ग्रॅज्युएशन भाग-४

मीनल's picture
मीनल in जनातलं, मनातलं
29 May 2009 - 1:43 am

ग्रॅज्युएशन भाग-१
http://www.misalpav.com/node/7889

ग्रॅज्युएशन भाग-२
http://www.misalpav.com/node/7905

ग्रॅज्युएशन भाग-३
http://www.misalpav.com/node/7939

ग्रॅज्युएशन भाग-४--
प्रॉम ची मजा करून झाल्यावर सुरवात झाली ती COMMENCEMENT CEREMONYची/हायस्कूल ग्रॅज्युएशन सेरिमनिची.
ग्रॅज्युएशन सेरिमनि किंवा हायस्कूल डिप्लोमा देण्याचा औपचारिक समारंभ अमेरिकेतल्या सर्व शाळातून केला जातो. पब्लिक स्कूल किंवा प्रायव्हेट स्कूल मधे जागा, हवामान, विद्यार्थ्यांची संख्या यानुसार समारंभाची पध्दत बदलते.
त्यासाठी स्टेडिअम, ऑडिटोरियम, मोठे पटांगण, ओपन थिएटर किंवा तश्या प्रकारची जागा शाळेला आधीपासून राखीव करून ठेवावे लागते. तिथे साउंड सिस्टीम, कार पार्कींगची आखणी, व्हील चेअर्स अश्या अनेक सोयींचीही व्यवस्था व्यवस्था करावी लागते.
नचिकेतच्या शाळेने आमच्या शहारातल ऍम्फी थिएटर बूक केले होते. शाळेच्या विकली मेल मधून त्याची माहिती ब-याच आधी पालकांना दिली गेली होती. काही दिवस आधी शाळेतर्फे विद्यार्थ्याच्या पालकांना, इतर मित्र मैत्रिणींना या समारंभाला येण्यासाठी पत्रिका देऊन आमंत्रण दिले गेले. आमंत्रण पत्रिकेत जाहिर खबर, समारंभाचा दिवस, वेळ, जागा, कार पार्कंग बद्दल सूचना दिल्या होत्या. प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या नातेवाईक, मित्रपरिवार यांच्या साठी १२ तिकिटे दिली गेली होती.
विद्यार्थ्यांना या समारंभासाठी गाऊन आणि गोंड्याची टोपी आधीपासून ऑनलाईन ऑर्डर करावे लागते. गुडघ्याच्या खालापर्यंत असलेल्या या सैलसर गाऊनला विद्यार्थ्याच्या शरिराच्या अचूक मापाची जरूरीच नसते. मुलांनी आणि मुलींनी घालायच्या गाऊनचा रंग, त्यावरील पॅटर्न शाळेनुसार बदलतात. नचिकेतच्या शाळेत मुलींना मरून लाल रंगाचा गाऊन होता. मुलांना मात्र काळाच घ्यायचा होता.त्यावर काही पट्टे, पॅटर्न नव्हते. पण शाळेने एक सोनेरी रंगाच बटण मात्र गाऊन वर लावायला दिले होते.
टोपीला तर ईलॅस्टिक असल्यामुळे ती कुणाच्याही ङोक्याला बसू शकते. त्याला लटकणा-या रेशमी लांब गोंड्याच्या धाग्याचे रंग शाळेनुसार ठरवलेले असतात. ग्रॅज्युएशन कॅप ही डोक्यावर फ्लॅट घालायची असते म्हणजे टोपीचा चौकोन जमिनीला समांतर राहतो. मुख्य म्हणजे ग्रॅज्युएशनचा डिप्लोमा मिळेपर्यंत टोपीचा रेशमी लांब गोंडा (Tassels) टोपीच्या उजवीकडे ठेवायचा असतो.
विद्यार्थ्यानी केलेली समाज सेवा, मिळवलेले मार्क, शिष्यवृती यानुसार गळ्यात घालायला ऑनर कॉर्डही दिली जातो.आमच्या चिरंजीवांना गोल्ड कलरची ऑनर कॉर्ड मिळाली होती. ती शाळेने दिली... म्हणजे आम्ही घेतली... म्हणजे ....
