माझा धातुकोष.

रामदास's picture
रामदास in जनातलं, मनातलं
9 Jun 2009 - 7:43 pm

(हे रुद्रा,तुझ्या कृपेने )
मला दगड ,मृत्तीका ,डोंगर ,पर्वत, वाळू, वनस्पती, सुवर्ण, पोलाद, शिसे, कथिल लोखंड , तांबे, अग्नी , उदक , लता, औषधी,शेतीच्या साह्याने पिकवलेले तसेच आपोआप निपजणारे धान्य, पाळीव आणि रानटी पशू, पूर्वार्जित,तसेच स्वकष्टार्जीत वित्त, ऐश्वर्ययुक्त संतती, ऐश्वर्य, स्थावर-जंगम धन, निवासस्थान, कर्तव्य करण्याची अनुकूलता आणि सामर्थ्य, हेतूसिद्धी,भावी सुख,तसेच आणि इष्ट प्राप्तीचा उपायआणि इष्ट गोष्टी आदींची प्राप्ती होवो.
(चमकातला पाचवा अनुवाक)

मे महिन्याच्या अखेरीस शेवटची वाळवणं अंगणात पडलेली असायची .पोरं शाळेची वाट बघत असायची. सुट्टी लवकर संपलीच तर बरं अशा काहीशा मूडमध्ये येण्याची तयारी असायची. सुट्टीतले सगळे धुडगुस घालून संपलेले असायचे. घामोळ्यांनी हैराण पोरं आपापसात कुरबुरी करत असायची. वेळ घालवायची साधनं कंटाळवाणी व्हायला लागायची त्या सुमारास कल्हईवाला घामाघूम होत दुपारी घरी यायचा. मरगळून पडलेल्या पोरांच्या अंगात उत्साहाचा संचार व्हायचा.धाकट्या भावांना आयांना बोलावण्यासाठी पिटाळलं जायचं. बिर्‍हाडातून हालचाली सुरु व्हायच्या.आयाबाया बाहेर यायच्या .रविवार असला तर पुरुष मंडळी बाहेर यायची.पाण्याचा गडवा पुढे सरकवला जायचा. पाणी पिऊन होईस्तो पोरं कल्हईवाल्याला गराडा घालायची.
सैपाकघरात भांड्यांचे आवाज यायला सुरुवात व्हायची. हळूहळू एकेक बाई येउन भांड्याचा ढिग समोर ठेवायची.
एकेक भांडं हिर्‍यासारखं निरखत कल्हईवाला पैसे सांगायचा.सगळ्या बायका एकाच वेळी महाग , काहीतरीच, असं काहीतरी बडबडत एकदम कलकलाट करायला लागायच्या.
ताई माई असं म्हणत कल्हईवाला शांतपणे कांग्रेसनी महागाई किती वाढवली आहे ते सांगायचा.बर्‍याच बायका भांडी आवरून चालायला लागायच्या.
मागच्या वेळी किती पैसे घेतले होते त्याचा पाढा वाचला जायचा.
पोरं चुळबुळत वाट बघत असायची.
शेवटी एकदाचा भाव ठरला की कुठल्यातरी बाईच्या लक्षात यायचं की कल्हईवाल्याची बोचकी दिसत नाहीय्येत.
"मेल्या आज कल्हई करणारेस की उगाच ...."
असं काहीतरी म्हणेम्हणेस्तो कल्हईवाल्याची घामानी थबथबलेली बायको दूरवरून बोचकी घेऊन येताना दिसायची.
तिच्या अंगाखांद्यावर चार बोचकी असायची .
पाचवं बोचकं पोटात असायचं.
शिणलेली बाई पायर्‍या चढून वर येईस्तो तमाम बायका परत कलकलाट करायला लागायच्या .
"मेल्या , तुला काय झालं रे बोचकी उचलायला..."
पण कल्हईवाला शांत असायचा.विडी काढून धागा सोडवत असायचा. माचीससाठी खिसे चाचपत असायचा.मग एखादं बिट्टं पोरगं अदबीनी माचीस आणून द्यायचं.(बहुतेक मी)
कडुलिंबाच्या खाली पुढचा प्रवेश सुरु व्हायचा. झाडूनी जागा साफ करून एक छोटा खड्डा , पाणी टाकून लिंपला जायचा. भात्याची पिशवी जोडली जायची. (पंख्याचा ब्लोअर यायचा होता.)भट्टीवर एकेक करून कोळशाचे तुकडे रचले जायचे.पिंजर टाकून झाल्यावर भट्टी पेटायची. थोडावेळ थोडासा पिवळट धूर यायचा. मग एकदा का भात्याचा झुस्स् फुस्स् आवाज सुरु झाला की निखारे रसरशीत पेटायचे.
आता पोरं कोडाळं घालून बसायची. भांड गरम झालं की त्याचा रंग बदलायचा.
मग नवसागराची एक फक्की पडली की धूरच धूर. एकीकडे कल्हईवाल्याचे हात जोरात चालायचे.चिंधीच्या बोळ्यानी भांडं स्वच्छ झालं की परत एकदा गरम करायचं .
वातावरणात नवसागराचा एक धुंद करणारा वास यायचा. आणि मग गरम भांड्यावर कल्हईचा तुकडा सही केल्यासारखा फिरायचा, दुसर्‍या क्षणाला चपळ हातानी बोळा फिरला की भांडं आरशासारखं चकचकीत.
सगळ्यांनी रोखून धरलेले श्वास एकसाथ बाहेर पडायचे.
भाता आणखी जोरात चालायचा.
दोन भांडी चमकवली की कल्हईवाला एखाद्या बिट्ट्याला खूण करायचा.
ते बिट्टं अगदी अग्रपूजेचा मान मिळाल्याच्या थाटात भांडी घेऊन घरात जायचं.
आतून ओक्के चा संदेश आला की कल्हईवाला जोरात भाता मारायचा.पुन्हा तेच .
कल्हई टाकल्यावरचं लखलखणं.
भात्याची छातीची धुसफुस.
पाण्यात भांड बुडवलं की येणारी वाफ.
मंत्रमुग्ध होऊन मुलं आणखी आणखी जवळ जवळं सरकायची.
फार जवळ आली की कल्हईवाला एखादं गरम भांडं जास्तच पुढे सरकवायचा. धगीला घाबरून पोरं मागे सरकायची.
सावल्या लांबत जाईस्तो हा खेळ. गरम भांड्यांचा वास. नवसागर आणि पाण्याची वाफ सोबतीला भारावून टाकणारे आवाज. एक दोन लॉट झाले की बरीचशी मुलं दुसर्‍या उद्योगाला लागायची.
मला हा प्रकार एव्हढा अद्भूत वाटायचा की मी शेवटपर्यंत थांबायचो. अधून मधून लॉयल्टी बोनस म्हणून भाता मारायला मिळायचा. मग मी खूष व्हायचो. मग कल्हईवाला हळूच बायकोकडे बघून हसायचा.
( आतापर्यंत पूर्ण सहानूभूती मिळून तिच्या पुढे दुपारच्या उरलेल्या अन्नाचं ताट वाढून आलेलं असायचं.)
मला वाटायचं की हे थांबूच नये .
कल्हई चालतच रहावी. खास करून कल्हईची कांडी काळ्याकुट्ट भांड्यावर विजेसारखी लखलखायची आणि दुसर्‍या क्षणी डोळ्यासमोर आरशासारखा लख्ख् उजेड असंच सारखं सारखं व्हावं असं वाटायचं.पण काम संपायचंच.
भांडी मोजली जायची .परत एकदा हिशोब व्हायचा.
मग कल्हईवाल्याच्या सप्लीमेंटरी डिमांड्स सुरु व्हायच्या. जुने कपडे दिले जायचे. राहीलेलं दुपारचं अन्न डब्यात भरलं जायचं.
मी दुपारपासून वाट बघत असलेला क्षण यायचा. कल्हईवाला कल्हईचा एक छोटुसा तुकडा मला द्यायचा. त्याची बायको हळूच किरकिरायची. कल्हईवाला बच्चा है असं म्हणत बोचकी भरायला लागायचा. भाता काढून झाला की पाणी भट्टीत ओतून एक जोराचा वाफेचा ढग आला की खेळ संपायचा.
मी नंतर बराच वेळ गरम मातीचा वास घेत बसून रहायचो.कथीलाचा तुकडा मुठीत दिल का तुकडा असल्यासारखा सांभाळून ठेवायचो.माझ्या धातुकोषाची सुरवात झाली ती अशी.
कविलोक काहीहे म्हणोत, आजही आषाढाच्या काळ्या कुट्ट ढगावर विज लखखली की मला आकाशाच्या गरम परातीवर कल्हईची रेघ ओढल्यासारखं वाटतं.
____________________________________________________________________________________

