माझं "पलायन" १: ए दिल है मुश्किल जीना यहाँ, जरा हट के जरा बच के ये है बम्बे मॅरेथॉन!!

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
21 Jan 2019 - 5:11 pm

१: ए दिल है मुश्किल जीना यहाँ, जरा हट के जरा बच के ये है बम्बे मॅरेथॉन!!

नमस्कार! काल २० जानेवारीला मुंबईत पहिली मॅरेथॉन पूर्ण केली. ४२ किलोमीटर पूर्ण करण्यासाठी ५ तास १४ मिनिट लागले. फार अद्भुत अनुभव होता हा. अतिशय रोमांचक आणि विलक्षण! ह्या अनुभवासंदर्भात आणि माझ्या धावण्याविषयी- 'पलायनाविषयी’- कशी सुरुवात झाली ह्यावर सविस्तर लिहिणार आहे.

माझं 'पलायन' सायकलमुळेच सुरू झालं. सायकल चांगली चालवता येण्यासाठी स्टॅमिना वाढवण्याच्या इच्छेने एका सायकल मोहिमेच्या तयारीसाठी २०१६ मध्ये रनिंग सुरू केलं. नंतर ती मोहीम तर नाही झाली, पण रनिंग सुरू राहिलं. हळु हळु त्यातले बारकावे शिकत गेलो व नंतर हाफ मॅरेथॉन केली व आता फुल मॅरेथॉन! ह्या प्रवासाविषयी सांगण्याआधी कालच्या अनुभवाबद्दल बोलेन.

टाटा मुंबई मॅरेथॉन! खरं तर धावक किंवा रनर्सची एक जत्रा! ह्या पूर्ण इव्हेंटमध्ये ४६ हजारांपेक्षा जास्त रनर्स आले होते. त्यांच्यातले जवळपास ८७०० रनर्स फुल मॅरेथॉनसाठी धावले! ह्या मॅरेथॉनमध्ये भाग घेण्यामागचा माझा उद्देश खरं तर समुद्रालगत व मुंबईच्या सी- लिंकवर पळणं, हे होतं. हाफ मॅरेथॉन पूर्ण झाल्यानंतर ह्या फुल मॅरेथॉनसाठी क्वालिफाय झालो. खरं तर मॅरेथॉनचा अर्थच मुळी फुल मॅरेथॉन असतो. पण अनेकदा लोक हाफ मॅरेथॉनलाही मॅरेथॉन म्हणतात किंवा कोणी दहा किलोमीटरच्या रनमध्ये भाग घेतला तरी त्याला मॅरेथॉन म्हणतात जे की चुकीचं आहे. त्यामुळे फुल मॅरेथॉन असा उल्लेख करतोय.

२० जानेवारीच्या मॅरेथॉनसाठी १८ जानेवारीला मुंबईला पोहचलो. समुद्रालगत दमटपणा खूप असतो. त्याच्याशी थोडं जुळवून घेण्यासाठी व पुण्यातून प्रवास केल्यावर थोडा आराम करावा असं वाटलं, म्हणून दोन दिवस आधी गेलो. गेल्यावर आधी बिब कलेक्शन केलं. तिथे माझे मित्र प्रकाशजी व रनिंगचे गुरू बनसकर सरसुद्धा होते. इथे एक किट मिळालं. माझी पहिलीच मॅरेथॉन असल्यामुळे मला नीट माहिती नव्हतं. मला वाटलं की किटच्या पिशवीतच टी- शर्ट असेल. पण तो त्यात नव्हता. त्यामुळे परत दुस-या दिवशी ठाण्यावरून तिथे जावं लागलं. मुंबईतला वेदनादायी प्रवास करावा लागला. मॅरेथॉनच्या प्रवासात हे गाणं सतत आठवत होतं-

ए दिल है मुश्किल जीना यहाँ!
जरा हट के जरा बच के
ये हैं बम्बे मॅरेथॉन!

ठाण्यात राहणारे माझे जिजाजी- पराग जोशी अनेक वर्षांपासून ही मॅरेथॉन करतात. त्यामुळे त्यांच्याकडे थांबलो. त्यांनी ५० किलोमीटरची अल्ट्राही केलेली आहे. त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या. बाकी तयारी त्यांच्यासोबत होत गेली. १८ जानेवारीला पुणे- मुंबई व तिथून ठाण्याला जाताना फार थकायला झालं. आणि हळु हळु मॅरेथॉनचं एक प्रकारचं टेन्शनही आलं. जसं सूर्योदय होण्याच्या आधी तास भरापासून संधीप्रकाश येतो, तसं मॅरेथॉनच्या आधी अस्वस्थ वाटायला सुरुवात झाली. त्यामुळे रात्री झोपही फार कमी लागली.

