हजारो बेटांचा देश...... फिनलँड.... भाग १

बरखा's picture
बरखा in भटकंती
25 Jun 2018 - 7:14 pm

अगदी सुरुवातीपासून सांगायचे झाले, तर नवरा कामानिमित्त फिनलँड येथे गेला आणि मग आमचे, म्हणजे माझे आणि मुलाचे तिकडे जाण्याचे ठरले. तयारी सुरु झाली. नवर्‍याची कंपनी जरी सगळ करणार होती तरी एवढा लांबचा प्रवास एकटीने करण्याचे धाडस मलाच करायचे होते. आता तुम्ही म्हणाल त्यात एवढ काय? पण माझ्या बाबतीत खरी गंमत ही की माझा आणि ईंग्रजी भाषेचा शाळेत असल्यापासून छत्तीसचा आकडा आहे तो अजूनही आहे. त्यात पुण्याच्या डेक्कन परिसराहून अधिक लांब कुठेच एकटी फिरले न्हवते. त्यामुळे माझ्या समोर पहिला प्रश्न होता तो एकटीने प्रवास करण्याचा आणि व्हिसा ऑफिस मधे समोरच्या माणसा बरोबर मी काय आणि कसे बोलणार याचा. फिनलँडचे व्हिसा ऑफिस दिल्लीला होते. सगळ्या कागदपत्रांची पुर्तता करून आम्ही व्हिसा साठी दिल्लीला गेलो. सर्व तपासणी करून आम्हाला आत सोडण्यात आले. पुढच्या काही मिनिटांतच आमचा नंबर आला तशी माझी धड धड वाढू लागली. आम्ही समोरच्या खुर्चीत जाऊन बसलो. काही वेळातच एक माणुस काचेच्या पलीकडून आमच्या समोर येऊन बसला. एक माईक त्याच्या कडे आणि एक माईक आमच्या कडे, दोघांच्या मधे जाड काच, त्या काचेखाली बारीक फट, त्या खाली एक सरकता ट्रे. जेमतेम एखदा जाड कागदांचा गठ्ठा त्या फटीतून जाऊ शकेल ईतकीच तीच्यात जागा. मी कागदपत्र काढुन तो माणूस काय बोलणार हे कान देऊन ऐकायला तयार झाले आणि काय आश्चर्य..... समोरचा माणुस चक्क माझ्याशी हिंदीत बोलला. त्या क्षणी मला काय तो आनंद झाला.... त्याचे मी वर्णनच करू शकत नाही. मग माझी धड धड लगेच कमी झाली आणि तिथले सगळे सोपस्कार संपवून आम्ही परत आलो. आता व्हिसा मिळेपर्यत वाट बघावी लागणार होती.
व्हिसा येईपर्यन्त मी जाण्याआधिची सगळी काम संपवण्याच्या मागे लागले. जवळ जवळ एक महिन्यानी व्हिसा मिळाला. आमची जाण्याची तारीख ठरली. फ्लाईट सर्च झाले. यात पुणे- दिल्ली, दिल्ली- हेलसिंकी असे फ्लाईट होते. ज्यात दिल्ली विमानतळावर जवळ जवळ बारा तास पुढच्या विमानाच्या प्रतिक्षेत काढावे लागणार होते. तर आणखी एक म्हणजे मधे मधे एक दोन तासांचे दोन थांबे असलेले अजुन एक फ्लाईट होते. आता प्रश्न होता तो मधे मधे थांबे असलेल फ्लाईट घ्याव कि डायरेक्ट फ्लाईट घ्याव याचा. थांबे असलेल्या विमानात जास्त सामान नेण्याची सोय होती. तर डायरेक्ट फ्लाईट मधे कमी वजनाचे सामान न्यावे लागणार होते. पण माझी ईग्रजीशी असलेली गट्टी बघता बायको हरवली विमानतळावर असे व्हायला नको म्हणुन नवर्‍याने डायरेक्ट फ्लाईटच घेतले. दोनचार वेळा सामानाच्या बॅगा काढून भरून झाल्या तरी विमानाच्या ठरवून दिलेल्या वजनात त्या काही बसेनात. शेवटी आवश्यक असलेल सामान कुरिअरने पाठवून दिले.
आम्हाला निरोप द्यायला नातेवाईक मंडळी आली होती. मला तर जणू पुन्हा माझी पाठवणी करताहेत की काय असेच वाटत होते. कारण सगळ्यांचे डोळे पाणावले होते.
( असे नातेवाईक मिळायला भाग्यच लागत. उगा नजर लवू नये ;) ) पुणे ते दिल्ली प्रवास पार पडला. दुसर्‍या विमानाला बराच वेळ असल्याने आम्हाला सगळ सामान परत घेऊन चेक ईन कराव लागणार होत. तस सामान घेऊन आम्ही पुढच्या विमानाच्या जागी जाऊन बसुयात अस ठरवल. तिथ गेल असता कळाल की बसायला अजीबातच जागा नाहीये. लोक परत बाहेर येऊन बसत होते. मी मात्र एकदा बघुन तर याव म्हणुन आत गेले, तर अगदी एस टी स्टॅडवर आल्यासारखच वाटल मला. सगळीकडे लोकांचा चिवचिवाट. जिथे जागा मिळेल तिथे सामान टाकून लोक पसरले होते. मी आमच्या विमानाची चौकशी केली. चेक ईन चालू व्हायला बराच अवकाश होता. मी बसायला जागा शोधू लागले. दोनच खुर्च्या रिकाम्या असलेलया माझ्या नजरेस पडल्या. तस मुलाला पळत जाऊन त्या पकडायला सांगितल्या. मी सगळ सामान घेउन त्याच्या मागे गेले. आता या ठिकाणी आम्हाला दहा ते बारा तास काढायचे होते. वेळ रात्रीची होती. नीट झोपताही येत न्हवते. शेवटी मुलाला हाताची उशी करून दिली आणि मी विमानतळावरील गंमत न्याहाळू लागले.( आता जर मला कोणी 'विमानतळावर दोन तास' या विषयावर निबंध लिहायला सांगीतला असता तर नक्कीच पैकीच्या पैकी मार्क मिळवले असते.) सकाळ होत आली तशी आमची चेक ईन ची वेळ जवळ आली तस मुलाला उठवून मी फ्रेश होऊन आले. आमच काऊंटर अजुन कूठेच सुरू झालेल दिसेना, म्हणुन चौकशी केली असता कळाले की विमान सहा तास उशीराने सुटणार आहे. म्हणजे पुन्हा ईथे सहा तास काढावे लागणार होते.
दुसरा काही पर्याय नसल्याने आम्ही पुन्हा खुर्चीत जाऊन बसलो. आता निदान बसायला बरीच जागा झाली होती. आम्ही जागा बदलून बसलो. हा ही वेळ सरला चेक ईन सुरू झाल बॅगा गेल्या. तस हायस वाटल. मधून मधून नवर्‍याला बातम्या पोहोचवण चालू होत. विमानाची वेळ झाली आम्ही गेट पाशी जाऊन थांबलो. काहीवेळातच विमानात जाऊन बसलो. मला झोप येत असल्याने मी झोपायचे ठरवले. काही वेळाच्या झोपेने जरा तरतरी आली. खिडकीतून सहज खाली बघितले असता अनेक लहान लहान पाण्यानी वेढलेली बेट दिसायला लागली. या बेटांच्या बाजूला कही ईमारती. काही वेळातच आम्ही हेलसिंकी विमानतळावर उतरलो. बाहेर नवरा स्वागतासाठी उभाच होता. मला एखादा किल्ला सर केला अस झाल होत. नवर्‍याला बघताच मी सुटकेचा श्वास सोडला.
ईथे आहे तोपर्यन्त आजूबाजूच जमेल तस बघायच ठरवल आहे. पुढ्च्या भागांमधे भेटी दिलेल्या ठिकाणांची माहीती मला जशी माहीती मिळाली आहे तशी देण्याच्या प्रयत्न करणार आहे. सगळ्यात पहिले आम्ही बघितला तो सुओमेनलिना (suomenlinna) समुद्री किल्ला. याची माहिती पुढील भागात.