तेव्हाचं सैपाक घर थोडंस अंधारलेलं असायचं .
चूल दिवसभर कमी जास्त जळतच असायची. (कोकणस्थ असलो तरी देशस्थांचा गुण लागलाच होता.)
ताटं वाट्या पितळेच्या . पराती पातेली पितळ्याची.भिंतीवरच्या फळीवर पितळेच्या डब्यांची रांग.पाटाच्या चौफुल्या पण पितळेच्या.
मला सगळीकडे पितळंच दिसायला लागलं होतं.आमचं लहान मुलांचं घंगाळ पितळेचं .मोठ्यांचं तांब्याचं .मोरीतला बंब तांब्याचा. देव पितळेचे.कोपर्‍यातली हंड्या घागरीचा थर पितळ्याचा.सैपाकघरात लुडबुडायला चान्स तसा नव्हता पण घरात लहान असल्यामुळे इतरांपेक्षा वावर जास्त होता.त्या सोनेरी धातूनी मला झपाटून टाकलं होतं.चिंचेचा चोथा घेऊन डबे घासायचं काम मी आवडीनी करायचो.
सगळ्या डब्यांना एक स्वत:ची अशी नावं होती.
लाडवाचा डबा.(हा बहुतेक वेळा रिकामाच असायचा.)
आत्याकडला डबा.(हा अधून मधून भरून पाठवायचा असायचा)
चपट्या झाकणाचा डबा.(ह्याला झाकण दुसर्‍या डब्याचे होते)
रुखवताचा डबा.(आईच्या माहीराकडून रुखवताचे सामान भरून आलेला)
हरवलेला डबा. (हा कोणाचातरी चूकून आमच्याकडे आला आणि तसाच राहीलेला)
पोचे आलेला डबा.(ह्या डब्याचा एक गुण असा होता की हा कुणाच्याही हातात दिला खाली पडायचाच.पडून पडून त्याला पोचे आले होते)
घट्ट झाकणाचा .(साखरेचा मेन स्टॉक ह्यात असायचा)
सैल झाकणाचा.(ह्या डब्याला थाप मारून बंद केलं तरी थोड्या वेळानी झाकण आपोआप उघडायचं )
पाच थराचा टूरवर घेऊन जाण्याचा डबा.(आजी ह्याला गार्डाचा डबा म्हणायची.आईचे बाबा गार्ड होते म्हणून त्याचं नाव तसं .चुलीजवळच्या राजकारणाचा एक भाग.)
मिसळणाचा डबा आणि गुळाचा डबा (हे बिचारे रोज कष्ट करणारे डबे.)
ह्या खेरीज मोठ्या पितळ्या होत्या. दहा दहा किलोच्या. कडी कोयंडा असलेल्या.
त्यात पापड्या कुरडया पापड.एका पितळीत बाकीचं पितळेचं सामान.म्हणजे चकलीचा पितळेचा सोर्‍या, पोहे चाळायच्या चाळण्या, उदबत्तीचं झाड .अभिषेकाचा गडू आणि त्याचा स्टँड.झांजा .टाळ.
सैपाक घरात पितळ्याचं साम्राज्य होतं.जे डब्यांचं तेच पातेल्यांचं.
पातेल्यांना पण नावं इतिहास , वंशावळ सगळं काही होतं.
ठोक्याचं पातेलं, जड बुडाचं पातेलं ,(आमच्या काही जावयांना हीच नावं सैपाकघराच्या बाजूनी दिलेली होती)
उभट पातेलं , फोडणीची पातेली, विरजणाची पातेली, ताकाची पातेली ,आंबील बनवायची एक वेगळीच होती.
सणासुदीला ,गौरी गणपतीला बाहेर येणारी घरातली पाहुणी पातेली पण होती.
याखेरीज स्पेशल पर्पज वाली अप्रॅटस होतीच.उकडीचे मोदक वाफवून काढण्यासाठी वगैरे.
पण मग पहीलं भारत पाक युद्ध झालं त्या दरम्यान पितळेचे तांब्याचे भाव अचानक वाढले.हौदाच्या तोट्या चोरीला जायला लागल्या.
पितळेच्या भांड्यांना कल्हईचा खर्च परवडेनासा झाला . बर्‍याच वेळा मी घरी पण कल्हई करून दाखवली पण कौतुकाखेरीज फारसं काही वाट्याला आलं नाही.
एका घराची चार घरं झाली. पितळेची आणि चांदीची भांडी वाटली गेली.
सैपाक घरात मनमोहन देसाईच्या सिनेमात दाखवतात तशी डब्यांची ताटातूट झाली.