१९ जानेवारीला सकाळी परागजींच्या ग्रूपसोबत एक सेशन केलं. स्ट्रायडर्स ग्रूपसोबतचा अनुभव छान होता. त्यांनी सुरुवातीला अनेक स्ट्रेचिंग एक्सरसाईजेस घेतले. नंतर अर्ध्या तासापर्यंत वॉक- जॉग घेतलं. नंतर परत वेगळे स्ट्रेचिंग एक्सरसाईजेस घेतले ज्यात धनुरासन, पश्चिमोत्तानासन अशी योगासनं व पवन मुक्तासन श्रेणीतल्या हालचालीही होत्या. मी जे स्ट्रेचिंग व योगासन करतो, ती ह्याला समांतर होती, त्यामुळे हे एक्सरसाईजेस आरामात करता आले. काही नवीन स्टेप्स/ स्थिती शिकायला मिळाल्या. दिड तासांच्या ह्या सत्रानंतर मस्त फ्रेश वाटलं. रात्रभर झोप झाली नव्हती हे जाणवणं थांबलं. त्यानंतर लगेचच टी- शर्ट घेण्यासाठी मुंबईतल्या बिब कलेक्शन सेंटरला जावं लागलं. बीकेसीची डायरेक्ट बस मिळेल असं वाटल्यामुळे हा प्रवास बसनेच केला. टी- शर्ट लवकरच मिळाला (टी शर्ट नव्हे, फक्त टी खरं तर). इथे धावकांची अक्षरश: रीघ लागली होती. पण बिब कलेक्शनचा शेवटचा दिवस असल्यामुळे उद्याच्या भाग- दौडीच्या आधी इथे भगदड होते की काय अशी स्थिती होती. दहा मिनिटांमध्ये काम झालं आणि परत निघालो. परतताना लोकलने येण्याचा विचार करत असतानाच मुलुंडला जाणारी बस मिळाली, त्यामुळे बसने निघालो. पण ह्या बसलाही खूप वेळ लागला. एक तास बस भांडूपच्या ट्रॅफिक जाममध्ये अडकली होती. एकदा तर वाटलं की, असाच उशीर होत राहीला तर मला मॅरेथॉनच्या आधी काहीच आराम मिळणार नाही. बसमधून एका इमारतीवर 'मॅरेथॉन हाय' लिहिलेलं दिसलं. नंतर ठाण्यातला मॅरेथॉन चौकही लागला. त्यामुळे तेच गाणं परत परत आठवतंय- ए दिल है मुश्किल यहाँ, जरा हट के जरा बच के! परत जाईपर्यंत सात तास गेले! कालही असाच प्रवास आणि मॅरेथॉनच्या एक दिवस आधी असाच प्रवास. फार थकायला झालं. आणि वाटत होतं की, प्रत्यक्ष मॅरेथॉनमध्ये जितकं थकणार नाही, तितकं सतत दोन दिवस थकतोय. आता चांगला आराम पाहिजे, नाही तर जी मॅरेथॉन "मुमकीन है" आहे, ती कठीण होईल.

संध्याकाळी बाकीची तयारी केली. जेवण लवकर झालं. आता मला किमान ४-५ तास झोप पाहिजे. नाही तर फार त्रास होईल. कारण सलग दोन दिवस काहीच आराम न करता फार थकायला झालं. जर झोप झाली, तर सलग दोन दिवस झालेला ताण वॉर्म अपसारखा उपयोगी पडेल. मग शरीराला रिचार्ज करण्याची संधी मिळेल व असाच ताण सलग तिस-या दिवशी घेण्यासाठी शरीर तयार राहील. संध्याकाळी चालताना फ्रेश वाटलं. सकाळी झालेलं सेशन व नंतर सतत मॅरेथॉनचा विषय चर्चेत असल्यामुळे आता हळु हळु मन त्या विषयापासून दूर ठेवू शकत आहे. आता नॉर्मल वाटतंय. आणि मग झोपही आली. झोपताना परत परत मनात स्वयंसूचन देत होतो- उद्या मला छान पळायचं आहे आणि माझे पाय दुखणार नाहीत. हाच विचार परत परत मनात आणत झोपलो व उठलो तेव्हाही हाच विचार मनात होता. साडेआठ ते साडेबारा अशी चार तास मस्त झोप झाली. दोन वाजता उठून तीन- सव्वा तीनच्या बसने मुंबईसाठी मी व परागजी निघालो. ताईने अडीचला उठून चहा- सँडविच बनवून दिलं. पीनट बटर सँडविच मस्तच वाटत होतं. जिजाजी व ताईने जी मदत केली व सोबत दिली, त्यामुळे हिंमत वाढली. ताई नंतर आम्हांला चीअर करायला मॅरेथॉनच्या रूटवरही येणार होती‌ व माझे आई बाबा, आशा- अदूही येणार होत्या.

