डॉ.विद्याधर ओक

आनंद घारे's picture
आनंद घारे in जनातलं, मनातलं
3 Jul 2008 - 10:56 pm

डॉ.विद्याधर ओक हे नांव हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात सुपरिचित आहे. स्व.गोविंदराव पटवर्धनांच्या या पट्टशिष्याने निष्णात हार्मोनियमवादक म्हणून आपले स्थान निर्माण केले आहेच, शिवाय प्राचीन शास्त्रीय संगीताला आधुनिक विज्ञानाचा आधार देणारा अभ्यासू वृत्तीचा आणि एक कुशाग्र बुध्दीचा संशोधक, या क्षेत्रात नव्या दिशा चोखाळणारा आणि दाखवणारा द्रष्टा, त्यासाठी नवे तंत्रज्ञान विकसित करणारा उद्योजक अशी अनेक प्रकाराने त्यांची ओळख करून द्यावी लागेल. हंसतमुख प्रसन्न चेहेरा, हजरजबाबीपणा, नेमक्या शब्दात आपल्या मनातला आशय बोलून व्यक्त करण्याची कला, श्रोत्यांना समजून घेऊन त्यांच्याशी सुसंवाद साधण्याची हातोटी वगैरे अनेक पैलू त्यांच्या अष्टपैलू व्यक्तीमत्वात आहेत. त्यांनी तयार केलेल्या बावीस श्रुतींच्या खास हार्मोनियमसंबंधी सादर केलेल्या लेक्चर डेमॉन्स्ट्रेशनला हजर राहण्याची संधी मला मिळाली. त्या वेळी जे पहायला आणि ऐकायला मिळाले त्याचा गोषवारा देण्याचा हा प्रयत्न आहे.

अणुशक्तीनगरमधील 'संवाद' तर्फे हा कार्यक्रम तिथल्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. ही मुख्यतः वैज्ञानिक आणि तंत्रज्ञांची वसाहत असल्याकारणाने बहुतेक श्रोते मंडळींकडे वैज्ञानिक चिकित्सक पध्दतीने विचार करण्याची वृत्ती होती. त्याचप्रमाणे रविवार संध्याकाळच्या अमूल्य वेळेचा सदुपयोग हिंडणे फिरणे, बाजारहाट, खाणेपिणे, नाटक सिनेमा यासारख्या लोकप्रिय गोष्टीत न करता किंवा घरबसल्या टीव्हीवरील खास कार्यक्रम पहाण्यात तो न घालवता हे लोक या कार्यक्रमाला आले होते यावरून त्यांना संगीताची आवड, जुजबी माहिती किंवा निदान श्रोत्याचा कान तरी निश्चितच होता. ही बाब श्री. ओकांच्या लगेच लक्षात आली आणि त्यांनी आपल्या संभाषणाची सुरुवात तिथूनच केली.

आपल्या शिक्षणपध्दतीमध्ये शालेय शिक्षणाच्या अखेरीस कला आणि विज्ञान यांची फारकत केली जाते. किंबहुना आर्टस आणि सायन्स एकमेकांच्या विरोधात असल्यासारखे दाखवले जाते. संगीताचा समावेश कलाविषयात होत असल्यामुळे त्याचा विज्ञानाशी कसलाही संबंध नाही असेच समजले जाते. गायन किंवा वादन शिकण्यासाठी किंवा आत्मसात करण्यासाठी विज्ञानाची गरज पडतही नाही. त्यामुळे या क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या आजपर्यंतच्या कोणा महान कलाकाराला सुध्दा त्या विषयाच्या मागच्या विज्ञानाचा अभ्यास करावा असे वाटले नसेल. परंपरागत भारतीय संगीताच्या क्षेत्रातल्या लोकांना विज्ञानाची पार्श्वभूमीच नव्हती असे दुर्दैवाने म्हणावे लागेल. पण वस्तुस्थिती अशी आहे की ध्वनिशास्त्रानुसार कोठलाही नाद किंवा ध्वनी याला विवक्षित कंपनसंख्या असते. या कंपनसंख्येच्या आधारानेच आपले श्रवणयंत्र तो नाद ओळखते आणि तो नाद स्मरणात साठवला जातो. एकामागोमाग कानावर पडणा-या नादांच्या कंपनसंख्यांमध्ये सुसूत्रता असेल तर त्यातून संगीत निर्माण होते आणि ती नसेल तर तो गोंगाट होतो. बोलण्यातून किंवा गाण्यातून जे ध्वनी निर्माण होतात त्याची कंपनसंख्या किती असते ते कांही आपल्याला आंकड्यात समजत नाही, पण चांगला गवई सुरात गातो आहे हे आपल्या कानाला जाणवते त्याचे कारण त्याच्या सुरांच्या कंपनसंखांमध्ये सुसंगती असते. कसून रियाज करून त्याने ते साध्य केलेले असते.

