हजारो बेटांचा देश... फिनलँड..भाग ५ (ब) स्टॉकहोम क्रुज ट्रिप

बरखा's picture
बरखा in भटकंती
6 Jul 2018 - 9:03 pm

https://www.misalpav.com/node/42878 भाग १
https://www.misalpav.com/node/42891 भाग २
https://www.misalpav.com/node/42898 भाग ३
https://www.misalpav.com/node/42906 भाग ४
https://www.misalpav.com/node/42947 भाग ५ (अ)

सकाळी उठून नाष्टा करून पुढील ठिकाणे बघण्यास निघालो. आमचा कुठेही उतरा आणि चढा या बसचा पास अजूनही शिल्लक होता. तुम्ही जेव्हा पहिली फेरी या बस मधे बसुन मारता त्या वेळेपासून पुढे चोवीसतास तो वापरू शकता. खरं तर ठिकाण बघण्याची यादी बरीच मोठी होती. सर्व काही बघणं शक्य न्हवत. मग ज्याला जास्तित जास्त पर्यटक भेट देतात अशी काही ठिकाण आम्ही निवडली. त्यातीलच एक 'वासा संग्रहालय'. हे बघायला जात असताना अनवधानाने अजून एक ठिकाण बघण झाल. ते म्हणजे 'जुनिबॅकन' जे आमच्या यादीत न्हवत. झाल अस की वासा संग्रहालय आणि जुनिबॅकन ही दोन्ही ठिकाण अगदी जवळ आहेत. आम्ही पाटी बघत जात असताना आमचा रस्ता चुकला आणि आम्ही जुनिबॅकन मधे पोहोचलो. बर तिथ गेलो तरी आम्हाला हे कळाल नाही की आम्ही चुकिच्या ठिकाणी आलो आहोत. स्टॉकहोमचा पास असल्याने तिकिट खिडकीवर तो दाखवला आणि आत जायचे तिकिट घेतले. तिथे सामान ठेवायला लॉकर असल्याने जास्तिचे सामान त्यात ठेवून आम्ही आत गेलो. तिकिट खिडकीवर सांगितले होते की येथे गोष्ट सांगणारी (स्टोरी ट्रेन) आगगाडी आहे ती नक्की बघा. आम्हाला वाटले की वासा बद्दल काही माहीती देणारी चित्रफित असावी. म्हणून आम्ही आधी यात बसायचे ठरवेल. त्या प्रमाणे रांगेत उभे राहिलो. एक लाकडी खोक हळू हळू सरकत येत होत. आपण त्या चालत्या खोक्यात बसायच, आपल्याला हवी असलेली भाषा सांगीतली की यात बसवण्यात आलेले ध्वनीयंत्र चालू होते आणि जुनिबॅकन नावाच्या मुलाची गोष्ट चालू होते. ईथे फोटो काढायला बंदी असल्याने याचे सर्व फोटो गुगलवरून घेतले आहेत.


जस जशी गोष्ट पुढे जाते आपण अगदी त्या गोष्टीत हरवून जातो. केवळ सरळ रेशेत न जाणारी ही आगगाडी आपल्याला मधेच सहा सात फूट वर उंच तर कधी जमिनिला समतल तर कधी डवी- उजवीकडे वळत या जुनिबॅकनच्या सोबत फिरवते. हा अनुभव फारच वेगळा होता. छोट्या छोट्या मुर्त्यांच्या रुपात अतिशय सुंदर अशी शिल्प तयार करून या जुनिबॅकनची गोष्ट तयार केली आहे. पण हे बघताना कुठेही आपण खोट बघत आहोत हे जाणवत नाही.
खांबावर चढलेला जुनिबॅकन ( दोन्ही फोटो गुगल वरून)

