माझ्या शब्दांची पाखरं उडतील वार्यावर
दाही दिशांत फिरून शोधतील तुझं घर
तुझ्या अंगणी विसावा घेतील ती क्षणभर
माझ्यासाठी आणतील तुझ्या गाण्यातले सूर
माझ्या आशेचा पाऊस बरसेल झरझर
ओल्या मातीच्या गंधाने धुंदावेल तुझं घर
मोती थेंबांचे सांडेल तुझ्यासाठी फुलांवर
माझ्यासाठी आणील तो तुझा प्राजक्तबहर
माझ्या स्वप्नांचे काजवे जागतील रात्रभर
उजळेल तुझं घर, तुला दिसेल समोर
उभा अंगणी मोहक चांदण्यांचा गुल्मोहर
माझ्यासाठी झळाळेल तुझ्या हास्याचे झुंबर
माझ्या कल्पनेचा वारा माझा धरून पदर
मला संगती नेईल दाखवाया तुझं घर
मंद शीळ घालून तो उघडील तुझं दार
माझ्यासाठी आणील तो ............तुलाच माझ्यासमोर!
प्रतिक्रिया
26 Mar 2009 - 10:46 pm | प्राजु
चांदण्यांचा गुलमोहोर आणि हास्याचे झुंबर..
मस्त आहेत कल्पना.
जबरदस्त!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/