दंगल: असा का पिक्चर रायते भाऊ?

Primary tabs

मित्रहो's picture
मित्रहो in जनातलं, मनातलं
30 Jan 2017 - 7:52 am

लय आयकून होतो दंगल दंगल. टिवी लावा के तेच चालू रायते हानिकारक बापू नाहीतर धाकड. जो तो सांगत होता लइ मस्त पिक्चर हाय. तवा म्हटल आपण बी दंगल पाहाले जाच. कापसाचा चुकारा उचलला आन बंद्या फॅमिलेले पिक्चर पाहाले घेउन गेलो, ते बी साध्यासुध्या टॉकीजमधे नाही तर नागपुरातल्या मॉलमंधी. असा पचतावा झाला ना. तुमाले सांगतो राजेहो लइ म्हणजे लइच भंगार पिक्चर हाय. असा का पिक्चर रायते भाऊ? लइ बेक्कार पिक्चर हाय. मी तुमाले येकयेक मुद्दा बराबर समजावून सांगतो.

लवस्टोरी
आता मले सांगा पिक्चरमंधी कमीत कमी येकतरी लवस्टोरी पायजेन का नाही. लवस्टोरी बिना पिक्चर रायते का कधी? येथ कोण स्टोरी लिवली का पण बंद्या पिक्चरमंधी लवस्टोरीच नाही. लवस्टोरी नसन तर पिक्चरमंधी हीरोइनी घ्यायच्याच कायले म्हणतो मी. त्यायले कामच का रायते जी या बगीच्यातून त्या बगीच्यात मस्त झकपक कपडे घालून हिंडाच, गाण म्हणाच, नाचाच. हिरोनबी मंग तिच्या मांग मांग फिरत गाण म्हणाच, नाचाच. तवा कुठ पिक्चर पायल्यावाणी वाटते पण यायन बंद्या पिक्चरमंधी लवस्टोरी काय बगीच्या बी नाही दाखवला. अस रायते का जी कधी? कोणी म्हणे ते कान कोण्या का पहेलवाणाची खरी स्टोरी हाय. खरी स्टोरीच दाखवाची होती तर तीन घंट्याचा पिक्चर कायले बनवाचा पंधरा मिनिटाच्या बातम्यात बी काम भागले असते ना. स्टोरी लिहनाऱ्याले पैसे द्याच जीवावर आल असन म्हणून खरीच स्टोरी घेतली. स्वस्तात निपटाले पायते लेकाचे पण तिकिट मात्र काही कमी करत नाही. बर जाउ द्या खरी स्टोरी तर खरी स्टोरी पण खऱ्या स्टोरीत लवस्टोरी राहात नाही अस काही कायदा हाय का? धोनी मंदी दोन दोन लवस्टोऱ्या होत्या, तो जिंदा है वाला कणचा पिक्चर होता त्याच्यात बी दोन लवस्टोऱ्या होत्या. येथच का घोड मेल होत. तो अमीर खान जवा जवान होता तवा त्यान त्या बहू( सिरेलमधली बहू. तेथ बी कंजूषी हीरोइन घ्याची सोडून सिरेलवालीच घेतली) सोबत लव केला असलच ना. एखांद मस्तपैकी गाणगिन टाकल असत, अस इहीरीवर, वावरात दोघ फिरली असती पायनाऱ्यालेबी बर वाटल असत. यायन लवगिव करन देल्ल सोडून आन शिद्दया चार पोरी झाल्या तेच दाखवल. अस रायते का जी कधी? पोर नाही झाले तरी चालते पण लवतर दाखवाच लागते न जी. मले तरी वाटत त्या डायरेक्टरले लवच अजीर्ण असन म्हणूनच त्यान लवस्टोऱी कट केली.

फायटा
आपण मोठ्या भाउचे पिक्चर पायले, मंग मिथुन दादाचे पायले, आता सल्लू भाइचे पायतो काहून. सांगा काहून, बराबर फायटा. पिक्चरमंधी कमीत कमी चार फायटा तरी पायजेन का नाही. मले समजल का पहेलवाणाचा पिक्चर हाय तवा म्हटल मस्त फायटा असन. कायच का तो पहलवाण नुसता कुस्त्याच खेळतो. कुस्त्या पाहाले आम्ही आखाड्यात जाउ, टाकीजमधी कायले येउ जी. कुस्ती पायताना मले तर समजतच नव्हत आपण पिक्चर पाहून रायलोय का टिव्ही पाहून रायलो ते. कोणी म्हणे खरच कुस्त्या खेळल्या म्हणून, मले नाही वाटत बातम्या घेउन काहीतरी कॅमेऱ्य़ाची करामत केली होय. अशा खऱ्याखुऱ्या कुस्त्या रायते का कधी?