भांड्यांची फळी ओकीबोकी झाली. पहील्यांदा एक डबा काढताना दुसरा पडायचा.आता दोन डब्यांमधली जागा भरून काढायची कशी हा प्रश्न होता. खूप सारे डबे म्हणजे अन्नाची रेलचेल होती असं नाही .डबे अर्धेमुर्धे भरलेले असले तरी संसार भरल्यासारखा वाटायचा.पासष्ट ते सत्त्यात्तर डब्यात खणखणाट . अंधारलेल्या त्या सैपाक घरात जोपर्यंत बल्बचा प्रकाश होता तोपर्यंत त्या नेपथ्यात सगळं काही झाकलं जात होतं .ट्युबलायटी आल्यावर तर घराची उसवत जाणारी शिवण नजरेस यायला लागली. आईनी एक दिवस पितळेचे डबे हळूहळू काढून टाकायचा निर्णय घेतला आणि पितळेच्या सामानची हकालपट्टी सुरु झाली. वरची फळी साबणाच्या रिकाम्या डब्यांनी घेतली. त्यावरच्या फळीवर पार्ले आणि साठे यांचे बिस्कीटाचे डबे आले.तिसरी फळी ग्लॅक्सोच्या बेबी फुड च्या गोल डब्यांनी घेतली.या डब्यांत पोट भरण्याची माया कमी नव्हती पण हे सगळं काही उपरं उपरं वाटायचं.