खर तर हे लहान मुलांचे वेळ घालवायचे ठिकाण आहे. पण बघण्यासारखे आहे. गोष्ट ऐकून झाल्यावर मग आम्हाला कळाले की आपण वासा मधे न येत भलतिकडेच आलो आहोत. मग पुन्हा तिकिट खिडकीवर जाऊन विचारले असता तिने वासा याच्या शेजारीच आहे असे सांगितले. तिथुन बाहेर पडून आम्ही पुन्हा वासा कडे नेणारा रस्ता बघू लागलो. समोरच एक मोठी ईमारत दिसली. आम्ही तिकडे गेलो. या वेळी आत जायच्या आधी बाहेरून नाव वाचून घेतले. ईथे बरीच गर्दी होती. आम्ही आत गेलो आणी डोळ्यांचे पारणे फेडणारे दृष्य समोर दिसले.

वासा हे एक संग्रहालय आहे जिथे ३०० वर्षापुर्वीची बोट अथवा विशाल जहाज संग्रहीत करून ठेवले आहे. याचा ईतिहास असा...
वासा हे जहाज युद्ध नौका म्हनून बनवण्यात आले होते. त्या काळात बनवल गेलेल सर्वात मोठ जहाज होत हे. या वर माणसं आणि दारूगोळा वाहून नेण्यासाठी बरीच जागा होती. या जहाजेची बांधनी पुर्ण झाल्यावर ते युद्धासाठी पाण्यात उतरवण्यात आले. तोफा, दारूगोळा, माणसं, धान्य अस बरच काही यावर चढवण्यात आल. प्रवासासाठी हे जहाज निघाले असता केवळ तेराशे मिटर अंतर जाऊन हे जहाज पाण्यात बुडाले आणि समुद्र तळाशी गेले. त्या नंतर बरीच वर्ष हे जहाज पाण्याखाली होते.
हे जहाज का बुडाले यात जरा दुमत आहे. नक्की कारण सांगता येत नाही. तरी याची दोन कारण सांगीतली जातात. एक म्हणजे जहाजाच्या क्षमतेपेक्षा जास्त वजनाच्या तोफा, दारूगोळा यावर चढवण्यात आले. दुसर म्हणजे ज्याने हे जहाज बांधले त्याला एतक्या मोठ्या जहाज बांधणीचा अंदाज न आल्याने त्याच्या कडून काही त्रुटी राहिल्या गेल्या ज्या मुळे जहाज बुडाले.

या जहाजाचा शोध घेउन ते पाण्याबाहेर काढण्याचे ठरवले गेले. याचा पहिला प्रयत्न फसला. पुन्हा एकदा जहाजाचा अभ्यास करून मग ते बाहेर काढले गेले.
पाण्यात काम करण्यासाठी त्या वेळी वापरण्यात आलेले पोषाख.

हे जहाज बघण्यासाठी जहाजेच्या दोन्हि बाजूने सात मजले बांधले गेले आहेत. प्रत्येक मजल्यावर जाउन हे जहाज बघता येते. वर जाण्यासाठी लिफ्ट आणि पायर्‍यांची सोय आहे. प्रत्येक मजल्यावर जहाजातील मिळालेले अवषेश काचपेटित ठेवले आहेत. तसेच एक चित्रफितही दाखवली जाते. अजुनही जहाजेवर काम चालू आहे. २००५ साली जहाजेच्या लाकडाला बुरशी चढू लागली. याचा अभ्यास केला असता बाहेरच्या बदलत्या वातावरणाचा परिणाम यावर होतोय असे अभ्यासकांच्या लक्षात आले. मग ईथे वातावरण नियंत्रित करण्यासाठी काही उपाय योजन केल्या गेल्या. हे संग्रहालय बघायला किमान एक तास तरी हवा.
जहाजेवर केलेले कोरीम काम बघण्यासारखी आहेत.


वासा बघून आम्ही निघालो ते रॉयल पॅलेस बघायला.
रॉयल पॅलेसचा पॅनोरमिक फोटो.

