अंकिता नव्हे प्रश्नांकिता.

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
7 May 2009 - 8:13 pm

काल माझी आणि अंकिताची धाकेकॉलनीच्या अपनाबाजारात अचानक गाठ पडली.अंकिताचं लग्न झालं असं मला कुणी तरी सांगितलं होतं.मी तिला म्हणालो,
"काय तू मला लग्नाला बोलवायला विसरलीस वाटतं?"
"असं काय काका? कुणाचं लग्न म्हणता?माझ्या लग्नाला मी तुम्हाला विसरेन कशी? आणि लग्न झालं तर माझ्या गळ्यात तुम्हाला मंगळसूत्र दिसणार नाही काय?"
नेहमी प्रमाणे प्रश्नावर प्रश्न विचारणार्‍या अंकिताला मी गंमतीत "प्रश्नांकिता" असं नाव ठेवलं होतं.
ह्यावेळीपण ती प्रश्न करायला विसरली नाही.
"अगं, लग्न झाल्यावर सुद्धा तुम्ही मुली साड्या नेसत नाही.आणि मंगळसूत्र म्हणे साडीशिवाय इतर पोषाखावर "ऑड" दिसतं.असं कुणी तरी म्हणाल्याचं मला आठवतं. तेव्हा म्हटलं.... म्हणजे माझी कुणीतरी फिरकी घेतलेली दिसते.पण ते जाऊदे.मला एक आठवलं,त्याला खूप वर्ष झाली म्हणा.तू पाच सहा वर्षाची असशील.तू एकदा तुझ्या आजोबाना विचारलं होतंस,
"आजोबा,तुम्ही माझ्या लग्नाला याल का?" आठवत असेल तुला"
थोडी आश्चर्यचकीत होऊन मला अंकिता विचारते,
"म्हणजे काय? ते तुम्हालाही माझ्या आजोबानी सांगतलं होतं?"
परत तिचे प्रश्न पाहून मी मनात हंसलो.
"हो,पण मला पूर्ण किस्सा माहित नाही."
मी म्हणालो.

सध्या आंब्यांचा सिझन असल्याने अपनाबाजारने त्यांच्या दुकानाच्या बाहेरच्या लॉबीमधे मंडप घालून आंब्याच्या पेट्या विकण्यासाठी ठेवल्या होत्या. गिर्‍हाईकं तिकडे येऊन आंब्याच्या पेट्या खरेदी करायाची.त्यांना बसण्यासाठी एक दोन बाकं ठेवली होती.
अंकिता म्हणाली,
"काका,चला आपण त्या बाकावर जाऊन बसूया.मी तुम्हाला तो किस्सा सांगते."
मला तिचं मन मोडवेना. आम्ही दोघं एका बाकावर जाऊन बसलो.
अंकिता म्हणाली,
लहानपणी मी आणि माझी धाकटी बहिण आमच्या आजीआजोबा बरोबर सदा आमचा अवसर घालवायचो.
माझ्या आईकडच्या मंडळींचे संबंध अगदी घनिष्ठ असायचे.
आमच्या मावशांची घरं जवळ जवळ होती.माझे नातावईक हेच माझे खरे मित्र मी समजते. आणि म्हणून त्यांना हृदयात जपून ठेवायला हवं.
मला आठवतं,त्यावेळी मी पाच एक वर्षाची होते.मला माझे आजोबा एकदा देवळात घेऊन गेले होते.घरी परत येताना पौर्णिमेचं पिठूळ चांदणं पडलं होतं. आम्ही दोघं हातात हात घालून चालत असताना वर आकाशात हजारो लाखो तारे पाहून माझ्या मनात आलं. आणि मी आजोबाना म्हणाले,
"आजोबा तुम्ही माझ्या लग्नाला येणार ना?
लग्न आणि लग्न समारंभाचं मला त्यावेळी का कुणास ठाऊक विशेष आकर्षण होतं.
मला आजोबा म्हणाले,
"हे बघ बाळा",
मला माहित होतं,माझ्या आजोबांकडून असला प्रतिसाद मला ऐकाचा नव्हता.
"मी तोपर्यंत कुठे असणार?"
मी ती त्यांची थट्टा असं समजून त्याचं उत्तर उचित वाटावं म्हणून मी त्यांना म्हणाले,
"आजोबा, असं कसं?माझं लग्न तुम्हाला कसं चुकेल?"
तेही हंसले आणि मी पण.
"हो गं, माझ्या नाती! मी नक्कीच असणार"
असं ते मला म्हणाले.
मी ज्यावेळी सहा वर्षाची झाले म्हणजे त्यानंतर एक वर्षानंतर माझे आजोबा गेले.ती चांदणी रात्र मला अजून आठवते.ते पुस्सट आणि उदास चलचित्र मी तुटू-फुटू कसं देऊं?

मला आठवतं रात्रीचे दहा,अकरा वाजले असतील, इतक्या उशिरापर्यंत न जागणारी मी डुलक्या काढू लागले होते.
तोपर्यंत माझे आईवडील घरी आले.माझी मावशी आमच्याबरोबर होती.त्यांची कुजबुज त्या त्यावेळच्या शांत वातावरणात ऐकूं येत होती.मी माझ्या अंथरूणात उठून बसले.त्या कुजुबूजीकडे कान लावून ऐकलं आणि समजले.
माझ्या आजोबानी मला वचन दिलं होतं.पण....
मरण हे कुणाला चुकलेलं नाही हे मला समजतं.पण आपलं प्रेमळ माणूस सर्वांसम्मत जुळून येणारी वेळ साधून कसं जाणार?

मी पण माझ्या लग्नात सप्तपदी करताना, होमा भोवती फिरताना, देवा-ब्राम्हणासमोर माझ्या भावी पतीला,
"मी जन्मो-जन्मी तुझ्याबरोबर राहिन"
हे वचन आतूरतेने ऐकणार्‍य़ा त्याला देणारच आहे
ना?"
असं म्हणून तिच्या आजोबांची आठवण काढून अंकिता डोळे पुसत होती.आम्ही दोघं जाण्यासाठी उठलो.
तिला बरं वाटावं म्हणून मी तिला जवळ घेत म्हणालो,
" व्हायचं ते होऊन गेलं.तू वाईट वाटून घेऊ नकोस.
मी येईन ना तुझ्या लग्नाला.तुझ्या आजोबांच वचन खरं करायला.पण मला बोलवायला विसरूं नकोस हां!"
" असं काय म्हणता काका?मी तुम्हाला कसं विसरीन?"
खरंच,असं जाता जाता प्रश्न विचारून जाणारी अगदी नावासारखी प्रश्नांकिताच ती म्हणा.

श्रीकृष्ण सामंत

कथालेख