छोटा बाहुबली
छोटा बाहुबली
-----------------
माझी लाडकी खाट अगदी खिडकीजवळ आहे . तिच्यावर बसायचं अन बाहेर पहात राहायचं . केसांमध्ये बोटं घालून गोल फिरवत . हा माझा आवडता उद्योग . काय मस्त वाटतं ! लांबवर नजर जाते . समोर नुसतं मोकळं माळरान आहे आणि निळं निळं आकाश . जोडीला भरभरणारा भन्नाट वारा !
आमचं घर मला खूप आवडतं . मोठं. मातीचं.बैठं . भरपूर अंगण असलेलं . खूपखूप जुनं ! अगदी माझ्या नऊ वारी नेसणाऱ्या , थकलेल्या आजीसारखं ! ते अगदी एकटं आहे . गावापासून लांब. आजूबाजूला एकही घर नाही. तशी वस्ती आहे. पण जवळ नाही . आई - अप्पा शेतात जातात . शेत लांब आहे घरापासून .