नाशिकच्या नररत्नांचे हौतात्म्यशताब्दी वर्ष!

सर्वसाक्षी's picture
सर्वसाक्षी in जनातलं, मनातलं
26 Apr 2009 - 11:08 pm

हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यसंग्रामातील क्रांतिपर्वाचा विसाव्या शतकातील पाया म्हणजे अभिनव भारत. नाशिकच्या असंख्य स्वातंत्र्यवीरांचे देशकार्य, समर्पित जीवन आणि तेजस्वी बलिदान स्वातंत्र्यसंग्रामात फार मोलाचे आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी इंग्लंडहुन ब्राउनिंगची पिस्तुले पाठविली, पैकी काही नाशिकात पोहोचली. आणि त्या पिस्तुलांचा वापर करायला अनेक कणखर हात सरसावले.

लोकशाही व स्वातंत्र्याच्या गप्पा मारणाऱ्या इंग्रजांनी हिंदुस्थानात साम्राज्यशाही, अत्याचार आणि दडपशाही चालविली होती. कुणालाही तुरुंगात धाडायला पुरावे, पंच वगैरेची गरजच नव्हती. भयानक छळ करुन हवे ते कबुलीजबाब कोवळ्या तरुणांकडुन जबरदस्तीने लिहुन घेतले जात व पुढे न्यायालयात अभियोग उभा राहिला असता तसे निवेदन करुनही ते सर्व जबाब आरोपींविरुद्ध ग्राह्य धरले जात असत.

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे वडील बंधु बाबाराव सावरकर यांना कवी गोविंद यांच्या कविता प्रसिद्ध केल्याबद्दल काळ्यापाण्याची जन्मठेप सुनावण्यात आली.
क्रांतिरत्न बाबाराव सावरकर

कवी गोविंद - गोविंद त्र्यंबक दरेकर

स्वत:ला सुसंस्कृत म्हणवुन घेणारे इंग्रज ज्या कशाने हिंदुस्थानची अस्मिता जागी होईल, स्वाभिमान जागे होईल वा क्षात्रतेज जागे होईल असा संशय सुद्धा येणारे सर्व साहित्य जप्त करीत असत व ते साहित्य बाळगणे, प्रसिद्ध करणे, वितरीत करणे वा वाचणे हा देशद्रोहाचा गुन्हा ठरविला जात असे. कवी गोविंद म्हणजे तेच ते सुप्रसिद्ध ’रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले’ या काव्याचे जनक. वयाच्या आठव्या वर्षी अपंगत्व आलेले गोविंद यांचे कवित्व बालपणापासुनच दिसुन आले होते. सुरुवातीला लावण्या व शृंगारिक काव्य करणाऱ्या गोविंदांनी पुढे अनेक ओजस्वी काव्ये लिहिली ज्यावर सरकारने बंदी आणली. क्रांतीवीर बाबाराव यांना ज्या चार आक्षेपार्ह कवितांसाठी जन्मठेप दिली गेली त्या कवी गोविंदांच्या चार कविता

१) बोधपर पुरातन मौज- (७ वे कडवे):

पुढे माजतिल परके राक्षस कोणी जरी अनिवार।
काळ्यांचा कलिराजा त्यांना करील सिंधू पार
॥७॥

२)शिवजन्मकालिन लोकमनोवृत्ति - (१० वे कडवे):

आर्यांचा हा परिसुन धावा गहिंवरला गणराय रे।
शिवरूपे मग येऊन मारी त्या परदस्या ठार रे ॥१०॥

३) रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले - (९ वे कडवे):

रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळेना।
असा भूतकालिन सिद्धांत जाणा।
स्वराज्येच्छुने पाहिजे युद्ध केले।
रणावीण स्वातंत्र्य कोणा मीळाले
॥९॥

४) श्री शिवास मावळ्यांची प्रार्थना - (९वे कडवे ):

तेव्हा शिवनेरी। शिव आले। मुदित मावळे झाले।
तेणे डळमळले। परतचे। सिंहासन जुलुमाचे॥९॥
॥शिवबा ! ये रे ये॥

पुढे या अपंग कवीसही सरकारी जुलुम व छळ यांना सामोरे जावे लागले, मात्र आपल्या कवितांमुळे बाबारावांना शिक्षा झाली याचा सल त्यांना कायम होता.