पहाटेच्या अंधारात इतर रनर्ससोबत बसने मुंबईला पोहचलो. इथे खरंच खूप मोठी जत्रा भरली होती! भारताबरोबर विदेशातीलही रनर्स आले आहेत! एक अद्भुत वातावरण सुरू झालं! माझे रनर मित्र व रनिंगचे गुरू बनसकर सरही इथे परत एकदा भेटले. उत्साह वाढवणारं वातावरण! अनेक ठिकाणच्या ग्रूप्सचे काही हजार धावक! सोबतच संगीतमय जल्लोष! त्यासोबत स्ट्रेचिंगची मजा! बरोबर साडेपाचला टाटा मुंबई मॅरेथॉन सुरू झाली! शिवाजी महाराज की जय, गणपती बाप्पा मोरया! सेक्शन बीमधून मी सुरुवात केली. आयोजन इतकं चोख होतं की, अजिबात गर्दी झाली नाही व सुरुवातीपासूनच धावायला जागा मिळाली. पण लगेचच दमटपणा किती भीषण आहे, हे जाणवलं. फार जास्त घाम गळायला लागला. थोडी भितीही वाटली. पण इतके सगळे जण एकत्र पळताना एक प्रवाह तयार होतो- एक फोर्स तयार होतो. एकट्याने पोहणं व ग्रूपसोबत प्रवाहाच्या दिशेने पोहणं ह्यात फरक पडतोच. मी आजवर जास्त रन सोलोच केले होते. त्यामुळे मला हे खूपच छान व सोपं वाटलं. आणि इतक्या लोकांना पळताना बघून एक प्रकारचं संमोहनही तयार होतं. त्यामुळे आरामात पुढे जात राहिलो. धावकांमध्ये ६०- ७० वयोगटातील ज्येष्ठ नागरिक व अनेक महिला- मुलीही आहेत. अनेक ठिकाणी लोक चीअर अप करत आहेत, उत्साह वाढवत आहेत! मध्ये मध्ये ऑर्केस्ट्रा, बँड बाजाही आहे! हे वातावरण एकदा अनुभवावं असंच आहे! अंधारातच किना-यालगत मरीन ड्राईव्हवरून पुढे गेलो. हाजी- अली मार्गे वरळी सी लिंकला पोहचलो. खरोखरच अद्भुत अनुभव है! परागजींनी खजूर पॅकेट दिले आहेत, ते दर सात किलोमीटरने सुरू केले. ठिकठिकाणी लोक पाणी, इलेक्ट्रॉल, केळं इ. घेऊन उभे आहेत. जवळ जवळ सततच छोट्या मुलांपासून ज्येष्ठ नागरिक चीअर अप करत आहेत. व्यवस्था अतिशय चोख आहे!


हाफ मॅरेथॉनचा टप्पा येईपर्यंत थकवा सुरू झाला. तरी ब्रेक न घेता पुढे जात राहिलो. मध्ये मध्ये इलेक्ट्रॉल- एनर्जाल घेत राहिलो, घोट घोट पाणी घेत राहिलो. २५ किलोमीटरनंतर पाय जास्त थकायला लागले. एकदा स्ट्रेचिंग केलं. थोडा वेळ बरं वाटलं. पण २९ किलोमीटरनंतर पळणं कठीण झालं. आता ऊनही वाढलं आहे. माझ्याप्रमाणे बाकीही लोक आता हळु हळु चालत- पळत आहेत. ह्याच टप्प्यावर एलिट- रेसर रनर्स मागून येऊन ओव्हरटेक करून गेले. जवळजवळ दोन तास उशीरा निघूनही ते एमेच्युअर रनर्सच्या फार आधी पोहचतात! पहिल्यांदा विदेशी एथलीटस बघता आले. त्यानंतर भारतीय एलिट एथलीटसही दिसले. त्यांच्यात परभणीची ज्योती गवतेही होती जिने मागच्या वर्षी भारतीय एलीट महिला एथलीटसमध्ये तिसरं स्थान प्राप्त केलं होतं.

