पहिले महायुद्ध! प्रकरण १ भाग ६

आदित्य कोरडे's picture
आदित्य कोरडे in जनातलं, मनातलं
14 Sep 2018 - 12:30 pm

आधीच्या भागांची लिंक
https://www.misalpav.com/node/43088
https://www.misalpav.com/node/43118
https://www.misalpav.com/node/43144
https://www.misalpav.com/node/43170
https://www.misalpav.com/node/43224
मागील प्रकरणात आपण म्हटल्याप्रमाणे आता ह्या भागात आपण फ्रान्झाच्या खुनानंतर घटना कशा घडत गेल्या आणि सर्बियाला ऑस्ट्रियाने निर्वाणीचा इशारा देणारे पत्र पाठवले इथवरचा इतिहास पहिला आता पुढे ...
पहिले महायुद्ध!
प्रकरण १ भाग ६

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

इकडे निकोला पॅसेज समोर मोठा बांका प्रसंग उभा होता. काही सर्बियन माणसांनी फ्रान्झ्चा खून केला होता हे तर उघड सत्य होते. सर्बियाची आंतरराष्ट्रीय पातळींवर प्रतिमाही फार चांगली नव्हतीच शिवाय अंतर्गत मामल्यात ही बराच गोंधळ होता. लष्करावर शासनाची पूर्ण पकड नव्हती. एपिस सारखे लोक जहाल राष्ट्रवादाच्या नावाखाली हिंसक कारवाया करणाऱ्या संघटना लष्करात राहून चालवत आणि त्याना जनतेकडून तसेच लष्कराकडून प्रोत्साहन मिळत असे. एपिस तर संधी मिळताच सरकार उलथून सत्ता हस्तगत करण्याची आणि सर्बियात लष्करशाही आणण्याची योजना आखत होता. असे पॅसेजाला गुप्तचर विभागाकडून समजले होते. त्यामुळे आता पॅसेज ऑस्ट्रियाला काय उत्तर देतो ह्यावर जसा इतर बड्या देशांचा सर्बियाबद्दलचा दृष्टीकोन असणार होता तसाच सर्बियन जनता आणि लष्कराचा दृष्टीकोन पॅसेज आणि त्याच्या सरकारबद्दल असणार होता.
सगळ्या मागण्या फेटाळल्या असत्या तर तो सर्बियाचा उद्दामपणा आणि चर्चेला तयार नसल्याचे म्हणजेच युद्धखोर असल्याचे बाहेर वाटले असते आणि मागण्या मान्य केल्या असत्या तर ती ऑस्ट्रीयापुढे शरणागती पत्करली असे समजून सर्बियात उद्रेक झाला असता ज्याचा फायदा लष्कर आणि एपिस ने नक्की घेऊन सरकार उलथून टाकले असते सर्बियात गृहयुद्ध सुरु होण्याची शक्यता दाट होती.
पॅसेजकडे दोन दिवसांचा वेळ होता. ह्या दोन दिवसात पॅसेज आणि त्याच्या मंत्र्यांनी अथक खपून, विचार विनिमय करून ऑस्ट्रियाला द्यायचे उत्तर तयार केले आणि अगदी २५ जुलैला ६ वाजायचा ५ मिनिटे बाकी असताना ते ऑस्ट्रियन राजदूत गीस्लीन्जेनकडे सुपूर्द केले. हे उत्तर म्हणजे राजकीय मुत्सद्देगिरीचा उत्तम नमुना होते. जवळपास सगळ्या मागण्या त्यात मान्य केल्या होत्या पण प्रत्येक मागणी मान्य करताना इतके आणि असे ‘जर-तर’, ‘किंतु-परंतु’ पेरले होते कि त्यामुळे सर्बियाने मागण्या मान्य केल्या असे म्हणणे चूक ठरले असते नव्हे सर्बिया काही म्हणतोय हेच त्यातून स्पष्ट होत नव्हते. ह्या एका पत्राने पॅसेजने बाजी मारली होती आणि युरोपात त्याची बाजू एकदम समजूतदारपणा दाखवणाऱ्या, युद्ध मनापसून टाळू पाहणाऱ्या देशाची झाली आणि अशा अपमानजनक आणि आततायी मागण्या करणाऱ्या ऑस्ट्रीयाचीच प्रतिमा युद्धखोर, लहान देशावर दडपण आणु पाहणाऱ्या मवाल्याची झाली. पॅसेजला हे पक्के माहिती होते कि ऑस्ट्रिया सर्बियावर काय वाट्टेल ते झाले तरी हल्ला करणारच होता त्यामुळे प्रामाणिकपणे त्याना उत्तर देऊन फायदा नव्हताच. उलट असे करून त्याने देशातही ऑस्ट्रिया विरोधी जनमत संघटीत केले आणि संभाव्य लोकक्षोभ, उद्रेक, बंडाळी टाळली, जनता त्यांच्या स्वातंत्र्यावर घाला घालू पाहणाऱ्या शत्रू -ऑस्ट्रियाविरुद्ध एकजूट झाली.