त्या काळी नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सन हा अत्यंत मग्रुर व जुलमी म्हणुन कुख्यात होता. १८८८ साली हिंदुस्थानात आलेला मेसन टिपेट्स जॅक्सन हा कालांतराने उत्तम मराठी व संस्कृतही जाणत असे. त्याला संस्कृतचे विशेष प्रेम होते. त्याने अनेक गरिब संस्कृत पंडितांना आर्थिक मदतही केली होती. त्याला गमतीने ’पंडित’ म्हटले जात असे व तोही असे मह्णत असे की गेल्या जन्मी मी या नाशिक क्षेत्रीचा ब्राह्मण असलो पाहिजे. मात्र तो कट्टर इंग्रज प्रथम होता. त्याच्या एक एक लिला जनक्षोभ वाढवित होत्या. वयाने वडील असुनही तरुणांचे नेते म्हणुन द्न्यात असलेल्या बाबासाहेब खऱ्यांचा छ्ळ, त्यांच्यावर वारंवार सरकार विरोधी भाषणे केल्याचा आरोप ठेवत त्याने सातत्याने बाबासाहेबांच पिच्छा पुरवला व त्यांची वाताहात केली.

स्चातंत्र्याभिमानी बाबासाहेब खरे वकिल

विद्याभूषण तांबेशास्त्री यांच्या बाबतही हाच प्रकार. कधी वंदे मातरम च्या घोषणा दिल्यामुळे अटकसत्र. या सर्वाचा कळस ठरला तो गाडीवानाचा मृत्यु. एका उन्मत्त इंग्रज अभियंत्याने आपल्या मार्गात आला म्हणुन भाऊसिंग या गरीब व निरपराध गाडीवानाचा लाथ्या बुक्क्यांनी मारुन जीव घेतला. मात्र या प्रकरणात जॅक्सनने गोऱ्यांचीच बाजु घेत त्या प्रकरणात गोऱ्या अभियंत्यास निर्दोष जाहिर केले; पुढे खटला भरायचा प्रश्नच नाही. एकीकडे हे जुलुम आणि दुसरीकडे हुतात्मा मदनलाल धिंग्राने केलेला कर्झन वध वा त्या साठी स्विकारलेले हौतात्म्य यामुळे नाशिकातील तरुणांचे रक्त सळसळु लागले.

उन्मत्त व हिंदद्वेष्ट्या जॅक्सनला यमसदनास धाडण्यासाठी पेटलेल्या तरुणांचे कट शिजु लागले. अखेर सर्व घडामोडींना निर्णायक स्वरुप आले व अनंत लक्ष्मण कान्हेरे, कृष्णाजी गोपाळ कर्वे व विनायक नारायण देशपांडे यांनी प्रत्यक्ष कामगिरी करायचे ठरले. मात्र जॅक्सन मुंबईला बढतीवर जाणर असल्याची खबर आली. नाशिक पालिकेतर्फे त्याला पानसुपारीचा समारंभ झाला. याच सुमारास किर्लोस्कर नाटक मंडळी नाशिकात होती. जॅक्सन नाट्यप्रेमी असल्याने विजयानंद नाट्यगृहात होणाऱ्या खेळाला बोलावुन त्याचा सत्कार करायचे ठरवले. आणि हाच दिवस हिच संधी या क्रांतिकारकांनी साधायची ठरवली. दिनांक २१ डिसेंबर रोजी हुतात्मा अनंत कान्हेरे यांनी भर नाट्यगृहात जॅक्सनला अगदी जवळुन गोळ्या घालुन ठार केले. अर्थातच त्याने सुटकेचा कसलाही प्रयत्न केला नाही. एकदा सरकारी दडपशाहीचा वरवंटा फिरू लागताच सर्व धागेदोरे हाती आले व अभियोग उभा राहिला. जॅक्सनचा वध हे केवळ एक निमित्त वा लक्षण आहे मात्रे हे क्षोभाचे द्योतक आहे व अन्यायाला आव्हान देण्याचा जनसामान्यांचा संग्राम आहे व खऱ्या अर्थाने हा सरकार उलथायचा लढा आहे हे सरकारचा ध्यानात आले होते.

भयानक छळ करुन अनेकांकडुन अनेक कबुलीजबाब लिहुन घेतले गेले, जे पुढे अभियोगात नाकारत त्या छळग्रस्तांनी न्यायाधिशांना खरी हकिगत सांगितली पण त्याचा काहीही उपयोग नव्हता. अखेर सरकारने निकालपत्र जाहीर केले

हुतात्मा अनंत लक्ष्मण कान्हेरे - फाशी
हुतात्मा कृष्णाजी गोपाळ कर्वे - फाशी
हुतात्मा विनायक नारायण देशपांडे - फाशी
शंकर रामचंद्र सोमण - काळ्यापाण्यावर जन्मठेप
वामन उर्फ दाजी नारायण जोशी - काळ्यापाण्यावर जन्मठेप
गणेश बाळाजी वैद्य -काळ्यापाण्यावर जन्मठेप
दत्तात्रय पांडुरंग जोशी - दोन वर्षे सक्तमजुरी.