समोर बसलेल्या श्रोत्यांना विज्ञान आणि कला या दोन्ही विषयात गती आहे हे ओळखून त्यांना समजेल अशा पध्दतीने श्री. ओकांनी आपले विवेचन केले. त्यांनी स्वतः विज्ञानाचा अभ्यास केलेला असल्यामुळे त्यांना ध्वनिशास्त्राची चांगली माहिती होती आणि त्या अनुषंगाने त्यांनी संगीतावर विचार केला. सा रे ग म प ध नी हे स्वर एकमेकांपासून कसे वेगळे आहेत आणि त्यांचा एकमेकांशी कसा संबंध आहे हे एकादा गवई ते स्वर गाऊन किंवा वादक वाजवून दाखवतो. विज्ञानाच्या दृष्टीने पाहता त्यांच्या कंपनसंख्याचे अंक समजून घेऊन त्यांच्या समूहांकडे पाहिले तर त्यातील आंकड्यांना जोडणारी सूत्रे शोधता येतात. विद्याधररावांनी संशोधकाला लागणा-या चिकाटीने हे जिकीरीचे काम केले. पाश्चात्य जगात सुरुवातीपासूनच विज्ञान आणि गणिताचा थोडा संबंध होता असे दिसते. त्याचाही त्यांनी अभ्यास केला.

हार्मोनियम या वाद्याचे शिक्षण त्यांनी लहानपणापासूनच घेऊन त्यांनी त्यात प्राविण्य मिळवले होते. त्याचबरोबर हार्मोनियम हे 'टेंपर्ड स्केल' प्रमाणे ध्वनी निर्माण करणारे वाद्य असल्यामुळे विशुध्द शास्त्रीय संगीताला ते योग्य नाही अशी टीका ते सतत ऐकत होते. नेमके हे कसते वैगुण्य आहे हे समजून घेण्यासाठी त्यांनी शास्त्रीय संगीताचा वैज्ञानिक दृष्टीने अभ्यास केला. त्यात त्यांना यश आले एवढेच नव्हे तर ती उणीव भरून काढण्याचा मार्गसुध्दा त्यांनी शोधून काढला.

आपल्या भाषणात डॉ.ओक यांनी आधी थोडक्यात हार्मोनियमचा इतिहास सांगितला. इसवी सन १८४० साली रीडवर वाजणारे जगातले पहिले यंत्र फ्रान्समध्ये तयार केले गेले. म्हणजे हे वाद्य १६८ वर्षे जुने आहे. पण संगीत तर हजारो वर्षांपासून चालत आले आहे आणि तानपुरा, सतार, सारंगी यासारखी वाद्ये सुध्दा निदान कित्येक शतकांपासून प्रचारात आहेत. त्या मानाने हार्मोनियम फक्त १६८ वर्षांच्या बाल्यावस्थेत आहे असेही म्हणता येईल. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नेहमीच आघाडीवर असलेल्या जर्मनीतल्या कुशल कारागीरांनीसुध्दा हे वाद्य बनवण्याचे कसब आत्मसात केले आणि पेट्या तयार करून विकायला सुरुवात केली. अल्पावधीत त्या
युरोपभर पसरल्या. त्या काळात त्या पायपेट्या असायच्या. संगीतप्रेमी ब्रिटीश अधिका-यांनी त्या भारतात आणल्या आणि त्यांचे पाहून एतद्देशीय धनिक वर्ग, संस्थानिक वगैरेंनीसुध्दा त्या फ्रान्स किंवा जर्मनीतून आयात केल्या. हा सन १८६० ते १८८० चा कालखंड होता. बाजाची पेटी भारतातसुध्दा फार लोकप्रिय झाली.

