सहजिवनात आली ही .....

टारझन's picture
टारझन in जनातलं, मनातलं
15 Jun 2009 - 2:42 am

णमस्कार्स लोक्स ,

गोष्ट आहे साधारण नऊ दहा वर्षांपुर्वीची .... दहावीत असेल .. नुकतंच मिसरूड फुटू लागलं होतं ... आणि सारख "कुछ कुछ होता है" असं वाटत होतं .. नक्की काय होतंय का होतंय हे कळायची अक्कल नव्हती .. आणि जरी बडबड्या स्वभाव असला तरी काही गोष्टी कोणाबरोबर बोलण्याची सोय नव्हती .. ते केवळ शारिरीक आकर्षण नव्हतं एवढं खरं .. त्याच्या कितीतरी पुढचं होतं ते .. मन कोणाच्या तरी शोधात होतं .. कोण ? स्वप्नसुंदरी ?

त्यावेळी एक मराठी सिनेमा पाहिलेला .. नाव नाही आठवत .. त्यात एक अत्तिशय सुंदर गाणं होतं .. "सहजिवनात आली ही स्वप्नसुंदरी"
हे गाणं त्यावेळी एवढं आवडलं एवढं आवडलं की झोपेतही हे गाणं वाजत रहायचं .. आईला काळजी वाटायला लागली .. आईनं नजर काढली तर बाबा म्हणाले ह्याची नजर काढायची गरज नाही .. मला त्यामुलीची काळजी वाटतेय जिच्यासाठी आपले युवराज गाणी म्हणतात .. मी ओशाळलो ... गावाबाहेर गेलं की एक टेकडी होती .. बाकी सगळीच हिरवळ असायची .. संध्याकाळ झाली की सुर्यास्त केवळ अप्रतिम दिसे .. तिथेच मी माझ्या स्वप्नसुंदरीची स्वप्न पहात तासंतास बसत असे .. एकटाच .. मळ्यातनं गुरं वळनारे लोकं त्यांच्या कळपाला घेउन घराकडे परतंत .. कोणी ओळखीचा भेटला की "आरं ए लका .. घरला न्हाय जायचं का ?" म्हणून आरोळी टाकायचा .. त्याला माझं उत्तर अपेक्षीत नसायचंच .. तो आपला रेडिओ चा ठोकळा कानाजवळ धरून णॉइजमिश्रीत गाणं ऐकन्यात मग्न असे. मी एकवात त्यांच्या कडे लूक टाकायचो आणि मनात विचार करायचो ... काय ही भावना आपल्यालाच आहे ? ह्याला दिवसभर गुरं वळणे .. अन घरी जाउन भाकरी खाउन तानुन देणे ह्या पलिकडे कधी विचार करताना पाहिला नाही .. सुर्याला शेवटपर्यंत नजर देउन मी घरी निघत असे. कोणासाठी तरी मन कासाविस होत असे ... फार फार .. एक पोकळी भासायची .....

फार चाळाचाळ केल्यावर माझ्या मनातलं चित्र मला सापडलं .. अगदी असंच होतं असं काही नाही .. पण बरंचसं असंच ..