सर्बियाने दिलेले उत्तर खालील प्रमाणे
१. सर्बीयन सरकार वृत्तपत्रे व नियतकालिकाना ऑस्ट्रिया विरोधी वक्तव्ये न करण्यास सम्बंधी समज देईल आणि पुढील अधिवेशनात तसा कायदाही करेल
२. सर्बियाकडे ‘नारोद्ना ओद्ब्राना’ किवा अशा इतर कुठल्याही संघटनेने ऑस्ट्रीयाविरोधी काही कृत्य केल्याचा पुरावा नाही. पण तरीही सरकार त्यांची चौकशी करून तशी माहिती मिळाल्यास सर्बियन कायद्याप्रमाणे त्यांच्यावर कारवाई करेल.
३. ऑस्ट्रियाने पुराव्यानिशी दाखवून दिल्यास सर्बियन सरकार शासकीय कार्यालये शाळा कॉलेजेस विद्यापीठे इथे जे काही ऑस्ट्रीयाविरोधी मजकूर, संदर्भ,वक्तव्य व कारवाया चालू असतील त्यावर निर्बंध आणेल.
४. ऑस्ट्रियाने पुरेसे आणि विश्वसनीय पुरावे दिले तर ऑस्ट्रीयाविरोधी कारवायात सामील अशा सर्व लष्करी आणि शासकीय अधिकाऱ्याना निलंबित करून त्यांच्यावर न्यायालयीन कारवाई करेल.
५. “सर्बियातील ऑस्ट्रिया विरोधी चळवळी आणि कारवाया थांबवण्यासाठी ऑस्ट्रिया सांगेल त्याप्रमाणे वागून ऑस्ट्रियाला सहकार्य करावे”... म्हणजे काय हे ऑस्ट्रियाने मोघमपणे सांगितले आहे पण तरी तत्वत: त्यांची हि मागणी सर्बियाला मान्य असून आंतरारष्ट्रीय कायद्याच्या आणि संकेताच्या चौकटीत राहून ऑस्ट्रियाला सर्व प्रकारचे सहकार्य करायला सर्बिया कटिबद्ध आहे
६. ऑस्ट्रियन अधिकाऱ्याना तपास कामात सामील करून घेणे हे सर्बियन घटनेच्या चौकटीत शक्य नाही.(पण पुढे मुद्दा १० पाहावा ...)
७. मेजर ऑस्कर टान्केस्चीझ आणि मिलानो सिगानोवीच ह्यांच्या विरुद्ध कोणताही पुरावा सापडला नसल्याने त्यांना अटक करता येणे शक्य नाही तरी ऑस्ट्रियाकडे असल्यास ऑस्ट्रियाने तसे पर्याप्त आणि विश्वसनीय/ सज्जड पुरावे सर्बियन सरकारला द्यावेत म्हणजे सरकारला त्यांच्यावर कारवाई करता येईल.
८. सर्बियातून ऑस्ट्रियात होणारी शस्त्रास्त्रांची अवैध तस्करी आणि दहशतवाद्यांची घुसखोरी थांबवाण्यासाठी कडक उपाय योजना केली जाईल
९. जर ऑस्ट्रियाने सर्बियन लष्करातील तसेच प्रशासनातील ऑस्ट्रिया विरोधी लिखाण आणि वक्तव्य करणाऱ्या अधिकाऱ्याविषयी पुरावे दिले तर सर्बियन सरकार त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करेल. मात्र साध्या तसा कुठलाही पुरावा सर्बियन सरकारकडे नाही.
१०. सर्बिया ह्या संबंधाने काय करीत आहे, करणार आहे ते वेळोवेळी कळवेलच पण ते ऑस्ट्रियाला समाधानकारक न वाटल्यास हेग येथील आंतरारष्ट्रीय न्यायालयात हा मुद्दा घेऊन जावा व त्यांचा निर्णय दोन्ही देशांनी मान्य करावा. अशीच उपाय योजना मुद्दा क्रमांक ६ मध्ये उल्लेख केलेल्या ऑस्ट्रियन अधिकाऱ्याना सर्बियन तपास कामात सामील करून घेण्या संबंधाने आलेल्या मागणी साठी करावी.
हे उत्तर स्वत: पॅसेजने ऑस्ट्रियन राजदूत गीस्लीन्जेनकडे सुपूर्द केले. त्यावर वरवर एक नजर टाकून त्यात ऑस्ट्रियाची सहा क्रमांकाची मागणी मान्य केली नाही म्हणजेच हा सर्बियाचा सहकार्य करायला नकार आहे असे सांगून गीस्लीन्जेनने तो नाकारला आणि सर्बियन राजधानीतून बाहेर पडून ऑस्ट्रियकडे रवाना झाला. त्याने असे करायचे हे आधी पासूनच ठरलेले होते कारण तो त्याचे समान सुमान बांधूनच दुतावासात आला होता. त्या दिवशीच म्हणजे २५ जुलै रोजीच तो रेल्वेने ऑस्ट्रियात परतला.आता पुढे काय होणार? ऑस्ट्रिया काय करणार? ह्याची उत्सुकता सगळ्यांनाच लागून राहिली.
२८ जूनच्या घटनेनंतर म्हणजे फ्रान्झच्या खुनानंतर तसा बराच काळ शांततेत गेल्यानंतर अचानक २३ जुलैला ऑस्ट्रियाने पाठवलेल्या निर्वाणीच्या खलित्याने इंग्लंडचे लक्ष एकदम त्याकडे वेधले गेले. आतापर्यंत ते स्वत: त्यांच्या देशात आयर्लंडच्या स्वातंत्र्याच्या जोरदार मागणी आणि उठावाने निर्माण झालेल्या गृहयुद्ध सदृश परिस्थितीतून मार्ग काढण्यातच गुंतले होते. ऑस्ट्रियाचा खलिता आणि सर्बियाचे उत्तर पाहून सर एडवर्ड ग्रे ह्यांनी परत एकदा सर्व बड्या राष्ट्रांनी एकत्र येऊन मागील प्रकरणान्प्रमाणे ह्यातून मार्ग काढावा म्हणून मोर्चे बांधणी सुरु केली. परंतु फ्रांस आणि रशियाला मात्र ऑस्ट्रियाच्या कारवायांची कूणकूण आधीच लागली असल्याने त्यानी युद्धाची तयारी म्हणून सैन्याची जमवाजमव सुरु केली होती. अर्थात ही बाब तेव्हा गुप्त होती.