त्याच अस झाल की एका सकाळी शाळेत निघताना नचिकेत म्हणाला," आई, टेन डॉलर बील आहे का?"
"असेल पर्समधे कदाचित. कशाला रे? तूझ बँकेच कार्ड काय झाल? हरवल का?" माझी काळजीयुक्त विचारणी झाली.
" अग, नाही ग. कार्ड आहे माझ्या कडे. शाळेत हवे आहेत टेन डॉलर्स ऑनर कॉर्ड साठी."
" असला ऑनर? कुणाचा? आणि कोण करतय?" माझा पुढला प्रश्न!
" माझा ऑनर. आपणच करायचा. टेन डॉलर्स देऊन शाळेकडून ऑनर कॉर्ड विकत घ्यायचा कमेंसमेंट् सेरिमनिला घालायला."उत्तर अपूर्णच होत नेहमी प्रमाणे.
"कसला ऑनर? आणि तूझा?" बाबाने प्रश्नावलीत भर घातली.
" I got 88 % above overall in this year. That’s why I will be honored." समाधान कारक असल तरी शंकायुक्त, आश्चर्य कारक अणि गोंधळात टाकणार उत्तर मिळाल.
काहीही पुढे न बोलता/विचारता तो ऑनर विकत घ्यायला १० डॉलरच बील पर्स मधून काढून दिल.
अजून १२ चा निकाल लागलच नव्हता. आम्हाला प्रत्येक टेस्ट, क्विजच्या मार्कांची माहिती ऑनलाईन मिळत असे. पण या वर्षी overall 88 % above मार्क असतील याची कल्पना नव्हती. सुखद धक्क्याने आमची बोलतीच बंद केली होती.
जसजसा त्या समारंभाचा दिवस जवळ येऊ लागतो तसतसा सबडिव्हीजनच्या, सोसायटीच्या प्रवेशद्वाराजवळच्या रस्त्यावरून जाणा-या येणा-या लोकांच्या माहितीसाठी ग्रॅज्युएट होणा-या मुलां-मुलींची नावे बोर्डावर लिहिली जातात. आमच्या ही सबडिव्हीजनच्या प्रवेशद्वाराजवळच्या नचिकेतच नाव झळकत होत. पास व्हायच साध १२ वी! आणि त्याच काय बाई तरी कौतुक?
समारंभाच्या काही दिवस आधी विद्यार्थ्यांचा सराव झाला, त्यांच्या पोशाखाबद्दल सूचना केल्या गेल्या. प्रथेनुसार मुलांनी काळी ट्राऊझर, पांढरा शर्ट, नेकटाय आणि काळे फॉर्मल शूज घालायचे होते आणि मुलींनी शॉर्ट स्कर्ट टॉप किंवा फ्रॉक घालायचा होता जेणे करून तो ड्रेस ग्रॅज्युएशन गाऊनच्या बाहेर खालून लोंबणार नाही. कार्यक्रमाबद्दल, विद्यार्थ्यांच्या कारसाठी असलेल्या राखीव जागेबद्दलही अधिक माहिती दिली गेली.
समारंभाच्या दिवशी ऍम्फी थिएटरला विद्यार्थ्यांना सकाळी पाऊणे दहाला बोलावले होते. पण इतरांना मात्र १० नंतर आत प्रवेश होता.समारंभाच्या जागी प्रवेशद्वारावर कार्यक्रम, ग्रॅज्युएट होणा-या विद्यार्थ्यांची नावे, त्यांना मिळालेले सत्कार, शिष्यवृत्या यांची माहिती देणारी पुस्तिका दिली गेली.
आत जाऊन पाहिले तर ते ओपन ऍम्फी थिएटरला खूपच प्रशस्त होते. त्या ठिकाणी जवळ जवळ २००० लोक तरी बसू शकतील अशी सोय असावी. शांळेच्या विद्यार्थ्यांचे नातेवाईक वगैरे मंडळी उत्साहाने जमा झाले होते.त्यांनी आधी येऊन उत्तम अश्या जागा अडवल्या होत्या. आम्ही उशीरा पोचल्यामुळे आम्हाला मागच्या खूर्च्या मिळाल्या.पहाता पहाता आमच्या मागच्या खूर्च्याही माणसांनी भरून गेल्या.