तो पहलवाण तर मले पहलवाण वाटलाच नाही. येवढा पहलवाण गडी त्याले गाववाले काही काही नाव ठेवते आन हा चुपचाप आयकून घेतो. अस रायते का कधी? पहलवाण हाय ना मंग दाखव न पहलवाणकी. एखांदी हवेत उडून फाइट माराची, दोन चार दुकान तोडाची, हातगाड्या उडवाच्या. हा बुवा थेंबभर रगत सांडवत नाही. याची सारी पहलवाणकी घरातल्या पोरीवर, सकाळी उठा धावाले जा, सकाळी उठा पोहाले जा, सकाळी उठा दंडबैठका मारा. त्यायच्यावर पहारा ठेवाले स्वतः त्यायच्या मांग मांग स्कुटर घेउन हिंडतो. पहलवाण गडी तवा बुलेटवरुन हिंडाव का नाही हा गडी कालेजातल्या प्रोफेसरासारखा स्कुटरवर हिंडतो. नाहीच काही तर एमएटी घ्याची. हेल्मेट घालून स्कुटर चालवनारा माणूस कधी पहलवाण रायते का जी. असा लुलुपुच्या पहलवाण रायला तर स्वतःच्याच पोरीच्या हातचा मार खाणार नाहीतर का. त्याले जवा त्याच्या पोरीन पटकनी देल्लीना तवा मले लइ आनंद झाला. म्हटल याले असच पायजेन जेथ पहलवाणकी दाखवाची तेथ नाही दाखवली आता भोग लेका.

हीरोइनी
पिक्चरमधल्या हीरोइनी म्हणजे कशा? आहा. त्यायचे ड्रेस, त्यायच्या साड्या, त्यायच्या अदा, त्यायच नाचन, त्यायचे केस, त्यायन झटका देल्ला का पदर कसा हवेत उडतो, केस हवेत उडतात. पायनाऱ्याले कस पैसा वसूल. हिमालयात थंडीत बी शुटींग असन ना तर तेथ बी पंखा लावून पदर आणि केस उडवते म्हणते. याले म्हणते पिक्चर पायनाऱ्याच्या पैशाची कदर करने. येथ हा बुवा लहानपणीच पोरीले हाफपँट घालाले लावतो, साड्या सलवार अस काही घालू देत नाही. त्यायचे केस कापून टाकतो. अशा रडते ना पोरी तवा, तुमाले सांगतो लइ बेक्कार वाटल राजेहो. मायाच्यान तर ते पायनच झाल नाही वाटल अस उठाव आन त्या पहलवाणाले तेथच झोडून काढाव. आर माणूस हाय का हैवान. अशा हैवानाले खोलीत कोंडून ठेवला ना ते बरच केल अशायले असच पायजे.

गाणे
पिक्चर म्हटल का गाणे आलेच. एखाद आयटम साँग, लग्नाच गाण, लवच गाण, सॅड गाण हे बंद आलच पायजे. त्याच काय आहे आपल्या येथ सणवार रायते, लगीनसराई रायते त्याले गाण लागते ना. चांगल लग्नाच गाण चालू रायते तेथ हा पहलवाण जाउन टपकतो आन गाण बंद करुन येतो. अमदाच्या लगीनसराइत कोणत गाण वाजवाच ‘दंगल दंगल’ का ‘हानिकारक बापू’. कस वाटन जी ते? नवरा बायकोच्या गळ्यात हार टाकतोय आन इकड गाण वाजतय ‘दंगल दंगल’. पोरगी सासरी चालली, बापाजवळ येउन उभी रायली, रडून रायली. तेथ का आता ते ‘बापू तू तो हानिकारक है’ अस गाण वाजवाच. दरवर्षी लगीनसराइले नव गाण द्याच हे पिक्चरवाल्यायची जिम्मेवारी हाय. यायन गाणे नाही दिले तर त्या बँडवाल्यायन कोणाकड पाहाच? त्यायन का वाजवाच? त्यायच्या पोटावर लाथ काहून माराची म्हणतो मी.

तो पिक्चर पायल्यापासून माया घरचा तर तालच बिघडला. आमच्या बायकोच डोस्कच फिरल. पिक्चर पायला तवापासून तिच्या मनात पक्क भरल आमची पोरगी पहलवाणच हाय म्हणून. मी म्हटल
“कशावरुन म्हणते तू?”
“तुमाले आठवत नाही लहाणपणी घोडा घोडा खेळताना पोरगी कस तुमाले लोळवत होती”
“अव ते मले लोळवत नव्हती म्या असाच पडत होतो.”
“तुमाले पोरीच कवतुकच नाही. तुमी पायजा येक दिवस कोणीतरी पोरगा येइन आन सांगन का आपल्या पोरीन त्याले धुतला, चांगला झोडून काढला. माये डोये त्याच दिवसाची वाट पाहून रायले.”
म्या तिच्याकड पायत रायतो. ते कोण्या पोराले खरचटल बी दिसल ना तर हे हातची बोरींग हापसाची सोडून त्याले जाउन इचारते
“का र कोण मारल?”