कुठे तरी लांब अंदमान निकोबारच्या बेटावर एकादा समुद्रकाठ .. मावळतीकडे निघालेला सुर्य .. त्या प्रकाशाचं एखाच्या वॉटरकलरने रंगवल्याप्रमाणे छटा प्राप्त आकाश .. कसं ही मुक्तहस्त ... चित्रात माझी जागा ऑफकोर्स फिक्स असे... शेजारी जरी म्हैस चरत असली .. तरी विचारात समाधी लागलेला मी ... आणि शेजारी .. माझी स्वप्नसुंदरी .. वरचं चित्र मनात इतकं पक्क होतं की मी बर्‍याचदा एकच स्वप्न पहात असे .. नुसते तिचेच विचार मनात असंत .. त्यावेळचं मन फारंच चंचल आणि अपरिपक्व असतं ..नक्की काय हवंय हे कळण्यासाठी फारच लहान .. टेकडीवरच्या मोठ्या दगडावर बसून मी ....मनातल्या समुद्रकिणारी तिला बाहुपाशात घेऊन तासंतास तिच्या डोळ्यात पहात बसलोय असली स्वप्न रंगवायचो .. ती कशी दिसते माहीत नाही .. पण ती फारंच सुंदर आहे .. अगदी सगळ्या पिक्चरच्या नट्या तिच्यासमोर फिक्या पडाव्यात अशी .. उंचं बुटकी काळी की गोरी ? निराकार प्रतिमा माझ्या मनातली .. माझी स्वप्नसुंदरी ..... तिच्याशी हव्वं ते हव्वं तेवढं बोलेन .. तिच्यासाठी कसलेही पुचाट जोक्स करून तिला हसवू .. तिच्या गालावर पडणारी खळी वेड्यागत एकटक पाहील .. तिच्या रेशमी गालांना स्पर्श करतांना नक्की कसं बरं वाटतं ? तिच्या डोळ्यांत फक्त आपलीच प्रतिमा आहे ही भावना नक्की किती सुख देते बरं ? तिनं माझ्यासाठी खास आवडते म्हणून तिनं खास माझ्यासाठी बनवलेली बटाट्याची भाजी आणि चपाती आणलीये (ए कोण हसतोय रे ? ) आणि ती तिच्या हातानं मला खाउ घालते आहे .. आणि मी नक्की काय खातोय हे माहित नाही .. नुसता जबडा हलतोय आणि मी तिच्या डोळ्यात अखंड बुडालोय .. हळूच तिला म्हणतो .. आता हे चाऊन पण देना .. जबडा दुखतोय गं तु चपातीत गव्हाऐवजी मैद्याचं पिठ टाकलंयेस बहुदा .. त्यावर तिचं मौन .. तिच्या आवाजात एक प्रकारची जादूच .. तिचं हसणं समुद्राच्या लाटांसारखं अगदी लयबद्ध .. आणि तो गोड आवाज .. कोण आहे ती ? स्वप्नसुंदरी ?

काय गं ? किती उशीर ? गेले तिन तास झाला मी येड्यागत वाट पहात बसलोय ... ... तु कुठे आहेस ? अगं बोल ना ? अगं बोल ? भयंकर चिडलोय मी ..

त्यावर तिनंच हलकेच माझ्या मानेला पकडून अलगद ओढलं ... आणि माझ्या ओठांवर आपले ओठ टेकवले .. क्षणार्धात सर्व ब्रम्हांडांची ट्रिप झाली.... आकाशातले रंग लाल,सोनेरी, पिवळे , निळे करडे .. सगळ्या छटा एकापाठोपाट बदलल्या सारखा भासला .. शरीरात एक विज सळसळली .. हळूच एक वार्‍याची झुळूक आली तसं गालांना गार जाणवलं .. बहुदा डोळ्यांतून काही ठिपके नकळत सांडले होते.. तसाच मी एकटक पहात होतो तिच्याकडे .. पहिला स्पर्ष ... हो .. पहिलाच ... माझा राग ? तो कधी आला होता ? काळ थांबवता आला असता तर कित्येक युगे तो क्षण तिथंच अनुभवा असं वाटत होतं .. तसं ही तिचं उशिरा येणं नेहमीचंच असायचं .. कदाचित तिला भेटण्याच्या उत्सूकतेने मी लवकर जात असेल ... ती आली की माझं रागावण्याचा पहिला चॅप्टर असे .. मग तिचे एक्स्क्यूज देणं सुरू झालं की मी "बास्स... काही बोलू नकोस ... " म्हनून तोंड फिरवून बसे .. आणि मग मला हवं ते न सांगताच मिळत असे ..

ती ,चल ना .. ह्या वाळूवरून थोडं दुरवर चालूयात ... चपला इथेच ठेव .. मजा येते समुद्रकाठी आनवानी चालायला .. मला थोडं बोलायचंय ..