याचे मुख्य कारण म्हणजे तंतुवाद्यांच्या मानाने हे वाद्य शिकायला आणि वाजवायला सोपे आणि त्याचा जबरदस्त आवाज. शास्त्रीय संगीतापासून ते तमाशा, नौटंकी यासारख्या सर्व प्रकारच्या लोकसंगीतात तिचा वापर धडाक्याने होऊ लागला. सन १८८२ साली संगीत सौभद्र या नाटकात हार्मोनियमचा वापर सर्वात पहिल्यांदा झाला असा उल्लेख सांपडतो.

१८४० सालापासून ते आजतागायत बाजारात मिळत असलेले सर्व हार्मोनियम आणि त्या प्रकारची इतर वाद्ये ही टेंपर्ड स्केलवरच आधारलेली आहेत. याचा आवाज कसा निघतो हे सोदाहरण दाखवण्यासाठी डॉक्टर ओकांनी एक परंपरागत पेटी घेऊन वाजवायला सुरुवात केली. समाधीसाधन संजीवन नाम, धुंदी कळ्यांना, मौसम है आशिकाना, शुक्रतारा मंदवारा, प्रथम तुला वंदितो, सुखकर्ता दुखहर्ता, तीन्ही सांजा सखे मिळाल्या, जेथे सागरा धरणी मिळते, तोच चंद्रमा नभात, एहेसान तेरा होगा मुझपर, इथेच आणि या बांधावर, निगाहे मिलाने को जी चाहता है, पान खाये सैंया हमार .... एकाहून एक गोड गाणे ते अप्रतिम वाजवत होते. त्यातले
स्वरच काय पण व्यंजने आणि शब्द सुध्दा ऐकू येत असल्याचा भास होत होता आणि टाळ्यांच्या कडकडाटाने श्रोते त्यांना दाद देत होते. वीस पंचवीस मिनिटे यमन राग अशा प्रकारे खुलवल्यावर त्यांनी विचारले, " कसे वाटले?" आता हा काय प्रश्न झाला? मग त्यांनी लगेच विचारले, " चांगलं वाटलं ना, मग यांत प्रॉब्लेम कुठे आहे?" टेम्पर्ड स्केलच्या पेटीवरील वादन ऐकून श्रोत्यांना त्यातून इतका आनंद मिळत असेल तर तिला नांवे ठेवण्याची आणि तिच्यात सुधारणा करण्याचा विचार करण्याची गरजच काय हा प्रश्न बुचकळ्यात टाकणारा होता.

क्षणभर थांबून त्यांनीच या प्रश्नाचे उत्तर देण्याला सुरुवात केली. पुन्हा एकदा सरगम आणि त्यातील स्वरांची कंपनसंख्या याकडे वळून त्यांनी सांगितले की वरच्या पट्टीमधील षड्जाची कंपनसंख्या खालील पट्टीमधील षड्जाच्या कंपनसंख्येच्या बरोबर दुपटीने असते. म्हणजे मुख्य सा जर १०० हर्टझ ( दर सेकंदाला १०० कंपने) असेल तर वरचा सा २०० इतका असतो आणि पंचम १५० असतो. सा आणि प मध्ये प्रत्येकी दोन दोन रे, ग आणि म असतात तसेच प आणि वरचा सा यांच्यामध्ये दोन दोन ध आणि नी असतात. त्यांतील रे, ग, ध आणि नी कोमल आणि शुध्द असतात तर दोन मध्यमांना शुध्द आणि तीव्र म्हणतात. अशा प्रकारे पहिल्या सा पासून वरच्या सा पर्यंत बारा नोट्स असतात. त्यातील प्रत्येक नोटची कंपनसंख्या तिच्या आधीच्या स्वराच्या १.०५९४६३१ इतक्या पटीने मोठी
असते. १०० या आंकड्याला या पटीने बारा वेळा गुणल्यास २०० हा आंकडा येईल. यालाच टेम्पर्ड स्केल असे नांव दिले आहे. हार्मोनियमच्या डाव्या बाजूच्या पहिल्या पट्टीपासून प्रत्येक स्वर वाजवत गेल्यास तो इतक्या पटीने चढत जातो. त्यातला समजा काळी चार हा षड्ज धरला तर कोमल ऋषभ, शुध्द ऋषभ, कोमल गंधार, शुध्द गंधार वगैरे स्वर त्यानंतर क्रमाने येतात. आपल्याला पहिल्यापासून अशाच प्रकारचे स्वर ऐकण्याची संवय झाली असते त्यामुळे कानाला ते चांगले वाटतातही.

