे न करणारे प्राणी म्हणून कुत्री मांजरांवर माणसं माया उधळतात .. पण त्यांची संख्या जी वाढत आहे ती सगळी सुखाने राहू शकत नाही ...

कुत्र्यांमुळे माणसांना होणाऱ्या त्रासापेक्षा अर्धपोटी असलेली कुत्री , पावसापाण्यात निवारा नसलेली , रस्त्यावर स्टॉल्स वगैरे वर खाणाऱ्या लोकांकडे आशाळभूत नजरेने बघणारी कुत्री त्यांना हडतुड करून हाकलून लावणारी माणसं कुत्री - मांजरं यांची सतत वाढणारी पिलावळ आणि त्यांचे होणारे हाल बघून मला वाटतं सरकारने अजिबात वेदना न होता इन्स्टंट मरण देणारं विष घालून या सगळ्यांना मारलं तर ती खरी भूतदया होईल . कुणी लोकांनीही सायनाईड किंवा तत्सम तात्काळ मरण देणारं विष घालून मारलं तर तो खरा उपकारच होईल त्यांच्यावर . पण ते धाडस होत नाही लोकांचं , पापाची भीतीही असते कदाचित .. कितीही त्रास होत असला तरी असलं कर्म आपल्या डोक्यावर घ्यायला धजावत नाहीत लोकं ... शिवाय तसं विनावेदना मरण देणारं विष अस्तित्वात आहे का नाही माहीत नाही ... झोपेच्या औषधाचा स्ट्रॉंग डोस - झोपेतच मृत्यू देईल असा कदाचित असला तर उपयोगी ठरेल .

पण जोवर ती आहेत तोवर एकतर दुर्लक्ष किंवा शक्य तेवढ्या दयेने त्यांना वागवणं हेच मार्ग उत्तम आहेत ... दया म्हणजे येता जाता खाऊ घालणं नाही पण निदान मारहाण करू नये , विनाकारण दगड मारून राग काढू नये .... गाभण किंवा पिलावळ असलेल्या कुत्रीला , हडकलेल्या कुत्र्या - मांजरांना , पिलांना शक्य असेल तर खाऊ घालावं , हेल्दी आणि माजलेल्यांना घालायची गरज नाही .... किमान दुर्लक्ष करावं , हडतुड दगड मारून दुखवू नये असं मला वाटतं ... मीपण बहुतेक इरामयी ताईंसारखाच अव्यवहारी सल्ला दिला आहे असं वाटतं ... पण थोडंस प्रेमाने , थोडंस सहानुभूतीने , थोडंस त्यांच्या जागी क्षणभर स्वतःला ठेवून पाहिलं तर एवढा जो मनस्ताप होतो त्यातला थोडासा तरी कमी होईल .... अत्यंत क्रोध किंवा रागाचा उपाय अत्यंत करुणा आहे असं कुठेतरी ऐकलं आहे .... त्यांच्यासाठी म्हणून नव्हे तर स्वतःच्या मनाच्या शांतीसाठी हा उपाय करून बघावा .. माझ्यासाठी तरी तो उपयोगी ठरला आहे नेहमीच ....

Rajesh188's picture

13 Jul 2019 - 10:12 pm | Rajesh188

मी रोज बघतो .
निर्जन ,बेसहरा,कोणतीच
मालमत्ता नसणारे किती हलाखीत जगतात ..ना अन्न , ना झोपायला जागा,
माणूस असून माणूस त्यांचा तिरस्कार करतो .
कुत्रा तर प्राणी आहे ..
मला कधी हा विचार येतो
प्रवासात पँट मध्ये शी केलेला भिकारी आपल्या जवळ येतो तेव्हा आपण लांब पळतो .
पण जेव्हा अपघातात आपण जखमी होतो आणि पँट मध्ये शी करणारा भिकारी आपल्याला वाचवत असेल तर त्याची आपल्याला बिलकुल किळस वाटत नाही. .
हा मानवी स्वभाव आहे