अगं हो बोल ना !! अतिशय महत्वाचा प्रश्न आहे ... "बोल ना" मी घशात व्याकुळता आणून तिला बोलतं करण्याचा प्रयत्न करतो ... तीचा चेहरा अगदीच निर्विकार .. मी हजारदा प्रयत्न करूनही कोणताच तर्क लावू शकत नाही ..
त्यावर ती उदास चेहरा करते ... इकडे मी थोडा घाबरतो .. बराच बावरतो .. तिचा चेहरा गंभीर होतो .. ती म्हणते .. मला शेवटचं सांग ... मी , "अगं बोल ना पटकन् .. का छळतेस ? " ती म्हणते ,, सांग .. "मेलेडी इतनी चॉक्लेटी क्यो है ? " आणि जोरजोरात हसत पुढे पळते .. मी ओशाळतो .. कारण ह्या आधी हाच सिन मी तिच्य सोबत केलेला असतो .. मी ही तिला पकडण्यासाठी तिच्या मागे पळतो ... संध्याकाळ होते .. सुर्य क्षितिजापार जातो .. आणि अंधार पडतो .. आणि मी स्वप्नातून बाहेर येतो .. तिचा निरोप अगदी नेहमी प्रमाणे रहातो ... उद्या येशील का लवकर ? असं विचारायला वेळच मिळत नाही .. मी आहे त्यात खुष असतो .. घरी येतो तर आई नं बटाट्याची भाजी केलेली असते .. मी जाम खुष होतो .. गालातल्या गालात हसत मी गाणं गुणगुणत असतो .. "सहजिवनात आली ही स्वप्न सुंदरी ... " आईच्या भुवया उंचावतात ... पण आई काही बोलत नाही .. रात्री बाबांना सगळा रिपोर्ट मात्र जातो ..

असाच बरीच वर्ष स्वप्नात जगलो .. पोरींबरोबर बोलण्याचा पोलियो झाला असल्याने स्वप्नसुंदरी आयुष्यात उतरणं तसं ही कठिणंच होतं ... जसा टाईम गेला तसं कधी कोणी आवडायची .. पण ती माझ्या स्वप्नसुंदरीच्या फ्रेम मधे फिट नाही बसायची .. मी आपलं "जाने क्या होगा रामा रे ? ,... जाने क्या होता मौला रे ..." म्हणत दिवस मोजायचो ... शेवटी देवानं जास्त परिक्षा पाहिली नाही ... स्वप्नसुंदरी प्रत्यक्षात उतरवून तो मोकळा झाला ...
स्वप्नातले क्षण तिने मला जसे च्या तसे मला दिले .. त्याबद्दल लाइफ मधे कधी नाही त्या एका बाबतीत मी स्वतःला लकी समजतो .. What do I want from the life ? What comes till end with me ? Its only my dreamgirl !!

अशाच एका स्वप्नवत प्रसंगात ऐन टायमाला कोण बिपिन काका फोन करतात .. प्रेमी यूगुलाची तपश्चर्या भंग करतात .. आणि अनपेक्षित पणे टार्‍याला सापडलेला पाहुन .. फोन वर विकट हास्य करतात !! त्यांचा ह्या ठिकाणी कडक शब्दांत जाहिर निषेध करण्यात येत आहे

जाहीरात : अपकमींग शेंशेशणल लेख .... "माझे प्रेमाचे ३ पोपट " लवकरच कमींग सुन

जीवनमानप्रकटन

प्रतिक्रिया

अनामिक's picture

15 Jun 2009 - 2:58 am | अनामिक

अगदी ओघावत्या शब्दात मांडलायेस लेख... फोटूमुळे अजून आकर्षक झालायं.