बाहेरून पॅलेस किती भव्य आहे याचा अंदाज येत होता. आम्ही आत गेलो. राजा- राणीचे जिथे लग्न झाले ते चर्च बघितले. बाकीचा राजवाडा फिरू लागलो, पण बर्‍याच ठिकाणी ईथे कॅमेरा, महिलांच्या पर्स आणि छत्र्या बरोबर नेता येणार नाहीत असे सूचना फलक होते. बर हे ठेवण्यासाठी कुठे जागाही दिसेना. एक जण बाहेर थांबून एक जण बघुन येईल असे करण्यापुरता वेळ आमच्या कडे न्हवता. कुठल्याही स्थितित दुपारी दोनवाजेपर्यत आम्हाला बंदरावर जाण्यास निघावे लागणार होते. त्यामुळे आम्ही बाहेरून पॅलेस बघण्याचे ठरवले.
पॅलेस जवळच गमला स्टान नावाची जागा आहे. हे कुठलेही संग्रहालय न्हवते. ही जागा म्हणजे जुने स्टॉकहोम. जसे पुण्यात आढळण्यार्‍या विविध पेठा. तसच काहिस हे. येथिल ईमारती ह्या अजुनही जुन्या काळातील आहेत. यांची रचना, ईथे जाणार्‍या चिंचिळ्या वाटा हे सगळ ईथ बघता येत.
जून्या ईमारती

एक गल्ली

अजुन एक

पर्यटकांची संख्या येथे जास्त असल्याने येथे अनेक रेस्टॉरंट आतील बाजूस पहायला मिळतात. जणू खाऊ गल्लीच आहे ही. ईथेच जेवायच होत पण मेनू बघता केवळ वॅफलवर भागवल आणि पुन्हा हॉटेलच्याच रेस्टॉरंट मधे जेवायच ठरवल.
याची चव फार सुंदर होती

याच परिसरात नोबेल संग्रहालय देखिल होते. पण आमच्या कडे पुरेसा वेळ नसल्याने बर्‍याच चांगल्या ठिकाणांना आम्हाला मुकावे लागले. दोन वाजत आले अस्ल्याने आम्ही हॉटेलच्या दिशेने झपाझप पाऊले उचलू लागलो. रेस्टॉरंट मधे गेलो तर ते रिकाम होत. जेवणाची चौकशी केली असता ते चालू व्हायला अजुन एक तास आहे असे साम्गीतले. आता पंचाईत झाली. जवळच दोनचार छोटेखानी रेस्टॉ. होते. तिथ जाऊन बघू असे ठरले. जवळच असलेया रेस्टॉ. मधे व्हेज सँडविच आणि फ्रेंच फ्राईज मिळाले. सँडाविच बरेच मोठे असल्याने ते लवकर संपेना. घड्याळ्याचे काटे मात्र पटापटा सरकत होते. मग ते राहिलेले सँडविच पार्सल करून घेतले आणि आम्ही हॉटेल मधून सामानाच्या बॅगा उचललया. आता बसने गेलो तर वेळ जाईल म्हणून टॅक्सीने जायचे ठरले. ती कशी बुक करायची याची चौकशी रिसेप्शनला केली असता तिनेच आम्हाला टॅक्सी बुक करून दिली.
पुढच्या दोनच मिनिटांत ती दारत हजर झाली. आम्ही आत बसलो. ईथे एक जाणवलेली गोष्ट म्हणजे रस्त्यावर वाहनांची बरीच गर्दी होती. तरीही कोणीही हॉर्न न वाजवता एका मागून एक पुढे जात होते. हे बघता आम्हाला वाटले की आता उशीर होणार. पण वेळेत बंदरावर पोहोचलो. टॅक्सी चालकाने जरा त्यात करमणूक केली. आमची बोली भाषा ऐकून त्याने ती कुठली आहे ते विचारले. याला मराठी म्हणता असे त्याला सांगीतले तसे तो मराठिच्या काही गाण्यांचा आणि सोनू निगमच्या फॅन असल्याचे कळाले. मला जरा हे ऐकून आश्चर्यच वाटले. एवढेच नाही तर त्याने काही हिंदी चित्रपट ही बघितले होते. हिंदीतिल काही गायकांंचा देखिल तो फॅन होता. त्याच्या सोबत मग जरा गप्पा झाल्या.
अगदी वेळेत त्याने आम्हाला बंदरावर उतरवले. आम्ही आत गेलो. चेकईन करून जहाजावर जाऊ लागलो. जाताना येताना बुक केलेल्या जहाजाची कंपनी जरी एकच असली तरी दोन्ही वेळेस जहाज थोडी वेगळी होती. जणु जहाजातील एल एक्स आय आणि व्हि एक्स आय मॉडेल होते हे. परतीचे जहाज अकरा मजली होते. थोड्याफार फरकाने बांधणी वेगळी होती. आम्ही रुम वर पोहोचलो. पुन्हा सामान टाकून सनडेकवर गेलो.
स्टॉकहोम बंदरावरून निरोप घेतानाचे स्टॉकहोम. आपल्या एथे लवासा या धर्तीवर बान्धले आहे.

