गवत्या

मित्रहो's picture
मित्रहो in दिवाळी अंक
6 Nov 2018 - 12:00 am

H

गवत्या

जरा जोर लावूनच गावातल्या घराचे दार उघडले, तसा कर्रर्र आवाज झाला आणि धुळीचा लोट अंगावर आला. मला जोरात ठसका लागला. खोकलतच मी छपरीत एक नजर फिरविली. छपरीत एका बाजूला कापसाचा ढीग आणि दुसऱ्या बाजूला धान्याच्या पोत्यांची रास बघायची सवय असलेल्या माझ्या डोळ्यांना रिकामी छपरी बघवत नव्हती. छपरीतील एका खुंटीला बैलांच्या गळ्यात बांधायच्या घंटा टांगून ठेवल्या होत्या आणि त्याखाली घंटांचा, घुंगरांचा ढीग होता. बैलांच्या गळ्यातल्या मोठ्या घंटा, गाईच्या गळ्यातल्या लहान घंटा, बकऱ्यांच्या गळ्यातले घुंगरू... सारे काही अस्ताव्यस्त पडले होते. तो ढीग बघून गाई, म्हशी, बकऱ्या, घंटा, घुंगरू य़ांचे आवाज माझ्या कानात घुमायला लागले. या आवाजाबरोबरच माझ्या कानात गुंजणारा आणखीन एक आवाज म्हणजे 'गवत्या'.