इकडे २५ जुलैला ऑस्ट्रियाला हवा तसा सर्बियाचा नकार मिळाला होता आता त्याचा सर्बीयावर हल्ला करायचा मार्ग मोकळा झाला होता. कमीतकमी जर्मनीला तरी तसेच वाटले आणि त्यानी परत एकदा ‘सर्बियाविरुद्ध युद्ध पुकारा’, ‘सर्बियाविरुद्ध युद्ध पुकारा’ म्हणून ऑस्ट्रियाकडे तगादा लावला. पण ऑस्ट्रियन सरसेनापती कॉनराड ह्याने ऐन वेळी शेपूट घातली. त्याने सांगितले कि हल्ला करायला ऑस्ट्रियन सैन्याची सिद्धताच नाहीये आणि कितीही प्रयत्न केले तरी १२ ऑगस्ट पूर्वी सर्बियावर हल्ला करणे अशक्य आहे. हा तोच कॉनराड होता ज्याने फ्रांझ फर्डिनांड हयात असल्यापासून “सर्बियावर हल्ला करून त्याला चेचला पाहिजे” असा ऑस्ट्रियन सरकारकडे सतत धोशा लावला होता. आता ऐनवेळी त्याचे हे घुमजाव म्हणजे आव आणून तोंडघशी पडण्याचाच प्रकार होता. आपली सैन्य सिद्धताच नाही हे समजल्यावर बर्खटोल्ड,झिमरमन,बेथमान-होल्वेग ह्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. जर्मनीला म्हणजेच चान्सेलर बेथमान-होल्वेगला जबर धक्का बसला. ह्या प्रकरणात इतर बड्या युरोपियन राष्ट्राना उतरू न देण्यावर, विशेषत: इंग्लंडला ह्यापासून दूर ठेवण्यावर त्याचा आधीपासून कटाक्ष होता आणि त्याकरता ऑस्ट्रियाने युद्ध लवकरात लवकर पुकारणे गरजेचे होते. पण आताच खरेतर उशीर झाला होता. त्यात अजून किमान १५ दिवस ऑस्ट्रिया सर्बियाविरुद्ध युद्ध पुकारू शकत नाही म्हटल्यावर त्यांच्या सगळ्या योजनेवरच पाणी पडले असते.इकडे २३ जुलैला ऑस्ट्रियाने निर्वाणीचा खलिता पाठवल्यापासून इंग्लंडने मध्यस्थी करण्यासाठी जर्मनीवर दबाव आणायला सुरुवात केली होती. त्याना फार काळ तो टाळू शकत नव्हता.
एकतर खून झाल्या झाल्या ऑस्ट्रियाने हल्ला केला असता तर ते काही प्रमाणात संतापाच्या भरात, प्रत्युत्तरादाखल केलेले कृत्य वाटले असते,आणि काही प्रमाणात समर्थनीय देखील वाटले असते पण आता उशीर झाला होता. १ महिना होऊन गेल्यावर ऑस्ट्रियाने युद्ध पुकारल्यावर तोच झाल्या घटनेचा राजकीय फायदा उठवून सर्बियासारख्या चिमुकल्या देशाच्या स्वातंत्र्याचा घोट घेऊ पाहतो आहे असे चित्र तयार झाले होते त्यात सर्बियाने दिलेले उत्तर,ऑस्ट्रियाच्या मान्य केलेल्या जवळपास सर्व मागण्या त्याना आंतरारष्ट्रीय स्तरावर समजूतदार आणि प्रामाणिक देश म्हणून ठसवत होते.
सर्बियाचा साथीअसलेल्या रशियातही झाल्या घटनांचे पडसाद उमटू लागले होते. २९ जुलै रोजी रशियन मंत्री मंडळ आणि झार निकोलस ह्यांची बैठक झाली आणि त्यात (सर्वानुमते नाही) असे ठरले कि रशियाने ऑस्ट्रिया आणि सर्बियात मध्यस्ती करून समेट घडवून आणावा. रशियन परराष्ट्र मंत्री सोझोनोव ह्याचा अशा समेटाला विरोध होता. एकतर मागे बोस्नियन तिढ्याच्या वेळी रशियाने मुत्सद्देगिरीत मात खाल्ली होती आणि त्यामुळे सर्बिया नाराज झाला होता. बल्गेरिया तर त्यांच्या विरोधातच गेला होता. आता ह्यावेळी पुन्हा पण जर माघार घेतली तर सर्बिया ही विरोधात जाईल ते बाल्कन प्रदेशातल्या आपल्या प्रभावाला मारक ठरेल. शिवाय ऑस्ट्रिया ज्या उड्या मारतोय त्या जर्मनीच्या जीवावर मारतोय हे उघड होते. ऑस्ट्रियाने केलेल्या बहुतांश मागण्या मान्य करून देखील ते सर्बियाला दाबू पाहत होते. १९०५ साली जपान बरोबर झालेल्या युद्धात हार झालेली असली तरी ती ९-१० वर्षापुर्वीची घटना होती दरम्यानच्या काळात फ्रान्सच्या मदतीने रशियन फौजात बरीच सुधारणा झालेली होती (म्हणजे असे साझोनाव चे मत होते.रशियन युद्ध मंत्री सुखोमिलीनोव ह्याचे मत त्याच्या विरुद्ध होते.) म्हणून मग त्यानी वरवर सामोपचार करणाऱ्याची भूमिका घ्यायची आणि गुप्तपणे सैन्याची तयारी चालू करायची असे ठरले.
जरी वरकरणी हि लष्कराची जमवाजमव फक्त ऑस्ट्रियन सरहद्दीवर करायची असे ठरले तरी त्यात काही अर्थ नव्हता. ऑस्ट्रिया काही झाले तरी सर्बिया वर हल्ला करणारच आणि मग कराराप्रमाणे रशियाला सर्बियाच्या मदतीला धावून जावे लागणार होते. रशियामध्ये पडला कि जर्मनीला त्यांच्या मैत्री कराराला जागून रशिया आणि सर्बिया विरुद्ध ऑस्ट्रियाच्या बाजूने उतरावे लागणार होते.एकदा जर्मनी रशिया विरुद्ध युद्धात उतरला कि फ्रांस गप्प बसणे शक्य नव्हते. ह्या गोष्टी अगदी उघड होत्या.फक्त ह्यात रशियाचे जे डावपेच जे चालू होते ते इंग्लंडने त्यांच्या बाजूने युद्धात उतरावे, तटस्थ राहू नये अशा दृष्टीने होते तर जर्मनीचे डावपेच होता होईल तो इंग्लंडला ह्यातून बाहेर ठेवावे असे होते.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

