आयुष्य आणि छंद यांचे समीकरण!
असे नशीबवान कमीच असतात, ज्यांना आपल्या छंदाचे रूपांतर आपल्या करियरमध्ये करता येते. काही सुखी असेही असतात, जे आपल्या करियरबरोबरच आपले छंद छान जोपासतात. काही टक्के असे असतात, जे लहानपणापासून एखाद्या कलेवर किंवा छंदावर मनापासून प्रेम करतात, पण आयुष्यातल्या जबाबदाऱ्यांमुळे आपले हे प्रेम मनातच ठेवतात. पण मग कधीतरी अशीदेखील वेळ येते की आयुष्य 'settle' होते आणि मग आपले ते जुने, पहिले प्रेम मान वर काढते.... आणि पति/पत्नीची 'त्या' प्रेमाला हरकत नसते, त्यामुळे मग ते जोपासलेदेखील जाते. काही मात्र माझ्यासारखे असतात, ज्यांना मुळात आपली आवड, छंदच माहीत नाहीत. म्हणजे माझा एकच प्रचंड आवडणारा असा छंद नाही. मला सगळेच करायला आवडते.
जे काम करते आहे, त्यावर माझे मनापासून प्रेम आहे. तितकेच प्रेम लेखनावर आहे. अधूनमधून कविता करतानादेखील मला तितकाच आनंद होत असतो. उत्तम कलाकृती पाहायला आवडते - मग ते नाटक असो किंवा सिनेमा किंवा मग उत्तम कलाविष्कार. सगळे सगळे आवडते आणि करूनदेखील बघावेसे वाटते. त्यातूनच गेल्या वर्षी अनुभवलेल्या एका कलाविष्काराची आवड मनात निर्माण झाली आणि लगेच प्रयत्नदेखील सुरू केला.
गेल्या वर्षी मी राजस्थानच्या सहलीला गेले होते. राजस्थानचे ऐतिहासिक महत्त्व आणि उत्तमोत्तम राजवाडे, हवेल्या हे तर नक्की पाहण्यासारखे आहे, त्याचबरोबर तिथे अनेक कलादेखील पाहायला मिळतात. त्यातलीच एक कला आहे सुंदर सुंदर मातीची भांडी बनवणे (Pottery). खरे सांगायचे तर मातीची भांडी असे म्हणून ते लोक तयार करत असणार्या, विविध आकाराच्या, कलाकुसर असणाऱ्या त्या वस्तूंना भांडी नाही म्हणावेसे वाटत. विविध प्रकारचे मातीचे दिवेदेखील ते बनवतात. मात्र हे सगळे त्याच मातीच्या रंगाचे.
त्या वस्तू बघून माझ्या मनात आले की जर या वस्तू छान रंगवल्या, तर घरातील एखादा कोपरा एकदम घराचे वेगळेपण दाखवून देईल. 'Aesthetic look' बदलून टाकेल. दिवाळीमध्ये मातीचा कंदील लावता येईल. झाले! मनात आले आणि मग मुंबईमध्ये अशा प्रकारच्या विविध आकारांच्या आणि त्यावर उत्तम कोरीवकाम असणाऱ्या वस्तूंची शोधाशोध सुरू केली. मात्र कितीही प्रयत्न केला तरी मला हव्या तशा वस्तू मुंबईत मिळत नव्हत्या. त्याच वेळी काही कामानिमित्त मी पुण्याला गेले आणि पुण्याच्या बाणेर भागात मला अगदी राजस्थानला बघितल्या होत्या तशा वस्तू मिळाल्या. अगोदर केवळ प्रयोग करून बघायचे ठरवले होते. म्हणून मग कोरीवकाम असलेली एकच फूलदाणी किंवा तसेच काहीसे म्हणता येईल अशी वस्तू घेतली. पोस्टर कलरच्या लहान बाटल्या घेतल्या आणि दोन ब्रश. घरी आल्या आल्या रंगकाम सुरू केले आणि खरेच आजूबाजूचे जग विसरले. तो अनुभवच शब्दातीत होता. जवळजवळ पाच तास मी रंगकाम करत होते. माझ्या आजूबाजूला काय चालू आहे याची मला फिकीर नव्हती. मी आणि माझी फूलदाणी इतकेच जणू काही जगात उरले होते.