जहाज आपला मागे सोडत चालेल मार्ग

आमचे जहाज पुढे निघाले आणि दुसर्‍या कंपन्यांची जहाज आपले बंदर सोडण्याव्या प्रतिक्षेत होती.

जहाजावरून दिसणारे टुमदार घर

अजुन एक जहाज वाटेत दिसले

या वेळीही आम्ही जातानाचे जेवण आधीच घेऊन ठेवल्याने दिल्या वेळी तिथे पोहोचलो. खायला काही मिळ्णार नाही हे माहितच होते, पण पोटात काही जाणेही महत्वाचे होते. या वेळीमात्र जेवताना बरीच गर्दी होती. शे- दिडशे माणस असावित. या ठिकाणी समुद्रीअन्न आवडण्यार्‍यांची खरच चंगळ आहे. आम्ही आपल गोडाच जेवण उचलून दिलेल्या टेबलवर जाऊन बसलो.
आमचे जेवण

मुलाने पार्सल आणलेले खाल्ल्ले असल्याने त्याला काही भुक न्हवती तो खेळायला निघुन गेला. मी मात्र आजुबाजुच्या लोकांचे निरिक्षण करू लागले. सवय जरा वाईट आहे पण नाईलाज होता. ईकड तिकड बघण्याशिवाय काहीच करता येत न्हवत. या निरिक्षणात आढळलेल्या काही गोष्टी
ईथले लोक खरच खादाड खाऊ आहेत की केवळ पैसे भरलेत आणि येऊद्या मग हवे तेवढे अस म्हणून ताट भरून भरून आणत होती
सगळ्याच टेबलांबर प्रॉनचा ढिगारा झाला होता. बर ते लोक हे खाताना मला उगा आपल्या भाजक्या आणी उकडलेल्या शेगांची आठवण झाली. जसे आपण शेंगेचे नाक मोडत आतील दाणे खाऊन फोलपट साचवतो अगदी तसेच हे लोक प्रॉन सोलून खात होते आणि टेबलावर ढिगारे करत होते.
मनोसक्त प्रॉन खाऊन झाल्यावर यांचा मोर्च्या वळतो तो पोर्क, बीफ अश्या केवळ वाफवलेल्या अथवा कच्च्या अन्नाकडे. जास्त करून हे सगळ अन्न बर्फाच्या लादीवर ठेवून गार ढोण्ण केलेल. ( आपल्याला म्हणजे गॅस वरून उतरवल की पोटात अशी खायची सवय)
हे ही मनोसोक्त खाऊन झाल की मग गोडाकडे. तेही पुन्हा भरपेट, नावापुरत वगैरे काही नाही. जणू ठेवलेले सर्व पदार्थ पोटात गेलेच पाहिजे.
बर या सगळ्याच्या जोडीला द्रवपदार्थ म्हणुन बिअर, वाईन, सोडा, व्हिस्की यांचे नळच लावले होते. ग्लास घायचा आणि नळाखाली हव्या तितक्यावेळा तो भरून घ्यायचा.
हे सगळ बघून मलाच लाजल्यासारख झाल आणि मी चार वेळा उठून मोजक्याच दोन दोन स्ट्रॉबेरी आणल्या.
जेवण करून आम्ही मुलगा जिथे खेळत होता तिथ गेलो. या वेळी आम्हाला एक भारतीय कुटूंब भेटल. नवरा- बायको आणी दोन मुल. त्यांनी बर्‍याच वेळा या जाहाजेवरुन प्रवास केला होता. नवर्‍यापेक्षा त्याच्या बायकोला जहाजेची अधिक माहिती झालेली होती. तिच्याकडूनच कळाले की जहाजेवर मुलांसाठी दर काही तासाने वेगवेगळे कर्यक्रम ठरवलेले असतात. त्यात हातचलाखीचे छोटे छोटे प्रयोग यांना शिकवले जातात, एक स्पर्धा घेतली जाते ज्यात जहाजेसंबधिच्या प्रश्नांची उत्तर त्यांना द्यायची असतात. जादूचे प्रयोग, बाहुलीनाट्य असे कार्यक्रम योजलेले असतात. मग मुलगा त्यांच्या मुलासोबत हे सगळ अनुभवायला गेला आणि आमच्या गप्पा सुरू झाल्या.
जहाजवर बाहुलीनाट्याचा आनंद घेताना