स्टेज म्हणाल तर हे भल मोठ्ठ. त्याची उंची, लांबी रूंदी प्रचंड होती.शिवाय प्रेक्षकांच्या बसायची सोय ही चांगली होती. उंच छप्परावर मोठाले पंखे होते.आजूबाजूने खुले असलेले हे थिएटर खूप हवेशीर होते.पाय-या पाय-यावरच्या खूर्च्यांमुळे स्टेजचा व्ह्यु कुठूनही नीट दिसता होता. कॅमेरा स्टँड्वर लावून फोटो काढण्यासाठी अधून मधून खूर्च्यांच्या सोबत टेबलाची ही उत्तम सोय होती.

समारंभाची सुरवात झाली काळे गाऊन घातलेल्या शिक्षकांच्या आणि हायस्कूलचे ग्रॅज्युएट होणा-या लाल/काळे गाऊन आणि मॅचिंग रंगाची लाल, काळ्या आणि पांढ-या रेशमी दो-या असलेल्या टोप्या घातलेल्या विद्यार्थ्यांच्या मिरवणूकीने. कार्यक्रमाच्या सुरवातीला शाळेचे गाणे, अमेरिकेचे राष्ट्र्गीत झाले.शाळेचा वाद्यवॄंद्य, गायकावॄंद्य यासाठी आधी पासून सराव करून तयारीत होता.

नंतर समारंभासाठी बोलावण्यात आलेल्या इतर पाहुण्याच तसेच उपस्थितांच औपचारिक स्वागत केल गेल.शाळेचे मुख्याध्यापक आणि इतर मान्यवरांची अभिनंदनाची छोटी भाषणे झाली. हायस्कूलच्या ४ही वर्षात अतिप्राविण्य मिळवलेल्या valedictorian आणि salutatorian विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केल गेल. त्यांना मेडल्स, ट्रॉफीज दिल्या गेल्या आणि त्यांची छोटेखानी भाषण ही झाली.आणि मग उरलेल्या विद्यार्थ्यांपैकी एकेक विद्यार्थ्याचे नाव पुकारून त्या विद्यार्थ्याला स्टेजवर आमंत्रित केले गेले.सर्वच जण आतुर असले तरी अतिशय शिस्तित उभे राहून आपल्या टर्नची वाट पहात होते.

शाळेच्या मुख्याध्यापकाकडून हायस्कूल डिप्लोमा घेण्यासाठी जाताना विद्यार्थ्याच्या स्टेजवरच्या `मार्च`च्या वेळी तर नातेवाईक, मित्रांनी केलेला टाळ्यांचा कडकडाट, जयघोष, नावाचा खेळकर आरडा ओरड विद्यार्थ्याला अधिक अभिमान आणि आनंद देतो यात शंकाच नाही.आम्ही ही आमच्या परीने ओरडण्याचा प्रयत्न केला. आम्ही खूपच मागे असल्यामुळे स्टॅज पर्यंत आमचा आवाज पोचल की नाही कोण जाणे?
डिप्लोमा मिळाल्यावर त्या आठवणींसाठी फोटो काढला गेला. शाळेकडून तो ऑनलाईन विकत घ्यायचा आहे.आम्ही मात्र आमच्या कॅमेरात टिपून घेतला.