चांदीच्या भांड्यांच्या जागी देवलची भांडी आली.बरेच दिवस मला देवल हा नवा धातुच वाटायचा. पण देवलची भांडी म्हटलं की आज्जी नाक मुरडायची .
"पुणेरी माणसं म्हंजे देवलची भांडी "असं सारखं घोकायची.(आईचं माहेर पुण्याचं )
थोडा मोठा झालो तेव्हा कळलं की देवल म्हणजे चांदीचा मुलामा दिलेली पितळेची भांडी.
स्टीलचा ,अ‍ॅल्युमिनीअमचा जमाना आला.आता बायकांमध्ये होड लागली स्टीलच्या डब्यांची. त्यातही गंजणारी स्टीलची भांडी मिळायची.बोहारणी हातोहात फसवायच्या. रेल्वेच्या डब्यात स्टीलच्या संसाराचा लिलाव व्हायचा.गाळण्यापासून पाण्याच्या पिंपापर्यंत.घरी गेल्यावर महीन्याभरात भांडी गंजायची. नुकतंच युध्द संपल्यामुळे सगळेच धातु महाग झाले होते.पण मग या बायांना मदत करणार कोण? कोण म्हणजे काय मीच. हातात चुंबकाचा तुकडा घेऊन नविन भांडी तपासायचं काम माझ्याकडे.
नंतर स्टीलचं ग्रेडींग २०२,२१२,३०४,३१६,३१६ एल ,क्रोम, निकेल, या सगळ्यांशी संबंध यायचा होताच.
आमच्या घरी चहा साखरेचे नविन डबे आले मुडीस चहाच्या कृपेनी. तेव्हा बायकांना वेड लावणारी स्किम त्यांच्या कडे होती. एक किलो चहा घेतला की दोन कुपनं. दोन कुपनं विकली की चार कुपनं. असं करत सोळा झाली की स्टेनलेस स्टीलचा चहाच डबा फुकट.
मी तेव्हा स्काउटमध्ये होतो. खर्‍या कमाईच्या नावाखाली मी खूप कुपनं विकली. घरी चहा साखरेचे आवळे जावळे स्टीलचे दोन डबे आले.
सभवतालचं जग बदलत जात होतं
पितळेची पातेली जाउन चकचकीत चंदेरी जर्मलची पातेली आली.
नव्या एल्युमीनीयमच्या जगाचं गुणगान बायका आपापसात करायला लागल्या.
बोहारणींचा सुळसुळाट वाढला.
धातुच्या या नव्या जनरेशन मध्ये माया नव्हती असं नाही पण सैपाकघराची शान त्यात नव्हती.
पितळ्याच्या संसारात जी लॉयल्टी आणि रॉयल्टी होती ती या नव्या धातूत नव्हती.युटीलीटी हा नवा ट्रेंड आला.
काका एअर फोर्स मध्ये होते. सुटीतून येताना ते इनामलची भांडी घेउन आले होते.निळ्या इनामलची भांडी सुंदर दिसायची पण तांब्या पितळेचा मान या भांड्यांना कधीच मिळाला नाही.सैपाकघरातल्या फळीवर विराजमान होण्याचा मान पण त्यांना मिळाला नाही.
इनामलची भांडी घरात दोनच. एक वडलांचं दाढीच्या पाण्याचं आणि दुसरं आजोबांच्या एनीमाचं.मग ती इनामलची भांडी तशीच अडगळीत गेली. लष्करी सामानात सन्मान्य अपवादानी खास मान मिळाला तो मात्र काकानी जर्मनीहून येताना मात्र पितळी टाकीचा प्रायमसचा स्टोव्ह आणला होता त्याला.त्याचं कौतुक फार व्हायचं.त्याचं नाव फरफर्‍या श्टो.
ज्या पाहुण्यांना चहाला चुलीच्या धुराचा वास आलेला चालायचा नाही त्यांचा चहा फक्त ह्या स्टोव्हवरती व्हायचा.
घरातलं तांब्या पितळेचं साम्राज्य संपुष्टात आलं.
पितळेची सगळीच पातेली गेली असं नाही .जी काही उरली होती ती अडगळीत गेली होती.
पावसाळ्यात घर दहा ठिकाणी गळायला लागलं की गळतीचं पाणी साठवायला ही जुनी भांडी हाताशी यायची.
(अपूर्ण)

वाङ्मयलेख

प्रतिक्रिया

घाटावरचे भट's picture

9 Jun 2009 - 7:52 pm | घाटावरचे भट

कडक लिवलंय, मालक. जुना काळ चित्रासारखा डोळ्यांसमोर उभा करावा तर तुम्हीच.

टारझन's picture

9 Jun 2009 - 9:06 pm | टारझन

अगदी !!! लेख फारंच आनंद देउन गेला :) रामदास सर , जर्राशी फ्रिक्वेंसी वाढवा राव !! :) अलगद ओघावतं लेखन .. लै भारी ...

स्वगत :- हल्लीच्या नासक्या दुधाच्या आणि वाया गेलेल्या पाकांच्या भिक्कारचोट धाग्यांत हा असला लेख म्हणजे वाळवंटात तेलाची विहीर सापडणे

- (नजरकैद) टा.रू.सावरकर

रेवती's picture

9 Jun 2009 - 7:59 pm | रेवती

नेहमीप्रमाणेच ग्रेट लेखन!
प्रत्येक वाक्य अर्थपूर्ण.
रेवती

सखी's picture

9 Jun 2009 - 8:15 pm | सखी

हेच म्हणते - सुरवातीला काही आवडलेली वाक्य परत देणार होते - पण मग लक्षात आले की सगळा लेखच कॉपी करावा लागेल.

Nile's picture

9 Jun 2009 - 8:47 pm | Nile

अगदी! पोटातल्या बोचक्यापासुन सुरुवात करणार होतो! :)

आमचा वाडा अन ते जुने सैपाकघर अजुन आहे, आमची आज्जी अजुनही ती भांडी वापरते. उन्हाळ्याच्या सुटीत आजीने धुतलेली ती भांडी अंगणात वाळत घालणे व वाळल्यावर पुन्हा आण नेउन देणे हे लगेच आठवलं. ह्या डब्यांकडे मात्र आमचं लक्ष असायचं ते फक्त त्यातल्या लाडवांमुळे किंवा नारळाच्या वड्यांमुळे! :)
श्या! आजचा दिवस अवघड जाणार! :(

धनंजय's picture

9 Jun 2009 - 9:53 pm | धनंजय

मात्र पोटातले पाचवे बोचके खासच.

लखलखीत-गुळगुळीत डब्या-पळ्यांमध्ये बेमालूम वस्तराही टाकावा तर रामदासांनीच.

लिखाळ's picture

10 Jun 2009 - 8:08 pm | लिखाळ

मात्र पोटातले पाचवे बोचके खासच.
लखलखीत-गुळगुळीत डब्या-पळ्यांमध्ये बेमालूम वस्तराही टाकावा तर रामदासांनीच.

खरोखरंच...
फार सुंदर लेख..

-- लिखाळ.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)

संदीप चित्रे's picture

9 Jun 2009 - 9:25 pm | संदीप चित्रे

असेच म्हणतो...
तुमचे लेख वाचताना वाटतं की तुम्ही आत्ता सहज गप्पा मारल्यासरखे समोर बसून बोलताय... तुटक तुटक पण एकसंध अर्थाचे.
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com

प्रकाश घाटपांडे's picture

9 Jun 2009 - 8:14 pm | प्रकाश घाटपांडे

आजही आषाढाच्या काळ्या कुट्ट ढगावर विज लखखली की मला आकाशाच्या गरम परातीवर कल्हईची रेघ ओढल्यासारखं वाटतं.

