अनाथाश्रमाची भेट!

उमेश कोठीकर's picture
उमेश कोठीकर in जे न देखे रवी...
7 Apr 2009 - 10:58 am

अनाथाश्रमी जाण्या झाले निमित्त दु:खाचे
बाळ सोडून गेले माझे दोन दिवसांचे
अनाथश्रमी मी गेले दु:ख हलके कराया
माझ्या बाळाच्या आठवाने फुले देवाची बघाया
पोचताच मी तेथे बाई समोर आली
करडा आवाज देता मुले पळत आली
हात जोडून सारी माझ्या समोर बसली
फुले देवाची निष्पाप धुळीत मातेने फेकली
कोणी छोटी कोणी मोठी ठायी त्यांच्या फक्त आशा
आई बाबा या हो लवकर! रडवेली त्यांची दशा!
चूक आमची काय? आम्ही देवाघरची फुले
तुम्ही तरी न्या हो घरी! आईबाबा आठविले
भाव निरागस त्यांचे हसू ओळखीचे वाटे
आई आली का न्याया? प्रश्नचिन्ह मनी दाटे
तान्ही तान्ही गोड बाळे काही रडणे थांबेना
स्पर्श मातेच्या दुधाचा त्यांच्या ओठांना होईना
एक पोर गोजीरवाणी बिलगून मला गेली
कोठे आहे माझी आई? बांध फोडून गेली!
या चिमण्या जीवांचा काय दोष अपराध?
का होईना आई त्यांची पश्चात्तापे दग्ध?
दु:ख बाळाचे माझ्या वाटे क्षुद्र मला जगी
आई आहे मी तुझी बाळा रडू नको उगी!
बाळ कोणते हवे?बाई करे फार घाई
काळवंडली फुले! ही नाही आमची आई!
बाहेर गलका झाला! बाई सांगत आली
बाळ दोन दिवसांचे कोणी टाकून गेली!
कसा बाळाचा आकांत! त्याला काहीच कळेना
होतो आईच्या र्‍हुदयी! आता कोणीच असेना!
पान्हा फुटे गं मला!आत्मा पिळवटून निघे!
हात चिमुकले त्याचे! म्हणे "आई मला घे!"
बाळ माझ्यासाठी गोड छान देवाने पाठविले
आई होईल मी त्याची माझा जीव गलबले!
जगी असता खाण अशी सोन्याची बाई
का होऊ मी फक्त एका सोन्याचीच आई?
माझ्यासारख्या आयांनो! या धावत इकडे
तुमचेच बाळ तुम्हा
येथे फिरून सापडे!
येथे फिरून सापडे!!!!

कविताविचार

प्रतिक्रिया

प्राजु's picture

7 Apr 2009 - 9:42 pm | प्राजु

कवितारूपी कथा आवडली.
अतिशय भावनाप्रधान आहे कविता.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

उमेश कोठीकर's picture

7 Apr 2009 - 11:30 pm | उमेश कोठीकर

धन्यवाद प्राजू. वाचल्यबद्दल.

क्रान्ति's picture

8 Apr 2009 - 8:57 pm | क्रान्ति

काळजाला हात घालणारा विषय आणि आशय! मांडणी पण चांगली केलीय उमेश. आवडली कविता.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com

अनामिक's picture

8 Apr 2009 - 9:03 pm | अनामिक

हेच म्हणतो... आवडली कविता.

-अनामिक