मॅरेथॉनचे शेवटचे दहा किलोमीटर अपेक्षेनुसार कठीण गेले. २९ नंतर मध्ये मध्ये चालणं अनिवार्य झालं. पण चांगली गोष्ट ही होती की, रनिंग बिल्कुल बंद करण्याची वेळ आली नाही. वॉक- जॉग सुरू केला. त्याच टप्प्यात मला चीअर अप करायला ठाण्यावरून ताई व माझे घरचेही भेटणार होते, त्यामुळेही थोडा उत्साह होता. फुल मॅरेथॉन तसा टेस्ट क्रिकेटसारखा संयमाचा- धैर्याचा खेळ आहे. खूप पेशन्स हवा. फक्त कोहली तत्त्व नाही तर पुजारा तत्त्वही गरजेचं! एक एक पाऊल पुढे टाकत राहिलो. पाणी पीत राहिलो, गॅप गॅपने खजूर व चिक्की खात राहिलो. २१ किलोमीटरला जवळपास सव्वा दोन तास लागले होते, ३० किलोमीटरलाही जवळपास सव्वातीन तास लागले. त्यामुळे हे तर कळालंच की मी शक्यतो साडेपाच तासांमध्येच मॅरेथॉन फिनिश करत आहे. ३४ व्या किलोमीटरला ताई भेटली. तिने चीअर केलं. तिथेच परागजीही भेटले. म्हणजे आम्ही जवळजवळ सोबतच जात होतो! त्यानंतर ३८ किलोमीटरला आई- बाबा व आशा अदू भेटले! पूर्ण रूटवर बाकी लोकही सतत चीअर अप करत होतेच! गो गो, यू कॅन डू ईट, बस चार किलोमीटर बाकी है, जाओ असे म्हणत होते. मध्ये मध्ये म्युझिकही वाजत होतं. माझे रनिंगचे आणखी एक गुरू हर्षद पेंडसेही भेटले. त्यांच्यासोबत पळू शकतो, ह्यामुळेही उत्साह वाढला. पुढे शरीराला त्रास होत होता, पण तरी आरामातच जात राहिलो. समोरच्या सिग्नलपर्यंत पळेन, मग चालेन असे छोटे टप्पे करत करत वॉक- जॉग चालू ठेवला. शेवटी फिनिशच्या आधीचा एक किलोमीटर पळूनच पूर्ण केला. माझं टायमिंग ५.१४ आलं! जर काल परवा चांगला आराम व नीट झोप झाली असती तर कदाचित ५ तासांच्या आतही पूर्ण करता आलं असतं. असो, मला टायमिंगमध्ये इतका रस वाटत नाही. मी फक्त सहज गतीनुसार जात राहिलो.

मॅरेथॉन पूर्ण झाली. आनंद तर झालाच आणि एका अर्थाने इतक्या कमी वेळेत पूर्ण झाल्याचं आश्चर्यही वाटलं. कारण मी तर समजत होतो की, मला कमीत कमी साडेपाच तास तरी लागतील. त्यापेक्षा बराच कमी वेळ लागला. उत्साहही वाढला. पण अचिव्हमेंट असं‌ काही वाटलं नाही. कारण मला वाटतं अचिव्हमेंटपेक्षा SOP मोठं असतं- स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर. प्रत्येक गोष्ट करण्याची योग्य पद्धत असते. त्या पद्धतीने ती गोष्ट केली जाऊ शकते. फक्त प्रोसेस कोड आपल्याला माहिती हवा. त्यात आवड असायला हवी. असो. माझ्या दृष्टीने १ ते ४२ किलोमीटर अंतरापेक्षा ० ते १ किलोमीटर हे मोठं अंतर आहे. पहिलं पाऊल उचलणंच कठीण असतं. ० ते १ पर्यंत माझी धाव व मग १ ते ४२ असं "पलायन" ह्याविषयी पुढच्या लेखात बोलेन. माझ्यासाठी ही मॅरेथॉन ह्या आत्मविश्वासारोबर ह्या वातावरणासाठीही लक्षात राहील. सतत अनेक तास रस्त्यावर ऊन्हात उभं राहून चीअर अप करणं, शिवाय पाणी, मीठ लावलेले केळे, इलेक्ट्रॉल हे देत राहणं सोपी गोष्ट नाहीय.