-अनामिक

अनिल हटेला's picture

15 Jun 2009 - 3:08 am | अनिल हटेला

टार्‍या कडून असल्या लेखाची अपेक्षा नव्हती......
( असल्या म्हणजे इतक्या सरळ आणी प्रेमळ शब्दाची)
त्यामुळे थोडासा इमेजला धक्का बसल्या सारखे वाटले....असो....
अपकमींग पोपटाच्या प्रतीक्षेत.....;-)

(पोपटशिरोमणी) :-D
बैलोबा चायनीजकर !!!
I drink only days ,which starts from 'T'...
Tuesday
Thursday
Today ;-)

नंदन's picture

15 Jun 2009 - 3:04 am | नंदन

लिहिलंय टारूभाऊ. एकदम दिल से आणि ओघवत्या शैलीत.
शेंशेशणल लेख येऊ दे लवकर.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

अनामिक's picture

15 Jun 2009 - 3:15 am | अनामिक

हो.. आणि त्यातले फोटू मात्र तुझेच असू दे रे... :)

-अनामिक

घाटावरचे भट's picture

15 Jun 2009 - 6:04 am | घाटावरचे भट

ऐसेच बोल्ता...

टारु खरं सांगू तुझ्याकडून अशा लेखाची मुळीच अपेक्षा नव्हती! मला वाटलं पुन्हा धुतलंस कोणत्यातरी एक ओळिच्या धाग्याला!! माहीत आहे तू काय म्हणशील, कानफाट्या नाव पडले म्हणून कोणी खरं मानत नाहीत तुझ्या भावनांना. पण असं नाहीये, खरंच सांगतो. तुझा लेख एक नंबर झालाय, एकदम मनापासून, अगदी प्रामाणिक! हॅट्स ऑफ!!
(खुद के साथ बातां : रंग्या, टारुने असे प्रेमळ लिखाण करणे म्हणजे डब्ल्यूडब्ल्यूएफ खेळणार्‍या रॉकने एकदम भिकारसावकार खेळावे तसे झाले! ;)

(सावकार)चतुरंग

प्राजु's picture

15 Jun 2009 - 5:09 am | प्राजु

माझा पोपट झाला की रे! काहीतरी हास्यकल्लोळ करणारं वाचायला मिळेल या अपेक्षेन आले आणि पहाते तर काय.. चक्क टारूभाय आपली प्रेम कथा तेही "वो प्यार.. प्यार ही क्या जिसमें दर्द ना हो, एहसास ना हो , इंतजार ना हो.." च्या ष्टाईल मध्ये लिहिते झालेले आहेत.
वाह! देव आपणांस अशीच सद्बुद्धी देवो. लवकर गोड बातमी दे रे लग्नाची. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

अवलिया's picture

15 Jun 2009 - 6:39 am | अवलिया

छान पैकी टोकाची वात सोलुन हळुच उदबत्तीने फटाका पेटवावा....
जरा दुर जावुन "धऽऽडाऽऽऽऽऽम ....." असा आवाज येईल या अपेक्षेने कानावर हात गच्च दाबुन घ्यावे....
आणि प्रतिक्षा करावी ......
सर सर... वात जळत असते...
आत्ता.... मग.... आत्ता.... मग ...
आणि....
कुठलाही आवाज न करता तो फटाका हळुच आकाशात जावा...
आणि नयनमनोहर रंगांची उधळण त्यातुनत व्हावी...
ती बघतांना कानावरचे हात काढुन घ्यायचे भान राहु नये ...
की विस्फारलेले तोंड बंद करायचे विसरुन जावे...
बास ! असेच काहीसे झाले रे तुझा हा लेख वाचतांना ....
जियो !!!!

--अवलिया

तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त
खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त
सौजन्य - प्राजु

भाग्यश्री's picture

15 Jun 2009 - 11:11 am | भाग्यश्री

अगदी सहमत!!
आवडला लेख!

http://www.bhagyashree.co.cc/

शाहरुख's picture

15 Jun 2009 - 12:23 pm | शाहरुख

अवलिया साहेब, प्रतिक्रिया आवडली..