हुतात्मा अनंत लक्ष्मण कान्हेरे

हुतात्मा कृष्णाजी गोपाळ कर्वे

हुतात्मा विनायक नारायण देशपांडे

ठाण्याच्या तुरुंगात असलेल्या या त्रयिसाठी १९ एप्रिल हा दिवस ठरला. त्या दिवशी सकाळी या सर्वांना उठवावे लागले इतके गाढ ते झोपले होते. एकदा निश्चय झाल्यावर चिंता कसली? हुतात्मा कान्हेरे यांनी तर असे सुचविले की पायाखालची फळी कशी ढकलायची ते सांगितले तर ते काम ते स्वत:च करतील. असामान्य धैर्याचे ते तीन महान क्रांतिकारक ठाणे येथील कारागृहात दिनांक १९ एप्रिल १९०९ रोजी राष्ट्राला दास्यातुन मुक्त करण्याच्या प्रयत्नात अभिमानाने फासवर गेले.

ठाणे मध्यवर्ती कारागृह


गेल्या रविवारी त्यांच्या हौतात्म्याला ९९ वर्षे झाली, म्हणजेच आता त्यांचे हौतात्म्य शताब्दि वर्ष सुरू झाले आहे. हुतात्मा कान्हेरे, कर्वे व देशपांडे या क्रांतिकारक त्रयीला सादर वंदन.

(काही कारणास्तव हा लेख फार संक्षिप्त स्वरुपात लिहावा लागला तसेच गेल्या रविवारी प्रसिद्ध करु शकलो नाही यासाठी अत्यंत दिलगीर आहे, क्षमस्व.)

इतिहाससमाजलेख

प्रतिक्रिया

अवलिया's picture

26 Apr 2009 - 11:13 pm | अवलिया

हुतात्मा कान्हेरे, कर्वे व देशपांडे या क्रांतिकारक त्रयीला तसेच सर्व क्रांतीकारकांना सादर वंदन.

--अवलिया

क्रान्ति's picture

26 Apr 2009 - 11:17 pm | क्रान्ति

अत्यंत ओजस्वी, निडर आणि महान क्रांतिकारकांबद्दल अत्यंत माहितीपूर्ण लेख आहे. कवी गोविंदांच्या कवितांचा संदर्भही अनमोल!क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com

ऋषिकेश's picture

26 Apr 2009 - 11:18 pm | ऋषिकेश

हुतात्मा कान्हेरे, हुतात्मा कर्वे व हुतात्मा देशपांडे या क्रांतिकारक त्रयीला सादर प्रणाम
साक्षीजी,
संक्षिप्त कार्यपरिचयाबद्द्ल अनेक आभार

ऋषिकेश

टारझन's picture

26 Apr 2009 - 11:19 pm | टारझन

हे असे लेख वाचले की आम्हाला पण स्फूरण चढते .. त्या काळात असतो तर आम्ही पण बरेच इंग्रज लोळवले असते.

अविनाशकुलकर्णी's picture

26 Apr 2009 - 11:27 pm | अविनाशकुलकर्णी

हे असे लेख वाचले की आम्हाला पण स्फूरण चढते .. त्या काळात असतो तर आम्ही पण बरेच इंग्रज लोळवले असते.

वा टारझन...अहो त्याहि पेक्षा क्रुर व भयानक काळे ईग्रज आहेत देशात..त्यांना लोळवा

दवबिन्दु's picture

27 Apr 2009 - 7:10 am | दवबिन्दु

असच एकडाव विर कोतवाल बद्दल लिहा. ते आपल्या चुलत्यापैकी एक होते. I'm proud of him. He is my hero.

तुमी चान्गल लिहता.

मराठी_माणूस's picture

27 Apr 2009 - 9:02 am | मराठी_माणूस

सर्व क्रांतीकारकांस विनम्र अभिवादन

पाषाणभेद's picture

27 Apr 2009 - 9:17 am | पाषाणभेद

दुर्मीळ माहीती मिळाली.
माहीतीपुर्ण लेख.
धन्यवाद.
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)

अभिज्ञ's picture

27 Apr 2009 - 9:28 pm | अभिज्ञ

अतिशय उत्तम व संग्राह्य लेख,

अभिज्ञ.

--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.

दशानन's picture

27 Apr 2009 - 9:32 am | दशानन

नतमस्तक !

थोडेसं नवीन !

विसोबा खेचर's picture

27 Apr 2009 - 10:19 am | विसोबा खेचर

नतमस्तक..!

साक्षीचे मनापासून आभार...

तात्या.

अरुण वडुलेकर's picture

27 Apr 2009 - 10:30 am | अरुण वडुलेकर

माहितीपूर्ण लेखाबद्धल शत शत धन्यवाद.