"हे आकाशवाणी नागपूर केंद्र आहे, तुम्ही ऐकत होता भक्तिसंगीताचा कार्यक्रम अर्चना. सकाळचे सहा वाजून तीस मिनिटे झाली आहेत. आता ऐकू या..." रेडिओ बंद आणि आजीचा रेडिओ सुरू.
"गवत्या, ए गवत्या. साडेसहा वाजले, अजून आला नाही."
"सुनंदाबाई, स्वतःला आकाशवाणी समजू नका. इथून तुमचा आवाज गवत्यापर्यंत पोहोचणार नाही." गोठ्यात झाडू मारता मारता आजोबांचा खोचक टोमणा.
"ए ऊठ, जा बरं त्या गवत्याआबांना बोलावून आण." गावी गेलो की सकाळ ही अशीच व्हायची गवत्याला उठवण्यासाठी. मी डोळे चोळत उठलो. गवत्याच्या घऱी गेलो, तेव्हा गवत्याच्या घरातील कुणी स्त्री गोवऱ्या थापत होती. गवत्याच्या घरात साधारण पंधरा माणसे तरी असावीत आणि यात गवत्या सर्वात मोठा, यापलीकडे गवत्याच्या घरातली नाती मला कधी कळली नाही.
"काकू, गवत्याआबा कुठे आहे?"
गवत्या आमच्या आजोबांच्या वयाचा किंवा कदाचित त्यांच्यापेक्षाही मोठा असावा, तरीही आम्ही चार भावंडे सोडली तर गवत्याला गवत्याआबा कुणी म्हणत नव्हते. सारा गाव - म्हणजे अगदी दोन वर्षांच्या पोरापासून ते पंचाहत्तर वर्षांच्या म्हाताऱ्यापर्यंत सारे त्याला 'गवत्या' असेच म्हणत होते. त्याच्या घरातील मंडळी मात्र 'मोठ्या' म्हणत होती. तो फक्त गवताचे भारे कापतो म्हणून गवत्या, की त्याचे नांव गौतम होते त्याचे गौत्या झाले होते, ते माहीत नाही. गवत्याचे खरे नाव काय हे जाणून घ्यायची कधी गरज भासली नाही.
"ते झोपून आहे, तिकड झोपडीत."
"काकू, गवत्याआबा त्या झोपडीत का झोपतात?"
"ते मुतते आंथरुणात." हे ऐकताच मला हसू आले. मी हसतच गवत्या झोपला होता त्या झोपडीत गेलो. अंगणातच एक छोटीशी झोपडी होती. त्यावर मराठी कवेलुचे छप्पर होते. मी गवत्याला हळू आवाजात आवाज दिला.
"गवत्याआबा, गवत्याआबा," माझ्या आवाजाचा गवत्यावर काहीच परिणाम होत नाही, हे बघून अंगणातच बसलेला गवत्याचा नातेवाइक जोरात ओरडला.
"ए मोठ्या, ऊठ. मालकीण बोलवते तुयी. बाबू तुल बोलवायल आला." आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तीला मोठ्या म्हणून असा दरडावून आवाज देताना मी आजवर बघितले नाही.
"बाबू, तू जा घरी, येइन तो." मी सरळ घऱी आलो.
घरी आल्या आल्या आजीला सांगितले,
"आजी, तुला माहीती, गवत्याआबा गादीत सूसू करतो" हे सांगतांना मला हसू आवरता येत नव्हते.
"हसायचं नाही. देव असतो त्यांच्यात." आजीचे गणित असेच होते. आजी सकाळपासून संध्याकाळपर्यंत गवत्यावर ओरडत होती, तरी तिच्या मते त्याच्यात देव होता. आजीला काहीही वेगळे दिसले की त्यात देव आहे असेच वाटायचे. नारळ खराब निघाला - देवाला पावला, वेल लवकर सुकली - देवाने नेली, साप दिसला - देवाने दर्शन दिले. देव आहे असे म्हटले की तिच्यापुरता विषय संपून जात होता. गवत्या वेडा नव्हता, पण नक्कीच मानसिक आजाराने पीडित होता. त्याला इतरांपेक्षा काही गोष्टीची समज कमी होती. त्याचा कधीकधी झोपेत शरीरावर ताबा राहत नव्हता. बाकी त्याचे वागणे बोलणे सर्वसामान्यांसारखेच होते. गाव मात्र त्याला वेडा ठरवून मोकळे झाले होते. त्याचमुळे गवत्याचे लग्न झाले नव्हते. त्याला कामेसुद्धा हलकीफुलकीच दिली जात होती. आमच्या घरी गवत्या गुरे चारणे, गवताचे भारे आणणे, गाईम्हशीचे दूध काढणे अशा कामांसाठी कामाला होता.
दहा मिनिटात तोंडात कडुलिंबाची काडी, बसलेले गाल, त्यावर पांढरी खुरटी दाढी, कृष्णवर्ण, अंगात फाटकी बंडी, खाली धोतर आणि पायात टायरच्या चपला असे गवत्याचे ध्यान आमच्या अंगणात येऊन उभे झाले. टाक्यातले पाणी घेऊन गवत्याने तोंड धुतले. आजीने चहा दिला.
"चहात जरा साखर टाकत जा ना बाई."