एका जर्मन नियतकालिकात युरोपच्या पटलावर ठेंगण्या सर्बियाचे आगमन ते फ्रान्झचा खून(ऑस्ट्रियाच्या पाठीत खुपसलेला खंजीर) आणि पुढची सगळी राजकीय मारामारी दाखवणारे मोठे सूचक व्यंगचित्र ... सगळा इतिहास त्यानी ५ चित्रात सांगितला आहे (अर्थात काहीसा त्यांच्या बाजूने )

२५ जुलैला ऑस्ट्रियाच्या मागण्याना सर्बियाचे उत्तर मिळाल्यानंतर जवळ जवळ तीन दिवस ऑस्ट्रियाकडून फार काहीच हालचाल झाली नाही पण फ्रांस रशिया आणि इंग्लंड मात्र एकदम जागे झाले. त्यानी जर्मनीवर ऑस्ट्रियाला समजवण्यासाठी दबाव आणायला सुरुवात केली. जर्मनी सोडता सगळ्यानीच लष्करी तयारी सुरु केली. सैनिकांच्या रजा रद्द करून त्यांना कामावर तातडीने रुजू व्हायला सांगितले गेले. सरहद्दीवरती सैन्याची जमवाजमव मोर्चेबांधणी सुरु झाली. इंग्लंड मध्ये पूर्वनियोजित युद्ध सरावासाठी आलेल्या युद्ध नौकाना सरावानंतर ही इंग्लंडच्या किनाऱ्यावरच तैनात आणि हुश्शार राहण्याची आज्ञा नाविक दल मंत्री विन्स्टन चर्चिलने दिली.इंग्लंडचे परराष्ट्र मंत्री सर एडवर्ड ग्रे ह्यांनी जर्मनीला इशाराच दिला कि “जर ऑस्ट्रिया अशी दादागिरी करतच राहणार असेल आणि जर्मनीला त्यांची समजूत काढता येत नसेल किंवा ते मुद्दाम त्यांना समजावत नसतील तर इंग्लंडला तटस्थ राहणे अवघड आहे.” पण इंग्लंडच्याच मंत्रीमंडळात मात्र ह्यावर टोकाचे मतभेद होते.एकटा चर्चिलच होता ज्याने वादविवादात फारशी रुची न घेता सरळ सरळ आपल्या अखात्यारीत आरमाराची युद्ध सिद्धता सुरु केली. ह्या बाबी कडे जर्मनीने थोडे दुर्लक्षच केले.एकतर युद्ध झालेच तर ते युरोपच्या भूमीवर होणार होते आणि इंग्लंडच्या आरमाराचा तिथे काही उपयोग नव्हता, त्यातून जर्मनीकडे स्वत:चे प्रबळ आरामार होते अन इंग्लंडचे खडे सैन्य -भूदल संख्येने बरेच तोकडे(८०-९० हजाराच्या आसपास) होते. त्यामुळे लगेच काही इंग्लंड आपल्याला धोका उत्पन्न करू शकणार नाही असा विचार त्यानी केला. ही त्यांच्या आकलनातली फार गंभीर चूक होती.
इकडे जर्मनीत कैसरने २८ जुलै रोजी प्रथमच सर्बियाने दिलेले उत्तर प्रथमच वाचले. तो चकीतच झाला. सर्बियाने जवळपास सगळ्या मागण्या मान्य केल्यात मग आता ऑस्ट्रिया का गुरकावतोय! त्याला कळेना.त्याने लगोलग चान्सेलर बेथमान-होल्वेगला बोलावून ऑस्ट्रियाला युद्धाची घोषणा न करण्याविषयी सांगितले. ह्याचा परिणाम उलटा झाला. इतका वेळ सतत ऑस्ट्रियाला युद्ध घोषित करा, सर्बियात सैन्य घुसवा म्हणून लकडा लावणारा जर्मनी आता ऐन वेळी असे ‘घूमजाव’ करतो हे आपल्या इभ्रतीला शोभा देणार नाही असे सांगून बेथमान-होल्वेगने चक्क नकार दिला. आणि वेळ पडल्यास राजीनामा द्यायची तयारी दर्शवली. पण कैसर ऐकेना. शेवटी जर्मन युद्धमंत्री फॉन फाल्केनहाईन मध्ये पडला. त्याने सांगीतले कि आता जर आपण माघार घेतली तर मंत्रीमंडळ सैन्य, सगळेच कैसरवर नाराज होतील, सैन्य त्याच्या विरोधात बंडही करू शकेल, गोष्टी खूप पुढे गेल्यात. आता आपण माघार घेऊ शकत नाही. कैसरचा नाईलाज झाला. २८ जुलैला सकाळी ११ वाजून १० मिनिटांनी ऑस्ट्रियाने सर्बियाविरुद्ध युद्ध जाहीर केले.खरेतर कॉनराडने युद्ध करायला ऑस्ट्रियन सैन्याची तयारी नाही असे सांगितले असताना परराष्ट्रमंत्री बर्खटोल्ड आणि चॅन्सेलर कार्ल फॉन स्टूर्ख स्वत:च्या जबाबदारी असे केले.त्यांनी हे असे का केले? हे नक्की सांगता येणे अवघड आहे.कदाचित जर्मनीचा सततचा दबाव असेल किंवा २८ जून पासून ऑस्ट्रियाने, त्यानी चालवलेल्या प्रयत्नाला ह्या न त्याकारणाने होत असलेल्या दिरंगाई मुळे वैतागून असेल किंवा आपण निर्णयक्षम खंबीर आणि खमके आहोत असे त्याना दाखवायचे असेल, नक्की सांगता येणे मुश्कील आहे.
११ वाजून १० मिनिटांनी युद्ध घोषित झाले तरी तसा निरोप द्यायला ऑस्ट्रियाचा राजदूतच सर्बियात नव्हता. म्हणून मग हा महत्वाचा निरोप तारेने सर्बियाला कळवण्यात आला. वेळ होती ११ वाजून ५० मिनिटे. एवढी महत्वाची युद्ध घोषणा आणि ती तारेने कळवली! पंतप्रधान पॅसेजचा विश्वासच बसेना त्याने ऑस्ट्रियाची राजधानी विएन्नाला फोन करून संपर्क साधायचा प्रयत्न केला. ही तार खरी आहे कि काही गैरसमज/ गोंधळ झाला आहे अशी विचारणा केली.(ऑस्ट्रीयाबाबत हे सहज शक्य होते )ऑस्ट्रिया कडून उत्तरादाखल त्याच दिवशी संध्याकाळी डॅन्यूब नदीत तैनात असलेल्या युद्धानौकांकरवी राजधानी बेलग्रेड वर बॉम्ब वर्षाव करण्यात आला. हे पहिल्या महायुद्धाचे पहिले बॉम्बस्फोट ठरले.
त्याच दिवशी दुपारी ४ वाजता रशियाने आपण सैन्य सिद्धता सुरु करत असल्याची घोषणा केली. कैसरने झार निकोलासला व्यक्तिगत तार केली ज्यात त्याने आपण दोघे मिळून प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यास अजूनही संघर्ष टाळता येईल आणि सामोपचाराने मार्ग काढता येईल अशी आशा व्यक्त केली आणि निकोलसकडून थोड्या सबुरीची अपेक्षा केली. ह्यात त्याने आपल्या चुलत भावाला निकी म्हणून संबोधले. प्रत्युत्तराद्खल झार निकोलसने देखील आपण ह्यातून नक्कीच सामोपचाराने मार्ग काढू शकू असा आशावाद व्यक्त केला. त्यानेही विल्हेल्मला विली असे संबोधले.हा त्यांच्यातल्या प्रसिद्ध विली-निकि पत्रव्यवहरातला पहिला पत्रसंवाद होता.पण गोष्टी त्यांच्या हाताबाहेर केव्हाच गेल्या होत्या. रशियातला फ्रेंच राजदूत मोरीस पोलीयोलोट ह्याने फ्रान्सचा रशियाला पूर्ण पाठींबा असल्याचे सांगितले.