मलाही तसच वाटत. वाचता वाचता कल्हईच्या चंदेरी राखेत गोळ्या शोधत हरवुन गेलो रामदासजी. वडलांना फरफर्‍या स्टो आवडायचा नाही म्हणुन त्यांनी पुण्याहुन सायलेन्सरचा बर्नर आणला होता. पेटल्यावर निळी ज्योत बघताना मला पुण्यातल्या बर्शनच्या शेगडीसारख वाटायच. तेवढेच शहरात आल्यासारख वाटायच.

प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

दाराशी येणार्‍या कल्हईवाल्याशी मीही असाच उकिडवा बसून असे तासंतास! कॉटनवेस्टचा बोळा फिरवून एखादं भांडं चमकावायला द्यायचा तो मला, त्यावेळी जो काही आनंद व्हायचा तो शब्दातीत आहे.
अगदी माझ्या लहानपणचं सैपाकघर डोळ्यांसमोर उभं केलंत! वाक्यावाक्यात हेलावून टाकणं तर तुमचं नेहेमीचंच आहे.

कविलोक काहीहे म्हणोत, आजही आषाढाच्या काळ्या कुट्ट ढगावर विज लखखली की मला आकाशाच्या गरम परातीवर कल्हईची रेघ ओढल्यासारखं वाटतं.
क्या बात है! केवळ रामदास!! जियो!!!

(सचिन खेळायला आला म्हटल्यावर शतकंच करायला हवं असं नसतं ४०-५० केल्या तरी त्या सचिनच्या असतात, तसंच आहे तुमचं, विषय काहीही असो रामदासांनी लिहिलं म्हणजे डोळ्यांचं पारणं फिटणार हे नक्की!)

(पेढेघाटी)चतुरंग

जुना वाडा परत आठवला.परत ती भांडी,त्यातल्या त्यात आमचा पितळी पानाचा डब्बा.गेले ते दिवस आता शिवण खुपच उसवल्या आहेत.

खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ

प्रकाश घाटपांडे's picture

9 Jun 2009 - 8:51 pm | प्रकाश घाटपांडे

त्यातल्या त्यात आमचा पितळी पानाचा डब्बा.गेले ते दिवस आता शिवण खुपच उसवल्या आहेत

.
खरय वेताळा, मी तेवढा पानाच डब्बा मात्र जपुन ठेवलाय. ओट्यावर गावकर्‍यांसोबत पानसुपारी साठी आजोबा हाच पानसुपारीचा डब्बा वापरायचे. श्राद्ध ,पक्ष, चंपाषष्ठी ,ऋषिपंचमी , श्रावणी सारख्या सणांच्या जेवणांनंतर आम्ही याच पानाच्या डब्ब्यातुन शेतातील आणलेली विड्याची पाने वापरुन विडा तयार करीत असु. बैठकीत गावकर्‍यांनी आपली चंची काढून पान तयार करणे हा कार्यक्रम पहाणे मला फार आवडायचे. ते पानाच्या शिरा काढणे, उलट्या बाजुला चुना लावणे , सुपारी अडकित्त्याने अगदी बारीक कातरणे व नंतर तोंडात काताचा तुकडा टाकणे
Pranavastu 010

प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

जपून ठेवलात हे खूपच छान केलेत घाटपांडेकाका!
(अधून मधून वापरता की काय? कारण मधल्या वाटीत थोडा चुना दिसतोय! :? )

(१२०-३००)चतुरंग

प्रकाश घाटपांडे's picture

9 Jun 2009 - 9:07 pm | प्रकाश घाटपांडे

पान खायला कुणी जोडीदार नाही. या पुन्यात आपन जंगी पानसुपारीचा कार्यक्रम ठेउ.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

अजुन एक पानाचा डब्बा होता अ‍ॅम्बेसिटर गाडीच्या रुपात. तो देखिल मस्त होता.आमच्यात कोण पान खात नव्हते. आमचे शेतावरचे वाटेकरी घरी यायचे ते चहा वगैरे घेऊन झाला की त्यातले पान खात बसत.मला सुपारी कातरुन देत असत. डब्याचा फोटो बद्दल प्रकाश काकाना धन्यवाद.

खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ

पर्नल नेने मराठे's picture

10 Jun 2009 - 11:11 am | पर्नल नेने मराठे

आमच्याकडे पण असा ड्बा आहे, मी त्याला चान्दीसाऱखे पोलिष येते
ते लावुन त्याला चन्दिचा करुन टाकलाय, न त्याला सेन्टर टेबलवर
थ्वेलेय.
चुचु

जुना वाडा परत आठवला.परत ती भांडी,त्यातल्या त्यात आमचा पितळी पानाचा डब्बा.गेले ते दिवस आता शिवण खुपच उसवल्या आहेत. आता मोड विकायचे दिवस आहेत.

खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ

पाषाणभेद's picture

9 Jun 2009 - 8:44 pm | पाषाणभेद

रामदासजी, मस्त काळ उभा केला. जुन्या आठवणींना मोल नसते. आताच्या जमान्यात कल्हईवाला सापडणार नाही आणि आजच्या पिढीला तो आनंद पण मिळणार नाही.

आमच्या गावाचा कल्हईवाला काही भांडे पण दुरस्त करायचा. जसे- कढईला कान लाव, बंबाचा धुरांड्याला पाईप लाव, त्याची राखेची जाळीला रिबीट लाव आदी.
मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)

स्वाती दिनेश's picture

9 Jun 2009 - 9:11 pm | स्वाती दिनेश

आमच्या अंगणात कल्हईवाल्याने त्याची भट्टी लावली की मी ही त्याचं काम संपेपर्यंत तो भांड्यांचा चकचकाट पाहत बसायचे. त्या कल्हईवाल्याचं बोट धरुन किती वर्षं मागे नेलंत हो...
लेख फार फार आवडलाच हेवेसांनल
स्वाती

लवंगी's picture

9 Jun 2009 - 11:43 pm | लवंगी

२-४ वेळाच पाहिलय कल्हईवाल्याला, पण खरच खिळवून ठेवणारा अनुभव. गेले ते दिन गेले. छान उजाळा दिलात आठवणींना

संजय अभ्यंकर's picture

9 Jun 2009 - 9:19 pm | संजय अभ्यंकर

लेख नेहमी प्रमाणे सुंदर!
आपल्या सर्वांच्या मनात एक बालपण असतं, ते आठवण करून देणारा लेख.

परंतु, रामदासजी, लेख पूर्णत्वास नेण्याचे तेवढे पहा!

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

वर्षा's picture

9 Jun 2009 - 10:09 pm | वर्षा

बेस्ट! मी कल्हईवाला प्रत्यक्ष न बघूनही प्रसंग पुरेपूर डोळ्यासमोर उभा राहिला!
अख्खा लेखच अव्वल आहे पण हे खासच...

>>ठोक्याचं पातेलं, जड बुडाचं पातेलं ,(आमच्या काही जावयांना हीच नावं सैपाकघराच्या बाजूनी दिलेली होती)

:)

क्रान्ति's picture

9 Jun 2009 - 10:42 pm | क्रान्ति

काळ सुखाचा आठवला. अगदी आजोळच्या घरात नेऊन सोडलं या लेखानं, तेही हसतखेळत, सहज! पितळी आणि तांब्याची भांडी घासायचा भला मोठा साग्रसंगीत कार्यक्रमच असायचा, पण ती लख्ख भांडी फळीवर आपल्या जागी बसली, की सराफाची पेढी काय दिसावी, असं ते स्वैपाकघर दिसायचं! काका, खूप मनातलं लिहिलंत तुम्ही! लवकर पुढचा भाग लिहा.

क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा

चकली's picture

9 Jun 2009 - 10:47 pm | चकली

नेहमीप्रमाणेच छान लेखन.

चकली
http://chakali.blogspot.com

बिपिन कार्यकर्ते's picture

10 Jun 2009 - 12:33 am | बिपिन कार्यकर्ते

ग्रेट, केवळ ग्रेट. शेवटचा कल्हईवाला बघून साधारण २५-३० वर्षे झाली असतील. पण तो विशिष्ट वास आणि ती चांदी फिरवल्यावर येणारा तो लख्ख चंदेरी रंग अजून स्वच्छपणे मनात हजर आहे. ते सगळं बाहेर आणलंत. आणि साधी पातेली ती काय? पण पिढ्यानपिढ्यांचा प्रवास घडवलात.


पासष्ट ते सत्त्यात्तर डब्यात खणखणाट .

साहेब, केवढं छोटं वाक्य!!! पण वाचलं तेव्हा सर्रकन काटा आला अंगावर. जाता जाता तुम्ही त्या १२ वर्षांचा काळ ५ शब्दांमधेच पण अगदी व्यवस्थित दाखवलात. आणि ते अगदी अचानक आलं वाक्य, ध्यानीमनी नसताना. हीच तुमची खासियत.

बाकी ते वीजेचं वगैरे वर्णन आणि उपमा इ. तर थोरच.

अवांतर: च्यायला!!! आलं यांचं अजून एक 'अपूर्ण'. यांची ही असलं जीवघेणं वगैरे लिहून नुसतं अपूर्ण टाकून लोंबत ठेवायची खोड कशी मोडायची बरं? पुढं लिहितच नाहीत. बसा लेको वाट बघत.

बिपिन कार्यकर्ते

छोटा डॉन's picture

10 Jun 2009 - 7:11 pm | छोटा डॉन

रामदासबाबांच्या लेखांना काय प्रतिक्रिया द्यावी ही खरोखर समस्या झाली आहे, अप्रतिम हा शब्दच थिटा पडावा असे लेखन आहे.
एकदम साधे सरळ, वळचणीच्या गळक्या पत्रातुन सरळ आत घुसणार्‍या पाण्याच्या धारेसारखे , सुखदच म्हाणवे ना ?

शब्दात प्रतिक्रिया जमणे अवघड आहे.
तरी बिका, रंगाशेठ, मुसुशेठ, प्रा डॉ. वगैरे मंडळी काही तरी ४ ओळीत परिपुर्ण प्रतिक्रिया लिहतात हेच बरे.
आपण आपले पटकन त्याला "+१, सहमत आहे" म्हणुन रिकामे व्हायचे ...
आत्ता तेच म्हणतो ...

अजुन येऊद्यात काका ...

अवांतर : अहो त्या "गोडबोलेंच्या प्रेमकहाणीला" सुद्धा एकदा कल्हई होऊन जाऊ द्या, फारच जुनीपुराणे वाटायला लागली कहाणी ...

------
छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

चित्रा's picture

10 Jun 2009 - 5:28 am | चित्रा

उत्तम लेख. कल्हई लावताना बघायला आवडत असे. आणि ते काम कल्हईवाल्याला बराच वेळ पुरत असे.

अवलिया's picture

10 Jun 2009 - 6:20 am | अवलिया

कडक !

--अवलिया

सहज's picture

10 Jun 2009 - 6:42 am | सहज

अप्रतिम. खरोखर मेंदुच्या एका कोपर्‍यात ह्या सगळ्या आठवणी होत्या व तुम्ही कल्हई करुन सर्व कश्या लख्ख केल्यात. लहानपण फिरवुन आणलतं.

"अनपेक्षीत लाभ" असं काही आजच्या दिनभविष्यात लिहले असेल का बघीतले पाहीजे.

ह्या एका लेखात इतकं काही भरभरुन दिलं आहेत की नेहमीप्रमाणे तुमचा (अपूर्ण ) हा तसाच राहीला तरी चालेल.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Jun 2009 - 7:16 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

खरोखर मेंदुच्या एका कोपर्‍यात ह्या सगळ्या आठवणी होत्या व तुम्ही कल्हई करुन सर्व कश्या लख्ख केल्यात. लहानपण फिरवुन आणलतं

अगदी असेच म्हणतो ! लहान होऊन कल्हईवाल्याच्यासमोर उभा असल्याचा स्वतःलाच भास झाला.

केवळ सुंदर लेखन सर !

तिच्या अंगाखांद्यावर चार बोचकी असायची .
पाचवं बोचकं पोटात असायचं.

इथे पैकीच्या पैकी मार्क दिले !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

टारझन's picture

10 Jun 2009 - 7:29 am | टारझन

तिच्या अंगाखांद्यावर चार बोचकी असायची .
पाचवं बोचकं पोटात असायचं.

.
इथे पैकीच्या पैकी मार्क दिले !

कल्हई वाली ला ? की रामदास सरांना ? =)) =)) =))
पण बाकी काहीही म्हणा आं .. कल्हई आहे म्हणून लावत बसू नये हे कोणी त्यांना समजवत का नव्हतं ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Jun 2009 - 7:35 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>कल्हई वाली ला ? की रामदास सरांना ?

रामदास सरांच्या निरिक्षणाला..... !
आणि तसेही कल्हईवालीच्या पाचव्या बोचक्याचं नवल तेव्हा कोणालाच नसावं :)

-दिलीप बिरुटे

चन्द्रशेखर गोखले's picture

10 Jun 2009 - 7:28 am | चन्द्रशेखर गोखले

केवळ अप्रतिम शब्दचित्र !! भावनेलाच हात घातलात रामदासजी !!
काही ओळी तर लाजवाब.. त्यातल्याच काही..

*मी नंतर बराच वेळ गरम मातीचा वास घेत बसून रहायचो.कथीलाचा तुकडा मुठीत दिल का तुकडा असल्यासारखा सांभाळून ठेवायचो.माझ्या धातुकोषाची सुरवात झाली ती अशी.
कविलोक काहीहे म्हणोत, आजही आषाढाच्या काळ्या कुट्ट ढगावर *विज लखखली की मला आकाशाच्या गरम परातीवर कल्हईची रेघ ओढल्यासारखं वाटतंपितळ्याच्या
संसारात जी लॉयल्टी आणि रॉयल्टी होती ती या नव्या धातूत नव्हती.युटीलीटी हा नवा ट्रेंड आला.
*पितळेची सगळीच पातेली गेली असं नाही .जी काही उरली होती ती अडगळीत गेली होती.पावसाळ्यात घर दहा ठिकाणी गळायला लागलं की गळतीचं पाणी साठवायला ही जुनी भांडी हाताशी यायची.

डॉ.प्रसाद दाढे's picture

10 Jun 2009 - 8:27 am | डॉ.प्रसाद दाढे

आणखी एक अप्रतिम लेख! अनुसेरीची आठवण अजूनही विसरलो नाही तर एकदम डोक्याला कल्हई? अहो काय रेंज का काय म्हणायची ही! रामदास फॅन क्लब किंवा फॅन फाउंडेशन स्थापन करावे नव्हे केलेच पाहिजे अश्या मतास आम्हीं आलो आहोत!

विनायक प्रभू's picture

10 Jun 2009 - 8:30 am | विनायक प्रभू

असे लेखन वाचले की राँग मॅन इन राँग प्लेस ची भावना परत उफाळुन येते.

प्रमोद देव's picture

10 Jun 2009 - 9:37 am | प्रमोद देव

रामदासस्वामी लेख वाचला आणि मीही भूतकाळात गेलो. कल्हईवाल्यासंबंधी मीही लिहीणार होतो पण आता तुम्ही इतके चित्रमय वर्णन केलेय की मला लिहीण्यासारखे काही उरले नाही.
कल्हईवाला गेला की तिथल्या मातीत पडलेले चंदेरी मोती शोधायची आमच्यात स्पर्धा लागायची. असे कैक चंदेरी मोती माझ्याकडे साठवलेले होते...त्या काळात.
पितळेचे,तांब्याचे डबे,भांडी चिंच लावून आणि राखेने घासून लखलखीत करण्याचे काम मलाही खूप आवडायचे.

अवांतर : लेखाचे शीर्षक वाचून आधी गैरसमज झाला होता. प्रभूदेवांसारखे काही क्रिप्टीक तर नाही अशी कु'शंका' आली. ;)

हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!

विसोबा खेचर's picture

10 Jun 2009 - 8:32 am | विसोबा खेचर

रामदासभावजी,

नेहमीप्रमाणेच जबरा लेखन.. नॉस्टॅल्जिक करून सोडलेत.

लेख लैच आवडून गेला..!

तात्या.

पिवळा डांबिस's picture

11 Jun 2009 - 3:07 am | पिवळा डांबिस

नॉस्टॅल्जिक करून सोडलेत.
असेच म्हणतो. विशेषतः कल्हईवाल्याच्या पार्टमध्ये...

प्राजु's picture

10 Jun 2009 - 8:36 am | प्राजु

पुढच्या भागाची वाट पहाते आहे.
लवकर लिहा.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

शैलेन्द्र's picture

10 Jun 2009 - 9:22 am | शैलेन्द्र

काय बोलु... तुम्ही लिहाव आणि आम्ही मुग्ध व्हावं...

ऋषिकेश's picture

10 Jun 2009 - 9:45 am | ऋषिकेश

मी ही कल्हईवाल्याची मौज प्रत्या अनुभवलेली नाहि.. तरीही भावना मात्र पुरेपूर पोचल्या
खूपच मस्त!साध्या शब्दांतील परिणामकारक वाक्ये! मजा आली

ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

नंदन's picture

10 Jun 2009 - 11:09 am | नंदन

ऋषिकेशशी सहमत आहे, नेहमीप्रमाणेच सुंदर लेख.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

सुबक ठेंगणी's picture

10 Jun 2009 - 11:31 am | सुबक ठेंगणी

आमच्याकडे फार पूर्वी कल्हईवाला यायचा पण आज पहिल्यांदाच तो एवढा वर्णनीय असू शकतो असं वाटलं...
तुम्ही समोर असतात तर मी नक्कीच तुमचे पाय धरले असते हो...

भाग्यश्री's picture

11 Jun 2009 - 2:27 am | भाग्यश्री

असे अगदी अवचित लेख येतात रामदास काकांचे ... आणि नाव वाचलं की ते वाचल्याशिवाय ऑफिसच्या कामात लक्ष लागत नाही. खरंच प्रभूमास्तर म्हणतात तसं गल्ली चुकली की हो...

वर्णनाला काय म्हणावं. बहुतेकांनी अनुभवलेली गोष्ट... पण इतके नेमके शब्द...
वर्णनाच्या तपशीलासाठी मला विलक्षण आवडणारे लेखक म्हणजे गोनीदा.. त्यांच्या जवळपास नेणारी शब्दकळा आहे ही.

आणि नेहमी प्रमाणे वर्णन वाचताना मधूनच षटकार वाचण्याची तर आता सवयच झाली आहे आम्हाला.

> आजही आषाढाच्या काळ्या कुट्ट ढगावर विज लखखली की मला आकाशाच्या गरम परातीवर कल्हईची रेघ ओढल्यासारखं वाटतं.

> आत्याकडला डबा.(हा अधून मधून भरून पाठवायचा असायचा)

>(चुलीजवळच्या राजकारणाचा एक भाग.)
> या डब्यांत पोट भरण्याची माया कमी नव्हती
> "पुणेरी माणसं म्हंजे देवलची भांडी "असं सारखं घोकायची.(आईचं माहेर पुण्याचं )
> पासष्ट ते सत्त्यात्तर डब्यात खणखणाट . अंधारलेल्या त्या सैपाक घरात जोपर्यंत बल्बचा प्रकाश होता तोपर्यंत त्या नेपथ्यात सगळं काही झाकलं जात होतं .

काय लिहावे... पहिल्यांदाच मिपावर अपूर्ण वाचून मनापासून आनंद झाला...
वाट पाहतो...

अभिज्ञ's picture

10 Jun 2009 - 3:55 pm | अभिज्ञ

खणखणीत लेख.
पुढचा भाग लवकर टाका.

अभिज्ञ.
--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.

आनंदयात्री's picture

10 Jun 2009 - 4:24 pm | आनंदयात्री

वाह. मस्त लेख. लेखनशैली एकनंबर .. खिळवुन ठेवणारी.

सर्वसाक्षी's picture

10 Jun 2009 - 6:57 pm | सर्वसाक्षी

वा रामदासजी

झकास चित्रदर्शी लेख. अनेक पैलु उलगडत जाणारा. अनेक दिवसांनी आपला असा सुरेख लेख वाचायला मिळाला. धन्यवाद

मस्त कलंदर's picture

10 Jun 2009 - 7:51 pm | मस्त कलंदर

कल्हईवाला खूप लहानपणी पाहिला होता.. पण त्याचं नि त्याच्या बायकोचं वर्णन तर अगदी चपखल.. मुर्तिमंत उभा राहिला डोळ्यासमोर.. त्याच्यासोबत भांड्याना बूड लावणारा (हा अजुनही येतो), बहुरूपी, कडकलक्ष्मी अशा बर्‍याचलोकांची सय आली हा लेख वाचून..

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

गणा मास्तर's picture

11 Jun 2009 - 3:39 pm | गणा मास्तर

वाचता वाचता नवसागराचा वास दरवळला.
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)

JAGOMOHANPYARE's picture

24 Sep 2009 - 3:17 pm | JAGOMOHANPYARE

नवसागर कुणाचा? कल्हईवाल्याचा की हातभट्टीवाल्याचा? :)

खंडेराव's picture

22 Mar 2019 - 12:14 pm | खंडेराव

फारच छान लिहिलेय, सकाळी सकाळी सोने सापडल्यासारखा आनंद झाला पहिला भाग वाचूनच..लहानपणी गावात कल्हईवाला यायचा, ते अगदी डोळ्यासमोर उभे राहिले!!

करमरकर नंदा's picture

24 Mar 2019 - 6:30 pm | करमरकर नंदा

कल्हई करून चकाकी आली आहे.

सविता००१'s picture

24 Mar 2019 - 7:36 pm | सविता००१

किती सुरेख आहे हा लेख... खूप भारी. आमच्याकडे पण एक कल्हईवाले यायचे आमच्या लहान पणी , ते आथव्लं. अगदी सगळं जसंच्या तसं डोळ्यासमोर उभं राहिलं.
पूर्ण करा नं आता