पण तरबेज गवयांना मात्र ते स्वर खटकतात, कारण आपल्या शास्त्रीय संगीतात जे गंधार, मध्यम, धैवत वगैरे स्वर येतात ते किंचित भिन्न असतात. खालच्या सा पासून वरच्या सा पर्यंत मधल्या स्वरांच्या कंपनसंख्यांचे प्रमाण १६/१५, १०/९, ९/८, ६/५, ४/३, ३/२ वगैरे साध्या अपूर्णांकाने वाढत वाढत ते २/१ पर्यंत जाऊन तसेच पुढे जाते. या अनुसार वाजणारे मधले स्वर हार्मोनियममधून निधणा-या स्वरांहून १-२ टक्क्याने हटके असतात. त्यामुळे तज्ञांना ते बेसुरे वाटतात. आपले कान एवढे तीक्ष्ण नसल्यामुळे त्यांना ते जाणवत नाही एवढेच. त्यातसुध्दा आपल्याला नेहमी ते स्वर एक गेल्यानंतर दुसरा असे ऐकू येतात त्यामुळे त्यांच्या प्रमाणबध्दतेतला हा सूक्ष्म फरक आपल्याला समजत नाही. पण एकाच वेळी पेटीचे तीन चार स्वर एकदम वाजवले तर मात्र थोडा गोंगाट वाटतो हे डॉक्टर ओक
यांनी प्रत्यक्ष वाजवून दाखवले. त्यांनी जी खास श्रुतींची पेटी बनवली आहे त्यातले स्वर भारतीय शास्त्रीय संगीतातील पध्दतीप्रमाणे ट्यून केले होते. त्यातले वेगवेगळे स्वर एकदम वाजवल्यावरसुध्दा ते सुसंवादी वाटत होते. या दोन्हीतला फरक ज्या लोकांच्या कानांना जाणवत नाही त्यांनी संगीत हा आपला प्रांत नाही हे वेळीच ओळखून क्रिकेट किंवा टेनिस असा दुसरा छंद धरून त्यात आपले मन रमवावे असे ते गंमतीने म्हणाले.

हा फरक एवढ्यावर थांबत नाही. मुळात सात मुख्य स्वर आणि पांच उपस्वर ही सप्तकांची संकल्पनाच हार्मोनियमचे सोबतीने पश्चिमेकडून आपल्याकडे आली आहे. भारतीय संगीत श्रुतींवर आधारलेले आहे. त्याचे वैज्ञानिक पध्दतीने विश्लेषण केले गेले नसल्यामुळे श्रुती म्हणजे नेमके काय याची सर्वमान्य अशी व्याख्या उपलब्ध नव्हती. डॉक्टरसाहेबांनी यासंबंधी अनेक ग्रंथांचा अभ्यास केला, हिंदुस्थानी आणि कर्नाटक शास्त्रीय संगीतातील स्वर कशा प्रकाराने लावले जातात हे पाहिले, अनेक प्रसिध्द संगीतकारांचे गायन व वादनाच्या ध्वनिफिती मिळवून त्यांचा अभ्यास केला. मल्टिचॅनेल एनेलायजरसारख्या आधुनिक उपकरणांचा उपयोग करून स्वरांच्या कंपनसंख्या मोजून त्याचा अभ्यास केला.

या सर्व संशोधनानंतर प्रत्येक सप्तकामध्ये बावीस श्रुती असतात असा निष्कर्ष त्यांनी काढला. षड्ज आणि पंचम हे दोन पक्के स्वर आहेत आणि ऋषभ, गंधार, मध्यम, धैवत व निषाद हे प्रत्येकी चार निश्चित अशा स्थानांवर श्रवण करता येतात अशा प्रकाराने एकूण बावीस हा
आंकडा येतो. कोठल्याही एका रागात यातले सातच स्वर असतात. कांही रागात तर पांच किंवा सहाच असतात. पण ते अतिकोमल, कोमल, शुध्द किंवा तीव्र असू शकतात. या प्रत्येक प्रकाराला श्रुति म्ङणतात. त्या त्या रागातील इतर वादी, संवादी स्वर ज्या प्रकारचे असतात त्यांना प्रमाणबध्द अशा श्रुती आल्या तर ते संगीत अधिक श्रवणीय वाटते. अशा प्रकारे प्रत्येक स्वरातील योग्य ती श्रुति घेऊन त्या सात सुरांमधून रागाची गुंफण केली जाते.