पुढील भाग: पलायन २: धडपडण्यापासून धड पळण्यापर्यंत

अशा इतर सर्व लेखांसाठी- माझा ब्लॉग

आरोग्यक्रीडाविचारअनुभव

प्रतिक्रिया

प्रशांत's picture

21 Jan 2019 - 5:16 pm | प्रशांत

मस्तच.
अभिनंदन

श्वेता२४'s picture

21 Jan 2019 - 5:24 pm | श्वेता२४

छान लिहीलंय. मॅरेथॉन करणाऱ्यांना कोणकोणत्या टप्प्यातून जावे लागते याची जाणीव झाली. शुभेच्छा.

देशपांडेमामा's picture

21 Jan 2019 - 5:54 pm | देशपांडेमामा

फुल मॅरेथॉन पूर्ण केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन !

देश

mrcoolguynice's picture

21 Jan 2019 - 6:02 pm | mrcoolguynice

I was there too for half-marathon...

एकनाथ जाधव's picture

21 Jan 2019 - 6:04 pm | एकनाथ जाधव

अभिन्नदन

टवाळ कार्टा's picture

21 Jan 2019 - 6:11 pm | टवाळ कार्टा

भारी

सविता००१'s picture

21 Jan 2019 - 7:18 pm | सविता००१

अभिनंदन

मित्रहो's picture

21 Jan 2019 - 7:49 pm | मित्रहो

अभिनंदन
मुंबई मैराथॉन दमट हवामानामुळे कठीण समजल्या जाते.

शेखरमोघे's picture

21 Jan 2019 - 8:34 pm | शेखरमोघे

अभिनंदन. मुंबईच्या दमट हवामानाची सवय नसतानाही अपेक्षेपेक्षा कमी वेळात ही शर्यत पूर्ण करतानाचा तुमचा अनुभव इतर स्पर्धातही वापरण्यासारखा - जसे प्रचन्ड पूर्वतयारी, प्रत्यक्ष स्पर्धेत आपल्या पुढे छोटे छोटे टप्पे ठेवत जाणे. Well done!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 Jan 2019 - 9:18 pm | डॉ सुहास म्हात्रे

एकदम भारी ! हार्दीक अभिनंदन !

मॅराथॉन पुरी करणे आणि ती ५ +/- तासांत पुरी करणे, हेच मोठे काम आहे.

पुढच्या अश्या अनेक प्रकल्पांसाठी अनेक शुभेच्छा !

दीपक सालुंके's picture

22 Jan 2019 - 12:24 pm | दीपक सालुंके

अभिनंदन

मार्गी's picture

23 Jan 2019 - 12:44 pm | मार्गी

वाचनाबद्दल व प्रतिक्रियांबद्दल सर्वांना धन्यवाद!! :)

सुबोध खरे's picture

23 Jan 2019 - 1:40 pm | सुबोध खरे

मॅरेथॉन ही शारीरिक पेक्षा मानसिक कसोटी जास्त असते. साधारण 25 किमी नंतर माणूस जिद्दीनेच पळत असतो आणि शरीर साथ देत असते.
आपल्या जिद्दीला आणि मानसिक कसोटीला सलाम

मार्गी's picture

24 Jan 2019 - 3:29 pm | मार्गी

धन्यवाद सर!!

@ mrcoolguynice आपलेही अभिनंदन!!

माझीही शॅम्पेन's picture

28 Apr 2019 - 6:49 pm | माझीही शॅम्पेन

वा निरंजन पहिल्या वाहिल्या पूर्ण मॅरेथॉन सती अभिनंदन :)
ताईच नाव डॉ अश्विनी हेही लिहायच न रे :)
अश्विनी आणि पराग दोघांना ओळखतो

मार्गी's picture

29 Apr 2019 - 10:02 am | मार्गी

ओहह.. आपले नाव कळेल का? ताईला आयडीवरून तरी कळालं नाही!

राजेंद्र मेहेंदळे's picture

1 May 2019 - 6:54 pm | राजेंद्र मेहेंदळे

एकदा हाफ मॅरेथॉनचा टप्पा गाठायची ईच्छा आहे, पण हा लेख वाचुन अजुन किती पल्ला पार करायचाय याची कल्पना आली.

नया है वह's picture

2 May 2019 - 2:43 pm | नया है वह

अभिनंदन