आपल्या मालकिणीला चहात साखर टाकत जा असे ठसक्यात फक्त गवत्याच सांगू शकत होता. तसा गवत्या चार कुडवाचा नोकर म्हणजे महिन्याला चार कुडव ज्वारी आणि वर्षाचे साल घेऊन काम करणारा. पण सकाळच्या चहापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत गवत्याचे सारे काही आमच्याकडेच होते. असे आहे म्हणून दोन कामे जास्ती करणे वगैरे गवत्याच्या स्वभावात नव्हते, उलट त्याला कामाचा प्रचंड आळस होता. कामे चुकवायची आणि मग त्याची मनाला वाटेल ती कारणे द्यायची. गवत्या काय कारण सांगेल काही नेम नव्हता. बरे, आपण पकडले जात आहोत, समोरच्याला आपले खोटे समजत आहे याचे त्याला काही सोयरसुतक नव्हते. तो बिनधास्त त्याला सुचेल ती कारणे द्यायचा.
गवत्या खराटा घेऊन निघाला, अंगणात दोनचार झाडू मारले, गाईम्हशींवर उगाच आरडाओरडा केला. मग त्याला बैलाला ढेप खाऊ घालताना आण्या दिसला. गवत्याने मग आण्याकडे तंबाखू मागितला, तिथेच खासरावर तंबाखू खात बसला.
"गवत्या, गवत्या"
आजीने परत आवाज दिला. दिवसातून शंभर वेळा तरी आजी गवत्या गवत्या करीत होती. मालकीण अंगणात येऊन आता आपल्यावर कडाडणार, याचा अंदाज येताच गवत्या टमरेल घेऊन सरळ वावरात पळाला. त्यानंतर अर्धा तास गवत्याचा पत्ता नाही. तिकडून आल्यावर पायातला काटा काढायचे निमित्त करुन तो अंगणातच गाणे गुणगुणत बसला. गाणे गुणगुणणे हा गवत्याचा आवडीचा छंद होता. तो सतत काही तरी गुणगुणत असायचा. पण गवत्याने कधी कुण्या सिनेमातली गाणी म्हटली नाहीत. तो आपली गाणी स्वतःच बनवत होता, गाण्याची चालही त्याचीच आणि गाणाराही तोच. गवत्याच्या गाण्याचा गीतकार, संगीतकार आणि गायक सबकुछ गवत्याच होता. गाण्यातील शब्दांना अर्थ असायला हवा, ते गाणे मीटरमध्ये हवे असे काही नाही. फक्त पहिल्या ओळीचे दुसऱ्या ओळीशी यमक जुळले की झाले.
"आस्ते, आस्ते तोडले रस्ते, सखूबाई तोंडाले पावडर फासते"
"गवत्या आंगण झाडल का?”
"कवाच"
"ते का हाय मंग" आजीने अंगणातल्या शेणाकडे बोट दाखवीत विचारले.
"तिकडं म्या नाही मालाकान झाडल. झाडता येत नाही तर मालक झाडतेच कायले का बा.” गवत्याचे हे वाक्य ऐकताच आजीचा पट्टा सुरु झाला.
"डोक्यावर बसवून ठेवला आहे याला. याची सारे कामे करुन घेता. तो एका कामाचा राहिला नाही.” अशा लेकी बोले सुने लागे गोष्टींचा गवत्यावर कधी परिणाम होत नव्हता.
"गवत्या, टाक्यात पाणी भरलं का?”
"हो, भरलं.”
"टाकी तर अर्धी रिकामीच हाय.”
"ढोर येऊन पिऊन गेलं असन.”
"ढोर कसे येईन? मालक तर येथच बसून हाय.”
"पाहा, मालक बसले असूनही ढोर येऊन पाणी पिऊन जाते. तुम्ही मलेच बोलता.” आता मात्र आजीचा ताबा सुटला आणि ती गवत्यावर खेकसली. तिच्या तोंडाचा पट्टा आता अधिक जोरात सुरु झाला. तिची बडबड ऐकून आता गवत्याही वैतागला. रागारागात उठला, हातात पाण्याच्या बादल्या घेतल्या, टाकी पूर्ण भरली, बादल्या तशाच फेकून दिल्या आणि सरळ घराकडे निघून गेला.
साधारण दोन तासांनी गवत्या परत आला. स्वारी अजूनही घुश्श्यातच होती. नेहमीप्रमाणे त्याने 'बाई' असा आवाज दिला नाही. तो आला याची दवंडी म्हणून त्याने भले मोठे चऱ्हाट जोऱ्यात आदळले. आजीने 'गवत्या' असा आवाज दिला, पण त्याने ओ दिली नाही. तो गुरे घेऊन शेतात निघून गेला. दुपारी मी आणि आजोबा जेवण करुन शेतात गेलो. शेतात तुरी काढणे चालले होते. खळे शिंपले होते. खळ्यावर तुरीच्या पेंड्यांचा ढीग ठेवला होता. तेंव्हा थ्रेशर नव्हते. बाया तुरीची पेंड झो़डपून शेंगा आणि दाणा वेगळा करीत होत्या. आजोबांनी खळ्याभवताल एक चक्कर मारली. तुरीचे दाणे हातात घेतले. आमच्या बाजूचा शेतवाला विठोबाजी तिथेच बसला होता.
"का विठोबाजी कसे इकड?”
"बायायले इचारले आलतो. मायीबी तूर हाय न.”
"किती होइन तुरी काही अंदाज" आजोबांनी आपल्या हातातले दाणे त्याच्या हातात देत विचारले.
"दाणा बारीक हाय पण पंधरा पोते कोठ गेले नाही.”
"गवत्या म्हणे पंचवीस पोते होइन.”