प्रतिक्रिया

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Jun 2018 - 8:16 pm | डॉ सुहास म्हात्रे

अरे वा ! सुरुवात तर छान झाली. बर्‍याच फोटोंसह तुमच्या भटकंतीचे सविस्तर वर्णन टाका. आम्ही सरसाऊन बसलो आहोत.

निशाचर's picture

26 Jun 2018 - 3:21 am | निशाचर

पुढिल भागाच्या प्रतीक्षेत.

एस's picture

25 Jun 2018 - 11:27 pm | एस

पुभाप्र.

अर्धवटराव's picture

26 Jun 2018 - 12:43 am | अर्धवटराव

पुभाप्र

रायनची आई's picture

26 Jun 2018 - 12:22 pm | रायनची आई

मस्त सुरूवात झाली..
तुमच्या मुलाने बरे एवढे तास विमानतळावर काढले..आमचा असता तर चुळबुळ करत राहिला असता नाहीतर विमान कधी सुटणार म्हणून प्रश्न विचारून विचारून हैराण केल असतं..

अनिंद्य's picture

26 Jun 2018 - 12:29 pm | अनिंद्य

वा वा

फिनलँड थोडा अपरिचित आहे, त्यामुळे पुढील भागांची उत्सुकता लागून राहिली आहे.
भरपूर फोटोंसह पुढील भाग टाका.

- अनिंद्य

वरुण मोहिते's picture

26 Jun 2018 - 3:17 pm | वरुण मोहिते

लिहीत राहा. वाचतोय

जेम्स वांड's picture

26 Jun 2018 - 4:48 pm | जेम्स वांड

उत्तम शैली , लिहीत राहा वाट पाहतोय, भरपूर फोटोज ऍड कराल.

पाटीलभाऊ's picture

26 Jun 2018 - 4:17 pm | पाटीलभाऊ

पुभाप्र

टर्मीनेटर's picture

26 Jun 2018 - 7:33 pm | टर्मीनेटर

छान सुरुवात. वर अनेक मान्यवरांनी सांगितल्या प्रमाणे फोटो भरपूर टाका. हटके डेस्टीनेशन असल्यामुळे उत्सुकता आहे.

तुषार काळभोर's picture

26 Jun 2018 - 9:36 pm | तुषार काळभोर

वेगळ्या प्रदेशाची भटकंती!! चिक्कार फोटो टाका!!
(आम्ही हापिसात फुकट अन घरी अनलिमिटेड डेटा असलेला प्लॅन वापरतो)

यशोधरा's picture

27 Jun 2018 - 8:00 am | यशोधरा

मस्त लिहिताय.

सोमनाथ खांदवे's picture

27 Jun 2018 - 6:13 pm | सोमनाथ खांदवे

वाचतांना पु. ल . चीं आठवण झाली हो !!!!
छान लिवलंय , आता यवू द्या फटा फट .