समारंभाच्या शेवटी सर्वांना परिचित असा क्षण.तो म्हणजे उंचावर ग्रॅज्युएशन कॅप उडवणे.ही प्रथा सूरू झाली फार पूर्वी नेव्ही मधील ग्रॅज्युऍट्स पासून.१९१२ मधे नेव्हीने ग्रॅज्युऍट्सना नवीन प्रकारची ऑफिसर हॅट दिली. मागिल चार वर्ष मिडशिपमन चे काम करित असतानाची टोपी आता घालण्याची आवश्यक नव्हती. या आनंदाचा उद्रेक झाला त्या जुन्या टोप्या हवेत वर फेकून.पुढिल वर्षी आणि आजतागायत ही प्रथा पाळली जाते.
नचिकेतच्या शाळेच्या ग्रॅज्युएशनच्या समारंभातही ही प्रथा पाळली गेली. ग्रॅज्युएशनचा डिप्लोमा मिळाल्यावर टोपीचा तो गोंडा डावीकडे फिरवायचा असतो. तशी सूचना केली गेली आणि लाल, काळ्या टोप्या वर हवे त उडाल्या. हाच हलकोल्लोळ झाला त्या तरूणाईचा. जणू काही याच खेळासाठी सर्वजण थांबले होते. आम्हीही त्या जल्लोशात सामिल झालो आणि फोटो घेणे मात्र राहून गेले.
टाळ्यांच्या कडकडाटात हायस्कूल ग्रॅज्युएशनचा औपचारिक सोहळा संपला.हायस्कूल डिप्लोमा हातात घेऊन परतत असलेल्या या विद्यार्थ्यांच्या चेह-यावर एक वेगळाच आनंद तरळताना दिसत होता.

हा हायस्कूल डिप्लोमा पुढिल शिक्षणासाठी, नोकरीसाठी आवश्यक असला तरी आताच्या स्पर्धात्मक जगात त्याची किंमत काहीच उरलेली नाही म्हणून अधिक नाव, पैसा आणि सुखमय जिवन मिळवून देण्यास असमर्थ ठरेल याची जाणीव प्रत्येक सूज्ञास असतेच. अधिक शिक्षण, पदव्या, अनुभव यांच्याकडे वाटचाल व्हावी या दृष्टीने या समारंभातील भाषणतून याची पुन्हा पुन्हा आठवण ही करून दिली जाते. अश्या प्रकारच्या COMMENCEMENT CEREMONY चा / हायस्कूल ग्रॅज्युएशनच्या औपचारिक सोहळ्याचा हेतू विद्यार्थ्यांच्या छोट्या यशाची दखल घेणे आणि त्याला अधिक ज्ञान, यश संपादन करण्यास उत्तेजन देणे हाच आहे.
कमेंन्समेंट सेरिमनि हा जिवनातल्या संक्रमणाची, स्थित्यंतराची जाणिव करून देणारा सोहळा. Commencement Means Beginning. सुरवात......नविन शिक्षणाची.....नवीन प्रकारच्या आयुष्याची..... आतापासून केलेली प्रत्येक कृती ही पुढिल आयुष्यासाठी यशाचीच असेल याची काळजी घेणे ही विद्यार्थ्याची जबाबदारी असते. आपण घेतलेले प्रत्येक पाऊल आपल्याला यशाकडे नेणार आहे की अपयशाला कारणीभूत होणार आहे याचा विचार करायची सुरवात.म्हणूनच याच नाव COMMENCEMENT CEREMONY.

जीवनमानप्रकटन

प्रतिक्रिया

चित्रा's picture

29 May 2009 - 2:03 am | चित्रा

सगळे भाग वाचले, आणि आवडले. मुलाचे अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा! आणि तुम्हालाही. मुले शिक्षणासाठी घरापासून लांब जाण्याचे आईवडिलांच्याच जास्त जिवावर येते.

प्राजु's picture

29 May 2009 - 2:04 am | प्राजु

खूपच छान!
सगळेच भाग मस्त झाले आहेत. या लेखामुळे एका सोहळ्याची ओळख करून दिलीस.. धन्यवाद.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

अनामिक's picture

29 May 2009 - 2:07 am | अनामिक

वा वा... छानचं झाली कमेंसमेंट सेरेमनी!
सगळेच भाग आवडलेत!

-अनामिक

धनंजय's picture

29 May 2009 - 2:14 am | धनंजय

घरचे वातावरण, समारंभातला हर्ष, सगळ्याचे वर्णन छान आहे.