संशोधनाअंती डॉक्टर ओक यांनी या श्रुतींच्या प्रमाणांचा तक्ता तयार केला आणि त्यानुसार वाजणा-या रीड्स बनवल्या. एवढेच नव्हे तर त्यांतून निघणा-या नादाचा अचूकपणा मोजणारे इलेक्ट्रॉनिक यंत्रसुध्दा बनवले आहे. वाजवणा-याला सोयीचे व्हावे या दृष्टीने सध्याच्या हार्मोनियम एवढ्याच आकाराची ही पेटी आहे. त्यात नेहमीच्या आकाराच्या तेवढ्याच पट्ट्या आहेत आणि प्रत्येक पट्टीच्या खाली दिलेली खुंटी बाहेर ओढून श्रुति बदलण्याची सोय आहे. जो राग वाजवायचा असेल त्यातल्या श्रुति आधी सेट केल्या की नेहमीप्रमाणेच तो हार्मोनियम वाजवायचा. याशिवाय त्यांनी मेटलोफोन नांवाचे एक वाद्य बनवले आहे. त्यात विशिष्ट धातूच्या पट्ट्बा बसवायच्या आणि वाजवायला सुरुवात करायची. याचे उदाहरण दाखवण्यासाठी त्यांनी प्रेक्षकांमधून एका माणसाला स्टेजवर बोलावून घेतले. या गृहस्थाने आयुष्यात कधीही कोणतेही वाद्य़ वाजवलेले नव्हते. मारवा रागाचे सूर फिट केलेला मेटलोफोन त्याच्यापुढे ठेऊन हातातील बारक्या हातोड्याने त्यातल्या कोठल्यही पट्टीवर कोणत्याही क्रमाने प्रहार करायला सांगितले. सारे स्वर बरोबर जुळलेले असल्यामुळे कसेही वाजवले तरी कानाला ते गोडच लागत होते. असेच हंसतखेळत तुम्ही शास्त्रीय संगीताचा थोडा आनंद स्वतः घेऊ शकता आमि त्य़ातून प्रयोग करीत शिकूही शकता असे त्यांनी सांगितले.

त्यानंतर प्रेक्षकांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना समर्पक उत्तरे देऊन त्यांच्या शंका त्यांनी दूर केल्या. हे एवढे रंगत चालले होते की आणखी हार्मोनियम वादन ऐकायला मिळणार आहे की नाही असे लोकांना वाटू लागल्यामुळे ती चर्चा आटोपती घ्यावी लागली. अखेरीस डॉ.ओक यांनी तयार केलेल्या बावीस श्रुतींच्या वाद्यावर त्यांनी कट्यार काळजात घुसली या नाटकातील रागमालिका असलेले चलत पिया बिन छिन बिसुराये हे पद वाजवले आणि परदेमें रहने दो, प्रभु अजि गमला, बनाओ बतियां वगैरे गाण्यातून भैरवी वाजवून या रंगलेल्या कार्यक्रमाची सांगता केली.

संगीतलेख

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

3 Jul 2008 - 11:24 pm | विसोबा खेचर

गेली अनेक वर्ष डॉ ओकांचा आणि माझा खूप जवळचा परिचय आहे. माझे त्यांच्या घरी अनेकदा जाणेयेणे सुरू असते. त्यांच्या घरी गेलो असताना त्यांनी निर्मिलेल्या मेंन्डोलियम या वाद्याबद्दल त्यांनी अगदी माझं समधान होईस्तोवर माहिती पुरवली. खूप वाजवूनही दाखवलं. त्यांचा अभ्यास अणि त्यांचं संशोधन हे निश्चितच वाखाणण्याजोगं आहे!

"अरे तात्या, अगदी केव्हाही ये, मस्तपैकी पेटी वाजवत बसू!" असं डॉक्टर मला नेहमी म्हणतात! :)

त्यांचे चिरंजीव आदित्य ओक हाही माझा चांगला मित्र आहे. तोदेखील गायनाच्या साथीला हार्मिनियमची संगत चांगल्या प्रकारे करतो. राहूल देशपांडे सोबत हार्मोनियम-साथीदार म्हणून नुकताच तो अमेरिकेच्या दौर्‍यावर गेला आहे...

आपला,
(गोविंदरावांचा भक्त) तात्या.

वाटाड्या...'s picture

3 Jul 2008 - 11:51 pm | वाटाड्या...

अशी माहिती बहुतेक पहिल्यांदाच मिळाली मिपावर त्या बद्दल धन्यवाद.