संदीप चित्रे's picture

15 Jun 2009 - 7:26 pm | संदीप चित्रे

१००% सहमत..

केवळ_विशेष's picture

23 Jun 2009 - 11:23 am | केवळ_विशेष

पावरबाझ प्रतिक्रिया... :)

टारझनभौ, लै बेष्ट

संग्राम's picture

2 Dec 2009 - 8:00 am | संग्राम

जितका सुंदर लेख ..तितकीच सुंदर प्रतिक्रिया !!!
मस्तच ....

सहज's picture

15 Jun 2009 - 7:11 am | सहज

"तूणे भी प्यार किया" फेम टारमानखान :-) लेख छान आहे.

पुढच्या लेखाच्या प्रतिक्षेत.
:-)

क्रान्ति's picture

15 Jun 2009 - 8:28 am | क्रान्ति

टारु मस्त लिहिलास लेख. अगदी मनातलं आणि मनापासून आलंय! खूप आवडला. :)

क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा

नीधप's picture

15 Jun 2009 - 9:47 am | नीधप

वरच्या सगळ्यांना +१

- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

Nile's picture

16 Jun 2009 - 11:08 pm | Nile

यांना +१. :)

"टारझनीण बाईन्चा" फोटु दाखवा बरे आम्हास्,,,,,त्यान्च्यामुळेच आपल्यात हा एवढा मोठा बदल झालेला दिसतोय,,,, लवकर लिही रे "पोपट"

नेहा

सायली पानसे's picture

15 Jun 2009 - 10:21 am | सायली पानसे

मस्तच लेख रे....
फोटो तर लई भारी.... जमल तर त्यातला एकाचे चित्र काढुन टारझन आणी जेन अस नाव देउन देइन हो तुला भेट.
खुपच मस्त आहे लेख.

कपिल काळे's picture

15 Jun 2009 - 10:36 am | कपिल काळे

जबहरया. रे टारया.
टारु कडून असला लेख-- एकदम खुर्चीतून उडालो!!

मराठमोळा's picture

15 Jun 2009 - 10:43 am | मराठमोळा

मस्त....
मांडलेल्या विचांराना दृष्यजोड देण्याची कल्पना एकदम भारी!!
लेख एकदम रोमँटीक आणी तो पण टारझण शैलीत. काँबिनेशन आवडले.. :)

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

पर्नल नेने मराठे's picture

15 Jun 2009 - 10:48 am | पर्नल नेने मराठे

मस्त....
लेख एकदम रोमँटीक
चुचु

नितिन थत्ते's picture

15 Jun 2009 - 10:52 am | नितिन थत्ते

मस्त.
(टारझणभौंचं काय खरं दिसेना झालंय, जेणवहिणी भेटलेल्या दिसतात)

खराटा
(रंग माझा वेगळा)

निखिल देशपांडे's picture

15 Jun 2009 - 11:12 am | निखिल देशपांडे

मस्त लिवलस रे टार्‍या....
काही तरी हि& हि लिहिले असेल असे विचार करत लेख उघडला... एकदम मस्त धक्का दिलास रे

==निखिल

परिकथेतील राजकुमार's picture

15 Jun 2009 - 11:27 am | परिकथेतील राजकुमार

काय लिवलयस काय लिवलयस र टार्‍या !!

टार्‍या हे काय झाले रे बाबा अचानक तुला ? मुंबईचे हवा पाणी मानवत नाहिये का तुला ? का त्या राजाच्या संगतीने होतय असे ?

असो, टार्‍या फक्त हि & हि नाही तर सुंदर आणी हळुवारही लिहु शकतोस हे सिद्ध केलेस त्याबद्दल खुप बरे वाटले.

पर्‍या
º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

मैत्र's picture

15 Jun 2009 - 11:43 am | मैत्र

टार्‍या ....
फारच सही आणि अनपेक्षित...
हाडं बीडं, बोळे क्लब, ब्वना या रांगेत अगदीच चुकार आहे लेख.. पण एकदम मनापासून आलेला वाटतोय. फोटो झकास आहेत.. (शेवटचा सगळ्यात बेष्ट)...
येऊदे अजून ... वरिजिनल फोटोसह...