"आता गवत्यान पंचवीस म्हटल्यावर पंचवीस काहूनजी तीस पोते होते.” तेथेच काम करता करता जनाबाईने आपले मत दिले. आमच्याकडे कामाला गवत्या आहे म्हणून कितीही मोठा दुष्काळ असला तरी आमचे शेत पिकते असा साऱ्या गावाचा समज होता. आजोबांचाही तोच विश्वास होता भलेही बऱ्याचदा गवत्याने म्हटले तसे घडले नव्हते. गवत्याला या कशातल काहीच कळत नाही त्याचमुळे तो सांगतो ते बरोबर असते असा त्याच्या अज्ञानाच्या शक्तीवर सर्वांचा प्रचंड विश्वास होता. म्हैस कोणत्या दिशेने गेली विचारा गवत्याला, मुलीचा नवरा कुणीकडे सापडेन विचारा गवत्याला. सारा विचित्रच प्रकार होता. असे असले तरी गवत्याला कामावर ठेवायला गावात किती लोक तयार होतील हा प्रश्न होता. आजोबांचा मात्र गवत्याच्या या सहाव्या इंद्रियशक्तीवर पूर्ण विश्वास होता. हा असा आंधळा विश्वास की आपण कामावर नाही ठेवले तर गवत्याची काय होणार ही काळजी की दोन्ही पण वर्षानुवर्षे गवत्या आमच्याकडेच कामाला होता.
"हाय कोठ ते?” विठोबाजींनी विचारले
"आण्या कोठ हाय रे गवत्या?”
"त्या तिकडल्या डुंगीच्या पडतात हाय. अजूनही गुश्यातच हाय गडी.”
"अस का. चल आण्या पाहून येउ. चाला विठोबाजी” मी आजोबा, आण्या, विठोबाजी सारे गवत्याला शोधत पडतात आलो. पडतात गुर सोडून गवत्या बोरीच्या झाडाखाली लोळत पडला होता. काही बकऱ्या पऱ्हाटीकडे चालल्या होत्या गवत्याचे तिकडे लक्ष नव्हते. आम्ही सारे गवत्याजवळ आलो तसा तो उठून बसला.
"काबे गवत्या कायचा घुस्सा हाय बे येवढा?” आजोबांनी जरा रागावूनच विचारले.
"हे मालकीण सकाडपासून पटर पटर लावून देते.”
"मालकीणीच का येवढ मनावर घेते बे. हे घे भाकर खाउन घे. जवसाची चटणी हाय. ठेचा हाय.”
"नाही मालक, आता येक तर मी राहीन नाहीतर मालकीण.”
"अरे बापरे. कठीण हाय गड्या. अस करु आता मांडोशी येतचे तवाच ठरवू काय ते. फैसलाच करुन टाकू.”
"मांडोशी नाही आजच ठरवा का ते"
"काम सोडून का करशीन तू?”
"मी काहीबी करीन उपाशी मरतो का मी. खंतीच्या कामाले जाइन हिंगणघाटले.”
"तू कसा उपाशी रायशीन, तुय पोट भरनच पण माय कस होइन. मायी म्हस दूध देत नाही तुया हात लागल्याबिगर"
"ते तर गाभणच राहत नव्हती, तवा म्या"
"तू का केल बे?” आण्या मधेच बोलला.
"तिले बोरगावले घेउन गेलतो त्या सुपारीवाल्याकड. त्याचा हल्या हाय.” गवत्याने आता भाकरीची शिदोरी उघडली. जवसाची चटणी, ठेचा आणि भाकर खायला लागला.
"पाय बर गवत्या तुयाबिगर मायी म्हस गाभण राहत नाही. गाय पाणी पित नाही, बैलं कडबा खात नाही.”
"आताच जनाबाई सांगत होती गवत्यान सांगतल म्हणून पंचवीस पोते तुरी होते नाहीतर असा बारीक दाणा, धा पोतेबी तुरी झाल्या नसत्या.” आण्याने आजोबाकडे बघत डोळा मारला.
"पाय आण्याले मालूम हाय, जनाबाइल मालूम हाय. आण्या कितीही डवरं, वखरं करु दे, खात टाकू दे, फवारे मारु दे पण गवत्या नाही तर माय वावर पिकन का.”
"ते तुमच तुम्ही पाहून घ्या पण माया हिशेब करुन द्या.” भाकरीवर ताव मारीत गवत्या बोलला.
"तुमच काही खर नाही बाबूजी. अमदाच का ते पिकपाणी हाय. फुड काही नाही.” विठोबाजी बोलले.
"आता गवत्या म्हणते तर हिशेब कराच लागन जी. न करुन कोणाले सांगता. सांजच्याले तुया हिशेब करुन देतो. आण्या हे तर लय मोठी पंचाइत झाली बे. तुले कोंबडं शिजवता येते का?”
"नाही जी मालक काहून?”
"आज वर्धेवरुन या बाबूले न्याले मोठे बापू येणार हाय. तवा मालकीण म्हणे कोंबड शिजवू. आता तुलेच शिजवा लागन.”
"मले नाही जमत जी ते. ते चूल बनवा, मसाले वाटा, कोण सांगतल. तुम्ही म्हणान तर अजून दोन वळी वखर हाणतो पण ते कोंबड शिजवाच सांगू नका. कोंबड बनवाच ते गवत्यान. त्याच्या हातची चव तर मालकिणीलेही येत नाही.”
"गवत्या तर आता चालला हिंगणघाटले. तो का आपला राहिला का.”
"ते ही खर आहे म्हणा आता गवत्या आपला राहीला नाही. आज काही मोठ्या बापूले पाहुणचार होत नाही.”
"म्या बनवतो कोंबड, आजचा आखरी दिस समजून घ्या.” कोंबड्याच नाव ऐकून अंगात वेगळाच उत्साह संचारलेला तरीही मला फारसा उत्साह नाही असा दाखवित गवत्या बोलला.
"लय उपकार बा तुये. रातच्याले कोंबड बनव, खा मंग तुया हिशेब करुन टाकू.”