त्या अनुभवानंतर मी मुद्दाम बाणेरला परत गेले आणि मग येताना गाडी भरून वेगवेगळ्या आकाराच्या आणि कलाकुसर असणाऱ्या वस्तू घेऊन आले. मी इतक्या वस्तू आणल्या आहेत की माझा नवरा घराच्या एका कोपऱ्याला अलीकडे कुंभारवाडा म्हणायला लागला आहे.
मात्र मी सगळ्यांच्या मतांकडे दुर्लक्ष करून अधूनमधून जसे जमेल तसे हे रंगकाम करत असते. माझ्या एक लक्षात आले आहे की जर तुम्ही रंगात रंगलात, तर मन प्रसन्न राहते. आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. अर्थात कदाचित आपल्याला जो छंद आवडतो, त्या छंदाचा अनुभवदेखील प्रत्येकाला हीच भावना देत असेल, असे मला वाटते. पण आता आणखी काहीतरी नवीन मिळेपर्यंत हे रंगकाम नक्की करणार आहे!
प्रतिक्रिया
14 Sep 2018 - 10:16 am | यशोधरा
वा! सुरेख रंगकाम. लेखामध्ये, कोणत्या प्रकारचे रंग वापरता, ब्रश कोणते असतात, ब्रश क्रमांक वगैरे ही माहिती पण लिहायला हवी, असे वाटते. रंगकाम कसे सुरू करता, प्राथमिक तयारी, रांगा लावायची पद्धत, स्ट्रोक्स कसे घेता, भांडे रंगवून झाल्यानंतर काय वगैरे असे सर्व लिहाल का?
माझ्यासारखी आरंभशूर एखादे भांडे तरी रंगवून पाहील!!
14 Sep 2018 - 6:32 pm | स्मिता.
मलाही हेच प्रश्न पडले. कृपया माहिती द्याल का?
मीसुद्धा अशीच फार छंद नसलेली, त्यामुळे काहीही वेगळं करून बघायला आवडतं. हे ही करून बघेन :)
14 Sep 2018 - 10:27 am | श्वेता२४
खूपच छान रंगकाम केलेय तुम्ही.
14 Sep 2018 - 10:37 am | चौकटराजा
हे दुरून तरी रॉयल प्ले मेटालिक पेन्टस वाटताहेत !
14 Sep 2018 - 10:42 am | कुमार१
आवडले. शुभेच्छा
14 Sep 2018 - 11:22 am | पद्मावति
मस्तच.
14 Sep 2018 - 12:22 pm | तुषार काळभोर
अतिशय सुंदर स्वनिर्मिती.
14 Sep 2018 - 12:23 pm | मंजूताई
ज्योती, मस्त रंगकाम!
14 Sep 2018 - 3:51 pm | कंजूस
सुरेख झालं आहे.
14 Sep 2018 - 7:03 pm | जव्हेरगंज
मस्त. आवडले!!!
14 Sep 2018 - 8:53 pm | शशिकांत ओक
जीवनात नवरंग निर्माण करून गेला... ज्योतीला ज्योतीने उजळले...
14 Sep 2018 - 9:35 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर छंद ! सगळ्या वस्तूंची रंगसंगती आवडली.
उगाच नाही म्हणत की, "आयुष्यभर मजेत रहायचे असले तर आपल्या छंदाला व्यवसाय बनवा." तुम्ही त्याच मार्गावरून चालत आहात, नशीबवान आहात !
14 Sep 2018 - 10:25 pm | पारुबाई
रंगसंगती खूपच छान आहे.
छंदांमुळे उत्साह येतो हे अगदी खरे.
15 Sep 2018 - 12:31 am | चित्रगुप्त
वा. आत दिवे लावल्यावर तर एकदमच सुंदर दिसते आहे. रंगसंगती उत्तम.
15 Sep 2018 - 8:54 am | ज्योति अळवणी
सर्वांचेच मनापासून आभार या कौतुकाबद्दल!
रंगांच्या संदर्भात सांगायचं तर मी camel चे फॅब्रिक अकॅरॅलीक रंग वापरले. अगोदर अगदी लहान बाटल्या आणल्या होत्या. ब्रश मात्र मला वाटत प्रत्येकाने आपापल्या चॉईस ने घ्यावेत. कारण नाजूक ब्रशने काम चांगले होते; पण खूप वेळ लागतो आणि कोरीव काम करायला जमतेच असे नाही. त्यातही तुम्ही कोणते पॉट घेतले आहात आणि त्यावर काय कलाकुसर आहे याने देखील फरक पडतो.
जाड ब्रशने देखील चांगले काम होते. साधारण लहान दिवे 400/500 रुपयांपर्यंत असतात. मोठ्या फुलदाण्या/दिवे हजार पर्यंत असतात. दिवाळीच्या अगोदर खूप महाग होतात. मात्र दिवाळी नंतर अर्ध्या किमतीत मिळतात. मुंबईच्या किमती पुण्याच्या मनाने जास्त आहेत. थोडं नाशिक किंवा पुण्यकडून साताऱ्याच्या दिशेने गेलात तर किमती कमी आहेत. पण ही pottry मिळणं तसं थोडं अवघड आहे; मात्र अशक्य नाही.
15 Sep 2018 - 11:14 am | फ्रेनी
खूप छान
आवडले
15 Sep 2018 - 10:04 pm | निशाचर
वा! रंगकाम खूप सुंदर दिसतंय.
15 Sep 2018 - 10:07 pm | मुक्त विहारि
मस्त...
17 Sep 2018 - 7:20 am | सुधीर कांदळकर
आवडले.
17 Sep 2018 - 3:39 pm | सविता००१
मस्त आहे रंगकाम. सगळ्या वस्तू खूप सुरेख दिसतायत
18 Sep 2018 - 10:40 am | सुबोध खरे
सुन्दर
18 Sep 2018 - 12:19 pm | अनिंद्य
@ ज्योति अलवनि,
रंगात रंगुनी साऱ्या रंग माझा वेगळा .......
DIY कल्पना आणि सादरीकरण दोन्ही आवडले.
शुभेच्छा,
अनिंद्य
18 Sep 2018 - 5:06 pm | ज्योति अळवणी
आपल्या कौतुकाबद्दल सर्वांचेच मनापासून आभार
18 Sep 2018 - 5:26 pm | टर्मीनेटर
खूप छान कलाकृती केली आहेत तुम्ही. कर्जत ते चौक फाटा ह्या रस्त्यावर ND Studio च्या पुढे मागे अशा अनेक प्रकारच्या मातीच्या सुंदर वस्तू, भांडी, सुरया, अगदी मातीचे तवे, वाईन ग्लास विकणारे दिसतात. त्यावर पण तुमचा ब्रश फिरला तर त्यांचे सौंदर्य कित्येक पटीने वाढेल हे नक्की. कधी गेलात त्या बाजूला तर गाडी थांबवून त्या बघितल्या/घेतल्या शिवाय राहवणार नाही तुम्हाला.
18 Sep 2018 - 10:23 pm | ज्योति अळवणी
अरे वा! खरच मुद्दाम जाऊन बघीन. हे रंग म्हणजे तुमच्या मेंदूला तुमच्या मनाशी जोडतात...
19 Sep 2018 - 12:09 pm | उदय के'सागर
Baner la nemaka konatya bhagat or thikani ya matichya vastu milalya?
22 Sep 2018 - 6:16 pm | Sanjay Uwach
"प्रत्येक गोष्ट करायला आवडते" हे अगदी पटल, पण जो छंद करियर म्हणून असेल तर ती व्यक्ती फारच भाग्यवान असेल. थोडक्यात धडपड्या माणूस कधीच स्वथ बसत नाही. आपण जोपासलेल्या छंद , खूपच छान आहे. शुभेच्छा.