विशाल कुलकर्णी's picture

15 Jun 2009 - 11:43 am | विशाल कुलकर्णी

सुखद धक्का, टारुभाऊ...
मस्तच... नॉस्टॅल्जिया जागवलास ! :-)

सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...

आमचं नवीन पाडकाम : बोलावणे आले की.... अंतीम : http://www.misalpav.com/node/8120

माधुरी दिक्षित's picture

15 Jun 2009 - 11:49 am | माधुरी दिक्षित

सहीच लिहिल आहेस रे !!!!
आवडला लेख खुप

बिपिन कार्यकर्ते's picture

15 Jun 2009 - 12:23 pm | बिपिन कार्यकर्ते

टार्‍या, काय हे? तुझा एकदम टाराजे झाला? एकदम राज्याच्या प्रांतात घुसखोरी? आणि 'त्या' गाण्याचं काय झालं? असो.

छान लिहिलंयस. फॉर अ चेंज वर्जिनल लेख टाकलास, आता नेहमीच असं लिहित जा. हा लेख अगदी मनाच्या कुपितून म्हणजे अगदी मनापासून आलाय हे अगदी जाणवते.

आता कामकी बातें:

०१. कोणताही महत्वाचा उद्योग करताना काही प्रीकॉशन्स घेणं आवश्यक असतं. महत्वाच्या प्रसंगी फोन बंद / सायलेंट ठेवणे हे काय सांगायला पाहिजे? दोष दुसर्‍यांच्या माथी मारू नकोस. पुढच्या वेळी लक्षात ठेव. आणि तरी फोन आला तर घेऊच नकोस. आणि घेतलास तरी, 'ए थांब ना...' असं अचानक ओरडू नकोस. ;)

०२. ती जेन एकदा भेटूच दे मला. त्यानंतर तू दु:खी होणारेस.

०३. तुझ्या ब्रह्मांडाच्या ट्रिपमधे एकदा व्यत्यय आला तर त्यानिमित्ताने तुला एवढा छान लेख सुचला. असा व्यत्यय नेहमीच आणावा म्हणतो. काय? શું ટારુભાઇ, બ્રહ્માંડની ટ્રિપમાં ડિસ્ટર્બન્સ ચાલસે કે તમે?

બિપિનભાઇ કાર્યકર્તા

स्वाती दिनेश's picture

15 Jun 2009 - 12:26 pm | स्वाती दिनेश

अरे किती छान लिहिलं आहेस, एकदम मनापासून लिहिलं आहेस हे समजतच आहे..
स्वाती

श्रावण मोडक's picture

15 Jun 2009 - 1:23 pm | श्रावण मोडक

लेखकाचे नाव बाजूला ठेवून वाचला. मग लेखकाचे नाव डोक्यात आणले. त्याची काही छायाचित्रे मनासमोर आणली. कशाचीच टोटल लागेनाशी झाली. शेवटी हेही आपले स्टिरिओटाईपच एकेक. मग पुन्हा लेखकाचे नाव बाजूला सारले. लेख पुन्हा डोक्यात घुसला. छान. असेच लिहित रहा.

अभिज्ञ's picture

15 Jun 2009 - 1:35 pm | अभिज्ञ

मस्त रे.
छान लिहिले आहेस.
और भी ऐसाही आने दो.

अभिज्ञ.
--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.

शाल्मली's picture

15 Jun 2009 - 1:38 pm | शाल्मली

टार्‍या,
तुझ्याकडून अश्या लेखाची वगैरे अजिब्बात अपेक्षा नव्हती हो..
मस्त लिहिला आहेस.
चतुरंग म्हणतात त्याप्रमाणे सुरुवातीला वाटलं की कुठल्यातरी लेखाचं नक्कीच 'विडंबण' पाडलयंस की काय!!