हातवर टॅटू काढताना

अशा प्रकारे माझ एक स्वप्न पुर्ण झाल.

प्रतिक्रिया

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Jul 2018 - 10:30 pm | डॉ सुहास म्हात्रे

स्टॉकहोममधल्या फेरफटक्याचा हा भाग खास आवडला. पुभाप्र.

काही फोटो दिसत नाहीत... बहुतेक त्यांना "पब्लिक अ‍ॅक्सेस" दिलेला नाही.

अनिंद्य's picture

7 Jul 2018 - 6:32 pm | अनिंद्य

फोटो अगदी 'अहाहा' कॅटेगरी आहेत !

पु भा प्र.

दुर्गविहारी's picture

7 Jul 2018 - 11:26 pm | दुर्गविहारी

मस्तच झालाय हा भाग. आवडला. काही फोटो दिसत नाहीत. पुन्हा लिंक करा. बाकी ज्ञानेश्वर माउलींची मराठी तिथेही पोहचली याचा आनंद झाला.

बरखा's picture

9 Jul 2018 - 4:45 pm | बरखा

मला पुर्वपरीक्षणात आणि लेख प्रकाशीत केल्यावर सगळे फोटो दिसत आहेत. त्या मुळे नेमके कोणते फोटो दिसत नाहीत ते कळत नाही. कोणी ते निदर्शनास आणून दिल्यास बदलण्याच प्रयत्न करेन.
प्रतिसादांसाठी धन्यवाद.

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Jul 2018 - 9:23 pm | डॉ सुहास म्हात्रे

वरून मोजले तर पुढील क्रमांकांचे फोटो दिसत नाहीत... १०, १४, १७, १८, २०,२२.

आपले फोटो जेथे साठवले आहेत तेथे लॉगइन असताना तर इतर कोणत्याही संस्थळावर दुवे दिलेले आपले फोटो स्वतःला दिसतात.

तुमचे फोटो जेथे साठवले आहेत (उदा: गुगलफोटो) तेथून लॉगऑऊट होऊन (पक्षी : आपल्या फोटोंसाठीही स्वतःला 'पब्लिक' बनवून) मग मिपा उघडले तर ज्या फोटोंना "पब्लिक अ‍ॅक्सेस" नाही ते फोटो दिसत नाहीत.

प्रचेतस's picture

10 Jul 2018 - 5:37 pm | प्रचेतस

खूपच भारी

संपूर्ण लेखमाला अतिशय वाचनीय व प्रेक्षणीय झाली आहे. सर्व प्रकाशचित्रे आकर्षक.