लिहनार
जानराव जगदाळे
ता हिंगणघाट, जि. वर्धा.

मित्रहो
https://mitraho.wordpress.com/

विनोदचित्रपटप्रतिक्रियाआस्वाद

प्रतिक्रिया

संदीप डांगे's picture

30 Jan 2017 - 8:53 am | संदीप डांगे

निर्राच धुळला क्येला तुमि राजेहो, असं कुठी अस्ते काय! ;-)

पैसा's picture

30 Jan 2017 - 8:57 am | पैसा

देवा रे देवा! लोळतेय हसून! =)) =)) असं कुठे ल्हिहिणं रायते काय! =)) नुस्ती दंगल!

प्रीत-मोहर's picture

30 Jan 2017 - 9:40 am | प्रीत-मोहर

=)) मज्जा आली वाचायला. असं कुठे रायते काय?

पुंबा's picture

30 Jan 2017 - 10:03 am | पुंबा

मस्त, खुसखुशीत, चाबूक!!

वरुण मोहिते's picture

30 Jan 2017 - 11:36 am | वरुण मोहिते

जमलाय :)))

पद्मावति's picture

30 Jan 2017 - 12:16 pm | पद्मावति

=)) मस्तच.

अगगगगं! कहर! जानराव जगदाळेंना रामराम सांगा.

खेडूत's picture

30 Jan 2017 - 12:43 pm | खेडूत

:))
जर का तुमाला पिच्चर बघणेच अशेल, तर ते खानावळीचे काहून पाऊन र्‍हायले- तुमाले सांगतो ते अक्षय कुमारचहे पा ना!

स्वीट टॉकर's picture

30 Jan 2017 - 1:03 pm | स्वीट टॉकर

मस्त खुसखुशीत !!

पिशी अबोली's picture

30 Jan 2017 - 1:36 pm | पिशी अबोली

लय भारी.

काल जीव वर आल्यासारखा रईस बघितला. त्यात हे सगळं अस्सं एकदम प्रॉपर मसालावालं. ते आठवून जाम हसू आलं. कायपण म्हणा, शारुख अगदी या शास्त्रांत बसणारा शास्त्रशुद्ध पिच्चर बनवणं सोडत नाही.

चिनार's picture

30 Jan 2017 - 2:52 pm | चिनार

काय लिवलंय जानराव !!
नुसता कल्ला...नीरा धांदल्या...लै मजा आली ना वाचून..

जगप्रवासी's picture

30 Jan 2017 - 6:11 pm | जगप्रवासी

जाम भारी

इशा१२३'s picture

30 Jan 2017 - 6:22 pm | इशा१२३

मजाच!

उगा काहितरीच's picture

30 Jan 2017 - 7:01 pm | उगा काहितरीच

मस्त ! एकदम सही !!

सही रे सई's picture

30 Jan 2017 - 7:53 pm | सही रे सई

हा लेख वाचत असताना मनात आल कि कोणीतरी याच वाचन करून मागे दंगल्चे फोटो चिटकवून एखादा व्हिडिओ टाकला पाहिजे आपल्या यु ट्यूब चानेल वर. खास नागपुरी अंदाजात. मज्जा येईल.
लेख मस्तच झाला आहे हे.वे.सां.न.ल.

मित्रहो's picture

30 Jan 2017 - 9:51 pm | मित्रहो

प्रतिसादाबद्दल धन्यवाद
मिपावरील संदीप डांगे यांनी याचे आजच सुंदर वाचन केलेय. त्यांनी ते वाचन करुन Sound CLoud वर टाकलेय.
मी माझ्या पद्धतीने वाचन करुन रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करतो. थोडा वेळ लागेल.

आपलं घरचं चॅनल असताना कशाला साऊंड क्लाऊड? तुम्ही घ्याच मनावर आपण यु ट्यूब वर. व्हायरल करुयात ;)

लेख फार च भारीये बाकी !

सही रे सई's picture

31 Jan 2017 - 9:18 pm | सही रे सई

+१

संदीप डांगे's picture

30 Jan 2017 - 11:37 pm | संदीप डांगे

धन्यवाद! बोलीभाषेची मजा लहजात व लयीत आहे. उस्फूर्त वाचन करुन टाकले. फार प्रोफेशनल झाले नाही. परत नीट रेकॉर्डिंग करण्याचा योग लवकर येईल असे वाटत नाही, तेव्हा हेच गोड मानून घ्या... :-)

https://soundcloud.com/sandeep-daange/ogg-7

पिलीयन रायडर's picture

30 Jan 2017 - 11:57 pm | पिलीयन रायडर

ओ काय?!!! युट्युबवर का नाही टाकत तुम्ही????

इतका खत्रा लेख आहे. तुम्ही इतका खत्रा वाचलाय. युट्युबवर हवंच आहे हे.

संदीप डांगे's picture

31 Jan 2017 - 12:03 am | संदीप डांगे

टाकतो मातारानी... टाकतो. :-)
जरा दुसरं नीट रेकॉर्ड करुन विडियो तयार करुन टाकतो. हे असंच आपलं करुन बघितलं. ;-)

सही रे सई's picture

31 Jan 2017 - 9:05 pm | सही रे सई

धन्यवाद संदीप भाऊ. वाचन करायचं सुचवल्यावर वाटल नाही कि इतक्या चटकन कोणी करेल हे. म्या पामराची इनंती लगीच मनावर घेतल्याबद्दल दंडवत.

पद्मावति's picture

31 Jan 2017 - 1:13 pm | पद्मावति

सुपर्ब, सुपर्ब रेकॉर्डिंग. यू ट्यूब वर टाकाच. मस्तच झालंय.

इरसाल कार्टं's picture

18 Feb 2017 - 12:53 pm | इरसाल कार्टं

+1111111111111111111111111111

टवाळ कार्टा's picture

2 Feb 2017 - 9:40 am | टवाळ कार्टा

हायला....भारी काम आहे हे....मनावर घ्या युट्युबवर टाकायला

जव्हेरगंज's picture

30 Jan 2017 - 8:19 pm | जव्हेरगंज

=))))
लैच भारी!!

संजय क्षीरसागर's picture

30 Jan 2017 - 9:46 pm | संजय क्षीरसागर

काय सुरेख लिहीलंय ! एकदम दिलखुष !!
अशा लेखनाबद्दल मन : पूर्वक धन्यवाद !

मित्रहो's picture

30 Jan 2017 - 9:54 pm | मित्रहो

प्रतिसादाबद्दल समस्त मिपाकरांचे मन : पूर्वक धन्यवाद.

रातराणी's picture

31 Jan 2017 - 12:03 am | रातराणी

हा हा ! भारी आहे!

ट्रेड मार्क's picture

31 Jan 2017 - 3:04 am | ट्रेड मार्क

विडियो तयार करुन टाकाच तूनळीवर

यशोधरा's picture

31 Jan 2017 - 7:38 am | यशोधरा

भन्नाट!

अजया's picture

31 Jan 2017 - 9:14 am | अजया

मस्त!

अनन्त्_यात्री's picture

31 Jan 2017 - 10:00 am | अनन्त्_यात्री

जानराव, जबराट लिवल॑य. आमिर बी हसून हसून फुट॑ल !!

संजय पाटिल's picture

31 Jan 2017 - 11:40 am | संजय पाटिल

लयच भारी लिवलय रव..

संजय पाटिल's picture

31 Jan 2017 - 11:41 am | संजय पाटिल

लयच भारी लिवलय राव..

मंजूताई's picture

31 Jan 2017 - 1:42 pm | मंजूताई

लई च भारी!

प्रीत-मोहर's picture

31 Jan 2017 - 2:35 pm | प्रीत-मोहर

डांगे अण्णा
__/\__
मज्जा आली ऐकायला

सिरुसेरि's picture

31 Jan 2017 - 3:45 pm | सिरुसेरि

छान लिहिलय . एकदम भैताडच ..

राजाभाउ's picture

31 Jan 2017 - 3:57 pm | राजाभाउ

मस्त लिवुन रायेल ना भाउ तुम्ही.
डांगे आण्णा दंडवत घ्या ____/\___

पाटीलभाऊ's picture

31 Jan 2017 - 5:03 pm | पाटीलभाऊ

जबराट लिहिलंय

हतोळकरांचा प्रसाद's picture

31 Jan 2017 - 7:54 pm | हतोळकरांचा प्रसाद

लैच भारी लिवलंय! लै आवडला लेख!

हा हा कसलं भारी लिहलंय!

गंभीरपणे लिहले असेल तर जास्तच आवड्ल. मला त्या हवेत गाड्या उडणार्या फायटा आणि भुरभूर केस उडणार्या हिरवीण खरोखरच फार आवडतात. पैसे देऊन ऐंटरटेनमेंट विकत घ्यायलाचतर आपण शिन्मा बघतो :-P

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Feb 2017 - 1:31 pm | डॉ सुहास म्हात्रे

लैच दंगल माजव्लीय !!! =)) =)) =))

ते कोण्या पोराले खरचटल बी दिसल ना तर हे हातची बोरींग हापसाची सोडून त्याले जाउन इचारते
“का र कोण मारल?”

निर्रा दांगळो केला राजा जानराव तुम्हि, तुमच लेखन तर एकद्म बम्म बावडा खुस्स बावडा हाये. जम्या मस्त जम्या.