जाहीरात : अपकमींग शेंशेशनल लेख .... "माझे प्रेमाचे ३ पोपट " लवकरच कमींग सुन

हे खास टारु टच लै भारी! लवकर कमूदे :)

अवांतर :- 'वैणी' कशा आहेत?

--शाल्मली.

:) ;;) टार्या तु फारच एमोतिओनल आहेस रे!!
मलाही हे माहित नहव्ता.....
खरोखर अप्रतिम आहे तुझी स्वप्ना.....आणि त्यातली तुझी स्वप्नासुंदरी....
फारच खर्या भावना आहेत तुझ्या ह्या.......
मी तुझी फॅन झाली आहे......
तुझ्या पुढ्च्या लेखाची वाट पाहते आहे,.....
(तुझी पंखी) जेन ;) :)
=D> =D> =D>

mamuvinod's picture

15 Jun 2009 - 3:42 pm | mamuvinod

णमस्कार्स लोक्स
जाहीरात : अपकमींग शेंशेशनल लेख .... "माझे प्रेमाचे ३ पोपट " लवकरच कमींग सुन

हे मात्र टारु टच

रेवती's picture

15 Jun 2009 - 5:23 pm | रेवती

टार्‍या,
तू ठीक आहेस ना?
आम्हा सर्व मिपाकरांना तुझी काळजी वाटते.
इतका कसा बदललास?
जेनकृपेमुळे की काय?
लेख छान लिहिलायस. आता नेहमीसारखे ते 'पोपट 'झाल्याचे लेख येऊ देत.

रेवती

मस्त कलंदर's picture

15 Jun 2009 - 6:42 pm | मस्त कलंदर

अनपेक्षित पण छान लेख..!!!!
मला गीतकार लोकांचं नि कवींचं (चांगल्या) नेहेमी आश्चर्य वाटतं. आपल्या स्वतःच्या भावनाच कधी कधी आपल्याला जमू नये इतक्या नेमक्या शब्दांत ते मांडतात... कसं काय जमतं त्यांना कुणास ठाऊक..!!!

आज मला हा लेख वाचताना अगदी तस्संच वाटलं!!!! :)

लगे रहो टारूभाई!!!! =D>

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

सूहास's picture

15 Jun 2009 - 7:15 pm | सूहास (not verified)

सुहास

टारझन's picture

15 Jun 2009 - 11:28 pm | टारझन

सर्व प्रतिसाद देणार्‍यांचं मन:पुर्वक आभार प्रदर्शन !!
ह्या असल्या भावणिक कोलन मधे आमच्यासारख्या कुख्यात आय.डी. नं हात घातल्याने आपणास धक्का बसणे सहाजिक आहे :)
तरी पण संभाळून घेतल्याबद्दल आणंद आहे :)

राज ठाकरे च्या टोण मधे :- ध्यानात ठेवा .. हिणकस लेख बंद करणार नाहीत .. मिसळपाव नवनिर्माण सेना एक लाईनीच्या बिहारी आणि पुचकट कौलाच्या युपीवाल्या धाग्यांना फाट्यावर मारल्या शिवाय रहाणार नाही .. हे हे हे मी तुमच्या टाळ्या(सॉरी) प्रतिसाद मिळवण्यासाठी नाही बोलत .. मला त्याचं काही नाही !!
पण म्हणतात ना काळ सोकावतो .. (असो पुढचं भाषण आपलं पाठ असावं )

- टारझन

स्वप्निल..'s picture

15 Jun 2009 - 11:48 pm | स्वप्निल..

टार्‍या,

एकदम मस्त लेख..!!

स्वप्निल

पिवळा डांबिस's picture

16 Jun 2009 - 12:19 am | पिवळा डांबिस

भारतात पावसाळा सुरू झालेला दिसतोय....
म्हणूनच,
"माझा णवीण पोपट हा,
लागलाय मिठूमिठू बोलायला..."
:)

अजून येऊदे...