बुधवार २९ जुलै उजाडला. सर्बियावर युद्ध घोषित केले तरी अजून सर्बियाच्या हद्दी ओलांडून ऑस्ट्रियाने सैन्य घुसवले नव्हते (हां, नाही म्हणायला राजधानी बेलग्रेड वर बॉम्ब वर्षाव केला होता.)रशियाने ऑस्ट्रियन आणि जर्मन सरहद्दिभोवती लष्कराची जमवाजमव सुरु केली होती. पण युद्ध घोषित केले नव्हते. फ्रांस मध्येही लष्करी तयारी जोरात सुरु होती. जर्मनी तर अजूनही शांतच होता. त्यानी कुठलीही घोषणा केली नव्हती किंवा युद्धाची तयारीही सुरु केली नव्हती. इंग्लंडचे आरमार युद्धाच्या तयारीत आदेशाची वाट पाहत सज्ज खडे होते. एकंदरीत परिस्थिती गंभीर असली तरी अगदीच हाताबाहेर गेलेली नव्हती.
पण जर्मनीत सेनाध्यक्ष मोल्टके आणि युद्धमंत्री फाल्केनहाईन अस्वस्थ झाले होते. फ्रांस आणि रशिया त्यांच्या सरहद्दीवर सैन्याची जोरदार जमवाजमव करत असताना ते शांत कसे बसणार! त्यानी चान्सेलर बेथमान-होल्वेगकडे जाऊन कैसरकडे युद्ध तयारी करण्याविषयी परवानगी मागण्यासाठी धोशा लावला. पण कैसर अजूनही तयार नव्हता. आताच लगेच जर्मनीने असे काही केले तर कालच झार निकोलसाला आपण जे सांगितले ते खोटे ठरले असते. म्हणून मग कैसरच्याच सांगण्यावरून बेथमान-होल्वेगने रशियाला तार करून जर्मन ऑस्ट्रियन सरहद्दीवर गडबड न करण्याविषयी इशारा दिला. त्याचा काही उपयोग होणार नाही आणि आता जवळपास रशिया आणि मग लगोलग फ्रांस जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारणार हे त्याना माहिती होते त्यांची अशा प्रसंगाला तोंड द्यायची तयारीही होती.(पण त्याबद्दल नंतर पुढे विस्ताराने येईलच .)त्यांना काळजी वाटत होती, आता इंग्लंड काय करते याची. इंग्लंड जर ह्यात ओढले गेले तर जर्मनीची अवस्था बिकट होणार होती. म्हणजे मागे सांगितल्याप्रमाणे इंग्लंड युरोपच्या मुख्य भूमीवर उतरून फार काही करेल किंवा करू शकेल असे नाही पण इंग्लान्द्मुळे जर्मनांच्या आफ्रिकेतल्या वसाहतीला मोठाच धोका उत्पन्न झाला असता.जर्मन योजनेप्रमाणे फ्रांस आणि रशियाशी युद्ध प्रसंग उत्पन्न झाल्यास, फ्रान्सला युद्धात तातडीने हरवून मग रशियाला अंगावर घ्यायाचे असे ठरले होते. ईंग्लंडमुळे जर फ्रान्सला तातडीने मदत मिळाली तर मग जर्मनीला छोटे अल्पकाळ चालणारे युद्ध न करता एकाचवेळी दोन आघाड्यावर रेंगाळणारे युद्ध करावे लागले असते जे जिंकणे अवघड होते.
२९ जुलै ला रशियात साधारण ५ वाजता सर्बियाच्या राजधानीवर गोळाफेक झाल्याची बातमी पोहोचली. त्याधीच जर्मनीचा सरहद्दीवर गडबड न करण्याचा इशारा पोहोचला होता. म्हणजे एकीकडे जर्मनी आपल्याला धमकावतोय आणि दुसरीकडे ऑस्ट्रिया त्यांच्या पाठींब्यावर सर्बियावर हल्ला करतोय असा अर्थ सोझोनोवने काढला. व्यक्तिगत असल्याने, त्याला कैसरने झार निकोलसला पाठवलेल्या तारेबद्दल काही माहिती नव्हते. पण ह्या दोन घटनांनी झार ही गोंधळाला आणि त्याने ऑस्ट्रियाविरुद्ध रशियाने युद्ध पुकारायला मान्यता दिली. इंग्लंडमध्ये सर एडवर्ड ग्रे देखील जर्मनीच्या थंड प्रतिसादाने वैतागले. त्यानी त्यांच्याकडचा जर्मन राजदूत प्रिन्स लीचनोस्की ह्याला परत एकदा स्पष्ट सांगितले कि जर्मनीने ऑस्ट्रियाला समजावून माघार नाही घेतली तर इंग्लंड तटस्थ राहणार नाही. ते फक्त बघ्याची भूमिका घेऊ शकणार नाही. आता मात्र बेथमान-होल्वेगचे डोळे खाडकन उघडले.
ऑस्ट्रियाचे काय व्हायचे असेल ते होवो पण ह्या तीन महाशक्ती एकत्र येऊन जर्मनीला चेचणार हे समजायला त्याला फार वेळ लागला नाही. आता त्याने खरोखरच सर्बियावरचा हल्ला थांबवा, त्यांच्या भूप्रदेशात सैन्य घुसवू नका, इंग्लंडची मध्यस्थीची मागणी मान्य करा आणि युद्ध लगेच थांबवा म्हणून संदेश पाठवला. सेनाध्यक्ष मोल्टके रशिया फ्रांस आणि आता इंग्लंड देखील जर्मनीविरुद्ध उभे राहताहेत हे पाहून अस्वस्थ झाला होता. त्याने जर्मनीने देखील युद्ध तयारी सुरु करावी म्हणून बेथमान आणि कैसर दोघांकडे विनवण्यावर विनवण्या सुरु केल्या.त्याला देखील बेथमानने शांत रहा, जरा वाट बघा म्हणून सांगितले. ऑस्ट्रियाची समस्या मात्र फार भारी होती. आधी एक तर सर्बिया विरुद्ध युद्ध किंवा काहीही करायला त्यांची यंत्रणा हलता हलत नव्हती, तेव्हा ‘लवकर काहीतरी करा’ म्हणून जर्मनी एकसारखा त्यांच्या मागे लागला होता आता तोच जर्मनी त्याना ‘थांबा’ म्हणत होता पण तीच दिरंगाई त्यांची जगड्व्याळ यंत्रणा थांबायला लागत होती. तरीही जर्मनीला जरा समाधान वाटावे म्हणून परराष्ट्रमंत्री बर्खटोल्ड, चॅन्सेलर कार्ल फॉन स्टूर्ख आणि सेनाध्यक्ष कॉनराड ह्यांनी संयुक्तपणे जाहीर केले कि त्यानी २३ जुलैरोजी दिलेल्या निर्वाणीच्या खलित्याताल्या सगळ्या अटी सर्बियाने विनाशर्त आणि शब्दश: मान्य केल्या शिवाय ते ऐकणार नाहीत.हा संदेश सर्बियाला तारेने दिला गेला.
गुरुवारी ३० जुलैला रशियाकडून जर्मनीच्या २९ जुलैच्या इशाऱ्याला उत्तर आले. आता ऑस्ट्रियाच्या वागण्याकडे पाहता त्याना ऑस्ट्रियाविरुद्ध सैन्याची जमवाजमव करणे भाग आहे. त्यामुळे ते काही ते सरहद्दीवरून सैन्य माघारी बोलावणार नाहीत. ह्याने जर्मन सेनाध्यक्ष मोल्टके अजून उताविळ झाला.आतापर्यंत फक्त कैसरच त्याचे ऐकत नव्हता आता बेथमान पण त्याचे ऐकेना. त्याला अंतरराष्ट्रीय डावपेच आणि मुत्सद्देगिरीशी काही घेणे देणे नव्हते त्याला जर्मन सरहद्दीन्ची काळजी होती. म्हणून मग त्याने सरळ सरळ ऑस्ट्रियाला तार करून रशियन सरहद्दीवर सैन्य तैनात करायला सांगितले. म्हणजे जर्मनीत नक्की अधिकार/अंमल होता कुणाचा? कैसरचा पार्लमेंटचा कि सैन्याचा ?खरेतर अशाप्रसंगी कैसरने खंबीरपणे वागून बेथमान आणि मोल्टकेला दमात घ्यायला हवे होते. ऑस्ट्रियाने ह्यावर काहीही करायचे नाही असेच ठरवले. ते आदल्या दिवशी सर्बियाला दिलेल्या संदेशाच्या उत्तराची वाट पाहू लागले.ह्यावेळी मात्र रशियाच्या पाठींब्याने सर्बियाने चक्क नकार दिला.त्याबरोबरच रशियाने जर्मनी आणि ऑस्ट्रिया दोघांविरुद्ध युद्ध तयारी सुरु केली. तशा आदेशावर झार निकोलसने नाईलाजाने सहीही केली. सोझोनावने तर परत झारने आपला निर्णय फिरवू नये म्हणून झार कडून येणारा कुठलाही फोन /संदेश स्विकारायाचा नाही असे कार्यालयात सगळ्यांना बजावले.
शुक्रवार ३१ जुलै उजाडला. रशियाने जर्मनी आणि ऑस्ट्रियाविरुद्ध सैन्य तयारी सुरु केल्याची बातमी जर्मनीला पोहोचली.आता जर्मनीला म्हणजे कैसरला नाईलाजाने जर्मन सैन्याला फ्रांस, रशिया आणि सर्बियाविरुद्ध सैन्य तयारी करायचे आदेश द्यावे लागले. (सर्बियाची आणि त्यांची सरहद्द सामाईक नसल्याने त्याला काही अर्थ नव्हता.)ह्या सगळ्या बातम्या इंग्लंडला पोहोचल्या. परराष्ट्र मंत्री एडवर्ड ग्रे ह्याना इंग्लिश पार्लमेंट कडून निर्णय मिळत नव्हता. त्यावेळी इंग्लडमध्ये उदारमतवादी मजूर पक्षाचे सरकार होते. आणि त्यांच्यात इंग्लंडने काय करावे ह्या बाबत एकमत होत नव्हते. ग्रे, चर्चिल आणि स्वत: पंतप्रधान हर्बर्ट अस्क्विथ हे युद्ध करावे ह्या बाजूचे होते तर अर्थमंत्री लोइड जॉर्ज आणि जॉन मोर्ले ( आपल्या कडील मिंटो-मोर्ले सुधारणा विधेयक आणणारे) हे इंग्लंडने तटस्थ राहावे अशा विचारांचे होते.मंत्रीमंडळात ह्यावरून उभी फुट पडायची शक्यता होती. सरकारही कोसळले असते. पण अशावेळी जर्मनीच त्यांच्या मदतीला धावून आला.
युरोपात बेल्जियम हे एक तटस्थ राष्ट्र होते आणि त्याची तटस्थता इंग्लंडने राखायचे वचन दिलेले होते.१८३९ च्या लंडन सामाझौत्याप्रमाणे फ्रांस ऑस्ट्रिया आणि जर्मन राष्ट्र संघ (तत्कालीन) हे देखील बेल्जीयम्च्या स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्वाचे विश्वस्त होते. जर जसे दिसते त्याप्रमाणे जर्मनी फ्रांस आणि रशिया विरुद्ध युद्धतयारी करीत असेल तर बेल्जियमच्या तटस्थतेचे काय? अशी विचारणा करणारी तार ग्रे ह्यांनी जर्मनीला पाठवली.तशीच तार त्यानी फ्रान्सला ही पाठवली. फ्रांसने लगेच उत्तर पाठवून आपण बेल्जीयम्च्या तटस्थतेला धक्का लावणार नसल्याचे सांगितले. जर्मनीने काहीच उत्तर दिले नाही.इंग्लंड काय समजायचे ते समजला.
१ ऑगस्ट ला जर्मन राजदूताने पॅरिस ला विचारणा केली जर रशिया आणि सर्बियाशी जर्मनीचे युद्ध झाले तर फ्रांस काय करेल? फ्रांस ने मोघम उत्तर दिले “ते त्याच्या हितसंबंधाच्या रक्षणासाठी जे योग्य असेल ते करतील.” जर्मनीने त्यांच्या राइश्टाग मध्ये रशियाने त्यांची २९ जुलैची मागणी फेटाळल्याचे वृत्त सांगितले. राइश्टागने एकमताने रशियाविरुद्ध युद्ध पुकारायचे विधेयक संमत केले.त्याच दिवशी जर्मनीने रशियाविरुद्ध युद्ध पुकारले.
हे त्यानी का केले ह्याचे कारण मोठे विचित्र होते. आतापर्यंत कैसर आणि बेथमान म्हणजे पार्लमेंट हे दोघे एकत्र येऊन युद्ध शक्यतो टाळायचे पाहत होते तर जनरल फॉन मोल्टके म्हणजे सैन्य हे फ्रांस आणि रशियाशी युद्ध करायच्या तयारीत होते. अशात लंडनमधील जर्मन राजदूत प्रिन्स लीचानोस्कीचा संदेश आला कि सर ग्रे ह्यांनी त्याला सांगितले आहे, “जर जर्मनी फक्त आणि फक्त रशियाशीच युद्ध करायचे आणि फ्रांस आणि इतर युरोपियन देशांपासून लांब राहायचे वचन देत असेल तर इंग्लंड स्वत: तटस्थ राहिलच पण ते फ्रान्सला देखील तटस्थ रहायला राजी करतील.” ही गोष्ट जर्मनीच्या चांगलीच पथ्यावर पडणार होती. पण सर एडवर्ड ग्रे ह्याने पंतप्रधान किंवा मंत्रीमंडळाशी चर्चा न करता हा निर्णय घेतला होता. अत्यानंदाने कैसर ने राजा जॉर्ज ला जो त्याचा चुलत बंधू लागत होता त्याला तार करवून वरील बाब कळवली. तेव्हा राजा जॉर्जने पंतप्रधान अस्क्विथला विचारून असले कुठलेही आश्वासन इंग्लंड देत नसून लीचानोस्की खोटे बोलत आहे किंवा त्याचा काही गैरसमज झाला आहे असे कैसरला कळवले .आता प्रश्न असा उभा राहतो कि ग्रे तरी असे का वागले असतील? थोडे समजून घेऊ, १९०५ पसुनच समझोत्याने फ्रेंच आणि इंग्लंड एकत्र राहत आले होते आणि फ्रेंचाना जशी भीती जर्मनीची वाटत होती तशी भीती किंवा धोका इंग्लंडला जर्मनीचा वाटायचे कारण नव्हते. इंग्लंडच्या सागरी धोरणामुळे, फ्रेन्चानी त्याना दुखवायला नको म्हणून आपले आरमार तितकेसे वाढवले नव्हते. ते आज जर्मनीपुढे कमकुवत होते. एवढेच नाहीतर इंग्लंड तटस्थ राहिले तर जर्मनी त्यांचे आरमार घेऊन फ्रांसला उत्तरेकडून चांगलेच जेरीला आणू शकत होता. जर्मन धोक्याला जमिनीवर तोंड द्यायची सिद्धता फ्रांसने आजपर्यंत चांगली केली होती. जर्मनी आणि फ्रांसची सामायिक सरहद्द तशी कमी लांबीची होती आणि तिथे फ्रांसने जर्मनीला रोखायची सिद्धता उत्तम केलेली होती शिवाय बेल्जीयान्म आणि स्वित्झर्लंड सारख्या तटस्थ राष्ट्रांचा बफर झोन होता पण सागरी संरक्षणासाठी मात्र ते इंग्लंडरच अवलंबून होते.सागरी युद्धात बेल्जियम नेदरलंड असे देश तटस्थ असणे उलट जर्मनीच्या पथ्यावरच पडणार होते आणि अशात इंग्लंड जर तटस्थ राहिले असते तर फ्रांसची अवस्था खरच बिकट झाली असती. कोणत्याही लिखित करारांन्वये इंग्लंड त्यांचे सागरी धोक्यापासून संरक्षण करायला बांधील नव्हते हे खरे पण इंग्लंड त्यांच्या पाठीशी अभे राहील असे गृहीत धरून ते चालले होते.त्यामुळे त्यानी सर एडवर्ड ग्रे ह्यांच्याकडे लकडा लावला कि इंग्लंडने फ्रान्सला साथ द्यावी, तटस्थ राहू नये. मंत्रिमंडळ जो पर्यंत काही निर्णय घेत नाही तोपर्यंत ग्रे ह्यांच्या हातात काही नव्हते. त्यामुळे त्यानी हे असे पाऊल उचलले असावे.(अर्थात हा अंदाज झाला, खरे कारण कधीच समोर आले नाही.आपण अंदाजच करू शकतो) पण त्याचा परिणाम भयंकर झाला. जर्मनी घाई घाईत रशियावर युद्ध पुकारून बसला आणि नंतर इंग्लंडने कानावर हात ठेवले.

त्यातल्यात्यात एक बरी बातमी अशी आली कि इटली हा जो जर्मनी आणि ऑस्ट्रिया बरोबर त्रिसदस्यीय कराराने बांधला गेलेला देश होता त्याने आपण मात्र ह्या तंट्यात सध्यातरी भाग घेत नसल्याचे आणि तटस्थ राहणार असल्याचे कळवले. म्हणजे त्यानी ह्या मागचे कारण दिले ते मोठे हुशारीने दिलेले, समयसूचक (आणि बरोबरही) होते. त्यांच्यातला त्रिसदस्यीय करार हा मुख्यत: संरक्षणात्मक होता म्हणजेच जर जर्मनी किंवा ऑस्ट्रियावर कुणी हल्ला केला असता तर इटली त्यांच्या बाजूने युद्धात उतरायला बांधील होता पण इथे तर जर्मनी आणि ऑस्ट्रियाने च दुसर्या देशांवर आक्रमण केलेले होते. त्यामुळे इटली त्यांच्या बरोबरीने युद्धात उतरायला बांधील नव्हता. इटली जरी सामर्थ्यवान देश नसला तरी त्याचा भूभाग आणि किनारपट्टी युद्धात जर्मनीला फार उपयोगी पडला असता. रशियावर आक्रमण करायची घाई करून जर्मनीने एका अर्थी स्वत:च्या पायावर धोंडा मारून घेतला होता. ह्याचे परिणाम त्याना पुढे युद्धात जेव्हा इंग्लंडने उत्तरेकडून त्यांची सागरी नाकेबंदि केली तेव्हा भोगावे लागले...असो.आता पुरते बोलायचे तर आपल्या दक्षिण सीमे बाबत फ्रांस आता काहीसा निश्चिंत झाला.
इंग्लंड मध्ये मात्र मंत्रिमंडळाचे अजूनही एकमत होत नव्हते अशात जर्मनीने दुसरी मोठ्ठी चूक केली. रविवारी २ ऑगस्टला संध्याकाळी ७ वाजता जर्मनीने बेल्जियमला निर्वाणीचे पत्र पठवले त्यात त्यानी म्हटले कि फेंच फोजा जर्मनीवर हल्ला करायच्या उद्देशाने बेल्जीयम्च्या हद्दीत घुसल्या आहेत.( हे साफ खोटे होते.) हा बेल्जियमच्या तटस्थतेचा आणि आंतरारष्ट्रीय कायद्याचाही भंग आहे तरी जर्मन सैन्याला त्यांचा मुकाबला करण्यासठी बेल्जियन सरहद्द ओलांडून जाऊ द्यावे, बदल्यात जर्मनी बेल्जियमला काही त्रास देणार नाही पण बेल्जियमने ऐकले नाही तर मात्र जर्मनीला नाईलाजाने बेल्जियम वर आक्रमण करावे लागेल. उत्तर द्यायला त्यानी बेल्जियमला फक्त १२ तास दिले.ह्यामुळे इंग्लंडच्या मंत्रिमंडळात आतापर्यंत होत नसलेले एकमत एकदम झाले. जर्मनी चक्क खोटे बोलून बेल्जियम सारख्या लहान आणि ह्या तंट्याशी दुरान्वयानेही संबंध नसलेल्या देशाच्या स्वातंत्र्यचा गळा घोटतो आहे. अजून फ्रांसने जर्मनीवर युद्धच घोषित केलेले नाही बेल्जीयमच्या सीमेत सैन्य घुसवणे तर दूरच राहिले, म्हणजे जर्मनी हाच युद्ध खोर आहे त्याला धडा शिकवलाच पाहिजे असे मत सर एडवर्ड ग्रे, आणि पंतप्रधान अस्क्वीथ ह्यांनी संसदेत मांडले. लोईड जॉर्ज ने आपला विरोध मागे घेतला आयर्लंडने देखील आपल्या स्वयंशासनाच्या मागण्या/ चळवळी युद्धकाळा पुरत्या स्थगित केल्याची घोषणा केली. एकमुखाने इंग्लंड जर्मनीविरुद्ध युद्धाला सज्ज झाले.
१२ तास संपल्यावरदेखील बेल्जीयमने कोणतेही उत्तर जर्मनीला दिले नाही पण आपल्या छोट्याश्या सैन्याला युद्धाला तोंड द्यायला सिद्ध राहायची तयारी करायला सांगितले. त्यादिवशी म्हणजे ३ ऑगस्टला संध्याकाळी जर्मन हद्दीवर फ्रेच सैन्याच्या हालचाली आणि विमाने घिरट्या घालताना दिसत आहेत असे सांगून जर्मनीने फ्रान्सविरुद्ध युद्ध पुकारले. हे कारणही खोटेच होते. त्या दिवशीच हि बातमी इंग्लंडला समजली.
इंग्लंडच्या परराष्ट्र मंत्रालयात सर्वत्र सामसूम होती. अंधार पडत असताना आपल्या कचेरीच्या खिडकीतून बाहेर लंडनच्या रस्त्यावर दिवे उजळताना पाहून सर एडवर्ड ग्रे म्हणाले “Lamps are going out all over europe: We shall not see them lit again in our life time.”(सर्व युरोपात दिवे मालवू लागले आहेत आणि मला नाही वाटत कि आपल्या हयातीत ते पुन्हा उजळलेले पहायला मिळणार आहेत...)संध्याकाळच्या त्या कातरवेळी नियतीच त्यांच्या तोंडून बोलत होती का?
मंगळवार ४ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता जर्मन फौजांनी बेल्जियमची सरहद्द ओलांडली. बेल्जियमने इंग्लंड आणि फ्रांस कडे १८३९च्या कराराची आठवण करून देत मदत मागितली. इंग्लंडने जर्मनीला विनाशर्त बेल्जियम मधून फौजा मागे घेण्यास सांगितले. त्याकरता त्याच दिवशी रात्री १२ वाजे पर्यंत त्याना वेळ दिला. जर्मनीने काहीही उत्तर दिले नाही. रात्री ११ वाजता लंडन मध्ये बिग बेनने ११ टोल दिले तेव्हा बर्लिन मध्ये रात्रीचे १२ वाजत होते. जर्मनीकडून काहीही उत्तर आले नाही हे पाहून इंग्लंडने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले. इंग्लंडने जर्मनीविरुद्ध ह्या तंट्यात भाग घेतल्याबरोबर हे स्पष्ट झाले कि हे आता युरोपच्या भूमीवर खेळले जाणारे छोटेसे युद्ध न राहता त्याची व्याप्ती फार मोठी-जागतिक असणार आहे.
खरेतर पहिले प्रकरण इथेच समाप्त होते पण पुढे काय घडले आणि इतर युरोपीय राष्ट्रांनी काय काय केले आणि ते कसे ह्या युद्धात उतरले ते पाहून आपण हे पहिले प्रकारण “संघर्षाची सुरुवात” आटोपते घेऊ, पण ते पुढच्या आणि शेवटच्या भागात...
क्रमश:
--आदित्य

इतिहासलेख

प्रतिक्रिया

आदित्य,
लेखमाला अतिशय माहितीपूर्ण आहे. सर्व पार्श्वभूमी छन उलगडुन सांगताय. अनेक धन्यवाद.
आपण लिहिल्या प्रमाणे, जर सागरी युद्धात बेल्जियम, नेदरलंड असे देश तटस्थ असणे जर्मनीच्या पथ्यावरच पडणार होते, तरी जर्मनीने काय कारणांमुळे बेल्जियमवर आक्रमण केले? त्यांना बेल्जियमची तटस्थता इंग्लंडने राखायचे दिलेले वचन माहिती नव्हते का? त्यामुळे इंग्लंड जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारेल ह्याचा अंदाज नव्हता काय? हे तर त्यांच्या इंग्लंडला तटस्थ ठेवण्याच्या धोरणाविरुद्ध होते. हे जरा विस्कटुन सांगाल का?

आदित्य कोरडे's picture

15 Sep 2018 - 8:09 am | आदित्य कोरडे

१८३९च्या करारानुसार जरी इंग्लंड फ्रांस रशिया आणि प्रशिया हे बेल्जीयामाच्या तटस्थतेचे संरक्षक असले तरी ह्यांच्या पैकी एकानेच बेल्जियमवर हल्ला केला तर नक्की काय करायचे म्हणजे त्या देशाशी युद्ध करायचे कि इतर काही मार्ग म्हणजे व्यापारावर निर्बंध , राजनैतिक संबंध तोडणे इ उपाय करायचे ह्या बाबत संदिग्धता होती त्यातून युरोपातल्या भांडणात पडायचे कि नाही ह्या वरून इंग्लंडात दोन मत प्रवाह होते आणि त्यावर लगेच काही तोडगा निघेल असे जर्मनीला वाटले नाही. असो इथे प्रतिसादात सगळी गुंतागुंत उलगडून सांगता येणार नाही दुसऱ्या प्रकरणातला एक भाग ह्या बेल्जियन प्रश्नालाच वाहिलेला आहे त्यात सगळे येईलच ...नक्की वाचा , आणखी एक ही लेखमाला आता अक्षर मैफल ह्या मासिकातून प्रसिद्ध होत आहे त्यामुळे त्याच्या संपादकांच्या सांगण्याप्रमाणे तिथे प्रसिद्ध व्हायच्या आधी हे लिखाण इतरत्र प्रसिद्ध करणे बरोबर ( त्यांच्या साठी ) होणार नाही त्यामुळे इथले भाग थोड्या उशीराने प्रसिद्ध होतील( अर्थात तिथे कितपत रिस्पोन्स येतो ह्यावरही ते अवलंबून आहे) तेव्हा दिरंगाई होईल तेवढी समजून घ्या

रांचो's picture

20 Sep 2018 - 5:24 pm | रांचो

< इथे प्रतिसादात सगळी गुंतागुंत उलगडून सांगता येणार नाही दुसऱ्या प्रकरणातला एक भाग ह्या बेल्जियन प्रश्नालाच वाहिलेला आहे त्यात सगळे येईलच ...नक्की वाचा > नक्कीच. वाट पहात आहे.

दुसऱ्या महायुद्धानंतर ची परिस्थिती सर्वज्ञात होती , पण पहिल्या महायुद्धापूर्वीची परिस्थिती सांगून आमच्या ज्ञानात भर पाडल्या बद्दल धन्यवाद .

तुषार काळभोर's picture

15 Sep 2018 - 9:48 am | तुषार काळभोर

आतापर्यंतच्या घटना काही महिन्यांच्या, वर्षांच्या, दशकांच्या अंतराने घडत होत्या. आता मात्र आठवडाभरात इतकं काही घडलंय की अजून एकदा वाचावं लागणारे.

खुप छान माहिती. आम्हीच नव्हे, तर शाळकरी मुलांनी देखील आवर्जुन वाचावी अशी.

नाखु's picture

20 Sep 2018 - 6:39 pm | नाखु

वाचण्यासाठी वा खु साठवून ठेवली आहे.
मोबल्यावरुन वाचताना फार डोळे गरगरायला होतात.

सुधीर कांदळकर's picture

23 Sep 2018 - 7:55 am | सुधीर कांदळकर

राजनैतिक पार्श्वभूमी मस्त परंतु यथार्थ रंगवली आहे. आता पुढील भागाची उत्कंठा लागली आहे.