"ठेचा झ्यॅक बनला होता.” गवत्यान जाता जाता शेरा दिला आणि गवत्या तिकडे शेतात चाललेल्या बकऱ्या हाकलायला उठला.
"ए भवाने चल हो अंदर, कोठ चालली बापाच माल हाय का?”
आम्ही शेतातून घरी आलो तोपर्यंत बाबा आले होते. गवत्याही गुर घेउन लवकरच घऱी आला. हातात एक कोंबड घेउनच आला.
"मालकीण हे पायजा कोंबड आणल"
"कोणाकडून आणल?”
"हे त्या डोम्याच व्हय. म्या मांगच पाहून ठेवल होत. मले वाटलच बाबूले न्याले मालक येइन तवा कोंबडं लागनं म्हणून.”
असे म्हणत गवत्यान अंगणात चूल मांडायला सुरवात केली. आधी जागा सारवून घेतली, त्यावर विटा ठेवल्या. दोन चांगली लाकडं फोडली.
"गवत्या आंग धुतल का नाही आज?”
"हो न जी मालक.” असे म्हणत गवत्याने परत चांगले हात धुतले.
"चांगल मुक्कामान याच मालक मस्त वावरात सैपाक केला असता. पांडगे बनवले असते.”
बाबा फक्त हसले. आजीने पाटा, वरवंटा आणून ठेवला, आल, लसून, काळेमिरे, धने, लवंग, विलायची, मिरची, लिंबू, कांदे, टमाटे सारे आणून ठेवले. गवत्याने कोंबड कापल, ते धुतल, त्याचे काप केले.
"तू आधी म्हशी दव्हून टाक बर पयले तू येच्यात लागला का तुले फुरसद भेटनार नाही.”
"आधी कोंबडं मंग म्हशी.”
त्याने कढईत तेल टाकून तेलात कांदे परतायला सुरवात केली. पाटा वरवंट्यावर आल, मिरची, लसूनची मस्त पेस्ट बनविली.
"बाई मिरच्या द्या अजून"
"आबे झोंबन ना"
"झोंबल्याशिवाय कोंबडीची मजा नाही येत मालक.”
मग त्याने टमा़ट्याची पण पेस्ट बनविली. एका मोठ्या गंजात तेल टाकूले, आल्या लसणाची पेस्ट टाकून त्यात पाणी ओतले आणि मग त्यात कोंबड शिजायला ठेवून दिले. हात धुवुन आजीला आवाज दिला
"बाई दुधाच भांड द्या बर"
"छपरीतच खाटेवर हाय पाय"
"बाई अधून मधून ते कोंबड जरा हालवा."
दुधाच भांड घेउन गवत्या गोठ्यात म्हशीचा दूध काढायला गेला. सकाळपासून कामाचा अजिबात उत्साह नसनारा गवत्या आता मात्र खूप उत्साहात होता. पाहुणे आले की पाहुण्यांसोबत गावातली वीस पंचवीस लोक जेवायला येतात. त्यांचा सारा स्वयंपाक करा, पाहुणचार करा त्यात मदत म्हणून आजीनेच गवत्याला शिकवले होता. आता मात्र तो आजीचेच ऐकत नव्हता. आपल्यासारख कोंबडं कुणी बनवू शकत नाही असे त्याचे ठाम मत होते. तसे ते खोटे नव्हते, गवत्या कोंबडं बनविनार म्हटले की गावातली काही माणसे, पोरबाळं आशेने जमत होते.
"बाई दूध"
"गवत्या दूध कमी आहे.”
"म्हस आटली असन.”
"अशी कशी आटते. आताच तर जनली म्हैस. महीनाही नाही झाला.”
"आता उन्हाची नदी आटते, वघळं आटते तर का म्हस नाही आटनार.”
"हे कोणत शास्त्र आहे?”
"ते गवत्याचा शास्त्र आहे.”
बाबांचे वाक्य ऐकायला गवत्या थांबलाच नव्हता. त्याच सार लक्ष चुलीकडे होते. गावातली मुलबाळं, काही मोठे व्यक्ती सारे जमले होते. मोठी माणसे उगाचच बाबांची चौकशी करायला आलो असे दाखवित होते आणि तेथेच खाटेवर कोंबड शिजायची वाट बघत बसले होते. बघता बघता चांगली वीस पंचवीस माणसे आणि पोर जमा झाली होती. भाजीच्या रश्श्याचा मस्त वास सुटला होता. गवत्यान त्यात अजून मसाला टाकला. तासभर झाला कोंबडे शिजत होते. मलाही मी कधी खातो असे झाले होते पण पहिल्या घासातच मला ठसका लागला. मी दर घासामागे पाणी पित खात होतो. सारी माणसे मात्र गवत्याची खूप स्तुती करीत होते. गवत्या खूष होता. स्वतःची तारीफ ऐकून सुखावला होता. त्याचे जेवण झाल्यावर गवत्या आजीला म्हणाला
"बाई भांड्यात पाणी टाकून ठेवले उद्या सकाळी घासतो.” आजी ऐकण्याच्या स्थितीत नव्हती तिचा डोळा लागला होता. गवत्याचा उत्साह मात्र अजून संपला नव्हता. आता गवत्याचा रेडीयो सुरु होणार होता. सकाळी रेडीयो लावून आजीची सकाळ होत होती तर तर गवत्याच्या गाण्यान गावाची रात्र होत होती. हातात एक मोडकी डफली घेउन, जोरजोरात मनाला वाटेल तशी गाणी म्हटल्याशिवाय गवत्याला झोपच येत नव्हती. गावही आता गवत्याची गाणी ऐकल्याशिवाय झोपत नव्हते. थोड्याच वेळात गवत्याचे गाणे ऐकू येउ लागले

हे नव्हे भेंड, ते नव्हे भेंड, गवत्यान बनवल कोंबड
हाड चोखून,चोखून खाते, गावातल पोट्ंटबी शेंबड
यंगल रे यंगल पोट्ट कोठ ते यंगल, कोंबड बनल चांगल
गवत्या सांगे खारे भाऊ, इचारते कायले चांगल का वांगलं

गवत्याची हीच प्रतिमा डोळ्यात ठेवून मी झोपी गेलो. गेली कित्येक वर्षे गवत्या हा असाच माझ्या मनात पक्का बसला आहे. गवत्याचा दिवस हा असाच असतो असेच माझ्या मनाने ठरविले आहे. आम्ही शेती मोडल्यावर गवत्याचे काय झाले, तो कुणाकडे नोकर होता, परत गावाला अशी मेजवानी मिळाली का आणि त्याची गाणी. खूप काही विचारावस वाटत होतं. मी आवरत घेतल. माझ्या मनातल्या गवत्याच्या प्रतिमेला मला धक्का पोहचू द्यायचा नव्हता. मी गोठ्याच्या दारातून परत एकदा त्या रिकाम्या गोठ्यात नजर फिरविली. गवत्या आठवून बघितला आणि गोठ्याचे दार बंद केले.

H

दिवाळी अंक २०१८

प्रतिक्रिया

प्राची अश्विनी's picture

7 Nov 2018 - 9:10 am | प्राची अश्विनी

छान लिहिलंय. डोळ्यापुढे उभे राहिले गवत्याआबा.

टर्मीनेटर's picture

7 Nov 2018 - 10:33 am | टर्मीनेटर

खूप छान. अशी काही व्यक्तिमत्वे मनात कायम त्यांची एक प्रतिमा निर्माण करून ठेवतात.

चटका लावणारे व्यक्तिचित्र. खूप परिणामकारक अश्या भाषेत लिहिले आहे तुम्ही.

मुक्त विहारि's picture

7 Nov 2018 - 3:54 pm | मुक्त विहारि

आवडले...

बादवे, तुम्ही विदर्भातले का?

मित्रहो's picture

8 Nov 2018 - 8:20 am | मित्रहो

हो विदर्भातला, हल्ली मुक्काम हैद्राबाद
मूळ वर्धा, मी, मीच लिहिलेल्या जानराव जगदाळे या पात्रासारखा. ता हिंगणघाट. जि. वर्धा.

मित्रहो's picture

8 Nov 2018 - 8:14 am | मित्रहो

धन्यवाद प्राची आश्विनी, मुक्त विहारी, टर्मीनेटर, यशोधरा.

अप्रतिम व्यक्तिचित्रण! _/\_

पद्मावति's picture

8 Nov 2018 - 3:20 pm | पद्मावति

खुप सुरेख. चित्रदर्शी अगदी.

गामा पैलवान's picture

8 Nov 2018 - 6:12 pm | गामा पैलवान

मित्रहो,

अगदी पु.लं.चा नारायण आठवला. तुम्ही वैदर्भीय भाषेत जोपासलेली पु.ल.शैली पाहून ते आपल्यान नसल्याचा विसर पडला. धन्यवाद! :-)

आ.न.,
-गा.पै.

मित्रहो's picture

8 Nov 2018 - 6:37 pm | मित्रहो

धन्यवाद परिधी, पद्मावती आणि गामा पैलवान.

गापै
माझ्या लिखाणांने तुम्हाला पुलंचा नारायण आठवला हे माझे मोठे भाग्य.

पुल शेवटी पुल होते.

धन्यवाद मंडळी.

अनिता ठाकूर's picture

9 Nov 2018 - 11:59 am | अनिता ठाकूर

सुरेख व्यक्तीचित्र !!

मित्रहो's picture

9 Nov 2018 - 2:58 pm | मित्रहो

धन्यवाद अनिता ठाकूर

ज्योति अळवणी's picture

9 Nov 2018 - 6:38 pm | ज्योति अळवणी

खूप छान. आवडला तुमचा गवत्या

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Nov 2018 - 9:35 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर प्रत्यक्षदर्शी शैलीतले व्यक्तीचित्रण, आवडले !

मित्रहो's picture

10 Nov 2018 - 5:18 pm | मित्रहो

धन्यवाद ज्योती अलवनि आणि डॉ. सुहास म्हात्रे.

सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकर्त्यांचे मनःपूर्वक आभार.

हे व्यक्तिचित्र काल्पनिक असले तरी पूर्णतः काल्पनिक म्हणता येणार नाही. एका गावाचा एका व्यक्तिवर असाच विश्वास होता तो पाणी कधी येइल ते सांगायचा आणि त्यासाठी सार गाव त्याला पोसत होत. मनात येइल तसे गाण म्हणणारी पात्रे बरीच असतात. अशाच बघितलेल्या काही पात्रांना एकत्रित करुन आणि काही काल्पनिक प्रसंग टाकून हे व्यक्तिचित्र लिहिले.

धन्यवाद.

नूतन सावंत's picture

11 Nov 2018 - 3:34 pm | नूतन सावंत

शब्दचित्र आवडले,गवत्या ,त्याची बकरी,।हैशी,गाई,आणि कोंबडोही डोळ्यासमोर उभी राहिली.

रंगासेठ's picture

13 Nov 2018 - 4:01 pm | रंगासेठ

व्यक्तिचित्रण आवडले.

मित्रहो's picture

13 Nov 2018 - 7:52 pm | मित्रहो

धन्यवाद नूतन ताई , धन्यवाद रंगासेठ

छान आहे व्यक्तिचित्रण.

> गवत्या वेडा नव्हता, पण नक्कीच मानसिक आजाराने पीडित होता. त्याला इतरांपेक्षा काही गोष्टीची समज कमी होती. त्याचा कधीकधी झोपेत शरीरावर ताबा राहत नव्हता. बाकी त्याचे वागणे बोलणे सर्वसामान्यांसारखेच होते. गाव मात्र त्याला वेडा ठरवून मोकळे झाले होते. त्याचमुळे गवत्याचे लग्न झाले नव्हते. > चांगलेच आहे लग्न झाले नव्हते ते. उगाच लग्न झाल्यावर बरा होईल म्हणून लग्न लावून देणार आणि https://www.maayboli.com/node/67285?page=2 इथे ShitalKrishna ने लिहिले आहे तसे काहीतरी होणार......

मित्रहो's picture

21 Nov 2018 - 6:36 pm | मित्रहो

प्रतिसादाबद्दल धन्यवाद
वरील लिंक वाचली काहीतरी भयंकर केस आहे. अशी पात्रे बरीच बघितली पण आजपर्यंत अशी केस ऐकली नव्हती. असे होउ शकते अशी शक्यता आहे पण आजवर बघितले नाही.

ऐकले किंवा बघितले नसण्याचे कारण 'अशा घटना घडतच नाहीत' हे नसून 'त्या घडतात पण त्याची बाहेर कुठे वाच्यता होत नाही, घरातल्या घरात दाबून ठेवल्या जातात' हे असणार असे मला वाटते.
यातला गुन्हेगार मनोरुग्णच असेल असे नाही.
मॉन्सून वेडिंग आणि हायवे चित्रपटात याबद्दल कथानक आहे.

मित्रहो's picture

24 Nov 2018 - 5:56 pm | मित्रहो

धन्यवाद

यातला गुन्हेगार मनोरुग्णच असेल असे नाही.

मी ज्या केसेस ऐकल्या त्यात कुणीही मनोरुग्न नव्हते. आणि जे मनोरुग्न मला माहीती आहे, होते त्यांच्याविषयी शोषण प्रकार ऐकला नाही.

श्वेता२४'s picture

22 Nov 2018 - 10:48 am | श्वेता२४

खूप खूप आवडलं व्यक्तिचित्रण

मित्रहो's picture

24 Nov 2018 - 11:42 am | मित्रहो

धन्यवाद श्वेता२४

पिशी अबोली's picture

27 Nov 2018 - 11:44 am | पिशी अबोली

सुंदर लिहिले आहे

लई भारी's picture

3 Dec 2018 - 6:56 pm | लई भारी

लिखाण आवडलं!

छान लिहिले आहे. गवत्या डोळ्यासमोर उभा राहिला.

मित्रहो's picture

4 Dec 2018 - 8:25 pm | मित्रहो

धन्यवाद पिशी अबोली, जागु, लई भारी.

नाखु's picture

4 Dec 2018 - 10:50 pm | नाखु

गावाकडच्या माणसांचं प्रेम आणि राग दोन्ही समर्थपणे चितारले आहे

निशाचर's picture

7 Dec 2018 - 4:51 am | निशाचर

सुंदर व्यक्तिचित्रण!

मित्रहो's picture

7 Dec 2018 - 5:01 pm | मित्रहो

धन्यवाद नाखु आणि निशाचर

महामाया's picture

27 Dec 2018 - 6:11 pm | महामाया

सुंदर प्रत्यक्षदर्शी शैलीतले व्यक्तीचित्रण, आवडले !

खिलजि's picture

2 Jan 2019 - 8:19 pm | खिलजि

छान लिहिलंय

मित्रहो's picture

5 Jan 2019 - 8:22 pm | मित्रहो

धन्यवाद महामाया आणि खिलजि