मीनल's picture

29 May 2009 - 2:25 am | मीनल

अजून एक भाग राहिला आहे. ग्रॅज्युएशन पार्टीचा!
१-२ दिवसात टाकते तो अंतिम भाग.
मीनल.

बहुगुणी's picture

29 May 2009 - 3:05 am | बहुगुणी

आणि फोटोही छान आले आहेत. नचिकेतचं अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
कमेंन्समेंट सेरिमनिचा अर्थ छान सांगितलाय.

(आमच्या चिरंजीवांच्या मास्टर्सच्या वेळच्या समारंभाची आठवण झाली, त्याने 'वॉक' करतांना ओरडा-ओरडी करण्यात आम्हां आई-बापापेक्षा त्याच्या आजीचाच आवाज जास्त खणखणीत होता! "त्यात काय लाजायचंय, माझं लेकरू परदेशात येऊन डीन्स मेरिट मिळंवतंय! कौतुक नको करायला?")

मदनबाण's picture

29 May 2009 - 3:19 am | मदनबाण

खरचं कौतुक वाटते आहे या सर्व गोष्टींचे... :)

मदनबाण.....

रेवती's picture

29 May 2009 - 5:59 am | रेवती

हा भाग रंगलाय अगदी.....त्या सोहळ्यासारखाच!
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत!

रेवती

स्वाती दिनेश's picture

29 May 2009 - 11:26 am | स्वाती दिनेश

हा भाग रंगलाय अगदी.....त्या सोहळ्यासारखाच!
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत!
रेवतीसारखेच म्हणते,
स्वाती

विसोबा खेचर's picture

29 May 2009 - 7:18 am | विसोबा खेचर

सर्व भाग उत्तम. मीनलतै, तुमचं कौतुक वाटतं!

अजूनही लिहा प्लीज! भरपूर लिहा..

तात्या.

बिपिन कार्यकर्ते's picture

29 May 2009 - 1:46 pm | बिपिन कार्यकर्ते

मीनलतै, हेच बोल्तो. तुमच्याकडे लिहायची हातोटी आहे. बरपूर लिहा. खूप खूप शुभेच्छा!!!

बिपिन कार्यकर्ते

अवलिया's picture

29 May 2009 - 7:24 am | अवलिया

वा! मस्त !! खूपच छान!
सगळेच भाग मस्त झाले आहेत

--अवलिया

क्रान्ति's picture

29 May 2009 - 9:07 am | क्रान्ति

मस्त वाटला हा सोहळा आणि त्याचं वर्णन! फोटोही खासच.
:) क्रान्ति
***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ
मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***
अग्निसखा

सहज's picture

29 May 2009 - 9:18 am | सहज

हा भाग देखील मस्त!

सुबक ठेंगणी's picture

30 May 2009 - 8:08 am | सुबक ठेंगणी

खूप छान झालं आहे वर्णन मीनलताई!
इथे जपानात बालवाडी, प्राथमिक शाळा, कॉलेज आणि विद्यापीठ अशा सगळ्या टप्प्यांवर “ग्रॅज्युएशन सेरेमनी” असते. बालवाडीतली लाल गोब-या गालांची मुलं त्या दिवशी सुटाबुटात असतात. आणि त्यांना कोणी “तू किती हॅंडसम दिसतो आहेस ह्या कपड्यांत!” असं म्हटलं की लाजून अजूनच लाल होतात. फक्त अमेरिकेत नसलेली एकच गोष्ट इथे असते ती म्हणजे, सोहळ्याच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत निदान पन्नासएक वेळा तरी कमरेतून वाकावं लागतं.
माझ्या शाळेतल्या एका मुलाने एक चित्र काढलं होतं. चित्रात फक्त दोन सूट होते. एक लहानपणीचा आणि दुसरा मोठेपणीचा. चित्राचं नाव होतं “सेइचो” म्हणजेच “मोठे होणे”
पण असे सोहळे करून आपण खरंच मोठे होतो का? की उलट सोहळे केल्याने जबाबदारीची सामुदायिक जाणीव होते? हे मात्र माझ्यासाठी आजपर्यंत प्रश्नच आहेत.