केवळ शास्त्रीय संगीतप्रेमी
मुकुल

याबद्दल सचित्र आणि चित्रफितींसह तपशीलवार माहिती या संकेतस्थळावर मिळू शकेल.

(कुशल हार्मोनियमवादक साथ करताना काय क्लृप्त्या वापरतात? हार्मोनियमचे स्वर हिंदुस्थानी [किंवा कर्नाटक] शास्त्रीय संगीतासाठी बेसुरे असतात हे तर सर्व वादकांना माहीत असते. योग्य स्वराचा [भसाडा का होईना] आभास निर्माण करण्यासाठी नेमक्या स्वराच्या वरची-खालची अशा दोन्ही पट्ट्या दाबतात का?)

तात्यांना (किंवा आणखी कोणी ती पेटी खुद्द बघितली/वाजवली असेल त्यांना) प्रश्न :
डॉ. ओक यांचे लेख वाचून असे दिसते की ती कुठल्यातरी स्थिर षड्जाला धरून बनवलेली आहे - त्यांच्या लेखांत त्यांनी नेहमी सफेत६चे उदाहरण दिलेले आहे. अर्थात पंचम अचल आहे. समोरची बटणे ओढून जो राग गायचा आहे त्यासाठी बाकीच्या ५ स्वरांसाठी योग्य श्रुती निवडता येतात. पण या श्रुतींमधील अंतर समसमान नाही. त्यामुळे कोणाला सफेत६ ऐवजी काळी२ पट्टी षड्ज म्हणून निवडायची असेल, तर (लेखांप्रमाणे तरी) ते जमणार नाही. करण सफेत६ पासून योग्य अंतरावर (पण समसमान अंतरे नाहीत) अशा २२ श्रुती काळी२ पासून योग्य अंतरावर असणार नाहीत.

त्यांचे लेख वाचण्यात माझी काही गफलत झाली आहे का? त्यांच्या मेलोडियमवरती गायकाला हव्या त्या पट्टीत गाणे वाजवता येते का?

या बाबतीत येथे एक गायक/पियनोवादक श्री. रॉनल्ड नेकर यांच्याशी चर्चा झाली. ते ओमाहा, नेब्रास्का येथे असताना तेथे २००३ साली नवीन बांधून घेतलेल्या ऑर्गनबद्दल त्यांनी मला माहिती दिली (दुवा).

एकाच ऑर्गनला अनेक कळफलक असतात, आणि प्रत्येक कळफलकला वेगवेगळे स्वर-श्रुती बसवता येतात. हल्ली पाश्चिमत्य संगीत १२-समसमान श्रुतींमध्ये वाटलेले सप्तक मनात धरून रचलेले असते. त्यामुळे काही कळफलक तसे असतात. तर काही कळफलक जुन्या प्रकारच्या श्रुतींना मानून बनवलेले असतात. अशा प्रकारे वेगवेगळ्या काळात लिहिलेले संगीत संगीतकाराला जसे अभिप्रेत होते तसे वाजवता येते.

अर्थात असा पर्यय असणे हे केवळ या ओमाहा येथील चर्चमधील ऑर्गनचे वैशिष्ट्य नव्हे, तर अनेक मोठ्या चर्चमध्ये अशी ऑर्गन आहेत.

भडकमकर मास्तर's picture

4 Jul 2008 - 9:19 am | भडकमकर मास्तर

अप्रतिम माहिती..
आणि
मला मेटलोफोन या वाद्याची माहिती फार आवडली...
धन्यवाद, आनंद...
आपला
( पेटीवादक) भडकमकर मास्तर

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

अमोल केळकर's picture

4 Jul 2008 - 9:30 am | अमोल केळकर

आनंदघन
डॉ.विद्याधर ओक यांचा परिचय आवडला
त्यांचे एखादे चित्र असेल तर प्रतिसादात टाकावे ही विनंती
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

आनंद घारे's picture

4 Jul 2008 - 11:30 am | आनंद घारे

गायकाला हव्यात्या सुरात गाता यावे आणि त्याला हार्मोनियमवर त्याच्या सुरात साथ करता यावी याच उद्देशाने टेम्पर्ड स्केल तयार केले गेले. परंतु त्यातील श्रुती सुरात येत नाहीत म्हणून त्या योग्य जागेवर ठेऊन नवी पेटी तयार केली तर ती कोणत्या तरी एका षड्जाच्या संदर्भातच असणार असे मला वाटते. मोठे गायक जसे स्वतःचे तानपुरे आणि तबले बरोबर घेतात त्याप्रमाणे त्यांना साथीसाठी स्वतःची संवादिनीही लागेल. या बाबतीत श्री. तात्या एक्सपर्ट कॉमेंट देऊ शकतील.