मी नेहमी प्रवासात डोळे उघडे ठेवतो आणि बेवारस भिकारी लोकांना
विचार करून अन्न ग्रहण करण्यासाठी मदत करतो .
वडापाव असेल किंवा समोसा खरेदी करून देतो ..
भिकारी पण duplicate असतात त्या मुळे सांभाळणं गरजेचं ..
कुत्रा हा प्राणी आणि कबुतर हा पक्षी शहरात नसावा असे माझे मत आहे

बेवारस भिकारी लोकांना
विचार करून अन्न ग्रहण करण्यासाठी मदत करतो .
वडापाव असेल किंवा समोसा खरेदी करून देतो ..

चांगलं काम करत आहात .. भुकेल्याच्या पोटात अन्न घालणं चांगलं कर्म आहे ...

जेम्स वांड's picture

13 Jul 2019 - 11:08 pm | जेम्स वांड

कुत्रेप्रेमी मंडळीने आपल्या हस्तिदंती मनोऱ्यात बसून अतिरेकी "वाहतो ही दुर्वांची जुडी" करत बसू नये अन प्रॅक्टिकल श्वानद्वेष्टे गेला बाजार भटके कुत्रे विरोधी लोकांनी आपल्या "ऑन ग्राउंड" सडकेवर उभारून पार विषाचा ड्रमही उपडा करू नये इतकं बोलून मी खाली बसतो बापडा.

टीप - आम्ही एका प्रथितयश राजकारणी कुत्रे आहोत आम्हाला दोन्ही डगरींवर तंगडी वर करणे जमते, तरीही स्वतंत्र भारताचे नागरिक म्हणून तुम्हाला आम्हांस दगड मारायची पूर्ण मुभा आहे, एकमेकांना मारण्यापरी आम्हास दगडे मारा वाटल तितकी, फक्त हाड म्हणायचं नाही, आवं हाडा की वैच, किंवा आवं हाडा साहेब म्हणायचं, आमच्या नेतृत्वाची तितकी आब राखली नाही तर दर धाग्यावर चावणेत येईल हे लक्षात घेणे

(भू:भू:कार) वांडो

खास सूचना - आम्ही हा प्रतिसाद पूर्ण शुद्धीत कसलीही नशापाणी न करता टंकलेला असून पोस्टिंग टाईम वरून भलते अंदाज बांधू नयेत, सदरहू कॉमेंट ही फक्त मामला गरमचा जरा गार करायला केलेली आहे तरीही संपादक/मालक आम्हांस टिरीवर टिब्बा हाणून हाकलणार नाहीत इतकी अपेक्षा, हाकलून लावलेस श्रीमान नादखुळा साहेबांनी एका मजेदार गमतीशीर पण निरुपद्रवी कुत्र्याला घालवल्याचा निषेध म्हणून चळवळ वाचकांची पत्रे सदरातून चालवावी ही नम्र विनंती.

वाचकांची (बुडे) गरम (पत्रे) वांडो - ताजा कलम समाप्त अब तुम्हारे हवाले साखळी साथीयो