परिकथेतील राजकुमार's picture

27 Apr 2009 - 11:21 am | परिकथेतील राजकुमार

सर्वसाक्षीजी नेहमीप्रमाणेच ओजस्वी भाषेतला माहितीपुर्ण लेख.
सर्व क्रांतीकारकांना वंदन.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

स्वाती दिनेश's picture

27 Apr 2009 - 11:46 am | स्वाती दिनेश

हुतात्मा कान्हेरे, कर्वे व देशपांडे या क्रांतिकारक त्रयीला तसेच सर्व क्रांतीकारकांना सादर वंदन.
स्वाती

श्रीयुत संतोष जोशी's picture

27 Apr 2009 - 11:59 am | श्रीयुत संतोष जोशी

अप्रतिम,
एकदा आपल्याला प्रत्यक्ष भेटावेच लागेल.

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

श्रीयुत संतोष जोशी's picture

27 Apr 2009 - 11:59 am | श्रीयुत संतोष जोशी

अप्रतिम,
एकदा आपल्याला प्रत्यक्ष भेटावेच लागेल.

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

नितिन थत्ते's picture

27 Apr 2009 - 7:26 pm | नितिन थत्ते

वंदन

खराटा
(रंग माझा वेगळा)

टिउ's picture

27 Apr 2009 - 8:16 pm | टिउ

विजयानंद नाट्यगृहाचं आता विजयानंद चित्रपटगृह झालंय. खरंतर इतकी महत्वाची आणी अभिमानाची गोष्ट तिथे घडलीये तर एक स्मारक करायला हवं. बरं चित्रपटगृह केलं तर ते तरी नीट ठेवा. आता माहित नाही, पण पुर्वी एकदा तिथे चित्रपट बघायला गेलो असतांना बाल्कनीचा काही भाग खाली पडला होता असं आठवतंय...असो!

बाकी नेहमीप्रमाणेच उत्तम माहितीपुर्ण लेख...धन्यवाद सर्वसाक्षी!

सुनील's picture

27 Apr 2009 - 8:31 pm | सुनील

सुंदर माहितीपूर्ण लेख.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

प्राजु's picture

27 Apr 2009 - 8:32 pm | प्राजु

साक्षीजी..
अत्यंत सुंदर लेख आहे हा.
मनापासून आवडला. अभिमानाने काळीज भरून आले.
त्या त्रयीला शतशः प्रणाम
आपले खूप खूप आभार.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

यशोधरा's picture

27 Apr 2009 - 9:52 pm | यशोधरा

साक्षीजी, माहितीपूर्ण लेख. धन्यवाद.

नाटक्या's picture

27 Apr 2009 - 10:15 pm | नाटक्या

(काही कारणास्तव हा लेख फार संक्षिप्त स्वरुपात लिहावा लागला तसेच गेल्या रविवारी प्रसिद्ध करु शकलो नाही यासाठी अत्यंत दिलगीर आहे, क्षमस्व.)

अहो तुम्ही माफी कसली मागता? आमची ती लायकी तरी आहे का? ह्या सगळ्यांचे देशभक्तांचे हौतात्म्य आमच्या सारखे करंटे विसरतात हिच अत्यंत शरमेची बाब आहे. खरं तर ह्या सगळ्या देशबंधूंची माहीती देउन तुम्ही आमच्यावर फार मोठे उपकार करता आहात. असेच लिहीत रहा. अतिशय सुंदर लेख आहे हा. त्या तिघांच्या देशभक्तीला कोटी-कोटी प्रणाम आणि एक सुंदर लेख आमच्यपर्यंत पोहोचवल्या बद्दल आपले खूप खूप आभार.

- नाटक्या

विसोबा खेचर's picture

28 Apr 2009 - 1:07 am | विसोबा खेचर

ह्या सगळ्यांचे देशभक्तांचे हौतात्म्य आमच्या सारखे करंटे विसरतात हिच अत्यंत शरमेची बाब आहे.

सहमत आहे!

आपला,
(खजील आणि अंतर्मुख) तात्या.

सहज's picture

28 Apr 2009 - 12:36 pm | सहज

पूर्ण सहमत.

हुतात्मा कान्हेरे, कर्वे आणि देशपांडे त्रयीसह ह्या कटातल्या इतर सर्व क्रांतिकारकांना अभिवादन!

(नतमस्तक) चतुरंग

वाटाड्या...'s picture

28 Apr 2009 - 10:08 am | वाटाड्या...

साक्षी शेठ,

अप्रतिम लेख व माहिती. नेहमीप्रमाणेच...त्रिवार वंदन ह्या वीरांना...

टार्‍या म्हणतो त्याप्रमाणे २-३ नक्कीच लोळवले असते...

तुमच्या ह्या लेखाने मिपाच्या किर्तीत मोलाची भर पडली. साठ्वुन ठेवावा असा लेख...

अशी ही दुर्मीळ छायाचित्रे कुठुन मिळवीलीत ?

शतशः आभार,

वाटाड्या...

(ने मजसी ने परत मातृभूमीला....सागरा प्राण तळमळला...)