आनंद घारे's picture

4 Jul 2008 - 11:44 am | आनंद घारे

खाली दिली आहेत. ती आधी दुसरीकडे आंतर्जालावर चढवून तिथला दुवा द्यावा लागतो. यामुळे लेखासोबत देता आली नव्हती.

प्रमोद देव's picture

4 Jul 2008 - 1:17 pm | प्रमोद देव

ही नवीन पद्धतीची संवादिनी फक्त साथीसाठी उपयुक्त आहे. स्वतंत्र(सोलो) वादनासाठी नव्हे असे डॉ.ओक ह्यांनी सांगितल्याचे स्मरते. त्यांचे प्रात्यक्षिक ह्यापूर्वी मी विलेपार्ले येथे टिळक मंदिरात पाहिले-ऐकले होते.

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

हेरंब's picture

4 Jul 2008 - 6:48 pm | हेरंब

ओकांवरचा लेख आवडला. तात्यांची त्यांच्याशी एवढी ओळख आहे हे वाचून आनंद वाटला.

(गोविंदरावांचा भक्त आणि आरंभशूर पेटीवादक)

प्रकाश घाटपांडे's picture

7 Oct 2018 - 5:02 pm | प्रकाश घाटपांडे

हे पुनर्जन्म मिथ्य कि तथ्य पुस्तकाचे लेखक आहेत. मेडिकलचे डॉक्टर आहेत एबीपी माझा वर त्यांचा कार्यक्रम झाला होता नुकताच

प्रकाश घाटपांडे's picture

7 Oct 2018 - 5:06 pm | प्रकाश घाटपांडे

हा तो कार्यक्रम https://www.youtube.com/watch?v=9MIWw9QI7IY

दहाएक वर्षं आमचे शेजारी होते. रोज दोनतीन तास पेटी वाजवत ती ऐकायला येई. पण आमच्या घरात कुणालाच संगीताचा कान नसल्याने कधीही पेटी ऐकायला गेलो नाही. इमारतीत आठजण होते त्यातल्या दोघांनाच आवड होती व ते सांगत की पेटी छान वाजवतात. आदित्य तिसऱ्या वर्षापासून वाजवतो. दुसरे दोघे भाऊही वाजवायचे.
शिवाय भारतीय ज्योतिषाची आवड होती. चिनी ज्योतिषावरही एक जाडजुड पुस्तक लिहिले आहे.

चौकटराजा's picture

11 Oct 2018 - 3:13 pm | चौकटराजा

तुमच्या त्या इमारती मध्ये मी का राहावयाला नव्हतो ? अरे दैवा ! असा प्रश्न मला पडलाय ! तुमचे व त्यांचे निरनिराळे उद्योग जवळून पहात मला अधिक श्रीमंत होता आले असते की !

कंजूस's picture

11 Oct 2018 - 8:55 pm | कंजूस

दात आहेत तर चणे नाहीत!!
डोंबिवलीत सुरुवातीला ज्या इमारतीत राहात होतो तिथे शेजारी नाट्यहौशी होता. मुंबइतल्या कापडगिरण्या बंद झाल्यावर त्याचीही नोकरी गेली. पण त्याची हौस कामाला आली. रविद्र नाट्यमंदिरासमोर राहायचा आणि फावल्या वेळात नाट्यमंदिरात पडून असायचा. सर्व नाटके तोंडपाठ त्यामुळे प्रॅाम्पटिंग, नेपथ्य मदत करत असे. मोरुच्या मावशीत माळ्याचे काम बदली म्हणून करत असे. मग मोरुच्या पथकाबरोबर भारत फिरला.
तर सांगायची गोष्ट म्हणजे तो म्हणाला सांगाल ते पास घेऊन येतो ! मग फक्त मोरुची मावशी पाहिलं आणि दुर्गा झाली गौरी'ची मेटालिक कॅसेट साउंड ट्रॅक घरी ऐकला!
नाटक समजत नाही त्याला फुकट पास!!

कलम's picture

12 Oct 2018 - 4:30 pm | कलम

चांगली माहिती