एकाच विषयावर प्रो आणि अँटी असे धागे आज वाचनात आले. माझा श्वान प्रेमाबद्दलचा प्रवास प्रो ते अँटी झाल्याने पहिला प्रतिसाद प्रो धाग्यावर देत आहे.
लहानपणापासून मला कुत्रे खूप आवडत होते.
त्या आवडीपायी स्वतःच्या पायावर उभे झाल्यावर आठ वर्षांपूर्वी मि लॅब्रेडोर जातीचे, एक महिन्याचे मादी पिल्लू खरेदी केले होते.
बायकोच्या सुचवणीने (आणि मला पण आवडल्याने) तिचे नाव जिंजर असे ठेवले होते.
एकतर कुत्रा या घरात राहील किंवा तू हे वाक्य मला लहानपणापासून ऐकवणाऱ्या माझ्या माता पित्यांनाही काही तासांतच तिचा लळा लागला होता.
वेळच्या वेळी तिला खाऊ पिऊ घालणे, तिला अंघोळ घालणे, तिची हगणी मुतणी साफ करणे, फिरायला घेऊन जाणे असे सगळे अगदी कौतुकाने चालू होते.
पहिल्या महिन्यातच घरातील अनेक किमती वस्तूंची पाडून,फाडून, फोडून, चावून वाट लाऊन झाल्यावर आपल्या सतत काहीतरी चावण्यासाठी शिवशिवणाऱ्या दातांनी तिने आमच्या घरातल्या सर्व मंडळीना म्हणजे मि, बायको, आई आणि वडील अशा सर्वांना चावून घेतले.
व्हेट कडून तिला इंजेक्शन्स देऊन आणली होती तरी फॅमीली डॉक्टरने सर्वांना रेबीज विरोधक इंजेक्शन घेण्याचा सल्ला दिला.
प्रती माणशी दंडावर ५०० रुपयांची ५ इंजेक्शन्स असा ५०० X ५ = २५०० पक्षी २५०० X ४ =१०,००० रुपये असा एकंदरीत खर्च आला जो तिच्या खरेदी मूल्यापेक्षा बराच जास्त होता.
बरेतर बरे त्यावेळी पूर्वीसारखी बेंबीच्या सभोवताली पोटाची जाळी करणारी १४ इंजेक्शने घ्यावी लागली नाहीत, नाहीतर जिंजर बरोबर मला सुद्धा त्याच दिवशी बेघर व्हायला लागले असते.
दिवसामाजी जिंजरची घरी आल्या गेल्या लहान, मोठ्या स्त्री, पुरुष अशा प्रत्येक व्यक्तीच्या गुप्तांगाचा वास घेऊन, पुढचे दोन पाय त्यांच्या अंगावर टाकून समोरच्याच्या उंची नुसार छाती, पोट, मांडी,गुढगे, नडगीवर त्तिच्या नखांचे ओरखडे उमटवण्या पासून बाहेर फिरायला घेऊन गेल्यावर कारच्या सीट्स फाडण्या पर्यंत प्रगती होत होती. आपल्या पिल्लाचे कौतुक या खात्यात सगळे काही माफ होते. भावनिक गुंतवणूक जी झाली होती तिच्यात!
माझ्या श्वान प्रेमाची कहाणी इथे संपते, मि (पाळीव असोत कि भटके) श्वानद्वेषी कसा झालो हे अँटी धाग्यावर सांगतो....

मित्रहो's picture

13 Jul 2019 - 11:46 pm | मित्रहो

आमच्या लहाणपणी आमच्या वाड्यात सतत कुत्री असत. त्यामुळे कधी कुत्र्यांची भिती वाटली नाही. अगदी डोळे न उघडलेल्या पिलाला सुद्धा आम्ही सहज हात लावत असू आणि ती कुत्री कधीही आमच्यावर भुंकत नव्हती. आम्हा मुलांना तरी कधी त्रास झाला नाही. इतरांना काय त्रास व्हायचे माहित नाही पण विष देउन काही कुत्री मारल्या गेली. काहींना तर विष दिल्यावर आम्ही मुलांनीच गवत खायला लावून उलटी करायला लावली आणि ते वाचले. वाडा सुटल्यावर कुत्र्यांशी संबंध सुटला. नंतर आमच्या घरी असाच एक भटका कुत्रा यायचा आम्ही त्याला खायला द्यायचो. त्याचा खरच आधार होता. तो रात्रभर घर राखायचा घऱात.
शिकत असताना मी ज्यांच्याकडे राहायचो त्यांचा कुत्रा त्या भागात प्रचंड प्रसिद्ध होता. आम्ही पता सुद्धा कुत्रेवाल घर असाच द्यायचो. कोणाची हिंमत नव्हती त्या घराकडे भटकायची. सुरवातीला दोन दिवस तो आमच्यावर भुंकला पण नंतर मस्त मैत्री झाली होती. सकाळी त्याच्यासोबत फिरायला जायचो.
असे जरी असले तरी रस्त्यावरची अनोळखी भटकी कुत्री दिसली की भिती वाटते. सायकलींगला जाताना सकाळी उजाडायच्या आत त्यांना जास्त जोर असतो. मागे धावतात. कुत्र्यांच्या त्रासापेपेक्षा वाइट वाटते ते त्या कुत्र्यांची अवस्था बघितल्यावर. महिन्यात आठ ते दहा दिवस सायकलींगला जात असलो तर कुत्र्याचा त्रास फारच झाला तर महिन्यातून एक दिवस . परंतु महिन्यातून चार ते पाच वेळा सकाळी कुत्रा गाडीखाली येउन मेलेला दिसतो. त्याचे फार वाइट वाटते. गाडीवाल्याचाच दोष आहे असे नाही म्हणणार कारण कुत्रे देखील वेड्यासारखा रस्ता क्रॉस करतात आणि गाडीखाली येतात. मागे वाचले होते एका व्यक्तीने उपाय सांगितला होता कि मी सर्व कुत्र्यांना गावाबाहेर घेउन जातो. त्यांचे पालन पोषण करतो. त्याचा खर्च सरकारने द्यावा. त्यांचे कुंटुब नियोजन करणार म्हणजे हळूहळू भटकी कुत्री समाप्त होणार.
दुसरे एक भयानक चित्र सुद्धा आहे. आजतरी ते अपवादच आहे पण आठ दहा कुत्र्यांनी टोळक करुन पाच सहा वर्षाच्या मुलांचा जीव घेतल्याच्या तुरळक घटना सुद्धा
घडल्या आहेत.

Rajesh188's picture

13 Jul 2019 - 11:49 pm | Rajesh188

मी जेव्हा१५/१६ वर्षाचा होतो तेव्हा आमच्या कडे कुत्रा होता गावी .
पांढरा आणि ब्लॅक रंगाचे स्पॉट असणारा .
शेतात रात्री पाणी देण्यासाठी जाताना तो बरोबर असायचा .
आणि पुढे चालायचा वाढलेल्या गवता मधून १० फीट चालून परत यायचा रस्ता धोकादायक नाही ह्याची ती सूचना असायची.
शेतात पाणी देताना तो सोबत असायचा रक्षका सारखा .
शेवटच्या क्षणी त्याला काय झालं माहीत नाही त्यांनी अन्न वर्जं केले .
आणि तो पिसळल आहे असा निष्कर्ष सर्वांचा .
डॉक्टर दाखवले
तो वाचणार नव्हता पण पिसाळला आहे असे सर्वांचे मत.
त्या क्षणी सुधा तो मला olkhyacha.
त्याच्या अंगावर हात फिरवणे अगदी तोंड उघडून ठेवले हाताने तरी विरोध नाही .
किती प्रामाणिक प्राणी .
पण city मध्ये प्रश्न निर्माण होतात ..त्यांचे पण हाल होतात आणि
मानवाचे पण
Suvarnymadhya साधावा .
पण त्या प्रामाणिक प्राण्याचा द्वेष करू नका

Rajesh188's picture

14 Jul 2019 - 12:29 am | Rajesh188

खुनी हल्ला झाला तर तुमचा जिवलग मित्र सुधा पळून जाईल पण तुम्ही प्रेम दिलेला कुत्रा पळून जाणार नाही प्रतिकार करेल

प्रकाश घाटपांडे's picture

14 Jul 2019 - 9:49 am | प्रकाश घाटपांडे

डॉ समीर कुलकर्णी यांची गोष्ट एका धर्मांतराची हा अनुभव मधील लेख यावर फार सुंदर आहे. खाली लिंक देतो आहे.
https://drive.google.com/open?id=0B2X6bSru0D7ISUhKLUhNT3pzTGI0MWd6Z252UX...

प्रकाश घाटपांडे's picture

14 Jul 2019 - 9:49 am | प्रकाश घाटपांडे

तसेच डॉ अभय बंग यांचा अनुभव दिवाळी अंक 2017 मधील द्वंद्व ही कथा एका श्वान द्वेषावर आधारित आहे. या कथेचा हिरो आहे भटका कुत्रा. ही कथाही सुंदर आहे. लिंक
https://drive.google.com/open?id=15XYqYQLM9JNQ_qJEzIlM3ARzL57532Yr

विनिता००२'s picture

15 Jul 2019 - 11:48 am | विनिता००२

कथा छान आहे, पण लेखकाला होणारा त्रास पण खरा आहे.

भटक्या कुत्र्यांवरुन आठवले. नासिकला आमच्या कॉलनीत अचानक एक नवीन कुत्रा आला. कुठुन आला कोण जाणे! सोनेरी रंगाचा, केसाळ, दिसायला रुबाबदार...त्याचे नाव काय होते माहीत नाही, माझी धाकटी बहीण जी अजून बाळच होती. बोबडे बोलत रोज त्याला पोळी द्यायची. ती त्याला राजा म्हणायची, म्हणून आम्ही पण !! :) खायला देतात कळल्यावर तो बरोबर रोज संध्याकाळी सात वाजता दारात येवून उभा रहायचा. ना भुंकायचा, ना ओरडायचा! फक्त शांतपणे दारासमोर उभा रहायचा. हे लक्षात आल्यावर आम्हीच वेळ लक्षात ठेवून त्याला खायला द्यायचो. नंतर तो अचानक यायचा बंद झाला. मेला की कोणी नेला माहीत नाही! पण अजून तो आठवतो. फार गुणी होता. तो भटका नसावा.

असा कधी भुंकला नाही, पण कचरा गोळा करणारे, उगीचच फिरणारे दिसले की कान उभारुन सावध व्हायचा, भुंकायचा.

इरामयी's picture

14 Jul 2019 - 6:08 pm | इरामयी

१.

जर आपल्याला एकदा समजलं की भटक्या कुत्र्यांपासून आपल्याला घाबरायचं काहीही कारण नाही तर बरेच प्रश्ण आपोआप नाहिसे होतील. >> तुमच्या मागे लागायला हवेत, तेव्हा घाबरु नका, त्यांना हा लेख वाचून दाखवा :)

हा प्रतिसाद माझ्या स्वतःबाबत असल्याने त्याचं उत्तर देत आहे. यात मी बरोबर किंवा आपण चूक असा कृपया अर्थ काढू नये. तसा मला अभिप्रेत नाही. आपल्या भावनांचा आणि मतांचा आदर आहे. सर्वांनी माझ्याप्रमाणेच वागावं असा हट्ट किंवा आग्रहसुद्धा नाही. प्रत्येकजण आपापल्या अनुभवांवरून , विचार/भावनांनुसार वर्तन करत असतं, आणि त्यामुळे प्रत्येकाचा काही दृष्टीकोण असतो आणि तो प्रत्येकाचाच बरोबर असू शकतो. तसंच कोण बरोबर अथवा कोण चूक असं काही म्हणता येऊ शकेल असं मला वाटत नाही.... :

उत्तर आहे, हो. नवीन परिसरात गेल्यावर बरेचदा माझ्या मागे भटकी कुत्री लागली आहेत. लहानपणी खूप भिती वाटत असे परन्तु हळूहळू भिती कमी होत गेली. भटक्या कुत्र्यांच्या पाठी लागण्याचा आपल्यावर कोणताही परिणाम होऊ दिला नाही किंवा तो (आपल्या हालचालींतून चेहेर्‍यावरच्या भावनांतून) त्यांना जाणवू दिला नाही तर साधारणपणे त्याचा आपल्याला त्रास होत नाही.

२.
एक प्रतिसाद यावर असाही येऊ शकतो, तुम्हाला कुत्रा चावेल तेव्हा कळेल. याचं उत्तर आहे, माझ्या प्राणीप्रेमामुळे (किंवा त्याच्या वेडामुळे म्हणा हवंतर) मला आजवर मांजर, गाय, म्हैस, माकड, बकरी असे अनेक प्राणी चावले आहेत. कुत्रे तर अनेक वेळा (आकडा दिला तर खोटं वाटेल) चावले आहेत.

३.
अजून एक प्रतिसाद असा आहे की मला माझ्या कॉलनीच्या बाहेरचं जग माहीत नाही. माझा अनुभव कदाचित पुरेसा नसेलही आणि त्यामुळे आपलं म्हणणं बरोबर असूही शकेल. परंतु आजवर माझं वास्तव्य नऊ ते दहा वेगवेगळ्या स्थानी झालेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणच्या भटक्या कुत्र्यांशी माझी आजवर मैत्रीच झाली आहे.

आपल्या सर्वांच्या मतांचा आदर आहे. धन्यवाद!

गड्डा झब्बू's picture

14 Jul 2019 - 7:15 pm | गड्डा झब्बू

आपली खिलाडूवृत्ती आवडली इरामयी!
बरोबर बोलला आहात, प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे असू शकतात, कित्येकदा एखाद्या व्यक्तीचे काही विचार/मते पटतात, पण काही बाबतीत मतभिन्नता असू शकते.
एखाद्याचे एखादे मत किंवा विचार पटल्याने त्याला मित्रपक्षात टाकणे किंवा न पटल्याने शत्रुपक्षात टाकणे हे गैर आहे. काही जण आपले अनुभव सांगत असतात तर काही जण पूर्वग्रहाच्या आधारावर मते मांडतात. कुणाशीही तात्विक मतभेद असले तरी ते तेवढ्या पुरते ठेऊन पुढची वाटचाल खिलाडूवृत्तीने करणे हेच योग्य.

धर्मराजमुटके's picture

14 Jul 2019 - 8:49 pm | धर्मराजमुटके

श्या ! प्रतिसाद शंभरी व्हायच्या आतच आयुध टाकली दोन्ही पक्षांनी ?? अरे कमीत कमी ५० तरी ?? काय हे, पुर्वीचं मिपा राहिलं नाही.
विशेष म्हणजे भु भु चा धागा असून गवि कटाक्षाने दूर राहिले. आता उरलो फक्त वाचनापुरता असले काही नाही ना :)

वाद थांबला की संवाद सुरू होतो. धन्यवाद. :)

जॉनविक्क's picture

14 Jul 2019 - 11:05 pm | जॉनविक्क

दिवसातून एकदा तरी मी तुनळीवर कुत्र्यांचे, वाघ, सिंह, मांजरी यांचे मजेशीर, भावनोक्तट व्हिडीओ आवडीने पाहतो. लाब्राडोर कुत्रा उत्कृष्ठ ट्रेन करण्याचा अनुभवही आहे(पेपर उचलून हातात आणून देणे, उठ बस म्हटल्यावर उठबस करणे, शेखहॅन्ड करणे, निर्देशित केलेली वस्तू तोंडात पकडून आणून देणे वगैरे, वगैरे...)

हे सर्व असूनही एकदा रस्त्यावरील कुत्रा त्यालाच खायला घालताना अनपेक्षितपणे कडकडून चावल्याने डाव्या हातातून भळाभळा रक्त वाहिले आहे, ज्यावर आत्मविश्वास दुर्दम्य असल्याने हायड्रोजन पॅराकसोईडने जखम धुऊन काढणे यापलीकडे उपचारही घेतले नाहीत पण या अनुभवाने सामान्य व्यक्तींचा श्वानप्रजातीबद्दल असलेला भीतीचा भावही आता समजू शकतो त्यामुळे मी भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त हवाच हे प्रांजळपणे कबूल करतो.

बाप्पू's picture

19 Jul 2019 - 10:29 am | बाप्पू

संदर्भ -
दैनिक लोकमत. 18 जुलै. हॅलो पुणे पान नं 3
---------------

कालच आणखी एका श्वानप्रेमी मुळे एका व्यक्तीला कोठडी ची हवा खायला लागली.

वाकड येथे एका हॉटेल व्यवसायिकेचे आणि चिकन शॉप मालकाचे भटक्या कुत्र्यांमुळे रोज भांडण व्हायचे.
हॉटेल व्यवसाययिका रोज आपल्या हॉटेलातील शिळे पाके पदार्थ हॉटेल समोरील भटक्या कुत्र्यांना खायला घालत ( वाह रे तुमचे प्राणी प्रेम. _^_) परंतु त्यामुळे होणाऱ्या अस्वच्छता आणि घाण यामुळे शेजारील चिकन शॉप मालक परेशान होता.. त्याने एके दिवशी वैतागून कुत्र्याला मारहाण केली त्यामुळे कुत्र्याचा मृत्यू झाला..

काल नेहमी प्रमाणे कुत्राप्रेमी हॉटेल व्यावसायिका आपल्या हॉटेल मधील शिळेपाके अन्न घेऊन कुत्र्यांना घास भरवायला आल्या पण आपला नेहमीचा कुत्रा दिसत नसल्याने त्यांनी चौकशी केली असता मारहाणीबाबत त्यांना समजले आणि आता चिकन शॉप चा मालक न्यायालयीन कोठडीत आहे..

-- बाप्पू मोड ऑन

च्या आयला.. तुम्हाला भटकी कुत्री म्हणजे काय तुमच्या घरातील आणि हाटेलातील शिळे पदार्थ फेकण्याची कचराकुंडी वाटले काय.. एवढीच जर कुत्र्यांची माया असेल तर त्यांना घरी किंवा हाटेल च्या दारात बांधून त्यांचे मुके घेत बसा ना .. उगाच त्यांना काही बाही खायला घालून सार्वजनिक ठिकाणी घाण करायला लाज वाटत नाही का? आणि हो.. तुम्हाला भटकी कुत्री पाहिजेत मग त्यांनी केलेली घाण पण काढत जा ना.. रोज शिळे पदार्थ फेकायला शोधत शोधत येता त्यांना.. मग त्याच प्रकारे रोज सकाळी त्यांचे हागलेले मूतलेले पण काढायला तुमचे हात झाडलेत काय??? सार्वजनिक ठिकाणी घाण करून रोगराई आणि दुर्गंधी पसरवण्यास तुम्हाला लाज कशी वाटत नाही...

बाप्पू मोड ऑफ.

वरील घटनेत चिकन शॉप मालकाची देखील थोडी चूक आहे. त्याने प्रथम महानगरपालिका आणि पोलिस स्टेशन येथे हॉटेल व्यवसायिकेविरुद्ध गुन्हा दाखल करायला हवा होता. कारण कि तिने सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकून अस्वछता केल्यामुळे..

पण त्याच्या तक्रारीला कोणी दाद दिली नसती.. या मनेका गांधी आणि फेक कुत्राप्रेमींची संख्या खूप आहे आणि त्यांनी खूप मोठी लॉबी तयार केलीये..

So feeling sad for that shop owner...!!!

ही प्रतिक्रिया इथेसुद्धा होती काय? यावरचा माझा प्रतिसाद इथे आहे:

https://misalpav.com/comment/1039693#comment-1039693

धन्यवाद!