धमाल मुलगा's picture

16 Jun 2009 - 4:16 pm | धमाल मुलगा

काय रे टार्‍या,
डांबिसकाका काय म्हणताहेत? ;)

अवांतरः लेख एकदम जंक्षान लिव्हलायस की रे चोच्या. हाबिणंदण :)

----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

Nile's picture

16 Jun 2009 - 11:09 pm | Nile

LOL!

निखिलचं शाईपेन's picture

16 Jun 2009 - 1:16 pm | निखिलचं शाईपेन

लोक्स, हे सगळे फोटोझ टा-याचे (आणि टारीचे) आहेत. हे एफ वाय आय.
छान लिहिलेस रे, आता लोकांना सरप्राईज देतोस आहे वेगळं लिहून तर, एक दोन स्केचेस हि टाक तू केलेली.
-निखिल.

विनायक प्रभू's picture

16 Jun 2009 - 1:22 pm | विनायक प्रभू

चे पाणी लागले म्हणावे की काय?

मनिष's picture

16 Jun 2009 - 1:50 pm | मनिष

मस्त झाला आहे रे! मला धक्का नाही बसला, तो आहे खरच संवेदनशील, उगाच टारगटपणा करत असतो. पुढच्या लेखाच्या प्रतिक्षेत. :)

सूहास's picture

16 Jun 2009 - 4:49 pm | सूहास (not verified)

<<त्यावेळी एक मराठी सिनेमा पाहिलेला .. नाव नाही आठवत .. त्यात एक अत्तिशय सुंदर गाणं होतं .. "सहजिवनात आली ही स्वप्नसुंदरी">>>

बहुधा " मु॑बईचा फौजदार" मधल हे गाण आहे...तु ही सध्या मु॑बईला आहेस्...गाण्याचा असर की मु॑बईचा ???

सुहास

टारझन हे फार छान लिहितात. (मागे त्यांनी पूर्व आफ्रिकेतील प्रवासवर्णन लिहिले होते, तेही अव्वल होते.)

असेच वैविध्यपूर्ण उत्कृष्ट लेखन करत राहावे - त्यांनी जाहिरात केलेल्या लेखाची वाट बघत आहे.

छोटा डॉन's picture

23 Jun 2009 - 2:02 pm | छोटा डॉन

भांचोद, कसला जबरा लिव्हला आहेस लेख एकदम ...
अगदी हटके आहे पण तुझ्या शैलीतलाच आहे, आवडला एकदम ...

बाकी मोडकसाहेबांशी सहमत, लेखातील कंटेन्ट आणि लेखकाची मनातली प्रतिमा अजिबात मेळ खात नाहीत, कदाचित हेच ह्या लेखाचे यश ...
असेच अजुन येऊदेत टारबा ...

बाकी ते एका ओळीच्या धाग्याला ठोकणे चालुद्यात, आमचा सपोर्ट आहे तुम्हाला. वेळ आली तर आमचे कार्यकर्ते ( बिका नव्हे ) रस्त्यावर उतरतील तुमच्यासाठी ...

------
छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

जागु's picture

23 Jun 2009 - 2:59 pm | जागु

भन्नाट लेख. पोपट झाला रे लवकरच टाका. तुमचे लिखाण खुपच छान झाल आहे.

ऋषिकेश's picture

23 Jun 2009 - 3:13 pm | ऋषिकेश

आगामी लेखात ३ च पोपट कसले घेतोस.. वरचे प्रतिसाद वाचून कळले असेल की तुझ्या ह्या अश्या लेखाने मिपावर किती पोपट झाले आहेत :) ;)

बराच उशीरा वाचला त्याबद्दल स्वारी मालक.. मात्र मस्त लेख.. वाचला नसता तर टारोबाच्या एका छान लेखाला मुकलो असतो

अवांतर: लेख वाचून ती हल्ली सुमो रेसलर्स उडत बॅले करत असतात ती जाहिरात आठवली ;)

ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे